बुधवार, १७ नोव्हेंबर, २०२१

७. रामरक्षां पठेत्प्राज्ञ: ...

१८ ऑक्टोबरला पहाटे मी व माझी वहिनी प्राची स्फटिकदर्शनाची अनुभूती घेऊन सकाळी साडेसात वाजेपर्यंत हॉटेलवर परतलो. त्याआधी, संध्याकाळचा अभिषेक करण्यासाठी गुरुजींशी पक्के बोलणे केले होते. नाश्ता झाल्यावर आम्ही सगळेजण इतर ठिकाणे बघायला बाहेर पडलो. सर्वप्रथम, दिवंगत राष्ट्रपती, डॉ. अब्दुल कलाम यांचे स्मारक बघायला गेलो. रामेश्वरजवळ  पीकारंबू  येथे डॉक्टर कलामांना दफन केले आहे. त्याच ठिकाणी उभारलेल्या या संग्रहालयाचे उदघाट्न, डॉ. कलामांच्या दुसऱ्या पुण्यतिथीच्या दिवशी, म्हणजे २७ जुलै २०१७ ला,  पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते झाले. या संग्रहालयात प्रवेश विनामूल्य असला तरी, तिथे जतन करून ठेवलेला ठेवा मात्र अमूल्य आहे. प्रवेशद्वारावरच "मिसाईल मॅन" ची ओळख सांगणारी, 'अग्नी' क्षेपणास्त्राची प्रतिकृती आहे. डॉ. कलामांच्या काही वैयक्तिक वापरातल्या वस्तू, व अनेक छायाचित्रे आणि पेंटिंग्ज या संग्रहालयात आहेत. डॉ. कलाम वीणा वादनात निपुण होते. त्यामुळे, ते वीणा वादन करीतअसतानाचा त्यांचा एक सुंदर पुतळा आहे. तसेच डॉ.  कलमाची काही भाषणे आपल्याला वाचायला मिळतात.
 
संग्रहालय बघून झाल्यावर सगळ्यांनी  रस्त्यावरच्या शहाळ्याच्या गाडीवर नारळपाण्याचा आस्वाद घेतला.  त्यानंतर  आम्ही कोदंडरामस्वामी मंदिर बघायला निघालो. धनुषकोडीच्या रस्त्यावर, रामेश्वरपासून सुमारे १० किलोमीटरवर, डाव्या बाजूला एका बेटाकडे जाणारा रस्ता आहे. एका बाजूने बंगाल महासागर आणि दुसऱ्या बाजूने मन्नारची खाडी यांनी वेढलेल्या या बेटावर, हे पुरातन मंदिर आहे. यामध्ये कोदंडधारी (धनुर्धारी) राम, आणि  लक्ष्मण, सीता, हनुमान व बिभीषण यांच्या, काळ्या दगडातील रेखीव मूर्ती आहेत. रावणाचा वध केल्यानंतर, याच जागी प्रभू रामचंद्रांनी  बिभीषणाला पट्टाभिषेक किंवा राज्याभिषेक केला अशी पौराणिक कथा, या मंदिराबाबत सांगितली जाते.
 

१९६४ सालच्या भीषण चक्री वादळांत संपूर्ण धनुष्यकोडी गाव उध्वस्त झाले होते. मात्र त्या तडाख्यात हे मंदिर अभंग राहिले, हे विशेष आहे. मंदिराच्या तिन्ही बाजूने नितळ समुद्र होता. भन्नाट वारे वाहत होते पण उन्हाचाही तडाखाही जाणवत होता. आम्हाला धनुषकोडी येथील रामसेतू पॉईंटला पोहोचण्याची ओढ लागलेली असल्याने आम्ही तिथून निघालो. 


धनुषकोडीकडे जाणारा सरळसोट रस्ता आणि दोन्ही बाजूला दिसणारा निळाशार अथांग समुद्र, त्यावरचे अफाट वारे, समुद्रकिनाऱ्यावरील पांढरीशुभ्र वाळू आणि वर दिसणारे निरभ्र आकाश, हे सगळे आपल्याला कमालीचा आनंद देऊन जाते. त्या रस्त्यावर आपण जसजसे पुढे-पुढे जात राहतो, तशी वस्ती विरळ होत जाते. वाटेत, १९६४ सालच्या वादळांत संपूर्णतः उध्वस्त झालेल्या धनुष्यकोडी गावाचे अनेक भग्नावशेष बघायला मिळतात. त्या घटनेनंतर तेथे पुन्हा कधीही वस्ती न झाल्याने आज ते "घोस्ट टाऊन" म्हणूनच ओळखले जाते. १९६४ पूर्वी  धनुष्यकोडीपर्यंत रेल्वे येत असे. धनुषकोडीचे जुने, पडके रेल्वे स्टेशन आणि एका चर्चच्या पडक्या भिंतीही दिसतात. 

रस्त्याच्या शेवटी, म्हणजेच भारतभूच्या टोकावर असलेल्या, रामसेतू पॉईंटचे दृश्य फारच रोमांचकारी होते. या  ठिकाणापासून, समुद्रमार्गे श्रीलंका केवळ १८ ते २० किलोमीटर दूर आहे. रामसेतू पॉईंटवर वेगवेगळ्या ठिकाणी उभे राहून आम्ही बरेच फोटो आणि व्हिडीओ काढले. उसळणाऱ्या समुद्राच्या लाटांचा फेस मनसोक्त अंगावर घेतला. आसपास, डोक्याला टॉवेल गुंडाळलेल्या अनेक तामिळी बायका, भर उन्हात उभे राहून अननस, काकडी आणि कैऱ्यांचे काप विकत होत्या. आम्ही अननसाचे आणि कैऱ्यांचे भरपूर काप खाल्ले. तिथलय फिरत्या विक्रेत्या बायकांकडून शिरीषने, इलिना,अन्य आणि नूर या नातींसाठी मोत्याच्या माळा विकत घेतल्या. धनुषकोडीहून दुपारी चार वाजायच्या आत परतावे लागते, हे माहित असल्याने आम्ही रामेश्वरकडे परतीचा प्रवास सुरु केला. 

धनुषकोडीच्या वाटेवर, चंद्रमौळी टपऱ्यांमध्ये 'परमेश्वराच्या प्रथमावतारा' चे सेवन केल्याशिवाय परत येऊ नका, असा प्रेमळ सल्ला काही हितचिंतकांनी आम्हाला दिला होता. अशाच एका अगदी छोट्या टपरीत आम्ही थांबलो. पोटाला तडस लागेपर्यंत जेवलो. मोक्षप्राप्तीचे सुख काय असू शकेल याचा अंदाज आम्हाला त्या मत्स्यभोजनानंतर आला. मुख्य म्हणजे, ते सुख मिळवायला अत्यंत अत्यल्प खर्च आला. सर्वसाधारणपणे, आपल्याकडच्या चांगल्या हॉटेल्समध्ये असे रुचकर जेवण जेवायला एका माणसाला जितका खर्च येईल, तेवढ्याच पैशात आम्हा आठ जणांचे जेवण झालेले बघून माझा भाचा देवाशिष कमालीचा अचंबित झाला. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आम्ही आमच्या हॉटेलमध्ये मुक्कामाला पोहोचलो. त्या रात्री लवकर झोपणे आम्हाला आवश्यक होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजेपर्यंत, सामान बांधून, नाश्ता करून, रामेश्वरहून मदुराईचा विमानतळ गाठायचा होता आणि मुंबईची फ्लाईट पकडायची होती.  

१९ तारखेला, आम्ही सकाळी सगळे काही वेळेत आवरले. वाटेत चहापाण्यासाठी थांबूनही फ्लाईटच्या वेळेच्या बरेच आधी आम्ही मदुराईमध्ये पोहोचलो. विमानतळावर जायला थोडा वेळ शिलकी असल्यामुळे, पुन्हा एके ठिकाणी थांबून मनसोक्त नारळपाणी प्यायलो. विमानतळावर पोहोचताच, मणी आणि सत्या या आमच्या टॅक्सीचालकांना निरोप दिला. सर्व काही सुरळीत पार पडले असे वाटत असतानाच, एक विघ्न उभे राहते की काय अशी परिस्थिती अचानकच उद्भवली. आमच्याकडे दादांच्या आधार आणि पॅन कार्डाची झेरॉक्स होती, पण त्यापैकी कुठल्याही कार्डाची मूळप्रत नव्हती. सुरक्षा अधिकारी त्या कागदपत्रांची मूळ प्रत दाखवल्याशिवाय विमानतळात आम्हाला प्रवेश नाकारू लागले. थोडा खोळंबा झाला, पण शेवटी, आनंद एक निवृत्त सेनाधिकारी असल्याचे जाणून, त्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी स्वतःच्या जबाबदारीवर आम्हाला विमानतळात प्रवेश दिला. 

"कोणाकोणाची किती ज्योतिर्लिंगे बघून झाली आहेत?" या विषयावर, परतीच्या प्रवासात आमची चर्चा सुरु झाली. बारा ज्योतिर्लिंगे नेमकी कुठे-कुठे आहेत? हे कोणालाच नीटसे आठवेना. खरंतर माझ्या मुलांना, त्यांच्या लहानपणी  मी जे श्लोक शिकवले होते, त्यात ज्योतिर्लिंग स्तोत्रही होतेच. पण आज मात्र मला ते बिनचूक आठवेना. शेवटी पुन्हा गूगलचाच आधार घ्यावा लागला. 

पूर्वी तोंडपाठ असलेले हे स्तोत्र, मी असे कसे विसरले? ही गोष्ट माझ्या मनाला खूप लागली. निदान लहानपणी आपण केलेल्या पाठांतराचे तरी विस्मरण होऊ नये असे मला वाटू लागले. त्यामुळे हल्ली रोज पहाटे, बागकाम करता-करता, रामरक्षा, गीतेचा पहिला आणि पंधरावा अध्याय, मारुतीस्तोत्र आणि पूर्वी पाठ असलेले इतर काही श्लोक, 'यूट्यूब' वर लावून ऐकायचा आणि ऐकता-ऐकता म्हणायचा नेम मी सुरु केला आहे. त्याच बरोबर, मला पूर्वी पाठ नसलेली, अथर्वशीर्ष आणि विष्णुसहस्त्रनाम, ही स्तोत्रेही हळूहळू तोंडपाठ करण्याचा मानस आहे. 

एकंदरीत पाहता, अतिशय आनंददायी अशा यात्रेनंतर, रामेश्वराने मला भक्तिमार्गावर वाटचाल सुरु करायला लावले आहे, हे या सहलीचे फलित म्हणावे लागेल! 
                                                                                                                                          
                                                                                                                                            (क्रमशः)

११ टिप्पण्या:

  1. छान लिहिले आहेस, दर्शन घेण्याचे राहिलेले ज्योतिर्लिंग पणं मराठवाड्यात आलीस तर पाहून होतील.

    उत्तर द्याहटवा
  2. मस्तच लिहिलंय. एकंदरीत रामेश्वरची सहल सफल झाली म्हणायची! 💐

    उत्तर द्याहटवा
  3. वा, वा, वा म्हणजे शेवटच्या परिच्छेदात तू कबूल करतेस, कि तू आस्तिकच आहेस. असो. खूप सुंदर प्रवास वर्णन. आता तुझं प्रवास वर्णन थांबणार, आता पुरतं तरी. त्यामुळे हुरहुर वाटते आहे. स्वाती जे सगळं पाहिलंस, ते सर्व अभ्यास पूर्ण लिहून सादर केलंस. मन:पुर्वक कौतुक.

    उत्तर द्याहटवा
  4. अगं मला लिहायला आवडते. बरे वाटते.
    पाठांतरामुळे आस्तिक/नास्तिक ठरते का?

    उत्तर द्याहटवा
  5. छान लिहलेयस नेहमीप्रमाणे . परमेश्वराच्या प्रथम अवताराचा संदर्भ ते वाक्य वाचताना आला नाही . नंतर आला. असो
    विनोदबुद्दी जागृत असतेच तुझी. श्री राम मंदिर वादळानंतरही टीकुन राहिले. तसेच तू स्तोत्रे ऐकतेस , पाठ करतेयस हे वाचुन मोद झाला. श्री रामप्रभूंची कृपाच होय. जय श्री राम ! जय श्री कृष्ण ! जय जय राम , कृष्ण हरी !

    उत्तर द्याहटवा