'गुलमोहोर रेस्टॉरंट'मध्ये पोटभर जेवण करून आम्ही कोळीकोडच्या कुट्टीचिरा या भागात असलेली जुनी-पुराणी 'मिश्काल मस्जिद' बघायला गेलो. मशिदीपर्यंत पोहोचेस्तोवर दुपारचे अडीच तीन वाजले होते. मिश्काल मशिदीमध्ये स्त्रियांना प्रवेश निषिद्ध आहे.
१४ व्या शतकात मुस्लिम व्यापारी, नाखुदा मिश्काल, याने ही मशीद बांधली होती. नाखुदा मिश्काल हा येमेनी व्यापारी अतिशय श्रीमंत होता. त्याच्याकडे जहाजांचा मोठा ताफा होता. भारत, चीन आणि पर्शिया या देशांशी त्याचा व्यापार होता. मुखत्वे लाकूड वापरून बांधली गेलेली ही मशीद पूर्वी पाचमजली होती. इसवी सन १५१० मध्ये पोर्तुगीज सेनानी अल्बुकर्क याने कोळीकोडवर हल्ला केला. त्या हल्ल्यामध्ये त्याच्या सैन्याने या मशिदीची जाळपोळ केली. त्यामुळे मशिदीच्या वरच्या काही मजल्यांचे नुकसान झाले. झामोरिन (सामुद्री) राजाच्या सैन्याने तो हल्ला परतवून लावला. पुढे १५७८ साली झामोरिन राजाने मिश्काल मशिदीची पुनर्बांधणी करून, मुस्लिमांबरोबर सलोख्याचे संबंध प्रस्थपित केले.
मिश्काल मस्जिद |
सध्या उभी असलेली मिश्काल मशीद चारमजली आहे. मशिदीची वास्तू जुनी असली तरीही सुंदर आहे. केरळमध्ये ज्या बोटावर मोजण्याइतक्या मध्ययुगीन मशिदी आहेत, त्यापैकी मिश्काल मशिदीला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. तसेच, ही मशीद मध्ययुगीन स्थापत्यकलेचा उत्तम नमुनादेखील आहे. या मशिदीचे वेगळेपण असे की, इतरत्र सर्व मशिदींमध्ये दिसणारे घुमट आणि मिनार या मशिदीत अजिबात नाहीत. मशिदीच्या अंतर्भागातील कोरीव काम केलेले खांब, दरवाजे आणि कमानींवर दक्षिणेतील मंदिरांच्या स्थापत्यकलेची छाप दिसून येते. मशिदीच्या मध्यभागी असलेल्या हॉलमध्ये चारशे लोक एकावेळी नमाज पढू शकतात.
शिहाद आम्हाला मशिदीबाबत जुजबी माहिती सांगत होता तोच तेथील नमाजाची वेळ झाली. एवीतेवी स्त्रियांना मशिदीमध्ये प्रवेश करता येणार नव्हताच, पण नमाजाच्या वेळी गैरमुस्लिम पुरुषांनाही प्रवेश वर्ज्य होता. त्यामुळे आमच्यापैकी कोणालाच मशिदीच्या आत जाता आले नाही. आम्ही सर्वानी मशीद फक्त बाहेरूनच पहिली, आणि मशिदीसमोर एक ग्रुप फोटो काढला. मी आणि आनंद मशिदीच्या बाहेर लावलेल्या फलकांवरची माहिती वाचत जरा जास्तच वेळ रेंगाळलो. बाहेर येऊन पाहिले तर, कु. वृंदा जोशी वगळता, आमच्याबरोबरचे इतर सर्वजण मशिदीशेजारच्या तलावावर गेले असल्याचे कळले. आम्ही त्यांच्यासाठी गाडीमध्ये बराच वेळ थांबलो पण त्यांचा पत्ताच नाही!
शेवटी श्री. निलेश यांना फोन लावला. त्यांच्याकडून असे समजले की इतर सहप्रवाशाना घेऊन, हलवा गल्लीतुन पुढे 'गोदाम' नावाच्या एका जागी ते गेले होते. ती जागा शोधत आम्हीही तेथे पोहोचलो. तिथे असे कळले की, १५ ऑगस्टची सार्वजनिक सुट्टी असल्याने सुप्रसिद्ध 'हलवा गल्ली'मधली सर्व दुकाने बंद होती. त्यामुळे आमच्या सहप्रवाशांच्या हलवाखरेदीच्या इराद्यावर पाणी पडले होते. म्हणून, तेथून जवळच गुजराती स्ट्रीटवर असलेले हे 'गोदाम' पाहण्याचा बूट अचानक निघाला असावा. आम्हीही आत गेलो, पण एक जिना चढून वर जावे लागणार असल्याने दादांना खालीच थांबवले.
श्री. व सौ. बशीर यांच्यासोबत 'गोदाम'मध्ये |
'गोदाम' हे नावाप्रमाणे खरोखरीच पूर्वीचे धान्याचे गोदाम होते. पण ती जागा पडीक झालेली होती. श्री. बशीर नावाच्या गृहस्थांनी ते गोदाम भाड्याने घेतलेले होते. दुबईच्या पोलीस खात्यात नोकरी केलेल्या श्री. बशीर यांना पुरातन कलात्मक वस्तू जमवण्याचा छंद होता. गेल्या अनेक वर्षांमध्ये जमवलेल्या वस्तूंचे संग्रहालय त्यांनी आता त्या जागेत तयार केले आहे. तिथे अनेक सुंदर कलात्मक वस्तू होत्या. काही वस्तू, फर्निचर आणि अत्तरे वगैरे खरेदी करण्यासाठीही उपलब्ध होती. परंतु, ते सगळे संग्रहालय असंख्य वस्तूंनी भरून गेलेले होते, आणि त्या वास्तूंबद्दलची माहिती कोठेही लिहिलेली नव्हती, किंवा ती माहिती सुसूत्रपणे सांगणारेही तेथे कोणी नव्हते. त्यामुळे मला ती जागा विशेष आवडली नाही. विदेशी गोऱ्या लोकांना भारतामधली कलाकुसर दाखवून, त्यांना तेथील वस्तू अव्वाच्या सव्वा भावामध्ये विकल्या जात असाव्यात असे मला वाटले.
गोदाम बघून झाल्यावर खरे तर, आमच्या मूळ कार्यक्रमाप्रमाणे आम्ही कोळीकोडजवळच असलेल्या कप्पड बीचवर जाणार होतो. पण त्याऐवजी आम्हाला कोळीकोड शहरातील बीचवरच्या 'कडलास' नावाच्या कॅफेमध्ये नेण्यात आले. हा कॅफे फारच छान होता आणि तिथे बसून आम्ही सूर्यास्त बघू शकणार होतो. आम्हाला वरच्या मजल्यावरची जागाही चांगली मिळाल्यामुळे समुद्रदर्शन चांगले होत होते. पण ढगाळ वातावरणामुळे आम्हाला सूर्यास्त मात्र दिसला नाही. सार्वजनिक सुट्टी असल्याने, बीचवर आणि आसपासच्या रस्त्यांवर लोकांची तुडुंब गर्दी होती. आम्ही दुपारी जेवलेले जेवण अजून खाली उतरले नव्हते. तरीही 'कडलास' कॅफेमध्ये बसून मी 'कॉफी क्रंच' प्यायले. ते पेय छानच होते, पण ते पीत असताना आणि माझ्या पोटामध्ये भूक नसतानाही, निशिताईंनी मागवलेला फालुद्याचा सुंदर पेला माझे लक्ष वेधून घेत होता!
'कडलास' कॅफेमधला फालुदा! |
'कडलास' कॅफेमधून निघून आम्ही आमच्या हॉटेलमध्ये आलो. कोळीकोडच्या मध्यवस्तीतील पालयम नावाच्या भागात, 'मेट्रो एम्पायर्स' हे हॉटेल होते. हॉटेलवर सामान टाकल्यावर म्हात्रे आणि पेंडसे पति-पत्नींबरोबर मी बाजारात फिरायला गेले. म्हात्रे आणि पेंडसे दांपत्यांनी केळ्याचे वेफर्स आणि कोळीकोडचा सुप्रसिद्ध हलवा खरेदी केला. मला केरळी मसाले विकत घ्यायचे होते, पण मसाल्याची सगळी दुकाने बंद होती.
दरम्यान, गिरीश-प्राची आणि जहागीरदार पतिपत्नींच्या कोळीकोडमधील हॉटेल बुकिंगचा काहीतरी घोळ झाला होता. तो घोळ निस्तरून श्री. निलेश साडेआठ वाजेपर्यंत आमच्या हॉटेलवर पोहोचले. त्यानंतर आम्ही जेवायला बाहेर गेलो, मात्र आम्हाला विशेष चांगले जेवण मिळाले नाही. मी जेवणारच नव्हते, त्यामुळे माझी काहीच अडचण झाली नाही. पण म्हात्रे पती-पत्नींना चतुर्थीचा उपास सोडायचा होता. त्यांना मनासारखी थाळी न मिळाल्याने त्यांचा बराच विरस झाला.
जेवणानंतर आम्ही हॉटेलवर परत आलो. हॉटेलच्या खोल्या आरामदायी होत्या, पण आमच्या खोलीमध्ये खूपच तीव्र वासाचे रूम फ्रेशनर मारलेले होते. तीव्र वासाची ऍलर्जी असल्याने, मला खोकल्याचा असह्य त्रास होऊ लागला. हॉटेल पूर्णपणे वातानुकूलित होते आणि खोलीच्या खिडक्या उघडण्याची काही सोय नव्हती. रात्री अकराच्या पुढे आता आपल्याला दुसरे हॉटेल शोधावे लागते आहे की काय असे आम्हाला वाटायला लागले होते. पण माझ्या नशिबाने, एका खोलीची खिडकी उघडण्यात हॉटेलच्या नोकरांना यश आले. त्या खोलीमध्ये रूम फ्रेशनरही मारलेला नसल्यामुळे मला शांत झोप लागली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा