केदारनाथला जाण्याचे ठरल्याने आणि तिकिटेही झालेली असल्याने आम्ही दोघेही चांगलेच उत्साहात होतो. ट्रेकिंग करणाऱ्या अनेक मित्रमैत्रिणीना विचारून CTR चे waterproof, ankle-high, trekking shoes विकत घेतलेले होते. ते घालून एकदा सिंहगड, दोन तीन वेळा तळजाई आणि पर्वती चढून झाले होते. म्हणजेच ट्रेकर्सच्या भाषेत ज्याला 'breaking the shoes' म्हणतात किंवा ज्याला आपण नवीन जोड्यांची सवय करणे म्हणतो, तेही झाले होते. दुर्गेश बुगडे या ट्रेकर मित्राने त्याच्याकडच्या, धातूच्या दोन चांगल्यापैकी trekking sticks ही आम्हाला वापरण्यासाठी दिल्या होत्या. माझ्या भाचीचे काही पातळ पण अतिशय उबदार स्वेटर्स माझ्याकडे होते. आनंदला एक ट्रेकिंग पॅन्ट हवी होती, तीही विकत आणलेली होती. त्यामुळे सगळी जय्यत तयारी झालेली होती. आम्ही विमानाचे तिकीट काढायच्या सुमारासच नेमके इराण-अमेरिका युद्ध जोरदार सुरु झाले होते. "भारतातील चार विमानतळ नागरी विमान वाहतुकीसाठी बंद ठेवणार" अशी बातमी वर्तमानपत्रामध्ये छापून आली होती. त्यामधे पुण्याचाही विमानतळ होता. म्हणून मग आम्ही आमचे तिकीट मुंबईहून काढले होते.
आमची फ्लाईट १८ तारखेला सकाळी १० वाजताची होती. त्यामुळे गिरीश-प्राचीकडे १७ तारखेला दुपारपर्यंत पोहोचण्याचे ठरवले होते. १६च्या रात्री उशिरापर्यंत सामानाची बांधाबांध सुरू होती. नवीनच ओळख झालेल्या साहिल या मुलाला फोन करून सकाळची टॅक्सी सांगितली होती. खरंतर साहिलला बजावून सांगितले होते की ड्रायव्हरला सकाळी ७.३० ला आम्हाला फोन करू दे. त्यावेळी आम्ही त्याला वेळ सांगू, मगच त्याला येऊ दे. पण तो निरोप त्या ड्रायव्हरला पोहोचलाच नव्हता. त्यामुळे बरोबर ७.३० वाजता स्विफ्ट डिझायर गाडी घेऊन तो हजरच झाला. सगळी आवरासावर करून निघताना कमालीची गडबड झाली. कसेबसे सामान एकत्र करून, शेवटचे अगदी जपून ठेवलेले दोन आंबे खाऊन आम्ही सामान घेऊन खाली उतरलो. आम्हाला घ्यायला आलेली गाडी मोठी असली, तरीही मागे डिकीमधे सिएनजी सिलेंडर असल्याने डिकीमधे सगळे सामान बसले नाही. शेवटी ड्रायव्हरशेजारी पुढच्या सीटवर काही सामान कोंबून ९ वाजता घर सोडलं.
वाटेत आम्ही माझ्या मामेनणंदेकडे, मंजूकडे पनवेलला जाणार होतो. तिच्याकडे सकाळी ११ च्या सुमारास पोहोचलो. तिथे दोन तास गप्पा आणि खाणं-पिणं झालं. मंजूने मस्त इडली-सांबार आणि हुग्गी केलेली होती. आम्ही गेल्यापासून ते आम्ही निघेपर्यंत मंजुची नात, आभा, गाढ झोपेत असल्याने तिला जागे असताना बघताच आले नाही. शांतपणे झोपलेले ते गोड बाळ बघून मात्र मन प्रसन्न झाले. आमची निघायची वेळ होऊन गेलेली असल्याने, शेवटी तिच्यासाठी नेलेले पांघरूण आणि छोटीशी भेट प्रियांकाच्या हातात देऊन आम्ही माहीमला निघालो. गिरीश-प्राचीच्या घरी आम्ही पार्किंग मधे पोहोचायला आणि प्राचीची गाडी तिथे पोहोचायला एकच गाठ पडली. प्राची, तिची मैत्रीण मृणाल आणि मैत्रिणीची डॉक्टर बहीण स्वाती असे डहाणूजवळील आगवन येथे एका मेडिकल कँपसाठी गेले होते. त्यांच्याबरोबर थोड्याफार गप्पा झाल्या.
आता आम्हाला आमचे सामान आवरणे अत्यावश्यक होते. माझ्याबरोबर मी बरेच वैद्यकीय सामान केदारनाथच्या हॉस्पिटलमधे देण्यासाठी सोबत आणले होते. त्या सगळ्या सामानाचे फोटो काढून मी त्या संस्थेचे मुख्य व्यवस्थापक, संदीपजींकडे आदल्या रात्रीच पाठवले होते. या सामानात बरेच स्प्लिंट्स्, दोन ग्लुकोमीटर, बीपी मोजण्याचे मशीन वगैरे होते. 'ते सगळे सामान केदारनाथच्या हॉस्पिटलमध्ये वापरले जाईल, तुम्ही ते बरोबर घेऊन या", असे संदीपजींनी मला फोनवर सांगितले. विमानाने नेण्याच्या दृष्टीने ते सामान नेमक्या कुठल्या दोन बॅग्जमधे भरायचे आणि पुढे केदारनाथला कसे न्यायचे, याचे नियोजन करण्यातच बराचसा वेळ गेला.
वैद्यकीय सामान खूप जड होते. त्याशिवाय, वजनाने हलके पण आकाराने मोठे असे बरेच स्वेटर्स आणि इतर गरम कपडे होते. विमानामधे प्रत्येकी १५ किलोची एकच बॅग चेक-इन करता येणार होती. हल्ली आपल्याला स्वतःचे सामान वाहून किंवा उचलून न्यायची सवयच राहिलेली नाही. विमानप्रवासात आणि इतरत्र सहजी वाहून नेण्यासाठी खाली चाके असलेल्या स्ट्रॉलीज सोयीच्या पडतात. पण "वर केदारनाथला जाताना स्ट्रॉली बॅग्स आणू नका, त्या खेचरांवर लादणे अवघड पडते" असेही आम्हाला सांगितले गेले होते. अगदी अत्यावश्यक असे कमीतकमी सामान आणा अशी सूचनाही मिळालेली होती. त्यामुळे सामान हरिद्वारपर्यंत न्यायला स्ट्रॉलीज बऱ्या आणि पुढे खेचरांवरून केदारनाथपर्यंत सामान वाहून नेण्याच्या दृष्टीने छोट्याछोट्या, चाकं नसलेल्या चार जाडसर हॅण्डबॅग्ज न्याव्यात असे ठरले. वैद्यकीय सामान व इतरही बऱ्याच जड वस्तू घालून एक बॅग आधी बाजूला केली. त्याचे वजन साधारण १५ किलोपर्यंत भरतेय याची खात्री करून घेतली. त्यानंतर आनंदची बॅग आकाराने जरा मोठी असल्याने त्यातही जमेल ते जड सामान घातले. त्या बॅगचे वजनही १०-१२ किलो भरले. उरलेले सामान विमानात घेऊन जाण्याच्या दृष्टीने हॅन्डबॅगमध्ये भरले. कमीतकमी सामान घेऊन प्रवास करणे खरोखरच किती अवघड असते, हे लक्षांत आले. सगळ्या बॅगा योग्य प्रकारे पॅक करून भरायला आम्हाला दोन-तीन तास लागले.
सगळे सामान आवरून झाल्यावर आम्ही जरा गप्पा मारायला मोकळे झालो. रविवारची रात्र असल्याने, त्यांच्या शिरस्त्याप्रमाणे गिरीश-प्राची आम्हाला घेऊन बाहेर जेवायला हॉटेलमध्ये निघाले. 'हयात' या पंचतारांकित हॉटेलच्या भारतीय रेस्टॉरंट मध्ये गेलो. जेवण चांगले होतेच पण पंचतारांकित हॉटेलमधल्या झुळझुळीत वातावरणात ते विशेष चांगले वाटले. घरी आल्यावरही रात्री उशीरापर्यंत गप्पा झाल्या. गिरीशला आनंदबरोबर इराण-अमेरिका युद्धाबद्दल आणि पुढील संभाव्य धोके आणि शक्यतांबद्दल गहन चर्च करायची खूप सुरसुरी होती. नुकत्याच पार पडलेल्या तीन-चार राज्यातील निवडणूका, ममतादीदींची हार असे इतरही अनेक विषय चघळायला होतेच. हा गप्पांचा तास बराच लांबला आणि झोपायला पहाटेचा १ वाजला. दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजताची फ्लाईट असल्याने, तयार होऊन,नाश्ता करून ७-७.३० पर्यंत घर सोडणे आवश्यक होते. त्यामुळे जेमतेम चार-साडेचार तास झोप मिळणार होती...
क्रमशः
