रविवार, १४ नोव्हेंबर, २०२१

४. पंबन ब्रिज

१७ ऑक्टोबरला सकाळी आम्ही मदुराईचे रिसॉर्ट सोडले आणि मणी व सत्याच्या टॅक्सीमधून रामेश्वरचा रस्ता पकडला. मदुराईचे रिसॉर्ट सोडताना एकीकडे मन अगदी जड झाले होते तर दुसरीकडे रामेश्वरला जाण्याची ओढही लागली होती. मदुराई ते रामेश्वर हा रस्ता अगदी चांगला असल्याने हे अंतर सहजी तीन तासात पार करता येते. पण आम्ही वाटेत एके ठिकाणी थांबून चहा-पाणी केले. त्यामध्ये थोडा वेळ गेला. तिथेच त्या चहाच्या टपरीवरच्या एका काचेच्या बरणीतला एक पदार्थ मला खुणावू लागला. गुलबट रंगाचा, एखाद्या छोट्या पणतीच्या  आकाराचा हा काय पदार्थ असावा, याचे मला कुतूहल वाटले. ते जाणून घेण्यासाठी, ड्रायव्हर सत्याला बोलावले. त्याने, 'कोकोनट अँड जॅगरी, लोकल स्वीट, व्हेरी गुड, व्हेरी टेस्टी" असे वर्णन केल्यावर, आधी त्यातल्या एक-दोन पणत्या किंवा वड्या विकत घेऊन, त्याचे तुकडे करून आम्ही सगळ्यांनी चव बघितली. ती वडी चवीला आपल्या खोबऱ्याच्या वडीसारखीच लागत होती. पण त्यात साखरेऐवजी गूळ असल्याने, छान खमंग लागत होती. आम्हाला सगळ्यांनाच ती आवडल्यामुळे आम्ही एक डझनभर वड्या  विकत घेतल्या आणि पुन्हा रामेश्वरच्या वाटेवर निघालो.

रामेश्वर हा भारताचा भाग असला तरी ते एक बेट आहे. मंडपम या गावापासून पंबन या गावाला जोडणाऱ्या पुलावरून गेल्यावर, तिथून पुढे आपल्याला रामेश्वरला जात येते. तिथे रेल्वेसाठी एक आणि वाहनासाठी एक असे  एकूण दोन पूल आहेत. रामेश्वरला पोहोचायच्या आधी, 'अन्नाई इंदिरा गांधी' पुलावर बराच वेळ थांबलो. आमच्या आधी आलेल्या अनेक प्रवासी गाड्या आणि बसेस तिथे थांबलेल्या होत्या. त्या वाहनांमधील प्रवासी पुलावर उतरून तिथल्या वातावरणाचा आनंद लुटत होते. "इधर थोडी देर रुकना, व्हेरी गुड सीन, व्हेरी फास्ट विंड" असे म्हणत आमच्या ड्रायव्हर्सनी आमच्या टॅक्सीज रस्त्याच्या कडेला थांबवल्या आणि आम्हाला खाली उतरायला सांगितले. पुलावर थांबल्यावर दिसणारे दृष्य आणि तिथल्या जादुई वातावरणाचे वर्णन शब्दांत करणे अवघड आहे,  पण मी प्रयत्न करते. ते भन्नाट वातावरण प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी अनुभवायलाच हवे.  

आम्ही पुलावरच्या रस्त्यावर उतरलो. तिथे उभे राहून दोन्ही बाजूला दिसणाऱ्या समुद्राचे दर्शन घेता येते. पुलाच्या दोन बाजूला दोन वेगवेगळे समुद्र आहेत. त्या  दोन्ही समुद्राच्या पाण्याचे रंग, त्याची गती वेगळी आहे. मंडपम कडून रामेश्वरकडे जाताना डाव्या बाजूला बंगालचा उपसागर आहे, तर आपल्या उजव्या बाजूला हिंद महासागर दिसतो. दोन्ही बाजूच्या समुद्राचे पाणी छान निळे आणि नितळ आहे. पण त्या दोन्ही सागरांच्या निळाईमध्येही जाणवण्यासारखा फरक आहे. तसेच दोन्ही बाजूच्या पाण्यामध्ये निळ्या रंगाच्या अनेकविध छटा दिसतात. डाव्या बाजूचे, म्हणजे बंगालच्या उपसागरातले पाणी शांत वाटले. तर आमच्या उजव्या बाजूचे, म्हणजे हिंद महासागरातील पाणी चांगले उसळताना दिसत होते. अन्नाई इंदिरा गांधी रोड ब्रिजच्या, डाव्या आणि उजव्या बाजूला उभे राहिले असता, दोन्हीकडच्या वाऱ्याच्या वेगातही कमालीचा फरक जाणवला. बंगालच्या उपसागरावरचे वारे जोराचे आहे पण त्याच्या तुलनेत हिंद महासागरावरून येणाऱ्या वाऱ्याचा वेग तुफान वाटला. इतका की, हे वारे आपल्याला हवेत उडवून लावेल की काय असे आम्हाला वाटले. सोबतच, या पुलावरून मोठमोठाली वाहने वेगात जात असताना पूल जरा हलल्यासारखा वाटतो आणि जीवाचा अगदी थरकाप उडतो. 

