गुरुवार, १९ एप्रिल, २०१८

टिकली तर टिकली


काही महिन्यांपूर्वीची गोष्ट असेल. मी वॉर्डमध्ये शिरले आणि फर्नांडिस सिस्टर म्हणाल्या," मॅडम आज कपाळावर टिकली का नाही लावलीत?"

मी गोंधळले.  "मी टिकली लावली होती , कुठेतरी पडली असणार" असे पुटपुटत चटकन माझा हात कपाळाकडे गेला. अर्थातच तिथे टिकली नव्हती. त्यामुळे टिकली शोधण्यासाठी मी गडबडीने माझी पर्स धुंडाळू लागले. पर्समध्ये टिकलीचे पाकीट नेहमी असते. पण नेमके त्या दिवशी ते सापडेना, तशी मी थोडीशी ओशाळले. माझ्या चेहऱ्यावरचे भाव फर्नाडिस सिस्टरांनी वाचले असावेत.
"मॅडम थांबा. कदम सिस्टर कडे नेहमी टिकल्यांचे पाकीट असते. मी आणते" असं  म्हणत काही क्षणांतच फर्नांडिस सिस्टरांनी टिकली आणून माझ्या कपाळावर लावली आणि आम्हा दोघींचाही जीव जणू भांड्यात  पडला.


टिकलीचे आणि माझे नाते फार वर्षांचे आहे. माझ्या लहानपणी आई बरेचदा मेण लावून त्यावर पिंजर लावायची. कधीतरी पुढे ती गंधाच्या उभ्या बाटलीतून गंध लावायला लागली आणि नंतर लालभडक मोट्ठी टिकली. अगदी लहानपणी मी पण गंधच लावत होते. पण माझ्या कपाळावर ते उतायला लागल्यामुळे नंतर मी टिकली वापरायला लागले. पण क्वचित कधी गंध फिस्कटले गेले  किंवा टिकली पडली तर आज्जी ओरडायची. सधवा बायकांनी आणि कुमारिकांनी भुंड्या कपाळाने हिंडायचे नाही, असं म्हणायची. कदाचित त्या शिकवणीमुळे असेल किंवा टिकली लावणे सवयीचे झाल्यामुळे असेल, टिकली माझ्या व्यक्तिमत्वाचा एक भागच होऊन गेली.

लग्नानंतर उत्तरभारतात राहण्याचा योग्य आल्यामुळे त्यावेळी नाविन्यपूर्ण वाटणाऱ्या, वेगवेगळया आकाराच्या  आणि कपड्यांना मॅचिंग रंगाच्या टिकल्या वापरायला लागले. पुढे पाश्चात्य वेशभूषा करायाला लागले तरीही माझी टिकली कपाळावर टिकलीच. जीन्स आणि टॉप घालून कपाळावर टिकली लावून आले की माझी मुलं, भाचरंडं चेष्टा करतात. कधी ती टिकली काढ म्हणतात. त्यांच्या आग्रहाला  बळी पडून मी कधीतरी ती काढतेही. पण कपाळावर टिकली असली की मला जरा बरं वाटतं, हे ही तितकंच खरंय.

गेल्या सात आठ वर्षांमध्ये चार-पाच वेळा परदेशात जाण्याचा योग आला. तिथे गेले तरी माझी टिकली कपाळावर असायचीच. अमेरिकेत एका फेलोशिप प्रोग्रॅमला गेले होते त्यावेळी त्या प्रोग्रॅमला आलेल्या अमेरिकन बायकांना माझ्या टिकलीबद्दल कोण कुतूहल होतं. एक दोघींनी तर मला त्यांच्यासमोर टिकली लावायला लावली. त्यांनाही कपाळाला टिकली लाऊन बघायची होती की काय, कुणास ठाऊक. चार वर्षांपूर्वी उझबेकिस्तानला गेलो होतो तेंव्हा तिथल्या काही उझबेक स्त्रियांनी, त्यांच्या अगम्य भाषेत," तुम्ही टिकली का लावता? ती कशी लावायची? सगळ्या भारतीय बायका टिकली लावतात का?  भारतातल्या मुसलमान बायका पण टिकली लावतात का? टिकली लावणे म्हणजे भारतीय संस्कृती का? असे अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडले होते. काही बायकानीं तर माझ्या कडून आणि माझ्या वहिनींकडून मोठया कौतुकाने टिकल्या मागून घेतल्या होत्या.

आमच्या लहानपणी काही सोप्पे ठोकताळे होते. सर्वच हिंदू मुली गंध किंवा टिकली लावायच्या. टिकली किंवा गंध नसलेली मुलगी ही इतर धर्माचीच असायची. आजकाल मात्र तसं काही राहिलेलं नाही. हल्ली हिंदू मुलींनाही टिकली शिवायच बघायची आपल्या डोळ्यांना सवय होऊन गेलीय. माझी मुलगी, भाच्या, पुतण्या कपाळाला टिकली लावतातच असे नाही. मी शिकवते त्या महाविद्यालयांमध्ये जवळ जवळ सगळ्या मुली टिकली न लावताच येतात. मागच्या महिन्यात एक दिवस कॉलेजमध्ये गेले आणि बघते तर काय, सगळ्या मुली अगदी नटलेल्या दिसल्या . जवळजवळ सगळयांच्या कपाळावर टिकल्या, चंद्रकोरी,  हातात बांगड्या, गळयात सोन्या-मोत्याचे हार , साड्या अथवा घागरा-चोळी नेसलेल्या, काही विचारू नका. मी अगदी चकित झाले. शिकवायला सुरुवात करायच्या आधी," आज काही विशेष आहे का?" असे विचारले, तर त्यांचा ' कल्चरल डे' आहे असे कळले. आता आपली संस्कृती सुद्धा फक्त ‘असे 'कल्चरल डे' किंवा 'संस्कृती दिन’ साजरा करण्यापुरती उरली आहे की काय? असाही एक प्रश्न माझ्या मनांत येऊन गेला.

पण काहीही म्हणा, या 'कल्चरल डे' च्या निमित्ताने कितीतरी मुलींच्या कपाळावर टिकली बघितली आणि छान वाटले. आपली संस्कृती टिकेल ना टिकेल देव जाणे, पण निदान या 'कल्चरल डे' च्या निमित्ताने चार मुलींच्या कपाळावर टिकली टिकली तरी मिळवली, असे म्हणायची वेळ आली आहे, नाही का?

शुक्रवार, २६ मे, २०१७

आरक्षणाचे रक्षण!


"बाई माझ्या नातीचा फार्म भरून देणार का?"

परवा सकाळी आल्याआल्या मोलकरणीने प्रश्न केला.
"भरून देते. पण कसला फॉर्म आहे गं?"
"नात दहावीला बसलीय.आता आनलाईन का काय ते कालेज भरायचंय. पन जातीचा दाखला नाई. त्यो मिळवायला फार्म भरायचाय."
"आता तुझी नात शिकलीय ना ? मग तिने का नाही भरला फॉर्म ?"
"आता काय सांगू बाई? तिनंच भरला होता. ती गेली पन होती त्या हापिसात. पन त्यो मानूस म्हनला त्यो दाखला इथे नाय, नगरला मिळंल. म्या म्हनलं नातींनं फार्म चुकीचा भरला आसल म्हनून तुमाला सांगायला आले. आमाला तर त्यातलं कायबी कळत नाय. माज्या पोरीचा नवरा मेलाय. आमच्या घरात कोन बी शिकलेलं नाय. पर माजी नातं लै हुशार हाय, चांगली शिकली तर बरं हुईल. मॅडम द्या ना फार्म भरून "
"पण दाखला नगरला का मिळणार ? ती तर इथे शिकते ना ? "
"माज्या मुलीला नगरला दिली होती. तिचा  नवरा मेल्यावर मी तिला इकडे आनली. त्या हापिसातला मानुस म्हनला आता दाखला नगरलाच मिळनार"

माझ्या "डॉक्टरी सुवाच्य" अक्षरांत मी  फॉर्म भरण्यापेक्षा आनंदने भरलेला बरा म्हणून त्याला फॉर्म भरायला सांगितले. त्या फॉर्मबरोबर त्या मुलीची, तिच्या वडिलांची आणि आजोबांची अशी अनेक कागदपत्रे पण जोडायची होती. आनंदने तो फॉर्म भरला आणि मोलकरणीच्या मुलीला आणि नातीला बोलावून घेऊन त्यांची सर्व कागदपत्रे तपासून घेतली. फॉर्म कुठे जमा करायचा, काही अडचण आली तर काय करायचे त्याबाबत योग्य ते मार्गदर्शन करून नगरच्या कार्यालयात जायला सांगितले. काल मोलकरणीची मुलगी आणि नात नगरला जाऊन तिथल्या कार्यालयात तो फॉर्म  जमा करून आल्यासुद्धा.
आता नातीला जातीचा दाखला मिळणार या कल्पनेने आज सकाळी मोलकरीण भलतीच खुशीत होती. "बाई सायबांनी आमाला सगळं नीट सांगितलं म्हणून काम झालं. नाहीतर काही खरं नव्हतं. सायबांचं लैच उपकार हायत"
"अगं उपकार कसले मानतेस. तुझी नात हुशार आहे. चांगली शिकली तर आम्हाला दोघांनाही आनंदच होईल. पण मला एक सांग, या मुलीच्या आईचा, वडिलांचा, आज्ज्याचा, पणज्याचा, कोणाचाच जातीचा दाखला कसा नाही? जातीच्या दाखल्याशिवाय त्यांना आरक्षणाचे फायदे  कसे मिळाले ?"

"त्यानला काय आन आमाला तरी कुटं काय आरक्षनाचे फायदे मिळाले? मी पयल्यापासून कामाला जायचे. आमची वस्ती लै वाईट. माजी पोरगी सातवीत होती तवाच मोठी झाली म्हनून तिचं लगीन लावून दिलं. तिचा नवरा, त्याचा बाप, आज्जा कोनबी शिकलेलं नाय. मग ते आरक्षनाचा फायदा कसा आन कुटं घेणार? माजी पोरं, माजा नवरा, माजा सासरा, त्याचा बाप, कोनबी शिकलेलं नाई. आमच्या जातीतले जे शिकले, त्यांना आरक्षनामुळं सरकारी नोकऱ्या मिळाल्या, डॉक्टर, इंजनेरबी हुता आलं. त्यांच्याकड आज गाड्या हायत, फ्लॅट हायत, मोप पैसा हाय. आता त्यांची पोरं मोठ्या शाळा-कालेजात जात्यात. पुन्हा आरक्षनाचा फायदाबी त्ये घेनारच. आमी अडानी हुतो आन आमची पोरंबी तशीच राह्यली. आमाला कुटल आरक्षन आन कसलं काय? म्हनून तर म्हन्ते बाई, तुमचे आन सायबांचे लै उपकार आहेत. तुमच्यामुळं माजी नात कालेज शिकल आन कायतरी नोकरीबी मिळवल."

तिच्या बोलण्याने मी विचारात पडले. सहज बोलता-बोलता, एक विदारक सत्य आणि गंभीर सामाजिक प्रश्न ती माझ्यासमोर मांडून गेली होती. दलितांसाठी आरक्षणाचा हक्क कायद्याने दिलेला आहे आणि ते योग्यच आहे. परंतु, गेली सत्तर वर्षे आरक्षणाचा फायदा न मिळालेल्या, त्यांच्यामधीलच खऱ्या-खुऱ्या उपेक्षितांच्या उन्नतीचं काय? आधीची पिढी शिकली नाही म्हणून पुढची पिढी सुशिक्षित नाही, जवळ पैसे नाहीत, आणि झोपडपट्टीतल्या कष्टाच्या जीवनातून सुटकाही नाही.

आरक्षणाच्या समर्थनात आणि विरोधातही आज नुसताच आरडा-ओरडा ऐकू येतो. पण, प्रत्यक्ष तळागाळात असलेले हे लोक कधी वर येणार? त्यांच्या हक्काचं रक्षण व्हायला नको कां ?

मंगळवार, १४ फेब्रुवारी, २०१७

तूच माझी व्हॅलेंटाईन!

             
                           अवचित आज सकाळी नवऱ्याने जेंव्हा ताजा लाल गुलाब माझ्या हाती दिला
                           व्हॅलेंटाईन डे! किती छान वाटलं मला, लाजत-लाजत  मीही तो स्वीकारला

                           मी नाही रे आणला गुलाब तुझ्यासाठी, कसनुसं हसून मी त्याला बोलले
                          "राहू दे गं राणी, तू असताना गुलाब कशाला?" त्याच्या बोलांनी जरा सुखावले

                          माझी व्हॅलेन्टाईन मात्र यायची होती अजून, तिचीच तर प्रतीक्षा होती मला
                          ठरवत होते मनातल्या मनात, आज एक छानसं फूल द्यायलाच हवं तिला

                          त्याने दिलेले फूल, परत त्यालाच मी द्यावे, या अपेक्षेने नवरा होता बघत
                          फूल हातात  घट्ट धरून, मी मात्र  बसले होते माझी घालमेल लपवत

                          इतक्यात ती लांबूनच येताना दिसली, आणि माझ्याकडे बघून छानसं हसली
                          तिला पाहता किती बरं वाटलं म्हणून सांगू? निदान आजची तरी चिंता मिटली

                          नवऱ्याला सोडून मी गेले धावत, अन गुलाबाच्या फुलाने केले तिचे स्वागत
                          म्हणाले "बरं झालं आलीस बाई," ("लाग आता कामाला") हे मात्र होतं स्वगत

                         लाल गुलाबाने ती अगदी हरखून गेली, वेणीमध्ये फूल खोवून कामालाही लागली
                         नजरेनेच मी त्याला म्हणाले "तूच माझा प्राणसखा," पण व्हॅलेंटाईन मात्र कामवाली! 









   

शनिवार, ११ फेब्रुवारी, २०१७

इस्टमनकलर

काल माझ्या ध्यानीमनी काही नसताना अचानकच आनंद म्हणाला,
"आज 'ध्यानीमनी'  बघायला जायचे का? व्हिक्टरीला सव्वाआठचा शो आहे "
वॅलेंटाईन डे जवळ आल्याचे सोशल मीडियातून नवऱ्याला कळल्यामुळे त्याने हे विचारले असावे असा गोड समज करून घेऊन मी चटकन हो म्हणून टाकलं. "तिकिटे मिळणार का? किती रुपयाचे तिकीटआहे?" असले व्यवहारी प्रश्न न विचारता मी लगेच तयार झाल्यामुळे त्यालाही आश्चर्य वाटलं असावं!

गडबडीने जेवण उरकून, आठ वाजून दहा मिनिटांपर्यंत आम्ही तिकिटाच्या खिडकीवर पोहोचलोसुद्धा. बाल्कनीची तिकिटे मिळणार नाहीत हे कळल्यामुळे खालची दोन तिकिटे काढली. मनातल्या मनातच, "दोन तिकिटाचे मिळून चाळीस रुपये वाचणार आहेत" या 'मध्यमवर्गीय' विचाराचे मलम त्या दुःखावर लावून मी पिक्चर बघायला सज्ज झाले. थिएटरवर सगळाच शुकशुकाट होता. पिक्चर सुरु झाला की काय या कल्पनेमुळे मी धास्तावले आणि गडबडीने थिएटरच्या दरवाज्यापाशी गेले. बराच वेळ झाला तरी कोणी आत सोडायचे नांवच घेईना. विचारणा केल्यावर कळलं की बाल्कनीची दुरुस्ती चालू असल्यामुळे तिथली तिकिटे विकलेलीच नाहीत. आणि आमची दोन तिकिटे धरून एकूण तीनच तिकिटांची विक्री झाली आहे!
पंधरा-वीस मिनिटे वाट बघितली. पण कोणीही प्रेक्षक न  फिरकल्यामुळे तो शो रद्दच झाला. आम्ही तिकिटाचे पैसे घेऊन घरी परत असताना माझ्या ध्यानीमनी नसताना मन हलकेच भूतकाळात, म्हणजे माझ्या लग्नाआधीच्या काळातल्या सोलापूरात  गेले.

मला सिनेमाचे वेड आहे, किंवा व्यसनच म्हणा ना! आणि या व्यसनाचे मूळ लहानपणी आमच्या घरी असलेल्या शिस्तीत आहे. आमचं एकत्र कुटुंब आमच्या आजीच्या अधिपत्याखाली चालायचे. ज्या काळांत आमच्या बरोबरच्या काही मुलामुलींनी राजेशखन्ना, अमिताभच्या पिक्चरची , 'फर्स्ट डे फर्स्ट शो'ची नशा अनुभवलेली होती, त्या काळांत आम्हा सहा-सात भावंडांना मात्र कधीतरी वर्ष-सहा महिन्यातून  'रामजोशी' किंवा 'आम्ही जातो आमुच्या गांवा' असले सोवळे सिनेमे दाखवले जायचे. एखादा सिनेमा 'गेवा कलर' आहे, 'फुजिकलर' आहे, 'टेक्निकलर' आहे का 'इस्टमनकलर' आहे, असल्या तांत्रिक बाबी, किंवा कुणा हिरो-हिरोईनला सायनिंग अमाऊंट किती मिळाली, असल्या आर्थिक बाबींची माहिती आमच्या बरोबरच्या दर्दी मुलामुलींना असायची. 'बिनाका गीतमाला' मध्ये त्या-त्या आठवड्याला कोणते गाणे नंबर एकवर येऊन 'सरताज गीत' होणार, यांवर त्यांच्या पैजा लागायच्या. त्या काळात सिनेमा बघणं, त्यातली गाणी ऐकणं आणि म्हणणं, अगदी गुणगुणणं सुद्धा, आमच्या घरातल्या शिस्तीत बसत नसल्यामुळे, आम्ही मात्र अगदीच अज्ञानी होतो. पण घरातल्या त्या विरोधामुळेच सिनेमा माझ्या मनाला जास्तच खुणावत राहिला.  दहावीत असताना, आमच्या वर्गातल्या दीपाली आणि इतर दोघी-तिघी मुलींनी सिनेमांची गाणी लिहिण्यासाठी केलेली दोनशे पानी वही बघून, मीही चोरून तशीच एक वही केली होती. माझ्या 'चुगलीतत्पर' भावंडांपैकी कोणीतरी त्याबद्दल आईला खबर पोहोचवली. मला बरीच बोलणी खावी लागली आणि अर्थातच ती वहीदेखील जप्त करण्यात आली. पण या सगळ्यामुळे सिनेमाबद्दलचे माझे आकर्षण वाढतच गेले.

कॉलेजमध्ये गेल्यावर, विशेषतः मेडिकल कॉलेजमध्ये गेल्यावर, घरच्या शिस्तीची पकड जरा सैल झाली. कधी चोरून तर कधी उघडपणे मी माझं व्यसन पूर्ण करू लागले. त्या काळातल्या अगदी साध्या, एसी नसलेल्या थिएटरमध्ये  सिनेमा बघायला जी मजा यायची, ती आजच्या झुळझुळीत मल्टिप्लेक्समध्येही  येत नाही. तसे पाहता 'मल्टिप्लेक्स'ची सुरुवात, सोलापूरसारख्या गावंढ्या शहरांत, ऐंशी वर्षांपूर्वी भागवत थिएटर्सने केली. एकाच आवारात असलेली भागवतांनी बांधलेली चित्रा, कला, छाया, उमा आणि गांधीं कुटुंबियांच्या मालकीची मीना आणि आशा ही थिएटर्स सिनेमाशौकिनांची नशा गेली कित्येक वर्षे पूर्ण करत आहेत. तीस-पस्तीस वर्षांपूर्वी माझ्या कॉलेजच्या दिवसांत, रांगा लावून किंवा प्रसंगी ब्लॅकने सिनेमाची तिकिटे विकत घ्यावी लागायची, हे आज खरे वाटणार नाही. कॉलेजमध्ये अचानकच प्रॅक्टिकल रद्द झाल्यावर किंवा एखाद्या वेळेस  प्रॅक्टिकल्स बुडवून मॅटिनी शो 'टाकण्याची' मजा अवर्णनीय होती. आधी पैशांची जुळवाजुळव करणे, "कॉलेज बुडवून सिनेमा बघण्यात तू काही मोठ्ठं पाप करत नाही आहेस" हे एखाद्या 'पापभीरू' मैत्रिणीला पटवून देणे, ट्रिपल सीट बसून पोलिसांना चुकवत चुकवत कसबसं थिएटरपाशी वेळेत पोहोचणे आणि शेवटी आपल्याला हवा तो सिनेमा निर्विघ्नपणे बघायला मिळणे यांत खूप मोठ्ठ थ्रिल होतं. अशावेळी भलीमोठी रांग पाहिली की पोटात गोळा यायचा. रांगेत कोणी ओळखीचे भेटले तर ठीक, अगदी नाहीच तर रांगेत पुढे असलेल्या एखाद्या तरुणाला अगदी गोड आवाजात आमच्यापैकी कोणीतरी तिकिटे काढण्याची विनंती करायचे आणि काम होऊन जायचं! कधी-कधी मात्र आम्ही पोहोचेपर्यंत "हाऊसफुल्ल" चा बोर्ड झळकलेला असायचा. अशा वेळी पोलिसांची नजर चुकवत दबक्या आवाजात तिकिटे विकणाऱ्या ब्लॅकवाल्याशी भरपूर हुज्जत घालून तिकीट मिळवावे लागायचे. अगदी तेही नाही मिळाले, तर डोअरकीपरला थोडे पैसे देऊ केले की तो पत्र्याच्या खुर्च्या टाकून आम्हाला बसवायचा!

त्या काळी सोलापुरातल्या थिएटरमध्ये सिनेमा बघण्याची मजा सांगावी तितकी थोडी आहे. एक तर सिनेमा हेच मनोरंजनाचे मुख्य साधन होते. मोठीमोठी थिएटर्स प्रेक्षकांनी गच्च भरलेली असायची. बाल्कनीतला प्रेक्षक आणि खाली बसलेलं पब्लिक यांच्या सामाजिक आणि आर्थिक स्तरामध्ये मोठा फरक असायचा. खाली बसलेलं पब्लिक दिलखुलासपणे दाद देणारं होतं. गाणी चालू झाली की लोक समोर येऊन नाचायचे, रुमाल-टोप्या-फेटे हवेत उडवायचे, आणि फारच चांगले नाच-गाणे चालू असेल तर पडद्यावरच्या हिरो-हिरोईनवर चक्क पैसे फेकायचे! 'लव्ह सीन्स' चालू असताना, आपण स्वतःच हिरो आहोत असे स्वप्नरंजन काहीजण करत असावेत,पण काही जण मात्र जळकटपणे हिरोला ओरडून सांगायचे, "ए सोड... सोड बे तिला"! व्हिलनवर तर सगळे, सुप्तपणे, भलताच खार खाऊन असायचे!!  

पब्लिकच्या गप्पांमधून सिनेमाचा बॉक्स-ऑफिस वरचा परफॉर्मन्स समजत असे. "त्यात लै एक्सपोज हाय बे! किसींग आन बेडसीन बी हाय बे" असं काहीसं एखाद्या सिनेमाचं वर्णन असलं की तो सिनेमा महिनोंमहिने हाऊसफुल्ल जायचा. अशा सिनेमातील 'तसला' शॉट चालू असला की पब्लिकमध्ये मोठा गोंधळ तरी माजायचा किंवा अगदी पिनड्रॉप सायलेन्स तरी असायचा. त्या काळात तसली कामं फक्त साईड हिरोइन्सकडे किंवा सिनेमातील कॅब्रे डान्सर कडे असायची. आजकालच्या हिरोइन्सनीच 'ती जबाबदारी' उचलून कॅब्रे डान्सर्सची सुट्टी करून टाकली आहे! शिवाय 'एक्स्पोज' आणि 'किसिंग' मध्ये काहीच नावीन्य न राहिल्याने सिनेमामध्ये "लै एक्सपोज आन किसिंग हाय बे !" अशी 'वर्ड ऑफ माऊथ' पब्लिसिटी पण  गायब झालीय!

त्यावेळी फक्त बाल्कनीतील सीट्सना नंबर असायचे. त्या खालचं तिकीट असलं की डोअरकीपरने आत सोडताक्षणी धक्का-बुक्की करत, पळत पळत जाऊन जागा पकडावी लागायची. त्यामुळे बाल्कनीत बसलेल्या लोकांना सिनेमा सुरु व्हायच्या आधीच ड्रेस सर्कलमध्ये चाललेल्या तुफान हाणामारीचा ट्रेलर बघायला मिळायचा. सोलापूरच्या रांगड्या पब्लिकच्या तोंडातून मराठी भाषेतील उच्चतम शिव्यांचे शब्दभांडार त्यावेळी ओतले जायचे. एकदा का सिनेमा सुरु झाला की हळूहळू समेट होऊन हा सगळं गोंधळ संपायचा आणि सिनेमाच्या जादुई दुनियेत पब्लिक रंगून जायचं. सिनेमाच्या थिएटरमध्ये जागा पकडण्याची एक गंमतशीर आठवण आहे. एकदा आम्हाला, 'संत तुकाराम' हा सिनेमा शाळेमार्फत दाखवला गेला होता. दोन-दोनच्या जोडीने उभे करून आम्हाला अगदी शिस्तीत रांगेने आत सोडले होते. 'हुशार' विद्यार्थी असल्यामुळे आत शिरताक्षणी पळत-पळत पुढच्या रांगेतल्या खुर्च्या आम्ही पकडल्या. अजूनही मला पडद्यावर अगदी जवळ दिसलेलं ते मोठ्ठंच्या-मोठ्ठं 'पुष्पक' विमान आठवतंय! अर्थातच, घरी आल्यावर डोकं खूप दुखलं आणि, 'सिनेमा नेहमी मागच्या रांगांमधे बसून बघावा आणि नाटक नेहमी पुढच्या रांगांमध्ये बसून बघावं' हे मौलिक ज्ञान त्यावेळी घरच्या वडीलधाऱ्या मंडळींकडूनच मिळाले!
सिनेमा चालू असताना मधेच कधीतरी आवाज गायब व्हायचा. मग, 'ए तुझ्या XXX... आव्वाज.... XXX' अशा आरोळ्यांनी आणि शिट्ट्यांनी थिएटर दुमदुमून जायचे. सिनेमाच्या मध्येच रीळ तुटणे, एखादे रीळ उलटे किंवा पुढेमागे  लागणे, वीज जाणे, असले व्यत्ययही कधी-कधी यायचे. पण एकंदरीत त्या काळातलं पब्लिक सहनशील आणि समंजस होतं. असला दीर्घ काळाचा व्यत्यय आल्यावर थोडा आरडाओरडा करून मग पब्लिक शांत बसायचं. थिएटरमध्ये जास्त वेळ गेला म्हणून कोणाच्या आयुष्यात फारसा फरक पडत नसे. सगळं आयुष्यच निवांत होतं.  पुरुषवर्ग  बाहेर चक्कर मारून विडी-सिगरेट फुंकून किंवा 'मावा' खाऊन यायचा. तर स्त्रीवर्ग नाकाला पदर लावून पोराबाळांना काखोटीला मारून स्वछतागृह गाठायचा. अशा वेळी खारे दाणे, वेफर्स, पिवळ्या रंगाच्या नळ्या म्हणजेच 'बॉबी', सोडावॉटरआणि चहाची भरपूर विक्री व्हायची. अगदीच पब्लिकच्या सहनशक्तीचा अंत बघितला गेला तर मात्र  प्रोजेक्टर चालवणाऱ्या 'बाळ्या' किंवा 'उस्मान्या' च्या नावाने शिव्यांची लाखोली वाहिली जायची. अशा व्यत्ययानंतर सिनेमा चालू झाला की त्याच  'बाळ्या' किंवा 'उस्मान्या'ला टाळ्यांनी आणि शिट्ट्यांनी उत्स्फूर्त दाद द्यायला लोक हात आखडत नसत !

सोलापुरातील स्त्री प्रेक्षकवर्गाची कथा काही औरच होती. "जय संतोषी माँ", किंवा "माहेरची साडी", "बाळा गाऊ कशी अंगाई" सारखे अलका कुबल, आशा काळे वगैरे रडक्या नट्यांचे सिनेमे "स्त्रियांच्या तुफान गर्दीत सतरावा आठवडा..." अशा वर्णनात चालायचे. तसल्या सिनेमाला कधी चुकून गेलेच तर खास बायकी गोधळ दिसायचा. पोरांची किरकिर, आयांनी त्यांच्या पाठीत घातलेले धपाटे आणि 'टवळे, सटवे..' वगैरे बायकी शिव्यांसहित एकमेकींच्या झिंज्या उपटत केलेली भांडणे, या सर्व आवाजांनी थिएटर कलकलून जायचं. असल्या सिनेमात हिरोईनचा सासरी होणारा छळ पाहून बायका मुसमुसून रडायच्या. सिनेमा संपेस्तोवर समस्त महिलावर्गाचे डोळे सुजून लालेलाल आणि पदर ओले झालेले असायचे. 

मागच्या महिन्यात सोलापूरच्या भागवत थिएटरमध्ये एक सिनेमा पाहिला. त्यातल्या एका थिएटरचे नाव आता, 'बिग सिनेमा भागवत' असं झालंय. मोबाईलवरून दीडशे रुपयांच्या तिकिटाचे बुकिंग केले. झुळझुळीत एसी थिएटरमधल्या गुबगुबीत गालिच्यासारख्या पायघड्यांवरून आमच्या तिकिटाच्या नंबरच्या सीटवर अलगद आसनस्थ झालो. कुठलीही रांग नाही, धक्काबुक्की नाही, आरडाओरडा नाही, तिकीट आणि जागा मिळणार की नाही याबद्दलची धास्ती नाही! थिएटरमध्ये बाल्कनी आणि ड्रेससर्कल अशी विभागणीही नव्हती. सगळे प्रेक्षक कमालीच्या शांतपणे सिनेमाचा आस्वाद घेत होते. शिट्ट्या, शिव्या आणि टाळ्या नसल्यामुळे सोलापूरच्या त्या थिएटर मध्ये 'पब्लिक' नव्हतंच असं वाटलं. सिनेमाच्या मध्यांतरात 'ट्रिंग-ट्रिंग' असा सोडा वॉटर बाटल्यांचा ओळखीचा आवाज आला नाही, आणि कुणी पोऱ्या चहा किंवा खाऱ्या दाण्याच्या कागदी पुड्या विकायलाही आला नाही. नाईलाजाने बाहेर जाऊन कॅरॅमल पॉपकॉर्नचा पुडा विकत घेतला. पण त्या महागड्या कॅरॅमल पॉपकॉर्नला जुन्या काळातल्या एक-दोन रुपयाच्या खाऱ्या दाण्यांच्या पुडीची सर अजिबातच नव्हती.

आजही मला थिएटरमध्ये जाऊनच सिनेमा बघायला आवडते. पण खरे सांगायचे झाले तर, सोलापुरातल्या थिएटरमध्ये, सत्तर-ऐंशीच्या दशकात सिनेमे पाहायला जशी मजा यायची तशी आजकाल येतच नाही! 

रविवार, ५ फेब्रुवारी, २०१७

'निदानतज्ज्ञ'



माझे काका, डॉक्टर राम गोडबोले, १९६२ ते २००६ पर्यंत म्हणजेच त्यांच्या निधनापर्यंत सोलापूरच्या वाडिया हॉस्पिटलमध्ये कार्यरत होते. त्या काळी बरेचसे डॉक्टर M.B.B.S. अथवा L.C.P.S. होऊन जनरल प्रॅक्टिस करायचे. आजच्यासारखा स्पेशालिटी आणि सुपरस्पेशालिटीचा तो जमाना नव्हता. लंडनहून M.R.C.P. आणि ग्लासगो विद्यापीठातून D.T.M.&H. या पदविकेचे सुवर्णपदक मिळवून भारतात परतल्यानंतर थेट आपल्या जन्मगावी म्हणजेच सोलापूरसारख्या दुष्काळी जिल्ह्यात, जनरल फिजिशियन म्हणून त्यांनी स्वतःच्या कारकीर्दीस सुरुवात केली. परदेशातून उच्चशिक्षण घेऊन स्पेशालिस्ट प्रॅक्टिस करणारे माझ्या काकांसारखे एक-दोनच डॉक्टर त्या काळी सोलापूरच्या पंचक्रोशीत होते. त्यामुळे साहजिकच  सुरुवातीपासून डॉक्टर राम गोडबोले हे एक वलयांकित व्यक्तिमत्व होते. तसेच त्यांच्या कर्तृत्वाच्या जोरावर भविष्यातदेखील प्रतिथयश आणि नामवंत डॉक्टर म्हणून ते नावाजले गेले.

प्रतिथयश आणि नामवंत डॉक्टर म्हटलं की, दिमाखदार एसी गाडीतून हिंडणारे, ब्रँडेड कपडे वापरणारे, भरपूर बँक बॅलन्स, फार्महाऊस किंवा शेती असलेले, वरचेवर परदेशवाऱ्या करणारे, देशी-विदेशी कॉन्फरन्समध्ये भाषणं देणारे, अनेक पुरस्कारांचे मानकरी असलेले डॉक्टर, असेच चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते, नाही का? आश्चर्य म्हणजे माझ्या काकांकडे यातले काहीच नव्हते. पण 'प्रतिथयश आणि नामवंत डॉक्टर' च्या माझ्या व्याख्येत बसणारे सर्व काही त्यांच्याकडे होते. ते एक उत्तम  'निदानतज्ज्ञ' आणि कुशल शिक्षक होते. त्यांचा अनुभव दांडगा होता. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशातील सोलापूरलगतच्या सर्व जिल्ह्यांमध्ये एक निष्णात डॉक्टर म्हणून त्यांची ख्याती होती. सोलापूरच्या 'डॉ. वैशंपायन  मेमोरियल मेडिकल कॉलेजचे' ते मानद प्राध्यापक असल्याने त्या कॉलेजमध्ये शिकत असलेल्या आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना ते 'मेडिसिन' या विषयाची लेक्चर्स द्यायचे. वाडिया हॉस्पिटलमध्ये आमची क्लिनिकल टर्म लागली की तिथल्या अवघड, आव्हानात्मक केसेस त्यांच्यासमोर मांडल्यानंतर त्यावर होणारी चर्चा व त्यायोगे केलेले वाचन यातूनही आम्हाला खूप शिकायला मिळायचे.  

काका-पुतणी या रक्ताच्या नात्यापेक्षा गुरु-शिष्या हे आमचे नाते अधिक घट्ट होते. त्यांच्या हाताखाली दोन-तीन वर्षे काम करण्याची संधी मिळणे, ही माझ्या वैद्यकीय करियरमधील सगळ्यांत भाग्याची गोष्ट आहे. योग्य वेळी, योग्य पद्धतीने आणि वाजवी खर्चात केलेल्या वैद्यकीय निदानाचे महत्त्व, या 'निदानतज्ज्ञ' गुरूने माझ्या मनावर ठासून बिंबवले. रुग्णाच्या सर्व तक्रारी शांतपणे ऐकून, व्यवस्थित वेळ देऊन रुग्ण तपासणे, त्या तपासणीतून सापडलेली लक्षणे, आणि आपले वैद्यकीय ज्ञान व अनुभव यांची सांगड घालून एक-दोन तात्पुरत्या निदानांपर्यंत (presumptive diagnosis) येणे, 'योग्य निदान' (correct and  final diagnosis) करण्यासाठी काही अत्यावश्यक चाचण्या लिहून देणे आणि त्या चाचण्यांचे अहवाल मिळेस्तोवर तात्पुरती औषधयोजना करणे, अशी त्यांची सविस्तर 'निदानप्रक्रिया' होती.  डॉक्टरने रुग्णाकडून खुबीने काढून घेतलेले त्याच्या तक्रारींचे नेमके वर्णन (History) आणि  रुग्णाची केलेली सखोल तपासणी (Medical examination),  यातच निदानप्रक्रियेतील नव्वद टक्के काम पूर्ण होत असते, असे ते नेहमी सांगायचे. त्यामुळे त्यांच्या निदानप्रक्रियेत सर्वात जास्त खर्च काय होत असेल तर तो त्यांचा वेळ आणि शास्त्रशुद्ध विचार. महागड्या वैद्यकीय चाचण्या आणि औषधे हा खर्च जवळजवळ नसायचाच. एखाद्या आव्हानात्मक केसमध्ये सहजासहजी 'योग्य निदान' होऊ शकत नसे. अशावेळी रुग्णाला पुढच्या काही तपासण्या ते लिहून देत. पण त्याचबरोबर,  स्वतः अगदी  शिकाऊ डॉक्टर असल्यासारखे वैद्यकीय पुस्तके व संदर्भग्रंथ काढून परत-परत वाचत. त्या काळात होणारी त्यांची प्रचंड तगमग योग्य निदान झाल्यावरच शांत होत असे. मग मात्र, एखादे जटिल रहस्य उलगडल्यावर शेरलॉक होम्सच्या चेहऱ्यावर जो काही भाव येत असेल, तशा छटा मला त्यांच्या चेहऱ्यावर दिसत. गोडबोले सरांच्या हाताखाली शिकलेल्या माझ्यासारख्या प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थिनीने हे अनुभवलेले आहे आणि त्यातूनच आमच्या वैद्यकीय शिक्षणाचा पाया भक्कम झाला आहे.  

त्या काळी, योग्य निदान करणे (Reaching  correct  and final diagnosis), हा वैद्यकीय शिक्षणातला अत्यंत महत्त्वाचा आणि अनिवार्य असा भाग होता. गोडबोले सरांसारखे अनेक उत्तम शिक्षक व 'निदानतज्ज्ञ' आमच्या पिढीला लाभले. योग्य निदान करण्याची ही कला गुरु-शिष्य परंपरेतून पुढे जात होती आणि अनेक 'निदानतज्ज्ञ' घडत होते. परंतु, त्याच काळातले आमच्याबरोबर किंवा थोडे पुढे-मागे शिकलेले बरेचसे व्यावसायिक, आज ज्या प्रकारे वैद्यकीय व्यवसाय करत आहेत ते बघितले की माझ्या अंगावर काटा येतो. आपल्या  शिक्षणाचा उपयोग करून योग्य निदान व उपचार करणे हे आपले कर्तव्य आहे, या शिकवणीचा माझ्या पिढीतल्याही कित्येक अलोपॅथी व्यावसायिकांना पूर्ण विसर पडलेला असावा, असे मला जाणवते. किंवा कदाचित त्या गोष्टींना त्यांच्या दृष्टीने फारसे महत्त्वच राहिलेले नाही. आपल्याकडे आलेल्या रुग्णावर स्वतःचा वेळ व बुद्धी खर्च न करता भरपूर चाचण्या व अनेक महागड्या औषधांवर रुग्णांना  पैसे खर्च करायला लावण्याची जणू अहमहमिका लागली आहे असे वाटते. अलोपॅथीव्यतिरिक्त इतर पॅथीच्याही अनेक वैद्यकीय व्यावसायिकांनी 'वैदिकोपचार', 'निसर्गोपचार', 'चिलेशन थेरपी', 'अरोमा थेरपी' अशा वेगवेगळ्या गोंडस नावांखाली जे काही घृणास्पद उद्योग चालवलेले आहेत, त्याबद्दल तर न बोललेलेच बरे. अशा व्यावसायिकांच्या कचाट्यात सापडलेल्या रुग्णाच्या आयुष्याची दोरी बळकट असेल तरच तो वाचतो. मात्र तसे नसेल तर आपला जीव आणि पैसे दोन्हीही गमावून बसतो. गंमत म्हणजे यांपैकीच अनेक व्यावसायिक हे लौकिकार्थाने 'वलयांकित, प्रतिथयश आणि नामवंत' झालेले आहेत. समाजातील सगळेच वैद्यकीय व्यावसायिक असे आहेत असे माझे मुळीच म्हणणे नाही. परंतु, सचोटीने आणि केवळ 'रुग्णहित' डोळ्यापुढे ठेऊन व्यवसाय करणारे तज्ज्ञ आज 'अल्पसंख्याक' होत चाललेले आहेत, हे मात्र खरे. 
  
आजच्या वैद्यकीय शिक्षणाची पद्धत आणि घसरत चाललेला दर्जा बघितला की मी विद्ध होते. बारावीनंतर लगेच MD/MS होता येत नाही. त्यामुळे नाइलाजास्तव विद्यार्थी साडेचार वर्षे कशीबशी काढतात आणि  एम.बी.बी.एस. कोर्स 'उरकून घेतात'. या काळात लेक्चर्स ऐकणे, आव्हानात्मक केसेस अभ्यासणे व त्यावर चर्चा करणे, असल्या 'फालतू' गोष्टींवर वेळ न घालवता MD/MS प्रवेश परीक्षेच्या क्लासेसचे मार्ग विद्यार्थी धुंडाळत असतात. त्यानंतरच्या  सुपरस्पेशालिटी अभ्यासक्रमांच्या प्रवेशपरीक्षा अधिकच अवघड असतात. आणि त्यांच्या तयारीसाठी वेगळे 'सुपर' क्लास असतातच. अशा या 'क्लासिकल' शिक्षणामध्ये ज्ञान मिळो ना मिळो, चांगली  'रँक' मिळणे अत्यंत महत्त्वाचे झालेले आहे. त्यामुळेच रुग्णाच्या आजाराचे 'योग्य निदान' होणे यासारख्या 'क्षुल्लक' गोष्टीला महत्त्वच राहिलेले नाही! 

आजचे हे विदारक चित्र पाहता, भविष्यकाळात गोडबोले सरांसारख्या डॉक्टर्सची दुर्मिळ प्रजाति नामशेष होईल की काय, अशी भीती मला भेडसावते. म्हणूनच,  'निदानतज्ञ' अशा एका सुपरस्पेशालिटी कोर्सचा समावेश वैद्यकीय शिक्षणप्रणालीत व्हायला हवा असे मला वाटते. तसे शक्य होईल अथवा न होईल. निदानपक्षी, मागच्या पिढीतल्या उत्तम गुरूंच्या तालमीत तयार झालेल्या 'निदानतज्ज्ञ' डॉक्टरांना हाताशी घेऊन, मीच 'निदानकला' या विषयाचा एखादा क्लास सुरु का करू नये? कशी वाटतेय कल्पना? 

बुधवार, १६ नोव्हेंबर, २०१६

'नवगरीबांचे' 'नोट'कारण!

पुणे महानगर पालिकेच्या सोनावणे हॉस्पिटलमध्ये माझ्या बालरूग्णांच्या पालकांना, "पाचशे आणि हजार रूपयांच्या नोटा बंद केल्यामुळे तुम्हाला कितपत त्रास होतोय?" असा प्रश्न विचारला असता जवळपास प्रत्येकाने, "मॅडम आमच्या कडे नेहमी फक्त दहा, पन्नास आणि कधीतरी शंभराच्या नोटा असतात. पाचशे किंवा हजारचीनोट आम्हाला कधी वापरायला मिळतच नाही तर आम्हाला काय फरक पडणार आहे?", असा प्रतिप्रश्न उपस्थित केला आणि खऱ्याखुऱ्या गोरगरिबांच्या जीवनावर नोटा बंदीच्या निर्णयामुळे काहीही विपरीत परिणाम झालेला नाही, याची खात्री पटली. त्या लोकांनी प्रधानमंत्री मोदींच्या निर्णयाचे स्वागतच केले.सोनावणे रुग्णालयात पेपर काढायला दहा रुपये पडतात. एखाद्या बालकाचे रक्त तपासणी करावी लागणार असेल तर अजून दहा रुपये भरावे लागतात. बरेचदा ते जास्तीचे दहा रुपयेही या गरीब लोकांकडे नसतात. त्यामुळे, "नोटा बंदमुळे गरिबांचे हाल होताहेत",  हा विरोधी पक्षांचा कांगावा हास्यास्पद आहे. इतर अनेक कारणांनी गरिबांचे हाल होताहेत,  ते यांना कधी जाणवले आहेत का? आज या राजकीय पुढाऱ्यांवर, मोदींच्या नोटा बंदीच्या निर्णयामुळे अचानक गरीबी ओढवली आहे आणि या नवगरीबांचे हाल होत आहेत, ही गोष्ट मला मान्य आहे आणि त्यांच्या बद्दल मला पूर्ण सहानुभूती आहे. 

बुधवार, १९ ऑक्टोबर, २०१६

प्रतिसाद

'झीरो एफ आय आर' या माझ्या लेखावर अनेक लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या.
"जपून राहा बाई, काळजी घे, इतक्या पहाटे फिरायला जाऊ नकोस, महिलांनी अशा आक्षेपार्ह वर्तनाकडे दुर्लक्ष करणेच जास्त शहाणपणाचे असते" अशा सावध प्रतिक्रिया काहीं स्त्रियांनी दिल्या. कित्येक स्त्रियांनी त्यांच्यावर ओढवलेले असेच प्रसंग मला सांगितले व मी 'एफ आय आर' दाखल करण्याचे धारिष्ट्य दाखवल्याबद्दल माझे खूप कौतुक केले.
"अशा गैरप्रकाराला हाताळता येणे प्रत्येक स्त्रीला किंवा पुरुषाला जमेलच असे नाही" अशी प्रतिक्रिया देऊन, पुरुषही अशा गैरवर्तनाचे बळी ठरू शकतात, याकडे काहींनी माझे लक्ष वेधले.
सर्वानाच विचार करायला प्रवृत्त करणारा असाही एक प्रश्न मांडला गेला की "मांडलेला विषय आणि त्यामागचा विचार समजून घ्यायची कुवत, बलात्कारांनंतर पीडितेच्या आणि गुन्हेगारांच्या जातीची चर्चा करणाऱ्या आपल्या समाजामध्ये आहे तरी का?"

पोलिसांविषयी मी जे लिहिलं, त्याबाबत मात्र सर्वांकडून आपल्या पोलीस खात्याला नांवे ठेवण्यात आली. पोलीसखात्यात काम करणाऱ्या आणि स्वच्छ प्रतिमा असलेल्या काही व्यक्तींनी माझा लेख वाचला आणि त्यांना थोडेसे वाईट वाटले. त्यातल्या एक-दोघांनी मला असेही सुचवले की " 'झीरो एफ.आय.आर.' म्हणजे काय? बाललैंगिक शोषण आणि इतर सर्वच लैंगिक गुन्हयाविरुद्ध कायद्यात काय तरतुदी आहेत? स्त्रिया स्वसंरक्षणासाठी काय करू शकतात? सरकारने त्यासाठी काय काय पावले उचलली आहेत? पोलिस नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी काय-काय करीत आहेत ?" याबद्दलही सविस्तर माहिती लिहून मी  समाजस्वास्थ्याला आणि स्त्रियांच्या सबलीकरणाला हातभार लावावा. म्हणूनच हा लेख.

"झीरो एफ.आय.आर." ही पोस्ट वाचून कित्येकजणींनी त्यांना त्यांच्या लहानपणी आलेले असेच काही वाईट अनुभव मला सांगितले. बाललैंगिक शोषण हा एक गंभीर गुन्हा आहे. जवळजवळ पन्नास टक्के मुला-मुलींना कुठल्या ना कुठल्या प्रकारात मोडणाऱ्या लैंगिक शोषणाला सामोरे जावे लागते, असे आकडेवारीने सिद्ध झालेले आहे. कित्येक  लहान मुलांना आपल्याबरोबर काही गैरकृत्य केले जातेय, याची जाणही नसते. अशा प्रकारच्या जवळजवळ नव्वद टक्के घटनांमध्ये मुलां-मुलींचे शोषण, नातेवाईकांकडून अथवा जवळच्या ओळखीच्या व्यक्तींकडून होत असते. दुर्दैवाने, कित्येक शोषणकर्तेही स्वतः कायद्याने अज्ञान, म्हणजेच अठरा वर्षाच्या खालील वयोगटातील असतात.  सुदैवाने, The Protection of Children from Sexual Offences Act, 2012, (POCSO) हा कायदा आज अस्तित्वात आलेला आहे. या कायद्याचे ज्ञान जास्तीतजास्त पालकांना असायला हवे.
आपल्या मुलाचे किंवा मुलीचे लैंगिक शोषण होणार नाही ही  काळजी घेणे तर आवश्यकच आहे, पण त्याबरोबरच आपला पाल्य कोणाचेही शोषण करणार नाही अथवा लैंगिक गुन्हे करण्यास प्रवृत्त होणार नाही यासाठी पालकांनी सतर्क राहून आपापल्या पाल्यांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. 

मुलांना सक्षम बनवून सुरक्षित ठेवण्यासाठी,  पालकांच्या आणि शालेय  शिक्षकांच्या कार्यशाळा 
मी स्वतः घेत असते. तसेच, चार-पाच वर्षांपासून ते मोठ्या वयाच्या मुलांसाठी मी शाळांमध्ये जाऊन  प्रबोधनसत्रे घेत असते. कुठले वर्तन अयोग्य आहे, त्यांच्याबरोबर असे अयोग्य वर्तन  होऊ नये यासाठी त्यांनी काय काळजी घ्यायची, कुणाबरोबर  असे काही घडत असेल  तर काय करायचे, नेमकी कशी व कोणाची मदत घ्यायची,अशा अनेक बाबींवर मी गप्पांच्या माध्यमातून मुलांचे प्रबोधन करते. चाईल्डलाईन या संस्थेने बनवलेली 'कोमल' ही फिल्म दाखवून मुलांना बोलते करते. नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाईल्डच्या 'POCSO E-Box' आणि चाईल्ड लाईनच्या Helpline बद्दल माहिती देते. लैंगिकता, योग्य-अयोग्य लैंगिकवर्तन, निकोप प्रेमसंबंध, सायबर सिक्युरिटी अशा विषयांवर विद्यार्थी-विद्यार्थिनींचे प्रबोधन मी करत असते. सर्व शाळांमधून व महाविद्यालयांमधून  असे प्रबोधन सातत्याने होणे अत्यावश्यक आहे. लैंगिक शिक्षणांमध्ये केवळ शारीरिक बदलाबद्द्दल न बोलता विद्यार्थी-विद्यार्थिनींना त्यांच्या भावनिक समस्या सोडवायला शिकवले पाहिजे. 

'झीरो एफ.आय.आर.' या पोस्टवर अशीही एक प्रतिक्रिया आली की, 'सर्व समाजात विकृती असतात, सर्वाना कधी ना कधी तरी अशा प्रसंगातून जावे लागते. आपल्याला जर काही शारीरिक इजा होत नसेल तर स्त्रियांनी डोके शांत ठेऊन अशा वागण्याकडे दुर्लक्ष करावे, हे बरे'. ही प्रतिक्रिया मात्र मला तितकीशी रुचली नाही. खरे बोलायचे तर, वर्षानुवर्षे स्त्रिया व लहान मुली घराबाहेर किंवा घरातदेखील येणाऱ्या अशा अनुभवांकडे दुर्लक्षच करत आलेल्या आहेत. कामाच्या ठिकाणी कित्येक महिलांना, बरोबरच्या पुरुषांच्या शोधक नजरा टाळत, अश्लील शेरेबाजी, शिट्ट्या, द्व्यर्थी चावट गाण्यांच्या ओळी ऐकत, किंवा सूचक हावभाव नजरेआड करतच काम करावे लागते. असे वागणे हा पुरुषांचा जन्मसिद्ध हक्क आहे, अशा समजुतीने पुरुष सर्रास वागतात. "डोके शांत ठेऊन अशा वागण्याकडे दुर्लक्ष करावे",  हा 'सबुरीचा सल्ला' मात्र स्त्रियांना दिला जातो हे योग्य नव्हे. स्त्रियांपुढे प्रश्न असाही येतो की अशा प्रकारात मोडणारे वर्तन सिद्ध कसे करायचे? असल्या 'क्षुल्लक' गोष्टीसाठी थेट पोलिसांकडे जाणे म्हणजे अजूनच अवघड. शिवाय, अशा गैरप्रकाराला आपल्याला  सामोरे जावे लागते आहे, याची घरी आई-वडील, भाऊ आणि नवरा यापैकी  कोणालाही काही सांगण्याची चोरी असते. नोकरी करणे तर आवश्यकच आहे. मग करायचे काय? तर कामाच्या ठिकाणी असले आक्षेपार्ह वर्तन निमूटपणे सहन करायचे, अशीच स्त्रियांची  मनोधारणा झालेली आहे. 

सतत होणाऱ्या या कुचंबणेतून सुटका व्हावी याकरिता राजस्थानात भंवरीदेवीच्या बलात्कारानंतर सुरु झालेला लढा, दिल्लीतील निर्भयाच्या बलिदानाने अजूनच तीव्र झाला. 'Sexual Harassment of Women at Workplace (Prevention, Prohibition and Redressal) Act, 2013' हा एक अत्यंत महत्वाचा, दिवाणी कायदा अस्तित्वात आला. या कायद्यामधील तरतुदींची स्त्रियांना आणि पुरुषांनाही व्यवस्थित माहिती असायला हवी. आक्षेपार्ह वागण्याकडे दुर्लक्ष न करता पीडित स्त्रियांनी तक्रार नोंदवावी, हेच योग्य. अशा कायदेशीर तरतुदींबद्दलही मी प्रबोधनसत्रे घेत असंते. तसेच, अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांच्या तक्रारनिवारण समितीवरही माझी नेमणूक झालेली आहे. आज जरी या कायद्याने केवळ स्त्रियांनाच संरक्षण मिळाले असले तरी हा कायदा gender-neutral करून पुरुषांनाही त्यायोगे संरक्षण मिळावे, असे माझे मत आहे. त्याचबरोबर, महिलांनी या कायद्याचा दुरुपयोग करू नये असेही मला वाटते.

भारतात लैंगिक गुन्ह्यांसाठी अनेक फौजदारी कायदे ब्रिटिशांनी १८७२ सालापासून लागू केले आणि भारतीय दंड विधानातील  ५०९ , ३५४, ३७५, ३७६ ही कलमे अस्तित्वात आली. त्यामध्ये वेळोवेळी काही सुधारणाही होत गेल्या. बऱ्याच कायद्यांमध्ये स्त्रियांना विशेष संरक्षण दिलेले आहे. पत्नीला किंवा सुनेला गैरवागणूक देणे, हुंडा किंवा माहेरून पैसे आणण्यासाठी तगादा  लावणे हा गुन्हा आहे ही जाणीव समाजात  रुजायला लागली असली तरीही, आज भारतात कौटुंबिक अत्याचारांचे व हुंडाबळीचे  प्रमाण बरेच आहे. अशा प्रकारच्या अन्यायाला विरोध करण्यासाठी मुलींना आणि स्त्रियांना सक्षम बनवणे आवश्यक आहे. असा गैरप्रकार घडत असल्यास योग्य त्या कायद्याची मदत घेऊन स्वतःचे संरक्षण कसे करावे, याची माहिती स्त्रियांना असणे आवश्यक आहे.
 
"First Information Report (एफ.आय.आर.)" म्हणजेच, गुन्ह्याच्या तक्रारीची पोलीसांकडे सर्वप्रथम होणारी नोंद.  गुन्हा घडल्याची तारीख, वेळ, ठिकाण असे गुन्हयाबद्दलचे सर्व तपशील पोलीस विचारून घेतात आणि एफ.आय.आर.मध्ये नमूद करतात. प्रत्येक एफ.आय.आर.ला त्या पोलीस स्टेशनचा एक क्रमांक दिला जातो. पूर्वापार अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार, ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हा घडलेला आहे, त्या पोलीस स्टेशनमध्येच गुन्ह्याची नोंदणी होणे अपेक्षित होते. मात्र, दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर गठित केल्या गेलेल्या 'न्यायमूर्ती वर्मा आयोगाच्या' सूचनांनुसार २०१३ साली कायद्यात बदल केला गेला. बदललेल्या तरतुदीनुसार, एखाद्या दखलपात्र गुन्हयाची नोंद पीडित व्यक्तीला आपल्या सोयीच्या कुठल्याही पोलीस स्टेशनला करता येते. यालाच "झीरो एफ.आय.आर."
असे म्हणतात, कारण
 गुन्हा नोंदविणाऱ्या पोलीस स्टेशनमध्ये अशा एफ.आय.आर.ला "००" असा क्रमांक देऊन ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हा घडलेला आहे, तेथे ती पाठवली जाते. दखलपात्र गुन्ह्याची नोंद लवकरात लवकर होऊन तपास जलदगत्या चालू व्हावा यासाठी ही तरतूद केलेली आहे. तेंव्हा, ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हा घडलेला आहे, त्याच पोलीस स्टेशनला जाऊन गुन्ह्याची नोंदणी करणे आता बंधनकारक नाही, हे जर सर्व नागरिकांना समजले तरच ते या हक्काचा वापर करू शकतील. 

पोलीस खाते काहीच कामाचे नाही असे म्हणून आपणच पोलीस खात्याला नेहमीच नावे ठेवत असतो. महाराष्ट्र पोलिसांनी स्त्रियांच्या संरक्षणासाठी 'प्रतिसाद' नावाचे एक मोबाईल ऍप तयार केलेले आहे. अपघात, अतिरेकी हल्ला, चोरी किंवा 'महिलांच्या सुरक्षेला धोका', अशा प्रकारचा कुठलाही गुन्हा घडल्यास आपण त्या ऍपचे बटन दाबून त्वरित पोलिसांची मदत मिळवू शकतो. या ऍपचा वापर करून लोक आज पोलिसांची मदत घेत आहेत  व पोलीस खातेही मदत करते आहे. तसेच १०० नंबर फिरवूनही आपण आपली तक्रर नोंदवू शकतो. १०० नंबर फिरवल्यानंतर काही मिनिटांतच पोलिसांची मदत मिळू शकते असा माझा आत्त्तापर्यँतचा अनुभव आहे. आपल्या देशांत कायदा व सुव्यवस्था हवी असेल तर पोलिसांबरोबरच नागरिकांचीही काही सामाजिक बांधिलकी आहे याचे भान आपण सर्वांनी ठेवले पाहिजे हे नक्कीच . 

     






सोमवार, १० ऑक्टोबर, २०१६

"झीरो एफ आय आर"

'पिंक' सिनेमा प्रदर्शित झाला आणि 'झीरो एफ.आय.आर' या विषयावर बरंच काही-काही लिहून यायला लागले. त्याच सुमारास कोपर्डीतील बलात्कार प्रकरणानंतर मूक मोर्चे निघायला लागले. मग इतर जातीतील महिलांवरदेखील कसे लैंगिक अत्याचार नेहमीच होत आलेले आहेत याचाही उहापोह चालू झाला. पण या सर्व गदारोळात, जाती-पातीचे राजकारण न करता, महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांविरुद्ध प्रतिबंधनात्मक ठोस पावले उचलली गेली पाहिजेत, हे नजरेआड होत आहे. 'झिरो एफ.आय.आर' वरून मला, मागच्या वर्षी नवरात्रात घडलेली एक  घटना आठवली.

नेहमीच्या सवयी प्रमाणे, पहाटे उठून मी सव्वापाच-साडेपाचच्या सुमारास फिरायला घराबाहेर पडले होते. भल्या पहाटेचे थंड, शांत व प्रसन्न वातावरण होते. अजून उजाडलेले नसल्याने  व रस्त्यावरचे काही दिवे बंद असल्याने, रस्त्यावर प्रकाश अगदीच कमी होता. साधू वासवानी चौकातून विधानभवनकडे उजव्या हाताच्या फुटपाथवरून चालत निघाले. त्या निर्मनुष्य रस्त्यावरून एक दांडगा तरुण फुटपाथच्या लोखंडी रेलींगजवळून चालत येताना मला दिसला. लांबूनच त्याची व माझी नजरानजर झाली, आणि मला काही कळायच्या आतच त्याने घाणेरडे अंगप्रदर्शन करून, माझ्याकडे बघत काही अश्लील हावभाव सुरु केले. अचानक असे दृश्य समोर आल्याने मी स्तब्ध झाले, कमालीच्या भीतीची लहर माझ्या शरीरातून गेली आणि अक्षरशः घाम फुटला. पण दुसऱ्याच क्षणी मी भानावर आले आणि माझ्या मनांत किळस, राग, उद्वेग या भावना उफाळून आल्या. त्याच्या त्या हिडीस वर्तनाबद्दल  त्याला चांगलाच धडा शिकवायला पाहिजे अशी प्रबळ भावना मनात आली.

तो तरुण माझ्या डाव्या बाजूला जवळच उभा असला तरी मी त्याच्या कानफटात लावू शकेन इतका जवळ नव्हता. रागाने त्याच्यावर ओरडत पटकन मागे वळून फुटपाथवरून रस्त्यावर उतरून, त्याला पकडण्याच्या उद्देशाने मी जवळ-जवळ धावतच त्याच्याकडे निघाले. माझा रणचंडिकेचा अवतार बघून तो घाबरून, मला चुकवून, वासवानी चौकाकडे पळू लागला. मग मीही सगळे बळ एकवटून त्याच्या मागे शक्य तितक्या जोरात पळायला लागले. पण तो  जोरात पळत काही क्षणांतच माझ्या नजरेआड झाला. त्या दरम्यान मी माझ्या  मोबाईल फोन वरून १०० नंबरवर फोन फिरवला, पण तो लागला नाही. म्हणून मी घरी फोन करून झालेला प्रकार आनंदला कळवला आणि पोलिसांना कळवायला सांगितले. रस्त्यावरून पळता-पळता, "पकडा पकडा" असा आरडाओरडा मी करीत असल्याने, रस्त्यावरून चाललेला एक अनोळखी रिक्षावाला मदतीला धावून आला व मी त्याच्या  रिक्षात बसून त्या तरुणाचा पाठलाग सुरु केला. रिक्षावाल्याने प्रसंगावधान राखून सुसाट वेगाने रिक्षा चालवत पाठलाग केल्यामुळे, साधू वासवानी रस्त्यावरील पोलीस मुख्यालयाच्या अलिकडच्या पेट्रोल पंपासमोर त्या तरुणाला आम्ही गाठले.

तातडीने रिक्षातून उतरून त्या तरुणाला मी पकडले  व त्याला एक सणसणीत थोबाडीत मारली. तो तरुण माझ्या पायावर लोळण घेऊन, हात जोडून, "मावशी माफ करा, मला सोडा. परत असं करणार नाही " अशी गयावया करायला लागला.  तेवढ्यात पोलीस मुख्यालयाच्या गेट नंबर तीन मधून एक महिला पोलीस शिपाई बाहेर आल्या व काय घडले याची विचारपूस करू लागल्या. तसेच पाठोपाठ एक पुरुष पोलीस शिपाई मोटारसायकलवरून आला. त्या माणसाने जे घृणास्पद वर्तन  केले होते त्याबद्दल  सांगण्याचीही मला लाज वाटत होती. तरीही घडलेला प्रकार  मी त्यांना सांगितला. मग त्या शिपायाने त्या तरुणाला पकडून पोलीस मुख्यालयाच्या दारात तैनात असलेल्या शिपायांच्या हवाली केले. हे सर्व होईस्तोवर घरातून निघून आनंदही तिथे आलेला होता. त्याने पोलिस कंट्रोल रूमला माझा फोन नंबर कळवलेला असल्याने, कंट्रोल रुमकडूनही मला फोन आलेला होता. तसेच विधान भवन पोलीस चौकीचे फौजदारही एका शिपायासह दाखल झालेले होते.

"या माणसांविरुद्ध तुम्हाला गुन्हा दाखल करायचाय का?" असा प्रश्न माझ्यापुढे पोलिसांनी ठेवला. गुन्हा घडलेलाच होता आणि तो दाखल करणे आवश्यक आहे यावर मी आणि आनंदही ठाम होतो. मग पोलीस त्या तरुणाला घेऊन बंडगार्डन  स्टेशनमध्ये गेले व मलाही तिथे जावे लागले. तिथे गेल्यावरचा अनुभव वेगळाच होता. 'आता पहाटे पहाटे ही काय पीडा आणलीय या बाईने?' असा भाव तिथल्या ड्युटीवरील पोलीस कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आला होता. त्यांनंतरचा सगळा प्रकार अत्यंत त्रासदायक होता. "बाई, कम्प्लेंट कशाला करता? याला जरा आत घेतो, आमच्या पद्धतीने समज देऊन सरळ करतो आणि देतो सोडून" किंवा, "एफ. आय. आर. दाखल केलीत तर तुम्हालाच त्रास होईल. कोर्टात साक्ष द्यायला यावे लागेल" आणि कळस म्हणजे, "बाई त्यानं तुम्हाला हात तर नाही ना लावला? मग द्या ना सोडून. कशाला एफ. आय. आर. देण्याच्या भानगडीत पडता?" हे सगळं कमी होतं की काय म्हणून, "बाई इतक्या पहाटे-पहाटे तुम्ही कशाला घराबाहेर पडला होतात?" पोलिसांच्या असल्या भडिमाराला मला सामोरे जावे लागले. मला हे सगळे असह्य होत होते. पण आनंद मला धीर देत, माझ्या बरोबर होता म्हणून मी शांत राहू शकले.   

सर्वांत चीड आणणारे वक्तव्य विधानभवन पोलीस चौकीच्या फौजदारसाहेबांचे होते," बाई, गुन्हा जर आमच्या पोलीस चौकीजवळ घडला असे तुम्ही म्हणता, तर मग तुम्ही आमच्या पोलीस चौकीवर तक्रार द्यायला का नाही आलात? इकडं पोलीस हेडक्वार्टरपाशी यायची काय गरज होती?" गुन्हेगाराच्या मागे जाऊन त्याला पकडणे मला जास्त महत्त्वाचे वाटले, असे स्पष्टीकरण मी दिले. पण त्यांना पटत नव्हते व ते सतत माझ्यावरच अविश्वास दाखवत होते! 
"विधान भवन पोलीस चौकीचे दार सकाळी आठ वाजेपर्यँत चक्क बंद करून ठेवलेले असते, मग मी कशी तिकडे येणार होते?" असा प्रतिप्रश्न मी त्यांना करू शकले असते. 
माझे फिरणे संपवून मी परत येईपर्यंत म्हणजे सुमारे आठ वाजेपर्यंत खरोखरीच, विधान भवन पोलीस चौकीचे दार बंद असते, हे मी गेली कित्येक वर्षे बघते आहे. हे सांगून त्या पोलीस फौजदाराचे तोड बंद करावे, असे मला क्षणभर वाटलेही होते. पण त्या वेळी त्यांची उणी-दुणी काढणे योग्य होणार नाही या जाणिवेने गप्प बसले. 

इतकी बोलणी ऐकूनही मी एफ. आय. आर. दाखल करण्यावर ठाम आहे हे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर मग, "मॅडम आत्ता आमची आधीची कामे चालली आहेत. तुमचा फोन नंबर द्या. आम्ही तुम्हाला बोलावून घेतो आणि मग एफ. आय. आर. नोंदवून घेतो", असे सांगण्यात आले. 
मी आणि आनंदने आपसात चर्चा केली आणि तिथेच थांबून एफ.आय.आर नोंदवूनच बाहेर पडायचे असे ठरवले. पुढचे दोन-अडीच तास आम्ही तिथल्या बाकड्यावर बसून होतो. रात्रीची ड्यूटी संपवून जाणाऱ्या व सकाळी ड्यूटीवर येणाऱ्या प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याच्या चेहऱ्यावर, "बाई तर बऱ्या घरच्या दिसताहेत, मग काय भानगड आहे यांची? पहाटे-पहाटे पोलीस स्टेशनला काय करताहेत?" असा प्रश्नार्थक भाव होता. काहींनी, "तुमचं काय आहे? का थांबला आहात?" असे प्रश्न विचारलेही. मग पुन्हा ते सगळे सांगणे आले. त्यावर पोलिसांची अनेक बेजबाबदार विधाने ऐकणे आले. काही पोलिसांचा बोलण्याचा रोख तर मला असाही वाटला की, या बाईच्या बाबतीत असं काही घडलं आहे म्हणजे हिचंच काहीतरी चुकलेलं असणार. मला अगदी लाजिरवाणे वाटत होते. तरीही, या अडचणींना न  जुमानता, एफ.आय.आर दाखल करणे हे माझे कर्तव्य आहे या भावनेने आम्ही तिथे थांबून राहिलो. शेवटी साडेनऊ दहाच्या सुमारास एफ.आय.आर दाखल होऊन त्याची प्रत घेऊन आम्ही तिथून बाहेर पडलो.

या सर्व घटनेतून मला काही गोष्टी जाणवल्या. सर्वप्रथम, अशा प्रसंगातून गेलेल्या स्त्रीला, गुन्ह्याविरुद्ध आवाज उठविण्यासाठी घरातील मंडळींचे, विशेषतः पति, वडील, भाऊ यांचे सक्रिय आणि भावनिक पाठबळ असणे अत्यावश्यक आहे. कित्येक स्त्रियांना अशावेळी कदाचित तेही मिळत नसावे. दुसरी गोष्ट म्हणजे, अशा प्रकारची तक्रार नोंदवायला गेलेल्या माझ्यासारख्या सुशिक्षित, सुस्थितीतील स्त्रीला जर पोलिसांकडून म्हणावे तसे सहकार्य मिळत नसेल, तर एखाद्या अशिक्षित, गरीब घरातल्या स्त्रीला एफ.आय. आर. नोंदवणे किती अवघड जात असेल याचा मला अंदाज आला. तिसरी गोष्ट म्हणजे, केवळ माझ्यासमोर दुरून घडलेल्या त्या वर्तनामुळे जर मी इतकी घाबरले होते तर प्रत्यक्षात लैंगिक अत्याचार झालेल्या स्त्रीची मानसिक अवस्था कशी होत असेल, याची कल्पना करता येऊ शकते. आणि त्यानंतर पोलिसांकडून धीर न मिळता उलट जर तिला अपमानास्पद वागणूक मिळत असेल तर ते अतिशय दुर्दैवी आहे. या सर्व कारणांमुळेच  कदाचित कित्येक गुन्हे घडूनही त्यांची नोंद करायला स्त्रिया कचरत असाव्यात. 'पिंक' सिनेमामुळे, एफ.आय.आर. नोंदवण्याचे महत्व आणि "झीरो एफ.आय.आर." ही संकल्पना अधोरेखित झाली. पण मला हेही लक्षात आले की अशा गुन्हयांची नोंद करूनच न घेण्याकडे पोलिसांचा कल असतो. कदाचित आपले पोलिसखाते, "झीरो एफ.आय.आर" म्हणजे, "एफ.आय.आर. च्या शून्य नोंदी करणे असा अगदी सोयीस्कर अर्थ घेत असावे!

नवरात्रात आपण स्त्रीशक्तीची पूजा करतो. मागच्या नवरात्रात मी माझ्यातली 'शक्ति' जागृत करून लैंगिक गुन्ह्याची प्रवृत्ती असलेल्या एका व्यक्तिला पकडून दिले. पोलिसांकडून केवळ 'समज देववून' त्याला सोडून देण्याऐवजी एफ.आय.आर. नोंदवण्याचा कष्टाचा पर्याय मी निवडला. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला वेळीच पकडून देऊन, पुढे होणारा एखादा गंभीर गुन्हा कदाचित मी थांबवू शकेन, अशीच माझी ठाम भूमिका होती आणि आजही आहे. सर्वच वयाच्या स्त्रियांनी, लैंगिक स्वरूपाच्या छोट्यातल्या छोट्या गुन्ह्यांबद्दलही   "Zero tolerence" ठेवला आणि न घाबरता गुन्हेगाराला प्रतिकार केला व गुन्हा नोंदवला, तर अशा अपप्रवृत्तींना आपोआप आळा बसेल. गुन्हा नोंदवण्यासाठी "झीरो एफ.आय.आर." ची संकल्पनाही स्त्रियांना नीट माहिती पाहिजेच. नवरात्रात स्त्रिया उपास, पूजा-अर्चा व नट्टापट्टा करतात, त्याला काहीच हरकत नाही. पण स्त्रीने स्वतःतल्या 'शक्ती'ची जाणीव करून घेणे' हे त्यापेक्षा अधिक महत्वाचे आहे.

दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजन केले जाते. स्त्रियांना समाजात सुरक्षितपणे आणि निर्भीडपणे वावरता यावे याकरिता केल्या गेलेल्या कायद्यांच्या 'ज्ञानाचे शस्त्र' स्त्रियांनी पाजळावे आणि निव्वळ अबला न राहता खऱ्या अर्थाने सबला व सक्षम व्हावे असे मला मनापासून वाटते! 




सोमवार, ३ ऑक्टोबर, २०१६

'बुचाची फुले'




बऱ्याच दिवसांनी कालचा रविवार अगदी निवांत गेला. आरामात उठले, सगळी वर्तमानपत्रे वाचली, नाष्टा आणि सकाळचा स्वयंपाक हे सगळंच उशिरा केलं. संपूर्ण दिवसभर कोणी पेशन्ट बघावे लागले नाहीत किंवा कोणी फोन करून त्रासही दिला नाही. संध्याकाळी विवेकच्या, म्हणजे माझ्या बालमित्राच्या कॅफेला भेट देऊन छान जेवलो आणि रात्री अकराच्या पुढेच घरी परतलो. घरी आल्या-आल्याच Whatsapp वरच्या कुठल्यातरी ग्रुपवरून बारामुल्लामध्ये अतिरेकी हल्ल्याची बातमी आली आणि मनात उगीचच एक ताण सुरु झाला. मग ती बातमी इतर ग्रुपसवर पाठवणं, त्यावर चर्चा करणं, वेगवेगळ्या चॅनेल्सवर त्या बातम्या बघणं असं करता करता बराच काळ गेला, त्यातून मनावरचा ताण थोडा वाढतच गेला आणि रात्री एकच्या पुढेच झोप आली. अर्थातच त्यामुळे आज, माझ्या नेहमीच्या वेळेपेक्षा बरीच उशिरा, साडेसहाला जाग आली. 


आज सोमवार, आधीच उठायला उशीर झालेला, आता फिरायला जावं की न जावं, दिवस धावपळीत जाणार आणि व्यायामाला वेळच मिळणार नाही, या विचारांनी पुन्हा मनावर ताण आला. तरी पण निग्रह करून रोजच्याप्रमाणे थोडावेळ का होईना, फिरून यायचंच असे ठरवले आणि घराबाहेर पडले. बाहेर पडल्या पडल्या एक मंद, परिचित वास आला आणि मन प्रसन्न झाले. आमच्या सोसायटीतून बाहेर जाण्याच्या मार्गावरच एक बुचाचे झाड आहे. ते झाड आता डवरलंय आणि झाडाखाली पांढऱ्या फुलांचा सडा पडायला सुरुवात झालीय हे जाणवलं. पुढे माझ्या नेहमीच्या फेरफटक्याच्या मार्गावरही, फुलांनी बहरलेली अशीच अनेक झाडे लागली आणि पुन्हा त्या फुलांचा तोच मंद सुवास आला . 

पुण्याच्या आर्मी कॅन्टोन्मेंटमध्ये, माझ्या रोजच्या फिरण्याच्या रस्त्यावर ठिकठिकाणी बुचाची झाडे आहेत. त्यांचे अस्तित्व इतर ऋतुंमध्ये मला जाणवतही नाही. सैन्यदलाच्या गणवेशाशी साधर्म्य असलेल्या या झाडाच्या, काळपट हिरव्या पानांमुळे, सैनिकांच्या शिस्तीत उभी असलेली ती झाडे, तिथे आहेत हे मला जाणवतच नसावे कदाचित. पण इतर ऋतूंमध्ये लक्षांत न येणारी तीच बुचाची झाडं, या दिवसांत माझ्या नजरेत भरतात ती केवळ गडद हिरव्यागार रंगाच्या झाडावर फुलणाऱ्या आणि उठून दिसणाऱ्या पांढऱ्या फुलांमुळे. पावसाच्या पाण्यामुळे या झाडांच्या पानावरची धूळ धुतली जाऊन आधीच त्यावर एक तरारी आलेली असते. त्यामुळे या चकचकीत हिरव्या रंगावर फुललेली ही नाजूक फुले बघितली की, हिरव्यागार रंगाच्या साडीवर कुणी पांढऱ्या धाग्याने, नाजूक असा कर्नाटकी कशिदाच काढलाय, असे मला वाटते. 

बुचाची फुले पाहिली की मनात जपलेल्या बालपणीच्या आठवणी उचंबळून येतात. लहानपणी मोठ्या टोपलीत किंवा परकर किंवा झग्ग्याच्या सोग्यामध्ये ती फुले आम्ही उचलायचो आणि मग आमची खूप मजा चालायची. ताज्या फुलांना एकमेकात गुंफून, आम्ही मुली छान वेणी करायचो, किंवा मोठा हारही करायचो. पिस्ता रंगांची देठं गुंफून केलेली, पांढऱ्या फुलांची आणि ती वेणी अतिशय नाजूक दिसायची. त्या फुलांबरोबर आमचे काही जरा विध्वंसक खेळही चालायचे. काहीवेळा आम्ही त्या नाजूक फुलांचे जरा जास्तच हाल  करत असू.  फुलाची पाकळी वेगळी करून, चिमटीत पकडून तिचे दोन पदर आधी दूर करायचो. मग तोंडाने हलकेच हवा त्यात सोडली की त्या पाकळीचा एक छोटासा,  पांढरा फुगा तयार व्हायचा.  तो फुगा आपल्या स्वतःच्या किंवा समोरच्याच्या कपाळावर फोडायचा. तो फुगा फुगला आणि चांगला मोठा आवाज करून फुटला की अगदी मस्त वाटायचं. कधीकधी कोण कमीत कमी वेळात जास्तीत जास्त फुगे फुलवतंय आणि फोडतंय याची स्पर्धा चालायची. तर कधी वरच्या पाकळ्या तोडून केवळ खालचे दांडे बाण म्हणून एकमेकांना मारायचो.


ताज्या बुचाच्या फुलांचा दांडा एका ठराविक अंतरावर खुडून, मागच्या बाजूने तो दांडा फुंकला की छान पिपाणी वाजते. उचललेल्या फुलांच्या पिपाण्या तयार करणे आणि दोन ओठांच्यामध्ये एकाचवेळी चार-पाच पिपाण्या घेऊन जोरजोरात वाजवत बसणं हा एक खेळ असायचा. दोन-तीन भावंडांनी किंवा मैत्रिणींनी एकाच वेळी मोजून सारखी फुले घ्यायची आणि मग कोण जास्त पिपाण्या तयार करतंय ते बघायचं, अशीही स्पर्धा चालायची.  कधी कधी हे असले खेळ आम्ही गटागटाने खेळायचो. बालपणीचे हे अगदी छोटे-छोटे आणि बिन खर्चाचे खेळ आम्हाला किती आनंद देऊन जायचे याची कल्पना आजच्या पिढीतल्या, महागड्या गेम्समध्ये रमणाऱ्या मुलांना येऊच शकणार नाही!

आज सकाळी, फिरायला निघताना जाणवत असलेला मनावरचा ताण, बुचाच्या फुलांचा वास श्वासात भरून घेतल्या-घेतल्या कमी झाला. या फुलांशी निगडित असलेल्या बालपणीच्या सुखद आठवणी कोंडून राहिलेल्या, मनाच्या कुपीचे बूच, आपसूक निघाले आणि मन अगदी हलके झाले. परत येताना, दोन्ही हात भरून फुले उचलून आणली. काही फुलांच्या पाकळ्यांचे फुगे करून फोडले आणि दोन चार फुलांच्या पिपाण्या करून आनंदच्या  कानाशी नेऊन वाजवल्या आणि येत्या आठवड्याचे काम करायला सज्ज झाले!    


शनिवार, २७ ऑगस्ट, २०१६

शंकासूर

रोज सकाळी माझ्या फेरफटक्याच्या मार्गावर बऱ्याच ठिकाणी मला शंकासुरांची झुडुपे दिसतात. लाल व पिवळ्या रंगाच्या या फुलांना काही विशेष गंध नसतो. या फुलांचे नाव 'शंकासुर' असे का पडले असावे?  असा मात्र नेहमी मला प्रश्न पडतो .


'शंकासुर' या नावामुळे मला आमच्या अनिरुद्धचे बालपण आठवते. त्याला बोलायला येऊ लागल्यापासूनच अनेक प्रश्न आणि  शंका विचारून, तो आम्हाला इतका भंडावून सोडायचा की एखादा 'शंकासुरच' आपल्या मागे लागला आहे असे वाटायचे. त्याच्या अनेक चित्र-विचित्र प्रश्नांना उत्तरे देणे, हे आम्हा दोघांना अवघड जायचे. तरीही मोठ्या संयमाने आम्ही समर्पक उत्तरे देत रहायचो. पुढे, तो जरा मोठा झाल्यावर त्याला आम्ही वाचनाची गोडी लावली. त्यामुळे त्याच्या बऱ्याचशा शंकाचे समाधान पुस्तकांमधून आणि इंटरनेटवरून होऊ लागले. आज तो शास्त्र शाखेचा एक अभ्यासू विद्यार्थी आहे. वेगवेगळ्या शास्त्र शाखांमधील संशोधनात तो रमलेला आहे आणि हातून काही मूलभूत संशोधन घडावे अशा प्रयत्नात आहे .

माझ्या दवाखान्यात, साधारण दोन तीन वर्ष वयाचे छोटे 'शंकासुर' रोज येत असतात. हे 'शंकासुर' सुद्धा त्यांच्या आई-वडिलांना सतत अनेक प्रश्न  विचारून पिडत असतात. काही आई-वडील त्यांच्या 'शंकासुरा'ला योग्य पद्धतीने शांत करताना मी पाहते. काही पालक मात्र त्यांच्या शंकाकडे लक्ष देण्याची तसदीही घेत नाहीत. तर काहीजण ऐकतात, पण समाधानकारक  उत्तरेच देत नाहीत. हे बघितले की मात्र मला फार वाईट वाटते. या शंकासुरी वृत्तीमुळेच उद्याचा शास्त्रज्ञ घडणार आहे. न्यूटन नामक शंकासुराला, 'झाडावरचं सफरचंद खाली का पडलं?' हा प्रश्न पडलाच नसता, तर शास्त्र आणि तंत्रज्ञान क्षेत्रातली मानवाची प्रगती कदाचित झालीही नसती. 'तुमच्या या शंकासुराला शांत करा ' हा माझा सल्ला ऐकायला  अशा पालकांना वेळही नसतो आणि ऐकण्याची इच्छाही नसते .

पालकत्व जर असेच चालू राहिले तर भावी  शात्रज्ञांची संख्या घटणार की काय? ही शंका मात्र माझ्या मनांत आल्यावाचून रहात नाही!

मंगळवार, २ ऑगस्ट, २०१६

उजळणी "संस्कृतीची"!


आज आषाढी अमावास्या. हा दिवस 'दिवली अमावास्या', 'दिवळी आवस', 'दिव्याची आवस' 'दर्श अमावास्या' किंवा 'गटारी अमावास्या' अशा अनेक नावांनी ओळखला जातॊ. सकाळपासून सोशल मीडियावर दीपोत्सवाची महती आणि माहिती सांगणाऱ्या अनेक पोस्ट्स फिरताहेत, तितक्याच गटारीवर घसरलेल्याही पोस्ट्स आहेत. आज सकाळी-सकाळी 'मंगलमय दीपपूजन की लाजिरवाणी गटारी?' अशी एक पोस्ट वाचली. त्या पोस्टचा आशय काहीसा असा होता की या मंगल दिवसाला, "गटारी" म्हणून इतकी कुप्रसिद्धी मिळत आहे, की ज्याची अवघ्या मराठी माणसांना लाज वाटावी, आणि हे योग्य नव्हे. दिव्याची अमावास्या साजरी करण्यामागची शास्त्रीय कारणे देऊन, खरंतर आपण पारंपरिक पद्धतीने आजचा आनंदमय दिवस साजरा करून आपली संस्कृती जपूया, असे छान विचार त्या  पोस्टमध्ये होते. परंतु, ते सगळं वाचून  मी मात्र विचारात पडले की 'आपली संस्कृती' म्हणजे नेमके काय? आणि आपली म्हणजे कोणाची? 

परंपरा जपणाऱ्या, एकत्र कुटुंबात जन्मल्यामुळे, लहानपणी घरात सगळे सण यथासांग साजरे होताना मला पाहायला मिळाले. दिव्याच्या अमावास्येच्या दिवशी मोलकरणी घरातले सगळे पितळी दिवे चिंच लावून घासून ठेवायच्या. आई-काकू गव्हाच्या जाडसर पिठांत तेल आणि गूळ घालून त्याचे दिवे करायच्या. पातेल्यावर चाळणी ठेऊन, त्यावर ते दिवे ठेऊन छान  वाफवायच्या. नंतर ते काढून, त्या दिव्यांमध्ये वातींची जोडी व तूप घालून ते प्रज्ज्वलित करून देवाला नैवेद्य दाखवायच्या. तसंच, त्या दिव्यांनी आम्हा बालगोपालांचे औक्षण झाल्यावरच मग आम्हाला दिवे खायला मिळायचे. घरातल्या मोलकरणीबरोबर तिची एखाद-दोन लहान मुले आलेली असली तर आई-काकू त्यांना पण ओवाळायच्या आणि दिवे खायला द्यायच्या.

दिवे करणे आणि खाणे या दोन्ही गोष्टी फारच आनंददायक असायच्या. गुळाने चिकट झालेल्या कणकेत हात घोळवत दिवे करायला मजा यायची. पण आम्ही मुले जरूरीपेक्षा जरा जास्तच कलाकुसर करुन वेगवेगळ्या आकाराचे दिवे करायला लागलो, की मग आई आम्हाला स्वयंपाकघरातून हुसकून लावायची. जेवताना आपण स्वतः केलेला दिवा मिळावा यासाठी धडपड असायची आणि तो विशेष गोड लागायचा हे वेगळं सांगायलाच नकोच  कणकेच्या दिव्यामध्ये, कणीदार साजूक तूप भरून खाण्याची लज्जत काही औरच असायची.

दिव्याच्या अमावास्येची दुसरी आठवण म्हणजे, केवळ त्या दिवशीच वाचली जाणारी, विशिष्ट कहाणी आणि सुरु होणारी जिवतीची पूजा. संपूर्ण श्रावण महिना देवघरात वास्तव्यास असलेला तो जिवतीचा फोटो अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे. जिवती नेहमीच दागिन्याने मढलेली, मोठ्ठ कुंकू लावलेली, गोल गरगरीत चेहऱ्याची आणि सुदृढ बांध्याची असायची. तिच्या पदराखाली एक आणि अंगा-खांद्यावर कमीतकमी चार-पाच मुले असायची. त्या काळात, "दो या तीन बस" "छोटा परिवार सुखी परिवार", "एक के बाद अभी नही और दो के बाद कभी नहीं", असली नारेबाजी एकीकडे वाचनात यायची आणि ठिकठिकाणी लाल त्रिकोण दिसायचा; तर दुसरीकडे हा फोटो! आमच्या कळत्या वयांत हा विरोधाभास  त्रासदायक वाटल्यामुळे, आम्ही आईला विचारायचो, "एकापाठोपाठची इतकी लहान मुले असलेल्या या जिवतीची पूजा का करायची? त्यावर, "मी सांगते म्हणून करायची", किंवा "आपल्या घरात पूर्वीपासून करतात म्हणून करायची" अशी न पटणारी उत्तरे मिळत असत. क्वचित एखादी चापटही खावी लागायची.   

अशा वातावरणामध्ये वाढत असताना, या अमावास्येला गटारी अमावास्या म्हणतात याचा मला गंधही नव्हता. मात्र, आमच्या घराच्या मागे एक देशी दारूचा गुत्ता होता. संध्याकाळी आजीच्या देखरेखीखाली पाढे आणि परवचा म्हणायची आमची वेळ, आणि घरामागील गुत्त्यावर दर्दी लोकांची वर्दळ वाढायची वेळ, साधारण एकच असायची. त्या गुत्त्यावर येणारी माणसे बघण्यामध्ये आणि ती काय बोलतात हे ऐकण्यामध्ये आम्हा भावंडांना कमालीचा रस असायचा. गुत्त्यावर चाललेली भांडणे, आरडाओरडा, खूप प्यायल्यानंतरच्या गळाभेटी आणि एकूण सर्वच तमाशा, घरातल्या मोठयांची नजर चुकवून, गच्चीवर लपून बघताना खूपच मजा यायची. तिथल्या वाचस्पतींमुळे आमचे (अप)शब्दभांडारही खूप समृद्ध झाले! या गुत्त्यावर गोंधळ घालणाऱ्या महाभागांमध्ये आमच्याकडे काम करणाऱ्या मोलकरणींचे नवरेही असायचे. रोज संध्याकाळी सुरु झालेला हा गदारोळ मध्यरात्रीनंतर कधीतरी संपत असावा. गटारी अमावास्येला तिथे काही खास वेगळा सोहळा होत होता की नव्हता, हे मी नाही सांगू शकणार!

मी आज मात्र विचारात पडते. आमच्या घरी साजरा होणारा तो दिवस, आमच्या मोलकरणींकडे तसाच साजरा होत असेल का? दिव्याची अमावास्या म्हटल्यावर माझ्या डोळ्यांसमोर आपल्या संस्कृतीची जी दृष्ये येतात, तशीच दृष्ये आज त्यांच्या मुलांच्या डोळ्यांसमोर येत असतील? का नेहमीपेक्षा जास्त पिऊन गटारात पडलेला बापच त्यांच्या डोळ्यांसमोर येत असेल आणि तोच त्यांच्या संस्कृतीचा भाग असेल? शेतकरी कामकरी कुटुंबातील इतर काहींच्या डोळ्यांसमोर, फक्त त्याच दिवशी जास्त दारू पिणारे त्यांच्या घरातले पुरुष असतील का? आपण जेंव्हा "आपली संस्कृती" असे म्हणतो तेंव्हा त्यात जसा दिव्याच्या आवसेचा दीपोत्सव आहे तसंच "गटारी"चं  पिणंही आहेच. तोही आपल्या समाजातल्या काही घटकांच्या संस्कृतीचा भाग होता आणि राहणार आहे. पण तशी "गटारी" साजरी करणारे लोक, बहुदा व्रतस्थपणे श्रावणही  पाळत असतील. आजच्या समाजात, कुठल्याही वारांचा, सणांचा किंवा चातुर्मासाचा धरबंध न ठेवणाऱ्या लोकांनी "गटारी"च्या प्रथेला ग्लोरिफाय करणं जसं योग्य नाही तसंच आपली "संस्कृती-संस्कृती" असा टाहो फोडत ती प्रथा नाकारणंही अयोग्य होईल. आपल्या  मुलांपुढे आपण कुठली संस्कृती ठेवतोय, हे जास्त महत्वाचे आहे. ती मोठी झाल्यावर, या दिवसाच्या त्यांच्या आठवणी काय असतील? सोशल मीडियावर "दिव्याच्या अमावास्येच्या" आणि "गटारीच्या" नवनवीन पोस्ट वाचण्यात आणि पुढे पाठवण्यात मग्न झालेले आई-वडीलच त्यांना आठवतील, कदाचित!  

दिव्याच्या अवसेला, दिवेलागणीच्या वेळी, मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी दडून बसलेल्या जुन्या आठवणींना उजाळा द्यायला मिळाल्यामुळे मला छान वाटतंय, हे मात्र खरं! 
   

सोमवार, १ ऑगस्ट, २०१६

देवा, असेच छत्र असू द्या !

मागचे दोन आठवडे , माझ्या बालरुग्णांना रात्री अपरात्री उदभवणाऱ्या दुखण्यांमुळे,  मला दुखणे आल्यासारखे झाले  होते. रोजचे जागरण होत होते, सकाळी लवकर जाग येत नव्हती आणि उठल्यावरही अंग आळसावलेले राहत होते.  आज मात्र पहाटे पहाटे छान जाग आली. त्यामुळे बरेच दिवसांनी, सकाळी फिरायला बाहेर पडले. बाहेर उघडीप होती म्हणून छत्री घ्यावी का न घ्यावी, अशा व्दिधा मनस्थितीत असताना शेवटी,  छत्री घेऊनच बाहेर पडले. मागच्या वर्षी, आमची अर्धांगवायू झालेली छत्री बाद करून, चांगली महागातली एक  नवीन छत्री  विकत घेतली होती. पण मागच्या पावसाळ्यात काही तिची घडी  मोडता आली नव्हती. त्यामुळे ती तशी अजूनही नवीनच असल्यासारखी आहे.

पावसाळ्यात छत्री घेऊन बाहेर पडले आणि पाऊस आलाच नाही की माझा जरासा हिरमोडच होतो.  अशा वेळी, "कशासाठी उगीच छत्री घेऊन बाहेर पडतात, कुणास ठाऊक " असा भाव काही लोकांच्या चेहऱ्यावर उमटलेला दिसतो आणि वाईट वाटते. आज मी बाहेर पडून थोडा वेळ झाला आणि पावसाच्या सरी सुरु  झाल्या. मी मोठ्या दिमाखाने माझी छत्री उघडली. अशावेळी मात्र, छत्री नसलेल्यांकडे बघून मात्र मला जास्तच वाईट वाटते. आषाढ आणि श्रावणांत, रस्त्यावर छत्री उघडझाप करण्याचा खेळ करण्यातही एक मजा असते . पाऊस थांबला म्हणून छत्री बंद करावी तर, आपण  छत्री उघडेस्तोवर आपल्याला भिजवून टाकणारी एखादी जोरदार सर येऊन जाते. आपण छत्री उघडून चालत राहावे, तर मधेच पाऊस बंद होतो. पाऊस थांबलाय, हे लक्षांत न आल्यामुळे छत्री उघडी ठेऊन चालत राहिलं तर, "बाई आता पाऊस थांबलाय, बंद करा ती छत्री" असा भाव समोरच्यांच्या चेहऱ्यावर दिसायला लागतो. 

या पावसाळ्यांत नवीन छत्री वापरून , पावसावर  आणि छत्रीवर चार ओळी  लिहण्याचा योग आलाय, हे ही नसे  नसे थोडके. वरुणराजा, तुझे छत्र असेच आमच्यावर राहू दे रे बाबा !

रविवार, २४ जुलै, २०१६

मोडणं सोपं असतं...

वर्षभरापूर्वी, म्हणजे २३ जुलै २०१५ रोजी, माझ्या ८६ वर्षांच्या सासूबाई बागेत फिरायला गेलेल्या असताना पडल्या आणि डोक्याला छोटी खोक पडली. मेंदू भोवती थोडा रक्तस्त्रावही झाला. मार अगदीच थोडा लागलेला असला तरीही त्या मनाने खचल्या आणि पुढे २० डिसेम्बर २०१५ ला त्यांनी इहलोकीचा निरोप घेतला. हा अपघात व्हायच्या दिवसापर्यंत माझ्या सासूबाई आणि माझे ९१ वर्षांचे सासरे असे दोघेच सारसबागेजवळच्या त्यांच्या सदनिकेत राहत होते. त्या वास्तूत जरी ते ३८ वर्षे राहत असले तरी त्यांचा ६७ वर्षे संसार झाला होता. 

सासूबाईंचा अपघात झालेल्या दिवसापासून, माझे सासरे माझ्या नणंदेकडे राहात असल्यामुळे त्यांची सदनिका आजपर्यंत बंदच होती. आज मात्र माझ्या सासऱ्यांनी, आम्हा सर्वांना, त्यांची दोन्ही मुले, दोन्ही सुना आणि त्यांच्या मुलीला, एकत्रित स्वतःच्या वास्तूत बोलावून घेतले. त्यांची सदनिका भाड्याने देऊन टाकावी असा विचार आता  पक्का केल्याचे सासऱ्यांनी आम्हाला सांगितले. तिन्ही अपत्यांनी त्यांच्या घरातले जे सामान ज्याला वापरासाठी हवे आहे ते एकमताने वाटून घेऊन घर रिकामे करावे असेही सुचवले. 

त्यांच्या इच्छेला मान देऊन माझा नवरा आनंद, माझे दीर,आम्ही दोघी सुना, आणि आमची नणंद अशा पाच जणांनी मिळून, भांडी-कुंडी, लाकडी सामान, पुस्तके, अशा वस्तू सामंजस्याने वाटून घेतल्या. काही वस्तू आजच्या फेरीतच उचलून आपापल्या घरी नेल्या. काही पुढच्या एक-दोन फेऱ्यांमध्ये नेऊ आणि ते घर रिकामे करू. माझ्या सासू सासऱ्यांच्या घरात तसे फार सामान नव्हतेच. आम्ही बरेचसे सामान वाटून घेतले असले तरी काही सामान कोणीच घेऊ इच्छित नव्हते. ते कोणा गरजू व्यक्तींना द्यावे किंवा मोडीत टाकावे असे ठरले.    

सामान घेताना माझ्या मनाची नकळतच घालमेल चालू झाली. पण मन घट्ट करून काही सामान घेतले. या गोष्टी सासूबाईंची आठवण म्हणून आपल्या घरी वापरात राहतील, याचे समाधान होतेच. आणलेले सामान साफ करण्यात आणि लावण्यात उरलेला दिवस गेला. पण कुठेतरी, मनाच्या कोपऱ्यातला एक विचार, सतत मनाला टोचतो आहे. माझ्या सासू-सासऱ्यांनी साठाहून अधिक वर्षांमध्ये जोडलेला त्यांचा संसार मोडायला साठ मिनिटेही लागली नाहीत. 

आज मला प्रकर्षानं जाणवलं, की  घर मोडणं सोपं आहे पण घर जोडणं फार अवघड आहे. आज आपण एक घर मोडलं, हा विचार त्रासदायक होतोय. पण आता मनाच्या प्रवाहाला मोडता घालून हा क्लेशदायक विचार मला मोडीत टाकलाच पाहिजे!