मंगळवार, १८ नोव्हेंबर, २०२५
त्या कुणी ना पाहिले ...
रविवार, १६ नोव्हेंबर, २०२५
आणि आज माझं अपहरण झालं!
इतक्यात माझ्या मागून एक चारचाकी गाडी सतत जोरजोरात हॉर्न वाजवत यायला लागली. सकाळच्या शांत वातावरणात तो कर्कश्श आवाज ऐकून मी वैतागले. मागे वळून बघितले, तर ती गाडी सर्रकन येऊन अगदी माझ्या अंगाजवळच थांबली. गाडीच्या आतून एक करडा आवाज आला, "मुकाट्याने गाडीत बस" आवाज स्त्रीचा होता आणि खूप ओळखीचा वाटत होता. त्यामुळे मला जास्तच आश्चर्य वाटले. ती गाडी माझी मैत्रिण स्मिता शिरवळकर चालवत होती. तिनेच, स्मितहास्य करत पण मोठ्या अधिकारवाणीने मला गाडीत बसायला सांगितले होते.
शुक्रवार, २३ मे, २०२५
डॉटर इन लव्ह!
गेले काही दिवस मराठी न्यूज चॅनलवर आणि समाजमाध्यमांवर वैष्णवी हगवणे हिच्या दुर्दैवी मृत्यूची जोरदार चर्चा सुरु आहे. तसेच हगवणे कुटुंबातील मोठ्या सुनेने, मयुरी जगताप-हगवणे हिने सासरच्यांविरुद्ध केलेल्या आणि दाबल्या गेलेल्या पोलीस तक्रारीबाबतही बातम्या समोर आल्या आहेत. सगळे वाचून आणि ऐकून माझे मन गलबलले.
हुंडाबंदीचा कायदा येऊन साठ वर्षे उलटून गेली. तरीही आज अनेक कुटुंबांमध्ये, या ना त्या मार्गाने, लग्नाच्या वेळीच मुलीच्या माहेरून पैसे उकळले जातात. अनेक घरांमधून, मुलाचे लग्न झाल्यावरही पुढील बरीच वर्षे, सुनेच्या माहेरून पैसे, कापड-चोपड, सोने-चांदी यावी, अशी अपेक्षा असते. आजही भारतीय घरांमधून सुनांचा छळ होतो का? असा प्रश्न मला कोणी विचारला तर मी म्हणेन, हो निश्चित होतो. घरोघरी होणाऱ्या छळाची तीव्रता कमी जास्त असते आणि स्वरूप निरनिराळे असते इतकेच. तो छळ भावनिक, मानसिक, शारीरिक किंवा काहीवेळा लैंगिक स्वरूपाचाही असतो. पण, एकदा का लग्न होऊन तू त्या घरची झालीस की तेच तुझे घर, माहेरी येऊन सासरचे काही सांगायचे नाही आणि सासरी जाऊन माहेरचेही सांगायचे नाही असेच 'संस्कार' कित्येक मुलींवर आजही केले जातात. 'लग्न टिकवणे' अत्यावश्यक आहे आणि ती तुझी जबाबदारी आहे हे अनेक घरातल्या मुलींच्या मनावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे बिंबवले जाते, हे दुर्दैव आहे. वैष्णवीची केस म्हणजे केवळ हिमनगाचे टोक आहे. अशा अनेक मुलींचा सासरी असह्य छळ होत असतो.
मी एक बालरोगतज्ज्ञ आहे. माझ्याकडे आपली लहानगी बाळे घेऊन तरुण आया येतात. सासरच्या घरामधे त्यांचा बारीक-सारीक छळ होत असतो, हे मला जाणवते. काहीवेळा त्या मला तसे सांगतातही. कित्येकदा माझ्याकडे बाळाला घेऊन एखाद्या घरची सून येऊन गेली की पाठोपाठ तिच्या सासूचा मला फोन येतो. सून खरोखरीच माझ्याकडे आली का, कधी पोहोचली, माझ्या क्लिनिकमधून कधी बाहेर पडली, असले प्रश्न मला त्या विचारतात. मला अतिशय राग येतो. पण कोणाच्याही खाजगी आयुष्यामधे मी लक्ष घालू शकत नाही. त्यामुळे खरी ती उत्तरे देऊन मला गप्प बसावे लागते. अनेक सुशिक्षित घरातल्या सुनेला जर दुसरी मुलगीच झाली असेल तर तिच्या सासरचे लोक माझ्यासमोर त्या सुनेला टोमणे मारतात. शक्य असेल तेव्हा मी त्यांना रागावते. पण प्रत्येकवेळी शक्य होतेच असे नाही.
वैष्णवीच्या मृत्यूला जे कोणी जबाबदार आहेत, त्यांच्यावर यथावकाश कायदेशीर कारवाई होईलही. पण वैष्णवीच्या सासरी तिचा छळ होतो आहे हे माहिती असूनही माहेरच्यांनी तिला पुन्हा-पुन्हा सासरी पाठवून दिले, हेही अयोग्य होते असे मला वाटते. 'शक्यतोवर आपल्या मुलीने सासरी नमते घेऊन, काहीतरी करून, जुळवून घ्यावे' अशीच अनेक माहेरच्यांनी मानसिकता दिसून येते. मुलीचा घटस्फोट झाला आणि ती माहेरी परत आली, तर समाजामध्ये मुलीची आणि पर्यायाने तिच्या माहेरच्यांचीच जास्त बदनामी होते, हेही दुर्दैवाने खरे आहे. त्या दबावाला घाबरून, 'कसेही कर आणि जुळवून घे' असेच अनेकजण आपापल्या मुलीला सांगत असावेत, असे मला वाटते. 'मुलं झाल्यावर होईल सगळं सुरळीत' अशाही विचाराने मुलीला जुळवून घ्यायला सांगितले जाते. कधी-कधी तसे होतही असेल. किंवा काही मुली धीटपणे छळाला प्रतिकार करून सासरच्यांना गप्प बसवतही असतील. पण एकीकडे नवऱ्याची आणि दुसरीकडे माहेरच्यांचीही साथ नसेल तर त्या विवाहितेचा कोंडमारा होतो, ही वस्तुस्थिती आहे.
असे असले तरीही, समाजात हळूहळू काही चांगले बदल घडत आहेत. माझ्या अगदी जवळच्या दोन मैत्रिणींच्या मुली आपापल्या लहानग्या बाळांना घेऊन माहेरी परतल्या आहेत. सासरी परत जायचे नाही या निर्धारानेच त्या परत आल्या आहेत. या मुलींच्या आई-वडिलांनी माहेरचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडे ठेवले होते, म्हणूनच हे शक्य झाले. या पालकांना समाजाची पर्वा नाही असे म्हणता येणार नाही. पण त्यांना आपल्या मुलींच्या मनःस्वास्थ्याची आणि सुखाची त्याहीपेक्षा जास्त पर्वा आहे, म्हणूनच ते त्यांच्यामागे खंबीरपणे उभे आहेत. माझ्या माहितीतल्या त्या दोन्ही मुली सुसंस्कारित आहेत. सासरी जुळवून घ्यायचा आटोकाट प्रयत्न असफल झाल्यानंतरच त्या सासर सोडून, आणि विवाहबंध तोडून स्वगृही परत आल्या आहेत. त्या मुली स्वतः कमावत्या आहेत, म्हणूनही कदाचित हे सुकर झाले असेल. पण एखाद्या न मिळवत्या मुलीवर असा प्रसंग ओढवला तरी तिलाही माहेरच्यांनी पाठिंबा द्यायला हवा.
समाजात असे काही चांगले बदल घडत असले तरी काही वाईट बदलही घडत आहेत. सासरच्यांनी सुनेला छळण्याच्या घटना जशा आहेत तशाच सुनांनी सासरच्यांचा आणि नवऱ्याचा अतोनात छळ केल्याचा घटना आज काही कमी नाहीत. 'कौटुंबिक अत्याचार' कायद्याचा गैरफायदा घेणाऱ्या काही सुनाही आज बघायला मिळतात. अशा सुनांच्या कारवायांना घाबरून राहणारे सत्शील आणि सद्वर्तनी कुटुंबीयदेखील माझ्या बघण्यात आहेत. दुर्दैवाने त्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याशिवाय काही पर्यायच नसतो. अशाच प्रकारच्या छळाला कंटाळून आत्महत्या केलेल्या तरुणाची बातमीही नुकतीच वाचनात आली होती. पण सुदैवाने अजून तरी अशा घटनांचे प्रमाण कमी आहे, असे मला वाटते.
आज एका सुप्रसिद्ध डॉक्टर बाईंनी आपल्या सुनेच्या यशाचे कौतुक आमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर सांगताना, सुनेचा उल्लेख 'डॉटर इन लॉ' असा न करता 'डॉटर इन लव्ह' असा केला. तसा उल्लेख त्यांनी मुद्दाम केला का त्यांच्या फोनने autocorrect केल्यामुळे तो झाला, हे मला माहिती नाही.
पण 'डॉटर इन लॉ' पेक्षा 'डॉटर इन लव्ह' हे संबोधन मला फार आवडले. घरोघरी आईबाप आपल्या पोटच्या मुलीवर जेवढे प्रेम करतात तेवढेच ते आपल्या सुनेवरही करू शकले तर आपला समाज किती सुदृढ होईल ही कल्पना काही काळ तरी मला सुखावून गेली. तसे खरोखर होईल तो सुदिन!
बुधवार, २३ एप्रिल, २०२५
सेकंड ओपिनियन
साधारण १० वर्षांपूर्वी, एका रविवारी पहाटे माझा अमेरिकास्थित भाऊ पुण्यात पोहोचला होता. त्या दुपारी अचानक त्याचे डोके भयंकर दुखू लागल्याने त्याला मी पुण्यातील एका सुप्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. त्याच्या स्कॅनचा रिपोर्ट नॉर्मल असल्याचे केसपेपरवर लिहून आले. पण सोमवारी तोच स्कॅन मुख्य डॉक्टरांनी पाहिल्यानंतर मेंदूमध्ये मोठा रक्तस्राव झालेला आहे असे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर सगळ्यांची एकच धावपळ सुरु झाली. अनेक तज्ज्ञ डॉक्टरांना बोलवून त्यांची मते घेण्यात आली. प्रत्येक डॉक्टरने एकेक नवनवीन औषध लिहिले. सुदैवाने माझा भाऊ त्या दुखण्यातून पूर्ण बरा झाला. सहा आठवड्यानंतर पुन्हा केलेला त्याचा स्कॅन नॉर्मल आला आणि मला हायसे वाटले. पण त्याला अनेक अनावश्यक औषधे सुरु आहेत, असे एक डॉक्टर म्हणून माझे मत होते. स्कॅन नॉर्मल आल्यामुळे ती औषधे आता बंद करावीत, असे त्याच्या डॉक्टरांना मी सुचवले. पण त्यांच्यापैकी कोणीच डॉक्टर औषधे बंद करण्याचा निर्णयही घेईनात आणि ती सुरु ठेवण्यासाठी सबळ कारणही सांगेनात. माझे समाधान न झाल्याने एक सेकंड ओपिनियन घ्यावे असे मला वाटले. तशा परिस्थितीत एकच व्यक्ती योग्य व ठाम निर्णय देऊ शकेल याची मला खात्री होती. ती व्यक्ती म्हणजे सोलापूरचे डॉक्टर शिरीष वळसंगकर सर! त्यामुळे मी भावाला घेऊन सोलापूरला गेले. शिरीषसरांशी चर्चा करून त्यांच्या सल्ल्याने सर्व औषधे बंद केली. त्यानंतर मी निश्चिन्त झाले आणि भावाला अमेरिकेला जाऊ दिले.
वळसंगकर कुटुंबियांचे आणि माझ्या सासर-माहेरच्या दोन्हीही कुटुंबियांचे अनेक वर्षे घनिष्ठ संबंध आहेत. शिरीषसर एक निष्णात डॉक्टर तर होतेच पण अतिशय उत्तम शिक्षकही होते. मी एमबीबीएस करत असताना शिरीषसरांनी मला मेडिसिन हा विषय शिकवला होता. त्यामुळे अर्थातच आमचे गुरु-शिष्याचे नाते होते. माझ्या काकांचे, म्हणजे सोलापूरच्या कै. डॉ. राम गोडबोले यांचे आम्ही दोघेही शिष्य असल्याने शिरीषसर माझे गुरुबंधुही होते. खूप वर्षांपूर्वी अगदी मित्रत्वाच्या नात्याने आम्ही एकत्र ब्रिजही खेळलेलो आहोत. सर अतिशय सुस्वभावी, सद्गुणी, सत्शील, मृदूभाषी, बुद्धिमान, सामाजिक भान असलेले, निर्मळ, विनम्र आणि गप्पांत रमणारे जगन्मित्र होते. माझ्या नवऱ्याचे तसेच माझ्या सर्व भावांचे आणि सरांचे अनेक वर्षांपासूनचे अतिशय मैत्रीपूर्ण संबंध असल्याने काही कौटुंबिक कार्यक्रमांमधेही अधून-मधून आमची भेट व्हायची. कधीही आणि कुठेही भेट झाली की सर अगदी निखळ हासत, नर्म विनोद आणि चेष्टा करत बोलायचे. त्यांच्यासारखा मोठा माणूस आपल्याशी इतके मोकळेपणाने बोलतो, हे बघून सुखावायला व्हायचे.
काही महिन्यांपूर्वी अगदी अचानकच त्यांचा मला फोन आला. फोनवर मला म्हणाले, "तुझा सल्ला घ्यायला फोन केला आहे." ते ऐकून मला आश्चर्याचा धक्काच बसला. सरांसारख्या इतक्या मोठ्या आणि यशस्वी व्यक्तीला माझ्याकडून काय सल्ला हवा असेल? असा प्रश्न मला पडला. माझी दोन्ही मुले बारावीनंतर अमेरिकेतील विद्यापीठामधे शिकलेली आहेत. सरांच्या नातवाला मेडिकलच्या शिक्षणासाठी अमेरिकेला पाठवण्याचा निर्णय ते घेऊ इच्छित घेत असावेत, असे त्यांच्या बोलण्यातून मला जाणवले. नातवाला अमेरिकेला पाठवायचे झाल्यास काय आणि कशी तयारी करावी, कुठल्या विद्यापीठांसाठी प्रयत्न करावेत, याबाबत त्यांना माझा सल्ला हवा होता. एमबीबीएस करण्यासाठी अमेरिकेत न पाठवता एमबीबीएसनंतरच्या उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला पाठवण्यास हरकत नाही, असे माझे मत मी त्यांना सांगितले. माझा सल्ला आणि त्यामागची कारणमीमांसा ऐकताना एखाद्या अतिसामान्य व्यक्तीने जितक्या शांतपणे ऐकावे, तसेच सर ऐकत होते. आमच्या संभाषणादरम्यान त्यांच्या मोठेपणाचा लवलेशही मला कुठे जाणवला नाही. त्यानंतर मात्र कधीच आमची भेट किंवा बोलणे होऊ शकले नाही.
अचानक मागच्या आठवड्यात, १८ एप्रिलला सरांच्या दुर्दैवी अंताची बातमी आली. डोकं सुन्न होऊन माझ्या डोळ्यातून घळाघळा पाणीच वाहू लागले. पहिले दोन-तीन दिवस तर मला नीटशी झोपही लागू शकली नाही. सरांची आठवण झाली की मनामधे एक प्रकारची वेदना उमटते. माणसांमधे रमणारे, सर्व नातेसंबंध जपणारे असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. त्यामुळे शिरीषसरांना जवळून ओळखत असलेल्या प्रत्येक व्यक्तीची माझ्यासारखीच अवस्था झालेली असणार यात मला शंका नाही. गेल्या काही दिवसांत आलेल्या बातम्यांवरून असे लक्षात येते आहे की सरांनी पूर्ण विचारांती आत्महत्येचा निर्णय घेतला असावा. त्यामुळे माझ्या मनात राहून-राहून एकच प्रश्न येतो. इतका टोकाचा निर्णय घेण्याआधी सरांनी एखादे सेकंड ओपिनियन का घेतले नाही ? असे असेल का, की यशाच्या इतक्या उत्तुंग शिखरावर पोहोचलेल्या व्यक्तीला आपले मन मोकळे करायला कोणीच नसते? Is it so lonely at the top?
जे झाले ते अतिशय वेदनादायक आहे. सरांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियांचे नुकसान तर झाले आहेच, पण संपूर्ण समाजाचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे.
सरांच्या आप्तस्वकीयांच्या दुःखात मीही सहभागी आहे. शिरीषसरांच्या आत्म्याला शांती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !
डॉक्टर स्वाती बापट, MBBS , MD (Pediatrics)
बालरोगतज्ज्ञ , पुणे
गुरुवार, १३ मार्च, २०२५
महाकुंभयात्रा-५
संगमावर गंगास्नान करून झाल्यावर आम्ही बोटीने सरस्वतीघाटावर परतलो. घाटावर अनेक लहान मुले आणि मुली यात्रेकरूंच्या कपाळावर हळद-कुंकवाने मळवट भरायला उत्सुक होती. आम्ही चौघांनीही कपाळावर हळद आणि त्यावर कुंकवाने ओम आणि त्रिशुळाचे छाप मारून घेतले. किल्ल्याच्या आत जाऊन आम्ही आमचे कपडे आणि इतर सामान आमच्या टॅक्सीमध्ये ठेवले. घरून निघताना प्राचीने मेथीचे पराठे आणि अंजलीने डिंकाचे लाडू करून बरोबर आणले होते. दोन-दोन पराठे, एकेक लाडू खाऊन आणि गरम कॉफी पिऊन आम्ही ताजेतवाने झालो आणि किल्ल्याच्या आवारातच असलेल्या पाताळपुरी मंदिराकडे चालत निघालो.
पाताळपुरी मंदिरात जाण्यासाठी काही पायऱ्या उतरून जमिनीच्या खालच्या स्तरावर जावे लागते. मंदिराच्या आत अत्यंत जुना असा अक्षयवट आहे. असे म्हणतात की, प्रभू रामचंद्र आणि माता सीतेने वनवासात जात असताना या वडाच्या सावलीत विश्रांती घेतली होती आणि या झाडाचा आशीर्वाद त्यांना लाभला होता. गंगास्नान केल्यानंतर अक्षयवटाला नमस्कार केल्यास जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळून मोक्षप्राप्ती होते, अशी लोकांची श्रद्धा आहे. पूर्वीच्या काळी तर अक्षयवटावरून उडी मारून लोक आपले प्राण देत असत. जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून कायमची सुटका होऊन मोक्ष मिळावा अशीच त्यामागची धारणा असणार. परंतु, बादशाह अकबराने १५८३ साली हा भक्कम किल्ला अक्षयवटाभोवतालीच बांधून काढल्यामुळे 'तडक मोक्षप्राप्ती'च्या प्रथेला कदाचित आळा बसला असावा.
आम्ही पाताळपुरी मंदिरात गेलो खरे, पण तिथे इतकी गर्दी आणि गोंगाट होता की कधी एकदा इथून बाहेर पडतो असे आम्हाला झाले. आम्ही त्वरित दर्शन घेऊन बाहेर पडलो, पण देवदर्शनानंतर मनाला शांती आणि समाधान लाभल्याचा अनुभव मात्र आला नाही. किल्ल्याच्या तटबंदीवर एक 'President's View Point' आहे. तिथून खाली पाहिले असता, संपूर्ण कुंभमेळ्याचे, गंगाकिनारी तात्पुरत्या वसवलेल्या Tent City चे आणि त्यामध्ये हिंडणाऱ्या प्रचंड जनसमुदायाचे दर्शन होत होते. तटबंदीच्या जवळच, गंगाकिनारी असलेल्या 'लेटे हनुमान' किंवा 'बडे हनुमान' मंदिराबाहेर दर्शनासाठी थांबलेल्या भक्तांची २-३ किलोमीटर लांब बारी लागलेली दिसत होती. ती बारी बघूनच आम्ही हनुमान मंदिरात न जाण्याचा निर्णय घेतला.
आमच्या मुक्कामाची सोय प्राचीच्या भावाने एका महंतांकरवी केलेली होती. आमचे गंगास्नान व देवदर्शन व्यवस्थित व्हावे यासाठी ते महंत स्वतः लक्ष घालत होते. आम्ही निवासस्थानी कधी पोहोचणार हे जाणून घेण्यासाठी सकाळपासून त्या महंतांचा आम्हाला अनेकवेळा फोन येऊन गेला होता. आम्हीही आता दमलो होतो त्यामुळे आम्ही किल्ल्यातून तडक टॅक्सीने निघालो. यमुनेपारच्या नैनी या गावाला जोडणारा पूल पार करून आम्हाला साधारण आठ किलोमीटर दूर असलेल्या त्या पत्त्यावर पोहोचायचे होते. आमची टॅक्सी प्रचंड गर्दीतून वाट काढत निघाली. आठ किलोमीटर अंतर कापायला आम्हाला जवळपास तीन तास लागले. गर्दीतून वाट काढत पायी निघालेले तळागाळातले यात्रेकरी प्रयागराजला आल्यावर प्रथमच आम्हाला जवळून पाहता आले. गंगास्नानाच्या ओढीने आलेले ते लोक आपले सामान डोक्यावर लादून, गर्दीतून वाट काढत, अत्यंत शांतपणे चालत होते. कित्येक जण आपल्या लहान मुलांना खांद्यावर बसवून चालत होते. म्हातारे-कोतारे, अपंग, अंध असे अनेक भक्तगण गर्दीत दिसत होते. सर्वांचा उत्साह आणि आस्था वाखाणण्यासारखी होती.
'ओमॅक्स हायटेक सिटी' नावाच्या, नव्या कोऱ्या सदनिकांच्या संकुलामध्ये एका तीन बेडरूमच्या सुसज्ज सदनिकेपाशी आम्ही भुकेजलेल्या आणि दमलेल्या अवस्थेमधे पोहोचलो तेंव्हा दुपारचे चार वाजले होते. भगवी वस्त्रे धारण केलेले, अत्यंत मृदुभाषी, आणि प्रसन्न चेहऱ्याचे, महंत श्री. गंगाधरमहाराज आमच्या स्वागतासाठी थांबलेले होते. आम्हाला बोटीतून संगमापर्यंत नेऊन गंगास्नान करण्याची व्यवस्थाही महाराजांनी केलेली होती. पण आम्ही गंगास्नान करूनच आलो आहे हे समजल्यावर त्यांनी आम्हाला विश्रांती घेण्यास सुचवले. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून, संगमापासून दूर असलेल्या नवीन कॅंटोन्मेंटमध्ये आम्ही राहायला जाणार आहोत, हे आम्ही त्यांना सांगितले. "आपल्याला भेटायला मी पुन्हा संध्याकाळी येईन" असे सांगून ते महाराज निघून गेले.
आम्ही स्वयंपाकघरामधे पाहतो तो काय? चहा-साखरेचे सामान, दूध, तेल, पोहे, कांदे-बटाटे, हिरव्या मिरच्या, तेल, मसाले, मिसळवण्याचा डबा, कणीक, डाळ-तांदूळ, भांडी-कुंडी असे सर्व काही तिथे होते. मी माझा थकवा विसरले आणि लगेच स्वयंपाकघराचा ताबा घेतला. कांदा, मटार, हिरवी मिरची व टोमॅटो घालून मी केलेल्या चमचमीत पोह्यांवर ताव मारून झाल्यावर, आले घातलेला मस्त गरमागरम चहा आम्ही प्यायलो. मग चौघांनींही गरम पाण्याने अंघोळ केली आणि आमचा दिवसभराचा शिणवटा पळून गेला. प्राचीच्या अंगात थोडी कणकण असल्याने आणि दमणुकीमुळे तिला झोप लागलेली होती. नेमके त्याच वेळी महाराज आम्हाला भेटायला आले. अंजलीला, मला आणि आनंदला शाल देऊन महाराजांनी आमचा सत्कार केला आणि महाकुंभमेळ्याचे चित्र असलेली एक सुंदर फोटोफ्रेम आम्हाला भेट दिली!
श्री. गंगाधर महाराजांनी आमची राहण्याची उत्तम सोय तर केलेलीच होती. संध्याकाळी सातच्या सुमारास त्यांनी आमच्यासाठी गरमागरम शुद्ध शाकाहारी वैष्णव भोजनाच्या थाळ्याही पाठवून दिल्या. आमच्याकडून राहण्या-खाण्याचे काहीही पैसे ते घेणार नव्हते. इतके सर्व आमच्यासाठी करून, त्याउप्पर त्यांनी आमचाच सत्कार केल्यामुळे आम्हाला अगदी लाजायला झाले. महाराजांशी बोलता-बोलता ज्या गोष्टी कळल्या, त्या ऐकून तर आम्हाला थक्कच व्हायला झाले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या आदेशावरून 'ओमॅक्स हायटेक सिटी' संकुलामधे जवळपास २०० सदनिका राखून ठेवलेल्या होत्या. विविध मठांना प्रत्येकी १०-२० सदनिकांचा ताबा दिलेला होता. त्या-त्या मठांचे महंत आपापल्या सदनिकांमध्ये भाविकांची राहण्याची सोय व गंगास्नानाची व्यवस्था स्वतः पाहत होते. सर्व सदनिकांमधे सोफासेट, डबलबेड, गाद्या-उशा-पांघरुणे ठेवलेली होती. जुजबी स्वयंपाकासाठी शिधा, भांडी-कुंडी आणि Induction Heater यासह प्रत्येक स्वयंपाकघर सुसज्ज केले गेले होते. आम्ही कुणी VIP भक्त असल्याप्रमाणे आमची अशा ठिकाणी विनामूल्य सोय व्हावी याचेही आम्हाला फार आश्चर्य वाटले.
रात्री जेवण झाल्यावर मी आणि अंजली पाय मोकळे करायला बाहेर पडलो. ओमॅक्स हायटेक सिटीच्या बाहेर पडताच दोन-तीन हेलिपॅड्स दिसली. कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या 'खऱ्याखुऱ्या VIP' भक्तांची हेलिकॉप्टर्स तिथेच उतरतात असे नंतर समजले! पायी हिंडत आम्ही दोघीच अरेल घाटापर्यंत चालून आलो. 'महाकुंभमेळानगरी' मधली आकर्षक रोषणाई दुरूनच पाहून आमचे डोळे दिपले.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून, चहा घेऊन आणि अंघोळी करून आम्ही कुंभमेळा क्षेत्रापासून दूर असलेल्या नवीन कॅंटोन्मेंटकडे जाणार होतो. शरीर थकले होते, पण अंथरुणाला पाठ टेकल्यानंतरही मनामध्ये विचारचक्र सुरूच होते. महाकुंभमेळ्याबाबत आम्हाला मिळालेली माहिती, तिथे आलेले अनुभव आणि त्यामुळे माझ्या मनामध्ये सुरु झालेल्या विचारचक्राबाबत पुढील लेखामध्ये लिहीन...
(क्रमशः)
शुक्रवार, ७ मार्च, २०२५
महाकुंभयात्रा-४
माझ्या गंगास्नानानंतर, "अखेर गंगेत घोडी न्हाली" अशी कॅप्शन लिहून आनंदने चतुराई केली होती असे मला वाटले. घोडा या शब्दाचे अनेकवचन म्हणूनही 'घोडी' हा शब्द वापरात आहे. त्यामुळे, आनंदने घोडी हे संबोधन माझ्यासाठी वापरले होते, का आम्हा दोघांनाही मिळून 'घोडी' असा बहुवचनी शब्द वापरला होता ते त्याने गुलदस्त्यातच ठेवले.
गंगास्नान घडेपर्यंत सहन कराव्या लागलेल्या अनेकांच्या अनेकविध व्यथांच्या कथा आम्हाला पूर्वीच कळलेल्या होत्या. त्याच्या तुलनेत, आमचे गंगास्नान म्हणजे अक्षरशः 'VIP स्नान' झाले, हेच आमच्या कुंभयात्रेचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल! अर्धा-पाऊण तास पाण्यात डुंबून झाल्यावर आम्ही किनाऱ्यावर परतलो. मी गंगास्नान करण्याच्या विचाराने गेलेले नसल्यामुळे, बदलण्यासाठीचे कपडे मी सोबत नेले नव्हते. त्यामुळे किनाऱ्यावर उन्हात बसून कपडे वाळवण्याशिवाय पर्यायच नव्हता. अंजली आणि प्राचीने बदलण्याचे कपडे आणले असले तरी संगमावरच्या त्या भारलेल्या वातावरणापासून पासून त्यांनाही दूर जावेसे वाटत नव्हते. आम्हाला संगमावर सोडून गेलेला आमचा नावाडीही परत आलेला नसल्यामुळे आम्हाला आपोआपच किनाऱ्यावर तासभर थांबायला मिळाले. तो तासभर एका अर्थाने अनुभवांची गंगाजळीच म्हणावी असा होता.
पूजेचे साहित्य, कलश, नारळ, विड्याची पाने, सुपारी व दूध या साहित्याचे अनेक विक्रेते सरस्वती घाटाजवळच्या किनाऱ्यावर आम्ही पाहिले होतेच. तसेच संगमाजवळच्या किनाऱ्यावरही काही विक्रेते हिंडत होते. अर्थात, हे सगळेजण अव्वाच्या-सव्वा भावाने ते साहित्य विकत होते, हे सांगायलाच नको. काहीजण आपापले पूजेचे सर्व साहित्य घरूनच घेऊन आलेले होते. अनेक भाविक वेगवेगळ्या प्रकारे गंगापूजन करत होते. त्या सर्वच पद्धती मला नवीन असल्यामुळे मी त्या लक्षपूर्वक पाहत होते. बरेचजण गंगेला तांब्याचा कलश अर्पण करत होते. कलशाच्या आत हळकुंड, साळीच्या लाह्या अथवा गहू, आणि एखादे नाणे टाकून, कलशावर श्रीफळ ठेवून व त्यावर वस्त्र गुंडाळून, तो कलश गंगेच्या प्रवाहामधे सोडण्याची प्रथा आहे. काहीजणांकडे गंगेला साडी दान करण्याची पद्धत आहे. गंगेच्या पात्रामधे उभे राहून, हळद-कुंकू लावून, साडीची घडी पूर्ण उघडून व साडीची चारही टोके हातात धरून गंगेच्या पात्रामधे हलकेच ती साडी सोडतात. गंगेच्या पात्रावर हेलकावे खात जात असलेल्या अनेक रंगाच्या साड्या संपूर्ण वातावरणामध्ये वेगळाच रंग भरत होत्या.
काही कुटुंबीय नवीन कोरे कपडे परिधान करून गंगास्नान करायला आले होते. गंगास्नान झाल्यानंतर त्यांनी आपले ते नवेकोरे, ओलेते कपडे गंगाकिनारी सोडून दिले व सोबत आणलेली निराळीच नवीन वस्त्रे परिधान केली. गंगास्नानाच्या निमित्ताने गरिबांना वस्त्रदान करण्याच्या अशा पद्धती रूढ असाव्यात असे मला वाटले. एका बाईने तर मला सांगितले की तिने घरून येतानाच ब्लाउज-पीस जोडलेली नवीन साडी, फॉल-पिको करून आणली होती. ज्या कुणा गरीब स्त्रीला ती साडी मिळेल तिला ती साडी अगदी मॅचिंग ब्लाऊजसह लगेच वापरता यायला मिळावी अशी सुंदर भावना त्यामागे होती. काही स्त्रियांनी गंगेच्या काठावरच्या वाळूमधे पूजा मांडली होती. त्यांनी ओल्या वाळूच्या पिंडी तयार केल्या होत्या. त्या पिंडींना हळदकुंकू व फुले वाहून त्यावर दुधाचा अभिषेक त्या करत होत्या. अशी पूजा करताना त्या आपापल्या भाषेमधे स्तोत्रे, काही श्लोक किंवा गाणी म्हणत होत्या. प्रज्वलित केलेला दिवा गंगेला अर्पण करून या पूजेची सांगता करत होत्या. काहींनी आपल्या घरची देवाची मूर्ती बरोबर आणली होती. त्या मूर्तीला गंगास्नान घालून, गंगाकिनारी तिचे पूजन ते करत होते. एकूण सगळे वातावरण भक्तिमय झालेले होते.
संगमाकडे येणाऱ्या भाविकांचा ओघ आता वाढतच चालला होता. गंगेचे आणि यमुनेचे पात्र असंख्य बोटींनी भरून गेले होते. दोन्हीं नद्यांची पात्रे स्वच्छ करण्यासाठी सरकारतर्फे चालवल्या जाणाऱ्या स्वयंचलित बोटी हिंडत होत्या. अरेल घाटापासून काही अंतरावर असलेल्या ऍडव्हेंचर स्पोर्ट्स सेंटरमधून पॅराग्लायडर आणि हॉट एयर बलूनद्वारे पर्यटकांना सैर करता येत होती. तिथून निघालेल्या पॅराग्लायडरमधून काहीजण गंगेच्या पात्रावरून आकाशात भ्रमंती करताना आम्हाला दिसले. संगमावर आलेल्या अनेकांनी गंगेचे पाणी भरून नेण्यासाठी बाटल्या किंवा कॅन्स सोबत आणलेले होते. अशा प्रकारचे कॅन व बाटल्या विकण्याचा व्यवसायही किनाऱ्यावर जोरात सुरु असल्याचे आम्ही आधीच पाहिले होते. माझ्याकडे विमानात मिळालेली २०० मिलिलिटरची एक छोटी बाटली होती. मी त्यातले पाणी पिऊन संपवून टाकले आणि त्यातच गंगेचे पाणी, माझ्या भाविक सिंधी शेजाऱ्यांना देण्यासाठी भरून घेतले. सोबत आणलेल्या पिशव्यांमध्ये अनेकजण गंगेकाठची वाळू भरून नेत होते. त्यातल्या एकीला, "वाळू का नेत आहेस?" असे मी कुतूहलापोटी विचारले. गंगेकाठची वाळू आणि गंगेचे पाणी आपापल्या घरी नेऊन देवघरामधे ठेवायची पद्धत आहे असे तिच्याकडून कळले. मग प्राचीने आणि अंजलीनेही, प्लॅस्टिकच्या एका छोट्या पिशवीमधे संगमातली वाळू भरून घेतली.
११ वाजत आले होते आणि आता सूर्य वर चढायला लागला होता. आम्ही आमच्या नावाड्याची वाट बघत होतो. इतक्यात एका बाईने माझ्या खांद्याला हात लावून माझे लक्ष वेधून घेतले. ती बहुतेक ओडिया भाषेमधे मला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होती. ती काय म्हणत होती ते मला काही केल्या समजेना. त्यानंतर तिने मला तीच गोष्ट खुणेने सांगितली आणि मला कळली. स्नान करून आल्यानंतर तिच्या भांगामधे तिला सिंदूर भरून हवा होता. मी तो भरून दिला. तिच्याजवळ आरसा नसल्याने, माझ्या फोनचा कॅमेरा सेल्फी मोडमधे करून, सिंदूर भरलेले तिचे रूप तिला मी दाखवले. ती कमालीची खूष होत माझ्याकडे पाहून हसली आणि पुन्हा ओडिया भाषेत काहीतरी म्हणाली. मला काहीही बोध झाला नसला तरी मीही उत्तरादाखल हसले. गंगातीरावर आलेल्या सर्व भाविकांना, त्यांचे प्रांत, भाषा, जात-पात या सर्वांपलीकडे जाऊन, एकत्र जोडणारी आपली भारतीय संस्कृतीच आहे याची मला प्रकर्षाने जाणीव झाली. त्याबरोबर हेही जाणवले की, विविधतेचे भांडार असलेल्या भारतामध्ये आपणा सर्वांना एकत्र जोडू शकणाऱ्या कितीतरी गोष्टी आहेत. तरीही, आपण आसपासच्या लोकांमधले वेगळेपण शोधत, एकमेकांमध्ये भिंती का उभ्या करू पाहतो?
आमचा नावाडी संगमावर परत येताच आम्ही सगळेजण नावेत बसून किनाऱ्याकडे निघालो. गंगास्नान झाल्यानंतर लगेच एखाद्या देवळामधे जाऊन देवदर्शन करण्याचा प्रघात आहे. त्यामुळे किनाऱ्यावर उतरताच आम्हाला किल्ल्यामधल्या पाताळपुरी देवस्थानाच्या आणि अक्षयवटाच्या दर्शनाला जायचे होते....
(क्रमशः)
बुधवार, ५ मार्च, २०२५
महाकुंभयात्रा-३
आम्ही २४ फेब्रुवारीला पहाटे प्रयागराजला पोहोचून २६ तारखेला रात्री मुंबईला परतणार होतो. आम्ही निघायच्या एक-दोन दिवस आधी बऱ्याच घडामोडी झाल्या.
आनंदचा जवळचा मित्र, भारतीय नौदलातील सेवानिवृत्त कमांडर लोकेश नुकताच प्रयागराजहून परतला होता. आमच्या सुनेचे आई-वडील, नेहा आणि धनंजय, हेही जाऊन आले होते. प्रयागराजमधल्या गर्दीची आणि तेथे येऊ शकणाऱ्या संभाव्य अडचणीची व्यवस्थित कल्पना आम्हाला त्या सर्वांकडून मिळाली होती. प्राचीच्या भावाच्या ओळखीने, संगमाजवळच एका फ्लॅटमधे दोन दिवसांची निवासव्यवस्था झाल्याचेही आम्हाला समजले होते. विमानतळावर आम्हाला घ्यायला येणाऱ्या टॅक्सीचालकाचा फोननंबरही आमच्या हातात आला होता. दरम्यान, आनंदच्या दुसऱ्या एका मित्राने, म्हणजे लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसबनीस याने बऱ्याच प्रयत्नांती, नवीन कॅंटोन्मेंटमधे २५ फेब्रुवारीच्या रात्रीचे दोन खोल्यांचे बुकिंगही आम्हाला मिळवून दिलेले होते.
प्रयागराजला जाऊन आलेल्या प्रत्येकाने आम्हाला बजावून सांगितले होते की सर्वप्रथम संगमावर जाऊन स्नान करून या आणि मगच इतरत्र कुठे जायचे तिथे जा. कारण, २६ फेब्रुवारीला महाशिवरात्र व शेवटचे अमृतस्नान असल्याने, संगमावर फार गर्दी होईल असा अंदाज होता. त्यामुळे शक्यतो २५ तारखेलाच आम्ही संगमापासून लांब असलेल्या नवीन कॅंटोन्मेंटमध्ये येऊन राहावे, म्हणजे संगम परिसरातील गर्दी व ट्राफिक जॅममध्ये अडकायचा प्रसंग येणार नाही, असेही सगळ्यांनी सुचवले होते.
पहाटे चार वाजताच्या मुंबई-प्रयागराज फ्लाईटसाठी, घरून अंघोळी करून, रात्री २ वाजता आम्ही मुंबई विमानतळावर पोहोचलो. विमान पूर्ण भरलेले होते. विमानातले जवळपास सर्वच प्रवासी महाकुंभयात्रेला निघाले होते, असे दिसले. बऱ्याच जणांनी अगदी ऐनवेळी तिकिटे काढलेली होती. काही जण त्याच दिवशी शेवटच्या विमानाने मुंबईला परतणार होते. तर काहीजण प्रयागराज, अयोध्या आणि वाराणसी करून परतणार होते. विमान प्रवाशांमधे आबालवृद्ध होते. कित्येकजण सहकुटुंब-सहपरिवार आलेले होते. अनेकांनी भगवी वस्त्रे परिधान केलेली होती. विमान आकाशात झेपावण्याच्या आधी, 'हरहर महादेव-हरहर गंगे' अशी घोषणा झाली. विमानात आम्हाला दिलेल्या जेवणांत सगळे उपासाचे पदार्थ होते. या सर्वच गोष्टींमुळे वातावरण संपूर्णपणे भक्तिमय झाले होते.
पहाटे सहा वाजता प्रयागराजला पोहोचताच आम्ही टॅक्सीने तडक सरस्वतीघाटाकडे निघालो. विमानतळाबाहेरच्या रस्त्याचे सुशोभीकरण करण्यात आले होते. रस्त्याच्या दुतर्फा मोठमोठे खांब उभारलेले होते आणि त्या खांबांवर कुंभ ठेवलेले होते. खांबांवर व कुंभांवर विद्द्युत दिव्यांनी रोषणाई केलेली होती. ठिकठिकाणी कुंभमेळ्याबाबत माहितीचे फलक लावलेले होते. हमरस्ता सोडून आम्ही गावात शिरलो. वाटेत लागलेल्या एका वस्तीकडे बोट दाखवत आमचा चालक उद्गारला, "ये चकिया और करेली इलाका है. कुख्यात गुंडा और दबंग राजकीय नेता अतीक अहमद का इलाका! वोही अतीक अहमद जिसकी कुछ महिने पहले हत्त्या हो गयी."
त्या चालकाचे शब्द ऐकताच, माझे मन ३० वर्षे मागे गेले. त्या काळी प्रयागराजमधे, म्हणजेच त्यावेळच्या अलाहाबादमधे पुष्कळ प्रमाणात गुंडाराज होते. त्यावेळी अतीक अहमद हा एक युवा नेता होता आणि जिकडे तिकडे त्याचे नाव ऐकू येत होते. कित्येक सायकल रिक्षांच्या मागे त्याचा फोटो आणि "अतीक अहमद (चकिया)" असे लिहिलेले पाहिल्याचे मला ठळकपणे आठवले. पण त्याकाळीही त्याचा जबरदस्त दरारा असल्याचे आम्ही ऐकून होतो. "योगीजींने सब गुंडा लोगोंको काबू में रखा है. उत्तर प्रदेश अब बहुत बदल गया है." आमच्या चालकाचे ते शब्द ऐकून मला खूप बरे वाटले.
जसजसे आम्ही घाटाजवळ पोहोचू लागलो तसतशी गर्दी वाढू लागली. आमच्या चालकाने गल्ल्या-बोळातून मार्ग काढत आम्हाला गंगेच्या तीरावरच्या सरस्वती घाटाच्या दिशेने नेले. पण तिकडे जाण्याचा रस्ता पोलिसांनी बंद केलेला होता. आनंदने त्याचे सैनिकी ओळखपत्र दाखवल्यामुळे आम्हाला पुढे घाटापर्यंत जाता आले. घाटाजवळच असलेल्या किल्ल्याच्या आत आर्मीचा Ordnance Depot आहे. आर्मीच्याच ताब्यात असलेल्या किल्ल्यामध्ये आम्हाला सहजी आतपर्यंत जाता आल्याने, आम्ही आमची टॅक्सी किल्ल्याच्या आतच ठेवली. तिथेच आर्मीचा एक रजिस्ट्रेशन काउंटर होता. किल्ल्यामध्ये हिंडण्यासाठीच्या परवानगीचे पासेस आनंदने तिथून घेतले. त्यानंतर आम्ही जेमतेम तीनशे मीटर दूर असलेल्या सरस्वती घाटाकडे चालत गेलो.
सरस्वती घाटावरून संगमापर्यंत जाण्यासाठी आर्मीनेच काही खाजगी बोटींची व्यवस्था केलेली होती. तिथे एक भली मोठी रांग लागलेली होती. पण सगळे भक्तगण अगदी शांतपणे रांगेमधे उभे होते. थोड्याच वेळात आम्ही बोटीमधे चढलो, सर्वांनी लाईफजॅकेट घातली आणि आमची बोट संगमाकडे निघाली. नदीकाठावरचे वातावरण खूपच प्रसन्न होते. नदीचे संपूर्ण पात्र वेगवेगळ्या आकाराच्या आणि प्रकारच्या नावांनी भरून गेले होते. आमची बोट संगमाकडे जात असताना, समोरच्या तीरावरच्या अरेल घाटावर लोटलेला अफाट जनसागर आम्हाला दिसत होता. अनेक भाविक त्या घाटावर गंगास्नानाचा आनंद घेताना दिसत होते. थोड्याच वेळात, आम्हाला संगमाचे अद्भुत दृश्य दिसू लागले. एकमेकांना भेटणारे ते दोन प्रवाह - एकीकडून संथपणे वाहत येणारी काळसर यमुना, आणि तिला आपल्यात सामावून घेण्यासाठी आसुसलेली, खळाळत येणारी, भुरकट रंगाची गंगा!
संगमाच्या जवळ आम्हाला सोडून आमचा नावाडी इतर प्रवाशांना आणायला निघून गेला. संगमाजवळच्या काठावर कपडे बदलण्यासाठी चांगले आडोसे आर्मीतर्फे तयार करून ठेवलेले होते. प्राची व अंजली गंगास्नान करण्यासाठी सज्ज होत्याच. स्नानानंतर बदलण्यासाठी त्यांनी कपडे सोबत आणलेले होते. पण आश्चर्य म्हणजे, आनंददेखील चक्क गंगास्नान करायला अंगावरचे कपडे काढून, swimming trunk घालून तयार झाला!
गंगेच्या खळाळत वाहत्या पात्रात ते तिघेही पुढे-पुढे जायला लागले. आम्हा तिघींच्या पर्सेस आणि चौघांचेही फोन सांभाळत मीही त्यांच्या मागे-मागे जाऊ लागले. गंगेच्या पाण्याला भलताच जोर असल्याने पायाखालची वाळू सरकत होती. संगमापर्यंत पोहोचेस्तोवर आम्हाला सकाळचे नऊ वाजले होते, सूर्य वर आलेला असला तरी पाणी चांगले थंडगार होते. अंजली व प्राचीने बरेच खोल पाण्यात शिरून डुबक्या मारल्या. आनंदही मस्तपैकी गंगास्नान करत होता. मी मात्र फक्त त्या तिघांचे फोटो आणि व्हिडीओ काढत होते. प्राची आणि अंजली सचैल स्नान करून बाहेर आल्या. "स्वातीताई, निदान फोटो काढून घेण्यासाठी तरी गंगेच्या पात्रामधे जरा आतपर्यंत जा" असा आग्रह प्राचीने धरला. त्यामुळे शेवटी मी आनंदचा हात धरून गंगेच्या पात्रामधे आतपर्यंत गेले. गंगेचे स्वच्छ, वाहते पाणी आणि आजूबाजूचे प्रसन्न वातावरण बघून मलाही उर्मी आली आणि मी चांगल्या दोन-तीन डुबक्या मारल्या. मी गंगेमध्ये डुबक्या मारत असतानाचा व्हिडीओ प्राचीने काढला होता. आम्ही पाण्यातून बाहेर आल्याआल्या, "अखेर गंगेत घोडी न्हाली" अशी कॅप्शन लिहून आनंदने तातडीने तो व्हिडीओ, माझ्या नकळत, आमच्या मुलांना पाठवून दिला!
गंगाकिनारी अनेक सुंदर गोष्टी बघायला मिळाल्या. पण त्याबाबत आता पुढील लेखामध्ये लिहीन.
(क्रमशः)
सोमवार, ३ मार्च, २०२५
महाकुंभयात्रा-२
मला ओळखणाऱ्या लोकांना, मी महाकुंभमेळ्याला जाणार आहे हे ऐकून वाटलेले आश्चर्य स्वाभाविकच होते. माझ्या मूळ स्वभावाशी मेळ न खाणारा हा निर्णय कोणत्या कारणामुळे झाला असेल याची उत्सुकताही अनेकांनी बोलून दाखवली.
१४४ वर्षांतून एकदा येणाऱ्या प्रयागराजमधील महाकुंभाबाबत जोरदार चर्चा बरेच दिवसांपासून चालू झाली असली तरी त्याकडे मी कधी फारसे लक्ष दिले नव्हते. महाकुंभाची तयारी योगी सरकार कशी करत आहे याबाबतच्या बातम्याही मी वाचत नव्हते. "ज्या सोहळ्यामध्ये मी सामील होण्याची सुतराम शक्यता नाही त्याबाबतची चर्चा मी कशासाठी ऐकायची?" असा माझा निर्विकार दृष्टिकोन होता. १४४ वर्षांतून एकदाच येणारा हा योग आपल्या हयातीत येत आहे हे आपले भाग्य आहे, आणि पुढच्यावेळी आपण या जगात नसू, म्हणून आपण जायला हवे, असे मला अजिबात वाटले नव्हते. महाकुंभामधे अनेक सेलेब्रेटी धेंडांनी हजेरी लावल्याबद्दलही मला कौतुक नव्हते. नागा साधूंना भेटायची इच्छाही मला नव्हती ओळखीतले, नात्यागोत्यातले अनेकजण महाकुंभासाठी जाणार होते. त्यांच्याकडे, किंवा आधीच तिथे जाऊन आलेल्या मंडळींकडे मी तिथल्या व्यवस्थेबाबत साधी चौकशीही केली नव्हती. कित्येकांच्या संगमस्नानाच्या कथा, फोटो, व्हिडीओ पोस्ट झाले. पण मी त्यापैकी कशाकडेच फारसे लक्ष दिले नव्हते. थोडक्यात काय तर, यापैकी कशामुळेही मला प्रेरित व्हायला झाले नव्हते. 'आपल्याला ज्या गावाला जायचेच नाहीये त्या गावाचा रस्ता कशाला विचारायचा?' अशीच माझी मनोधारणा होती, म्हणा ना.
महाकुंभ सुरु झाल्यापासूनच, माझ्या काही व्हॉट्सअप ग्रुप्समधले एकदोन महाभाग सातत्याने त्याबद्दल नकारात्मक पोस्ट टाकत होते. काही चांगले घडत असेल तर त्याविरुद्ध नकारात्मक लिहून आनंद मानणाऱ्या काही नतद्रष्ट लोकांच्या त्या पोस्ट्सकडे मी सहसा काणाडोळा करत असते. पण माझ्या मनाला त्या कुठेतरी खुपत होत्या. 'डाव्या' किंवा समाजवादी विचारसरणीच्या तथाकथित 'धर्मनिरपेक्ष' लोकांच्या जिभा, केवळ हिंदूंधर्मीयांच्या सणां-उत्सवांच्या विरोधात वळवळत असतात हे मी पाहिले आहे. सनातनी लोक मूलतः सहिष्णू असल्याने, ते अशा विघ्नसंतोषी लोकांना फारसा विरोध करत नाहीत, आणि त्यामुळेच असल्या लोकांचे फावते.
पहिले दोन आठवडे महाकुंभमेळ्यामधील उत्तम व्यवस्थापनामुळे मोदी-योगीजींची वाहवा जशीजशी व्हायला लागली, तसतशी या गँगच्या लेखणीला जास्त-जास्तच धार यायला लागली. गंगास्नान व त्यायोगे होणारे पापक्षालन अशा काही धार्मिक आस्थांविषयी कुचेष्टा सुरु झाली. तरीही बराच काळ मी अशा लोकांकडे दुर्लक्ष करत राहिले. मात्र, २९ जानेवारीला, मौनी अमावस्येच्या रात्री काही भाविकांच्या मृत्यूची अतिशय क्लेशदायक बातमी आली आणि या नकारात्मक लोकांच्या हातात जणू कोलीतच आले. "महाकुंभमेळ्यात इतकी अव्यवस्था आहे की चेंगराचेंगरी तर होणारच. अस्वच्छतेचा बजबजाट आहे, रोगराई पसरणार नाही तर काय?" असे 'ज्ञान' त्यांच्या लिखाणातून पाझरायला लागले.
त्यापाठोपाठच, म्हणजे ३१ जानेवारीला, माझी एक शालेय वर्गमैत्रिण, सुलेखा कानेगावकर, संगमस्नान केल्यानंतर फेसबुकलाइव्हवर आली. तिच्या व्हिडिओला अंगठा दाखवून मी तिचे कौतुक तर केलेच. पण ती प्रयागराजमध्ये आहे हे कळताच, 'मौनी आमावस्येला ती कुठे होती? तिला काही त्रास तर झाला नाही ना?' असे प्रश्न माझ्या मनामधे आले. त्यामुळे तिच्या काळजीपोटी मी तिला फोन केला. पुढची १५-२० मिनिटे ती महाकुंभमेळ्यातील सोयी-सुविधांबद्दल भरभरून बोलत राहिली. तेथील सुव्यवस्थेचे तिने केलेले वर्णन ऐकून मी खूपच भारावून गेले. तसेच काहीसे वर्णन माझ्या परिचयातील डॉ. माधवी दातार यांच्या लिखाणातूनही मला नंतर समजले.
मौनी अमावस्येला घडलेल्या दुर्घटनेनंतर कुंभमेळ्याकडे जाणाऱ्यांचा ओघ बराचसा आटेल अशी काही लोकांची अटकळ होती. पण तसे न होता, प्रयागराजकडे जाणाऱ्यांची संख्या वाढू लागली. त्या दुर्घटनेमुळे योगी-मोदीजींची नाचक्की होईल असेही काही लोकांना वाटले होते. परंतु, तसेही झाले नाही. त्यामुळे त्या विघ्नसंतोषी आणि मोदी-योगीविरोधी आघाडीचा जळफळाट वाढत गेला. त्यांच्याकडून नकारात्मक पोस्ट्सचा आणखी भडीमार सुरु झाला. आमच्या डॉक्टर्सच्या व्हाट्सअप ग्रुपवरील काही डॉक्टरांनी तर ताळतंत्र सोडून व्यक्त व्हायला सुरुवात केली. एखाद्या दुर्घटनेमधे निरपराध व्यक्तींचे मृत्यू झाल्यास, मग ते मृत्यू भले आपल्या शत्रूराष्ट्रवासीयांचे का असेनात, कुठल्याही संवेदनशील व्यक्तीला दुःखच व्हायला हवे. परंतु, या दुर्घटनेचेही भांडवल करून, आणि क्षुद्र राजकीय वैरभावनेने टवाळी आणि टिप्पण्या करणाऱ्या या टोळक्याचा मला मनस्वी राग आला. त्यानंतर मात्र मी सातत्याने कुंभमेळ्यातल्या व्यवस्थेबाबत माहिती घेऊ लागले. माझ्या मैत्रिणीने आणि इतर परिचितांनी सांगितलेल्या सकारात्मक गोष्टी लिहून, सर्व नकारात्मक पोस्ट्सना विरोध दर्शवू लागले. १२ फेब्रुवारीच्या रात्री अशाच काही चीड आणणाऱ्या पोस्ट्स माझ्या वाचनात आल्या. त्या क्षणी माझ्या मनात विचार आला की इतरांच्या माहितीवर विसंबून न राहता आपणच कुंभमेळ्यात जावे. स्वतः तिथल्या लोकांशी बोलावे, तिथली व्यवस्था कशी आहे ते स्वतःच्या डोळ्याने पाहावे, आणि मगच या नतद्रष्ट टोळक्याला विरोध करावा. ही तीव्र इच्छा मला झाली आणि काही तासांच्या आत आम्ही आमची तिकिटे काढलीदेखील! ज्या नकारात्मक लोकांच्या कुचाळक्यांमुळे मला हा अमृतानुभव मिळाला त्यांची मी आयुष्यभर ऋणी राहीन.
प्रयागराजला जायची आणि यायची विमानाची तिकिटे काढून झाली. आर्मीने खास कुंभमेळ्यासाठी सुरु केलेल्या armaan या वेबसाईटवर नोंदणी करून आम्ही संगमापर्यंत जाण्यासाठीचा 'आर्मी व्हिजिटर' पास काढला. आर्मीतर्फे बोटीची सोय होईल असेही आनंदने केलेल्या चौकशीतून समजले. संगमाजवळील किल्ला आर्मीच्याच ताब्यात आहे. जुने कॅंटोन्मेंट संगमाजवळ आहे आणि नवीन कॅंटोन्मेंट तेथून ८-९ किलोमीटर दूर आहे. आर्मीतर्फे अगदी स्वच्छ व सोयीस्कर निवासव्यवस्था माफक दरामध्ये आम्हाला मिळू शकली असती. जुन्या कॅंटोन्मेंटमधे, म्हणजे संगमाच्या अगदी जवळ राहता आले तर आम्हाला हवे होते, कारण तेथे राहून संगमापर्यंय जाणे सुकर झाले असते. पण प्रचंड गर्दीमुळे बुकिंग मिळत नव्हते. दूरवरच्या नवीन कॅंटोन्मेंटमधे अगदी डॉर्मेटरी मिळाली तरीही चालेल असा विचार आम्ही केला. परंतु, सातत्याने प्रयत्न करूनही २० तारखेपर्यंत काहीच हाती लागले नाही.
