रविवार, २४ जुलै, २०१६

मोडणं सोपं असतं...

वर्षभरापूर्वी, म्हणजे २३ जुलै २०१५ रोजी, माझ्या ८६ वर्षांच्या सासूबाई बागेत फिरायला गेलेल्या असताना पडल्या आणि डोक्याला छोटी खोक पडली. मेंदू भोवती थोडा रक्तस्त्रावही झाला. मार अगदीच थोडा लागलेला असला तरीही त्या मनाने खचल्या आणि पुढे २० डिसेम्बर २०१५ ला त्यांनी इहलोकीचा निरोप घेतला. हा अपघात व्हायच्या दिवसापर्यंत माझ्या सासूबाई आणि माझे ९१ वर्षांचे सासरे असे दोघेच सारसबागेजवळच्या त्यांच्या सदनिकेत राहत होते. त्या वास्तूत जरी ते ३८ वर्षे राहत असले तरी त्यांचा ६७ वर्षे संसार झाला होता. 

सासूबाईंचा अपघात झालेल्या दिवसापासून, माझे सासरे माझ्या नणंदेकडे राहात असल्यामुळे त्यांची सदनिका आजपर्यंत बंदच होती. आज मात्र माझ्या सासऱ्यांनी, आम्हा सर्वांना, त्यांची दोन्ही मुले, दोन्ही सुना आणि त्यांच्या मुलीला, एकत्रित स्वतःच्या वास्तूत बोलावून घेतले. त्यांची सदनिका भाड्याने देऊन टाकावी असा विचार आता  पक्का केल्याचे सासऱ्यांनी आम्हाला सांगितले. तिन्ही अपत्यांनी त्यांच्या घरातले जे सामान ज्याला वापरासाठी हवे आहे ते एकमताने वाटून घेऊन घर रिकामे करावे असेही सुचवले. 

त्यांच्या इच्छेला मान देऊन माझा नवरा आनंद, माझे दीर,आम्ही दोघी सुना, आणि आमची नणंद अशा पाच जणांनी मिळून, भांडी-कुंडी, लाकडी सामान, पुस्तके, अशा वस्तू सामंजस्याने वाटून घेतल्या. काही वस्तू आजच्या फेरीतच उचलून आपापल्या घरी नेल्या. काही पुढच्या एक-दोन फेऱ्यांमध्ये नेऊ आणि ते घर रिकामे करू. माझ्या सासू सासऱ्यांच्या घरात तसे फार सामान नव्हतेच. आम्ही बरेचसे सामान वाटून घेतले असले तरी काही सामान कोणीच घेऊ इच्छित नव्हते. ते कोणा गरजू व्यक्तींना द्यावे किंवा मोडीत टाकावे असे ठरले.    

सामान घेताना माझ्या मनाची नकळतच घालमेल चालू झाली. पण मन घट्ट करून काही सामान घेतले. या गोष्टी सासूबाईंची आठवण म्हणून आपल्या घरी वापरात राहतील, याचे समाधान होतेच. आणलेले सामान साफ करण्यात आणि लावण्यात उरलेला दिवस गेला. पण कुठेतरी, मनाच्या कोपऱ्यातला एक विचार, सतत मनाला टोचतो आहे. माझ्या सासू-सासऱ्यांनी साठाहून अधिक वर्षांमध्ये जोडलेला त्यांचा संसार मोडायला साठ मिनिटेही लागली नाहीत. 

आज मला प्रकर्षानं जाणवलं, की  घर मोडणं सोपं आहे पण घर जोडणं फार अवघड आहे. आज आपण एक घर मोडलं, हा विचार त्रासदायक होतोय. पण आता मनाच्या प्रवाहाला मोडता घालून हा क्लेशदायक विचार मला मोडीत टाकलाच पाहिजे!   

1 टिप्पणी: