रविवार, १४ नोव्हेंबर, २०२१

५. रामेश्वर दर्शन

१७ ऑक्टोबरला, आमच्या सहलीदरम्यान, प्रत्यक्षात रामेश्वरला पोहोचण्याच्या आधी, दुपारी साधारण साडेबारा-एकच्या सुमारास आम्ही टॅक्सीने पुलापाशी पोहोचलो होतो. तेथे बराच वेळ थांबून तिथले वारे अंगावर घेतल्यावर आणि तिथले विहंगम दृश्य डोळे भरून पाहिल्यावरही, आमचा कोणाचाच पाय तिथून निघत नव्हता. पण आम्ही त्याच संध्याकाळी रामेश्वर दर्शन करायचे, असे  मनाशी योजले होते. त्यामुळे शेवटी आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी निघालो. रामेश्वरच्या 'दैविक हॉटेल' मध्ये आमचे बुकिंग गिरीशने आधीच करून ठेवले होते. आम्ही दोन वाजेपर्यंत हॉटेलवर पोहोचलो. आधी हॉटेलच्या खोलीवर सामान टाकले आणि पाठोपाठ खाली उतरून रेस्टॉरंट मध्ये  दुपारचे जेवण उरकले. त्यानंतर सगळेजण रामेश्वर दर्शनासाठी निघालो. रामेश्वर देवळाला चारही दिशांना चार उत्तुंग प्रवेशद्वारे किंवा गोपुरे  आहेत. मुख्य देवळाचा गाभारा पूर्वाभिमुख आहे. आम्ही गेलो तेव्हा फक्त पूर्व आणि पश्चिम दिशांच्या द्वारांमधून प्रवेश करता येत होता. नेहमी तसेच असते की नाही, हे मात्र मला माहिती नाही. आम्ही पश्चिम दरवाज्याने प्रवेश केला. त्याआधी आमचे फोन व चप्पल बाहेरच्या एका दुकानात ठेऊन दिले. देवळात मोबाईल अथवा कॅमेरा नेण्यास वा फोटो काढण्यास मनाई आहे. 


रामेश्वरचे देऊळ फारच सुंदर आहे. आम्ही दर्शनाला गेलो त्या दिवशी रविवार होता. अनेक महिन्यानंतर  प्रथमच रामेश्वरचे देऊळ, रविवारच्या दिवशी दर्शनासाठी उघडलेले होते. त्यामुळे देवळात भाविकांची फारशी गर्दी नव्हती. आत गेल्यावर दादांसाठी व्हीलचेअरही  मिळाली. त्यामुळे त्यांना दर्शन करणे सुकर झाले. रामेश्वरचे संपूर्ण देऊळ दगडी आहे. या देवळाची भव्यता बघून खरोखरीच अचंबित व्हायला होते. या छोट्याशा बेटावरच्या समुद्रतटावर असे विशाल, प्रमाणबद्ध आणि अद्वितीय मंदिर बांधण्याची संकल्पना करणे आणि ती प्रत्यक्षांत उतरवणे, ही गोष्टच मला आपल्या संस्कृतीच्या दृष्टीने अतिशय अभिमानास्पद वाटली. आपल्या देशाच्या एका कोपऱ्याच्या जवळ वसलेल्या या बेटावर, दळणवळणाच्या अत्याधुनिक सेवा उपलब्ध असल्यामुळे आज आपल्याला तिथपर्यंत सहजी पोहोचता येते. पण शेकडो वर्षांपूर्वी या सर्व सोयी नसताना,  हे देऊळ कसे बांधले असेल? हा आपल्याला प्रश्न पडतो. देवळातील दगडी खांब व मूर्ती ज्या प्रकारच्या पाषाणातून कोरलेल्या आहेत, त्या प्रकारचे पाषाण तिथल्या पंचक्रोशीत कुठेही दिसत नाहीत. त्यामुळे ते पाषाण कुठूनतरी दूरवरून जहाजांवर लादून. समुद्रावाटे, आणलेले असावेत असा कयास आहे. शेकडो वर्षांपूर्वी इतके मोठे दगड कसे वाहून आणले असतील? त्यावर इतके कलात्मक कोरीव काम कसे केले असेल? हे सगळे आपल्या आकलनाच्या पलीकडचे आहे. १९८१ साली मी केदारनाथचे देऊळ पहिले होते तेव्हाही अभिमानाने ऊर असाच भरून आला होता. 

रामेश्वराच्या देवळाचे बरेचसे पुजारी हे महाराष्ट्रातले ब्राम्हण आहेत. देवळात शिरायच्या आधीपासूनच काही पुजारी, अभिषेक करायचा आहे का? इतक्या-इतक्या रुपयांमध्ये अभिषेक होईल, इतके पैसे भरा लवकर आणि जवळून दर्शन होईल, असे सांगत आपल्या मागे लागतात. ते पुजारीच गाईड म्हणूनही तुमच्याबरोबर येतात. असेच एक पुजारी आमच्याबरोबर येऊन आम्हाला देवळाची माहिती,  देवळाशी निगडित सर्व पौराणिक कथा आणि इतिहासही सांगत होते. मीनाक्षीअम्मन देवळाप्रमाणेच रामेश्वराच्या देवळाच्या आवारात अनेक देवदेवतांची मंदिरे आहेत. पण मीनाक्षी देवळाच्या मानाने रामेश्वरचे देऊळ खूप योजनाबद्धपणे बांधलेले वाटते. कदाचित यावनी हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी या मंदिराची रचना एखाद्या चक्रव्यूहासारखी केलेली असावी, असे वाटते. मुख्य मंदिराच्या बाहेर एक भलामोठा नंदी आहे. मंदिरात एकूण तीन शिवलिंगे आहेत. सीतेने वाळूपासून तयार केलेले लिंग म्हणजेच 'रामनाथ स्वामी लिंग', हनुमानाने कैलास पर्वतावरून उचलून आणलेले 'काशीविश्वनाथ' किंवा 'हनुमदीश्वर' लिंग आणि हनुमानाने स्वतःसाठी शिवाकडून मागून घेतलेले, 'आत्मलिंगेश्वर लिंग' अशी ती तीन लिंगे आहेत.  शेजारी विशालाक्षी देवीचे, पर्वतवर्धिनी देवीचे अशी दोन मंदिरे आहेत.  शेषशायी विष्णूची अतिशय सुंदर मूर्ती असलेले मंदिर आहे. हनुमानाची एक भव्य स्वयंभू मूर्ती 'अंजनेय' मंदिरात आहे. सोन्याने मढवलेला एक गरुड ध्वज आहे. संथान गणेश, सायनाग्रह, सेतू-माधव अशा सर्व देवी देवतांचे दर्शन घेत आम्ही तो विस्तृत मंदिर परिसर हिंडत होतो. त्या दिवशी फारशी गर्दी नसल्यामुळे आम्हाला अगदी शांतपणे दर्शन घेता आले.  

रामेश्वर मंदिर परिसरांत एकूण ५३ तीर्थे आहेत. त्यातली २२ तीर्थे मंदिराच्या आतल्या बाजूस आहेत तर उरलेली बाहेर आहेत. त्या तीर्थाच्या पवित्र पाण्यात अंघोळ करून रामेश्वराचे दर्शन करणे हा 'पापक्षालनाचा' आणि मोक्षप्राप्तीचा खात्रीशीर मार्ग समजला जातो. आम्ही गेलो होतो तेव्हा, कोव्हीड निर्बंधामुळे ही कुंडे आणि त्यामधले  स्नान, बंद केलेले होते. ते जरी चालू असते तरीही आमच्या पैकी कोणी स्नान केले असते की नाही, या बाबत मी जरा साशंकच आहे.  मंदिराची प्रवेशद्वारे अतिशय भव्य आहेत. त्यामुळे तिथे अंबारीसहित हत्ती सहजी प्रवेश करू शकतो. आम्ही गेलो होतो तेव्हाही तिथे एक हत्ती होताच. माहुताला पाच-पन्नास रुपये दिले की तो हत्ती आपल्याला सोंड वर करून आशीर्वादही देतो. प्राचीला हत्ती खूप आवडत असल्याने तिने तो आशीर्वाद घेतला आणि हत्तीच्या सोंडेला हात लावून मनोभावे वंदन केले. 

रामेश्वराच्या देवळातले मंडप, सुंदर कोरीव काम केलेले एकसंध अजस्त्र दगडी खांब, त्यामुळे तयार झालेले लांब-लांब प्राकार (Infinite corridor ),  हे सर्व बघून  डोळे दिपून जातात, आपला ऊर अभिमानाने ऊर भरून येतो, आणि निसर्गसान्निध्यात असलेली ही भव्य वास्तू आपल्याला भारावून टाकते. आम्ही दोन-तीन तास मंदिरातील देव-देवतांचे दर्शन करत, सुरस पौराणिक व ऐतिहासिक कथा ऐकत आणि मंदिरातील कोरीव न्याहाळत व वाखाणत हिंडत होतो. तोपर्यंत संध्याकाळ झाल्यामुळे देऊळ बंद व्हायची वेळ झाली होती. दादांना रामेश्वराचे दर्शन करवणे, हा आमच्या सहलीचा मुख्य हेतू, आता साध्य झाला होता. पण का कुणास ठाऊक माझे मन भरले नव्हते. बराच वेळ देवळात काढल्यानंतरही, परत आपण या देवळात यावे, अशी तीव्र इच्छा तिथून बाहेर पडताना मला झाली. आम्ही रामेश्वरमध्ये, पुढचा एकच दिवस राहणार होतो. त्या दिवशी दिवंगत राष्ट्रपती अब्दुल कलाम मेमोरियल, व बिभीषण मंदिर पाहून धनुष्यकोडीला जाणे, असा पूर्ण दिवसभराचा बेत आधीच ठरलेला होता. त्यामुळे पुन्हा रामेश्वरदर्शनाची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता जवळ जवळ शून्य होती.  

पण रामेश्वराच्या मनात काहीतरी वेगळीच योजना असावी. अनपेक्षिपणे रामेश्वराला त्रिवार वंदन करण्याची संधी मला मिळाली. त्याबाबत मात्र आता मी पुढील लेखात सांगेन.        

                                                                                                                               (क्रमशः)

२ टिप्पण्या: