बुधवार, ७ सप्टेंबर, २०२२

११. मलबारची सफर-ध्वजारोहण!

 

१५ ऑगस्टला पहाटे पाच वाजताच जाग आली. चहाचे पाणी गरम करायची किटली आणि टी बॅग वगैरे सामान आदल्या दिवशीच मागवून ठेवले होते. पहाटे डिप-डिपचा चहा करून प्यायले. माझ्या खुडबुडीमुळे आनंदला जाग आली होती, पण तो पांघरूण गुरफटून पडून राहिला होता. म्हणून मी एकटीच पुळणीवरच्या वाळूवर थोडा वेळ पळून आले. 

मी खोलीवर परतेपर्यंत आनंद आणि दादा जागे झालेले होते. त्या दोघांबरोबर पुन्हा चहा घेतला. आज आम्हाला सामान बांधून, लवकर तयार होऊन, रेल्वे स्टेशनवर जायचे होते. आमची टेम्पो ट्रॅव्हलर गाडी सात वाजता आमचे सामान घेऊन पुढे कोळीकोडला जाऊन थांबणार होती. आम्ही साडेनऊ वाजता कण्णूर रेल्वे स्थानकावर पोहोचणारी आणि पुढे कोळीकोडला जाणारी गाडी पकडणार होतो. त्याआधी आमच्या अंघोळी, नाश्ता उरकून साडेआठ वाजता ध्वजारोहण समारंभाला हजर राहून ध्वजवंदन करायचे होते. 

आम्ही लगबगीने तयारीला लागलो. देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाल्याचा एक वेगळाच आनंद आमच्या मनामध्ये होता. दादांच्या हस्ते ध्वजारोहण होणार असल्यामुळे दादा खूपच उत्साहात होते. त्यांची अंघोळ व नाश्ता वेळेत आवरून, त्यांना कुठलाही त्रास न होऊ देता, रेल्वे गाडीमध्ये कसे चढवावे, याचाच विचार मी आणि आनंद करीत होतो. 'सीशेल होम' मधल्या सोलर हिटरची दुरुस्ती झालेली नसल्यामुळे, सर्वांना अंघोळीकरता गरम पाणी पुरवण्याची निराळी व्यवस्था निलेश राजाध्यक्ष यांनी बघितली. त्यामुळे आम्ही सगळेच वेळेत तयार झालो. सामान बांधून आमच्या बॅगा टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये ठेवण्यासाठी दिल्या. फक्त दादांची व्हीलचेयर आमच्याबरोबर रेल्वेने नेण्यासाठी ठेवली. 
नाश्ता करायला गेलो तर तिथे सगळे वेगवेगळे आणि छानछान पदार्थ मांडून ठेवलेले होते. ते बघून माझ्या तोंडाला पाणीच सुटले. केळीच्या पानामध्ये बांधलेले पुट्टु होते, 'एलाअडा' म्हणजेच गूळ व ओल्या नारळाचे सारण भरून केळीच्या पानामध्ये उकडून केलेल्या करंज्या होत्या, काळे चणे किंवा घुगऱ्याची मसालेदार उसळ, अर्थात 'कडलाकरी' होती, नारळाची चटणी व पांढरेशुभ्र जाळीदार आप्पम होते; त्याशिवाय, नारळाच्या दुधामध्ये शिजवलेली एक मिक्स भाजी आणि आदल्या दिवशीसारख्याच पुदिन्याची पाने पेरलेल्या कलिंगडाच्या फोडी, असा भरभक्कम नाश्त्याचा बेत होता. 

सगळे पदार्थ अगदी मस्त दिसत होते आणि त्यांचा सुवासही दरवळत होता. मग काय, आम्ही सगळेच त्या पदार्थांवर तुटून पडलो. म्हात्रे पती-पत्नींचा चतुर्थीचा उपास असल्यामुळे निलेश राजाध्यक्ष यांनी त्यांच्यासाठी खास बटाट्याचे तळलेले फिंगरचिप्स आणि आले घातलेले मसाला ताक मागवून ठेवले होते. आम्ही सर्वांनीही फिंगरचिप्सची चव बघितली. काहींनी ताकाचा आस्वादही घेतला. सगळे पदार्थ पचायला हलके व अतिशय चवदार होते. आमच्या शेजारच्या टेबलवर काही केरळी लोक बसले होते. डिशमध्ये पुट्टु कुस्करून त्यावर कडलाकरी, भाजी किंवा चटणी घालून भातासारखे कालवून ते हाताने खात होते. ते पाहून मग मीही तसेच कालवून खाल्ले. केवळ ध्वजारोहणाची वेळ होत आली होती आणि त्यानंतर आम्हाला गाडी पकडायची होती म्हणूनच आम्ही खाणे थांबवले आणि तिथून उठलो!

ध्वजारोहणाची सर्व जय्यत तयारी झालेली होती. दादांनी ध्वज फडकवला आणि कडक सलामी दिली. आम्ही सगळ्यांनी राष्ट्र्गीतचे समूहगान केले. त्यानंतर शिहादने एक छोटेसे भाषण केले. जवळजवळ सव्वासहाशे वर्षांपूर्वी वास्को द गामा या पहिल्या युरोपियन माणसाने केरळच्या सागरी किनाऱ्यावर पाय ठेवला होता. त्या घटनेमुळे आणि त्यानंतरच्या काळात ब्रिटिश आक्रमणांमुळे आपला देश पारतंत्र्यामध्ये गेला होता. दीडशे वर्षांचे पारतंत्र्य झुगारून, पंचाहत्तर वर्षांपूर्वी ज्या दिवशी भारत स्वतंत्र झाला, नेमके त्याच दिवशी, केरळ किनारपट्टीवरच आम्ही ध्वजारोहण समारंभाला उपस्थित असणे, हा मला आमच्यापुरता एक सुखद योगायोग वाटला. मोठ्या उत्साहाने आणि अतिशय अभिमानाने आम्ही सर्वांनी हातामध्ये ध्वज पकडून आमचे फोटो काढून घेतले. 

आता आमची 'सीशेल होम' सोडण्याची वेळ झाली होती. आमच्यापैकी कोणाला आणखी काही हवे आहे का, याची हरीस यांनी अगदी आस्थेने चौकशी केली. आमच्याबरोबर केळी आणि काही फळे बांधून दिली. त्यानंतर मला व आमच्यापैकी इतर काही जणांना, 'सीशेल होम' बद्दल आपापले अभिप्राय देण्याची विनंती केली. रोशनने, म्हणजे हरीस यांच्या मुलाने, आमच्या बोलण्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग केले. आम्ही सर्वांनीच आपापल्या शब्दांमध्ये 'सीशेल होम' मधील चोख व्यवस्थेचे, उत्तम खाद्यपदार्थांचे, आणि आल्हाददायक वातावरणाचे भरभरून कौतुक केले.

आमच्या सामानासह टेम्पो ट्रॅव्हलर गाडी घेऊन, आमचा चालक शाम सकाळी साडेसातच्या सुमारासच कोळीकोडला निघून गेलेला होता.  'सीशेल होम' पासून आम्हाला कण्णूर रेल्वे स्टेशनवर नेण्यासाठी  एका वेगळ्या गाडीची व्यवस्था करण्यात आली होती. आम्हाला निरोप द्यायला स्वतः रिसॉर्टमालक हरीस उभे होते. आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांना निरोप देताना आपण म्हणतो तसे, "परत एकदा या निवांत राहायला आणि कोळीकोडला सुखरूप पोहोचलात की फोन करून कळवा" या शब्दात ते बोलले नाहीत इतकेच. पण त्यांच्या चेहऱ्यावरच्या भावांमुळे ते तसेच म्हणत आहेत असे मला जाणवले. त्यामुळे हे 'होम' सोडताना माझे मन अगदी गलबलून आले होते. "आम्ही परत निश्चित येऊ" असे त्यांना सांगून मगच  मी गाडीमध्ये बसले. 

कण्णूर स्टेशनवर आम्ही अगदी वेळेत पोहोचलो. तिथे सरकता जिना असल्यामुळे, दादांना एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर नेताना आम्हाला काही त्रास झाला नाही. तसेच, व्हीलचेयर सोबत नेलेली असल्याने दादांना प्लॅटफॉर्मवर चालावेही लागले नाही. तिथे गेल्यानंतर आमची गाडी वीस मिनिटे उशिरा येणार असे कळले. त्यामुळे मी जरा कण्णूर प्लॅटफार्मवर इकडे-तिकडे हिंडून आले. व्हीलचेयरवरच्या रुग्णाला सहजी आत नेता येईल असे एक शौचालय प्लॅटफॉर्मच्या एका टोकाला होते. पण त्याला कुलूप लावून ठेवलेले दिसले! कण्णूर स्टेशनचा प्लॅटफॉर्म मात्र अतिशय स्वच्छ होता. काही फिरते विक्रेते मेदूवडे विकत होते. दुकानांमध्ये इतर पदार्थांबरोबरच तीळगुळाचे लाडूही विकायला ठेवले होते. 

आमची गाडी कण्णूर स्टेशनवर फक्त तीन मिनिटे थांबणार होती. त्यामुळे गाडीमध्ये चढताना काही गडबड तर होणार नाही ना, अशी धाकधूक मनामध्ये होती. परंतु, निलेश राजाध्यक्ष, सुमंत पेडणेकर आणि मोहंमद शिहाद या तिघांनींही दादांना गाडीमध्ये चढायला मदत केली, आणि आम्ही सगळे अगदी सहजी गाडीमध्ये शिरुन बसू शकलो. एसी चेयरकारच्या दोन वेगवेगळ्या डब्यांमध्ये आम्हाला जागा मिळाली होती. काही प्रवाशांना विनंती करून आम्ही एकत्र जागा मिळवल्या. 

आपण सर्वांनी देशभक्तीपर गाणी गात-गात जावे असे श्री. पेंडसे यांनी सुचवले. ती कल्पना आम्हाला सगळ्यांनाच आवडली. डब्यामधले इतर प्रवासी काय म्हणतील याची तमा न बाळगता आम्ही मुक्तपणे समूहगान केले. कोळीकोड स्टेशन येईपर्यंत या जोशपूर्ण आणि संगीतमय वातावरणामध्ये आमचा वेळ कसा गेला, हे आम्हाला कळलेच नाही.

१७ टिप्पण्या:

  1. अतिशय सुंदर वर्णन कण्णूर बद्दल देशभक्ती पण

    उत्तर द्याहटवा
  2. नेहमीप्रमणेच सुंदर वर्णन Thanks for very good.update

    उत्तर द्याहटवा
  3. आम्हीही या प्रवासात आहोत असे वाटले. छान अनुभव लिहीला आहेस.

    उत्तर द्याहटवा