आम्ही दादांनाही या पुलावर उतरवले. त्या रस्त्यावर दोन्ही बाजूला अनेक वाहने उभी होती. काही वाहने अचानक सुरु होत होती. तसेच अनेक वाहने, दोन्ही बाजूने सुसाट जात-येत होती. त्यामुळेच रस्ता पार करून दादांना पुलाच्या डाव्या बाजूला, म्हणजे हिंद महासागराच्या बाजूला नेऊ नये असे मला वाटत होते. पण आनंदने दादांचा हात काळजीपूर्वक पकडून, त्यांनाही तिकडच्या तुफानी वाऱ्याची अनुभूती देऊन आणले. दादाही त्या सर्व वातावरणात अगदी उल्हसित झाले होते. आम्हा इतर सर्वांच्या अंगात तरअक्षरशः वारे भरल्यासारखेच झाले होते. तिथे अनेक फिरते विक्रेते, परातीत ठेवलेले अननसाचे आणि कलिंगडाचे पातळ काप विकत होते. आधी नको-नको म्हणत सगळ्यांनी तिखट-मीठ लावलेले ते काप, पुन्हा-पुन्हा  विकत घेऊन खाल्ले. 

रस्त्याच्या डाव्या बाजूला, खाली समुद्रात, एक लांबलचक रेल्वेचा पूल, म्हणजेच पंबन रेल्वे ब्रिज दिसतो. भारतात समुद्रावरील हा एकमेव असा पूल आहे की जो जहाजे आडवी जाऊ देण्यासाठी खुला होऊ शकतो. या पुलावरून रेल्वे जात असताना बघण्यासाठी अनेक प्रवासी तिथे तास-दोन तास प्रतीक्षा करत थांबून राहतात म्हणे. आमच्याकडे तितका वेळ नव्हता. तसेच तो पूल जहाजासाठी उघडताना बघणे ही एक पर्वणीच असते, असे म्हणतात. अगदी पूर्वी, म्हणजे शंभराहून अधिक वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी पंबनचा रेल्वेचा पूल बांधला होता. १९६४ साली आलेल्या अघोरी वादळाच्या तडाख्यात त्या पुलाचा काही भाग समुद्रात कोसळला होता. त्या जुन्या पुलाचे  पाण्यात पडलेले  अवशेष, आजही आपल्याला दिसतात. त्या काळरात्री, पंबन पुलावरून जात असलेल्या रेल्वे गाडीतल्या सर्व प्रवाशांना जलसमाधी मिळाली होती, हे आठवले आणि निसर्गाच्या ताकदीपुढे मानव किती क्षुद्र ठरतो याची मला जाणीव झाली. तसेच हा पूल, आपल्याला जीवनाकडून मृत्यूकडे नेणारा पूल आहे, हे त्यावेळी त्या प्रवाशाना  कळले असेल का? हा विचार माझ्या मनाला चाटून गेला आणि मनात अगदी चर्रर्र झाले. 

जीवन आणि मृत्यू याना जोडणारा पूल अदृश्यच असतो,  हे किती चांगले आहे नाही का ? 


                                                                                                                                            (क्रमशः)

१५ टिप्पण्या:

  1. तुझे प्रवास वर्णन वाचून खरेच एकदा हा प्रवास करावा असे वाटायला लागले . नेहेमी सारखे छान.. मेघा

    उत्तर द्याहटवा
  2. यु ट्युबवर पंबन ब्रीजचे व्हिडीओ आहेत. पण तुझा लेख वाचून व्हिडीओ न पाहिलेल्यासही तिथला थरार समजू शकतो. छान.

    उत्तर द्याहटवा
  3. Wov! किती छान लिहिलंयस्! स्वाती विशेषत:ह्या writeup मध्ये मला काय जाणवलं तर, भराभर पुढे सरकतो वाचक. विशिष्ट वेग आहे. तरीही एक प्रकारचा ठहरावही आहे.वाचकालाही बरोबर घेतेस.
    तुला सलाम.

    उत्तर द्याहटवा
  4. खूप छान व समर्पक वर्णन स्वाती.खरोखर सही प्रवास वर्णन.

    उत्तर द्याहटवा
  5. स्वाती खूप छान लिहिलंय.पुन्हा एकदा रामेश्वर याठिकाणी जाऊन आल्याचा आनंद मिळाला.खूप सुंदर वर्णन केले आहे.

    उत्तर द्याहटवा