तेवढ्यात असे समजले की, प्राचीच्या भावाच्या एका पक्षकाराचे वडील प्रयागराजमधील एका मठाचे महंत आहेत. त्यांच्याकडून एखाद्या तंबूची किंवा तत्सम काहीतरी व्यवस्था होण्याची आशा निर्माण झाली. प्रवासाला निघण्याच्या दोन दिवस आधीपर्यंत आमच्या हातात पक्के असे काहीच नव्हते. शेवटी आपापले अंथरूण-पांघरूण किंवा sleeping bags घेऊन जायचीही मनाची तयारी आम्ही केली. पण आमच्या नशिबात काहीतरी वेगळेच होते, त्याबाबत पुढील भागात लिहीन.
(क्रमशः)
रविवार, २ मार्च, २०२५
महाकुंभयात्रा-१
१२ फेब्रुवारी २०२५. रात्रीचे दहा वाजले होते. मी माझा फोन चाळत बसले होते आणि अचानक मला काय वाटले कुणास ठाऊक? मी माझ्या मुंबईच्या वहिनीला फोन लावला, "प्राची, मी महाकुंभमेळ्याला चालले आहे. तुला यायचंय का? "
माझे बोलणे ऐकून प्राचीला बहुतेक हर्षवायू झाला असावा. ती कमालीच्या आनंदात म्हणाली, "अहो, मी अंजलीशी आत्ताच महाकुंभला जाण्याबाबत बोलत होते. पण आम्हाला सगळ्या अडचणीच समोर दिसत होत्या. तिचा फोन ठेवला आणि तुमचा फोन आला. आता तुम्ही जायचं ठरवताय म्हणजे आमची महाकुंभयात्रा निश्चित घडणार. आपण तिघी मिळून जाऊया. तुम्ही जसे ठरवाल तशा आम्ही दोघी येऊ." प्राचीकडून अशी बिनशर्त संमती मिळताच, प्रयागराजपर्यंत कसे जायचे याचा विचार मी करू लागले.
आनंद कॉम्प्युटरवर काहीतरी काम करत बसला होता. माझे आणि प्राचीचे बोलणे त्याच्या कानावर पडल्यामुळे आश्चर्यचकित होऊन तो मला म्हणाला, "तू खरंच महाकुंभ मेळ्यामधे जाणार आहेस?"
"हो. निश्चितच जाणार आहे मी. आणि तूही आलास तर मला बरे वाटेल."
"आणि गंगास्नानही करणारेस?" आनंदने विचारले.
"ते मी सांगू शकत नाही, पण मी जाणार हे निश्चित आहे. तू पण येणार का? तू येणार असशील तर चौघांनी एकत्र कसे जायचे या दृष्टीने विचार करूया."
"तुला मी बरोबर असावे असे वाटते आहे ना? मग मी येईन. "
आनंदचे उत्तर ऐकून मला अगदी सुखावायला झाले.
तितक्यात माझ्या मुंबईच्या भाच्याचा फोन आला, "आत्या, तू महाकुंभमेळ्याला खरंच जाणार आहेस? का नुसतीच आईची चेष्टा करते आहेस?"
"अरे, मी नक्की जाणार आहे. तुझी आई किती श्रद्धाळू आहे हे मला माहीत आहे. धार्मिक गोष्टींच्या बाबतीत मी तिची अशी चेष्टा कशी करेन?"
"अगं, पण त्या स्नानामुळे पापक्षालन, मोक्षप्राप्ती, वगैरे होईल या गोष्टींवर तुझा विश्वास तरी आहे का?"
"नाही. यापैकी कशावरही माझा विश्वास नाहीये, हे तुला चांगले माहिती आहे "
"मग तू महाकुंभामधे कशासाठी जाते आहेस?"
"अशा गोष्टींवर विश्वास असलेल्यांनीच महाकुंभाला जावे, असे कुठे लिहिले आहे? ना आपल्या धर्मामधे तसे सांगितले आहे, ना योगीजींनी तसे काही म्हटले आहे. कोणावरही कसलीही वैचारिक सक्ती नसणे, हेच तर आपल्या धर्माचे वैशिष्ठय आहे. मला जावेसे वाटतेय, मी जाणार आणि आमच्याबरोबर आनंदकाकाही येणार आहेत"
"आनंदकाकांनी तुझ्याबरोबर यावे असा आग्रह नक्की तूच धरला असणार. Otherwise, he would have never come. "
"मी आग्रह धरला नाही. पण माझ्याबरोबर त्यांनी यावे, ही इच्छा मी बोलून दाखवली आणि ते लगेच तयार झाले"
"चला. मग काय? तिकडे जाऊन तुम्ही दोघेही गंगास्नान करून पावन होणार नां?" भाच्याने आता जरा चेष्टेचाच सूर लावला.
"तुझी आई आणि तुझी मामी गंगास्नान करतील. त्यांच्याबरोबर संगमापर्यंत मी जाईनच. त्यांचे सामान सांभाळेन. त्यांचे व्हिडीओज आणि फोटोज काढेन आणि तुम्हाला पाठवीन. आनंदकाका गंगास्नान करणार की नाहीत, याबाबत तेच सांगू शकतील. पण आम्ही तिथे जाणार हे निश्चित."
"पण मला सांग, आनंदकाका पूर्वी तीन-साडेतीन वर्षे प्रयागराजमधेच पोस्टिंगवर होते. त्या काळात तुम्ही कधीतरी संगमावर जाऊन गंगास्नान केले होते का?" भाच्याने आता माझी उलटतपासणी घ्यायला सुरुवात केली.
"त्या काळात आमच्याकडे आलेल्या अनेक पाहुण्यांना आम्ही संगमावर नेऊन आणले. पण आम्ही दोघांनी कधीच गंगास्नान केले नाही हे खरे आहे. पण आता तुझे प्रश्न थांबव आणि फोन ठेव. आम्हाला पुढचं सगळं प्लॅनिंग करायचं आहे."
प्रयागराजपर्यंत पोहोचण्याचे मार्ग काय-काय आहेत, त्यापैकी कोणता मार्ग सगळ्यात श्रेयस्कर, चौघांच्या दृष्टीने सोयीच्या तारखा कोणत्या आहेत, प्रवासात काय-काय अडचणी येऊ शकतील याबाबत पुढचा अर्धा-पाऊण तास उलट-सुलट चर्चा झाली. आम्हा दोघांनाही खरे तर स्वतःच्या गाडीने जाण्याची इच्छा होती. प्राचीचा ड्रायव्हर, आनंद आणि मी, असे तिघेजण आळीपाळीने गाडी चालवू शकलो असतो. पण त्यासाठी कमीतकमी पाच ते सहा दिवसांचा दौरा आखावा लागला असता. अंजलीच्या मुलीची परीक्षा असल्याने, पाच-सहा दिवस काढणे अंजलीला शक्य नव्हते. प्रयागराजजवळच्या हमरस्त्यांवर वरचेवर होत असलेल्या ट्रॅफिक जॅमच्या बातम्याही आम्ही ऐकून होतो. रेल्वेची तिकिटे मिळणे केवळ अशक्य होते. प्राची आणि अंजलीशी एक-दोन वेळा चर्चा झाल्यावर आम्ही विमानाने जायचे निश्चित केले. साधारण रात्री ११.३० वाजेपर्यंत आमची विमानाची तिकिटे काढून झालीसुद्धा!
माझा मुंबईचा भाऊ त्याच्या वकिली व्यवसायामधे अतिशय व्यग्र असल्यामुळे रोजच रात्री जेमतेम ११-१२ वाजेपर्यंत तो घरी येतो. भाऊ घरी परतला आणि आमची प्रयागराजची तिकिटे काढून झाली आहेत, ही सनसनाटी बातमी त्याला मिळाली. त्याला न विचारता, न कळवता, प्राचीने जाण्याचे पक्के केले आणि त्या बेतामध्ये मीही सामील आहे हे ऐकून तो अचंबित झाला असावा. त्याने मला फोन केला.
"स्वाती, प्राची सांगते आहे की महाकुंभमेळ्याला जायचे तू ठरवलेस आणि प्राचीला "येणार का?" असे विचारलेस म्हणे! खरे आहे का हे? का ती उगीच आपलं तुझं नाव पुढे करते आहे?"
"प्राची सांगते आहे ते अगदी खरे आहे. मलाच अचानक महाकुंभमेळ्याला जायची इच्छा झाली. पण कोणीतरी बरोबर असावे असे मला वाटले. प्राची भाविक आहे. तिची जायची इच्छा असणार, याची मला खात्री होती. म्हणून मी तिला फोन केला."
"प्राचीची इच्छा असणे स्वाभाविक आहे. पण मुळात तुला जायची इच्छा कशी काय झाली हेच मला कळत नाहीये! आणि तुझ्या इच्छेखातर आनंदसुद्धा यायला तयार झालाय म्हणे! तुझे डोके मूळ स्वभावाच्या उलट चालायला लागले आहे, का आता साठी उलटल्यानंतर तू भक्तिमार्गावर चालायचे ठरवले आहेस?"
माझ्या स्वभावाच्या उलट दिशेने जाण्याचा माझा निर्णय कशामुळे झाला हे गिरीशला समजावून सांगणे अवघड होते. त्यामुळे त्याच्या प्रश्नाला उत्तर द्यायचे मी टाळले.
महाकुंभमेळ्याला जाण्याची प्रेरणा नेमकी कशामुळे मिळाली याबद्दल अनेकजणांच्या कथा माझ्या वाचनात आल्या होत्या. मला मात्र महाकुंभमेळ्याला जाण्याची तीव्र इच्छा एका अगदी निराळ्याच कारणामुळे झाली होती. त्याबाबत मी पुढील भागामधे सांगेन...
(क्रमशः)शनिवार, १५ फेब्रुवारी, २०२५
बुलढाणा जिल्ह्यातील भ्रमंती- ५
लोणार सरोवर बघून आम्ही संध्याकाळी MTDC रिसॉर्टवर परत आलो, आणि इथे "कोणी चांगला माहितगार गाईड आहे का?" अशी विचारणा तिथल्या कर्मचाऱ्यांकडे केली. महेश मिश्रा नावाच्या गाईडचा नंबर त्यांच्याकडून मिळाला. मी लगेच महेश मिश्रांशी संपर्क साधला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता लोणार सरोवराच्या प्रवेशद्वाराजवळ भेटायचे आम्ही ठरवले. उद्या पहाटे तो आमच्या बरोबर लोणार सरोवरापर्यंत येऊन त्या परिसरातील सर्व मंदिरांची माहिती देणार होता.
रात्रीचे जेवण लवकर उरकून आम्ही त्वरित झोपून गेलो. दुसऱ्या दिवशी पहाटे आंघोळीच्या गरम पाण्याने दुखरे अंग शेकून घेतले आणि बरोबर सात वाजता आम्ही ठरलेल्या जागी पोहोचलो. महेश मिश्राही वेळेत तिथे आलेला होता. महेश हा जेमतेम तिशी पार केलेला, एम.कॉम. शिकलेला, मृदुभाषी तरुण आहे. त्याचे आडनाव मिश्रा असले तरी तो उत्तम मराठी बोलत होता. पहिल्या पाच-सात मिनिटांमधले त्याचे बोलणे ऐकूनच, चांगला माहितगार गाईड मिळाला असल्याची आम्हा दोघांची खात्री पटली. लोणार परिसराचे गाढे अभ्यासक, व तेथील कॉलेजचे माजी प्राचार्य कै. सुधाकर बुगदाणे सरांशी महेशचा शालेय जीवनातच संपर्क आलेला होता. त्यांच्यासोबत हा संपूर्ण परिसर महेशने हिंडून पाहिलेला होता. बुगदाणे सरांकडून महेशने मिळवलेल्या माहितीला, MTDC आणि वनखात्याकडून त्याने घेतलेल्या प्रशिक्षणाचीही जोड मिळालेली आहे.
महेशने सांगितले की, सरोवराच्या परिसरामधे महादेवाची एकूण बारा मंदिरे आहेत. या बारा महादेवांचे दर्शन घेतले तर भारतभर विखुरलेल्या बारा ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाचे पुण्य मिळते असे मानतात. गोमुख तीर्थाच्या जवळच असलेले, भल्या मोठ्या पिंपळाच्या झाडाजवळचे हटकेश्वर किंवा हटेश्वर मंदिर हे तंत्र-मंत्र करणाऱ्या हटयोगी लोकांचे आराध्यदैवत आहे. या मंदिरातली पिंड उत्तराभिमुख नसून पूर्वाभिमुख आहे. पूर्वाभिमुख पिंड हे प्रत्येक 'हटेश्वर' किंवा हटकेश्वर' महादेव मंदिराचे वैशिष्ट्य असते. तिथून जवळच नारदेश्वर मंदिर आहे. ही दोन मंदिरे पहिली आणि आम्ही पायऱ्या उतरून सरोवराच्या दिशेने जायला लागलो. हटकेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूने खाली असलेले पापहरेश्वर मंदिर दिसत होते. पण तिथे जाण्यासाठीचा रस्ता चांगला नसल्यामुळे आम्ही ते मंदिर दुरूनच पाहिले. पापहरेश्वर मंदिराच्या आसपास उत्खननाचे काम चालू असून तिथे भुयारी मार्ग आणि जुन्या मंदिरांचे काही अवशेष सापडलेले आहेत. काही पायऱ्या उतरून गेल्यावर डाव्या हाताला कुमारेश्वर मंदिर लागले. राष्ट्रकूट काळातले, हेमाडपंती शैलीतील या मंदिराची रचना इजिप्तच्या पिरॅमिड्स सारखी आहे. कुमारेश्वर मंदिराच्या समोरील झऱ्याला 'सीतान्हाणी' किंवा 'ललित तीर्थ' असे म्हणतात. राम-लक्ष्मण व सीता वनवासात असताना, रामाने जमिनीत बाण मारून हा झरा काढला आणि सीतेला स्नान करण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले होते, अशी आख्यायिका आहे. या तीर्थाच्या पाण्यामधे स्नान करू नये अशी पाटी असूनही वनखात्याचा एक कर्मचारी, तिथून नुकताच स्नान आटपून बाहेर पडताना दिसला!
त्यानंतर आम्ही यज्ञेश्वर महादेव मंदिराजवळ पोहोचलो. कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रेश्वर मंदिराच्या छताला जसे गोलाकार भोक आहे तसेच भोक या मंदिराच्या छताला आहे. हे भोक पूर्वीच्या काळात आकाशदर्शनासाठी वापरले जात असे. पण आता ते भोक बुजवलेले आहे. शुक्राचार्य ऋषी या मंदिराचा वेधशाळा म्हणून वापर करायचे. या मंदिराजवळील एका मोठ्या शिळेतून वेगवेगळे आवाज निघतात. जवळच असलेले याज्ञवल्केश्वर मंदिर मात्र पूर्णपणे उध्वस्त झालेले आहे. शिवभक्त असलेले याज्ञवल्केश्वर हे आयुर्वेदाचे तज्ज्ञ होते. त्यांनी या परिसरातील वनस्पतींचा अभ्यास करून विविध रोगांवर औषधे शोधली होती. तिथून जरासे उंच स्तरावर असलेले रामगया मंदिर महेशने आम्हाला दाखवले. या मंदिरातील राम-लक्ष्मण व सीतेच्या प्राचीन मूर्ती निजामाच्या काळात फोडल्या गेल्या. आता इथे रामाची एक लाकडी रंगवलेली मूर्ती बसवलेली आहे. या मंदिरामधे तिन्ही बाजूने प्रकाश येतो. गर्भगृहासमोर आपण उभे राहिलो की आपल्याला तीन सावल्या दिसतात, हे या मंदिराचे वैशिष्टय आहे. होकायंत्राच्या सहाय्याने या मंदिराच्या दगडामधील चुंबकीय गुणधर्माचे प्रात्यक्षिक महेशने आम्हाला करून दाखवले. मंदिराजवळ रामकुंड नावाचे एक चौरसाकृती कुंड आहे. तिथून पुढे सरोवराकडे चालत जात असताना, लोणार सरोवराची आणि त्या परिसरातल्या वनस्पती व प्राणिसृष्टीबद्दलची खूप माहिती महेश आम्हाला देत होता. वाटेवर पडलेले साळींदराचे काटे आणि लालचुटुक गुंज बिया त्याने उचलून मला दिल्या, महादेवाच्या पिंडाच्या आकाराची बी असलेले लाल फूल दाखवले, अनेक झाडांची, पक्ष्यांची व प्राण्यांची माहिती दिली. तिथे वाटेतच पडलेली बिबट्याची विष्ठाही त्याने आम्हाला दाखवली. बिबट्याचा नित्य वावर त्या वाटेवर होत असल्याचे लक्षात येताच आम्ही पुन्हा एकदा मनातून जरा चरकलो!
कमळजा मंदिराच्या वाटेवर, वाघ महादेव मंदिर, मोर मंदिर, शंकर-गणेश मंदिर अशी अर्धवट पाण्याखाली गेलेली आणि मोडकळीला आलेली काही मंदिरे आम्हाला काठावरूनच पाहता आली. कमळजा मंदिराचाही काही भाग पाण्यात गेलेला आहे. त्या मंदिरापुढे, सरोवराच्या परिघावर असलेली बगीचा मंदिर अथवा विष्णू मंदिर, देशमुख महादेव मंदिर, अंबारखाना मंदिर, चोपडा महादेव, मुंगळा महादेव, ही मंदिरे मात्र हल्ली संपूर्णपणे पाण्याखाली असल्याने आम्हाला पाहता आली नाहीत. महेशने आम्हाला सांगितले की लोणार सरोवराचे पाणी खारट असले तरी अत्याधिक आम्लारी (alkaline) असल्यामुळे या सरोवराच्या पाण्यात मासे जगू शकत नाहीत, आणि ते पाणी पिण्यासाठीही अयोग्य आहे. मात्र त्या पाण्यात वाढणारे प्रथिनयुक्त शेवाळ किंवा Blue-Green Algae खायला विविध स्थलांतरित पक्षी दरवर्षी येऊन जातात. लिटमस पेपरच्या सहाय्याने सरोवराच्या पाण्याचा pH तपासल्यास १२ च्या आसपास येतो असे महेशने आम्हाला सांगितले. त्यानंतर एका पारदर्शक ग्लासमधे सरोवराचे पाणी त्याने घेतले व त्यामध्ये हळद घातली. हळदीमुळे त्या पाण्याचा रंग पिवळा न होता त्यातील आम्लारी गुणधर्मामुळे काही क्षणातच ते पाणी कुंकवाच्या रंगासारखे लाल झाले. मग त्याच लाल पाण्यामधे महेशने लिंबाचा रस मिसळला. लिंबूरस आम्लधर्मी असल्याने त्या पाण्याच्या अम्लारीधर्मावर मात झाली आणि त्या लाल पाण्याचा रंग बदलून पिवळा झाला. प्रयोगशाळेमधले रसायनशास्त्राचे प्रत्याक्षिकच आमच्यासमोर चालू असल्यासारखे आम्हाला वाटले. या पाण्यावर विशिष्ट प्रकारचे दगड तरंगतात हे महेशने दाखवल्यावरही आम्हाला आश्चर्य वाटले. लोणार सरोवराचा परिसर अनेक अद्भुत आणि गूढ गोष्टीनी भरलेला आहे. या खाऱ्या पाण्याच्या सरोवराशेजारी खड्डा खणल्यास तिथे मात्र गोड्या पाण्याचे झरे लागतात. सरोवराच्या अगदी शेजारी गोड्या पाण्याची एक विहीरदेखील आहे. सरोवराच्या आसपासची माती लोहकणमिश्रित आहे. तिथल्या काही दगडांमधे चुंबकीय गुणधर्म आहेत. या परिसरामध्ये अजूनही अनेक भुयारी मार्ग, मूर्ती, मंदिरे आणि इतर ऐतिहासिक अवशेष मिळण्याची शक्यता असल्याने, पुरातत्वखात्यातर्फे उत्खनन व संशोधन अजूनही चालूच आहे.
सकाळच्या वेळी सरोवराचे सौंदर्य जास्तच खुलून दिसत होते आणि थंड वातावरणातली भटकंतीही आल्हाददायक वाटत होती. मंदिरे बघून परतत असताना, लोकांनी वाटेतच टाकून दिलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या व पिशव्या महेश गोळा करत होता. वर पोहोचल्यावर तो सगळा कचरा त्याने कचरापेटीत टाकला. आपल्या परिसराचे सौंदर्य जपण्यासाठीची त्याची धडपड पाहून आम्हाला अतिशय कौतुक वाटले. आम्ही वर येईपर्यंत साडेअकरा वाजून गेले होते. आम्हाला त्याच दिवशी मोठा पल्ला गाठून पुण्याला परतायचे होते. त्यामुळे गोमुख धारेवरील मंदिरांची माहिती आम्ही बाहेरूनच ऐकली. या धारेच्या वरच्या बाजूला देवीच्या आणि बालविष्णू मंदिरांमधे अनेक कोरीव शिल्पे आहेत. आम्ही आमच्या खोलीवर परतलो आणि झटपट सामान आवरून खोली सोडली. दैत्यसूदन मंदिराजवळ पुन्हा महेशला भेटायचे ठरले होते. आदल्या दिवशीही आम्ही ते सुंदर मंदिर बघून आलो होतो. पण त्या मंदिराचा इतिहास, स्थापत्यशास्त्र, पौराणिक महत्त्व आणि तिथली कलाकुसर याबाबत महेशने आम्हाला सविस्तर माहिती दिली. हे मंदिर चालुक्यराजा विजयादित्य याने लोकपालदेवी या आपल्या पत्नीच्या आग्रहास्तव बांधले होते. १८७८ साली उत्खनन करून हे मंदिर मातीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. मंदिरात मूळ मूर्ती मात्र सापडली नव्हती. सध्या मंदिरामध्ये असलेली विष्णूची मूर्ती नागपूरच्या राजे भोसले यांनी दिलेली आहे. मंदिराच्या गर्भगृहाच्या छतावर अनेक सुंदर शिल्पचित्रे कोरलेली आहेत. त्यामध्ये लवणासुराचा वध आणि इतरही अनेक कथा चितारलेल्या आहेत. मंदिराच्या बाह्यभागावर अतिशय रेखीव शिल्पे आहेत. त्यामधे ब्रम्हा-विष्णू-महेश, श्रीकृष्ण, महिशासुरमर्दिनी, नृसिंह अशा अनेक देवादिकांची चित्रे कोरलेली आहेत. तसेच खजुराहो येथील मंदिरांमध्ये आहेत तशीच कामक्रीडेची काही शिल्पचित्रेही आहेत. लोणार येथे प्रत्यक्षात जाऊनच अनुभवायला व मनात साठवायला हवे असे दैत्यसूदन मंदिराचे सौंदर्य आहे.
दैत्यसूदन मंदिर बघून झाल्यावर आम्ही मोठा मारुती मंदिर बघायला गेलो. १८४१ साली कोकणातून आलेल्या कानिटकर घराण्यातील एका संतपुरूषाला ही ९ फूट ३ इंच लांब आणि चार फूट रुंद अशी हनुमानाची भव्य मूर्ती पालापाचोळ्यामधे सापडली होती. तिथे राहून ते या मूर्तीची पूजा-अर्चा करायचे. निजामाचा दिवाण, राजा चंदुमल याने १८६५ साली इथे मंदिर बांधून दिले. या मूर्तीला अनेक वर्षे शेंदूर फासला जात होता. त्यामुळे ही मूर्ती दिसायला अगदीच ओबडधोबड होती. काही वर्षांपूर्वी या मूर्तीवर साठलेला जवळपास वीस टन शेंदूर खरडून काढण्यात आला. त्यानंतरच या मूर्तीचे मूळ सुंदर रूप दिसू लागले. काळ्या दगडात कोरलेली ही मूर्ती अतिशय भव्य आणि रेखीव आहे. या मूर्तीचा दगडही चुंबकीय गुणधर्म असलेला आहे. कानिटकर कुटुंबीयांनी अलीकडेच त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. हे मंदिर पाहून झाल्यावर, महेश आम्हाला लोणार सरोवराच्या 'व्ह्यू पॉंईंट'वर घेऊन गेला. तिथे उंचावर उभे राहून लोणार सरोवराचे मनोहर दृष्य आम्ही डोळ्यात आणि आमच्या फोनच्या कॅमेऱ्यामधे बंदिस्त केले आणि मोठ्या जड मनाने पुण्याकडे निघालो.
महाराष्ट्रातील सात आश्चर्यापैकी लोणार सरोवर हे एक आहे, हे मला तिथे जाईपर्यंत माहिती नव्हते, याची मला लाज वाटली. या सरोवराची निर्मिती निसर्गाच्या चमत्कारामुळे झाली आहे. सरोवर आणि भोवतालचा प्रदेश म्हणजे नैसर्गिक सौंदर्याचा आविष्कार आहे. आपल्या राजे-रजवाड्यांनी इथे सुंदर मंदिरे बांधून या जागेच्या सौंदर्यामधे भर घातलेली आहे. त्यांची कल्पकता, कलासक्तता आणि दूरदृष्टी जागोजागी दिसून येते. पण इतक्या सुंदर स्थळाला म्हणावी तितकी प्रसिद्धी मिळालेली नाही. त्यामुळेही असेल कदाचित, पण इथे पर्यटन-विकास खूपच कमी झालेला वाटला. अजिंठा-वेरूळपर्यंत येणारे काही जाणकार परदेशी पर्यटक मात्र आवर्जून लोणारलाही येतात. देशातील ऐतिहासिक स्थळाबद्दल भारतीयांमधे असलेली अनास्था बघून त्यांना काय वाटत असेल याची कल्पना न केली तर बरे. विदर्भामधे भेटलेल्या अनेक स्थानिक लोकांना मी "लोणार-मेहेकर पाहिलेत का?" असा प्रश्न विचारला. अनेकांनी ते अजून बघितलेले नाही असे कळले. खरे तर, प्रत्येक शाळा-कॉलेजच्या सहली इथे नेऊन विद्यार्थ्यांना या स्थळाचे पौराणिक, ऐतिहासिक, भौगोलिक, भूगर्भशास्त्रीय, आणि खगोलशास्त्रीय महत्त्व समजावून सांगितले पाहिजे. जीवशास्त्र, रसायनशास्त्र, पदार्थविज्ञान, या आणि इतर अनेक शास्त्रांची प्रात्यक्षिके इथल्या रम्य वातावरणामधे दाखवल्यास विद्यार्थ्यांमधे शास्त्र विषयाची गोडी वाढवता येईल असे मला वाटले.
पुण्या-मुंबईकडचे माझ्यासारखे अनेक सुशिक्षित लोक विदर्भ, मराठवाडा खानदेश या भागाबद्दल बऱ्यापैकी अनभिज्ञ असतात असे मला अनेकदा जाणवते. मागे मराठवाड्यामधील परळी वैजनाथ, औंढा नागनाथ आणि आसपासची देवळे पहिली तेंव्हाही मला असेच वाटले होते. आम्हाला भेटलेल्या तेलंगणनिवासी बँक अधिकाऱ्यांच्या सांगण्याप्रमाणे, बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यही भेट देण्यासारखे आहे. या जिल्ह्यात आम्ही ज्या भागांमधे फिरलो, तो सगळा प्रदेश हिरवागार दिसला. तिथले शेतकरी प्रगत असावेत आणि एकूण बऱ्यापैकी सुबत्ता असावी असे वाटले. तिथले लोक बोलायला नम्र आणि मदत करायला तत्पर दिसले. एक गोष्ट मात्र खटकली. ती म्हणजे, शेगाव कचोरी वगळता खास वैदर्भीय खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येईल असे एकही उपाहारगृह आम्हाला दिसले नाही. आपली भाषा, आपला इतिहास, आपली कला, आपली संस्कृती आणि आपली खाद्यसंस्कृती या सगळ्याचा पोकळ अभिमान बाळगून उपयोग नाही. या गोष्टींचे जाणीवपूर्ण जतनही केले पाहिजे याची प्रकर्षाने जाणीव झाली. लोणार सरोवर परिसरामधे प्लास्टिकला बंदी असल्यासंबंधीचे अनेक फलक लावलेले होते. तरीही जागोजागी प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि पिशव्या पडलेल्या बघून खूप वाईट वाटले. या परिसराचे सौंदर्य टिकावे असे वाटत असेल तर पर्यटकांचे सामान तपासून प्लॅस्टिकच्या पिशव्या व बाटल्या प्रवेशद्वाराजवळच काढून ठेवण्याची सक्ती करायला हवी.
फारसे काही पूर्वनियोजन केलेले नसतानाही आमची बुलढाणा जिल्ह्याची भ्रमंती उत्तम रीतीने पार पडली. आता पुन्हा कधीतरी मुद्दाम ठरवून किमान चार-पाच दिवसांचा दौरा काढला पाहिजे, असे वाटते. बघू या पुन्हा केंव्हा योग येतो ते!
मार्गदर्शक श्री. महेश मिश्रा यांना संपर्क करण्यासाठी दूरध्वनी क्रमांक:- ८२०८३६१४४६ / ९५२७९७९५३८
बुलढाणा जिल्ह्यातील भ्रमंती-४
बुधवार, १२ फेब्रुवारी, २०२५
बुलढाणा जिल्ह्यातील भ्रमंती-३
लोणार सरोवराबाबत गेली कित्येक वर्षे वर्तमानपत्रांमधून आलेले अनेक लेख मी वाचलेले होते. हजारो वर्षांपूर्वी एका उल्कापातामुळे तयार झालेले हे सरोवर भारतातीलच नव्हे तर अख्ख्या जगातील एक आश्चर्य समजले जाते. या सरोवराचे वैशिष्ट्य असे की, उल्कापातामुळे जगभरामधे अनेक ठिकाणे विवरनिर्मिती झाली. पण फक्त याच विवराचे रूपांतर खाऱ्या पाण्याच्या सरोवरामधे झालेले आहे. "सुमारे सव्वातीनशे पायऱ्या उतरून आणि जंगलातली पायवाट चालून, आपण अगदी सरोवरापर्यंत जाऊन आलो तरीही, लोणार सरोवर परिसर बघायला अर्धा दिवस पुरतो" असे मला अनेकांनी सांगितले होते. त्या दृष्टीने आम्ही MTDC रिसॉर्टमधल्या खोलीचे एकाच रात्रीचे बुकिंग केले होते. आम्ही पोहोचलो तो शनिवार होता. लोणार ते पुणे हा प्रवास कमीतकमी ८ ते ९ तासांचा आहे असे आम्हाला गुगल मॅप्सवर दिसत होते. त्यामुळे, संध्याकाळच्या आत सरोवर बघायचे, दुसऱ्या दिवशी पहाटे उठून दैत्यसूदन मंदिर बघून उशिरात-उशिरा सकाळी नऊ वाजेपर्यंत लोणारहून निघून, दिवसाढवळ्या पुण्याला पोहोचायचे, असे आम्ही मनाशी ठरवले होते.
मेहेकर येथील सुंदर मंदिरे पाहून झाल्यावर आम्ही साधारण दुपारी अडीच-तीनच्या सुमारास MTDC रिसॉर्टमध्ये पोहोचलो. या रिसॉर्टमध्ये छोट्या-छोट्या अनेक टुमदार बंगल्या आहेत. प्रत्येक बंगलीमधे एक डबलरूम, अटॅच्ड टॉयलेट आणि खोलीच्या समोर व मागच्या बाजूला व्हरांडा आहेत. या व्हरांड्यांमधे प्लॅस्टिकच्या आराम खुर्च्या ठेवलेल्या असतात. चार-चार बंगल्यांच्या मधल्या चौरस भागामधे चांगली निगराणी राखलेले हिरवेगार लॉन आहे. आसपासच्या संपूर्ण परिसरामधे भरपूर झाडे आहेत. शिवाय संपूर्ण रिसॉर्टच्या आवारामध्ये छान फुलझाडे लावून सुशोभीकरण करण्यात आलेले आहे. एकूण तिथले वातावरण शांत आणि प्रसन्न आहे. व्हरांड्यामधल्या खुर्च्यांवर बसून निवांतपणे चहाचे घोट घेत त्या वातावरणाचा सुखद अनुभव घेता येतो. या रिसॉर्टचे रेस्टॉरंट वरच्या मजल्यावर आहे. त्या मजल्याची उंची मुद्दामच खूप जास्त ठेवलेली असल्यामुळे पूर्वी तिथूनच लोणार सरोवराचे दर्शन व्हायचे. पण आता रेस्टॉरंट आणि लोणार सरोवर यांच्या दरम्यान खूप झाडी वाढल्यामुळे तिथून सरोवर दिसत नाही.
MTDCच्या थोड्याफार गलथान कारभाराची पहिली झलक आम्हाला रिसेप्शन काउंटरवर गेल्याबरोबर मिळाली. महाराष्ट्रातल्या ज्या-ज्या पर्यटनस्थळी MTDC ची रिसॉर्ट आहेत त्या सर्व ठिकाणांची माहितीपुस्तके तिथल्या एका शेल्फमधे ठेवलेली दिसली. मी साहजिकच लोणारचे माहितीपुस्तक शोधू लागले. तिथल्या मॅनेजरने अगदी थंडपणे, 'लोणारची माहितीपुस्तके संपली आहेत. लोणार वगळता इतर सर्व माहितीपुस्तके आहेत' असे उत्तर दिले. त्याच्या आवाजामध्ये कुठलीही दिलगिरी नव्हती हे प्रकर्षाने जाणवले.
आमच्या बंगलीची किल्ली घेऊन आम्ही सामान खोलीत ठेवले. खोल्यांची देखभाल फारशी चांगली नाही, हे लगेच जाणवले. आजकाल कोणत्याही साध्या हॉटेलच्या खोलीमध्ये आंघोळीचा साबण, शाम्पू, टूथपेस्ट, पाणी गरम करण्याची किटली, हे सर्व ठेवलेले असते. त्या बंगलीमध्ये यापैकी एकही गोष्ट तर नव्हतीच, पण टॉवेल्स व नॅपकिन्सदेखील ठेवलेले नव्हते. चौकशी करता सांगण्यात आले की, "लॉंड्रीवाला दोन वाजता येईल, तेंव्हा टॉवेल मिळतील." खोलीमध्ये 'वायफाय' कनेक्शन होते पण इंटरनेट चालू नव्हते. त्याचे कारण ऐकून तर आम्ही धन्य झालो. "इंटरनेट कनेक्शनची फी वेळेत भरलेली नसल्याने कनेक्शन कापलेले आहे!"
दुपारी जेवणाच्या वेळेस आम्ही मेहेकरच्या बालाजी मंदिरात साबुदाणा उसळीचा प्रसाद खाल्लेला असल्यामुळे जेवायची भूक नव्हतीच. चहा घेऊन लगेच आम्ही सरोवर परिसर हिंडायला जायचे ठरवले. पण तिथल्या सहाय्यकाने दोन कप चहा आणायला अर्धा तास लावला. अल्युमिनियम फॉईलने झाकून आणलेल्या कपांमधला तो चहा आमच्या हातात येईपर्यंत थंड झालेला होता. महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना द्यायची असेल तर अशा अनेक लहान-मोठ्या गोष्टीकडे लक्ष देणे अत्यावश्यक आहे असे जाणवले.
लोणार गावामधे MTDC रिसॉर्ट व्यतिरिक्त 'विक्रांत रिसॉर्ट' आणि 'कृष्णा लॉज' अशाही दोन जागा राहण्याजोग्या आहेत असे समजले. पण लोणार सरोवराच्या सर्वात जवळचे निवासस्थान MTDC रिसॉर्ट हेच आहे. कृष्णा लॉज ST स्टँडच्या समोरच आहे. तिथे कदाचित रास्त भावात राहण्याची सोय होत असावी. विक्रांत रिसॉर्टचे दर MTDC रिसॉर्टपेक्षा जास्त आहेत असेही समजले. अर्थात, ही सगळी माहिती आम्हाला स्थानिक लोकांकडून 'ऐकीव' स्वरूपात मिळालेली असल्याने आणि आम्ही कृष्णा लॉज किंवा विक्रांत रिसॉर्ट येथे प्रत्यक्ष जाऊन शहानिशा करून घेतलेली नसल्याने खात्रीशीर म्हणता येणार नाही.
चहा घेऊन आम्ही निघालो. लोणार सरोवराच्या बाहेर रस्त्यावरच आमची गाडी उभी केली. तिथे जेमतेम पाच-सहा गाड्याच उभ्या होत्या. बाहेर हातगाडीवर तीन-चार फळविक्रेते, प्लॅस्टिकच्या ग्लासमध्ये उघड्यावरच ठेवलेल्या अननस आणि कलिंगडाच्या कापलेल्या फोडी विकत होते. काही पर्यटक ते विकत घेऊन खातही होते. 'उघड्यावरील फळे आणि अन्न खाऊ नये' असे शाळेत कितीही शिकवले गेले तरी प्रत्यक्षात मात्र ते पाळले जाताना दिसत नाही. "असल्या पोपटपंची शिक्षणाचा तरी काय उपयोग?" असे मला वाटून गेले. आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता बाळगण्याची सवय आपल्या देशातल्या सामान्यजनांना लावण्यासाठी अशा छोट्याछोट्या गोष्टींमधे प्रचंड काम करणे आवश्यक आहे.
सरोवर परिसरात जाण्यासाठी सकाळी सातपासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच प्रवेश दिला जातो. पाच वाजता प्रवेशद्वार बंद केले जाते, पण खाली सरोवरापर्यंत गेलेल्या पर्यटकांना गडबडीने वर यावे लागत नाही. खाली गेलेले सर्व पर्यटक वर आलेले आहेत याची खात्री करून मगच प्रवेशद्वाराला कुलूप लावले जाते. मुख्य प्रवेशद्वारावर प्रत्येक पर्यटकाला आपले नाव, गावाचे नाव, फोननंबर यांची नोंद करावी लागते. त्याशिवाय आधारकार्ड किंवा एखादे फोटो-आयडेंटिटी कार्ड दाखवावे लागते. तिथे असलेले सुरक्षारक्षक प्रत्येक पर्यटकांचे सर्व तपशील त्यांच्या वहीमध्ये लिहून घेतात. "इतकी कसून चौकशी का केली जाते?" हा माझ्या मनामधे साहजिकच आलेला प्रश्न मी तिथल्या सुरक्षारक्षकाला विचारला असता, गेल्या ऑगस्ट महिन्यामधे घडलेली एक धक्कादायक सत्यघटना त्याने सांगितली. परभणी जिल्ह्यातील एका विवाहित स्त्रीने लोणार सरोवराच्या परिसरामधे येऊन, एका साथीदाराच्या मदतीने आपल्या तरुण व अविवाहित प्रियकराचा गळा आवळून खून केला होता. मारेकऱ्यांनी त्या तरुणाचा मृतदेह तिथल्या झाडीमधे टाकून दिला होता. त्या घटनेनंतर, या परिसरात येणाऱ्या प्रत्येकाचे आधारकार्ड तपासून, नाव, गाव व फोननंबर यांची नोंदणी करण्याचे आदेश पोलिसांकडून जारी झाले आहेत. ही घटना ऐकून, माझ्या अंगावर अक्षरशः शहारा आला.
लोणार सरोवराच्या परिसरात शिरल्यानंतर काही दगडी पायऱ्या उतरून खाली जावे लागते. रस्त्याच्या पातळीपासून जेमतेम २५-३० मीटर्स खाली गेल्यावर गोमुख तीर्थ आणि इतर काही देवळांचा समूह लागतो. त्याच्याच डाव्या बाजूला जरा वरच्या भागामध्ये भल्यामोठ्या पिंपळाच्या झाडाजवळ हटेश्वर मंदिर आहे. त्याच्या बाजूलाच नारदेश्वर मंदिर आहे. तिथेच एक आयताकृती सुंदर लॉन तयार करून या भागाचे सुशोभीकरण करण्याचा थोडाफार प्रयत्न झालेला आहे. आम्ही ती मंदिरे परतीच्या वाटेवर बघायचे ठरवले आणि सरोवराच्या दिशेने पायऱ्या उतरायला लागलो. काही अंतर गेल्यावर पायऱ्या संपून पायवाट लागते. तिथेच वनखात्याचे सुरक्षारक्षक बसलेले दिसले. त्यांनी आम्हा दोघांकडून प्रत्येकी चाळीस रुपये घेऊन प्रवेशिका दिली. त्यानंतर आम्ही पुन्हा ती पायवाट धरली. लोणार सरोवराभोवती एकूण बरीच सुंदर मंदिरे आहेत. सगळी मंदिरे, त्यांचे वैशिष्ट्य आणि इतर बरेच काही मी पुढील भागांमधे सांगणार आहे.
शुक्रवार, ७ फेब्रुवारी, २०२५
बुलढाणा जिल्ह्यातील भ्रमंती-२
आम्ही सिंदखेडराजाहून दुपारी चार-साडेचारच्या सुमारास शेगावच्या दिशेने निघालो. वाटेवरच सुमारे १६-१७ किलोमीटरवर असलेल्या देऊळगावराजा गावातले बालाजीचे देऊळ आम्हाला बघायचे होते. रस्ता चांगला असल्यामुळे आम्ही अर्ध्या तासातच पोहोचलो. देवळापर्यंत जाणाऱ्या चिंचोळ्या गल्ल्यांमधे दोन्ही बाजूला, साधारण सर्व देवस्थानांच्या ठिकाणी असतात तशी दुकाने होती. या बालाजीच्या देवळातली मूर्ती लखुजीराजांना सापडली असे म्हणतात. जगदेवराव जाधवांनी बांधलेल्या मूळ देवळाचा जीर्णोद्धार १९५२ साली केला गेला. जाधवांचे वंशज या देवळाचे विश्वस्त आहेत.
या मंदिराला बालाजीचे दुकान किंवा देवघर असे म्हणले जाते. मंदिराला कळस नाहीये. या देवळातील बालाजीची मूर्ती यातुशय सुबक आणि मोहक आहे. बालाजीच्या उजव्या बाजूला श्रीदेवी आणि डाव्या बाजूला भूदेवीची मूर्ती आहे. बालाजीच्या मस्तकावर नागफणी आणि त्यावर पाचू बसवलेला आहे. या बालाजीला 'प्रतितिरुपती' असेही म्हणतात. तिरुपतीच्या मंदिरामधे बोललेला नवस या मंदिरामधे फेडता येतो असे मानले जाते. या देवळामध्ये देणगी देणाऱ्या भक्तांना, त्यांनी दिलेल्या देणगीच्या प्रमाणात काही टक्केवारीवर प्रसाद दिला जातो, हे या मंदिराचे वैशिष्ठ्य आहे. नवरात्रात लाखो भक्तांच्या उपस्थितीत उत्सव साजरा होतो. आम्ही गेलो तेव्हा मात्र तिथे भक्तांची फारशी वर्दळ नव्हती. दर्शन घेऊन बाहेर पडलो तेंव्हा एक वयस्कर विक्रेता, खाण्याचा डिंक आणि जिरे विकायला रस्त्याकडेलाच बसलेला दिसला. त्याच्याकडचा डिंक अगदी उत्तम प्रतीचा असल्याची तो ग्वाही देत होता आणि मी डिंक विकत घ्यावा यासाठी तो फारच गळ घालत होता. जिरे चांगल्या प्रतीचे आहे हे मला वासावरून कळत होते पण डिंकाबद्दल खात्री नव्हती. तरीही मी एक किलो डिंक आणि अर्धा किलो जिरे विकत घेतले. भाव, दर्जा यांची फारशी चिकित्सा न करता, मी इतकी लवकर खरेदी केलेली बघून आनंदला भलतेच आश्चर्य वाटले. घरी परतल्यानंतर गरम तुपामध्ये डिंक चांगला फुलल्यावर माझा चेहरा आनंदाने फुलला हे सांगायलाच नको.
संध्याकाळी पाचच्या सुमारास आम्ही चिखली-खामगावमार्गे शेगावकडे निघालो. शेगावच्या 'श्री गजानन महाराज संस्थान'तर्फे चालवण्यात येणाऱ्या 'आनंदविहार' या अतिथीगृहातच मुक्काम करावा असे माझ्या मैत्रिणीने आवर्जून सांगितले होते. संभाजीनगरहून निघण्यापूर्वीच आम्ही ऑनलाईन किंवा फोनबुकिंग करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, "शेगावपासून अर्ध्या तासाच्या अंतरावर पोहोचलात की फोन करा. खोली मिळून जाईल" असे आम्हाला फोनवर सांगण्यात आले हॊते. खामगावला पोहोचलो तेंव्हा आम्ही 'आनंदविहार'ला फोन केला. पण, "माऊली, इथे खोलीसाठी भक्तांची मोठी रांग लागली आहे. कमीतकमी दोन तासांचे वेटींग आहे. बराच वेळ थांबूनही खोली मिळेल याची खात्री देता येत नाही. आपणही येऊन रांगेत थांबू शकता." असे उत्तर अतिशय नम्रपणे देण्यात आले. सूर्यास्त होऊन अंधार पडायला लागला होता. दिवसभराच्या प्रवासामुळे आम्ही दोघेही कंटाळलेलो होतो. आनंद दिवसभर ड्रायव्हिंग करत असल्यामुळे त्याला विश्रांतीची नितांत गरज होती. त्यामुळे मी पुन्हा फोन केला. परंतु, नम्र स्वरामधे तेच उत्तर देऊन फोनवरची व्यक्ती म्हणाली, "माऊली, इथे जागा मिळेल याची खात्री देता येणार नाही. शेजारी आमचेच 'आनंद विसावा' नावाचे अतिथीगृह आहे, तिथे चौकशी करा." पण तिथेही आम्हाला विनम्र स्वरात नकारघंटाच ऐकू आली. आम्ही बरेच हिरमुसलो होतो. तरीही मोठ्या आशेने 'आनंदविहार'च्या पार्किंगमध्ये गाडी लावून बुकिंग काउंटरकडे गेलो.
'आनंदविहार'चा परिसर अतिशय विस्तीर्ण, स्वच्छ आणि रम्य आहे. आपल्याला खोली मिळेल की नाही अशी धाकधूक मनामध्ये बाळगून, बुकिंग काऊंटरजवळ आम्ही सुमारे दोन तास रांगेत थांबून होतो. "आत्तापर्यंत असा अनुभव कधीच आलेला नाही" असे रांगेतले अनेकजण आम्हाला सांगत होते. दुसऱ्या दिवशी, म्हणजे शनिवारी एकादशी होती आणि पाठोपाठ रविवार व २६ जानेवारीची सुट्टी असल्याने भक्तांची गर्दी लोटली असल्याचे आम्हाला समजले. काहीजण कंटाळून 'आनंद विसावा' मधे कोणालातरी पाठवून तिकडे खोली मिळवण्याच्या प्रयत्नात होते. आठ वाजून गेले तरी आम्हाला खोली मिळाली नव्हती. आता थकव्यासोबतच पोटात भूकही जाणवत होती. पण आमच्यापैकी किमान एकाला रांगेत थांबणे आवश्यक होते. त्यामुळे आधी मी आणि त्यानंतर आनंदने, तिथल्या उपाहारगृहामधे जाऊन जेवण केले. अतिशय साध्या, सात्विक चवीची थाळी प्रत्येकी केवळ सत्तर रुपयाला होती. अखेर, रात्री साडेनऊच्या सुमारास आम्हाला एक डबलरूम मिळाली आणि आमचा जीव भांड्यात पडला.
'आनंदविहार' येथे राहण्यासाठी २/३/४/५/६ जणांची सोय असलेल्या वेगवेगळ्या आकारमानाच्या एकूण सहाशे खोल्या आहेत. सर्व खोल्यांमधे चोवीस तास गरम पाण्याची सोय आहे. एकंदर परिसर आणि खोल्यांमधली स्वच्छता वाखाणण्याजोगी आहे. खोलीत गेल्याबरोबर अंघोळ करून आम्ही निद्रादेवीच्या अधीन झालो. दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ व नाश्ता उरकल्यानंतर आम्ही श्री गजानन महाराजांचे मुखदर्शन केले. देवळातली चोख व्यवस्था, तेथील सर्व सेवेकऱ्यांची सेवा आणि लोटलेल्या भक्तांचा गजाननमहाराजांच्या प्रति असलेला भक्तिभाव मनाला खूपच भावला. दर्शन झाल्यावर, खोलीवर परतून सामानाची आवराआवर केली. 'आनंदविहार'मधले प्रसन्न, शांत आणि अतिशय सात्विक वातावरण अनुभवायला परत शेगावला यायचेच अशी खूणगाठ मनाशी बांधून आम्ही खोली सोडली. शेगाव सोडताना तिथली सुप्रसिद्ध कचोरी खाण्याचा मोह टाळता आला नाही. गुगलचा सहारा घेऊन एका कुठल्यातरी शर्मांच्या दुकानातील कचोऱ्या विकत घेतल्या. काही बायका डझनावारी 'फ्रोझन' कचोऱ्या विकत घेत होत्या. मी दोन दिवसांनंतर पुण्याला पोहोचणार असल्यामुळे फ्रोझन कचोऱ्या विकत घेता आल्या नाहीत. कचोरीची चव अप्रतिम असली तरीही अशावेळी नेमके स्वतःचे गोलमटोल शरीर डोळ्यासमोर येत असल्यामुळे केवळ एका कचोरीवर समाधान मानले.
सुमारे ११ वाजता शेगाव सोडून आम्ही साडेबारा वाजेपर्यंत मेहेकर येथील 'शारंगधर बालाजी' मंदिरामधे पोहोचलो. या मूर्तीबाबतची सत्यकथा अतिशय रंजक आहे. १८८८ साली, ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मेहेकर गावाजवळच धरणाचे खोदकाम सुरु झाले होते. त्या खोदकामादरम्यान एक मोठी लाकडी पेटी सापडली. त्या पेटीमधे चंदनाच्या सालींमधे गुंडाळलेली बालाजीची अत्यंत सुबक मूर्ती होती. ही मूर्ती ब्रिटिशांनी पळवू नये म्हणून, कुठल्याच मुहूर्ताची वाट न बघता, ग्रामस्थांनी रातोरात त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली. यामुळे संतापलेल्या ब्रिटिशांनी येथील साठ गावकऱ्यांना काही महिने तुरुंगात डांबून ठेवले होते. त्या पेटीवर असलेला ताम्रपट व मूर्तीवरील दागिने मात्र ब्रिटिशांनी हडप केले, असे सांगितले जाते.
काळ्या गंडकी दगडामध्ये कोरलेली, ११ फुटी उंच, चार फुटी रुंद आणि दोन फुटी जाड, अशी ही मूर्ती बालाजीची जगातली सर्वांत मोठी मूर्ती आहे. मूर्तीभोवतीच्या प्रभावळीमधे दशावतार कोरलेले आहेत. चतुर्भुज मूर्तीच्या हातांत शंख, चक्र, गदा व पद्म आहे. बालाजीच्या मूर्तीबरोबर श्रीलक्ष्मी विराजमान असलेली ही एकमेव मूर्ती आहे. त्यामुळे या ठिकाणी लक्ष्मी-विष्णूच्या एकत्रित दर्शनाचा लाभ मिळू शकतो. प्रभावळीवर ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचे एकत्रित चित्र आहे. मूर्तीच्या पायाजवळ जय-विजय आणि भूदेवी आहेत. मूर्तीच्या डोक्यावर असलेल्या मुकुटामध्ये शारंग नावाचे धनुष्य धारण केलेल्या श्री विष्णूंची मूर्ती असल्यामुळे या मूर्तीला शारंगधार-बालाजी असे नाव पडले आहे. आपल्या मनामधे जो भाव असेल तोच भाव मूर्तीच्या चेहऱ्यावर दिसत असल्यामुळे इथे आत्मरूप दर्शनाचा लाभ मिळतो असे म्हणतात. इतकी सुंदर मूर्ती असलेल्या या देवस्थानाचा परिसर मात्र अगदीच रया गेलेला भासला. आम्ही दर्शन घेत असताना तिथल्या सेवेकऱ्यांनी आम्हाला विचारले, "तुम्ही बाहेरगावाहून आला आहात का?" आम्ही हो म्हणताच, मोठ्या अगत्याने ते आम्हाला देवळामागे असलेल्या प्रसादालयात घेऊन गेले. बाहेरगावच्या भक्तांना आवर्जून प्रसाद देण्याची प्रथा तिथे आहे. अप्रतिम चवीची 'साबुदाणा उसळ' म्हणजेच साबुदाणा खिचडी, आणि ताक असा प्रसाद त्या सेवेकऱ्यांनी आम्हाला आग्रहाने खाऊ घातला.
मंदिरामधून बाहेर पडण्याच्या रस्त्यावर नृसिंह मंदिराचा फलक दिसला. संत श्री बाळाभाऊमहाराज पितळे यांच्या ज्ञानमंदिराजवळील सुमारे २०० वर्षे जुन्या वाड्यामध्ये हे मंदिर आहे. संपूर्ण जगामधे जशी १२ ज्योतिर्लिंगे प्रसिध्ध आहेत तशी पौराणिक महत्त्व असलेल्या एकूण ११ नृसिंह मूर्ती आहेत. त्यापैकी सहावे नृसिंह मंदिर हे मेहेकर येथे आहे. ही स्वयंभू प्राचीन मूर्ती कमीतकमी १५०० वर्षे जुनी असावी. ही वाकाटक काळातील मूर्ती आहे असे काही संशोधक मानतात तर काही जणांच्या मते ही उत्तर चालुक्यकालीन असावी. एकुणात, या मूर्तीच्या कालखंडाबाबत एकमत नाही. अनेक शतके जमिनीखालील भुयारामधे ही मूर्ती बंदिस्त होती. येथील पितळे कुटुंबियांपैकी, नागपूरस्थित श्यामराज पितळे महाराजांना दृष्टांत झाल्यामुळे मेहेकर येथील माळीपेठेत असलेली ही हेमाडपंती भुयारामधली ही मूर्ती बाहेर काढली गेली. या मूर्तीची स्थापना १५८१ साली झालेली आहे. गंडकी काळ्या पाषाणामधे कोरलेली ही अतिशय सुंदर आणि सुबक मूर्ती आहे. ही मूर्ती अष्टभुज असून, तिच्या हातांमधे शंख, चक्र, पद्म आणि गदा आहेत. नृसिंहाचा चेहरा, आयाळ, व मुकुटावर आभूषणे अतिशय रेखीवपणे कोरलेली आहेत. हिरण्यकश्यपूच्या पोटामध्ये नृसिंहाची नखे रुतलेली स्पष्ट दिसून येतात. नृसिंहानी भक्त प्रल्हादाबरोबर इथेच भोजन केले आणि ते शांत झाले असा समज आहे. त्यामुळे या देवस्थानात अन्नदानाला खूप महत्त्व प्राप्त झालेले आहे. या मंदिरामधे मुख्य मूर्तीजवळच श्रीकृष्णाची काळ्या पाषाणातील सुबक पण छोटी मूर्ती आहे.
आम्ही काहीही ठरवले नसताना, एकादशीच्या दिवशी तीन देवस्थानाच्या ठिकाणी नतमस्तक होण्याचा योग आपसूकच आला, हे विशेष होते. अशा रितीने पुण्यसंचय करून, मेहेकरहून आम्ही लोणारच्या वाटेला लागलो.















