शनिवार, ३ सप्टेंबर, २०२२

८.मलबारची सफर-'अरक्कल संग्रहालय' आणि दीपगृह

'सेंट अँजेलो फोर्ट' बघून झाल्यावर आम्ही अराक्कल संग्रहालय बघायला निघालो. वाटेत एका मशिदीची सुंदर इमारत दिसली. सर्वसाधारणपणे बघायला मिळणाऱ्या इतर मशिदींपेक्षा या इमारतीची रचना खूपच वेगळी होती. ही मशीद अरक्कल म्युझियम आणि मापिला खाडीच्या मध्ये आहे. कण्णूर शहरातील ही सर्वात जुनी मशीद अरक्कल राजाने सतराव्या शतकात बांधली, असे आम्हाला आमचा गाईड शिहाद याने सांगितले. डच स्थापत्यशैलींमध्ये बांधली गेलेली ही एकमेव मशीद आहे आणि त्यामुळेच या मशिदीची इमारत वेगळी आणि अतिशय देखणी आहे.  

सेंट अँजेलो किल्ल्यावर उन्हामध्ये फिरून आमच्या तोंडाला कोरड पडली होती. त्याबाबत आम्ही काही तक्रार करायच्या आधीच निलेश राजाध्यक्ष यांनी ते ओळखले असावे. अराक्कल संग्रहालयाजवळ आम्ही गाडीतून उतरल्यावर, संग्रहालयाच्या आत जाण्याआधी, त्यांनी आम्हा सर्वांना एक मस्त शीतपेय प्यायला दिले. शहाळ्यातील पाणी आणि 'पतली मलई' एकत्र मिक्सरमधून फिरवून, नंतर थंडगार केलेले ते मधुर पेय पिऊन आम्ही अगदी ताजेतवाने झालो. 

'अरक्कल राजवट' ही केरळमधील एकुलती एक मुस्लिम राजवट होती. कण्णूर शहर आणि लक्षद्वीपमधील दक्षिणेकडील काही बेटांवर यांचे राज्य होते. हे शाही घराणे कोलाथिरी राजवंशाचीच एक शाखा असल्याचे म्हटले जाते. या घराण्यात मातृसत्ताक पद्धत पाळली जात असल्यामुळे, राज्याचे उत्तराधिकार मामाकडून भाच्याकडे जात असत. पण कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ सदस्य, स्त्री अथवा पुरुष, हाच राज्याचा शासक असतो. राज्यकर्त्या राजाला 'अली राजा' आणि सत्ताधारी राणीला 'अरक्कल बीवी' अशा नावांनी संबोधले जाते. या मुस्लिम शासकांनी, अठराव्या शतकामध्ये हैदर अली या म्हैसूरच्या राजाला, केरळवर आक्रमण करण्यासाठी बोलावले होते. १६६३ साली अरक्कल राजाने डचांकडून एक वास्तू विकत घेतली. ती वास्तू, म्हणजेच 'अरक्कल राजवाडा', ज्यामध्ये सध्या हे अरक्कल संग्रहालय आहे.  

या छोट्याशा संग्रहालयाची इमारत जुनी असली तरी मजबूत आहे. संग्रहालयामध्ये अरक्कल राजघराण्यामधल्या लोकांनी वापरलेल्या वस्तू मांडून ठेवल्या आहेत. त्यात लाकडी नक्षीदार टेबल-खुर्च्या, बाक, पलंग, कपाटे, संदुका आणि मोठमोठाले आरसे आहेत. त्याचबरोबर त्या काळची शस्त्रे, दंड, वाद्ये, हांडे अशा इतरही अनेक वस्तू आहेत. जुने टेलीफोन्स, दुर्बिणी यासोबतच तिथले विशेष आकर्षण म्हणजे, कुराण शरीफची एक हस्तलिखित प्रत आणि अरक्कल राजवटीचा जुना ध्वज! शिहादने आम्हाला त्या ध्वजावरच्या सगळ्या चिन्हांबद्दल सविस्तर माहिती दिली. संग्रहालय बघून झाल्यावर आम्ही कण्णूरचे दीपगृह बघायला निघालो. 

पैयंबलम बीचजवळ असलेल्या या दीपगृहापर्यंत पोहोचेस्तोवर, दुपारचे  बारा वाजून गेले होते. दीपगृहाच्या आवारात शिरताच, डाव्या बाजूला एक छोटे संग्रहालय आहे. त्यामध्ये, सर्व दीपगृहांमध्ये पूर्वापार वापरली गेलेली वेगवेगळी उपकरणे ठेवलेली आहेत. शिहादने आम्हाला त्या उपकरणांची माहिती सांगितली. १८८५ सालापासून ते १९६२ पर्यंत लक्षद्वीप दीपस्तंभामध्ये वापरले गेलेले एक अवाढव्य ऑप्टिक (प्रकाश प्रवर्धित करणारी भिंगाची रचना) दाखवले. कधीकधी दाट धुक्यामुळे, ऑप्टिकने प्रवर्धित केलेला प्रकाशही जहाजांना दिसू शकत नाही. अशा परिस्थितीत जहाजचालकांना सतर्क करण्यासाठी पूर्वीपासून वापरण्यात आलेली एक प्रचंड  घंटा  या संग्रहालयामध्ये बघायला मिळाली. तिथल्या प्रेक्षागृहामध्ये भारत देशातील सर्व दीपगृहांबद्दलचा एक माहितीपट दाखवला जातो. संग्रहालय बघून झाल्यावर, आम्ही प्रेक्षागृहामध्ये चित्रपट बघायला जाईपर्यंत एक वाजत आला होता. तिथल्या सरकारी कर्मचाऱ्याने आम्हाला चित्रपट चालू करून दिला. पण बरोबर एक वाजायला पाच मिनिटे बाकी असताना, आपला सरकारी बाणा दाखवला. दुपारी १ ते २ जेवणाची सुट्टी असल्यामुळे त्याने आम्हाला संग्रहालयाच्या बाहेर काढले. त्यामुळे तो चित्रपट आम्हाला पूर्ण बघता आला नाही.  

सकाळी सगळ्यांनी भरपेट नाश्ता केलेला असल्यामुळे एक वाजेपर्यंत कोणालाच भूक लागली नव्हती. त्यामुळे आम्ही सर्वांनी दीपगृहाचा जिना चढून वर जाण्याचे ठरवले. फक्त दादा आणि सौ. अस्मिता म्हात्रे खालीच थांबले. लाल आणि पांढर्‍या रंगात रंगवलेले, जवळपास ७५ फूट उंच असे हे  दीपगृह, अजूनही सक्रिय आहे. वर चढून जाण्यासाठी एक चक्राकार जिना आहे. जिन्यामधे हवा येण्यासाठी बाहेरच्या भिंतीला ठराविक अंतरावर खिडक्या आहेत. जिना चढताना आम्हाला सर्वानाच धाप लागत होती. त्यामुळे त्या खिडक्यांजवळ थांबून जरा दम खात, अंगावर वारे घेत, बाहेर बघायला बरे वाटले. 

अगदी शेवटी एक निमुळती आणि खडी चढण असलेली लोखंडी शिडी चढून, दीपगृहाच्या गोलाकार सज्जामध्ये जात येत होते. त्या शिडीवरून एकावेळी फक्त एकच व्यक्ती चढू किंवा उतरू शकत होती आणि चढताना पायामधे आणि पोटामध्येही गोळे येत होते. पण इतके कष्ट करून, सज्ज्यामध्ये पोहोचताच, जे दृश्य दिसले ते मात्र वर्णनातीत होते. मॉन्सूनचे तुफान वारे वाहत होते आणि नजर पोहोचेपर्यंत फक्त समुद्रच दिसत होता. तिथे आम्ही अनेक फोटो काढले. बऱ्याच जणांनी ३६० अंशातील व्हिडिओही काढला. व्हिडियोमध्ये आपण एखाद्या ठिकाणचे दृश्य, तिथले आवाज, तिथे असलेल्या व्यक्तींच्या चेहऱ्यावरील भाव हे सगळे कैद करू शकतो. पण तरीही तेथील 'माहौल', आणि त्यावेळी आपल्या मनामध्ये उचंबळणारे भाव मात्र कैद करता येत नाहीत!  


खरं सांगायचे तर त्या 'माहौल' मधून आमचा कोणाचाच पाय निघत नव्हता. पण त्या छोट्या सज्ज्यामध्ये पर्यटकांची गर्दी व्हायला लागली होती. तसेच आम्हाला पुढे थलासरीपर्यंत प्रवास करून, तिथली सुप्रसिद्ध 'थलासरी बिर्याणी' चाखायची होती. त्यामुळे काहीश्या नाईलाजानेच आम्ही खाली उतरलो आणि गाडीमध्ये बसून थलासरीकडे प्रयाण केले.   

 

३ टिप्पण्या: