शनिवार, १३ मे, २०२३

शिमला-कसौली भाग-१

यावर्षी फेब्रुवारीच्या १९-२० तारखेला साहिल अग्रवालचा अचानकच फोन आला. तो म्हणाला, 
"ऑंटी, मैं और अंशुला शादी कर रहे हैं और आप दोनोंको जरूर आना है"

साहिल, हा अनिरुद्धचा, म्हणजे आमच्या मुलाचा शालेय वर्गमित्र. बारावीनंतर आमचा अनिरुद्ध अमेरिकेला शिकायला गेला, आणि साहिल मुंबई आय.आय.टी.मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनीयरिंग करायला गेला. साहिलची बारावी होईपर्यंत त्याचे कुटुंबीय पुण्यातच होते. साहिलच्या आई-वडिलांची आणि आमची चांगली ओळख आहे. त्याचे वडील, श्री. शिशिर अग्रवाल हे इन्कमटॅक्सचे बडे अधिकारी आहेत. पुण्याहून त्यांची बदली बरेली आणि त्यानंतर हैद्राबादला झाली. 

गंमत म्हणजे अनिरुद्ध अमेरिकेला गेल्यानंतर साहिलचे आणि आमचे छान मैत्र जुळले. आम्ही मुंबईला गेलो की साहिल तिथेही आम्हाला भेटायला यायचा. तो पुण्याला आला की आमच्या बरोबर, आर्मीच्या क्लबमध्ये बसून एखादी निवांत संध्याकाळ हलक्या गप्पा, चर्चा आणि हास्य-विनोद करत घालवायचा. आय.आय.टी.तून बाहेर पडल्यानंतर साहिलने अमेरिकेला जाऊन MS केले व काही काळ तिथेच नोकरी केली. या सर्व काळातदेखील त्याचा आणि आमचा संपर्क कायम होता. सध्या साहिल आणि अंशुला हैद्राबादला नोकरी करतात. त्या दोघांच्या मैत्रीबद्दल त्याने आम्हाला पूर्वीच कल्पना दिली होती. आता ती दोघे लग्न करत आहेत हे ऐकून आम्हाला खूपच आनंद  झाला.  

साहिल-अंशुलाचे  लग्न २९-३० एप्रिलला शिमल्याला होणार होते. सध्याच्या  भाषेत सांगायचे झाले तर ते 'डेस्टिनेशन वेडिंग' होते. त्यामुळे एकूण ७०-७५ लोकांनाच आमंत्रण होते. ज्याला इंग्रजीमध्ये exotic locations म्हणतात, अशी अनेक नवनवीन ठिकाणे हुडकून, हल्ली बरेच लोक डेस्टिनेशन वेडिंग्ज साजरी करतात. काही काळानंतर, लोक  चंद्रावर जाऊन  लग्न करायला लागले तरी मला आश्चर्य वाटणार नाही. अग्रवाल कुटुंबीय मूळचे बरेलीचे आहेत. अंशुलाचे आई-वडीलही मूळचे उत्तर प्रदेशातले, पण दिल्लीत स्थाईक आहेत. श्री. शिशिर अग्रवाल सध्या हैद्राबादला चीफ इन्कमटॅक्स कमिशनर असताना, आणि साहिल-अंशुला हे सुद्धा हैद्राबादेतच असताना, लग्न शिमल्याला का? हा माझ्या मनात उमटलेला प्रश्न मी साहिलला विचारला. 

"कुछ नहीं आँटी, हमने पहले डेट्स निश्चित की। हम दोनोंको यही डेट्स  सूट कर रही हैं। पर एप्रिलके अंतमे तो गर्मी रहेगी। इसलिये हम किसी हिलस्टेशनका सोच रहे थे। मेरी मम्मीने उनकी कॉलेजकी पढाई शिमलाके सेंट बीड्स कॉलेजसे की है। इसलिये मम्मीको शिमलासे थोडा लगाव है। हम लोगोंको शिमला में एक बहुत अच्छा रिसॉर्टभी मिला।  फिर हमने शिमलाही फायनल कर दिया।"  साहिल अगदी निर्मळपणे सांगत होता. 

खरंतर, डेस्टिनेशन वेडिंग म्हटले की माझ्या पोटात गोळाच उठतो. त्यामध्ये जर ड्रेस कोड, कलर कोड, वेगवेगळ्या थीम्स, असे सगळे असले तर बरीच जमवा-जमव करावी लागते. परंतु, साहिलने सांगितले की लग्न अगदी साध्या पद्धतीने होणार आहे, कुठलाही ड्रेस कोड-थीम्स वगैरे काहीच नाहीये. हे ऐकून माझा जीव भांड्यात पडला. आम्हाला २९ एप्रिलला सकाळी रिसॉर्टमध्ये पोहोचायचे होते. सकाळी मेंदी, रात्री संगीत, ३० तारखेला सकाळी हळदीचा कार्यक्रम, रात्री जयमाला व फेरे, असे विविध सोहळे होणार होते. १ मे च्या सकाळी सगळ्यांनी आपापल्या घरी परतायचे होते.  

एकूण ७०-७५ लोकांमध्ये आमची वर्णी लागून आम्हाला अगदी आग्रहाचे निमंत्रण आहे, हे ऐकून आम्ही मनोमन सुखावलो होतो. लग्नाला हजर राहण्यामध्ये इतर काहीही अडचण नसल्याने आम्ही जायचे ठरवले. शिमल्याला आम्ही पूर्वी कधीच गेलेलो नव्हतो. दादा म्हणाले, "इतके दूर जाणार आहात तर तू आणि आनंद आठवडाभर राहून शिमला  आणि आसपासचा भाग हिंडूनच या. मी तोपर्यंत मुंबईत राहीन. तुम्ही निश्चिन्तपणे जाऊन या."

१ मे  ते ६ मे  या काळात शिमला व कसौली बघण्याचा बेत आम्ही निश्चित केला. लगेच, मुंबई ते चंडीगढ विमानाची, व पुढे कालका ते शिमला टॉय ट्रेनची तिकिटेही काढून टाकली.  


  

२० टिप्पण्या:

  1. ओके, छान! पुढचं ही येऊ दे, लवकर.

    उत्तर द्याहटवा
  2. सिमला, कसौली हा परिसर सुरेख आहेच, अर्थात मी २०१९ च सांगतोय, आता गर्दी आणि इतर गजबजाट वाढला असेल, पुढला ब्लॉग लवकर येईल हि अपेक्षा. तो वाचून या वर्षी परत summer tour केल्याचा थंडावा इथं औरंगाबादेत ४०/४२ डिग्रीत मिळेल . नितीन चौधरी

    उत्तर द्याहटवा
  3. परिसर छानच आहे...
    पण आता पुण्यात ही चांगलाच उन्हाळा आहे. प्रवासवर्णन लिहण्याने थंडावा येईल!

    उत्तर द्याहटवा
  4. सिमला, कसौली, बिनसर, चैल वगैरे ठिकाणी आम्ही काही मित्र आणि फॅमिली गेलो होतो. अतिशय उत्तम परिसर. तेव्हा बिनसरला प्रचंड बर्फ सुद्धा पडला होता. खूप एन्जॉय केल होतं.

    उत्तर द्याहटवा
  5. Waiting for your experience about toy train....

    उत्तर द्याहटवा
  6. एकदम छान लिहिले आहे..... विनायक जोशी

    उत्तर द्याहटवा
  7. खूप छान , किती स्वच्छ आणि निर्मळ लिहिता मॅडम तुम्ही ..खूप भावतं .

    उत्तर द्याहटवा
  8. माल रोडवर फेरफटका मारला असेलच. एप्रिल मध्ये बर्फ होते का? संस्मरणीय ट्रीप झाली असेल.

    उत्तर द्याहटवा
  9. Nice coverage u feel like u r there.great writing skill Dr

    उत्तर द्याहटवा