सोमवार, ३ मार्च, २०२५

महाकुंभयात्रा-२

मला ओळखणाऱ्या लोकांना, मी महाकुंभमेळ्याला जाणार आहे हे ऐकून वाटलेले आश्चर्य स्वाभाविकच होते. माझ्या मूळ स्वभावाशी मेळ न खाणारा हा निर्णय कोणत्या कारणामुळे झाला असेल याची उत्सुकताही अनेकांनी बोलून दाखवली. 

१४४ वर्षांतून एकदा येणाऱ्या प्रयागराजमधील महाकुंभाबाबत जोरदार चर्चा बरेच दिवसांपासून चालू झाली असली तरी त्याकडे मी कधी फारसे लक्ष दिले नव्हते. महाकुंभाची तयारी योगी सरकार कशी करत आहे याबाबतच्या बातम्याही मी वाचत नव्हते. "ज्या सोहळ्यामध्ये मी सामील होण्याची सुतराम शक्यता नाही त्याबाबतची चर्चा मी कशासाठी ऐकायची?" असा माझा निर्विकार दृष्टिकोन होता. १४४ वर्षांतून एकदाच येणारा हा योग आपल्या हयातीत येत आहे हे आपले भाग्य आहे, आणि पुढच्यावेळी आपण या जगात नसू, म्हणून आपण जायला हवे, असे मला अजिबात वाटले नव्हते. महाकुंभामधे अनेक सेलेब्रेटी धेंडांनी हजेरी लावल्याबद्दलही मला कौतुक नव्हते. नागा साधूंना भेटायची इच्छाही मला नव्हती  ओळखीतले, नात्यागोत्यातले अनेकजण महाकुंभासाठी जाणार होते. त्यांच्याकडे, किंवा आधीच तिथे जाऊन आलेल्या मंडळींकडे मी तिथल्या व्यवस्थेबाबत साधी चौकशीही केली नव्हती. कित्येकांच्या संगमस्नानाच्या कथा, फोटो, व्हिडीओ पोस्ट झाले. पण मी त्यापैकी कशाकडेच फारसे लक्ष दिले नव्हते. थोडक्यात काय तर, यापैकी कशामुळेही मला प्रेरित व्हायला झाले नव्हते. 'आपल्याला ज्या गावाला जायचेच नाहीये त्या गावाचा रस्ता कशाला विचारायचा?' अशीच माझी मनोधारणा होती, म्हणा ना. 

महाकुंभ सुरु झाल्यापासूनच, माझ्या काही व्हॉट्सअप ग्रुप्समधले एकदोन महाभाग सातत्याने त्याबद्दल नकारात्मक पोस्ट टाकत होते. काही चांगले घडत असेल तर त्याविरुद्ध नकारात्मक लिहून आनंद मानणाऱ्या काही नतद्रष्ट लोकांच्या त्या पोस्ट्सकडे मी सहसा काणाडोळा करत असते. पण माझ्या मनाला त्या कुठेतरी खुपत होत्या. 'डाव्या' किंवा समाजवादी विचारसरणीच्या तथाकथित 'धर्मनिरपेक्ष' लोकांच्या जिभा, केवळ  हिंदूंधर्मीयांच्या सणां-उत्सवांच्या विरोधात  वळवळत असतात हे मी पाहिले आहे. सनातनी लोक मूलतः सहिष्णू असल्याने, ते अशा विघ्नसंतोषी लोकांना फारसा विरोध करत नाहीत, आणि त्यामुळेच असल्या लोकांचे फावते. 

पहिले दोन आठवडे महाकुंभमेळ्यामधील उत्तम व्यवस्थापनामुळे मोदी-योगीजींची वाहवा जशीजशी व्हायला लागली, तसतशी या गँगच्या लेखणीला जास्त-जास्तच धार यायला लागली. गंगास्नान व त्यायोगे होणारे पापक्षालन अशा काही धार्मिक आस्थांविषयी कुचेष्टा सुरु झाली. तरीही बराच काळ मी अशा लोकांकडे दुर्लक्ष करत राहिले. मात्र, २९ जानेवारीला, मौनी अमावस्येच्या रात्री काही भाविकांच्या मृत्यूची अतिशय क्लेशदायक बातमी आली आणि या नकारात्मक लोकांच्या हातात जणू कोलीतच आले. "महाकुंभमेळ्यात इतकी अव्यवस्था आहे  की चेंगराचेंगरी तर होणारच. अस्वच्छतेचा बजबजाट आहे, रोगराई पसरणार नाही तर काय?" असे 'ज्ञान'  त्यांच्या लिखाणातून पाझरायला लागले.  

त्यापाठोपाठच, म्हणजे ३१ जानेवारीलामाझी एक शालेय वर्गमैत्रिण, सुलेखा कानेगावकर, संगमस्नान केल्यानंतर  फेसबुकलाइव्हवर आली. तिच्या व्हिडिओला अंगठा दाखवून मी तिचे कौतुक तर केलेच. पण ती प्रयागराजमध्ये आहे हे कळताच, 'मौनी आमावस्येला ती कुठे होती? तिला काही त्रास तर झाला नाही ना?' असे प्रश्न माझ्या मनामधे आले. त्यामुळे तिच्या काळजीपोटी मी तिला फोन केला. पुढची १५-२० मिनिटे ती महाकुंभमेळ्यातील सोयी-सुविधांबद्दल भरभरून बोलत राहिली. तेथील सुव्यवस्थेचे तिने केलेले वर्णन ऐकून मी खूपच भारावून गेले. तसेच काहीसे वर्णन माझ्या परिचयातील डॉ. माधवी दातार यांच्या लिखाणातूनही मला नंतर समजले.  

मौनी अमावस्येला घडलेल्या दुर्घटनेनंतर कुंभमेळ्याकडे जाणाऱ्यांचा ओघ बराचसा आटेल अशी काही लोकांची अटकळ होती. पण तसे न होता, प्रयागराजकडे जाणाऱ्यांची संख्या वाढू लागली. त्या दुर्घटनेमुळे योगी-मोदीजींची नाचक्की होईल असेही काही लोकांना वाटले होते. परंतु, तसेही झाले नाही. त्यामुळे त्या विघ्नसंतोषी आणि मोदी-योगीविरोधी आघाडीचा जळफळाट वाढत गेला. त्यांच्याकडून नकारात्मक पोस्ट्सचा आणखी भडीमार सुरु झाला. आमच्या डॉक्टर्सच्या व्हाट्सअप ग्रुपवरील काही डॉक्टरांनी तर ताळतंत्र सोडून व्यक्त व्हायला सुरुवात केली. एखाद्या दुर्घटनेमधे निरपराध व्यक्तींचे मृत्यू झाल्यास, मग ते मृत्यू भले आपल्या शत्रूराष्ट्रवासीयांचे का असेनात,  कुठल्याही संवेदनशील व्यक्तीला दुःखच व्हायला हवे. परंतु, या दुर्घटनेचेही भांडवल करून, आणि क्षुद्र राजकीय वैरभावनेने  टवाळी आणि टिप्पण्या करणाऱ्या या टोळक्याचा मला मनस्वी राग आला. त्यानंतर मात्र मी सातत्याने  कुंभमेळ्यातल्या व्यवस्थेबाबत माहिती घेऊ लागले. माझ्या मैत्रिणीने आणि इतर परिचितांनी सांगितलेल्या सकारात्मक गोष्टी लिहून, सर्व नकारात्मक पोस्ट्सना विरोध दर्शवू लागले. १२ फेब्रुवारीच्या रात्री अशाच काही चीड आणणाऱ्या पोस्ट्स माझ्या वाचनात आल्या. त्या क्षणी माझ्या मनात विचार आला की इतरांच्या माहितीवर विसंबून न राहता  आपणच कुंभमेळ्यात  जावे. स्वतः तिथल्या लोकांशी बोलावे, तिथली व्यवस्था कशी आहे ते स्वतःच्या डोळ्याने पाहावे, आणि मगच या नतद्रष्ट टोळक्याला विरोध करावा. ही तीव्र  इच्छा मला झाली आणि काही तासांच्या आत आम्ही आमची तिकिटे काढलीदेखील! ज्या नकारात्मक लोकांच्या कुचाळक्यांमुळे मला हा अमृतानुभव मिळाला त्यांची मी आयुष्यभर ऋणी राहीन.  

प्रयागराजला जायची आणि यायची विमानाची तिकिटे काढून झाली. आर्मीने खास कुंभमेळ्यासाठी  सुरु केलेल्या armaan या वेबसाईटवर नोंदणी करून आम्ही संगमापर्यंत जाण्यासाठीचा 'आर्मी व्हिजिटर' पास काढला. आर्मीतर्फे बोटीची सोय होईल असेही आनंदने केलेल्या चौकशीतून समजले. संगमाजवळील किल्ला आर्मीच्याच ताब्यात आहे. जुने कॅंटोन्मेंट संगमाजवळ आहे आणि नवीन कॅंटोन्मेंट तेथून ८-९ किलोमीटर दूर आहे. आर्मीतर्फे अगदी स्वच्छ व सोयीस्कर निवासव्यवस्था माफक दरामध्ये आम्हाला मिळू शकली असती. जुन्या कॅंटोन्मेंटमधे, म्हणजे संगमाच्या अगदी जवळ राहता आले तर आम्हाला हवे होते, कारण तेथे राहून संगमापर्यंय जाणे सुकर झाले असते. पण प्रचंड गर्दीमुळे बुकिंग मिळत नव्हते. दूरवरच्या नवीन कॅंटोन्मेंटमधे अगदी डॉर्मेटरी मिळाली तरीही चालेल असा विचार आम्ही केला. परंतु, सातत्याने प्रयत्न करूनही २० तारखेपर्यंत काहीच हाती लागले नाही. 

तेवढ्यात असे समजले की, प्राचीच्या भावाच्या एका पक्षकाराचे वडील प्रयागराजमधील एका मठाचे महंत आहेत. त्यांच्याकडून एखाद्या तंबूची किंवा तत्सम काहीतरी व्यवस्था होण्याची आशा निर्माण झाली. प्रवासाला निघण्याच्या दोन दिवस आधीपर्यंत आमच्या हातात पक्के असे काहीच नव्हते. शेवटी आपापले अंथरूण-पांघरूण किंवा sleeping bags घेऊन जायचीही मनाची तयारी आम्ही केली. पण आमच्या नशिबात काहीतरी वेगळेच होते, त्याबाबत पुढील भागात लिहीन.  

(क्रमशः) 

१९ टिप्पण्या:

  1. तुझ्या व्यक्तिमत्वाला साजेसाच निर्णय तू घेतलास. अभिनंदन 💐
    - विठ्ठल कुलकर्णी

    उत्तर द्याहटवा
  2. उत्सुकता वाढली आहे तुझ्या पुढील ब्लॉगची,मुळात प्रयागराज या स्थानात अलौकिक असं काहीतरी नक्की आहे, मला वाटतं तुम्हीं तेथे काही वर्षे राहिले पण अहात.

    उत्तर द्याहटवा
  3. छान लिहिले आहे.... पुढच्या भागाची वाट बघत आहे

    उत्तर द्याहटवा
  4. छानच लिहीले आहेस.आपले नुकतेच बोलणे झाल्याने तुझ्या लिखाणाची वाट पहात होतो. तुझ्या स्वभावानुसार व्यक्त झाली आहेस अभिनंदन....गोविंद दातार

    उत्तर द्याहटवा
  5. छान ! पुढील भागाची उत्सुकता ..

    उत्तर द्याहटवा
  6. छान इथपर्यंत! पण पुढे केंव्हा,?..
    मेघा

    उत्तर द्याहटवा
  7. 👌पुढील भागाची वाट पहात आहोत

    उत्तर द्याहटवा
  8. खरं म्हणजे मी पण चकित झाले होते. This wasn't THE SWATI, I knew😀पण आता पटले मला ही.
    तुझ्या पुढच्या पोस्ट ची आतुर वाट बघतीय

    उत्तर द्याहटवा
  9. छान लिहिले आहेस, तुझ्या पुढच्या लिखाणाची वाट पहात आहे

    उत्तर द्याहटवा
  10. लिखाण छान आहे , अनुभव दांडगा आहे.

    उत्तर द्याहटवा
  11. पहिला भाग वाचला आणि आताचा हा दुसरा भाग पण छान आवडला. पण आता तिसऱ्या भागातील अजून काय छान वाचायला मिळणार याची उत्कंठा वाढली आहे.
    स्वातीताई, तुमची वाचनाची आवड सुद्धा खूप जुनी आहे . दररोज हिराचंद नेमचंद वाचनालयात कादंबरी घ्यायला यायचा.

    धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  12. सुंदर... पुढील भागाची उत्सुकता

    उत्तर द्याहटवा