१७ ऑक्टोबरला रामेश्वराचे दर्शन घेऊन आम्ही हॉटेलवर परतलो. रात्रीचे आठ वाजून गेले होते. हॉटेलबाहेर पडून इतरत्र कुठे जेवायला जायचा उत्साह आम्हाला कोणालाच नव्हता. त्यामुळे सगळेजण दैविक हॉटेलच्या तळमजल्यावर असलेल्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन तिथला शाकाहारी बुफे जेवलो. दुसऱ्या दिवशी किती वाजता निघायचे आणि काय-काय बघायचे याची योजना जेवता-जेवताच पक्की केली.
आम्ही रामेश्वरदर्शनाबाबत चर्चा करीत असतानाच माझी वहिनी, प्राची म्हणाली, की तिला 'स्फटिकदर्शन' करण्याची इच्छा आहे. त्याबाबत मला काहीच कल्पना नव्हती. मग प्राचीनेच सांगितले की सकाळी पाच वाजता रामेश्वराचे देऊळ भक्तांसाठी उघडल्यावर प्रथम पल्लियारे दीप पूजा होते. ठीक पाच वाजून दहा मिनिटांनी रामेश्वराच्या पिंडीखाली किंवा मागे ठेवलेले स्फटिक लिंग भक्तांच्या दर्शनासाठी बाहेर काढून त्याची पूजा केली जाते. ते दर्शन घेणे फार भाग्याचे असते असे तिचे म्हणणे होते.
कुतूहलापोटी मी इंटरनेटवर स्फटिकदर्शनाची माहिती वाचली. त्या दर्शनासाठी पहाटे चारच्या आत स्नान करून भक्तगण रांग लावून उभे असतात असेही मी वाचले. इतक्या पहाटे उठून प्राचीबरोबर जायला इतर कोणाचीच तयारी नव्हती. कुठल्याही भाग्योदयाच्या आशेने नव्हे, पण एक अनुभव म्हणून मी प्राचीबरोबर जाण्यासाठी आनंदाने तयार झाले. मी तिच्यासोबत जाणार आहे या गोष्टीचा सगळ्यात जास्त आनंद गिरीशला झाला! पहाटे साडेतीनला उठून, अंघोळ करून जायचे आम्ही ठरवले व लगेच आपापल्या खोलीत झोपायला गेलो.
माझा डोळा लागत असतानाच, अचानक माझ्या एका मित्राचा फोन आला. त्याचे वडील बरेच आजारी आहेत व त्यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी यासाठी, त्याच्या वतीने मी, माझ्या डोळ्यादेखत रामेश्वराला अभिषेक करवून घ्यावा, अशी कळकळीची विनंती त्याने मला केली. मी हे काम निश्चित करेन अशी ग्वाही त्याला दिली.
शिरीषकडे रामेश्वरच्या एका गुरुजींचा दूरध्वनी क्रमांक होता. रात्रीच मी त्यांच्याशी बोलले. स्फटिकदर्शनासाठी मी दुसऱ्या दिवशी देवळात येणार आहे, त्यावेळीच अभिषेक करावा अशी विनंती मी गुरुजींना केली. अभिषेकासाठी काय-काय लागेल, किती खर्च येईल याबाबत गुरुजींकडून सर्व माहिती घेतली. आमचे स्फटिकदर्शन' झाल्यावर, रामेश्वर मंदिराच्याच आवारातील काशीविश्वनाथाच्या देवळाजवळ ते आम्हाला येऊन भेटतील आणि अभिषेकाबाबत चर्चा करतील, असे गुरुजींनी सांगितले.
ठरल्याप्रमाणे आम्ही दोघी पहाटे उठून, अंघोळ करून, रामेश्वर मंदिराच्या पूर्व द्वारावर पहाटे सव्वाचारला पोहोचलो. तिथे आमच्याही आधी अनेक भाविक येऊन रांगेत उभे होते. पाच वाजायच्या काही मिनिटे आधीच आम्हाला आत सोडण्यात आले. अगदी जवळून दर्शन घेता यावे यासाठी आम्ही प्रत्येकी २०० रुपयाचे तिकीट घेऊन आत गेलो. पल्लियारे दीप पूजा आम्हाला बघायला मिळाली. त्यानंतर, पुजाऱ्यांनी स्फटिक लिंग बाहेर काढले. साधारण फूटभर लांबीचे ते स्फटिक लिंग,समयांच्या मंद प्रकाशामध्ये अतिशय सुंदर दिसत होते. शिवनामाच्या घोषात त्या लिंगाला मनोभावे नमस्कार करणाऱ्या भाविकांच्या डोळ्यातील भाव मी निरखत होते. तिथल्या वातावरणाचा, त्या पूजेचा, आणि स्फटिक लिंग दर्शनाचा तो सोहळा मला एक वेगळीच अनुभूती देऊन गेला. दर्शन झाल्यावर आम्हाला 'थिरुवनंथाल दीप आराधना'ही बघायला मिळाली. त्यानंतर गुरुजींची वाट बघत आम्ही विश्वनाथाच्या देवळापाशी थांबलो.
गुरुजी आल्यावर आमच्या डोळ्यादेखत अभिषेक करून हॉटेलवर परतायचे असे आम्ही ठरवले होते. जवळजवळ सात वाजत आले तरीही गुरुजी आलेच नाहीत. मंदिरात आमच्याजवळ फोन नसल्यामुळे गुरुजींशी संपर्क साधणेही शक्य नव्हते. पण त्या पवित्र मंदिरात, पहाटेच्या मंगलवेळी बसून राहायला आम्हाला दोघीनाही खूप प्रसन्न वाटत होते. शेवटी गुरुजी आले. आज प्रदोष असल्याने, अभिषेक संध्याकाळी सहा वाजतानंतरच करायचा असे त्यांनी सांगितले. त्यानुसार, संध्याकाळी ठीक सहा वाजता विश्वनाथाच्या देवळाजवळ येऊन भेटायला त्यांनी आम्हाला सांगितले. तो दिवसभर आम्ही धनुष्यकोडी व इतरत्र हिंडणार होतो. त्यानंतर पुन्हा संध्याकाळी देवळांत येण्यासाठी उत्साह आणि ऊर्जा राहील की नाही याबाबत मी साशंक होते. पण एकीकडे, "तुझ्या डोळ्यादेखत अभिषेक करून घे" ही माझ्या मित्राने बोलून दाखवलेली इच्छा आणि "संध्याकाळी सहा वाजतानंतरच अभिषेक करायचा", हा गुरुजींचा आदेश, या दोन गोष्टींच्या कचाट्यात मी सापडले होते. त्यामुळे, संध्याकाळी पुन्हा रामेश्वराच्या देवळांत जाण्याचे नक्की ठरवले.
दिवसभर धनुष्यकोडी व इतर ठिकाणे पाहून आम्ही हॉटेलवर पाच वाजेपर्यंत परतलो. त्यानंतर अंघोळ करून, अगदी उत्साहाने आम्ही दोघीही अभिषेक करण्यासाठी रामेश्वराच्या देवळात पोहोचलो. सायंकाळची रामेश्वराची 'सयरात्वा' पूजा आम्हाला बघायला मिळाली. त्या पाठोपाठ, माझ्या मित्राच्या इच्छेनुसार, रामेश्वराला गंगाजल, दूध आणि बिल्वपत्र यांचा अभिषेक व साग्रसंगीत पूजा गुरुजींनी केली. त्यानंतर आम्हाला सोबत घेऊन गुरुजींनी सर्व मंदिर परिसर आम्हाला पुन्हा दाखवला. इतरही देवदेवतांची आराधना आणि पूजा आम्ही केली. मंदिराच्या 'Infinite Corridor' मध्ये, गुरुजींनी त्यांच्याच फोनवर आमचा फोटो काढून दिला. हे सगळे करून रात्री आठनंतर आम्ही हॉटेलच्या रूमवर परतलो.
'प्रदोष' म्हणजे काय? हा प्रश्न माझ्या डोक्याच्या मागे कुठेतरी होता. रूमवर आल्यावर सहज म्हणून गूगलवर माहिती वाचली. प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध व वद्य त्रयोदशीला प्रदोष असतो. सूर्योदय होण्याच्या ४५ मिनिटांपूर्वी ते सूर्यास्तानंतर ४५ मिनिटांच्या काळाला 'प्रदोष काळ' असे म्हणतात. शिवपूजेच्या दृष्टीने प्रदोषकालाचे महत्त्व अनन्यसाधारण असते. सूर्यास्तानंतर रात्रीचा प्रारंभ होण्याच्या काळांत प्रदोषाची पूजा केली जाते. ज्या वारी प्रदोष असतो, त्या दिवशीच्या व्रताचे महत्त्व वेगवेगळे असते, असेही कळले. सोमवारी आलेल्या प्रदोषाला 'सोमप्रदोष' म्हणतात आणि त्यादिवशी पूजा केल्याने आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात.
माझ्या मित्राला मी हे सगळे सांगितले. त्याला फार समाधान वाटले. विशेष म्हणजे स्फटिकलिंग दर्शनाच्या प्राचीच्या इच्छेमुळे आणि, मी माझ्या डोळ्यादेखत अभिषेक करून घ्यावा, या माझ्या मित्राच्या आग्रहापोटी, मी १८ ऑक्टोबरला, सोमवारी दोन वेळा रामेश्वराच्या दर्शनासाठी गेले. अशा रीतीने मला आदल्या दिवशी एकदा आणि दुसऱ्या दिवशी दोन वेळा रामेश्वराचे दर्शन घडले आणि रामेश्वराला त्रिवार वंदन करण्याची संधी मिळाली. माझ्यासारख्या नास्तिक व्यक्तीला, रामेश्वराने संपूर्ण प्रदोषकाळ त्याच्या देवळात व्यतीत करायला लावला हे विशेष!
१८ ऑक्टोबरच्या दिवसभर आम्ही काय-काय मजा केली, ते मी पुढील लेखात लिहीन.
(क्रमशः)
नशीबवान आहेस हे खरं.
उत्तर द्याहटवामाहिती नाही!
उत्तर द्याहटवाछान. सविस्तर वृत्तांत . आनंद वाटला. नास्तिक अगर आस्तिक म्हणवून घेतल्याने कोणी तसे होत नाही. परमेश्वराची ईच्छा प्रमाण व अंतिम असते. तुला अजुनही असे योग यावेत , येतील. हार्दिक शुभेच्छा ! ॐ नमः शिवाय ! हर हर महादेव ! जय जय शिव शंकर !
उत्तर द्याहटवाधन्यवाद!
उत्तर द्याहटवावा स्वाती,डॉक्टर असुनही वेगळ्या प्रकारे विचार करून लिहितेस,खूप छान वाटलं.अशीच वेगवेगळी माहिती आम्हाला पण मिळते.खूप छान.👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद सुलभा!
उत्तर द्याहटवानेहमीप्रमाणे तुझी लेखनशैली खूप छान....👍👍
उत्तर द्याहटवाधन्यवाद मिलिंद!
हटवास्वाती खूप छान! सुंदर लिहिलंय् तू, नेहमीप्रमाणे. किती प्रांजळपणे लिहिलंयस्, तू शेवटच्या ओळीत! माझं तर स्पष्ट मत आहे कि तू आस्तिकच आहेस. कुणी तरी असं म्हटलंय् कि सगळी माणसं आस्तिकच असतात ;मुखाने काही बोललं तरी. असो पुढच्या भागाची आतुरतेने वाट पहाते आहे.
उत्तर द्याहटवाबोलूयात.
उत्तर द्याहटवाउत्तम
उत्तर द्याहटवा🙏🙏🙏✌️✌️✌️
उत्तर द्याहटवावा, खूप छान माहिती आणि वर्णन!
उत्तर द्याहटवाधन्यवाद!
उत्तर द्याहटवावा! ग्रेट! केवळ भाग्यवंतांच्याच नशिबी असे योग येतात. श्रद्धा - अश्रद्धा - अंधश्रद्धा याहीपलिकडे जाऊन काही घटना घडत असतात.
उत्तर द्याहटवाघडलं तसं लिहिलं!
उत्तर द्याहटवा