रविवार, ४ सप्टेंबर, २०२२

९. मलाबारची सफर- 'हर्मन गुंडर्ट' आणि 'गुंडर्ट बंगला'

कण्णूर दीपगृहापासून निघून आम्ही थेट थलासरीच्या 'एम आर ए रेस्टॉरंट' मध्ये साधारण अर्ध्या तासामधे पोहोचलो. रेस्टारंटमध्ये तुडुंब गर्दी होती. त्यामुळे आम्हाला जेवण्यासाठी जागा मिळेपर्यंत पुढे अजून अर्धा-पाऊण तास लागला. तोपर्यंत सर्वांनाच कडाडून भूक लागली होती. त्या कॅफेच्या बाहेर, काचेच्या आड मांडून ठेवलेले अनेक खाद्यपदार्थ अत्यंत आकर्षक दिसत होते. तिथे बाहेरच एक माणूस 'कुनाफा' नावाचा गोड पदार्थ तयार करत होता. जेवणाला वेळ लागणार आहे हे लक्षात आल्यामुळे प्राचीने दादांसाठी एक कुनाफा विकत घेतला. शेवटी आम्हाला बसायला जागा मिळाली. पण रेस्टारंटमध्ये तुफान गर्दी असल्यामुळे, जेवण खूप उशिरा आले. थलासरी चिकन, थलासरी बिर्याणी आणि दोन प्रकारचे पुलाव उत्तम होते. प्रत्येकाला त्याच्या आवडीचे जेवण मिळावे यासाठी निलेश राजाध्यक्ष खूपच धडपड करत होते. परंतु, तेथील गर्दीमुळे, त्यांचे प्रयत्न तोकडे पडत होते. जेवणासाठी बराच वेळ प्रतीक्षा करूनही मनासारखे खाद्यपदार्थ न मिळाल्याने काहीजण नाराज झाले. 

जेवण उरकून रेस्टॉरंटमधून निघेपर्यंत साडेचार वाजून गेले होते. जेमतेम पंधरा मिनिटांतच आम्ही 'गुंडर्ट बंगल्या'मध्ये पोहोचलो. या प्रशस्त बंगल्याचे आवारही  खूप मोठे आहे. बंगल्याच्या चारही बाजूंना मोठे व्हरांडे आहेत. हा बंगला पारंपरिक केरळी स्थापत्यशैलींमध्ये बांधलेला आहे. बंगल्यावर उतरते कौलारू छप्पर आहे. बंगल्याला मोठमोठ्या खिडक्या आहेत तर तिथले लाकडी दरवाजे चांगले रूंद व मजबूत आहेत. हा बंगला वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे आणि बंगल्याचा परिसर शांत व निसर्गरम्य आहे.

एकोणिसाव्या शतकामध्ये, याच बंगल्यामधे सुमारे २० वर्षे राहून डॉ. हर्मन गुंडर्ट आणि त्यांच्या पत्नी ज्युली डुबोईस यांनी मल्याळम भाषासंवर्धनासाठी आणि शिक्षणाच्या प्रसारासाठी अत्यंत मोलाचे कार्य केले. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी या बंगल्यामध्ये गुंडर्ट यांच्या जीवनाबाबतची आणि कार्याबद्दलची सर्व माहिती संग्रहित करण्यात आली आहे. ती माहिती विविध भाषांमधून ऐकण्याची सोय करण्यात आलेली आहे. 


डॉ हर्मन गुंडर्ट यांचा जन्म १८१४ साली जर्मनीमधील स्टुटगार्ट या शहरामध्ये झाला. ते अतिशय प्रतिभावंत होते. १८३५ मधे टूबिगन विद्यापीठामधून त्यांनी भाषाशास्त्रामध्ये (फिलॉलॉजीमध्ये) डॉक्टरेटची पदवी संपादन केली. त्याचबरोबर त्यांनी तिथे धर्मशास्त्राचाही अभ्यास केला. या शिक्षणादरम्यान, हिब्रू, लॅटिन, इंग्रजी आणि फ्रेंच या भाषांवर त्यांनी प्रभुत्व मिळवले. १८३६ साली ते ख्रिश्चन मिशनरी म्हणून युरोपातून सागरी मार्गाने भारतात आले. बोटीवरील काही महिन्यांच्या प्रवासातच ते बंगाली, हिंदी व तेलगू भाषा शिकले आणि सहप्रवाशाना शिकवूही लागले. त्यांचे जहाज आधी कलकत्त्याला जाणार होते. पण ते तिथे न जाता मद्रासच्या किनाऱ्याला लागले. त्यामुळे काही काळ ते तामिळनाडूमधील तिरुनेलवेल्ली आणि पुढे आंध्रप्रदेशमधील चित्तूर येथे कार्यरत होते. त्याकाळात त्यांनी तामिळ आणि तेलगू भाषांवर प्रभुत्व मिळवले. युरोपमधून त्यांच्याबरोबर आलेल्या ज्युली डुबोईस या तरुणीशी, चित्तुर येथे ते विवाहबद्ध झाले. नोव्हेम्बर १८३८ मधे गुंडर्ट पती-पत्नींना मेंगलोरच्या बासेल मिशनचे काम बघण्यासाठी बोलावण्यात आले. त्या कामानिमित्त फिरताना ते केरळच्या थलासरी येथे पोहोचले आणि पुढील वीस वर्षे त्यांनी तिथेच वास्तव्य केले. 

गुंडर्ट पती-पत्नींनी थलासेरीच्या इल्लीकुन्नू भागातील या बंगल्यामध्ये राहावे, तेथेच बासेल मिशनचे स्टेशन स्थापन करावे आणि ख्रिस्ती धर्मप्रसाराचे काम करावे असे ठरले होते. त्या कामाच्या निमित्ताने  डॉ. गुंडर्ट यांनी स्थानिक शिक्षकांकडून काही महिन्यातच मल्याळम भाषा शिकून घेतली. वर्षभरातच त्यांनी त्यांच्या बंगल्याच्या व्हरांड्यात पहिली मल्याळम शाळा सुरु केली. त्याच वेळी त्यांच्या पत्नीने मुलींसाठी पहिली  निवासी शिक्षणसंस्था सुरू केली. त्यानंतरच्या काही महिन्यांत, डॉ गुंडर्ट यांनी कादिरूर, थलासेरी फोर्ट, माहे आणि धर्मादम येथे मल्याळम शाळा सुरु केल्या. या सर्व शाळांना नियमित भेटी देऊन, तिथल्या कामकाजावर ते देखरेख करीत असत. 

ख्रिस्ती धर्माच्या प्रसारानिमित्त, थलासरीच्या आसपासच्या गावांना सातत्याने भेटी देत असल्यामुळे, तेथील स्थानिक लोकांमध्ये डॉ. गुंडर्ट यांची नियमित उठ-बस होती. स्थानिकांसोबतच्या संवादातून त्यांनी शक्य तितके मल्याळम शब्द, वाक्प्रचार आणि म्हणी गोळा केल्या. त्यामुळे, मल्याळम भाषेचे पुष्कळच ज्ञान त्यांना प्राप्त झाले. स्थानिक विद्वानांसोबत चर्चा करून, त्यांनी मल्याळम भाषेतील व्याकरणाचे नियम निश्चित केले. तसेच त्या भाषेमधे  पूर्णविराम, स्वल्पविराम, अर्धविराम, आणि प्रश्नचिन्ह अशा चिन्हांचा वापर प्रचलित केला. 'मल्याळभाषा व्याकरणम' हे मल्याळम भाषेतील पहिले व्याकरणाचे पुस्तक डॉ. गुंडर्ट यांनीच संकलित करून १८५१ साली छापले. तसेच, १८७२ साली पहिला मल्याळम-इंग्रजी शब्दकोशदेखील त्यांनी तयार केला व बायबलचे मल्याळममध्ये भाषांतरही केले. 

१८५७ मध्ये, मलाबार प्रांताच्या दक्षिणेला असलेल्या कोळीकोड शहरापासून ते उत्तरेकडे कर्नाटकातील हुबळीपर्यंतच्या सर्व शाळांचे पहिले शिक्षण-निरीक्षक म्हणून डॉ. गुंडर्ट यांची नियुक्ती केली गेली. त्या पदावर असताना, शिक्षकांची नियुक्ती करण्याचे कामही ते पाहत असत. शाळा, महाविद्यालये आणि नव्याने स्थापन झालेल्या मद्रास विद्यापीठासाठी डॉ. गुंडर्ट यांनी पाठ्यपुस्तके लिहिली आणि परीक्षांकरिता प्रश्नसंचही संकलित केले. इतिहास, भूगोल आणि खगोलशास्त्र या क्षेत्रातही डॉ गुंडर्ट यांनी योगदान दिले आहे. मल्याळम भाषेमधील अनेक जुने दस्तऐवज आणि थलासरीशिवाय मलबार प्रांतामधील इतर ठिकाणच्या धर्मग्रंथांचे संकलन त्यांनी केले होते. ते सर्व संकलित साहित्य त्यांनी पुढे जर्मनीमधील टुबिंगेन विद्यापीठाला देणगीरूपाने दिले.

डॉ. गुंडर्ट यांनी छपाईसाठी, आपल्या बंगल्यामध्येच एक 'लिथो प्रेस' चालू केली. त्या छापखान्यामधून, 'राज्यसमाचारम' नावाचे पहिलेवहिले मल्याळम वर्तमानपत्र, आणि पुढे 'पश्चिमोदयम' हे दैनिकदेखील छापण्याची सुरुवात डॉ गुंडर्ट यांनीच केली. महिलांना इंगजी शिक्षण देऊन, शिवणकाम शिकवून त्यांना उपजीविकेचे साधन मिळवून देऊन, त्यांचा सामाजिक स्तर उंचावण्यासाठी या बंगल्यात चालू केले गेलेले अनेक उपक्रम अतिशय महत्त्वाचे आहेत. डॉ. हर्मन  गुंडर्ट यांनी सुरु केलेली नेत्तूर टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (NTTF),  ही या बंगल्याच्या शेजारीच आहे आणि अजूनही कार्यरत आहे.

केरळची स्थानिक संस्कृती व मल्याळम भाषेचा विकास साधण्याकरिता, आणि शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी व्याकरणविषयक ज्ञान संकलित करण्यासाठी, डॉ. गुंडर्ट यांनी दिलेले योगदान बहुमूल्य आहे. त्यांनी मल्याळम भाषेत एकूण तेरा पुस्तके प्रकाशित केली. त्यांनी तेलगू साहित्याचे हिब्रूमध्ये भाषांतर केले आहे, असेही एका फलकावर वाचले आणि मी आश्चर्यचकितच झाले. डॉ गुंडर्ट याचे नातू, जर्मन कादंबरीकार व नोबेल पारितोषिक विजेते हर्मन हेसे यांच्या म्हणण्यानुसार, डॉ. गुंडर्ट यांना कमीतकमी तीस भाषा अवगत होत्या. 

गुंडर्ट बंगला पाहून आणि डॉ. गुंडर्ट यांच्या कार्याबद्दल लिहिलेली विस्तृत माहिती वाचून, मी कमालीची थक्क झाले. कोण कुठला हा परकीय मनुष्य, आपल्या देशामध्ये येऊन राहतो काय, आपल्यालाही अतिशय अवघड वाटणाऱ्या दाक्षिणात्य भाषा व संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळवतो काय, स्थानिक संस्कृती व भाषांच्या संवर्धनासाठी आपल्या तारुण्यातील बहुमूल्य काळ वेचतो काय, हे सर्व अचंबित करणारेच कार्य आहे. 

परंतु, डॉ. गुंडर्ट यांच्या कार्याबद्दल वाटलेल्या आदरासोबतच मला स्वतःचीच फार लाजही वाटली. मी एक डॉक्टर असल्याने, बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या केरळी नर्सेसबरोबर माझा नेहमी संबंध येतो. त्या नर्सेस आपापसात मल्याळममध्ये बोलत असतात. इतकी वर्षे ती भाषा माझ्या कानावर पडत आली आहे, पण ती मला बोलता तर येत नाहीच, पण समजतही नाही, ही वस्तुस्थिती खरोखरच लाजिरवाणी आहे. 

आपल्यापैकी कित्येकांना, एखादी दाक्षिणात्य भाषा ऐकल्यानंतर ती तेलगू आहे, तमिळ आहे की मल्याळम, हेसुद्धा सांगता येत नाही. त्या भाषा बोलणे किंवा त्या भाषांमध्ये लेखन करणे ही तर खूपच दूरची गोष्ट झाली. इतकेच नव्हे तर, मराठी भाषेशी पुष्कळसे साधर्म्य असलेल्या हिंदी, गुजराती या भाषाही आपल्याला येत नाहीत, आणि त्याची लाज वाटण्याऐवजी आपण ते 'वृथा अभिमानाने' सांगून हसण्यावारीही नेतो. 

आपण आपल्याच देशाबद्दल आणि देशवासीयांबद्दल किती अनभिज्ञ आहोत, आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी आपण सर्वांनीच आणखी किती प्रयत्न केले पाहिजेत याची जाणीव मला गुंडर्ट बंगल्यामधे गेल्यावर प्रकर्षाने झाली.

४ टिप्पण्या:

  1. भाषा यायला हव्यात, इथं कन्नड documents आणि मराठी documents इंग्लिश मधे ट्रान्सलेट करून घ्यायला 4तास गेलें , नशीब कोर्ट proceeding इंग्लिश मधे आहेत त्या मुळे consent terms पटकन तयार झाल्या. या अगोदर अनेकदा कर्नाटकात आलो भाषा शिकली नाही

    उत्तर द्याहटवा