सोमवार, २२ जून, २०२६

केदारनाथ-भाग १४

आज सकाळी मला साधारण चारच्या सुमाराला जाग आली. आनंद जागाच दिसला. त्याला बिचाऱ्याला रात्रभर झोप आली नव्हती. सतत खोकल्याची उबळ येत होती. झोप न झाल्यामुळे आणि अंगात गेले पाच-सहा दिवस सतत ताप असल्याने तो खूपच वैतागलेला होता. आज एकच गोष्ट चांगली होती, ती म्हणजे त्याला सकाळी ताप नव्हता. काल दिवसा आणि रात्री त्याला झोपही नव्हती. कधी नव्हे ते कालच्या दिवसभरात त्याने अंघोळही केलेली नव्हती कारण तेवढे कष्टही त्याला नको वाटत होते. त्यामुळे आधी त्याने आणि त्याच्यापाठोपाठ मी अशी दोघांनीही पाच वाजायच्या आत  अंघोळ उरकली. 

आम्हाला उद्या सकाळी इथून हेलिकॉप्टरने निघायचे असल्याने आमचे बरेचसे सामान आम्ही कालच खाली पाठवून दिलेले होते. त्यामुळे आज सकाळी लाँड्री करणे आवश्यक होते. आमच्या अंघोळी झाल्यानंतर पाठोपाठ मी वॉशिंग मशीन लावून टाकले. आम्ही ज्या दिवशी आलो होतो, त्याच दिवशी आम्हाला श्री. धनवीरजींनी सांगून ठेवले होते की तुमच्या सोयीने कुठल्याही दिवशी पहाटे पाच वाजता तुम्ही दर्शनाला जा. त्याला कारणही तसेच होते. पहाटे पाच वाजता आमच्या हॉस्पिटलमधे काम करणाऱ्या कोणालाही गर्भगृहात जाऊन दर्शन करण्यासाठी विशेष सोय केलेली होती. इतक्या दिवसांत आज प्रथमच आम्ही दोघेही, पाच वाजायच्या आधी अंघोळी करून तयार झालेले होतो. पण आनंदच्या सध्याच्या परिस्थितीत, इतक्या पहाटे आणि कडाक्याच्या थंडीत, दीड किलोमीटर दूर असलेल्या देवळापर्यंत चालत जाऊन दर्शन करण्याचा विचारही आम्ही करू शकत नव्हतो.  

सहा वाजता चहा आणण्यासाठी फ्लास्क घेऊन वर स्वयंपाकघरात गेले. तिथून गरम  चहा आणि दोन प्रकारच्या बिस्किटांचे पुडे घेऊन आले. आनंदला दिवसातून तीन वेळा antibioticचे इंजेक्शन द्यायचे होते. इतक्या पहाटे, रात्रपाळी करून दमलेल्या नर्सेसपैकी कोणालातरी इंजेक्शन द्यायला वर बोलवून घ्यावे असे आम्हाला वाटले नाही. त्यामुळे चहा पिऊन झाल्यावर आम्ही दोघेही खाली वॉर्डमधे गेलो. तिथे नर्सेसनी आनंदला Antibiotics चा डोस दिला व पाठोपाठ त्याच्या छातीचा एक्सरेही काढला. इथे पोर्टेबल एक्सरेची आणि डिजिटल फिल्मची सोय आहे. त्यामुळे लगेच मला तो एक्सरे बघायलाही मिळाला. त्यामधे न्यूमोनिया किंवा इतरही काही दोष न दिसल्यामुळे मला हायसे वाटले. 

जेंव्हा आनंदला शिरेवाटे antibiotic देणे चालू होते आणि अजून त्याचा एक्सरेही व्हायचा होता तोपर्यंत मी थोडा वेळ ओपीडीतले पेशंट्स तपासले. बरीच आजारी असलेली एक-दोन लहान मुले ओपीडीत आली होती. त्यांना तपासून मी औषधोपचार केले. इतक्या सकाळी मी तिथे थांबून काम करतेय हे बघून, आधीच रात्रपाळीचा डॉ. शोभित आश्चर्यचकित झाला होता. त्यातून लहान मुलांना तपासून मी औषधे दिल्यामुळे त्याला खूपच बरे वाटले असावे. कारण, लहान मुलांना औषधे द्यायला बालरोगतज्ज्ञ सोडून इतर डॉक्टर्स जरासे घाबरतात. आम्ही दोघेही पहाटे OPD मधेच असल्यामुळे, डॉ. हर्ष आणि डॉ. अजय गौरीकुंडला पायी निघण्याआधी त्यांची व आमची भेट होऊ शकली. 

आनंदचे इंजेक्शन आणि एक्सरे  झाल्यावर त्याने तिथे आलेल्या NDRF आणि SDRF च्या जवानांशी जरा गप्पा मारल्या. त्यांच्याकडून त्यांच्या कामाची माहिती घेतली. त्यानंतर आम्ही दोघे खोलीत आलो आणि नेहमीपेक्षा जरा लवकरच  नाश्ता खाण्यासाठी वर भोजनालयात गेलो. पण तिथे अजून झाडलोट चालू होती. म्हणून मी खाली जाऊन वॉशिंग मशीनची स्पिन सायकल संपवून कपडे वाळत घालून आले. तोपर्यंत आनंद वरच्या मजल्यावरच्या बाल्कनीमधे उभा राहून बाहेरचे फोटो काढत होता. आज नाश्त्याला गरमागरम आलूपराठे व दही होते. मोठमोठाले दणकट आणि चवदार पराठे खायला आम्हा दोघांनाही बरे वाटले. आम्ही नाश्ता करत असताना आमच्याबरोबर नरेंद्र नावाचा नर्सही नाश्ता करायला आला. आमच्या त्याच्याशी बऱ्याच गप्पा झाल्या. राजस्थानमधील अल्वर गावच्या शेतकरी कुटुंबातील हा मुलगा अतिशय गुणी नर्स आहे. कार्डियाक नर्सिंगमधे तो निपुण आहे. या नर्सेसना इथे कमीतकमी दोन महिने काम करायचे असते. त्यांना बारा तासांची शिफ्ट असते. कुठल्याही शिफ्टमध्ये काम भरपूरच असते. घरापासून दूर, इतक्या थंड वातावरणात, १२-१२ तास अविरत काम करणे, तसे खूपच जिकिरीचे आहे. या मुला-मुलींना, इथे ड्यूटी केल्याबद्दल, नेहमीच्या पगारापेक्षा, जास्तीचे असे केवळ १५०००/- रुपये दरमहा मिळतात. त्या मुला-मुलींचा कामाचा उरक आणि कामाबद्दलची आत्मीयता वाखाणण्याजोगी होती.  

नाष्ट्यानंतर मी खाली ८.३० पर्यंत कामाला आले. आज नेमके पावसाळी हवामान होते. आमचे अजून केदारनाथाचे दर्शन राहिलेच होते. डॉ. सुभाषिनीने सकाळीच मला फोन करून सांगितले होते की तिला आज ओपीडीत यायला उशीर होणार आहे. फोनवरून तिने आनंदच्या तब्येतीची चौकशी केली. आनंदला आज ताप नाहीये हे कळल्यामुळे तिने सुचवले की आम्ही दोघांनी आज सकाळीच दर्शन करायला जावे. ती ओपीडीत आली की लगेच मी आनंदला घेऊन दर्शनासाठी निघून जावे, असे तिने निक्षून सांगितले. १० च्या सुमारास डॉ. सुभाषिनी ओपीडीत आली. ती आल्यावर मात्र तिने मला ओपीडीमधून बाहेर काढले आणि दोघेजण त्वरित दर्शन करून या, असे सांगितले. मी पटापट वर येऊन आनंदला सांगितले की, "आपण आत्ता  दर्शनाला जायचे आहे, तू  जरा लवकर तयार हो."

इथल्या स्थानिक पोलिसांकरवी चालवली जाणारी एक इलेक्ट्रिक कार पेशंट्सना हॉस्पिटलपासून हेलिपॅडपर्यंत नेण्यासाठी वापरली जाते. मी खोलीत येण्याआधी श्री. धनवीरजींना विनंती केली होती की आनंदसाठी इलेक्ट्रिक गाडी मागवून घ्या. त्या गाडीसाठी त्यांनी फोनही करून ठेवला होता. आज एक पेशंटही हेलिपॅडपर्यंत जाणारच होता. त्यामुळे त्याच गाडीत आमचीही सोय होऊ शकणार होती. त्या कारमधून निदान काही अंतर तरी आम्हाला जाता येणार होते. देवळाचे गर्भगृह दुपारी १२ वाजता बंद होते, असेही आम्हाला रोहनजींनी सांगितले होते. त्यामुळे, काहीही करून आम्हाला १२ वाजायच्या आत 'स्पर्शदर्शना'साठी देवळामध्ये पोहोचणे आवश्यक होते.  

आनंदला तयार व्हायला सांगून मी खाली उतरले. त्याला बिचाऱ्याला उठवतही नव्हते. पण त्यालाही केदारनाथाचे देऊळ बघायचेच होते. त्यामुळे तो कसाबसा दोन स्वेटर्स अंगावर चढवून तयार झाला. आमचे सामान आम्ही खाली नारायणकोटीला पाठवून दिलेले असल्याने, आमचे रेनकोट्स आता आमच्याकडे नव्हते. डॉ. सुभाषिनीने आणि कृष्णा नर्सने, तत्परतेने आपापल्या खोलीमधे जाऊन त्यांचे रेनकोट आणून आम्हा दोघांना दिले. आनंदने खाली येताना बरोबर फ्लास्कमधे गरम पाणी भरून आणले होते. आम्हा दोघांच्या walking sticks पण आणल्या होत्या. मात्र तो पैसे बरोबर आणायचे विसरला होता. तसेच त्याच्या डोक्यावर कानटोपीही नव्हती. त्याची कानटोपी नेमकी धुवायला गेलेली होती. मग मी पुन्हा वर जाऊन पैसे घेऊन आले. OPD मधे कोणा एका पेशंटची बरेच दिवसापूर्वी विसरलेली एक लोकरी कानटोपी मिळाल्यामुळे ती आनंदला घालायला दिली. हे सगळे होईपर्यंत सव्वा अकरा वाजून गेले. आम्ही इथे आल्यापासून नऊ दिवसांनी आज प्रथमच हॉस्पिटलमधून बाहेर पडलो. इलेक्ट्रिक कारने आम्हाला मंदिराच्या अलीकडे सुमारे ५०० मीटरवर असलेल्या हेलिपॅडपर्यंत सोडले. त्यानंतर पुढे आमचे आम्हाला चालतच जायचे होते.

दर्शनासाठी थांबलेल्या भाविकांची लांबचलांब रांग मंदिरापासून हेलीपॅडपर्यंत आलेली दिसत होती. बारीकसा पाऊसही सुरु झाला होता. सगळीकडे चिखल, पाण्याची डबकी आणि निसरडे झालेले होते. आमच्या हॉस्पिटलचाच एक बूथ देवळाच्या मागील दरवाज्यापाशी लावलेला होता. त्या बूथवर काम करणाऱ्या, कुणाल नावाच्या एका नर्सिंग स्टुडंटने आम्हाला त्या बूथवर यायला सांगितले होते. एक मोठा पूल येईपर्यंत देवळात जाणाऱ्यांची आणि देवळातून बाहेर पडणाऱ्यांची वाट एकच होती. त्यामुळे त्या पुलावर कमालीची चेंगराचेंगरी होती. त्यातून कशीबशी वाट काढत, आम्ही हळूहळू पुढे गेलो. पुलावरून बाहेर पडल्यावर मात्र मंदिराकडे जाण्याचा व परतीचा मार्ग वेगवेगळा होता. तिथून उजव्या हाताला असलेल्या पायऱ्या चढून, एका मोठ्या आकाराचे ॐ अक्षर असलेल्या चिन्हापर्यंत येऊन, पुढे मंदिराच्या डाव्या बाजूला असलेल्या आमच्या हॉस्पिटलच्या बूथपर्यंत आम्ही पोहोचलो. 

बूथवर गेल्यावर आमचा बॅकपॅक मी उतरवून ठेवला. कुणालबरोबर काम करणारा, राम नावाचा दुसरा एक नर्सिंग स्टुडंट आम्हाला त्याच्यासोबत घेऊन निघाला. त्याच्यामागून तिथल्या तुफान गर्दीतून वाट काढत आम्ही पुढे निघालो. कुणालजवळ बसलेल्या एका पोलिसाने माहिती पुरवली, "आता तुम्हाला उशीर झाला आहे, गर्भगृह बरोबर बारा वाजता बंद होईल आणि पुढचे दोन तास बंद राहील. तोपर्यंत तुम्हाला काही दर्शन मिळणार नाही". हे ऐकून माझा खूप विरस झाला. बारा वाजायला काही मिनिटेच बाकी होती. देवळामधून बाहेर पडणाऱ्या त्या गर्दीच्या लोंढ्यातून वाट काढणे आम्हाला काही केल्या जमेना. तिथे बरीच चेंगराचेंगरी होत होती आणि गर्दी हटवण्यासाठी पोलीस लाठ्या मारत होते. स्वतःपेक्षाही मला आनंदची काळजी वाटत होती. त्याच्या हाताच्या शिरेमधे Intracathची सुई लावलेली होती. तिथे त्याला दुखापत होऊन रक्तस्त्राव होईल की काय, ही भिती मला भेडसावत होती. शेवटी कशीबशी गर्दीतून वाट काढत आम्ही मागच्या दारामधून, अगदी बारा वाजायला दोन मिनिटे कमी असताना गर्भगृहात प्रवेश मिळवू शकलो. 

आम्ही आत गेल्यागेल्या देवळाच्या गर्भगृहाकडे जाण्याचे दार बंद झाले. त्यामुळे बाहेरून नवीन कोणीही भाविक आत येऊ शकत नव्हते. पण आधीच आत आलेल्या लोकांची गर्दी आमच्यापुढे होतीच. प्रथम नंदीचे दर्शन घेऊन गर्भगृहात पोहोचलो आणि पिंडरुपी शिळेचे स्पर्शदर्शन घेतले. माझ्या एका मित्राने त्याच्या दिवंगत वडिलांसाठी काही प्रार्थना करायला सांगितली होती. मनोमन ती प्रार्थनाही मी केली. जवळजवळ सर्वच देवस्थानांमध्ये असते तशी कमालीची गर्दी, "विविध प्रकारच्या पूजा करून घ्या" असे म्हणत तिथल्या पुजाऱ्यांचे मागे-मागे लागणे, एकंदर अस्वच्छता आणि ढकलाढकली पाहून मनात चीड आली. आमच्या पुढे असलेल्यांपैकी बरेचसे लोक 'व्हीआयपी दर्शन'वाले होते. अशा धनिक यजमानांची किती आणि कशी लुबाडणूक करता येईल, याची तिथल्या पुजाऱ्यांमधे जणू चढाओढ चालू होती. 

गर्भगृहात गेल्यानंतर माझ्या लक्षात आले की आम्ही आणलेले पैसे आमच्या बॅकपॅकमध्येच राहिले होते. त्यावेळी मला 'स्वामी विवेकानंद हॉस्पिटल'चे ब्रीदवाक्य आठवले, "नरसेवा, नारायणसेवा". त्यामुळे मी माझ्या मनाचे समाधान करून घेतले की हॉस्पिटलमधे मी जी नरसेवा केली होती, तीच ईशसेवा मानून केदारनाथ मला आशिर्वाद नक्की देतील! गर्भगृहामध्ये जमिनीवर अनेक नाणी खाली पडलेली दिसली. मी ती खाली पडलेली सगळी नाणी उचलली आणि पिंडीसमोरच्या दानपेटीत टाकली. ते बघून तिथल्या एका पुजाऱ्याने माझ्याकडे पैशासाठी हात पसरले. मी मानेनेच नाही असे म्हटल्यावर त्याने चक्क माझ्या पाठीत धपाटा घातला! मला कमालीचा राग आला. पुढे असेच एका-दोघांनी मला हाताने ढकलल्यावर मी त्यांच्यावर चक्क माझ्या हातातली काठी उगारली. केदारनाथाच्या पवित्र गर्भगृहात आलेले हे कडवट अनुभव खूपच क्लेशदायक होते. 

