आज सकाळी सहा वाजता हरिद्वारहून नारायणकोटीला निघायचे होते. पहाटे साडेचारचा गजर व्हायच्या आधीच जाग आली. सकाळी उठल्या-उठल्या आम्हा दोघांनाही गरम चहा हवाच असतो. पहाटे चहा मिळावा यासाठी आनंदने आदल्या रात्री इथल्या नेपाळी आचाऱ्याशी संधान बांधून ठेवले होते. "सकाळी चार वाजता या, मी इथेच असतो, मला उठवा, तुम्ही म्हणाल तेंव्हा, छान ताजा आणि गरम चहा करून पाजतो", असे आश्वासन त्याने आनंदला दिलेले होते. त्यामुळे आम्हाला चहा मिळणारच या खात्रीने आम्ही एक मजला उतरून भोजनालयामधे पोहोचलो. तिथे एक मनुष्य खाली जमिनीवर गादी टाकून, डोक्यावरून पांघरूण घेऊन झोपलेला दिसला. आनंदने त्याला हाक मारून उठवले. तर तो नेपाळी आचारी नसून कोणीतरी वेगळाच माणूस निघाला. "मी चहा करणारा माणूस नाही आणि जो चहा करतो तो माणूस इथे झोपत नाही", असे अत्यंत झोपाळलेल्या आवाजात सांगून, तो मनुष्य पुन्हा डोक्यावरून पांघरूण घेऊन झोपून गेला. आता चहा मिळणार नाही, या कल्पनेने आम्ही दोघेही अस्वस्थ झालो. आपणच स्वयंपाकघरात जाऊन चहा करावा आणि प्यावा, अशा विचाराने आम्ही आत शिरलो. पण तिथला सगळा पसारा आणि भली मोठी भांडी पाहून आम्ही चक्रावून गेलो. त्यामुळे आम्ही चहा न करण्याचा निर्णय घेतला. आदल्या रात्री फ्रीजमधे ठेवलेला, कापलेल्या खरबुजाचा डबा घेऊन वर आलो आणि दोघांनी मिळून ते संपवले.
अंघोळी उरकून, प्रवासाचे कपडे घालून, सगळे सामान बांधून आम्ही तयार झालो होतो. तोच ५.३० च्या सुमारास, आमच्या खोलीच्या दारावर थाप पडली. हॉस्पिटलचा वॉचमन आम्हाला सर्वांना जागे करायला आला होता. पाठोपाठ कोणीतरी खोलीवर चहा घेऊन आले. छान गरम, पण साखरेच्या पाकासारखा गोड चहा पिऊन आम्ही खाली उतरलो. आमचे सामान हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी आधीच खाली नेऊन ठेवले होते. आम्ही उतरल्यानंतर डॉ. हर्ष आणि डॉ. अजय ही मुले त्यांचे सामान आवरून खोलीबाहेर पडले. हर्ष म्हणजे एक अगदी खास नमुना आहे, हे त्याच्या काल रात्रीच्या बोलण्यातच कळले होते. आज सकाळी तो खाली यायच्या आधी बराच वेळ वरच्या मजल्यावरच थांबून स्वतःचे फोटो काढत बसला होता. ६.१५ पर्यंत आम्हाला न्यायला टॅक्सी आली. शेवटी हर्षला खाली बोलवावे लागले. चालक आमचे सामान टॅक्सीच्या वरच्या कॅरीअरला बांधत असतानाच आम्ही हॉस्पिटलमधे असलेल्या स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्यासमोर आमचे फोटो काढले.
हरिद्वार ते नारायणकोटी, हा वळणा-वळणांच्या घाटरस्त्यावरचा प्रवास, कमीतकमी ६ तासांचा आहे. सध्या चारधाम यात्रा चालू असल्याने सतत वाहतूक कोंडी असते. त्यामुळे उशिरात उशिरा सकाळी सहा-साडेसहापर्यंत हरिद्वारहून निघा, नाहीतर जेवायच्या वेळेपर्यंत तुम्ही नारायणकोटीला पोहोचणार नाही, असे ध्वजपालजींनी आम्हाला बजावून सांगितले होते. आम्हाला नारायणकोटीला घेऊन जाण्यासाठी नेमलेल्या टॅक्सीवाल्याला आणखीही एक काम दिलेले होते. आमच्या आधी केदारनाथला गेलेल्या आणि १० दिवसांची सेवा पूर्ण करून परतणाऱ्या डॉक्टर्सना घेऊन त्याच दुपारी त्याला पुन्हा हरिद्वारला परतायचे होते. त्यामुळे आम्हाला नारायणकोटीला वेळेत पोहोचणे आवश्यक होते.
हरिद्वार ते नारायणकोटीचा प्रवास तसा सुखकर झाला. चालकाव्यतिरिक्त आम्ही चार प्रवासी गाडीत होतो. एसी गाडी होती खरी, पण अनेक ठिकाणी चढाचा रस्ता असल्याने चालकाला एसी बंदच करावा लागत होता. आनंदला मानेचा त्रास असल्याने तो चालकाच्या शेजारी बसला होता. मी, अजय व हर्ष मागे बसलो होतो.
हर्ष आणि अजय या विद्यार्थ्यांशी खूप गप्पा झाल्या. ही मुले नुकतीच फायनल एमबीबीएस ची परीक्षा देऊन आलेली होती. रिझल्ट अजून यायचा होता. परीक्षा झाल्यावर इंटर्नशिप चालू व्हायच्या आधीच्या काळात ही तरूण मुले केदारनाथधामच्या हॉस्पिटलात काम करायला चाललेली होती, हे ऐकून आम्हाला दोघांनाही त्यांचे कौतुक वाटले. हे दोघेही, एमबीबीएसच्या पहिल्या वर्षापासून ते आजतागायत एकाच खोलीवर राहात आहेत. त्यामुळे त्यांचा मैत्रीचा बंध अगदी घट्ट आहे. दोघेही अगदी पहिल्या वर्षापासून रक्तदानाचे कँप्स घेणे, आणि इतरही बरेच समाजोपयोगी कार्य करत आलेली आहेत. दोघेही मध्यप्रदेशचे रहिवासी आहेत. हर्ष कटणीचा आणि अजय सिहोरचा राहणारा आहे. दोन्ही मुले शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यामुळे पुढे शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभावापेक्षा जास्त भाव मिळवून देण्याच्या उद्देशाने काही व्यवसायही चालू करावा असा त्यांचा मानस आहे. हर्ष फारच ध्येयवादी व आदर्शवादी वाटला. त्याच्या कल्पना चांगल्या असल्या तरीही त्या प्रत्यक्षात उतरणे अवघड वाटत होते. त्या मानाने अजय बराच प्रॅक्टिकल वाटला.
हर्ष आणि अजय कडून National Medicos Organization (NMO) या संस्थेबद्दल माहिती मिळाली. मेडिकलच्या विद्यार्थ्यांपासून ते वरिष्ठ वैद्यकीय व्यावसायिकांपर्यंत कोणीही व्यक्ती या संस्थेची सदस्य होऊ शकते. देशभरातल्या दुर्गम, किंवा आदिवासी-बहुल भागांमध्ये या संस्थेचे मेडिकल कँप्स चालतात, देशभरातल्या लहान-मोठ्या गावांमध्ये त्यांच्या वार्षिक मीटिंग्ज होतात असे समजले. एकूण ही सर्व माहिती मला चांगली वाटली. म्हणून मी लगेच NMO चा फॉर्म भरायचा निर्णय घेतला. पण टॅक्सी-प्रवासादरम्यानच तो फॉर्म मी भरत असल्याने अनंत अडचणी आल्या. शेवटी तो फॉर्म दुसऱ्या दिवशी केदारनाथच्या वाटेवर जाताना भरला गेला.
हरिद्वार ते नारायणकोटीच्या रस्त्यावर वाटेत शिवपुरी व ब्रम्हपुरी ही गावे लागली. इथे River rafting, bungee jumping असे साहसी खेळ चालतात. त्यामुळे तिथपर्यंत खूप ट्रॅफिक लागले. गेल्या वर्षी आम्ही या भागात फिरायला आलेलो असताना आमची रिव्हर राफ्टिंगची सफर शिवपुरीतूनच सुरु झाल्याचे आठवले. हा भाग संपल्यानंतर कुठेतरी नाष्टा करायला थांबायचे ठरले. पण रस्त्यावर फारशी चांगली उपहारगृहे दिसत नव्हती. शेवटी चालकाला सांगितले की तू तुझ्या माहितीच्या बऱ्या ठिकाणी थांब. त्याने ज्या ढाब्यावर गाडी थांबवली तिथे जाऊन आम्ही पराठे, दही, छोले आणि कसलीशी चटणी असलेल्या थाळीचा नाष्टा केला. भूक लागलेली होतीच, आणि आता उंचावर चढून आल्याने हवाही जराशी आल्हाददायक वाटू लागली होती. मी आणि आनंदने आधी एकेक पनीर पराठा खाल्ला व नंतर एक मिक्स पराठा अर्धा-अर्धा करून खाल्ला. अजयने केवळ एक मिक्स पराठा खाल्ला. हर्षला गाडी लागण्याचा त्रास असल्याने त्याने फक्त लिंबूपाणी घेतले. लिंबूपाणी विकणारा मनुष्य चाट मसाला लावलेली काकडीपण विकत होता. मी आमच्यासाठी खायला काकडीही आणली. नाष्ट्यानंतर चहा प्यायल्याशिवाय समाधान होणार नव्हते. डॉ. अजयदेखील माझ्याप्रमाणेच चांगल्या चहाचा शौकीन असल्याने आमची मैत्री जरा आणखी घट्ट झाली.
आम्ही सकाळी ६.३० ला हरिद्वारहून निघालो होतो. वाटेत जेमतेम अर्धा पाऊण तास थांबलो होतो. दुपारचा दीड वाजत आला तरीही रस्ता संपत नव्हता. वाटेत आधी देवप्रयाग, मग श्रीनगर (गढवाल), आणि रुद्रप्रयाग ही गावे लागली होती. केदारनाथकडून वाहत येणारी मंदाकिनी आणि हिमालयातील एका हिमनगातून वाहत येणारी अलकनंदा या पवित्र नद्यांचा संगम रुद्रप्रयाग येथे होतो. तिथून पुढे वाहत जाणारी अलकनंदा देवप्रयाग येथे भागीरथी नदीला जाऊन मिळते आणि त्यानंतर ती गंगा या नावानेच पुढे वाहत जाते. या दोन्ही संगमांच्या ठिकाणी आपण काही काळ थांबावे अशी हर्षची फार इच्छा होती. परंतु, आम्ही पोहोचल्यानंतर ज्या डॉक्टरांना आमच्याच गाडीतून हरिद्वारला परतायचे होते, त्यांचा आमच्या टॅक्सीचालकाला सतत फोन येत असल्याने आम्ही वाटेत फार वेळ वाया घालवणे श्रेयस्कर नव्हते.
नारायणकोटीला पोहोचेपर्यंत दुपारचे २.३०-३ वाजले होते. अजय आणि हर्षची राहण्याची सोय नारायणकोटीच्या हॉस्पिटलमधे केली होती. पण तिथे काही दुरुस्तीचे काम चालू असल्याने, आम्हा दोघांना, जवळच असलेल्या एका छोट्या रिसॉर्टमधे ठेवले होते. नारायणकोटी हॉस्पिटलचे व्यवस्थापक श्री. गौरव जुयाल हे आम्हाला थोड्या वेळाने येऊन भेटणार असे म्हणाले होते. आम्ही बरोबर आणलेली वैद्यकीय सामग्री, मला त्यांच्याकडे सुपूर्द करायची होती. तसेच दुसऱ्या दिवशीचे नियोजनही करायचे होते. पण बराच वेळ झाला तरी तो मनुष्य आला नाही. शेवटी त्याला फोन करून मी सांगितले, "आम्हाला आता जेवण करून झोपायचे आहे, तुम्ही लवकर या". सर्व वैद्यकीय सामग्री त्याच्या स्वाधीन केली आणि केदारनाथच्या रस्त्यासंबंधी चर्चाही केली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, केदारनाथच्या वाटेवर सध्या तुफान गर्दी आहे, सोनप्रयागपर्यंत सतत वाहतूक कोंडी असते, तसेच तिथून पुढे गौरीकुंडपर्यंत शटल गाडी मिळणेही खूप अवघड होते, असे कळले. त्यामुळे शक्यतो पहाटे तीन वाजता नारायणकोटी सोडणे आणि लवकरात लवकर सोनप्रयाग गाठणे आवश्यक आहे, हे लक्षात आले. त्याप्रमाणे अजय आणि हर्षलाही दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजेपर्यंत तयार राहा, असा निरोप दिला.
आम्ही राहात असलेल्या 'हिमालयन कम्फर्टस्' या रिसॉर्टमधे अनेक छोट्या-छोट्या कॉटेजेस् होत्या. आमची कॉटेज म्हणजे एक लहानशीच पण अगदी उबदार अशी खोली होती. रिसॉर्टचा स्टाफ अतिशय अदबीने वागत होता. अगदी आर्मीच्या शिस्तीत सगळे काम चालू असल्याचा भास होत होता. त्यामुळे आम्ही दोघेही सुखावलो. त्यांच्या रेस्टॉरंटमधे बसून जेवायला मजा आली. आधी गरमागरम टोमॅटो सूप आणि भाजलेले पापड आणि सॅलड आले. त्यानंतर फणसाची भाजी, बीन्स+बटाटा भाजी, मटर-पनीर, छान शिजलेला आणि लाजवाब चवीचा राजमा, भात आणि टमटमीत फुगलेल्या गरम रोट्या असे चविष्ट जेवण होते. जेवणानंतर सुकामेवा घातलेली खीर होती व शेवटी सौंफ व मुखवास दिला. एकूण सगळे नेटके वाढणे, स्वच्छता आणि वाढप्यांचे अदबशीर बोलणे बघून आर्मीच्या वातावरणाचीच आठवण होत राहिली. न राहवून आम्ही चौकशी केल्यावर समजले की या रिसॉर्टचे मालक, कर्नल प्रदीप श्रीवास्तव, हे सेवानिवृत्त आर्मी पायलट आहेत. सध्या ते दिल्लीत वास्तव्याला असून इथे एक मॅनेजर आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची टीम रिसॉर्टची सर्व व्यवस्था पाहते. आर्मीमधून सेवानिवृत्तीनंतर कर्नल श्रीवास्तव हे येथील एका खाजगी हेलिकॉप्टर कंपनीमध्ये पायलट म्हणून काम करीत होते. या रिसॉर्टच्या जवळच फाटा आणि गुप्तकाशी अशी दोन हेलिपॅड आहेत. त्यामुळे तिथून वर हेलिकॉप्टरने केदारनाथला जाणाऱ्या आणि येणाऱ्या भाविकांची इथे चांगली सोय होते. या चार महिन्यांत या रिसॉर्टची बरीच कमाई होत असावी. आनंदने लगेच कर्नल प्रदीप श्रीवास्तव यांच्याशी फोनवर बोलून त्यांच्या रिसॉर्टबद्दलचा आमचा अभिप्राय कळवला. मी त्यांचा वेबसाईटवर review देखील लिहिला.
जेवण झाल्यावर आधी सामानाची बांधाबांध केली. श्री. गौरव जुयाल यांनी आमच्या लहान-लहान स्ट्रॉलीज पाहिल्या आणि आम्हाला त्या स्ट्रॉलीज मधेच सामान भरायला सांगितले. त्यामुळे केदारनाथला न्यायचे सामान त्यात भरून आम्ही आमच्या स्ट्रॉलीज तयार ठेवल्या. त्या स्ट्रॉलीज खेचरावरून वर केदारनाथला नेल्या जाणार होत्या. आमचे सामान केदारनाथला पोहोचायला दोन दिवसदेखील लागू शकतील असे समजले होते. सहसा, एका दिवशी सकाळी दिलेले सामान, दुसऱ्या दिवशी गौरीकुंडला पोहोचते व तिथे ते खेचरावर लादून तिसऱ्या दिवशी केदारनाथच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचवले जाते. आम्ही जे सामान वरपर्यंत नेणारच नव्हतो तेवढे सामान आमच्या रिकाम्या झालेल्या मोठ्या बॅगमध्ये घालून, ती बॅग आम्ही नारायणकोटीलाच ठेवली. स्ट्रॉलीज वरपर्यंत नेता येणार नाहीत अशा कल्पनेने आम्ही मुंबईहून ज्या रिकाम्या हॅन्डबॅग्स आणल्या होत्या त्या मात्र उगीचच बरोबर वाहून आणल्या असा पश्चात्ताप आम्हाला झाला. आमच्या पाठीवरच्या बॅकपॅक्समध्ये आम्ही अगदी अत्यावश्यक सामान घेतले. त्यात पाण्याची एकेक बाटली, केदारनाथला गेल्यावर बदलण्यासाठी एकेक कपड्यांचा जोड, एक स्वेटर, कानटोपी, माझा स्टेथोस्कोप, आधार कार्ड, रेनकोट व पैसे अशा मोजक्या वस्तू सोबत ठेवल्या. माझ्याकडे एक पातळ सुती ओढणी होती. तीही बॅकपॅकमधे ठेवली. चालताना वापरण्यासाठी ट्रेकिंग स्टिकही घेतल्या. संस्थेने आम्हाला दिलेले, गळ्यात अडकवायचे आयडी कार्ड किंवा ओळखपत्रही सोबत ठेवले.
सामानाची आवराआवर करून ९ वाजता झोपी गेलो. पण झोपण्यापूर्वी पहाटे दोन वाजताचा गजर लावायला मात्र विसरलो नाही!


छान. 👍
उत्तर द्याहटवा- विठ्ठल
Madam, I am a doctor settled abroad. I woder if I can volunteer in this hospital for a short period every year. As I am now working part time it will be feasible for me and my other Indian friends to contribute to this institution. Will you kindly give the details of this hospital and how one can get in touch with the administrators ? Many thanks
उत्तर द्याहटवाI can give you all the details. However, your comment has been posted as "निनावी". So, I have no way to communicate with you. Please message me on my WhatsApp number 9422035875.
उत्तर द्याहटवाडॉ. हर्ष आणि डॉ. अजय या दोन तरुण विद्यार्थ्यांबद्दल स्वातीताईंनी जे लिहिले आहे, त्यावरून त्या स्वतः एक उत्तम डॉक्टर तर आहेतच, *पण त्याहूनही एक संवेदनशील आणि उत्तम माणूस आहेत हे सिद्ध होते.*
उत्तर द्याहटवाफायनल एमबीबीएसची परीक्षा संपवून निकाल लागण्यापूर्वीच्या सुट्टीत ही मुले केदारनाथसारख्या दुर्गम भागात वैद्यकीय सेवा देण्यासाठी चालली आहेत, हे *त्यांनी मोठ्या कौतुकाने अधोरेखित केले आहे.*
डॉ. हर्षबद्दलचे विशेष कौतुक: हर्षचे स्वभावचित्र त्यांनी खूप सुंदर रेखाटले आहे. तो थोडा अवखळ आहे (सकाळी स्वतःचे फोटो काढण्यात मग्न असणारा), पण त्याच वेळी तो अत्यंत *ध्येयवादी व आदर्शवादी आहे.* मध्यप्रदेशच्या शेतकरी कुटुंबातून आलेल्या हर्षचे आपल्या मातीशी आणि शेतकऱ्यांशी असलेले नाते स्वातीताईंनी ओळखले. त्याची स्वप्ने पाहून स्वातीताईंना *जाणवले असावे* जर हर्षची ही स्वप्ने सत्यात उतरली, तर भारताला डॉ. अभय बंग यांच्यासारखा आणखी एक सेवाभावी, समर्पित डॉक्टर लाभेल.
हर्षमधील ही समाजसेवेची ठिणगी ओळखणे, हे स्वातीताईंच्या विशाल आणि पारखी नजरेची साक्ष देते.
*लेखिका म्हणून स्वातीताईंचे कौतुक करावे तितके थोडे आहे,* कारण त्यांचे पती (आनंद) हे माजी लष्करी अधिकारी (Ex-military officer) असल्याने त्यांची राहण्याची, व्यवस्थेची आणि शिस्तीची परिमाणे खूप उच्च असणार हे उघड आहे. तरीही, नारायणकोटी येथील 'विवेकानंद हेरिटेज रिसॉर्ट'च्या निसर्गरम्य परिसराने आणि तिथल्या व्यवस्थेने त्यांचे मन जिंकून घेतले. मिलिटरी बॅकग्राउंड असलेल्या कुटुंबाला तिथली स्वच्छता, कडेकोट व्यवस्था आणि निसर्गाचे सौंदर्य भावले, हे स्वातीताईंनी ज्या कौतुकाने आणि आत्मीयतेने लिहिले आहे, ते खरोखरच मनाला स्पर्शून जाते.
केवळ आपला प्रवास न सांगता, प्रवासात भेटलेल्या या मुलांमार्फत 'नॅशनल मेडिकोज ऑर्गनायझेशन' (NMO) या संस्थेचे कार्य त्यांनी वाचकांपर्यंत पोहोचवले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तरुण पिढी दुर्गम भागात कशी निस्वार्थी सेवा देत आहे, हे सांगून त्यांनी लेखाची उंची वाढवली आहे.
हा तिसरा भाग केवळ एका प्रवासाची डायरी नाही, तर त्यात तरुण पिढीच्या स्वप्नांचा आदर, सहप्रवाशांच्या स्वभावाचे सुंदर पैलू आणि निसर्गाचे अप्रतिम कौतुक आहे. *डॉ. स्वाती बापट यांचे हे लेखन वाचकाला खिळवून ठेवणारे आणि विचार करायला लावणारे आहे!*
🙏✌️👍
हटवा