शनिवार, २३ नोव्हेंबर, २०२४

सब घोडे बारा टक्के!

२० नोव्हेंबर २०२४ ला महाराष्ट्रामधे विधानसभेसाठी मतदान झाले. 

"आपले मत मोलाचे असते. ते वाया घालवू नका", "माझ्या एका मताने काय फरक पडणार आहे, असा विचार करून मतदान टाळू नका" किंवा," मतदारांनो, आपल्या मतांसाठी पैसे घेऊ नका. आपले मत विकू नका" असल्या संदेशाचा, पांढरपेशा वर्गाच्या व्हाट्सएप्प ग्रुपवर सुळसुळाट झालेला होता. सुशिक्षितांच्या ग्रुपमध्ये हे असले संदेश काही कामाचे नसतात, असे मला वाटते. आपले मत वाया घालवू नये किंवा एका मताने काय फरक पडतो हे न कळण्याइतका पांढरपेशा वर्ग निर्बुद्ध नाही. आणि या वर्गातल्या कोणालाही कधीही कोणताही राजकीय पक्ष मतांच्या बदल्यात पैसे देत नाही. त्यामुळे तिसऱ्या संदेशाचाही आपल्यासारख्याना काही उपयोग नसतो. पण ते असो. 


मतदानाच्या आदल्या दिवशी, पुण्यात माझ्याकडे काम करणारी मोलकरीण म्हणाली," ताई मी उद्या सुट्टी घेणार आहे."

मी म्हणाले," ठीक आहे. जरूर सुट्टी घे.  मतदान करायचे असेल ना. "

" हो, आणि पैसे पण मिळणार आहेत." 

मी म्हणाले, " खरंच पैसे वाटतात का गं ? 

" हो. वाटतात की " ती निर्विकारपणे उत्तरली. 

" दर निवडणुकीला पैसे वाटतात का ?"

" देतात ना. दर वेळी देतात. आमच्या घरात तर आम्ही आठ जण मतदार आहोत. प्रत्येकाच्या नावाने देतात." 

" कुठली पार्टी देते गं ?" मी कुतूहलाने विचारले. 

" आमच्या वस्तीत एकच पार्टी देते. तिकडे दुसऱ्या मुहल्ल्यात दुसरी पार्टी देते." 

मतदानाच्या दुसऱ्या दिवशी ती आल्याबरोबर मी तिला विचारले, "मतदान केलेस का गं ?'

डाव्या हाताची तर्जनी माझ्यासमोर धरून ती म्हणाली "हे बघा. केले की ताई" 

"पैसे मिळाले का? कसे आणि कुठे देतात गं पैसे?" मी उत्सुकतेपोटी विचारले.

" हो. मिळाले की पैसे. घरी येऊन नोटा देऊन जातात. यावेळी प्रत्येक मताला तीन हजार दिले की . आमच्या सगळ्यांच्यात मिळून २४००० रुपये मिळाले" 

मी आश्चर्यचकित झाले. 

ती पुढे बोलू लागली, "वर आम्हाला प्रत्येकाला, काहीतरी खूण केलेली वीस रुपयाची एक-एक नोट देऊन गेले आहेत. ती जपून ठेवायला सांगितले आहे"

" ती नोट कशासाठी?"

"ज्यांनी पैसे दिले आहेत त्यांची पार्टी निवडून आली की आम्ही ती वीसची नोट त्यांना दाखवायची. त्यानंतर ते अजून पैसे देणार म्हणाले आहेत. 

हे सगळे ऐकून मी थक्क झाले. 

" पण मग तू मत कोणाला दिलेस?"

" ज्यांनी पैसे दिले त्यांच्या उमेदवारालाच मत दिले. आम्ही बेईमानी नाही करत." 

निवडणूकांमधे गरिबांची मते विकत घेतली जातात, हे अगदी लहानपणापासून मी ऐकून आहे. लहानपणी आमच्या घरातल्या मोलकरणींना निवडणुकीच्या आधी नव्या साड्या मिळायच्या, झोपडपट्टीतील पुरुषांना धोतरजोडी मिळायची. पुढे अनेक राजकीय पक्ष मतदारांना वेगवेगळ्या पद्धतीने विकत घ्यायला लागले. पण यावेळच्या निवडणुकीत राजकीय पक्षांच्या कल्पकतेला धुमारे फुटले होते, असे वाटले. 

दिवाळीच्या आधी सोलापूरला गेले होते. तोपर्यंत महाराष्ट्रामधे  निवडणुकीचे वारे वाहायला लागलेच होते. 

मी आलेली आहे हे बघितल्यावर आमच्या शेजारी राहणारी सत्तरीची यास्मिन, मला भेटायला घरी येऊन बसली. गप्पा मारता-मारता सांगू लागली " मैं दिवालीमे अजमेर दरगेको जा रहीं हूँ. इसबार इन लोगोने बहोत अच्छा किया हैं. वहीच लोग हं सबकू लेको जा रहे है. सब खाना-पिना, गाडी सब उनकाच हैं. आपन खाली जानेका. खाली एक फार्म भरकु ले रहे हैं और एक फोटू और आधार कार्डकी कापी देना हैं. दिवालिके  बाद  निवडणुका हैं ऐसा बोल रहे हैं." 

तिने एका राजकीय पक्षाच्या नेत्याचे नाव घेतले. 

थोड्या वेळाने सोलापूरची मोलकरीण आली आणि आनंदाने सांगू लागली "ताई, दिवाळीनंतर दोन दिवस अष्टविनायकाला जाणार आहे."

सदैव कर्जबाजारी असलेली ही बाई, कामाचा खाडा करून अष्टविनायकाला जाण्याचा खर्च कसा करणार आहे? हा प्रश्न मला पडला. मी तिला काही विचारायच्या आत तिनेच खुलासा केला, "निवडणूका आल्यात नव्ह. म्हणून आम्हाला नेणार आहेत." 

तिनेही दुसऱ्या एका राजकीय पक्षाचे नाव घेतले. 

आपल्या देशामधे कुठलाच पक्ष धुतल्या तांदुळासारखा नाही. सगळे पक्ष एकमेकांवर पैसे वाटपाचे आणि मतदारांना विकत घेण्याचे आरोप करत असतात. पण निवडणूक तोंडावर आली की सर्वच पक्षांकडून पैसे वाटप होते. एकप्रकारे, तळागाळातील बहुजनांचा तात्पुरता आर्थिक विकास घडतो इतकेच!  

उद्या सकाळी माझी मोलकरीण कामाला आली की, "त्या वीस रुपयाच्या नोटेच्या बदल्यात तुला कधी आणि किती पैसे मिळणार?" हा प्रश्न विचारून तिचे उत्तर ऐकायला मी उत्सुक आहे. 

डॉ. स्वाती बापट 

मंगळवार, २९ ऑक्टोबर, २०२४

अवघे एकशे वयमान!

 साधारण दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझ्या रोजच्या सवयीप्रमाणे मी पहाटे उठून, तयार होऊन चालायला बाहेर पडले. आमच्या इमारतीमधून बाहेर पडून गल्लीच्या टोकाला येऊन मी मुख्य रस्त्याला लागणार होते. तितक्यात मला डावीकडून एक वयस्कर गृहस्थ चालत येताना दिसले. त्यामुळे ते जाईपर्यंत मी जरा थांबले आणि मग त्यांच्या मागोमाग निघाले. पण त्यांना पार करून पुढे जात असताना,  त्यांचे वय विचारावेसे मला कुतूहलापोटी वाटले. 
माझा प्रश्न ऐकल्यावर ते गृहस्थ हसून म्हणाले, " माझ्या वयाबाबत तुझा काय अंदाज आहे?"
" नव्वदी तर पार केलेली वाटतेय" 
"नव्वदी केंव्हाच पार झाली. मला  नुकतीच सत्त्याण्णव पूर्ण झाली आहेत!" 
मी चकित झाले. त्यांनी आपले नाव श्री. कन्सल असे सांगितले. पुढे त्यांची आणि माझी चांगली ओळख झाली. पहाटे आमची भेट झाली की गप्पाही होऊ लागल्या. एक प्रकारे मैत्रीच झाली म्हणा ना. आमच्या गप्पातून मला त्यांच्याबद्दल बरीच माहिती कळली. हे कन्सल आजोबा केंद्र सरकारच्या डिफेन्स अकाऊंट्स खात्यामध्ये जवळपास चाळीस वर्षे नोकरी करून वयाच्या साठाव्या वर्षी निवृत्त झालेले होते. जसजसे वय वाढत जाते तसतसे सरकारी निवृत्ती वेतनामधेही वाढ होत जाते आणि वयाची शंभरी पार केल्यानंतर पेन्शन दुप्पट होते, असे ते मला सांगायचे. आर्थिकदृष्ट्या मी कोणावरही अवलंबून नाही आणि कोणालाही माझे काही करावे लागत नाही, असे ते मला मोठ्या अभिमानाने सांगायचे.   

जनरल पोस्ट ऑफिसच्या बरोबर समोरच्या गल्लीतल्या एका इमारतीतील चौथ्या मजल्यावरच्या सदनिकेत ते राहत होते. त्यांच्या इमारतीला लिफ्ट नसल्यामुळे ते रोज सकाळी जिना उतरून एकटेच बाहेर पडायचे. तिथून सुमारे अर्धा किलोमीटर चालत जाऊन, परमार ट्रेड सेंटर नावाच्या इमारतीत रोज सकाळी सहाच्या सुमारास भरणाऱ्या सत्संगाला ते जायचे. साधू वासवानी चौकातला 'सर माणेकजी मेहता मार्ग', ते कोणाच्याही मदतीशिवाय पार करायचे. सातच्या सुमारास सत्संग संपल्यानंतर मात्र, त्यांचा पंच्याहत्तरीचा  मुलगा त्यांना घ्यायला यायचा. कारण त्यावेळेपर्यंत सर माणेकजी मेहता रस्त्यावरच्या वाढलेल्या रहदारीतून त्या वयोवृद्ध आजोबाना एकट्याने वाट काढणे अवघड पडत असावे. त्यानंतरही ते आपल्या मुलाबरोबर चालतच  परतून, चार जिने चढून आपल्या घरी जायचे. पुढे माझी त्यांच्या मुलाशीही ओळख झाली. त्यांच्या मुलाकडून मला अजूनच आश्चर्यकारक माहिती कळली होती. ते आजोबा रोज पुन्हा संध्याकाळी चार जिने उतरून, इमारतीच्या खाली वीस-पंचवीस मिनिटे चालायचे व परत जिने चढून वर जायचे.

पुढील दोन-तीन वर्षांनंतर हळू-हळू ते आजोबा मला सकाळी रस्त्यावर दिसेनासे झाले. पण त्यांच्या मुलाची आणि माझी कधीकधी भेट होत असे.  मुलाकडून आजोबांची खबर मला मिळत असे. शंभरी पार करेपर्यंत ते आजोबा दिवसातून दोन वेळा जिने उतरून इमारतीच्या खालच्या आवारात फिरायचे म्हणे. वयाची १०३ वर्षे पूर्ण झाल्यावर त्यांना कुठलाही त्रास न होता घरच्याघरी मृत्यू आला, असेही मला कळले. पण माझा हा मित्र शतायुषी झाल्यानंतर मात्र आमच्या भेटीचा योग कधी आला नाही.
 
भोर येथे स्थायिक असलेल्या, प्रोफेसर  विनय कुलकर्णी या माझ्या वर्गमित्राच्या वडिलांना, म्हणजे श्री. लक्ष्मण बाळाजी कुलकर्णी यांना १८ ऑक्टोबर २०२४ रोजी १०० वर्षे पूर्ण झाली. वडिलांच्या शताब्दीपूर्तीप्रीत्यर्थ प्रो. विनय कुलकर्णी यांनी भोर येथे एक मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. काही कारणाने आम्हाला त्या कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नव्हते. विनयशी आधी संपर्क साधून, रविवार दि. २७ ऑक्टोबर रोजी सकाळी मी आणि आनंद माझ्या वडिलांना घेऊन भोरला गेलो. माझ्या वडिलांना गेल्या महिन्यात ९१ वर्षे पूर्ण झाली. आता त्यांच्या समवयस्क व्यक्ती भेटणेही दुर्लभ झाले आहे. त्यामुळे, वयाची शंभरी पार केलेल्या व्यक्तीला भेटण्यासाठी माझे वडीलही उत्सुक होते. आम्ही प्रो. विनय कुलकर्णी यांच्या घरी पोहोचलो तर त्यांचे वडील आम्हाला भेटायला स्वतःहून उठून चालत बाहेर दिवाणखान्यात आले. आमचे नमस्कार स्वीकारून, त्यांनी हसतमुखाने आमची  विचारपूसही केली. आम्ही बोललेले त्यांना बऱ्यापैकी ऐकू येत होते. त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधणे शक्य झाले. श्री लक्ष्मण कुलकर्णी यांनी १९४३ -१९८२ या काळात भारत सरकारच्या तारखात्यामधे नोकरी केलेली होती. त्यापैकी पहिली सात वर्षे ते मुंबईमध्ये कार्यरत होते. १९५० पासून निवृत्त होईपर्यंत म्हणजे १९८२ सालापर्यंत ते सोलापुरात राहत होते. त्यांनी त्यांच्या सोलापुरातल्या वास्तव्याबद्दलच्या काही आठवणी सांगितल्या. माझ्या वडिलांचे सर्व आयुष्य सोलापुरातच गेलेले असल्याने त्या दोघांच्या काही ओळखीही निघाल्या आणि त्या दोघांच्या गप्पा होऊ शकल्या. 


श्री. लक्ष्मण कुलकर्णी उर्फ अण्णांच्या तब्येतीच्या काहीही तक्रारी नाहीत. मुलगा विनय त्यांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्थित काळजी घेतोच. परंतु, अंघोळ, कपडे बदलणे, जेवणे  इत्यादी आपापली कामे स्वतःच  करतात, आणि त्यासाठी त्यांना कोणाचीही मदत घ्यावी लागत नाही. इतकेच काय, विनयला कामानिमित्त दिवसभरासाठी बाहेर जावे लागले, तर ते एकटेच घरात राहतात, आपापले जेवायला वाढून घेतात, हे विशेष. आण्णा ठराविक आहार घेतात, जेवणा-खाण्याच्या वेळा सांभाळतात आणि अधेमधे काही खात-पीत नाहीत. १९८२ साली सेवानिवृत्त झाल्यावर आण्णांनी योगासनाचे शिक्षण घेतले. त्यानंतर आजतागायत ते न चुकता संध्याकाळी पाच वाजता त्यांच्या योगसाधनेला सुरुवात करतात. पूर्वी ते जवळपास तास-दीडतास योगासने करायचे. आता वयोमानापरत्वे तो वेळ थोडा कमी झाला आहे इतकेच. आम्ही संध्याकाळचा चहा घेत असताना , अण्णांची योगासनांची वेळ झाली.  बांधून ठेवलेली योगासनांच्या मॅटची गुंडाळी उघडून, त्यांनी ती जमिनीवर अंथरली. एखाद्या विशीतल्या तरुणाला लाजवेल अशा चपळाईने अण्णांनी योगासने करायला सुरुवात केली. अर्धा-पाऊण तास सर्वांगाला व्यायाम झाल्यावर त्यांनी जमिनीवर अंथरलेल्या मॅटची गुंडाळी बांधून जागेवर ठेवली. विनयच्या आणि अण्णांच्या परवानगीने मी त्यांची योगसाधना माझ्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपली. अण्णा नोकरीत असताना, भारतीय तारखात्याच्या विभागीय क्रिकेट संघाचे उपकप्तान होते.  त्या शिवाय ते टेबल टेनिस, बुद्धीबळही खेळायचे, हे विनयकडून आम्हाला समजले.

माझे सासरे, कै. भास्कर वेंकटेश बापट वयाच्या ९२ वर्षेपर्यंत जगले. ते तसे नाजूक चणीचे होते, आणि व्यायामाने कमावलेली अशी त्यांची शरीरयष्टी नव्हती. म्हणूनच, आपल्या दीर्घायुष्याबद्दल ते कधी-कधी स्वतःच आश्चर्य बोलून दाखवत असत. पण विशेषतः नव्वदी पार केल्यानंतर ते नेहमी म्हणायचे, "मी कधी काही व्यसन केले नाही, पोटाच्या वर कधीही जेवलो नाही, आयुष्यभर जेवणाच्या वेळा सांभाळल्या,  बाहेरचे खाणे टाळले आणि आयुष्यभर चालत-फिरत राहून आपापली कामे करत राहिलो. या पाच सूत्रांचे पालन केले म्हणून मी कदाचित दीर्घायुषी झालो असेन." 

अण्णांना भेटल्यानंतर मला माझ्या सासऱ्यांची आणि त्यांनी सांगितलेल्या त्या पाच सूत्रांची मला प्रकर्षाने आठवण झाली. अण्णांची भेट माझ्यासाठी आणि आनंदसाठी खूपच प्रेरणादायी होती. पण मुख्यत्वे माझ्या वडिलांमध्ये नवचैतन्य आल्यासारखे आम्हाला वाटले. भोरहून पुण्याला परत निघताना आम्ही सगळेच अण्णांच्या  पाया पडलो. दादा अण्णांच्या पाया पडताना म्हणाले, "मी शंभरी ओलांडली की पुन्हा भोरला येईन आणि तुमचे आशीर्वाद घेईन." दादांना आशीर्वाद देत आण्णा, " तथास्तु" म्हणाले! 

 
 

रविवार, ९ जून, २०२४

एज इज नॉट जस्ट अ नंबर !

आज एकसष्ठी पूर्ण झाली. मध्यरात्रीपासूनच अनेक मित्र-मत्रिणी,आप्तांच्या आणि माझ्या बालरुग्णांच्या पालकांच्या शुभेच्छांचा  नुसता पाऊस पडतोय. "आतातरी जरा तुझा बालिशपणा सोडून देऊन, जरा पोक्तपणे वागत जा" असा लाडिक सल्ला माझ्या काही 'हितचिंतकांनी' दिला. तर माझा एक वर्गमित्र फोनवर शुभेच्छा देत म्हणाला, "तुला  एकसष्ट वर्षे पूर्ण झाली? खरंच वाटत नाही. तुझ्या वयाचे आकडे उलटे केले तर १६ हा अंक येतो. परवाच तू तोरण्यासारखा अवघड किल्ला सर केलास. त्यामुळे मला तर तू अजून षोडशाच वाटतेस!" त्याचे ते बोलणे ऐकून मी मनोमन अगदी सुखावले होते. माझ्या काही मोठ्या भावंडानी, 'साठ प्लस' या गटामध्ये माझे मागच्या वर्षीच सहर्ष स्वागत केले होते. आयुष्यातला साठीचा महत्त्वाचा टप्पा ओलांडून, वर एक वर्ष उलटून गेल्यामुळे 'साठ प्लस' या गटामधले माझे स्थान पक्के झाले. माझ्या मोठ्या भावंडानी आणि आप्तस्वकीयांनी माझे हार्दिक अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या! पण आता यापुढे तब्येतीला जपायला  हवे असा प्रेमळ सल्ला दिला. माझ्या काही आत्या मावशा आणि काकूंनी, "अगंबाई मागच्याच वर्षी तू साठ वर्षांची झालीस नाही का? खरंच  वाटत नाही गं.  मला तर तू अजूनही अगदी फ्रॉक आणि दोन वेण्यातलीच अल्लड मुलगी आठवतेस!" 

एकूण काय? माझ्या मागच्या वर्षीच्या वाढदिवसाला बोलले तसेच या वर्षीही मला शुभेच्छा देणारे सर्वजण 'वय' या संकल्पनेच्या वेगवेगळ्या पैलूंबद्दलच बोलत होते. त्यामुळे व्यक्तीच्या वयाबद्दल किती वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू शकतात, याचा मला पुनःप्रत्यय आला. सर्वसाधारणपणे वय मोजताना आपण जन्मतारखेपासून किती वर्षे उलटली, इतका आणि इतकाच विचार करत असतो. पण वैद्यकीय परिभाषेमधे केवळ या वयाचा विचार न करता, वयाच्या वेगवेगळ्या पैलूंचा किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या वयाचाही विचार केला जातो. जन्मदिवसापासून आजतागायत जो काळ उलटून गेला आहे त्याला आम्ही Chronological Age म्हणतो. ते महत्त्वाचे असतेच. पण बुद्ध्यांक काढण्यासाठी Mental Age हे खूप महत्त्वाचे ठरते. म्हणजे एखाद्या ठराविक वयाच्या मुला-मुलीच्या मेंदूची वाढ आणि प्रगल्भता, त्यांच्याच वयाच्या इतर मुला-मुलींच्या मेंदूइतकी झाली आहे की नाही, यावर त्या मुला-मुलीचे Mental Age ठरते. Mental Age हे Chronological age च्यापेक्षा बरेच कमी असेल तर त्या व्यक्तीला मतिमंद म्हटले जाते. Mental Age हे Chronological age च्या बरोबरीचे असेल तर  त्या व्यक्त्तीचा बुद्ध्यांक १०० असतो. Mental age हे Chronological Age च्या पेक्षा जास्त असणे, अर्थात तुमचा बुद्ध्यांक जास्त असणे, हे कधीही चांगले समजले जाते.  

कायद्याच्या परिभाषेमधे Legal Age ला खूपच महत्त्व असते. लग्न करणे, मतदानाचा हक्क मिळणे अशा अनेक गोष्टींसाठी Legal Age लक्षात घेतले जाते. वयाची १८ वर्षे पूर्ण झालेली नसल्यास, त्या व्यक्तीला भारतीय कायद्याच्या नजरेमध्ये 'अल्पवयीन' समजले जाते. 'अल्पवयीन' वयोगटासाठीचे कायदे, त्यांच्यातील गुन्हेगारांना मिळणाऱ्या शिक्षा वेगळ्या असतात. अशा अल्पवयीन व्यक्तींना कायद्याने काही विशेष हक्कही दिले गेलेले आहेत. हे हक्क, व हे कायदे बालकांच्या सुरक्षिततेसाठी खूपच महत्त्वाचे आहेत. काही दिवसांपूर्वी, साडेसतरा वर्षे वयाच्या एका मुलाकडून  पुण्यात घडलेल्या एका मोठ्या अपघातानंतर, Legal Age वर खूप उहापोह झाला. असाच उहापोह 'निर्भया' हत्याकांडाच्यावेळीही झाला होता. बाल न्याय अधिनियमातील तरतुदींनुसार, वय वर्षे १६ ते १८ च्या दरम्यानच्या कुणा व्यक्तीने एखादा जघन्य अपराध केल्यास, त्या व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक स्थितीचे तज्ज्ञांद्वारे मूल्यमापन केले जाते. सदर गुन्हा करण्याकरिता व त्याचे परिणाम जाणण्यासाठी ती व्यक्ती सक्षम असल्याचा निर्वाळा तज्ज्ञांनी दिल्यास त्या व्यक्तीला कायद्याच्या दृष्टीने 'प्रौढ' मानून खटला चालवला जाऊ शकतो व तिला कठोर शिक्षा होऊ शकते.   

एखाद्या व्यक्तीच्या प्रत्यक्ष वयाच्या मानाने,  तिच्या शारीरिक अवयवांचे वय किती आहे? म्हणजेच एखाद्या व्यक्तीचे अवयव त्याच वयाच्या इतर व्यक्तींच्या अवयवाच्या मानाने कितपत सक्षमपणे काम करू शकत आहेत यावरून त्या व्यक्तीचे Biological Age ठरते. आपला आहार, आपल्या आरोग्यपूर्ण सवयी, आपली जीवनशैली, आपली अनुवांशिकता अशा अनेक घटकांवर आपले Biological age अवलंबून असते. आपल्या Chronological Age च्या मानाने शरीर कमी थकलेले असेल तर आपले Biological Age कमी आहे असे म्हटले जाते, व ते कमी असणे वैद्यकीय दृष्ट्या त्या व्यक्तीच्या दीर्घायुरोग्यासाठी उत्तम असते. अशा व्यक्ती वयोवृद्ध होईपर्यंत कार्यक्षण आणि कार्यरत राहू शकतात. त्यामुळे, कोणालाही आपल्या Chronological Age च्या मानाने आपले Biological Age कमी असावे असे वाटणे सहाजिकच आहे.

जीवनातल्या वेगवेगळ्या  परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी, एखादी व्यक्ती तिच्याच वयाच्या इतर व्यक्तींच्या मानाने,  मानसिक दृष्ट्या किती सक्षम आहे, यावर त्या व्यक्तीचे Psychological Age ठरते. वयाच्या मानाने Psychological Age जास्त असलेल्या व्यक्ती, तिच्या वयोगटातील इतर व्यक्तींच्या मानाने नवनवीन आव्हानांना सहजी तोंड देऊ शकतात, जास्त उत्साही असतात, नवीन कौशल्ये लवकर आत्मसात करू शकतात, नवीन व्यवसाय किंवा नोकरीमध्ये लवकर आणि सहजी रुळू शकतात किंवा अगदी नवीन विषय व अभ्यासक्रम सहजी पूर्ण करू शकतात. अशा व्यक्तींच्या व्यक्तिमत्वामध्ये एकप्रकारची लवचिकता असते. म्हणजेच, Chronological Age च्या मानाने Psychological Age जास्त असणे चांगलेच म्हणायचे!

प्रत्येक वयोगटातील व्यक्तीकडून एखाद्या संस्कृतीतील सामाजिक नियमानुसार काही ठराविक वर्तनाची अपेक्षा असते. यामध्ये आपली कौटुंबिक व सामाजिक कर्तव्ये पार पाडणे, आपले शिक्षण वेळेवर पूर्ण करणे, अशा गोष्टींचा समावेश असतो. एखादी व्यक्ती, आपल्या वयोगटातील इतर व्यक्तींच्या मानाने स्वतःच्या सामाजिक जबाबदाऱ्या किती सहजी आणि समर्थपणे पार पडते, यावर त्या व्यक्तीचे Social Age अवलंबून असते. म्हणजेच  Chronological Age च्या मानाने Social Age जास्त असणे, कधीही चांगलेच समजले जाते. 

थोडक्यात काय? आपल्या Chronological Age च्या मानाने आपले mental age, Psychological Age आणि Social Age जास्त असणे,  परंतु Biological Age कमी असणे हे सर्वोत्तम! 

म्हणूनच मी म्हणते, "एज इज नॉट जस्ट अ नंबर!"

रविवार, २६ मे, २०२४

प्रेरणादायी तोरणा सहल!

या वर्षी एप्रिल-मे महिन्यांतल्या उकाड्यामुळे फारच हैराण व्हायला झाले होते. दोन-तीन दिवस महाबळेश्वरला जायचे पक्के केले होते. पण तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वेल्हे गावातल्या एका रिसॉर्टबद्दल समाजमाध्यमात आलेली एक पोस्ट वाचली आणि तिकडे जावे असे अचानक मनात आले. आम्ही दोघे, माझे वडील दादा, माझा आतेभाऊ राजीव, आणि माझे सोलापूरस्थित काका, श्री. हरि गोडबोले आणि सौ. प्रियंवदाकाकू अशा सहाजणांनी जायचे ठरवले. 

आम्ही चौघे पुण्याहून आणि काका-काकू सोलापूरहून, पहिल्या दिवशी दुपारी १२ वाजेपर्यंत पोहोचलो. त्या रिसॉर्टमधून अगदी समोरच तोरणा दुर्ग दिसत होता. वामकुक्षीनंतर चहासाठी म्हणून बागेमध्ये बसलो असताना विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरु झाला. काही क्षणांतच समोरचा तोरणा दुर्ग ढगांच्या आणि धुक्याच्या आड दिसेनासा झाला. सगळ्या परिसरातील दिवे गेलेले असल्याने, बाहेरच पण जरा आडोश्याला बसून  रिसॉर्टच्या मालकांशी मनसोक्त गप्पा झाल्या. तोरणा चढायला आणि उतरायला किती वेळ लागतो, गाडी कुठपर्यंत जाऊ शकते, ही माहिती त्यांच्याकडून समजली. दुसऱ्या दिवशी पहाटे उठून गडावर जायचे, असे मी, आनंद व राजीवने फारसा विचार न करता ठरवूनच टाकले. सहलीला निघण्यापूर्वी, तोरणा गडाबाबत काहीही वाचलेले नव्हते किंवा गड चढायचा विचारही केलेला नव्हता हे विशेष.

पहाटे साडेपाच वाजता रिसॉर्टमधून आमच्या गाडीने निघून, आम्ही तिघे तोरणा गडाच्या पायथ्याशी  पोहोचलो. आम्ही बरोब्बर पावणेसहा वाजता चढायला सुरुवात केली. आदल्या दिवशीच्या मुसळधार पावसामुळे वाटेवरची खडी चढण निसरडी झाली होती. त्यावेळी आमच्याशिवाय तिथे कोणीही नव्हते. आम्ही slow but steady अशा पद्धतीने, कुठेही न थांबता सतत चढत राहिलो. साधारण वर्षभरापूर्वी आनंदला हार्ट अटॅक येऊन त्याची  दोनवेळा angioplasty झालेली असल्यामुळे, माझ्या मनामध्ये जरा धाकधूक होती. पण मी ती कोणाजवळही बोलून दाखवलेली नव्हती. किल्ला चढायला लागल्यानंतर माझीच इतकी दमछाक होत होती की काही बोलायला माझ्या तोंडातून शब्द फुटत नव्हता, हे वेगळेच. माझ्या शरीरातला 'अतिरिक्त' भार पेलत चढणे, हे मोठे जिकिरीचे काम होते. त्या मानाने राजीव आणि आनंदला कमी कष्ट पडत होते. जरूर पडेल तेंव्हा ते दोघे मला हातही देत होते. 

अर्धी चढण चढून आम्ही आलो असू तेंव्हा आमच्या मागून काही कोवळी मुले आरडा-ओरडा करत, एकमेकांची चेष्टा करत, गाणी म्हणत, ठिकठिकाणी सेल्फ्या काढत वर येताना दिसली. ती मुले अगदी लीलया वर चढत होती. नुकतीच दहावीची परीक्षा देऊन आलेली जेमतेम सोळा-सतरा वर्षांची ही मुले, हातकणंगल्याहून आली होती. त्यांचे ते सरसर गड चढणे पाहून, त्यांच्यामध्ये मला सोळा-सतरा वर्षे वयाचे शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळेच दिसू लागले. त्या कोवळ्या वयात, शिवरायांसारख्या द्रष्ट्या महापुरुषाने स्वराज्याचे स्वप्न पाहिले, इतर समवयस्क मुलांना प्रेरित केले, हा किल्ला जिकंण्याची मोहीम आखली आणि ती यशस्वीरीत्या पारदेखील पाडली, हे सगळेच आज आपल्यासाठी आश्चर्यकारक, अभिमानास्पद आणि प्रेरणादायी आहे. 

तोरणा हा पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच दुर्ग आहे. आम्ही दोन तासात गडावर पोहोचलो. तिथे थोडेफार फिरून, काही फोटो काढून आणि सभोवतालचे नयनरम्य दृश्य डोळ्यामध्ये साठवून आम्ही खाली उतरायला लागलो. त्या वेळी, वीस ते तीस वयोगटातले अनेकजण गड चढताना आम्हाला दिसत होते. बुद्धपौर्णिमेची सुट्टी असल्याने पुण्याहून आलेली कॉलेजची मुले, बँकेतील कर्मचारी, अंत्रोळीहून आलेल्या काही मुली अशी तरुणाई भेटल्यामुळे खूप छान वाटले. पुण्यातील एका कॉलेजचा गट तर चक्क हातात शिवरायांचा जरीपटका घेऊन वर येताना दिसला. त्यांना थांबवून, त्यांच्याबरोबर फोटो काढून घ्यायचा मोह आवरता आला नाही. आजच्या तरुण पिढीला इतक्या वर्षानंतरही शिवरायांचा प्रताप प्रेरणादायी ठरत आहे, हे विशेष.  

वेल्हे गावाजवळच, मढे घाटातला लक्ष्मी धबधबा अतिशय प्रेक्षणीय आहे, असे आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी अचानकच समजले. तो बघायला म्हणून, सकाळी साडेसातच्या सुमारास गाडीने बाहेर पडलो. अर्थात भर उन्हाळ्यात आम्हाला धबधबा बघायला मिळणार नव्हताच. वाटेवर गुंजवणी धरणाचा बंधारा आणि भट्टी वाघदरा, केळद वगैरे गावे लागली. वेल्हे गावातून सोळा किलोमीटर, वळणावळणाचा घाटरस्ता पार करून आम्ही धबधब्यापर्यंत पोहोचलो. बराचसा रस्ता निर्मनुष्य होता. ज्या मोकळ्या पठारावरून खाली धबधबा दिसतो, त्या जागेजवळ आम्ही पोहोचलो. सर्वत्र धुक्याचे साम्राज्य होते. अचानक काही लोकांचा बोलण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. पुढे जाऊन पहिले तो, पाच-सहा पुरुषमंडळींनी पठारावरच्या मोकळ्या जागेत लहान-लहान तंबू ठोकून रात्रभर मुक्काम केला होता, असे समजले. त्यांच्यासोबतच्या गप्पांमधून बरीच माहिती मिळाली. केळद गावामध्ये तंबू भाड्याने मिळतात, असेही समजले. पुण्याच्या अभिनव स्थापत्य महाविद्यालयातील प्राध्यापक, श्री. अतुल भागवत नामक अवलियाबरोबर त्यांचे एक-दोन नातेवाईक व मित्र, खास पौर्णिमेच्या रात्री मुक्कामाला तेथे आलेले होते. प्रा. भागवत यांना अवलिया म्हणण्याचे कारण असे की, दर पौर्णिमेच्या रात्री, ते इथे येऊन मुक्काम करतात, कधी नातेवाईक अथवा मित्रकंपूसोबत, तर कधी एकटेच! हे ऐकून आम्हाला अगदी अवाक व्हायला झाले. सरांकडे स्वतःचे दोन तंबूदेखील आहेत. आमच्या परतीच्या  वाटेवर, केळद गावातली देवराई बघून जायचा सल्ला भागवत सरांनीच आम्हाला दिला. 

देवराईची संकल्पना, पावित्र्य आणि त्यामागची गावकऱ्यांची भावना याबाबत आम्हाला पूर्वकल्पना असली, तरीही प्रत्यक्ष देवराईला भेट देण्याचा अनुभव खूपच सुखद होता. ही देवराई तशी छोटीशीच आहे. देवळाभोवती, वर्षानुवर्षे  गावकऱ्यांनी आपुलकीने जतन केलेली झाडे बघून भारावून जायला झाले. आम्ही वाटेवर पाहिलेल्या भट्टी वाघदरा या गावामधे, लोखंड वितळवून शस्त्रास्त्रे बनवण्याची शिवकालीन भट्टी आहे, अशी माहिती आम्हाला नंतर एका मित्राकडून कळली. पण ती माहिती कळेपर्यंत आम्ही वेल्ह्याला पोहोचलो होतो. त्यामुळे ही भट्टी बघायच्या निमित्ताने, पुन्हा या परिसराला भेट द्यायचे आम्ही मनाशी ठरवले. 

दोन दिवसांची आमची ही छोटीशीच सहल अनेक कारणांमुळे अविस्मरणीय झाली. 

काहीही न ठरवता आणि माहिती न घेता गेलेलो असूनही आम्ही तोरणा किल्ला चढलो. किल्ल्याची चढण बरीच अवघड आहे, हे आधी कळले असते तर माझ्याच मनाने कदाचित कच खाल्ली असती! कारण, मागच्या वर्षी, १२ जून २०२३ रोजी आनंदला हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. त्याच्या हृदयाच्या डाव्या बाजूच्या एका मोठ्या रक्तवाहिनीमध्ये तयार झालेल्या गुठळीमुळे ती रक्तवाहिनी पूर्णपणे बंद झाली होती. (१००% ब्लॉक). त्यावेळी 'इमर्जन्सी अँजिओप्लास्टी' द्वारे ती गुठळी काढून स्टेंट बसवावा लागला होता. त्याच वेळी त्याच्या हृदयाची आणखी एक मोठी रक्तवाहिनी ७० ते ८०% बंद असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले होते. पण तो अत्यवस्थ असल्याने, दुसरी अँजिओप्लास्टी लगेच न करता, ९ ऑक्टोबर २०२३ रोजी केली गेली. आमच्या तोरणा मोहिमेमधे आनंदच्या हृदयाच्या क्षमतेचा कस लागला, आणि मोहीम यशस्वी झाल्यामुळे आमचा आत्मविश्वासही वाढला. 

अनेक तरुण-तरुणी, नुसते लोळत सुट्टी न घालवता, किल्ला चढायला आलेले बघूनही आम्हाला खूप कौतुक वाटले. किल्ल्याची अवघड चढण चढताना, "शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप.. .." हे शब्द मनामध्ये घोळत होते. प्रा. अतुल भागवतांच्या भटकंतीच्या कथा ऐकून मी अगदी भारावून गेले. 

एकूण काय, तर शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या उत्तुंग, 'प्रचंडगड', अर्थात तोरणा गडाला भेट देऊन मला नवीन ऊर्जा तर मिळालीच, पण तिथली शुद्ध हवा पिऊन, आणि पक्ष्यांचे मंजुळ गान ऐकून, प्रसन्न मनाने आम्ही पुण्याला परतलो.        

सोमवार, ६ मे, २०२४

कर्णफुलांच्या गोष्टी!

त्या दिवशी जोरजोरात सायकल चालवत, मी कशीबशी कॉलेजमधे वेळेत पोहोचले होते. पहिला तास सुरू व्हायला जेमतेम एक-दोन मिनिटे बाकी होती. आम्ही मैत्रिणी वर्गात शिरून बाकांवर बसत असतानाच माझी एक मैत्रीण माझ्याकडे बघून हासत-हासत उद्गारली,
"स्वाती, काय गं हे? एकाच कानात रिंग घातली आहेस. दुसऱ्या कानातली रिंग घालायला विसरलीस की काय?"
मी चपापून दोन्ही कानांना हात लावला, तर काय? खरोखर फक्त एकाच कानात रिंग होती. तितक्यातच आमचे प्राध्यापक वर्गात शिरले आणि त्यांनी  तास चालू केला. 

माझी छाती धडधडायला लागली. सकाळी घरातून निघताना, दोन्ही कानामधे सोन्याच्या रिंग्ज घातल्याचे मला निश्चित आठवत होते. पण मग एक रिंग गेली तरी कुठे? सरांच्या शिकवण्याकडे माझे लक्षच लागेना. आता घरी गेल्यावर कुणाकुणाची, किती आणि काय-काय बोलणी खावी लागतील, या विचाराने मी भलतीच अस्वस्थ झाले. ती  रिंग वाटेत कुठे पडली असेल का? पडली असली तर कुठे? माझ्या मनांमध्ये सगळ्या उलट-सुलट विचारांनी जणू रिंगणच धरले. 
सरांचा तास संपेपर्यंत मी कशीबशी कळ काढली. सर बाहेर पडल्याबरोबर, मीही तडक वर्गाच्या बाहेर पडून  सायकल  मारत घराच्या दिशेने निघाले. पण घरापर्यंत न जाता, काहीतरी विचाराने वाटेतच एके ठिकाणी मी थांबले. तिथेच खाली बसून, वेड्यासारखी तिथल्या धुळीमध्ये हात फिरवत मी शोधू लागले. आणि आश्चर्य म्हणजे त्या धुळीत माझी सोन्याची रिंग चकाकताना मला दिसली! माझा जीव भांडयात पडला. मी ती रिंग उचलून कानात घातली  आणि पुन्हा सायकल पळवत  कॉलेजात येऊन पोहोचले!

त्याचे असे झाले होते की, मी घरातून बाहेर पडताना माझा 'एप्रन' बॅगमध्ये ठेवला होता. सायकलवर कॉलेजला निघणार तेवढ्यात लक्षात आले की सायकलमध्ये हवा अगदीच कमी आहे. म्हणून मग सायकल हातात धरून चालत जवळच्या सायकलवाल्याकडे गेले. सायकलमध्ये हवा भरायला थांबलोच आहोत तर, नंतरचा वेळ वाचावा म्हणून, बॅगमधला एप्रन बाहेर काढून मी गडबडीत अंगावर चढवला. हे सगळे मला आठवत होते.  कदाचित एप्रन घालताना ती रिंग माझ्या कानातून निसटून खाली पडली असेल ही एक शक्यता होती. म्हणून मी तिथे शोधू लागले आणि खरोखरच तसे झाले असल्याने ती रिंग मला मिळाली.
 

तुम्ही म्हणाल, आज इतक्या वर्षानंतर ही गोष्ट सांगण्याचे काय कारण? ते कारणदेखील कर्णफुले हरवण्याच्या अलीकडच्या काही घटनांबाबतीतले आहे.  परंतु, ते माझ्या कर्णफुलांचे नाही आणि ती कर्णफुलेही एका वेगळ्याच प्रकारची आहेत! 

नव्वदी पार केलेल्या माझ्या वडिलांनी, आमच्या आग्रहाखातर, चार-पाच वर्षांपूर्वी, त्यांच्या दोन्ही कानांसाठी मशिन्स  (hearing aid) विकत घेतली. अतिशय चांगल्या प्रतीची व नवीन तंत्रज्ञान वापरून बनवलेली ती यंत्रे बऱ्यापैकी महाग होती. एकेका कानाचे मशीन जवळपास लाख-लाख रुपयाचे होते. त्यांच्या या कानाच्या मशीन्सबद्दल, आम्ही गमतीनेच, "दादा, ही तुमची कर्णफुले आहेत", असे म्हणतो. आणि ही मौल्यवान कर्णफुले  माझ्या वडिलांकडून अनेक वेळा आणि वेगवेगळ्या प्रकारे गहाळ होत राहतात. 
चाळीस वर्षांपूर्वी माझ्या कानातली रिंग गायब झाली होती, तेंव्हा मी वडीलधाऱ्यांच्या भीतीने कावरी-बावरी झाले होते. गंमत म्हणजे आज वडिलांची कर्णफुले गहाळ झाली की, माझ्या धाकाने ते कावरेबावरे होतात!

वडिलांची दोन्ही मशिन्स एकाचवेळी दिसेनाशी झाली की आम्हाला जवळजवळ खात्रीच असते की त्यांनी ती नेहमीच्या जागी न ठेवता दुसरीकडे कुठेतरी ठेवली असणार. थोडी शोधाशोध केली की ती सापडतात. पण एकच मशीन गायब झाले तर मात्र फारच मोठे शोधकार्य हाती घ्यावे लागते. 
कुठल्यातरी शर्टाच्या किंवा पॅन्टच्या खिशात, कधी बाथरूममध्ये, कधी खुर्ची किंवा सोफ्याच्या सीटखाली, तर कधी चष्म्याच्या केसमध्ये, अशा वेगवेगळ्या आणि अकल्पनीय जागी आम्हाला ते कर्णफूल सापडते. 

एकदा असेच, त्यांचे एकाच मशीन दिसेनासे झाले. आम्ही सगळे घर उलथे -पालथे केले. त्यांची खोली दोन-दोनदा झाडून काढली. अगदी कपाटे आणि टेबलाखालूनही झाडू फिरवला. पण मशीन काही सापडले नाही. त्या दिवशी वडिलांनी त्यांचे कपाट आवरले होते. त्या आवरा-आवरीनंतर बराच सुका कचरा फेकून दिल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले. काहीच मिनिटांपूर्वी आमच्या इमारतीत कचरा गोळा करायला येणाऱ्या बाईला, आमच्या घरातला सगळा सुका कचरा आम्ही दिला होता. मशीन कचऱ्यात गेले असेल तर तिला शोधायला सांगावे म्हणून गडबडीने तिला फोन केला. तर ती म्हणाली, "अवो, आत्ताच तर सगळा कचरा महानगरपालिकेच्या गाडीवाल्याला दिला की!"
 
मग काय? आम्ही महानगरपालिकेच्या कचरा संकलन करणाऱ्या गाडीचा माग काढत-काढत गेलो. बरेच लांब गेल्यावर एका सोसायटीच्या बाहेर ती गाडी दिसली. त्या गाडीवरचा असंख्य पोत्यामधून, आमच्या इमारतीतील पोते आम्ही अंदाजाने शोधून काढले. ते पोते उलटे करून बघितले. पण त्या पोत्यामध्ये ते मशीन काही सापडले नाही. 

हताश होऊन आणि काहीसे वैतागून आम्ही घरी परत आलो. मशीन शोधण्याच्या नादात, घरात बराच पसाराही आम्ही करून ठेवला होता. तो आवरण्याचे  काम होतेच. माझे वडील तोंड पाडून, एका कोपऱ्यात बसून होते. आपल्यामुळे आपल्या मुलीला आणि जावयाला त्रास सहन करावा लागतोय, अशी कमालीची अपराधीपणाची भावना त्यांच्या चेहऱ्यावर होती. आम्ही दोघांनी त्यांना धीर दिला. आजच नवीन मशीन घेऊन टाकूया असे सांगितले आणि घरातला पसारा आवरायला लागलो. आवरून झाल्यावर जरा नीट स्वच्छता करावी या हेतूने वडलांच्या खोलीतले टेबल पुढे ओढून त्यामागून व त्याखालूनही पुन्हा झाडून घेतले. टेबल भिंतीकडे सरकवत असतांना, टेबलाच्या मागच्या पट्टीला ते मशीन अडकून, लटकलेल्या अवस्थेत दिसले! 

आम्हाला सर्वांनाच काय आनंद झालाय म्हणून सांगू!

त्याच कर्णफुलाची काल संध्याकाळी घडलेली गोष्ट. 
वडिलांच्या एका कानातले मशीन जरा विचित्रपणे बाहेर आल्याचे मला जाणवले. पाहते तर काय, कानाच्या मागे बसणार मशीनचा मुख्य भाग व्यवस्थित होता, पण कानाच्या आत जाणारा छोटा रिसीव्हर मात्र गायब झालेला दिसत होता. पुन्हा घर झाडणे, गाद्या उलट्या-पालट्या करणे, चादरी झटकणे, ठिकठिकाणी शोधाशोध करणे हे सगळे सोपस्कार झाले. पण तो तुकडा काही मिळेना. सहज माझ्या डोक्यात काहीतरी आले. मोबाईलच्या टॉर्चने, वडिलांच्या कानाच्या आत प्रकाशझोत टाकला, तर काय? तो तुकडा तुटून, त्यांच्या कर्णनलिकेच्या (Auditory  Canal) बराच आत रुतून बसलेला दिसला! मग सर्जिकल चिमट्याच्या साहाय्याने, आम्ही तो मोठ्या खुबीने बाहेर काढला.

 
कर्णफुले हरवण्याच्या आणि गवसण्याच्या या काही गमतीदार गोष्टी षट्कर्णी व्हाव्यात यासाठीच हा लेख!

रविवार, ५ मे, २०२४

जागतिक हास्यदिन?


आज सकाळी नेहमीप्रमाणेच फिरायला गेले होते. तिथे ठिकठिकाणी घोळक्यामधे उभे राहून काही मंडळी जोरजोरात हासताना दिसली. तशी ती मंडळी नेहमीच हासतात. पण आज जास्त जोरात हासत होती! समाजमाध्यमांतून आज 'जागतिक हास्यदिन' असल्याचे कळले आणि मला हासायलाच आले.





अमेरिकन लोकांनी mother's day आणि father's day साजरा करायला आपल्याला शिकवले. खरंतर आई-वडिलांवर प्रेम करायला, त्यांच्या ऋणांची उतराई करायला एखादा दिवस राखून ठेवण्याची कल्पना सुद्धा मला हास्यास्पद वाटते. पण डॉकटर मदन कटारिया, या एका भारतीय डॉक्टरने जगाला 'हास्यदिन' साजरा करायला शिकवले, हे वाचून कुठेतरी बरे वाटले. मे महिन्याच्या पहिल्या रविवारी, उकाड्याने हैराण झालेलो असतानाही 'हास्यदिन' साजरा करायच्या निमित्ताने लोकं जोरजोरात हसायला लावणे, हे खरोखरच कौतुकास्पद आहे!

सध्या निवडणुकीचे वारे चालू असल्याने आपल्या सर्वांना नेतेमंडळी हासण्याची भरपूर संधी देत आहेत. समाजमाध्यमामधून नेत्यांवर किंवा राजकीय पक्षांवर होणाऱ्या टिप्पण्या, कविता, मिम्स आपल्याला सात हसवत राहत आहेत. 

पण खरं सांगा  हासायला आपल्याला काही कारण लागते का?

सकाळी बरेचदा फिरायला बाहेर पडते तिथे काही व्यक्ती वरचेवर भेटतात. अशा व्यक्ती कधीकधी माझ्याकडे बघून हासतात. कधी मी अशा व्यक्तींकडे बघून मी हासते. मी त्यांच्या हास्याचे आणि ते माझ्या हास्याचे, हासून स्वागत करतो. आमची अगदी छोटीशी 'हास्यमैत्री' होते. ती मैत्री जवळपास नि:शब्द असते. परस्परांकडे बघून हासण्यापेक्षा ती फार पुढे जाते असे नाही. पण रोज असे हासरे चेहरे मनाला आनंद देऊन जातात, हे मात्र खरे.

सिग्नल नसलेल्या रस्त्यावर, एखादा वाहनधारक आपल्या कडे बघत, सुहास्य करत आपल्याला त्याच्या किंवा तिच्याआधी जाण्याची खूण करतो. कधीकधी आपणही असे हासून  दुसऱ्याला आपल्या आधी जाण्याचा इशारा करतो. भर रहदारीच्या रस्त्यावर, आपण कातावलेले असताना हे हास्य दोन्ही पक्षांना सुखद वाटते.

व्हॉट्सअप, फेसबुक, इंन्टाग्रॅम मुळे तर क्षणाक्षणाला हास्याची कारंजी उडत असतात. त्या पोस्ट वाचून/ऐकून/बघून आपण प्रत्यक्षात हासतोच पण पोस्टकर्त्याला स्माईलींची बरसात करून 'हास्यपावती' पाठवतो.

थोडक्यात काय? दिवसभर अनेक कारणांमुळे मी हासतच असते. हास्यदिन साजरा करायला काही हरकत नाही. पण प्रत्येक दिन हा 'हास्यदिन' समजून साजरा करत राहायला काय हरकत आहे?

 डॉक्टर स्वाती बापट, पुणे

रविवार, ७ एप्रिल, २०२४

अलगद झेलणे...

आज पहाटे आमच्या घराजवळच्या आर्मी सब एरियाच्या मैदानामध्ये फिरायला गेले होते. तिथे चालण्यासाठी एक छोटाच पण अगदी छानसा सिन्थेटिक ट्रॅक केलेला आहे. त्या मैदानाच्या आवारात खूप जुनी, मोठमोठालीं झाडे आहेत. त्या झाडांची सावली वॉकिंग ट्रॅकवर पडते. तसेच त्या झाडांवर तऱ्हेतऱ्हेचे पक्षी किलबिल करत असतात.  वॉकिंग ट्रॅकच्या कडेकडेने रंगीबेरंगी फुलांची झुडपे लावलेली आहेत. एकूणच, या सर्व वातावरणात चालणे अतिशय आनंददायी असते.  

आज चालताना ट्रॅकच्या बाजूच्या हिरव्यागार झुडुपावर (Calyptocarpus Vialias) लक्ष गेले. वसंत ऋतूमध्ये या झुडुपावर अतिशय नाजूक अशी पिवळी धमक्क फुले येतात. गर्द हिरव्या पानांच्या मखमली पार्श्वभूमीवर ती पिवळी फुले उठून दिसतात. ते बघायला मला खूप आवडते. आज, नेहमीच्या फुलांबरोबरच, पण या झुडुपाच्या फुलांपेक्षा वेगळ्या आकाराची लहान-मोठी अनेक पिवळी फुले या झुडुपावर मला दिसली. मी जरा निरखून बघितल्यावर, ती फुले या झुडुपाची नसून, शेजारी असलेल्या पिवळ्या गुलमोहोराची (Peltophorum Petrocarpum) फुले आहेत असे लक्षात आले. त्या झाडाची फुले गळून खाली असलेल्या या हिरव्या झुडुपावर पडलेली होती. या झुडुपाने, जणू आपलीच फुले असल्यासारखी पिवळ्या गुलमोहराची ती फुले आपल्या अंगाखांद्यावर अलगद झेललेली होती. ते बघून मला, माझ्या लहानपणीची एक गोष्ट आठवली.  

पूर्वीच्या काळी उन्हाळ्याच्या सुट्टीत मुले अगदी हक्काने मामाच्या घरी जात. मामा-मामीची तीन-चार मुले आणि पाहुणे म्हणून आजोळी आलेली पाच-सहा भाचरंडे अगदी गुण्यागोविंदाने तिथे नांदत. स्वतःच्या मुलांमध्ये आणि नणंदांच्या मुलांमध्ये कुठलाही भेदभाव न करता, आमच्या माम्या सर्व मुलांना प्रेमाने खाऊ-पिऊ घालायच्या, त्यांचे रुसवे-फुगवे काढायच्या आणि त्यांचे अमाप लाड करायच्या. त्यामुळेच आमच्या पिढीतल्या सर्वच मुलांचा 'मामी' हा एक जिव्हाळ्याचा विषय असायचा. आजोळी एकत्र जमलेले ते लेंढार आनंदाने आणि अलगद 'झेलणाऱ्या' त्या माऊल्या खरोखर कौतुकाला पात्र होत्या! 

एखाद्या प्रसंगाला, किंवा व्यक्तीला 'झेलणे' या उक्तीमधे जरासा नकारात्मक भाव आहे.पण 'अलगद झेलणे' असं म्हटलं की त्या उक्तीला एक सकारात्मकता येते. आजकालची अनेक मुले लग्नच करायला नको म्हणतात. बरं, लग्न केलेच तर आम्हाला मूल नकोच आहे, एकापेक्षा जास्त तर नकोच नको, अशीच विचारसरणी हल्ली होत चालली आहे. आमच्या नंतरच्या पिढीतली कित्येक नाती आधीच हद्दपार होऊन गेली आहेत. आता तर काय? दर घरटी फक्त एकच मूल असल्याने मुलांना भावंडंच नसतात. त्यामुळे त्यापुढच्या पिढीत सख्खा मामा, मावशी, काका आत्या ही नाती नाहीत मग आते, मामे, चुलत आणि मावस भावंडे कुठून असणार? 

आजोळी जाणे, मामा-मामीच्या अंगाखांद्यावर अलगद खेळणे, मामीशी गुळपीठ असणे आणि हितगुज करणे  या सगळ्या गोष्टींना भावी पिढीला मुकावे लागणार आहे. आपला संपूर्ण समाज कुठेतरी निसर्ग-नियमाच्या विरोधात चालला आहे असं मला वाटतं. पटतंय का तुम्हाला?



        

बुधवार, २० मार्च, २०२४

चिमणी पाहावी शोधून!

आज २० मार्च, म्हणजे जागतिक चिमणी दिवस. 

वळचणीला बसलेल्या आणि सर्वत्र चिवचिवाट करत असलेल्या असंख्य चिमण्या मी लहानपणी पहिल्या होत्या. आज चिमणीचे दर्शन केवळ स्वप्नांमधेच होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र या दुर्लक्षित पक्ष्यासाठी पुढे कधीतरी एखादा 'जागतिक दिवस' राखून ठेवला जाईल असे लहानपणी मला स्वप्नातदेखील वाटले नव्हते.  

रोजच्याप्रमाणेच आजही सकाळपासून दिवसभर व्हाट्सऍपवर केवळ चिवचिवाटच चालू होता. त्यामध्ये 'चिमणी' या विषयावरचे बरेच लेख, कविता आणि विनोदही होते. आमच्या शाळेतल्या एका शिक्षिकेचे टोपणनाव विद्यार्थ्यांनी 'चिमणी' असे ठेवले होते. आमच्या शाळेच्या व्हाट्सऍप ग्रुपवर एका वात्रट विद्यार्थ्याने आज त्या 'चिमणाबाईंची' सुध्दा आवर्जून आठवण काढली! पण गेले काही दिवस माझ्या मनामध्ये मात्र एक वेगळीच चिमणी चिवचिवत होती. आजच्या या 'जागतिक चिमणी दिनाचे' औचित्य साधून, त्या चिमणीवर एक लेख लिहून काढायचा मोह मला आवरला नाही!


आमच्या घराचे नूतनीकरण करण्याचा धाडसी निर्णय आम्ही नुकताच अमलात आणला. धाडसी निर्णय अशासाठी असे की नूतनीकरणाच्या काळामध्ये, गेले तीन महिने आम्ही आमच्याच घरामध्ये निर्वासितांसारखे राहत होतो. एक-दोन भिंती फोडणे, बाथरूम्स नवीन करणे, खिडक्या बदलणे अशा इतर कामांबरोबर आम्ही 'मॉड्युलर किचनही' करून घेतले. त्या किचनबरोबर 'चिमणी' अत्यावश्यक आहे, हे समजल्यामुळे 'किचन चिमणी'ची शोधाशोध सुरु केली. आजच्या काळात एखादी उडती-फिरती चिमणी शोधण्यापेक्षाही 'किचन चिमणी' शोधणे जास्त अवघड आहे, असे माझ्या लक्षात आले. अनेक वेबसाईट्स, यू-ट्यूब व्हिडीओ, मैत्रिणींची मते आणि समाजमाध्यमातील अनेक ग्रुप्सवर शोधाशोध केल्यावर मी जास्तच संभ्रमात पडले. 

मिळत गेलेल्या माहितीतील एकेक तपशील हळू-हळू डोक्यामध्ये शिरायला लागला. किचन चिमणी ६० आणि ९० सेंटीमीटर, अशा दोन आकारामध्ये येते. सर्वसाधारणपणे दोन-तीन बर्नर असलेल्या शेगडीसाठी ६० सेंटीमीटर आणि ४-५ बर्नर असलेल्या शेगडीसाठी ९० सेंटिमीटर्सची शेगडी असावी. तसेच आपल्या गॅसच्या शेगडीच्या लांबी इतकी किचन चिमणी घेतलेली उत्तम. माझ्याकडची गॅस शेगडी तीन बर्नरची असली तरी त्या शेगडीची लांबी जवळपास ७५ सेंटिमीटर्स भरली. पण ७५ सेंटिमीटरमधे अगदीच कमी पर्याय उपलब्ध आहेत. आणि त्या चिमण्यांनाही ६० सेंटिमीटर्सच्या चिमणीचीच मोटार बसवलेली असते, फक्त वरची काच ७५ सेंटिमीटर्सची असते इतकेच. ही बाबा लक्षात आल्यावर मी ६० सेंटिमीटरची चिमणी घेण्याचे ठरवले. 

फिल्टरवाली चिमणी घ्यावी का फिल्टरलेस चिमणी घ्यावी? हा प्रश्न पुढे आला. फिल्टरवाली चिमणी घेणेच योग्य आहे, असे माझ्या अभ्यासांती लक्षात आले. कार्बन फिल्टर, मेश फिल्टर आणि बॅफल फिल्टर, अशी वेगवेगळी नावे ऐकून मला, इंग्रजीमधल्या 'to get baffled' या वाक्यरचनेचा अर्थ पुरेपूर कळला!

बरीच माहिती गोळा केल्यानंतर मात्र कुठल्याही प्रकारे baffle न होता म्हणजेच बावचळून न जाता Baffle filter असलेली चिमणीच घ्यायचे पक्के केले. हा Baffle filter फोडणीतले तेल चिमणीच्या मोटारपर्यंत जाऊ देत नाही, असे असले तरी दर दोन-तीन आठवड्यातून तो फिल्टर स्वच्छ करण्याचे काम गळ्यात पडते, हेही खरे. मात्र हा फिल्टर वरचेवर स्वच्छ करून चिमणी वापरली तर  स्वयंपाकघरामध्ये चिकट मेणी साठत नाही हे विशेष. 

चिमणी ductless घ्यावी का ducted ? हा प्रश्न  त्यानंतर उद्भवला. चिमणीमधून हवा बाहेर फेकणारी duct त्याच्या मॉड्युलर किचनच्या सौंदर्यामधे बाधा आणते असे अनेक गृहिणींना वाटते. त्यासाठी त्या ductless  चिमणी घेतात. अशा चिमणीमध्ये वरच्या बाजूला एक कार्बन फिल्टर बसवलेला असतो. तो फिल्टर, स्वयंपाकघरातला धूर आणि वास काही प्रमाणात शोषून घेत असला तरीही बाहेर फेकू शकत नाही. तसेच स्वयंपाक करत असताना निर्माण होणारी वाफ आणि गरम हवासुद्धा ही चिमणी बाहेर फेकू शकतनाही. म्हणून मग स्वयंपाकघरातला उकाडा आणि कोंदटपणा कमी होत नाही. Ductless चिमणीमधे बसवलेल्या कार्बन फिल्टरमध्ये काजळी साठून तो दर चार-सहा महिन्यांनी गच्च भरतो आणि नीट काम करेनासा होतो. त्यामुळे कंपनीचा माणूस बोलवून कार्बन फिल्टर बदलावा लागतो. त्यासाठी दीड-दोनहजार रुपये मोजावे लागतात ते वेगळेच. चिमणीची duct डोळ्यांना खुपली तरीही चालेल पण माझे स्वयंपाकघर स्वच्छ ठेवणारी ducted चिमणीच मी घेणार, हे मी पक्के ठरवले. चिमणीच्या खालच्या बाजूला असलेला baffle filter तेल शोषून घेतो, आणि वास, धूर व गरम हवा बाहेर फेकण्याचे काम चिमणीतून घराबाहेर जाणारी duct करते.    

बाजारामध्ये 'ऑटो-क्लीन' आणि 'नॉन ऑटो-क्लीन'  अशा दोन प्रकारच्या चिमण्या उपलब्ध आहेत. 'ऑटो-क्लीन' चिमणीमध्ये एक बटन दाबले की त्या चिमणीच्या आतल्या बाजूला चिकटलेली मेणी वितळून एका ट्रेमध्ये साठते आणि चिमणी स्वच्छ होते. ही प्रक्रिया दाखवणाराने मस्त व्हिडीओ यू-ट्यूबवर बघायला मिळतात. आपल्या शरीरावर चिकटलेली मेणी, एखादे बटन दाबून बाहेर काढता आली तर किती बरे होईल, हा विचार ते व्हिडीओ पाहताना मनामध्ये आल्याशिवाय राहिला नाही! वर्षातून एकदा तरी कंपनीचा माणूस बोलवून 'नॉन ऑटो-क्लीन' चिमणी, आतून-बाहेरून स्वच्छ करवून घ्यावीच लागते. पण 'ऑटो-क्लीन' चिमणीसुध्दा तशीच दर वर्षी स्वच्छ करवून घ्यायला लागते, हे जसे समजले तशी मी 'ऑटो-क्लीन' चिमणी मनातून बाद करून टाकली. 

किचन चिमणी हे तसे बरेच महागडे प्रकरण आहे. इंटरनेटवर बघायला मिळत असलेल्या बऱ्याचशा 'मॉड्युलर किचन'मध्ये 'स्लॅन्टेड' किंवा तिरप्या छताच्या चिमण्या दाखवलेल्या असतात. तिरप्या किंवा स्लॅन्टेड चिमण्या जागा कमी व्यापतात, हे खरे आहे. पण आपण चिमणी ज्या कामासाठी विकत घेतो, त्यासाठी त्या अगदीच कुचकामी ठरतात. केवळ  'आमच्याकडे महागडी किचन चिमणी आहे बरं का!' अशी शेखी मिरवण्यासाठी स्लॅन्टेड चिमण्या उपयोगी पडतात! एखादी वस्तू जास्त महाग असली कि ती जास्त चांगली असते, अशी अनेकांची समजूत असते. पण  कित्येकदा तसे नसतेही. 

किती suction power असलेली चिमणी विकत घ्यावी हे ठरवण्यासाठी माझ्या मेंदूची बरीच पॉवर खर्च झाली. सर्वसाधारणपणे, सध्याच्या विभक्त कुटुंबात जेमतेम तीन-चार माणसेच असतात. स्वयंपाकघरेही जेमतेम १००-१५० चौरस फुटांची असतात. अशा घरामध्ये १०००-१२०० सक्शन पॉवरची (ताशी १०००-१२०० घनमीटर) चिमणी पुरेशी होते. अशा पॉवरच्या चिमणीचा आवाजही सुसह्य असतो.  १०-१२ लोकांच्या कुटुंबात, जिथे सतत आणि भरपूर स्वयंपाक होत असतो अशा कुटुंबासाठी १४००-१५०० पॉवर असलेली चिमणी लागते! पण अशा पॉवरबाज चिमण्यांचा आवाजही जबरदस्त असतो, हे लक्षात घ्यायला हवे. "तो आवाज ऐकल्यावर गिऱ्हाईक पॉवरबाज चिमणी घ्यायला तयार होत नाहीत, म्हणून आम्ही त्या चिमण्या शोरूम्समध्ये ठेवतच नाही" असे एका डीलरने मला दबक्या आवाजात सांगितले! पूर्ण विचारांती माझ्या किचनसाठी मी ११५० पॉवरची चिमणी निवडली. 

आपल्या हाताच्या इशाऱ्यावर चालू-बंद होणाऱ्या, वेग कमी-जास्त करणाऱ्या (मोशन सेन्सर किंवा gesture control ) अशा चिमण्या बाजारामध्ये येतात. आपल्या बोटांच्या इशाऱ्यावर सगळे घर नाचावे अशी सुप्त इच्छा स्त्रीच्या मनामध्ये असल्यामुळे, तशी 'मोशन सेन्सर' चिमणी घेण्याचा मोह न पडला तरच नवल! पण तो मोह टाळणेच उत्तम. काही काळातच ते मोशन सेन्सर पॅनल बंद पडते, किंवा त्रास द्यायला सुरुवात करते आणि अखेर बदलावे लागते. खरंतर push buttons ने चालणारी चिमणी सर्वात उत्तम. पण हल्ली बाजारामध्ये तशी चिमणी सहजी उपलब्ध नसल्याने मला इलेक्ट्रॉनिक बटन्स असलेली चिमणी विकत घ्यावी लागली. 

अशी 'सर्वगुणसंपन्न' चिमणी एकदाची माझ्या घरात येऊन बसली आणि मला अगदी 'हुश्श' म्हणावेसे वाटले. पण नुसते हुश्श म्हणून गप्प बसेन तर मी कसली?

म्हणून, माझ्या चिमणी-शोधमोहिमेचा वृत्तांत तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीच तर हा चिवचिवाट!