शिखांच्या धार्मिक वस्तू विकणाऱ्यांच्या दोन टपऱ्या गेल्या काही दिवसांपासून माझ्या क्लिनिकच्या समोरच्या रस्त्यावर अनधिकृतरीत्या लागल्या आहेत. त्याच्या बरोबर समोर, पाच-सहा वर्षांपासून, एक असेच अनधिकृतपणे बांधलेले छोटेसे दत्ताचे देऊळ होते. त्या देवळाचा 'जीर्णोद्धार' नुकताच झाला. आज दत्तजयंतीचा मुहूर्त साधून मूर्तीची पुनर्स्थापनादेखील झाली. हे देऊळ तसे काही वर्षांपूर्वीच बांधलेले होते आणि काही पडझड वगैरेही झालेली नव्हती. तरीही त्याचा जीर्णोद्धार करावा असे कुणाच्यातरी मनात का आले असावे? बरं, देवळाचा जीर्णोद्धारही कदाचित अनधिकृतपणेच झाला असावा! भक्तांची हीSS भलीमोठ्ठी रांग लागली होती दर्शनासाठी. शेजारी मंडप, लाऊडस्पीकरवर गाणी आणि प्रसादाचे जेवणही होतेच. रस्त्यावर गर्दी, वाहतुकीची कोंडी हे सर्व त्याबरोबर आलेच. अनधिकृतपणे रस्त्यावर दुकान उभे राहत असताना, देऊळ बांधताना अथवा त्याचा जीर्णोद्धार होताना, किंवा एकूणच अशा सर्व अनधिकृत कारवाया प्रशासनाच्या लक्षांत का येत नाहीत? या सगळ्या गोष्टी मलाच इतक्या त्रासदायक का वाटतात?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा