Thursday, 11 November 2021

३. मीनाक्षीअम्मन

आम्ही १५ ऑक्टोबरला दुपारी मदुराईला पोहोचलो. दादांना दगदग होणार नाही अशा बेताने, मदुराई आणि रामेश्वरची सहल अगदी आरामात करायची असेच आम्ही ठरवले होते. त्यामुळे पोहोचलो त्या दिवशी कुठेही बाहेर न पडता "ताज गेट वे" या रिसॉर्टमध्येच आम्ही आराम केला. मदुराई एयरपोर्टवरून रिसॉर्टकडे जाताना, मणी नावाच्या एका टॅक्सीचालकाशी शिरीषने संधान बांधून ठेवले होते. त्याच्या टॅक्सीतून त्याने आम्हाला १६ तारखेला मदुराई दर्शन करवावे, आणि १७-१८ ऑक्टोबरला रामेश्वर दर्शन करवून, १९ ऑक्टोबरला मदुराई एयरपोर्टवर सोडावे अशी बोली शिरीषने मणीसोबत ठरवली. त्यानुसार, मणीची स्वतःची झेस्ट गाडी आणि त्याच्याच ओळखीतल्या, सत्त्या नावाच्या ड्रायव्हरची इनोव्हा गाडी, अशा दोन गाड्या १६ तारखेला सकाळी ९ वाजता, आमच्या दिमतीला हजर झाल्या. मीनाक्षी मंदिर दुपारी बारा वाजता बंद करतात असे कळल्यामुळे आम्ही सगळे तयार होऊन, सकाळी  १० वाजेपर्यंत मंदिराकडे जायला निघालो. 


मीनाक्षी मंदिर अतिशय भव्य-दिव्य आहे. मंदिराच्या चारही दिशेला असलेल्या द्वारांची उत्तुंग गोपुरे दूरवरूनच दिसू लागतात. मंदिरापासून साधारण ५०० मीटर अलीकडे गाड्यांमधून उतरून, मंदिरापर्यंत चालत जावे लागते. दर्शनासाठी तिकीट काढावे लागते. बाहेर चपला-बूट ठेवण्याची व्यवस्था आहे. मंदिरात मोबाईल अथवा कॅमेरा न्यायला बंदी आहे. मंदिरात जाताना स्त्रियांनी साडी अथवा सलवार-कमीज-दुपट्टा असा वेष घालावा आणि पुरुषांनी पँट/ धोतर/ लुंगी नेसलेली असावी, असा नियम आहे. आमचे दादा नेमके बर्म्युडा  घालून आलेले होते. रिसॉर्टमधून निघण्याच्या गडबडीत ते आमच्या कोणाच्याच लक्षात आलेले नव्हते. मग दादांसाठी वेल्क्रो-वाली लुंगी विकत घेऊन, बर्म्युडा पँटच्यावरच त्यांच्या कमरेला ती गुंडाळली. गंमत म्हणजे, देवळात अनेक मद्रासी 'लुंगे-सुंगे', आपली लुंगी अर्धी दुमडून, कमरेला खोचून हिंडत होते.आणि त्याबाबत मात्र कोणीही आक्षेप घेत नव्हते. 

मीनाक्षी मंदिराच्या आवारात अनेक लहान-मोठी मंदिरे आहेत. तिथे व्हीलचेअर मिळाल्यामुळे दादांना दर्शन घेणे जरा सुखकर झाले. मंदिराची आणि देवदेवतांची माहिती कळावी म्हणून, आम्ही एक गाईड केला होता. तो त्याच्या तमिळ-हिंदीमधून आम्हाला, तिथल्या मूर्तींबाबत वेगवेगळ्या दन्तकथा सांगत होता. मीनाक्षीच्या रूपातील पार्वती आणि सुंदरेश्वराच्या रूपातील शंकर यांचा लग्नसोहळा सर्व देवी-देवतांच्या उपस्थितीत झाल्याचे सांगितले जाते. एकावेळी हजारो लोकांना सहजी सामावून घेईल इतके हे मंदिर भव्य आहे.  मंदिरात गर्दी होती आणि खूप उकडत होते. मीनाक्षी मंदिर आणि तिथल्या प्रत्येक खांबावरील कोरीव कामाचे निरीक्षण करायला आणि प्रत्येक मूर्तीचे महत्व समजावून घ्यायला कमीतकमी एक पूर्ण दिवस हवा. त्यामानाने आम्ही ते मंदिर अगदीच भराभरा पहिले. मीनाक्षी अम्मनच्या मूर्तीचेही अगदी ओझरतेच दर्शन झाले. मंदिराच्या परिसरांत एक हजार खांब असलेले एक भव्य दालन किंवा मंडप आहे. त्या प्रत्येक खांबावर उत्तम कोरीव काम केलेले आहे. त्या दालनांत सध्या एक संग्रहालय केलेले आहे. या दालनाला काही काळापूर्वी आग लागून बरेच नुकसान झाले आहे. तिथेच एका कोपऱ्यात, 'म्युझिकल पिलर्स' आहेत. त्या खांबांवर आघात केला असता, मधुर सूर वाजतात असे आम्हाला समजले. पण तो भाग बंद केलेला असल्याने आम्हाला तिथपर्यंत पोहोचता आले नाही. 

