बुधवार, ७ सप्टेंबर, २०२२

१२ . मलबारची सफर-दीपांजली संग्रहालय

कोळीकोड स्टेशनवर आम्ही सकाळी साडेअकराच्या सुमारास पोहोचलो. अनुभव ट्रॅव्हल्सची टेम्पो ट्रॅव्हलर गाडी, स्टेशनबाहेर आमच्यासाठी येऊन थांबलेली होती. गाडीचा चालक श्याम सकाळी साडेसातच्या सुमारास 'सी शेल होम' वरून आमचे सामान घेऊन निघाला होता. पण तो अगदी वेळेत, आमच्या स्वागताला कोळीकोड स्टेशनवर पोहोचलेला बघून अगदी हायसे वाटले. आम्ही गाडीमध्ये बसून दीपांजली संग्रहालयाकडे निघालो. गिरीश-प्राची आणि जहागीरदार पती-पत्नी कण्णूरहून इनोव्हाने निघून कोळीकोडच्या वाटेवर होते. पण त्यांना पोहोचायला वेळ लागणार होता. 

दीपांजली संग्रहालय हे अगदी डोळे दिपवून टाकणारे संग्रहालय आहे. एखादी व्यक्ती एका विशिष्ट ध्येयाने पेटली की काय नेत्रदीपक कामगिरी करू शकते, याचे हे संग्रहालय उत्तम उदाहरण आहे. श्री. प्रसाद यांच्या अथक प्रयत्नातून हे भारतातील एकमेवाद्वितीय दीप संग्रहालय तयार झालेलं आहे. श्री. प्रसाद यांनी अनेक वर्षे  दीपगृहामध्ये अधिकारी म्हणून काम केले. नोकरीच्या सुरुवातीपासूनच त्यांना दिवे जमवण्याचा छंद लागला. नोकरीत असताना आणि निवृत्तीनंतरही, तीस वर्षांहून अधिक काळामध्ये, श्री. प्रसाद यांनी अठराव्या शतकापासून वापरात असलेले अनेक प्रकारचे दिवे जमा केले आहेत. कोळीकोडच्या पुथियांगडी या भागातील, श्री. प्रसाद यांच्या स्वतःच्या छोट्या बंगलीच्या वरच्या मजल्यावर, त्यांनी जमवलेल्या दिव्यांचे प्रदर्शन मांडलेले आहे. 

श्री. प्रसाद 

दीपांजली संग्रहालय एकावेळी पाचच जणांना बघता येते. एकेका पाच जणांच्या गटाला, श्री. प्रसाद त्यांच्याकडचे सगळे दिवे दाखवतात. दिवे दाखवण्याच्या निमित्ताने ते विविध संस्कृती, भूगोल, इतिहास, कला आणि विज्ञान या सर्व गोष्टींवर प्रकाश टाकतात असे जाणवते. तसेच, प्रत्येक दिवा त्यांनी कुठून आणि कसा मिळवला याबाबतची अतिशय रंजक माहिती ते आपल्याला देतात. या संग्रहालयामध्ये शेकडो दिवे आहेत. देवळांमध्ये, चर्चमधे , मशिदींमध्ये किंवा ज्यू लोकांच्या सायनागॉगमध्ये वापरले गेलेले दिवे, दीपगृहांमध्ये, खाणींमध्ये, जहाजांवर, रेल्वेमध्ये आणि रेल्वेच्या सिग्नल्ससाठी वापरात आलेले दिवे, गॅसवर, अल्कोहोलवर, पेट्रोलवर, तेला-तुपावर किंवा चरबीवर चालणारे दिवे, वेगवेगळ्या धातूंपासून, काचेपासून, मातीपासून आणि दगडांपासूनही केलेले दिवे, टेबल लॅम्प्स, लटकवायचे, भिंतीवर लावायचे दिवे, दिवट्या, मशाली, चिमण्या, कंदील, आणि दिव्याची झुंबरे असे अनेको-अनेक प्रकारचे दिवे या संग्रहालयामध्ये आहेत. अनेक कलात्मक, पारंपरिक तसेच अत्यंत दुर्मिळ असे दिवे इथे आपल्याला बघायला मिळतात. 'अल्लाउद्दीनचा दिवा' सोडला तर बाकी सगळ्या प्रकारचे दिवे मला या संग्रहालयामध्ये  बघायला मिळाले!

आम्ही पाच-पाच जणांच्या तुकडीने वर जाऊन दिवे बघत होतो. बाकीचे सगळे श्री. प्रसाद यांच्या घरामध्ये खालच्या मजल्यावर बसून होतो. एकेका तुकडीला,  ते सर्व दिवे डोळे भरून बघायला अर्धा-पाऊण तास लागत होता. पहिली तुकडी वर होती तोपर्यंत गिरीश-प्राची आणि जहागीरदार पती-पत्नी दीपांजली संग्रहालयात येऊन पोहोचले. पाच-पाच जणांचा एक, अशा तीन गटांमध्ये आम्ही संग्रहालय बघितले. निलेश राजाध्यक्षांनी आम्हा सर्वांसाठी, लिची आणि सफरचंदाच्या थंडगार ज्यूसचे टेट्रापॅक्स आणले आणि प्रतीक्षेचा काळ सुसह्य केला. सगळ्यांचे  प्रदर्शन बघून होईपर्यंत दुपारचे दीड वाजून गेले होते. सकाळी भरपेट नाश्ता केलेला असला तरी सगळ्यांनाच आता भूक लागायला लागली होती. दीपांजली संग्रहालय बघून झाल्यावर आमच्या दोन्ही गाड्या 'गुलमोहोर' या  शाकाहारी रेस्टॉरंटपाशी येऊन थांबल्या आणि आमचा जीव भांड्यात पडला. 

अगदी थोडाच वेळ थांबल्यानंतर आम्हाला बसायला टेबल मिळाले. रेस्टॉरंट अतिशय स्वच्छ दिसत होते. या रेस्टॉरंटमधली थाळी चांगली असते, आणि ती अगदी लोकप्रिय आहे, असे शिहादने आम्हाला सांगितल्यामुळे, थाळीच मागवायची असे आम्ही सगळ्यांनी ठरवले. इथे फक्त दोनच प्रकारच्या थाळ्या होत्या, तेही मला फार बरे वाटले. आम्ही सर्वांनी 'साऊथ इंडियन मील्स ' घेतली आणि शुभेन्दूने 'नॉर्थ इंडियन मील' घेतले. मी आणि दादा प्रत्येकी एकेक पूर्ण थाळी खाऊ शकणार नाही असे वाटल्यामुळे आम्ही दोघांमध्ये मिळून एक थाळी घेतली, ते फारच योग्य झाले. थाळीमध्ये आलेले जेवण भरपूर होते. या थाळ्याच्या किमती अगदी कमी होत्या. 'साऊथ इंडियन मील ' साधारण  १५० रुपयाला आणि 'नॉर्थ इंडियन मील' १७५ रुपये होते. 

केळीचे पान आच्छादलेली पितळेची मोठी थाळी, दोन-तीन प्रकारच्या भाज्या, रस्सम, सांबारम, दही, आणि पायसम, असे पदार्थ आठ वाट्यांमध्ये, आणि एक मोठा वाडगा भरून भात, एक तळलेला आप्पलम किंवा पप्पड्म, दोन प्रकारच्या चटण्या, बीट व गाजराचे गोडसर लोणचे, एक कोशिंबीर, तळलेली भरली मिरची आणि टॅपिओकाचे तळलेले कुरकुरीत काप, अशी ती थाळी बघून मन अगदी तृप्त झाले. थाळीमधल्या पदार्थांची रंगसंगती केळीच्या हिरव्यागार पानावर छान उठून दिसत होती. अगणित पदार्थ वाढलेली ही थाळी 'अनलिमिटेड' होती. एखादा पदार्थ आपण मागितला की तिथले वेटर्स तो पदार्थ अगदी तत्परतेने वाढत होते. सर्वसाधारणपणे आपल्याकडच्या 'थाळी भोजनालया'मध्ये वेटर्स सतत काहीनाकाही वाढण्यासाठी आपल्या आसपास घोंघावत राहतात आणि शांतपणे जेवू देत नाहीत. तशी परिस्थिती तिथे अजिबात नव्हती, हे मला फार आवडले. प्रत्येक पदार्थाची चव उत्कृष्ट होती. रेस्टॉरंटमध्ये भरपूर गर्दी होती, आणि बाहेरही लोक जेवणासाठी थांबलेले होते. तरीही, आम्ही जेवण करत असताना आम्हाला कोणीही घाई-गडबड केली नाही हेही विशेष. माझ्या व दादांच्या सामायिक थाळीमध्ये पायसमची एकच वाटी आलेली असल्यामुळे मी माझ्यासाठी आणखी एक वाटी मागून घेतली. म्हात्रे पती-पत्नीचा चतुर्थीचा उपास असल्यामुळे त्यांच्यासाठी फ्रुट डिश आणि ताक मागवले होते. 


अगदी वेगळ्या चवीचे, जास्त तेल-तिखट-मसाले न वापरलेले साधे सात्विक पण रुचकर जेवण झाल्यावर आम्ही कोळीकोडमधल्या अजून काही जागा बघायला निघालो. 


,

२ टिप्पण्या:

  1. सहजे ते अज्ञान। म्हणौनि म्हणती ते भिन्न।
    एर्‍हवी दीपाप्रति काई आनान। प्रकाशु आहाती॥
    असे असले तरी संग्रहालयाची कल्पना छानच.
    आणि लिहिलेही छान. 👍

    उत्तर द्याहटवा