शुक्रवार, २३ मे, २०२५

डॉटर इन लव्ह!

गेले काही दिवस मराठी न्यूज चॅनलवर आणि समाजमाध्यमांवर वैष्णवी हगवणे हिच्या दुर्दैवी मृत्यूची जोरदार चर्चा  सुरु आहे. तसेच हगवणे कुटुंबातील मोठ्या सुनेने, मयुरी जगताप-हगवणे हिने सासरच्यांविरुद्ध केलेल्या आणि दाबल्या गेलेल्या पोलीस तक्रारीबाबतही बातम्या समोर आल्या आहेत. सगळे वाचून आणि ऐकून माझे मन गलबलले.  

हुंडाबंदीचा कायदा येऊन साठ वर्षे उलटून गेली. तरीही आज अनेक कुटुंबांमध्ये, या ना त्या मार्गाने, लग्नाच्या वेळीच मुलीच्या माहेरून पैसे उकळले जातात. अनेक घरांमधून, मुलाचे लग्न झाल्यावरही पुढील बरीच वर्षे, सुनेच्या माहेरून पैसे, कापड-चोपड, सोने-चांदी यावी, अशी अपेक्षा असते. आजही भारतीय घरांमधून सुनांचा छळ होतो का? असा प्रश्न मला कोणी विचारला तर मी म्हणेन, हो निश्चित होतो. घरोघरी होणाऱ्या छळाची तीव्रता कमी जास्त असते आणि स्वरूप निरनिराळे असते इतकेच. तो छळ भावनिक, मानसिक, शारीरिक किंवा काहीवेळा लैंगिक स्वरूपाचाही असतो. पण, एकदा का लग्न होऊन तू त्या घरची झालीस की तेच तुझे घर, माहेरी येऊन सासरचे काही सांगायचे नाही आणि सासरी जाऊन माहेरचेही सांगायचे नाही असेच 'संस्कार' कित्येक मुलींवर आजही केले जातात. 'लग्न टिकवणे' अत्यावश्यक आहे आणि ती तुझी जबाबदारी आहे हे अनेक घरातल्या मुलींच्या मनावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे बिंबवले जाते, हे दुर्दैव आहे. वैष्णवीची केस म्हणजे केवळ हिमनगाचे टोक आहे. अशा अनेक मुलींचा सासरी असह्य छळ होत असतो.     

मी एक बालरोगतज्ज्ञ आहे. माझ्याकडे आपली लहानगी बाळे घेऊन तरुण आया येतात. सासरच्या  घरामधे त्यांचा बारीक-सारीक छळ होत असतो, हे मला जाणवते. काहीवेळा त्या मला तसे सांगतातही. कित्येकदा माझ्याकडे बाळाला घेऊन एखाद्या घरची सून येऊन गेली की पाठोपाठ तिच्या सासूचा मला फोन येतो. सून खरोखरीच माझ्याकडे आली का, कधी पोहोचली, माझ्या क्लिनिकमधून कधी बाहेर पडली, असले प्रश्न मला त्या विचारतात. मला अतिशय राग येतो. पण कोणाच्याही खाजगी आयुष्यामधे मी लक्ष घालू शकत नाही. त्यामुळे खरी ती  उत्तरे देऊन मला गप्प बसावे लागते. अनेक सुशिक्षित घरातल्या सुनेला जर दुसरी मुलगीच झाली असेल तर तिच्या सासरचे लोक माझ्यासमोर त्या सुनेला टोमणे मारतात. शक्य असेल तेव्हा मी त्यांना रागावते. पण प्रत्येकवेळी शक्य होतेच असे नाही. 

वैष्णवीच्या मृत्यूला जे कोणी जबाबदार आहेत, त्यांच्यावर यथावकाश कायदेशीर कारवाई होईलही. पण वैष्णवीच्या सासरी तिचा छळ होतो आहे हे माहिती असूनही माहेरच्यांनी तिला पुन्हा-पुन्हा सासरी पाठवून दिले, हेही अयोग्य होते असे मला वाटते. 'शक्यतोवर आपल्या मुलीने सासरी नमते घेऊन, काहीतरी करून, जुळवून घ्यावे' अशीच अनेक माहेरच्यांनी मानसिकता दिसून येते. मुलीचा घटस्फोट झाला आणि ती माहेरी परत आली, तर समाजामध्ये मुलीची आणि पर्यायाने तिच्या माहेरच्यांचीच जास्त बदनामी होते, हेही दुर्दैवाने खरे आहे. त्या दबावाला घाबरून, 'कसेही कर आणि जुळवून घे' असेच अनेकजण आपापल्या मुलीला सांगत असावेत, असे मला वाटते. 'मुलं झाल्यावर होईल सगळं सुरळीत' अशाही विचाराने मुलीला जुळवून घ्यायला सांगितले जाते. कधी-कधी तसे होतही असेल. किंवा काही मुली धीटपणे छळाला प्रतिकार करून सासरच्यांना गप्प बसवतही असतील. पण एकीकडे नवऱ्याची आणि दुसरीकडे माहेरच्यांचीही साथ नसेल तर त्या विवाहितेचा कोंडमारा होतो, ही वस्तुस्थिती आहे.   

असे असले तरीही, समाजात हळूहळू काही चांगले बदल घडत आहेत. माझ्या अगदी जवळच्या दोन मैत्रिणींच्या मुली आपापल्या लहानग्या बाळांना घेऊन माहेरी परतल्या आहेत. सासरी परत जायचे नाही या निर्धारानेच त्या परत आल्या आहेत. या मुलींच्या आई-वडिलांनी माहेरचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडे ठेवले होते, म्हणूनच हे शक्य झाले. या पालकांना समाजाची पर्वा नाही असे म्हणता येणार नाही. पण त्यांना आपल्या मुलींच्या मनःस्वास्थ्याची आणि सुखाची त्याहीपेक्षा जास्त पर्वा आहे, म्हणूनच ते त्यांच्यामागे खंबीरपणे उभे आहेत. माझ्या माहितीतल्या त्या दोन्ही मुली सुसंस्कारित आहेत. सासरी जुळवून घ्यायचा आटोकाट प्रयत्न असफल झाल्यानंतरच त्या सासर सोडून, आणि विवाहबंध तोडून स्वगृही परत आल्या आहेत. त्या मुली स्वतः कमावत्या आहेत, म्हणूनही कदाचित हे सुकर झाले असेल. पण एखाद्या न मिळवत्या मुलीवर असा प्रसंग ओढवला तरी तिलाही माहेरच्यांनी पाठिंबा द्यायला हवा. 

समाजात असे काही चांगले बदल घडत असले तरी काही वाईट बदलही घडत आहेत. सासरच्यांनी सुनेला छळण्याच्या घटना जशा आहेत तशाच सुनांनी सासरच्यांचा आणि नवऱ्याचा अतोनात छळ केल्याचा घटना आज काही कमी नाहीत. 'कौटुंबिक अत्याचार' कायद्याचा गैरफायदा घेणाऱ्या काही सुनाही आज बघायला मिळतात. अशा सुनांच्या कारवायांना घाबरून राहणारे सत्शील आणि सद्वर्तनी कुटुंबीयदेखील माझ्या बघण्यात आहेत. दुर्दैवाने त्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याशिवाय काही पर्यायच नसतो. अशाच प्रकारच्या छळाला कंटाळून आत्महत्या केलेल्या तरुणाची बातमीही नुकतीच वाचनात आली होती. पण सुदैवाने अजून तरी अशा घटनांचे प्रमाण कमी आहे, असे मला वाटते.     

आज एका सुप्रसिद्ध डॉक्टर बाईंनी आपल्या सुनेच्या यशाचे कौतुक आमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर सांगताना, सुनेचा उल्लेख 'डॉटर इन लॉ' असा न करता 'डॉटर इन लव्ह' असा केला. तसा उल्लेख त्यांनी मुद्दाम केला का त्यांच्या फोनने autocorrect केल्यामुळे तो झाला, हे मला माहिती नाही. 

पण 'डॉटर इन लॉ' पेक्षा  'डॉटर इन लव्ह' हे संबोधन मला फार आवडले. घरोघरी आईबाप आपल्या पोटच्या मुलीवर जेवढे प्रेम करतात तेवढेच ते आपल्या सुनेवरही करू शकले तर आपला समाज किती सुदृढ होईल ही कल्पना काही काळ तरी मला सुखावून गेली. तसे खरोखर होईल तो सुदिन! 

२६ टिप्पण्या:

  1. किती छान! Daughter in love असेच असायला हवे. तर अशा वैष्णवी सारख्या घटना कमी होतील. तू विश्लेषण अगदी सखोल केले आहेस.
    मेघा

    उत्तर द्याहटवा
  2. "Daughter in Love", व्वा काय सुंदर कल्पना मांडली आहे, टाळ्या. मस्त

    उत्तर द्याहटवा
  3. Daughter in love
    अप्रतिम लेखांकन केले आहे.

    उत्तर द्याहटवा
  4. छान लेखन. पण यावर उपाय मिळणे अवघड आहे.

    उत्तर द्याहटवा
  5. खूपच छान वास्तव मांडलयस.

    उत्तर द्याहटवा
  6. अजूनही समाजात बदल नाही. तू सुरेखच लिहितेस नेहमीच. जास्तीत जास्त लोकांनी वाचावे ही इच्छा.

    उत्तर द्याहटवा
  7. खूपच संयतपणे लिहिले आहे असे वाटते.
    खरं आहे. स्त्रिया, महिला पुरुषांच्या बरोबरीने कर्तव्य श्रेष्ठ झाल्या तरी घरात त्या पडती बाजू घेतात. कैक वेळा घरातल्या स्त्रियासुद्धा स्त्रियांवर अत्याचार करतात.
    - विठ्ठल कुलकर्णी

    उत्तर द्याहटवा
  8. या बरोबरच Mother in love झाले तर किती छान.

    उत्तर द्याहटवा
  9. फारच छान विचार मांडले आहेत

    उत्तर द्याहटवा
  10. खूपच छान, खरंच daughter in love खुप मस्त आयडिया

    उत्तर द्याहटवा
  11. वास्तववादी लेखन ,अजूनही हुंडा प्रथेतून समाज बाहेर आला नाही ,माध्यम बदलली आहेत.

    उत्तर द्याहटवा
  12. नेहमीप्रमाणे छान लिहलं आहेस. माझ्यामते सासू आणि मुलीची आई ह्यासारख्या घटनांना जबाबदार असतात.

    उत्तर द्याहटवा
  13. समाज वैचारिक रीतीने सुधारणे फार गरजेचं आहे.

    उत्तर द्याहटवा
  14. छान लिहिले आहे, मुली कमावत्या असणं हे त्यांच शस्त्र आहे ते त्यांनी विचारपूर्वक वापरले पाहिजे, वैष्णवी एवढी कमकुवत का होती हा प्रश्न पडतो

    उत्तर द्याहटवा
  15. एकदम छान आणि सविस्तर लिहले आहेस.daughter in love ची कल्पना चांगली आहे पण सुनांनी चांगल्या सासुनांही mother in love म्हणले पाहिजे.
    वैष्णवीच्या बाबतीत तिच्या आईवडीलांना जबाबदार ठरवेन.त्यांनी आधार दिला आसता तर तिच्यावर ही वेळच आली नसती .

    उत्तर द्याहटवा
  16. स्वाती खूपच छान विचार मांडले आहेत. समाज सुधारतोय पण अद्याप ही जे फुकट मिळावे असे कायम वाटत आहे ती विचार धारा आपण कधी सोडणार. Mother in love व्हावे.....
    दातार

    उत्तर द्याहटवा
  17. खरच खूप सुंदर daughter in love 👌

    उत्तर द्याहटवा