मीनाक्षी मंदिराचा फेरफटका आणि दर्शन झाल्यावर बऱ्यापैकी दमणूक जाणवत होती. त्यामुळे रिसॉर्टमधल्या वातानुकूलित खोलीत जाऊन एक झोप काढावी असा माझा विचार होता. पण गिरीशला अचानक हुक्की आली की, आपल्या गृहलक्ष्मीला, म्हणजे प्राचीला, साडीखरेदीसाठी नेऊन खूष करावे. दादांना दुपारी विश्रांती घेणे आवश्यक असल्याने ते रिसॉर्टवर परतणार होते. दादांच्याच गाडीत शिताफीने घुसून, आनंद, शिरीष व देवाशिष हे तिघेही रिसॉर्टवर विश्रांती घेण्यासाठी सटकले. मला मात्र त्या साडी-खरेदी दौऱ्यावर अगदी नाईलाजानेच, पण जावे लागले. गिरीश-प्राची, ज्योत्स्ना आणि मी पुढील तीन तास तंगडतोड करून शेवटी प्राचीसाठी दोन रेशमी साड्यांची खरेदी केली. तोपर्यंत पाच वाजून गेले होते. संध्याकाळी साडेसहाला नायकर महालातील 'लाईट आणि साउंड शो'  पाहण्याचे आमचे आधीच ठरले होते. उरलेल्या थोडक्या वेळात आम्हाला रिसॉर्टवर जाऊन, वेळेत परत येणे शक्य नव्हते. त्यामुळे नायकर महालाजवळच थोडा वेळ काढायचे आम्ही ठरवले. जवळच्या एका हॉटेलमध्ये उत्तम कॉफी प्यायलो आणि एका हलवायाच्या दुकानातून, दोन-तीन प्रकारची मिठाई, काजूची भजी व इतर काही नमकीन घेऊन आम्ही नायकर महालात पोहोचलो. रिसॉर्टवर गेलेले लोक मस्त झोप काढून, ताजेतवाने होऊन नायकर महालापाशी पोहोचलेले होते. नायकर महाल भव्य आहे, पण तिथला 'लाईट आणि साउंड शो' अगदीच सुमार आहे. मला तर बराच काळ डुलकी लागली होती! 

सकाळी भरपेट नाश्ता झालेला असल्याने आम्ही दुपारी जेवण केलेले नव्हते. दिवसभर नारळाचे पाणी, चहा कॉफी आणि मदुराई-फेम 'जिगरठंडा' नावाचे पेय पीत हिंडत होतो. संध्याकाळी 'लाईट आणि साउंड शो' बघत असताना काजूची भजी आणि केळ्याचे वेफर्स खाल्ल्यामुळे तोंड चांगलेच खवळलेले होते. रात्रीपर्यंत कमालीची भूक लागली होती. त्यामुळे, आम्ही मदुराईचे सुप्रसिद्ध, 'सबरीस' रेस्टोरंट गाठले. तिथले दोसे, इडली, आप्पम असे अनेक गरमागरम व चवदार पदार्थ खाऊन आमचे पोट अगदी तुडुंब भरले. तरीदेखील, संध्याकाळी विकत घेतलेल्या मिठाईचाही आस्वाद आम्ही घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून रामेश्वरला जायचे असल्याने लवकर झोपणे आवश्यक होते. तरीही झोपायच्या आधी थोडावेळ पत्ते खेळण्याचा मोह आम्हाला टाळता आला नाही. 

माझ्या आईचे माहेरचे नाव मीनाक्षी होते. मदुराई-रामेश्वरची सहल ठरवली तेव्हापासूनच आणि संपूर्ण सहलीच्या काळात, माझ्या दिवंगत 'मीनाक्षीअम्मन'ची आठवण मला सातत्याने अस्वस्थ करत राहिली होती.   

                                                                                                                                                      (क्रमशः )

10 comments:

 1. खूपच छान. संपू नये असे वाटते.

  ReplyDelete
 2. छान प्रवासवर्णन.

  ReplyDelete
 3. स्वाती नेहमी प्रमाणेच प्रवासवर्णन खूप छान.👌👌

  ReplyDelete
 4. क्या बात है! फार छान. ह्या भागाचा समारोप फार छान केलास. पूर्ण मंदिर पहात असताना मनात आई होती. हे हलकेच हळूच सांगितलेस. प्रवास वर्णन नेहमी प्रमाणे सुरेख
  सुबद्ध.

  ReplyDelete
 5. छानच. प्रथम लिहिलेले शेवटी वाचले. पण चांगलेच वाटले. धन्यवाद .

  ReplyDelete