देवळाच्या मागच्या बाजूला काही पायऱ्या चढून गेल्यावर आम्हाला 'भीमशिळा' दिसली. २०१३ साली मंदाकिनी नदीच्या रौद्र रूपाने झालेल्या प्रलयकाळात ही भीमकाय शिळा प्रवाहाबरोबर वाहत येऊन, बरोबर मंदिराच्या मागच्या बाजूस येऊन थांबली होती. त्या शिळेने पाण्याचा प्रवाह अडवल्यामुळेच मंदिराचे काहीही नुकसान झालेले नव्हते. प्रत्यक्ष भीमानेच शिळेचे रूप घेऊन केदारनाथाच्या गाभाऱ्याचे रक्षण केले असल्याची भावना श्रद्धाळूंच्या मनात रूढ आहे. भीमशिळेजवळ आम्ही फोटो, व्हिडिओ काढले. त्यानंतर देवळाचा परिसर थोडा हिंडून बघितला व देवळाच्या बाहेरही काही फोटो काढले. त्यानंतर मेडिकल बूथवर येऊन आमची बॅकपॅक कुणाल नर्सकडून घेतली आणि त्याचे आभार मानून परतीच्या वाटेला लागलो.

या सगळ्या काळात जवळजवळ सतत बारीक पाऊस पडत राहिला होता. पण आमच्याकडे दोन रेनकोट्स असल्याने आम्ही भिजलो नाही. "केदारनाथ येथील हॉस्पिटलमधली माझी सेवा पूर्ण करून मगच मी शेवटच्या दिवशी स्पर्शदर्शनाला जाईन." असे इथे येताना मी ठरवूनच आले होते. ती गोष्ट जरी माझ्या मनाप्रमाणे झालेली असली, तरीही आनंदच्या तब्येतीची मला फार काळजी वाटत होती. देवळाच्या आसपासच्या डोंगरांवर यात्रेकरू गेलेले आम्हाला दिसत होते. पण आता आम्हाला मात्र इतरत्र कुठेही जायची इच्छा उरली नव्हती आणि अंगात त्राणही नव्हते. परतीच्या वाटेवर चालताना आनंदला खूप दमायला होत होते. त्याचे पाय दुखत होते आणि त्याला तहानही लागत होती. त्यामुळे त्याला वरचेवर विश्रांतीसाठी थांबावे लागत होते. भाविकांच्या तुडुंब गर्दीतून वाट काढत आणि आमच्या आसपास घोंगावणाऱ्या पिठ्ठूवाले आणि घोडेवाल्यांना बाजूला सारत, आम्ही कसेबसे हॉस्पिटलमधे येऊन पोहोचलो. आनंदने केदारनाथाचे देऊळ पाहावे अशी माझी तीव्र इच्छा होती, ती पूर्ण झाली. पण त्याची अशी फरफट झालेली पाहूनही मला फार वाईट वाटले. आम्ही साडेअकराच्या  सुमारास हॉस्पिटलमधून बाहेर पडलो होतो आणि दीड वाजेपर्यंत परत आलो होतो. 

अनंत अडचणींवर मात करून अखेर गर्भगृहापर्यंत वेळेत पोहोचणे आणि स्पर्शदर्शन करणे आमच्या नशिबी लिहिलेले होते तर!

[क्रमशः]

©डॉ. स्वाती बापट. 
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा