रविवार, २८ ऑगस्ट, २०२२

४. मलाबारची सफर- 'अनंतपद्मनाभस्वामी' - 'आनंदाश्रम'

 

शनिवार दिनांक १३ ऑगस्टला सकाळी पाऊणे सात-सात वाजता रूमवर चहा आल्यामुळे जाग आली. तोपर्यंत मला बरेचसे बरे वाटायला लागले होते. बेकल किल्ल्यावरच्या सुसाट वाऱ्याबरोबर माझा ताप कुठल्याकुठे उडून गेला असावा. सकाळी नऊ वाजेपर्यंत सामानसुमान बांधून आम्हाला खोली सोडायची होती. त्या दिवशी सकाळी  नाश्ता झाल्यावर आम्हाला 'अनंतपद्मनाभस्वामी' हे विष्णूचे देऊळ बघायला जायचे होते. आमच्या कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे या देवळात आम्ही १२ ऑगस्टला सकाळी जेवणाच्या आधी जाणार होतो. पण मुंबईहून येणाऱ्या प्रवाशांचे विमान थोडे उशिरा पोचल्यामुळे १३ ऑगस्टच्या सकाळी देऊळ बघायचे ठरले होते. 

हॉटेलच्या बुफे नाश्त्यामध्ये इडली-वडा, सांबर, चटणी, पुरी-भाजी, उत्तप्पे, कॉर्नफ्लेक्स, चॉकोज, असे अनेक पदार्थ व चहा-कॉफी होती. सिटी टॉवर्स हॉटेलमधील जेवण उत्तम होते. पण त्या मानाने नाश्त्यातील पदार्थांची चव काही खास नव्हती. एकीकडे आमचा सगळ्यांचा नाश्ता होत असताना बसचालक श्यामने आमचे सामान गाडीच्या टपावर बांधून ठेवले होते. त्यामुळे नाश्ता उरकून आम्ही लगेच 'सिटी टॉवर्स' हे हॉटेल सोडले. 'अनंतपद्मनाभस्वामी' देवस्थान बघण्यासाठी गाडी परत मंगळुरूच्या दिशेने निघाली. जाताना निलेश राजाध्यक्ष यांनी आम्हाला या देवस्थानाबद्दल माहिती सांगितली. 

अनंतपूर गावामध्ये असलेले, हे केरळमधले एकमेव तळ्यातले देऊळ आहे. तिरुअनंतपूर या केरळच्या राजधानीमधले 'अनंतपद्मनाभस्वामी' देवस्थान सुप्रसिद्ध आहे. त्या 'अनंतपद्मनाभस्वामींचे' मूळ स्थान पूर्वी अनंतपूरच्या देवळात होते, अशी एक आख्यायिका आहे.  अनंतपूर देवळातील तळ्याच्या उजव्या बाजूला असलेल्या गुहेतून बाहेर निघणाऱ्या गुप्तमार्गाने, 'अनंतपद्मनाभस्वामी' आपले मूळ स्थान सोडून तिरुअनंतपूरला निघून गेले, अशीही एक आख्यायिका आहे. 

तिरुअनंतपूरचे देवस्थान अतिशय श्रीमंत देवस्थान आहे असे मी ऐकून आहे. परंतु, 'अनंतपद्मनाभस्वामींच्या' मूळ देवस्थानात मात्र श्रीमंतीचा भपका अजिबात जाणवला नाही. तेथे भाविकांची गर्दीही फार नव्हती. "पैशाकडे पैसा जातो" असे अगदी सहजी बोलले जाते. इतर भौतिक गोष्टींच्या बाबतीत हे सूत्र नक्कीच लागू पडत असेल. पण, तथाकथित 'श्रीमंत' देवस्थानांच्या बाबतीतही हेच सूत्र लागू पडते की काय, असे मला यापूर्वीही अनेकदा वाटून गेले आहे. तोच विचार पुन्हा मनात येऊन थोडे उदास वाटले. परंतु, मनःशांतीची जी 'श्रीमंती' अनंतपूरच्या या देवालयात मी अनुभवली, त्याने माझ्या मनावरचे मळभ क्षणभरातच दूर होऊन गेले. 

पंधरा-वीस पायऱ्या उतरून तळ्यापर्यंत गेल्यावर देवळात जाण्याची वाट आहे. पुरुषमंडळींना आपापल्या अंगातले सदरे काढून ठेऊन, उघड्या अंगाने दर्शन घ्यावे लागले. पुजाऱ्याने आम्हाला या देवळाबद्दल आणि विष्णूच्या मूर्तीबद्दलच्या अनेक आख्यायिका सांगितल्या. सध्या गाभाऱ्यात असलेली मूर्ती पंचधातूंपासून बनवलेली आहे. पण मूळ मूर्ती,  'कडू-शर्करा-योगम्' अशा अनेक औषधी घटकांपासून तयार केलेली होती. इथल्या मूर्तीपासून परावर्तित होणारे किरण, पुरुषांच्या उघड्या छातीमधून आणि स्त्रियांच्या कुंकवामधून शरीरात प्रवेश करून ऊर्जा देतात, असेही आम्हाला सांगितले गेले. 

तळ्यामध्ये अनेक मासे आणि एक मगर आहे. ती मगर ठराविक वेळी देवळाजवळ येऊन प्रसाद ग्रहण करते, पण मासे खात नाही, असेही आम्हाला सांगितले गेले. त्या मगरीचे दर्शन मिळणे मोठे भाग्याचे समजले जाते. आम्ही देवळामध्ये पोहोचलो त्या वेळी मगरीच्या प्रसादग्रहणाची वेळ नव्हती. देवळाच्या उजव्या बाजूला गेल्यावर कुठेतरी मगर दिसू शकेल असे पुजाऱ्याने सांगितल्यामुळे आमच्या बरोबरचे काहीजण तिकडे गेले. पण बऱ्याच वेळानंतर, 'मगर तुम न आये ... ' असे म्हणत ते सगळे परतले.

देवदर्शन झाल्यानंतर आम्ही कन्हानगड येथील एका छोट्या टेकाडावर, वसलेल्या 'आनंदाश्रम' येथे गेलो. आम्ही आमच्या टेम्पो ट्रॅव्हलरमधून उतरलो, आणि आश्चर्य म्हणजे, आमचे स्वागत करायला, मुंबईमधील सुप्रसिद्ध वकील व माजी न्यायाधीश, श्री. शेखर जहागीरदार, त्यांच्या पत्नी सौ. निशिगंधा जहागीरदार, माझा भाऊ गिरीश आणि वहिनी सौ. प्राची, असे चौघेजण उभे होते. त्या चौघांना बघून आनंदाश्रमात शिरायच्या आधीच आम्हाला खूप आनंद मिळाला.  

कन्हानगड येथेच जन्मलेले श्री. विठ्ठल राव यांनी १९२० मध्ये, वयाच्या छत्तिसाव्या वर्षी संन्यास घेऊन स्वामी रामदास हे नाव धारण केले. श्री. रामदास स्वामींनी १९३१ साली आनंदाश्रमची स्थापना केली. आश्रमात शिरल्यावर उजव्या हाताच्या दालनामध्ये स्वामी रामदास याचे जीवन, त्यांचे विचार आणि कार्य याबद्दल माहिती देणारे फोटो आणि लेख मांडून ठेवलेले होते. त्यांच्याबद्दलचा एक माहितीपटही आम्हाला दाखवला गेला. 'सर्व प्राणीमात्रांमध्ये देवत्व आहे असे समजून त्यांची सेवा करावी', या विचाराचा आणि 'वैश्विक प्रेम' या तत्वाचा त्यांनी पुरस्कार केला. जीवनामध्ये आदर्श आचरण कसे असावे याबाबत स्वामींनी भाष्य केलेले आहे. प्रत्येक व्यक्तीने आपापला व्यवसाय सचोटीने करून, जमेल तेवढी प्राणिमात्रांची सेवा केल्यास, त्याच्या हातून खरी ईशसेवा घडते अशी काहीशी स्वामीजींची शिकवण होती. 

सध्या आश्रमाचे काम पाहणारे एक वरिष्ठ स्वामीजी एका खोलीमध्ये बसलेले होते. त्यांनीही रामदास स्वामींच्या विचारधारेची महती आम्हाला समजावून सांगितली. पण नेमके त्याचवेळी मला थोडा खोकला आल्यामुळे मी खोलीच्या बाहेर आले. पाठोपाठ मला एक फोन आल्यामुळे मी पुन्हा आत जाऊ शकले नाही. त्यामुळे इतर सर्वांना क्रीम बिस्किटांचा पुडा आणि वेलची केळी असा प्रसाद मिळाला, जो मला मात्र मिळाला नाही! पण सौ. प्राचीने मला प्रसाद आणून दिला. त्या क्रीम बिस्किटांची चव विशेष चांगली होती.   

विशेष म्हणजे 'आनंदाश्रमात' सर्व जाती-धर्माच्या लोकांना विनामूल्य प्रवेश आहे. 'आमची इतरत्र कुठेही शाखा नाही' असे पुण्यामध्ये मला सुपरिचित असलेले वाक्य इथेही ऐकायला मिळाले. पण त्यामध्ये मार्दव होते. या स्थळाचे पावित्र्य, शांतता आणि भारलेले वातावरण मी इतरत्र फारसे अनुभवले नव्हते. त्यामुळे त्यांची कोठेही शाखा नसणे हे मला स्वाभाविकच वाटले. या आश्रमाला कुठल्याही प्रकारचे बाजारू स्वरूप आलेले नसल्यामुळे तेथे गेल्यावर मन खरोखरच प्रसन्न झाले. आनंदाश्रमामध्ये जरा उंचावर चढून गेल्यावर, ध्यानधारणेसाठी एक खोली आहे. माझे पाय दुखत असल्यामुळे तिथे मात्र मी गेले नाही. पण बाहेरच्या एका झाडाखालच्या कट्ट्यावर आडवे पडून मी काही मिनिटे ध्यानधारणा करू शकले! 

गिरीश-प्राची आणि जहागीरदार पती-पत्नी १२ तारखेला संध्याकाळच्या विमानाने कण्णूर येथे येऊन पोहोचले होते. अनुभव ट्रॅव्हल्सनेच त्यांची सगळी व्यवस्था केली होती. एका इनोव्हा कारमधून ते कण्णूरहून उत्तरेला प्रवास करून आनंदाश्रम येथे आलेले होते. आनंदाश्रम सोडताना आम्ही दादांची रवानगी इनोव्हा मध्ये केली, आणि श्री. शेखर व सौ. निशिताई जहागीरदार आम्हा इतरांबरोबर टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये आले. हसत-खेळत आम्ही नीलेश्वर बॅकवॉटरचा रस्ता पकडला.  

४ टिप्पण्या:

  1. तुझ्या या दौऱ्यामुळे केरळ बद्दल फारच छान माहिती मिळाली व कधीतरी आपणही फिरायला तेथेच जावे व तशीच अनुभूती येते का हे पहावे अशी इच्छा निर्माण झाली आहे बघू कधी योग येतो .

    उत्तर द्याहटवा