गुरुवार, १ सप्टेंबर, २०२२

६. मलाबारची सफर- 'सी शेल बीच होम'


नीलेश्वर बॅकवॉटर्सपासून आम्ही कण्णूरकडे साधारण चार वाजायच्या सुमारास गाडीत बसून निघालो. नकाशावर अंतर ७५ किलोमीटर दिसत होते. पण रस्त्यामध्ये वाहतूक कोंडी झाली असल्याने, आम्हाला वाट वाकडी करून जावे लागले. दीड तासांत पोहोचू असे वाटले होते. पण वेळ लागू लागला. त्यामुळे वाटेत जरा 'पाय धुवायला' थांबलो. [हा वाक्प्रचार हल्ली फारसा वापरात नाही. 'फ्रेश होणे' या आजकाल मराठीत घुसलेल्या वाक्प्रचारामुळे असे अनेक जुने मराठी वाक्प्रचार वळचणीला जाऊन पडलेले आहेत!] तिथे आसपास कुठे चहा मिळतोय का, हे पाहायचा प्रयत्न श्री. नीलेश यांनी केला, पण चहा काही मिळाला नाही. दोन तास होत आले तरीही रिसॉर्ट न आल्याने सगळ्यांनाच जरा कंटाळल्यासारखे झाले होते. शेवटी साडेसहा वाजायच्या सुमारास 'सी शेल बीच होम' या रिसॉर्टला आम्ही पोहोंचलो. गिरीश-प्राची आणि जहागीरदार पती-पत्नींचे अगदी ऐनवेळी या सहलीला यायचे ठरल्यामुळे, त्या चौघांना 'सी शेल बीच होम' मध्ये जागा मिळाली नव्हती. त्यामुळे त्यांची सोय दुसऱ्या कुठल्यातरी रिसॉर्टमध्ये केलेली होती. बेकलचा किल्ला बघून ते परस्पर तिकडे गेले.  

'सी शेल बीच होम' मधे आमच्या स्वागताची तयारी होती. बाहेरच एका मोठ्या टोपल्यात शहाळी घेऊन एक गडी बसलेला होता. त्याने सपासप शहाळी कापून आम्हाला सर्वांना दिली. शहाळ्याचे गोड पाणी पिऊन झाल्यावर त्याने आम्हाला आमच्या शहाळ्यांमधली 'पतली मलई' काढून दिली. शहाळ्यातले पाणी पिऊन आणि मलई खाऊन आमचा थकवा दूर पळाला. शहाळे बघितल्यावर, अनिरुद्धची, म्हणजे आमच्या मुलाची आठवण झाल्याशिवाय राहिली नाही. अमेरिकेतून भारतात आल्याबरोबर आणि परतीच्या प्रवासासाठी विमानतळावर पोहोचायच्या आधी तो आवर्जून शहाळे पितो. त्याची आठवण काढत मी दोन शहाळी प्यायले.   

'सी शेल बीच होम' हे रिसॉर्ट समुद्रकिनाऱ्याला लागून असलेल्या एका उंच कड्यावर आहे. आमच्या डोळ्यासमोर, पण जरा खालच्या पातळीवर समुद्र दिसत होता. समुद्राचा धीरगंभीर नाद इथल्या संपूर्ण वातावरणात भरून राहिलेला होताच पण एक सुखावह शांतताही जाणवत होती. रिसॉर्टचे बाह्य रूप अगदी साधे आहे. ज्या पर्यटकांना 'तथाकथित' पंचतारांकित सोयी हव्या असतात त्यांना कदाचित हे रिसॉर्ट फारसे आवडणार नाही. पण आम्हाला आवडते तशी स्वच्छ, शांत, कुठलाही भपका नसलेली ही जागा असल्याने आम्ही फारच खूष झालो. 'सी शेल बीच होम' मध्ये  राहायला आलेल्या पाहुण्यांना, 'Home away from home' असा अनुभव देण्यासाठी  रिसॉर्टचे मालक हरिस आणि त्यांचा मुलगा रोशन जातीने लक्ष घालत असतात. 

'सी शेल बीच होम' रिसॉर्टच्या आत आल्या-आल्या, अगदी समोरच एक समुद्राभिमुख झोपाळा आहे. जवळच, पन्नास-साठ माणसांना आरामात बसता येईल असे एक दालन आहे. त्यामध्ये एक छोटे स्टेजही आहे. एखादे घरगुती स्नेहसंमेलन आयोजित करण्यासाठी ही अगदी सुयोग्य जागा आहे. या बीच होम मध्ये एकूण १६ खोल्या आहेत. सर्व खोल्या वातानुकूलित आहेत. खालच्या मजल्यावरच्या खोल्यांच्या समोर व्हरांडा आहे तर वरच्या मजल्यावरच्या खोल्यांना बाल्कनी आहे. तिथे लाकडी बाक आणि मोठमोठाल्या आरामखुर्च्या ठेवलेल्या आहेत. कुठल्याही खोलीच्या बाहेर उभे राहिले की समोर अथांग समुद्र दिसतो! खालच्या मजल्यावर स्वयंपाकघर आहे. त्यासमोरच एका प्रशस्त मोकळ्या जागेमध्ये जेवणासाठी टेबल-खुर्च्या मांडलेल्या आहेत. या जागेवर छप्पर घातलेले असल्यामुळे, भर पावसामध्ये सुद्धा इथे बसता येते. या भागातून खाली समुद्राकडे जाण्यासाठी एक बांधलेला जिना आणि पायवाट आहे. पंधरा-वीस पायऱ्या आणि पायवाट उतरून गेले की आपण पुळणीवर पोहोचतो.  

आम्हाला खालच्या मजल्यावरच्या दोन खोल्या दिल्या होत्या. अंघोळ करून कपडे बदलून आम्ही मोकळ्या हवेवर बाहेर येऊन बसलो. तिथे एका कोपऱ्यामधले टेबल पकडून, तमाम समविचारी लोकांनी, निवांतपणे सुरापानाचा आस्वाद घेतला. जेवण लागेपर्यंत आम्ही सगळे, 'खारे' वारे खात, आरामात गप्पा मारत बसलो. आम्हा 'अनुभव'च्या सहप्रवाशांसाठी खास बुफे लावला होता. मलाबारी पराठेआणि साधे पराठे, पनीर मसाला, डाळ, कसलीशी भाजी, मटण स्ट्यू , तळलेले मासे, आणि फ्राईड चिकन आणि भात असा बेत होता. जेवणानंतर व्हॅनिला आईस्क्रीम होते. श्री. हरिस, प्रत्येकाची आपुलकीने चौकशी करत, स्वतः सगळ्यांना जेवण वाढत होते. त्यांना सांगून मी  दादांसाठी केळ्यांची शिकरण करून घेतली. सर्व खाद्यपदार्थांचे रूप आणि वास खूपच चांगला असल्याने, मला जेवायचा मोह होत होता, पण मी तो आवरला. दुपारचे जेवण उशिरा झाल्यामुळे भूक कमीच होती आणि रात्री उशिरा बाहेरचे जेवण जेवल्यावर त्रास होईल की काय, अशी भीतीही वाटत होती. मी एक ग्लासभर गरमागरम दूध मात्र प्यायले. 

जेवण झाल्यानंतरही उशिरापर्यंत आम्ही सगळे गप्पा मारत बसलो. नीलेश राजाध्यक्ष यांनी आम्हाला दुसऱ्या दिवशीच्या, म्हणजे १४ ऑगस्टच्या, कार्यक्रमाबाबत सूचना दिल्या. सात वाजता चहा मिळेल, नाश्ता आठ नंतर मिळेल, मधल्या वेळामध्ये कोणाला समुद्रावर फिरायला जायचे असेल तर जाऊन यायला हरकत नाही, असे सांगितले गेले. नाश्त्यानंतर सकाळी ९ वाजायच्या सुमारास 'फोर्ट सेंट अँजेलो' बघायला निघायचे आहे असेही सांगितले गेले. १४ ऑगस्टला आम्ही आणखी बऱ्याच छानछान जागांना भेट देणार होतो. 

सगळे झोपायला गेले तरीही मला झोप येत नव्हती. त्यामुळे मी व्हरांडयातील आरामखुर्चीवर बसून सतत उसळणाऱ्या समुद्राच्या लाटांकडे बघत बसले. माझ्या मनामध्येही अनेक विचार उसळत होते.  गिरीश-प्राची आणि जहागीरदार पती-पत्नींना आमच्याबरोबर या घरातला पाहुणचार घेता आला नाही याचे वाईट वाटत होते. आमच्या नातीला, म्हणजे नूरला इथे घेऊन आलो तर तिला किती आवडेल, असेही वाटले. जवळच्या सर्व आप्तांना या 'सी शेल बीच होम' मध्ये घेऊन यायचे , असा मनाशी निश्चय करून मी  खोलीमध्ये जाऊन निद्राधीन झाले. 

७ टिप्पण्या:

  1. नेहमीच्या शैलीत झकास प्रवास वर्णन

    उत्तर द्याहटवा
  2. सुंदर लिखाण केरळचा निसर्ग डोळ्या समोर उभा राहिला.

    उत्तर द्याहटवा