बुधवार, १० जून, २०२६

केदारनाथ-भाग-२

आमची मुंबई-दिल्ली फ्लाईट १८ तारखेला सकाळी १० वाजता होती. आम्ही जाताना मुद्दामच मुंबई दिल्ली असे विमानाचे तिकीट काढले होते. डेहराडून एयरपोर्ट छोटा आहे आणि हवामान खराब  असले की तिथला विमानतळ बंद केला जातो. दिल्ली-डेहराडून हे विमान काही कारणाने रद्द झाले तरी आम्ही दिल्लीहून टॅक्सी घेऊन डेहरादूनला पोहोचू शकणार होतो. आम्ही दोघेही सकाळी साडेपाचलाच उठलो. आमच्या आधीच गिरीशही  उठून बसला होता. आम्ही दोघे जात असल्याने तो जरा हळवा झाला होता. आमच्यासाठी त्याने चहा करून ठेवला होता आणि सँडविचेसही बनवून घेतली होती. रात्रीचे जेवण बरेच जड झालेले असल्याने आम्हाला  दोघांनाही सकाळी काहीही खायची भूक नव्हती. त्यामुळे ती सँडविचेस डब्यात घालून वाटेत खाण्यासाठी आम्ही आमच्याबरोबर घेतली. तसेच चार वेलची केळीही गिरीशने बरोबर दिली. प्रवासात खाणे आणि पाणी बरोबर असले पाहिजे, असा आमच्या आईचा नियम होता. तो नियम आम्हा तिघाही भावंडांच्या डोक्यात हे पक्का बसलेला आहे. त्यामुळे सॅन्डविचेसचा डबा, केळी आणि दोन पाण्याच्या बाटल्याही मी सोबत घेतल्या. त्यानंतर पटापटा अंघोळी करून व आवरून, आम्ही उबर टॅक्सीने विमानतळ गाठला. 

मुंबई ते दिल्ली व दिल्लीपासून पुढे देहरादून पर्यंतचा प्रवासही सुखाचा झाला. कोणत्याही प्रवासात इतर सहप्रवासी काही खात असतील तर आपल्यालाही काहीतरी खायची अनावर इच्छा होतेच. दिल्लीच्या प्रवासात विमानात एयरहोस्टेसने काही ठराविक प्रवाशांनाच खाणे दिले. त्यातल्या काहींनी आधीपासून खाद्यपदार्थांसाठी पैसे भरलेले होते तर काहीजण पैसे भरून खाद्यपदार्थ विकत घेत होते. त्या खाद्यपदार्थांच्या वासाने आमचीही भूक चाळवली. म्हणून आम्हीही सोबत आणलेले सँडविचेस व केळी असे खाल्ले. आम्ही देहरादूनला दुपारी ३ वाजता पोहोचणार होतो. दिल्लीला बारा वाजताच पोहोचलो होतो. थोडे खाणे झाले असले तरीही अजूनही पोटात भूक होती. दिल्ली विमानतळावर अगदी गडबडीतच वडा सांबार खाल्ले आणि कॉफी प्यायलो. त्या सुमार चवीच्या वड्यामुळे आणि कॉफीमुळे अंशी आमच्या तोंडाची चव तर खराब करून घेतलीच, पण त्या सुमार खाण्यापायी  चक्क साडेसहाशे रूपये उडाल्याचे दुःख त्याहून मोठे होते

दिल्ली देहरादून विमान आम्ही अगदी धावत-पळतच पकडले. जेमतेम पाऊण तासांतच विमान डेहरादूनला उतरले. गेल्या वर्षी डिसेंबरमधे आम्ही दिल्लीमार्गे हरिद्वार, ऋषिकेश आणि देहरादूनला येऊन गेलो होतो. पण त्यावेळी आम्ही दिल्ली-देहरादून प्रवास रेल्वेने व देहरादून-दिल्ली प्रवास टॅक्सीने केला होता. त्यामुळे, देवभूमीतील देहरादून येथील जॉली ग्रँट एयरपोर्टवर आम्ही प्रथमच पाऊल ठेवत होतो. तिथे सगळ्या पाट्या हिंदी तसेच संस्कृतमधे आहेत. वाचून छान वाटले. एअरपोर्टवर आम्हाला घ्यायला हॉस्पिटलची गाडी आली होती. गाडी तशी खटाराच होती. एसी लावलेला होता पण गाडी फारशी थंड होत नव्हती. आमच्या आधी दोन तीन तास, हैद्राबादचे एक सायकियाट्रिस्ट डॉ. राव आलेले होते. आम्ही दुसऱ्या दिवशी केदारनाथसाठी रवाना होणार होतो तर ते बद्रीनाथला जाणार होते. त्यांना व आम्हाला मिळून एकच गाडी नेमलेली होती. त्यांचे जेवण झालेले नसल्याने, आम्ही पोहोचलो तेंव्हा ते गाडी घेवून जेवण-खाण्याच्या शोधात बाहेर पडलेले होते. पण दुर्दैवाने त्यांना जवळपास काहीच खायला मिळाले नाही. आमच्या बरोबर गाडीतून तेही हरिद्वारच्या हॉस्पिटलमधे आले. तोपर्यंत चार वाजून गेले होते आणि ते भुकेने कासावीस झाले होते. 

हॉस्पिटलमधे पोहोचल्यानंतर तिथले मुख्य डॉक्टर संजय शाह यांच्या ऑफिसमधे बसून, त्यांच्या बरोबर बऱ्याच गप्पा झाल्या. थोड्या वेळाने चहा आला पण चहाबरोबर बिस्किटे येणार होती ती काही  आली नाहीत. डॉ रावांना हिंदी बोलण्याची जरा अडचणच असल्याने आणि कदाचित भिडस्त स्वभावामुळे, ते त्यांच्या भुकेबाबत किंवा काहीतरी खायला मिळावे याबद्दल  तोंड उघडून बोलेनात. डॉ शहा तर खूपच गप्पा मारत बसले होते. आम्हा दोघांनाही प्रवासाचा शीण जाणवत होता. शेवटी काही खायलाही येईना आणि गप्पाही संपेनात, हे बघून, आम्हीच डॉ. शाह यांना सांगितले की डॉ राव यांना भूक लागली आहे, तरी त्यांच्या जेवणाची व्यवस्था लवकरच झाली तर बरे होईल.  

हॉस्पिटलच्या कॅन्टीनमध्ये एकच स्वयंपाकी आहे, पण त्याने  संध्याकाळची भाजी आमटी करून ठेवलेली आहे, अशी खबर मिळाली. आम्हा तिघांसाठी फक्त गरम फुलके करणे बाकी होते. आम्ही तिघेही पहिल्या मजल्यावर असलेल्या भोजनालयात गेलो. भोजनालयाच्या आत जाण्याआधी बाहेरच्या स्टँडवर आपापले बूट व चपला काढून जाणे अपेक्षित असते. जेवण झाल्यावर आपापले ताट, वाटी, भांडे व चमचे धुवून ठेवायचे असते. हॉस्पिटलमधे काम करणारेे सर्व कर्मचारी व डॉक्टर्स एकत्र आणि एकच प्रकारचे जेवण या भोजनालयात आनंदाने जेवतात. सकाळी प्रार्थना होते, अन्नदेवतेला हात जोडून मगच सगळेजण जेवण सुरू करतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिस्तीचा आणि एकत्र काम करण्याच्या शक्तीचा अनुभव इथे आला. 

 डॉ रावांच्यामुळे संध्याकाळी  सहाच्या आत  आम्हालाही गरम जेवण मिळाले. अगदी साधे पण रुचकर जेवण होते. तिथे डॉ संजय शाह यांची पत्नी डॉ. तीस्ता शाह यांनी स्वहस्ते आम्हाला गरम फुलके आणून वाढले. अशा प्रकारे स्वागत झाल्यामुळे आम्ही मनोमन सुखावलो. पोटभर जेवण झाल्यावर आम्ही आमच्या खोलीत गेलो. हॉस्पिटलमधेच वरच्या मजल्यावर चार क्रमांकाच्या खोलीमधे आमची राहण्याची व्यवस्था होती. आतल्या आतच संडास व न्हाणीघर असलेली ती  प्रशस्त खोली होती. आमचे सामान आधीच तिथे नेऊन ठेवलेले होते. एका मठाची वास्तू या संस्थेने आपल्या हॉस्पिटलसाठी मिळवली आहे. याच वास्तूमधे 'सेवाभारती' या संघाच्या उपसंस्थेचे कार्यालयही आहे.

 त्या जुन्या मठाच्या जागेतच हे हॉस्पिटल सुरू केलेले असले तरी आमची राहण्याची व्यवस्था असलेल्या भागाचे बांधकाम कदाचित नवीन असावे. खोलीतील बाथरूममधे एक साबण, एक शांपूचे व एक तेलाचे पाकीट ठेवलेले होते. अंग पुसायचे पंचे व हात पुसायला टॉवेलही दिलेला होता. खोली साधीच पण स्वच्छ होती. बाहेर सर्व खोल्यांना सामायिक असा एक मोठा व्हरांडाहोता. आम्ही दोघांनीही अंघोळ केली. दिवसभर घातलेले कपडे धुवायला वॉशिंग मशीनचा शोध आम्ही घेऊ लागलो. आमच्या खोलीकडून जुन्या भागाला जोडणारा एक कलंडलेला आणि अरुंद व्हरांडा होता. तिथेच पुढे एका मोठ्या खोलीत चार-सहा वॉशिंग मशीन्स ठेवलेली होती. बरेच जुने सामानही तिथे पडलेले होते. बाहेर एक मोठी गच्ची होती. तिथे कपडे वाळत घालण्यासाठी तारा होत्या. काही खोल्यांच्या बाहेर, कपडे वाळत घालण्यासाठी स्डँडही ठेवलेले दिसत होते. आनंदने तिथे जाऊन आमचे दिवसभर वापरलेले कपडे, वॉशिंग मशीनमधून धुवून काढले व वाळत घातले. बाहेर गच्चीवर छान वारे सुटलेले होते. खोलीच्या बाहेर वातावरण थंड आणि प्रसन्न होते. त्यामानाने खोलीच्या आत एसी असूनदेखील विशेष थंडावा जाणवत नव्हता. 

पोटभर जेवण झालेले असले तरीही जिभेचे चोचले पुरवायला आम्ही दोघे बाहेर पडलो. डॉ. राव यांना  'हर की पौडी' घाटावरची गंगाआरती पाहायची असल्याने ते तिकडे गेले होते. आम्ही सहा महिन्यापूर्वीच ते सर्व पाहिलेले असल्याने, जरा इकडे-तिकडे फिरून कुठे हलवायाचे चांगले दुकान दिसते आहे का ते पाहायला आम्ही निघालो. जवळच मोहन पुरीवाल्याचे दुकान दिसले. तिथे आत वातानुकूलित खोलीत बसून रसमलाई, लस्सी आणि दही खाऊन जीव तृप्त झाला. परत येताना एक खरबूजही आणले.  तिथल्या स्वयंपाकघरातून सुरी घेऊन अर्धे खरबूज कापून खाल्ले आणि उरलेले अर्धे कापून डब्यात भरून स्वयंपाकघरातील फ्रीजमधे नेऊन ठेवले. पहाटे निघण्यापूर्वीच्या नाश्त्याची सोय झाली. 

भोपाळहून आलेली डॉ. हर्ष राय आणि डॉ. अजय अहिरवाल अशी दोन तरूण मुले आमच्या बरोबरच केदारनाथला जाणार आहेत, असे आम्हाला इथल्या श्री. ध्वजपाल जी नावाच्या  मॅनेजरकडून कळले होते. रात्री त्या दोघांची आणि आमची ओझरती भेट झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता, आम्हाला नारायणकोटीला नेण्यासाठी गाडी येईल, असे ध्वजपालजींनी सांगितले होते. त्यामुळे रात्री लवकर झोपणे आवश्यक होते. पण विमानातून आणण्यासाठी बॅग्ज ज्या पद्धतीने भरल्या होत्या, त्या उघडून त्यातले सामान वेगळ्या पद्धतीने भरणे आता आवश्यक होते. एका मोठ्या बॅगेमधे केदारनाथच्या हॅस्पिटलमधे देण्याचे सामान वेगळे केले. केदारनाथला जायच्या वाटेवर नारायणकोटी येथे आमच्या व्यक्तिगत सामानापैकी कुठले सामान काढून ठेवायचे आणि कोणते सामान पुढे वरपर्यंत न्यायचे याचे मनोमन नियोजन केले. रात्री १० वाजेपर्यंत झोपलो, पण त्याआधी सकाळी ४.३० चा गजर लावायला आम्ही विसरलो नाही. 

[क्रमशः]

©डॉ. स्वाती बापट  

३ टिप्पण्या:

  1. छान लेख - शुभेच्छुक विठ्ठल

    उत्तर द्याहटवा
  2. स्वतः डॉक्टर असूनही केदारनाथच्या हॉस्पिटलसाठी वैद्यकीय सामान घेऊन जाणे, तिथल्या भोजनालयातील साधे नियम (स्वतःची भांडी स्वतः धुणे) आनंदाने स्वीकारणे, यातून तुमचा सुजाण आणि नम्र स्वभाव दिसून येतो.

    ​थोडक्यात सांगायचे तर, डॉ. स्वाती बापट यांचे हे प्रवासवर्णन केवळ 'आम्ही इथे गेलो आणि हे पाहिले' असे नीरस नसून, त्यात मानवी स्वभाव, प्रसंगनिष्ठ विनोद, आणि उत्तम Narrative flow आहे. पुढील भागांची उत्सुकता कायम ठेवणारी त्यांची ही शैली खरोखरच वाखाणण्याजोगी आहे! त्यांना या सुंदर लेखनासाठी मनापासून शुभेच्छा!🙏

    उत्तर द्याहटवा