बुधवार, १ जुलै, २०२६

चुके काळजाचा ठोका!

दादांना म्हणजे माझ्या वडिलांना, जवळपास ९३ वर्षे पूर्ण झालेली आहेत. त्यांच्या वयाच्या मानाने त्यांची तब्येत खूप चांगली आहे.

चार वर्षांपूर्वी, ते माझ्याकडे ते पुण्याला राहत असताना त्यांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन करायचे ठरले. ऑपरेशनपूर्वीच्या तपासण्यांमधे असे समजले की त्यांना Atrial fibrillation आहे. Atrial fibrillation म्हणजे हृदयाचे ठोके ठराविक लयीमधे पडण्यासाठी जी व्यवस्था असते, ती व्यवस्था कोलमडून पडण्याचा एक प्रकार आहे. या आजारामुळे दादांच्या हृदयाचे ठोके अनियमितपणे पडत होते. पण त्यामुळे इतर काहीही त्रास त्यांना होत नसल्याने वेगळे उपचार करण्याची गरज नाही, असे त्या वेळच्या पुण्यातल्या कार्डिओलॉजिस्टचे मत पडले. दादांच्या रक्तात गुठळी होऊ नये, यासाठी फक्त एक गोळी डॉक्टरांनी चालू केली होती होती. 

गेले दीड वर्षे दादा मुंबईत माझ्या भावाकडे, म्हणजे गिरीश-प्राचीकडे  राहतात. गेल्या महिन्याभरात दोन-तीन वेळा, चालता-चालता अचानक त्यांच्या अंगातले अवसान गेल्यासारखे त्यांना वाटले. ते पडले नाहीत पण चालता-चालता थांबले आणि बसायला खुर्ची मागितली. माझ्या वहिनीने मला फोनवर हे कळवले. पण मला लगेच मुंबईला जाणे शक्य नव्हते. डॉ.अभिषेक वायंगणकर, हा माझ्या भाच्याचा मित्र मुंबईमधील एक निष्णात न्यूरॉलॉजिस्ट आहे. मी डॉ.अभिषेकला माझ्या भावाच्या घरी जाऊन दादांना तपासायची विनंती केली. त्याने लगेच दादांना तपासले आणि काही तपासण्या करायला सांगितल्या. दादांच्या मेंदूचा MRI, तसेच, मेंदूतील रक्तप्रवाह नीट आहे ना हे बघण्यासाठी MR Angiography, आणि हृदयाचे कार्य कसे चालले आहे हे समजण्यासाठी 2D Echocardiography, अशा सर्व तपासण्या आम्ही करून घेतल्या. दादांचे सलग सात दिवस Holter monitoring, करून घेण्याचा सल्लाही डॉ. अभिषेकने दिला होता. होल्टर मॉनिटरिंगमधे, रूग्णाच्या शरीराला होल्टर मशीन लावून रूग्णाला घरी पाठवतात. रुग्णाच्या हृदयाच्या ठोक्यांची गती आणि नियमितपणा, या दोन्ही गोष्टी, हे मशीन २४ तास सतत मोजत राहते. त्यानंतर त्याचे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड किंवा ग्राफही  मिळण्याची सोय असते. 

मुंबईमधे माझ्या भाऊ-वहिनीच्या ओळखीचे एक चांगले कार्डिओलॉजिस्ट आहेत. वहिनीने त्यांच्याकडे जाऊन दादांच्या हृदयाच्या तपासण्या करून घेतल्या. दादांचा 2D Echo चा रिपोर्ट चांगला आला. डायबेटिस, कोलेस्टेरॉल आणि इतर सर्व तपासण्यांचे रिपोर्टही नॉर्मल आले. त्या  कार्डिओलॉजिस्टनी असे ठरवले की सात दिवसांऐवजी तीनच दिवसांचे होल्टर मॉनिटरिंग करावे. होल्टर मॉनिटरिंगमधे मात्र दादांच्या हृदयाची गती काहीवेळा खूपच कमी, म्हणजे मिनीटाला ३०-३२ पर्यंत खाली येते आहे, असे समजले. काही वेळा असेही दिसून आले की, हृदयाचे ठोके कमी झाल्याने त्यांच्या व्हेंट्रीकल्सचे वेगळे ठोके पडत आहेत (Ventricular ectopics), तर कधीकधी हृदयाचे ठोके चुकत आहेत (ventricular asystole). दादांच्या वृद्धत्वामुळे हे सगळे होत आहे आणि यात काळजी करण्याचे फारसे कारण नाही, असे त्या कार्डिओलॉजिस्टचे मत पडले. त्यामुळे, इतर काहीही इलाज न करता दादांना नेहमीचे औषधच फक्त घेत राहू दे, असे त्यांनी सांगितले. दादांच्या वृद्धत्वामुळे असे होत असू शकेल, हे जरी मला आणि डॉ. अभिषेकला पटले असले तरी यावर काहीही इलाज न करणे, हे आम्हा दोघांनाही पटले नव्हते. दुर्दैवाने, हृदयाची गती वाढवण्यासाठी कुठलीही औषधे उपलब्ध नाहीत. 

अशा परिस्थितीत आम्ही दोघांनी ठरवले की आपापल्या ओळखीच्या कार्डिओलॉजिस्टचे मत घ्यायचे. मी पुण्यात एका कार्डिओलॉजिस्ट मैत्रिणीचे मत घेतले. डॉ. अभिषेकने त्याच्या एका कार्डिओलॉजिस्ट मित्राला विचारले. त्या दोघांनी असे मत दिले की, हृदयाचे ठोके लयीत पडण्यासाठी, दादांना  AICD हे मशीन लावणे अत्यावश्यक आहे. त्यानंतर, मुंबईतल्या ज्या कार्डिओलॉजिस्टने दादांना तपासले होते, त्यांच्याशी मी फोनवर याविषयी चर्चा केली. त्यावेळीही त्यांनी अगदी निक्षून सांगितले की, दादांचे वय लक्षात घेता, आता त्यांना कुठलेही मशीन लावू नये. पण मी माझा मुद्दा बराच लावून धरला. अखेर, जरा नाराजीनेच त्या कार्डिओलॉजिस्टनी असा सल्ला दिला की, होल्टरचा रिपोर्ट ज्यांनी दिला होता त्या Electro-Physiologist डॉक्टरांचे मत आम्ही घ्यावे. मला असे वाटत होते की दादांना मशीन लावणे आवश्यक असेल, तर ते त्वरित लावावे. म्हणून मी त्या Electro-Physiologist ना फोनवरच दादांचे सगळे रिपोर्ट्स  पाठवले आणि आता पुढे काय करावे, असा प्रश्न विचारला. आधी तेही म्हणाले की कुठलेही मशीन लावू नये. पण मी त्यांना सांगितले की दादांना तोल गेल्यासारखे होते आहे. त्यांना मी हेही सांगितले की एका न्यूरोलॉजिस्टने दादांना तपासून आणि त्यांचे MRI व हॉल्टरचे रिपोर्ट्स बघून असा निर्वाळा दिलेला आहे की हा त्रास दादांच्या हृदयातील बिघाडामुळे होतो आहे. हे ऐकल्यावर मात्र त्या Electro-Physiologist नी असे मत दिले की दादांना AICD या मशीनची गरज नसून पेसमेकर बसवणे आवश्यक आहे. आता माझ्या पुढे हा प्रश्न पडला की दादांना AICD लावायचा का पेसमेकर लावायचा? 

माझ्या ओळखीतले दुसरे एक सुप्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट मुंबईमध्ये कार्यरत आहेत. त्यांनाही एकदा विचारून मगच योग्य तो निर्णय घ्यावा असे मी ठरवले. दादांना नेमका काय त्रास झाला हे सांगून आणि सगळे रिपोर्ट्स त्यांना फोनवरच पाठवून, "दादांच्या बाबतीत नेमके काय करावे? मशीन बसवायचे झाल्यास कुठले मशीन बसवावे?" असे प्रश्न मी विचारले. त्या डॉक्टरांनी, सगळे रिपोर्ट्स बघून मला समजावून दिले की दादांना  पेसमेकरच बसवणे  योग्य होईल आणि AICD लावणे अयोग्य आहे. ते स्पष्टीकरण मला पटले. तरीदेखील, अंतिम निर्णय घेण्याआधी आपण स्वतः जरा वाचन करावे, म्हणून मी बरेच वाचन केले. त्यानंतर, संपूर्ण विचारांती मी असा निर्णय घेतला की पेसमेकरच लावला पाहिजे तोही त्वरित लावावा. तो निर्णय मी डॉक्टरांना लगेच कळवूनही टाकला. 

जे Electro-Physiologist तो पेसमेकर बसवणार होते, त्यांनी मला सांगितले की, दोन प्रकारचे पेसमेकर असतात. त्यापैकी कुठला लावायचा याचा निर्णय आम्ही घ्यावा. मला या विषयातले काहीच ज्ञान नव्हते. त्यामुळे पुन्हा माझे  विचारमंथन आणि वाचन सुरु झाले. पेसमेकर लावण्याचा निर्णय पक्का झालेला असला तरी, या दोन प्रकारांपैकी कुठल्या प्रकारचा पेसमेकर लावावा हे ठरवण्यासाठी मी पुन्हा पुण्यातल्या माझ्या कार्डिओलॉजिस्ट मैत्रिणीचा सल्ला घेतला. परंतु, दादांना  पेसमेकर लावण्यापेक्षा AICD लावणेच योग्य आहे, असे मला परत समजावून देण्याचा तिने प्रयत्न केला. त्यामुळे मी पुन्हा एकदा बुचकळ्यात पडले. माझी द्विधा मनस्थिती पाहून, तिने तिच्या हॉस्पिटलमधील एका अतिशय नामवंत कार्डिओलॉजिस्टचे मत घ्यायचे ठरवले. दादांचे रिपोर्ट्स त्यांना दाखवल्यानंतर त्या कार्डिओलॉजिस्टनी पण दादांना पेसमेकरच्या ऐवजी AICD बसवण्याचा सल्ला दिला.

वेगवेगळ्या डॉक्टरांकडून असे उलट-सुलट सल्ले मिळाले असले तरी अंतिम निर्णय मलाच घ्यायचा होता. पुन्हा एकदा बरेच वाचन आणि खूप विचारमंथन केल्यानंतर, पेसमेकर लावण्याचाच निर्णय मी पक्का केला. या सगळ्या काळात, माझ्या दोन्ही भावांना आणि वहिन्यांना मी मला मिळत गेलेली माहिती सांगत होते. सुदैवाने, त्या सर्वांचा मला पूर्ण पाठिंबा होता. या निर्णयप्रक्रियेमधे जवळपास गेले पाच-सहा दिवस मी खूप अस्वस्थ असल्याने मला नीट झोपही लागत नव्हती. 'आपण घेतो आहोत तो निर्णय योग्य आहे ना? चुकणार ता नाही?' या विचाराने माझ्याच हृदयाचे ठोके कितीवेळा चुकले असतील, हे मी स्वतःही सांगू शकणार नाही. या संबंध काळात मला माझ्या दिवंगत काकांची, म्हणजेच माझे गुरु, सोलापूरचे डॉ. रामचंद्र एकनाथ गोडबोले यांची उणीव प्रकर्षाने भासली. मला असेही वाटत राहिले की आज जर ते हयात असते तर ही संपूर्ण निर्णयप्रक्रिया माझ्यासाठी अतिशय सोपी झाली असती. 

माझा धाकटा भाऊ आणि वहिनीच्या मदतीसाठी आणि त्यांना व दादांनाही धीर देण्यासाठी मी आणि आनंद मुंबईला गेलो. दादांचे ऑपरेशन पार पडेस्तोवर आम्ही तिथेच राहिलो. सुदैवाने, या वयातही दादांना ऑपरेशनचा फारसा काही त्रास झाला नाही. आज त्यांना घरी पाठवण्यात आले आहे .
 
यापुढे दादांच्या हृदयाचा ठोका चुकणार नाही, हे समाधान मला असल्यामुळे  माझ्याही हृदयाचे ठोके आता व्यवस्थित पडत राहतील हे नक्की! 

११ टिप्पण्या:

  1. ती. स्व. दादांच्या प्रकृतीस चांगला आराम मिळेल आता. मुलीने एवढी जी धावपळ केली.

    उत्तर द्याहटवा
  2. Take care of श्री दादा आणि स्वतःची पण. लढणाऱ्या लेकी साठी बाप एक बुलंद कहाणी आणि श्रमलेल्या बापाला लेक म्हणजे नारळातील पाणी हि कवी श्री दासू वैद्य (छ संभाजी नगर) यांची कविता आठवली.

    उत्तर द्याहटवा
  3. सर्व घटनाक्रम इतक्या बारीक बारीक तपशीलासह तूच लिहू शकतेस स्वाती .काळजी घ्या सगळेच आणि हो सगळ्यांचे कमीअधिक प्रमाणात चुकलेले ठोके पूर्ववत झाले ,हे वाचून बरे वाटले.

    उत्तर द्याहटवा
  4. आदरणीय दादा आपली प्रकृती लवकरात लवकर बरी होणे गरजेचे आहे. आपण योग्य ती काळजी घ्यालच. आम्हाला आपली नितांत गरज व सोबत हवी आहे आपण शतायुषी व्हा ही परमेश्वर चरणी प्रार्थना.

    उत्तर द्याहटवा
  5. Hats off to you. The approach to go for a second opinion, which you opted for, would not ordinarily be exercised, which is creditable in itself. However, considering your family background regarding observing a problem, analyzing its various angles, and selecting a proper solution, I am not surprised by your action plan. I wish Ti.Dada a long and cherished life. I do agree with your expressions about your uncle, the Bhishma in diagnosis.

    उत्तर द्याहटवा
  6. दादांना माझा नमस्कार....🙏 स्वातीताई.... फार नशिबवान आहेस तू. तुला वडिलांची काळजी आणि सेवा करण्याची संधी मिळत आहे. तुझ्या या सेवेच्या व्रताने दादांना नक्कीच बरे वाटेल. आणि इतर गरजू लोकांना ही
    फायदा होईल

    उत्तर द्याहटवा
  7. Dear Dr. Swati Bapat,

    Heartiest congratulations on this touching and inspiring blog.

    Your loving and devoted care of your beloved “ Dada “is truly admirable. It reflects the finest values of love, gratitude, and respect for parents. Your selfless dedication is an inspiration and a shining example for all of us.

    I sincerely pray that Dada is blessed with good health, peace, comfort, and a stable, happy life as he continues his remarkable journey at the age of 93 years. May God continue to bless both of you your brother his spouse and all those near and dear once’s and the doctors who taking care of Dada’s health with the with strength, happiness, and many more cherished moments together.

    With heartfelt appreciation and best wishes,

    M. D. Kulkarni 🙏🏾

    उत्तर द्याहटवा
  8. दादांच्या तब्येतीबद्दल तू घेत असलेली काळजी आणि पूर्ण निर्णय घेण्याआधीचे तुझे प्रयत्न आणि विचार खूप कौतुकास्पद आहेत! स्वतः डॉक्टर असल्यामुळे तू घेतलेले निर्णय ते सुद्धा इतरांना पटवून देण्याचंi धडपड अगदी स्पष्ट दिसून येते! उत्तम प्रकृती लाभून दादांना आनंद उपभोक्ता येऊ दे अशीच परमेश्वरा पाशी प्रार्थना
    !!

    उत्तर द्याहटवा