आज आमच्या लग्नाचा वाढदिवस. व्हॉटस्अप-फेसबुक-फोन या सर्व माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. छान वाटलं.
हल्ली लोक कुठे-कुठे जाऊन त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करतात, एकमेकांना महागड्या आणि 'सरप्राईझ गिफ्ट्स' वगैरे देतात. आम्ही मात्र आमच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करायची पद्धत कधीच ठेवलेली नाही. आज आम्हाला नेमके पुण्याजवळच्या रिसॉर्टमधे एका लग्नासाठी जायचे होते. त्यामुळे सकाळपासून तयार होऊन वेळेवर लग्नस्थळी पोहोचण्याची गडबड होती. तिथेच गोडाचे जेवण करून आम्ही आमच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला!
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांमधे एका मैत्रिणीने, "नांदा सौख्यभरे" अशा शुभेच्छा पाठवल्या आणि मला हसू आले. आमच्या लग्नाला आज ३९ वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे आम्ही सौख्यभरे नांदतो आहोत, हे तर निश्चितच आहे.
मागच्या महिन्यात, आनंदचे काही सेवानिवृत्त आर्मी अधिकारी मित्र आणि त्यांच्या पत्नी असे एकत्र जेवायला गेलो होतो. गप्पांच्या ओघात 'नवरा-बायकोची भांडणे' हा विषय सुरू झाला. मग काय विचारता? सगळ्यांनाच कंठ फुटला. "नांदा सौख्यभरे" अशा शुभेच्छा आज मला माझ्या ज्या मैत्रिणीने पाठवल्या तिनेच, तिची आणि तिच्या नवऱ्याची कशाकशावरून भांडणे होतात, याचे रसभरीत वर्णन त्या दिवशी केले होते. थोड्याफार फरकाने इतरही सगळ्याचे असेच अनुभवकथन झाले. अत्यंत क्षुल्लक किंवा अगदी हास्यास्पद वाटणाऱ्या कारणांवरून, आमच्यासारखेच इतरही सगळे नवराबायको अगदी कडाकडा भांडतात, हे ऐकून मला हायसे वाटले. लग्नाला पन्नास वर्षे झालेल्या नवरे-बायकांचेही अनुभव असेच होते. त्यातली एक तर म्हणाली, "आम्हा दोघांनाही एकमेकांशी भांडल्याशिवाय चैनच पडत नाही. एखाद्या दिवशी कुठल्याही कारणावरून भांडण झालेच नाही तर अगदी चुकल्या-चुकल्यासारखे वाटते. या वयात नवरा-बायकोंना भांडण्यासाठी हक्काचा पार्टनर म्हणून एकमेकांची जास्त गरज असते!"
माझ्या मैत्रिणीने, "नांदा सौख्यभरे" असा शुभसंदेश पाठवल्यावर मी तिला प्रश्न विचारला , "अगं भांडा सौख्यभरे, असं तुला म्हणायचेय का? " तिचे हसून उत्तर आले, "ते तुमचे रोजचे चालूच असणार आहे. म्हणून आज 'नांदा सौख्यभरे', अशा शुभेच्छा दिल्या आहेत."
आजचा दिवस संपत आला. आश्चर्य म्हणजे आज कुठल्याही विषयावरून आमचे भांडण झाले नाही. मैत्रिणीच्या शुभेच्छा आजचा एक दिवस तरी पुरल्या आहेत, हेही नसे थोडके!

असू दे की! जो नांदतो, तोच तर भांडतो! छान निरीक्षण!
उत्तर द्याहटवामेघा
मला वाटत नाही, तुम्ही दोघं भांडत असाल असं. कोकणस्थ आहात. मोजकेच शब्द वापरत असणार. 😀
उत्तर द्याहटवानांदा सौख्यभरे, आनंदी आनंद गडे 👍
- विठ्ठल कुलकर्णी
खूपच छान लिहिलंय 😊👍
उत्तर द्याहटवासंसार म्हणजे भांडणे आलीच, तरी पण आपण एव्हढी वर्षे एकत्र आहोत ह्यातच एक मेका विषई असलेली आपुलकी दिसून येते आणि ह्यातच सर्व सुख समाविष्ट आहे. विवाह वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
उत्तर द्याहटवासौ स्वाती आणि श्री आनंद विवाह वर्धापन दिनाच्या शुभेच्छा
उत्तर द्याहटवाफारच भारी! खूपच मजेशीर !
उत्तर द्याहटवाहलकंफुलकं लेखन!
स्वाती तुम्हां दोघांनाही मन:पूर्वक अभिष्टचिंतन.
उत्तर द्याहटवाविवाह वर्धापनदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा
उत्तर द्याहटवातुझ्या कडे भांडणे एकतर्फीच होत असतील असे वाटते.
उत्तर द्याहटवाकहानी घर घर की👍😀
उत्तर द्याहटवाVery Beautiful.
उत्तर द्याहटवाविवाह वर्धापनदिनानिमित्त थोड्या उशिराने हार्दिक शुभेच्छा
उत्तर द्याहटवास्वाती प्रेमाचा मार्ग पोटातून जातो…तू उत्तम सुगरण आहेस…रोज एवढे छान छान पदार्थ करतेस…मला वाटत नाही तुमच कधी भांडण होत असेल म्हणून.
उत्तर द्याहटवाआणि आनंद खूपच सहकार्य करणारा आहे….
खुप छान लिहलेस.वाचताना मजा आली.
उत्तर द्याहटवातुम्हा दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा
छान लिहिले आहेस. तुम्हां उभयतांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
उत्तर द्याहटवाकिती छान लिहिले, बाई! काय करू तुला?
उत्तर द्याहटवाएकच सांगते "दिवसभर भांडा आणि आयुष्यभर नांदा! "
असं म्हटलं तरी तुमच्यातील नाजूक प्रेमाचं रेशमी बंधन खूप बळकट आणि घट्ट आहे, ते तसेच असणार.
तुम्हां दोघांनाही खूप खूप शुभेच्छा आणि प्रेम!