पुणे महानगर पालिकेच्या सोनावणे हॉस्पिटलमध्ये माझ्या बालरूग्णांच्या पालकांना, "पाचशे आणि हजार रूपयांच्या नोटा बंद केल्यामुळे तुम्हाला कितपत त्रास होतोय?" असा प्रश्न विचारला असता जवळपास प्रत्येकाने, "मॅडम आमच्या कडे नेहमी फक्त दहा, पन्नास आणि कधीतरी शंभराच्या नोटा असतात. पाचशे किंवा हजारचीनोट आम्हाला कधी वापरायला मिळतच नाही तर आम्हाला काय फरक पडणार आहे?", असा प्रतिप्रश्न उपस्थित केला आणि खऱ्याखुऱ्या गोरगरिबांच्या जीवनावर नोटा बंदीच्या निर्णयामुळे काहीही विपरीत परिणाम झालेला नाही, याची खात्री पटली. त्या लोकांनी प्रधानमंत्री मोदींच्या निर्णयाचे स्वागतच केले.सोनावणे रुग्णालयात पेपर काढायला दहा रुपये पडतात. एखाद्या बालकाचे रक्त तपासणी करावी लागणार असेल तर अजून दहा रुपये भरावे लागतात. बरेचदा ते जास्तीचे दहा रुपयेही या गरीब लोकांकडे नसतात. त्यामुळे, "नोटा बंदमुळे गरिबांचे हाल होताहेत", हा विरोधी पक्षांचा कांगावा हास्यास्पद आहे. इतर अनेक कारणांनी गरिबांचे हाल होताहेत, ते यांना कधी जाणवले आहेत का? आज या राजकीय पुढाऱ्यांवर, मोदींच्या नोटा बंदीच्या निर्णयामुळे अचानक गरीबी ओढवली आहे आणि या नवगरीबांचे हाल होत आहेत, ही गोष्ट मला मान्य आहे आणि त्यांच्या बद्दल मला पूर्ण सहानुभूती आहे.
बुधवार, १६ नोव्हेंबर, २०१६
बुधवार, १९ ऑक्टोबर, २०१६
प्रतिसाद
'झीरो एफ आय आर' या माझ्या लेखावर अनेक लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या.
"जपून राहा बाई, काळजी घे, इतक्या पहाटे फिरायला जाऊ नकोस, महिलांनी अशा आक्षेपार्ह वर्तनाकडे दुर्लक्ष करणेच जास्त शहाणपणाचे असते" अशा सावध प्रतिक्रिया काहीं स्त्रियांनी दिल्या. कित्येक स्त्रियांनी त्यांच्यावर ओढवलेले असेच प्रसंग मला सांगितले व मी 'एफ आय आर' दाखल करण्याचे धारिष्ट्य दाखवल्याबद्दल माझे खूप कौतुक केले.
"अशा गैरप्रकाराला हाताळता येणे प्रत्येक स्त्रीला किंवा पुरुषाला जमेलच असे नाही" अशी प्रतिक्रिया देऊन, पुरुषही अशा गैरवर्तनाचे बळी ठरू शकतात, याकडे काहींनी माझे लक्ष वेधले.
सर्वानाच विचार करायला प्रवृत्त करणारा असाही एक प्रश्न मांडला गेला की "मांडलेला विषय आणि त्यामागचा विचार समजून घ्यायची कुवत, बलात्कारांनंतर पीडितेच्या आणि गुन्हेगारांच्या जातीची चर्चा करणाऱ्या आपल्या समाजामध्ये आहे तरी का?"
पोलिसांविषयी मी जे लिहिलं, त्याबाबत मात्र सर्वांकडून आपल्या पोलीस खात्याला नांवे ठेवण्यात आली. पोलीसखात्यात काम करणाऱ्या आणि स्वच्छ प्रतिमा असलेल्या काही व्यक्तींनी माझा लेख वाचला आणि त्यांना थोडेसे वाईट वाटले. त्यातल्या एक-दोघांनी मला असेही सुचवले की " 'झीरो एफ.आय.आर.' म्हणजे काय? बाललैंगिक शोषण आणि इतर सर्वच लैंगिक गुन्हयाविरुद्ध कायद्यात काय तरतुदी आहेत? स्त्रिया स्वसंरक्षणासाठी काय करू शकतात? सरकारने त्यासाठी काय काय पावले उचलली आहेत? पोलिस नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी काय-काय करीत आहेत ?" याबद्दलही सविस्तर माहिती लिहून मी समाजस्वास्थ्याला आणि स्त्रियांच्या सबलीकरणाला हातभार लावावा. म्हणूनच हा लेख.

आपल्या मुलाचे किंवा मुलीचे लैंगिक शोषण होणार नाही ही काळजी घेणे तर आवश्यकच आहे, पण त्याबरोबरच आपला पाल्य कोणाचेही शोषण करणार नाही अथवा लैंगिक गुन्हे करण्यास प्रवृत्त होणार नाही यासाठी पालकांनी सतर्क राहून आपापल्या पाल्यांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे.



भारतात लैंगिक गुन्ह्यांसाठी अनेक फौजदारी कायदे ब्रिटिशांनी १८७२ सालापासून लागू केले आणि भारतीय दंड विधानातील ५०९ , ३५४, ३७५, ३७६ ही कलमे अस्तित्वात आली. त्यामध्ये वेळोवेळी काही सुधारणाही होत गेल्या. बऱ्याच कायद्यांमध्ये स्त्रियांना विशेष संरक्षण दिलेले आहे. पत्नीला किंवा सुनेला गैरवागणूक देणे, हुंडा किंवा माहेरून पैसे आणण्यासाठी तगादा लावणे हा गुन्हा आहे ही जाणीव समाजात रुजायला लागली असली तरीही, आज भारतात कौटुंबिक अत्याचारांचे व हुंडाबळीचे प्रमाण बरेच आहे. अशा प्रकारच्या अन्यायाला विरोध करण्यासाठी मुलींना आणि स्त्रियांना सक्षम बनवणे आवश्यक आहे. असा गैरप्रकार घडत असल्यास योग्य त्या कायद्याची मदत घेऊन स्वतःचे संरक्षण कसे करावे, याची माहिती स्त्रियांना असणे आवश्यक आहे.
"First Information Report (एफ.आय.आर.)" म्हणजेच, गुन्ह्याच्या तक्रारीची पोलीसांकडे सर्वप्रथम होणारी नोंद. गुन्हा घडल्याची तारीख, वेळ, ठिकाण असे गुन्हयाबद्दलचे सर्व तपशील पोलीस विचारून घेतात आणि एफ.आय.आर.मध्ये नमूद करतात. प्रत्येक एफ.आय.आर.ला त्या पोलीस स्टेशनचा एक क्रमांक दिला जातो. पूर्वापार अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार, ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हा घडलेला आहे, त्या पोलीस स्टेशनमध्येच गुन्ह्याची नोंदणी होणे अपेक्षित होते. मात्र, दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर गठित केल्या गेलेल्या 'न्यायमूर्ती वर्मा आयोगाच्या' सूचनांनुसार २०१३ साली कायद्यात बदल केला गेला. बदललेल्या तरतुदीनुसार, एखाद्या दखलपात्र गुन्हयाची नोंद पीडित व्यक्तीला आपल्या सोयीच्या कुठल्याही पोलीस स्टेशनला करता येते. यालाच "झीरो एफ.आय.आर."
असे म्हणतात, कारण गुन्हा नोंदविणाऱ्या पोलीस स्टेशनमध्ये अशा एफ.आय.आर.ला "००" असा क्रमांक देऊन ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हा घडलेला आहे, तेथे ती पाठवली जाते. दखलपात्र गुन्ह्याची नोंद लवकरात लवकर होऊन तपास जलदगत्या चालू व्हावा यासाठी ही तरतूद केलेली आहे. तेंव्हा, ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हा घडलेला आहे, त्याच पोलीस स्टेशनला जाऊन गुन्ह्याची नोंदणी करणे आता बंधनकारक नाही, हे जर सर्व नागरिकांना समजले तरच ते या हक्काचा वापर करू शकतील.
पोलीस खाते काहीच कामाचे नाही असे म्हणून आपणच पोलीस खात्याला नेहमीच नावे ठेवत असतो. महाराष्ट्र पोलिसांनी स्त्रियांच्या संरक्षणासाठी 'प्रतिसाद' नावाचे एक मोबाईल ऍप तयार केलेले आहे. अपघात, अतिरेकी हल्ला, चोरी किंवा 'महिलांच्या सुरक्षेला धोका', अशा प्रकारचा कुठलाही गुन्हा घडल्यास आपण त्या ऍपचे बटन दाबून त्वरित पोलिसांची मदत मिळवू शकतो. या ऍपचा वापर करून लोक आज पोलिसांची मदत घेत आहेत व पोलीस खातेही मदत करते आहे. तसेच १०० नंबर फिरवूनही आपण आपली तक्रर नोंदवू शकतो. १०० नंबर फिरवल्यानंतर काही मिनिटांतच पोलिसांची मदत मिळू शकते असा माझा आत्त्तापर्यँतचा अनुभव आहे. आपल्या देशांत कायदा व सुव्यवस्था हवी असेल तर पोलिसांबरोबरच नागरिकांचीही काही सामाजिक बांधिलकी आहे याचे भान आपण सर्वांनी ठेवले पाहिजे हे नक्कीच .
सोमवार, १० ऑक्टोबर, २०१६
"झीरो एफ आय आर"
'पिंक' सिनेमा प्रदर्शित झाला आणि 'झीरो एफ.आय.आर' या विषयावर बरंच काही-काही लिहून यायला लागले. त्याच सुमारास कोपर्डीतील बलात्कार प्रकरणानंतर मूक मोर्चे निघायला लागले. मग इतर जातीतील महिलांवरदेखील कसे लैंगिक अत्याचार नेहमीच होत आलेले आहेत याचाही उहापोह चालू झाला. पण या सर्व गदारोळात, जाती-पातीचे राजकारण न करता, महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांविरुद्ध प्रतिबंधनात्मक ठोस पावले उचलली गेली पाहिजेत, हे नजरेआड होत आहे. 'झिरो एफ.आय.आर' वरून मला, मागच्या वर्षी नवरात्रात घडलेली एक घटना आठवली.
नेहमीच्या सवयी प्रमाणे, पहाटे उठून मी सव्वापाच-साडेपाचच्या सुमारास फिरायला घराबाहेर पडले होते. भल्या पहाटेचे थंड, शांत व प्रसन्न वातावरण होते. अजून उजाडलेले नसल्याने व रस्त्यावरचे काही दिवे बंद असल्याने, रस्त्यावर प्रकाश अगदीच कमी होता. साधू वासवानी चौकातून विधानभवनकडे उजव्या हाताच्या फुटपाथवरून चालत निघाले. त्या निर्मनुष्य रस्त्यावरून एक दांडगा तरुण फुटपाथच्या लोखंडी रेलींगजवळून चालत येताना मला दिसला. लांबूनच त्याची व माझी नजरानजर झाली, आणि मला काही कळायच्या आतच त्याने घाणेरडे अंगप्रदर्शन करून, माझ्याकडे बघत काही अश्लील हावभाव सुरु केले. अचानक असे दृश्य समोर आल्याने मी स्तब्ध झाले, कमालीच्या भीतीची लहर माझ्या शरीरातून गेली आणि अक्षरशः घाम फुटला. पण दुसऱ्याच क्षणी मी भानावर आले आणि माझ्या मनांत किळस, राग, उद्वेग या भावना उफाळून आल्या. त्याच्या त्या हिडीस वर्तनाबद्दल त्याला चांगलाच धडा शिकवायला पाहिजे अशी प्रबळ भावना मनात आली.
तो तरुण माझ्या डाव्या बाजूला जवळच उभा असला तरी मी त्याच्या कानफटात लावू शकेन इतका जवळ नव्हता. रागाने त्याच्यावर ओरडत पटकन मागे वळून फुटपाथवरून रस्त्यावर उतरून, त्याला पकडण्याच्या उद्देशाने मी जवळ-जवळ धावतच त्याच्याकडे निघाले. माझा रणचंडिकेचा अवतार बघून तो घाबरून, मला चुकवून, वासवानी चौकाकडे पळू लागला. मग मीही सगळे बळ एकवटून त्याच्या मागे शक्य तितक्या जोरात पळायला लागले. पण तो जोरात पळत काही क्षणांतच माझ्या नजरेआड झाला. त्या दरम्यान मी माझ्या मोबाईल फोन वरून १०० नंबरवर फोन फिरवला, पण तो लागला नाही. म्हणून मी घरी फोन करून झालेला प्रकार आनंदला कळवला आणि पोलिसांना कळवायला सांगितले. रस्त्यावरून पळता-पळता, "पकडा पकडा" असा आरडाओरडा मी करीत असल्याने, रस्त्यावरून चाललेला एक अनोळखी रिक्षावाला मदतीला धावून आला व मी त्याच्या रिक्षात बसून त्या तरुणाचा पाठलाग सुरु केला. रिक्षावाल्याने प्रसंगावधान राखून सुसाट वेगाने रिक्षा चालवत पाठलाग केल्यामुळे, साधू वासवानी रस्त्यावरील पोलीस मुख्यालयाच्या अलिकडच्या पेट्रोल पंपासमोर त्या तरुणाला आम्ही गाठले.
तातडीने रिक्षातून उतरून त्या तरुणाला मी पकडले व त्याला एक सणसणीत थोबाडीत मारली. तो तरुण माझ्या पायावर लोळण घेऊन, हात जोडून, "मावशी माफ करा, मला सोडा. परत असं करणार नाही " अशी गयावया करायला लागला. तेवढ्यात पोलीस मुख्यालयाच्या गेट नंबर तीन मधून एक महिला पोलीस शिपाई बाहेर आल्या व काय घडले याची विचारपूस करू लागल्या. तसेच पाठोपाठ एक पुरुष पोलीस शिपाई मोटारसायकलवरून आला. त्या माणसाने जे घृणास्पद वर्तन केले होते त्याबद्दल सांगण्याचीही मला लाज वाटत होती. तरीही घडलेला प्रकार मी त्यांना सांगितला. मग त्या शिपायाने त्या तरुणाला पकडून पोलीस मुख्यालयाच्या दारात तैनात असलेल्या शिपायांच्या हवाली केले. हे सर्व होईस्तोवर घरातून निघून आनंदही तिथे आलेला होता. त्याने पोलिस कंट्रोल रूमला माझा फोन नंबर कळवलेला असल्याने, कंट्रोल रुमकडूनही मला फोन आलेला होता. तसेच विधान भवन पोलीस चौकीचे फौजदारही एका शिपायासह दाखल झालेले होते.
"या माणसांविरुद्ध तुम्हाला गुन्हा दाखल करायचाय का?" असा प्रश्न माझ्यापुढे पोलिसांनी ठेवला. गुन्हा घडलेलाच होता आणि तो दाखल करणे आवश्यक आहे यावर मी आणि आनंदही ठाम होतो. मग पोलीस त्या तरुणाला घेऊन बंडगार्डन स्टेशनमध्ये गेले व मलाही तिथे जावे लागले. तिथे गेल्यावरचा अनुभव वेगळाच होता. 'आता पहाटे पहाटे ही काय पीडा आणलीय या बाईने?' असा भाव तिथल्या ड्युटीवरील पोलीस कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आला होता. त्यांनंतरचा सगळा प्रकार अत्यंत त्रासदायक होता. "बाई, कम्प्लेंट कशाला करता? याला जरा आत घेतो, आमच्या पद्धतीने समज देऊन सरळ करतो आणि देतो सोडून" किंवा, "एफ. आय. आर. दाखल केलीत तर तुम्हालाच त्रास होईल. कोर्टात साक्ष द्यायला यावे लागेल" आणि कळस म्हणजे, "बाई त्यानं तुम्हाला हात तर नाही ना लावला? मग द्या ना सोडून. कशाला एफ. आय. आर. देण्याच्या भानगडीत पडता?" हे सगळं कमी होतं की काय म्हणून, "बाई इतक्या पहाटे-पहाटे तुम्ही कशाला घराबाहेर पडला होतात?" पोलिसांच्या असल्या भडिमाराला मला सामोरे जावे लागले. मला हे सगळे असह्य होत होते. पण आनंद मला धीर देत, माझ्या बरोबर होता म्हणून मी शांत राहू शकले.
सर्वांत चीड आणणारे वक्तव्य विधानभवन पोलीस चौकीच्या फौजदारसाहेबांचे होते," बाई, गुन्हा जर आमच्या पोलीस चौकीजवळ घडला असे तुम्ही म्हणता, तर मग तुम्ही आमच्या पोलीस चौकीवर तक्रार द्यायला का नाही आलात? इकडं पोलीस हेडक्वार्टरपाशी यायची काय गरज होती?" गुन्हेगाराच्या मागे जाऊन त्याला पकडणे मला जास्त महत्त्वाचे वाटले, असे स्पष्टीकरण मी दिले. पण त्यांना पटत नव्हते व ते सतत माझ्यावरच अविश्वास दाखवत होते!
"विधान भवन पोलीस चौकीचे दार सकाळी आठ वाजेपर्यँत चक्क बंद करून ठेवलेले असते, मग मी कशी तिकडे येणार होते?" असा प्रतिप्रश्न मी त्यांना करू शकले असते.
माझे फिरणे संपवून मी परत येईपर्यंत म्हणजे सुमारे आठ वाजेपर्यंत खरोखरीच, विधान भवन पोलीस चौकीचे दार बंद असते, हे मी गेली कित्येक वर्षे बघते आहे. हे सांगून त्या पोलीस फौजदाराचे तोड बंद करावे, असे मला क्षणभर वाटलेही होते. पण त्या वेळी त्यांची उणी-दुणी काढणे योग्य होणार नाही या जाणिवेने गप्प बसले.
इतकी बोलणी ऐकूनही मी एफ. आय. आर. दाखल करण्यावर ठाम आहे हे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर मग, "मॅडम आत्ता आमची आधीची कामे चालली आहेत. तुमचा फोन नंबर द्या. आम्ही तुम्हाला बोलावून घेतो आणि मग एफ. आय. आर. नोंदवून घेतो", असे सांगण्यात आले.
मी आणि आनंदने आपसात चर्चा केली आणि तिथेच थांबून एफ.आय.आर नोंदवूनच बाहेर पडायचे असे ठरवले. पुढचे दोन-अडीच तास आम्ही तिथल्या बाकड्यावर बसून होतो. रात्रीची ड्यूटी संपवून जाणाऱ्या व सकाळी ड्यूटीवर येणाऱ्या प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याच्या चेहऱ्यावर, "बाई तर बऱ्या घरच्या दिसताहेत, मग काय भानगड आहे यांची? पहाटे-पहाटे पोलीस स्टेशनला काय करताहेत?" असा प्रश्नार्थक भाव होता. काहींनी, "तुमचं काय आहे? का थांबला आहात?" असे प्रश्न विचारलेही. मग पुन्हा ते सगळे सांगणे आले. त्यावर पोलिसांची अनेक बेजबाबदार विधाने ऐकणे आले. काही पोलिसांचा बोलण्याचा रोख तर मला असाही वाटला की, या बाईच्या बाबतीत असं काही घडलं आहे म्हणजे हिचंच काहीतरी चुकलेलं असणार. मला अगदी लाजिरवाणे वाटत होते. तरीही, या अडचणींना न जुमानता, एफ.आय.आर दाखल करणे हे माझे कर्तव्य आहे या भावनेने आम्ही तिथे थांबून राहिलो. शेवटी साडेनऊ दहाच्या सुमारास एफ.आय.आर दाखल होऊन त्याची प्रत घेऊन आम्ही तिथून बाहेर पडलो.
या सर्व घटनेतून मला काही गोष्टी जाणवल्या. सर्वप्रथम, अशा प्रसंगातून गेलेल्या स्त्रीला, गुन्ह्याविरुद्ध आवाज उठविण्यासाठी घरातील मंडळींचे, विशेषतः पति, वडील, भाऊ यांचे सक्रिय आणि भावनिक पाठबळ असणे अत्यावश्यक आहे. कित्येक स्त्रियांना अशावेळी कदाचित तेही मिळत नसावे. दुसरी गोष्ट म्हणजे, अशा प्रकारची तक्रार नोंदवायला गेलेल्या माझ्यासारख्या सुशिक्षित, सुस्थितीतील स्त्रीला जर पोलिसांकडून म्हणावे तसे सहकार्य मिळत नसेल, तर एखाद्या अशिक्षित, गरीब घरातल्या स्त्रीला एफ.आय. आर. नोंदवणे किती अवघड जात असेल याचा मला अंदाज आला. तिसरी गोष्ट म्हणजे, केवळ माझ्यासमोर दुरून घडलेल्या त्या वर्तनामुळे जर मी इतकी घाबरले होते तर प्रत्यक्षात लैंगिक अत्याचार झालेल्या स्त्रीची मानसिक अवस्था कशी होत असेल, याची कल्पना करता येऊ शकते. आणि त्यानंतर पोलिसांकडून धीर न मिळता उलट जर तिला अपमानास्पद वागणूक मिळत असेल तर ते अतिशय दुर्दैवी आहे. या सर्व कारणांमुळेच कदाचित कित्येक गुन्हे घडूनही त्यांची नोंद करायला स्त्रिया कचरत असाव्यात. 'पिंक' सिनेमामुळे, एफ.आय.आर. नोंदवण्याचे महत्व आणि "झीरो एफ.आय.आर." ही संकल्पना अधोरेखित झाली. पण मला हेही लक्षात आले की अशा गुन्हयांची नोंद करूनच न घेण्याकडे पोलिसांचा कल असतो. कदाचित आपले पोलिसखाते, "झीरो एफ.आय.आर" म्हणजे, "एफ.आय.आर. च्या शून्य नोंदी करणे असा अगदी सोयीस्कर अर्थ घेत असावे!
नवरात्रात आपण स्त्रीशक्तीची पूजा करतो. मागच्या नवरात्रात मी माझ्यातली 'शक्ति' जागृत करून लैंगिक गुन्ह्याची प्रवृत्ती असलेल्या एका व्यक्तिला पकडून दिले. पोलिसांकडून केवळ 'समज देववून' त्याला सोडून देण्याऐवजी एफ.आय.आर. नोंदवण्याचा कष्टाचा पर्याय मी निवडला. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला वेळीच पकडून देऊन, पुढे होणारा एखादा गंभीर गुन्हा कदाचित मी थांबवू शकेन, अशीच माझी ठाम भूमिका होती आणि आजही आहे. सर्वच वयाच्या स्त्रियांनी, लैंगिक स्वरूपाच्या छोट्यातल्या छोट्या गुन्ह्यांबद्दलही "Zero tolerence" ठेवला आणि न घाबरता गुन्हेगाराला प्रतिकार केला व गुन्हा नोंदवला, तर अशा अपप्रवृत्तींना आपोआप आळा बसेल. गुन्हा नोंदवण्यासाठी "झीरो एफ.आय.आर." ची संकल्पनाही स्त्रियांना नीट माहिती पाहिजेच. नवरात्रात स्त्रिया उपास, पूजा-अर्चा व नट्टापट्टा करतात, त्याला काहीच हरकत नाही. पण स्त्रीने स्वतःतल्या 'शक्ती'ची जाणीव करून घेणे' हे त्यापेक्षा अधिक महत्वाचे आहे.
दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजन केले जाते. स्त्रियांना समाजात सुरक्षितपणे आणि निर्भीडपणे वावरता यावे याकरिता केल्या गेलेल्या कायद्यांच्या 'ज्ञानाचे शस्त्र' स्त्रियांनी पाजळावे आणि निव्वळ अबला न राहता खऱ्या अर्थाने सबला व सक्षम व्हावे असे मला मनापासून वाटते!
या सर्व घटनेतून मला काही गोष्टी जाणवल्या. सर्वप्रथम, अशा प्रसंगातून गेलेल्या स्त्रीला, गुन्ह्याविरुद्ध आवाज उठविण्यासाठी घरातील मंडळींचे, विशेषतः पति, वडील, भाऊ यांचे सक्रिय आणि भावनिक पाठबळ असणे अत्यावश्यक आहे. कित्येक स्त्रियांना अशावेळी कदाचित तेही मिळत नसावे. दुसरी गोष्ट म्हणजे, अशा प्रकारची तक्रार नोंदवायला गेलेल्या माझ्यासारख्या सुशिक्षित, सुस्थितीतील स्त्रीला जर पोलिसांकडून म्हणावे तसे सहकार्य मिळत नसेल, तर एखाद्या अशिक्षित, गरीब घरातल्या स्त्रीला एफ.आय. आर. नोंदवणे किती अवघड जात असेल याचा मला अंदाज आला. तिसरी गोष्ट म्हणजे, केवळ माझ्यासमोर दुरून घडलेल्या त्या वर्तनामुळे जर मी इतकी घाबरले होते तर प्रत्यक्षात लैंगिक अत्याचार झालेल्या स्त्रीची मानसिक अवस्था कशी होत असेल, याची कल्पना करता येऊ शकते. आणि त्यानंतर पोलिसांकडून धीर न मिळता उलट जर तिला अपमानास्पद वागणूक मिळत असेल तर ते अतिशय दुर्दैवी आहे. या सर्व कारणांमुळेच कदाचित कित्येक गुन्हे घडूनही त्यांची नोंद करायला स्त्रिया कचरत असाव्यात. 'पिंक' सिनेमामुळे, एफ.आय.आर. नोंदवण्याचे महत्व आणि "झीरो एफ.आय.आर." ही संकल्पना अधोरेखित झाली. पण मला हेही लक्षात आले की अशा गुन्हयांची नोंद करूनच न घेण्याकडे पोलिसांचा कल असतो. कदाचित आपले पोलिसखाते, "झीरो एफ.आय.आर" म्हणजे, "एफ.आय.आर. च्या शून्य नोंदी करणे असा अगदी सोयीस्कर अर्थ घेत असावे!
नवरात्रात आपण स्त्रीशक्तीची पूजा करतो. मागच्या नवरात्रात मी माझ्यातली 'शक्ति' जागृत करून लैंगिक गुन्ह्याची प्रवृत्ती असलेल्या एका व्यक्तिला पकडून दिले. पोलिसांकडून केवळ 'समज देववून' त्याला सोडून देण्याऐवजी एफ.आय.आर. नोंदवण्याचा कष्टाचा पर्याय मी निवडला. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला वेळीच पकडून देऊन, पुढे होणारा एखादा गंभीर गुन्हा कदाचित मी थांबवू शकेन, अशीच माझी ठाम भूमिका होती आणि आजही आहे. सर्वच वयाच्या स्त्रियांनी, लैंगिक स्वरूपाच्या छोट्यातल्या छोट्या गुन्ह्यांबद्दलही "Zero tolerence" ठेवला आणि न घाबरता गुन्हेगाराला प्रतिकार केला व गुन्हा नोंदवला, तर अशा अपप्रवृत्तींना आपोआप आळा बसेल. गुन्हा नोंदवण्यासाठी "झीरो एफ.आय.आर." ची संकल्पनाही स्त्रियांना नीट माहिती पाहिजेच. नवरात्रात स्त्रिया उपास, पूजा-अर्चा व नट्टापट्टा करतात, त्याला काहीच हरकत नाही. पण स्त्रीने स्वतःतल्या 'शक्ती'ची जाणीव करून घेणे' हे त्यापेक्षा अधिक महत्वाचे आहे.
दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजन केले जाते. स्त्रियांना समाजात सुरक्षितपणे आणि निर्भीडपणे वावरता यावे याकरिता केल्या गेलेल्या कायद्यांच्या 'ज्ञानाचे शस्त्र' स्त्रियांनी पाजळावे आणि निव्वळ अबला न राहता खऱ्या अर्थाने सबला व सक्षम व्हावे असे मला मनापासून वाटते!
सोमवार, ३ ऑक्टोबर, २०१६
'बुचाची फुले'

आज सोमवार, आधीच उठायला उशीर झालेला, आता फिरायला जावं की न जावं, दिवस धावपळीत जाणार आणि व्यायामाला वेळच मिळणार नाही, या विचारांनी पुन्हा मनावर ताण आला. तरी पण निग्रह करून रोजच्याप्रमाणे थोडावेळ का होईना, फिरून यायचंच असे ठरवले आणि घराबाहेर पडले. बाहेर पडल्या पडल्या एक मंद, परिचित वास आला आणि मन प्रसन्न झाले. आमच्या सोसायटीतून बाहेर जाण्याच्या मार्गावरच एक बुचाचे झाड आहे. ते झाड आता डवरलंय आणि झाडाखाली पांढऱ्या फुलांचा सडा पडायला सुरुवात झालीय हे जाणवलं. पुढे माझ्या नेहमीच्या फेरफटक्याच्या मार्गावरही, फुलांनी बहरलेली अशीच अनेक झाडे लागली आणि पुन्हा त्या फुलांचा तोच मंद सुवास आला .

बुचाची फुले पाहिली की मनात जपलेल्या बालपणीच्या आठवणी उचंबळून येतात. लहानपणी मोठ्या टोपलीत किंवा परकर किंवा झग्ग्याच्या सोग्यामध्ये ती फुले आम्ही उचलायचो आणि मग आमची खूप मजा चालायची. ताज्या फुलांना एकमेकात गुंफून, आम्ही मुली छान वेणी करायचो, किंवा मोठा हारही करायचो. पिस्ता रंगांची देठं गुंफून केलेली, पांढऱ्या फुलांची आणि ती वेणी अतिशय नाजूक दिसायची. त्या फुलांबरोबर आमचे काही जरा विध्वंसक खेळही चालायचे. काहीवेळा आम्ही त्या नाजूक फुलांचे जरा जास्तच हाल करत असू. फुलाची पाकळी वेगळी करून, चिमटीत पकडून तिचे दोन पदर आधी दूर करायचो. मग तोंडाने हलकेच हवा त्यात सोडली की त्या पाकळीचा एक छोटासा, पांढरा फुगा तयार व्हायचा. तो फुगा आपल्या स्वतःच्या किंवा समोरच्याच्या कपाळावर फोडायचा. तो फुगा फुगला आणि चांगला मोठा आवाज करून फुटला की अगदी मस्त वाटायचं. कधीकधी कोण कमीत कमी वेळात जास्तीत जास्त फुगे फुलवतंय आणि फोडतंय याची स्पर्धा चालायची. तर कधी वरच्या पाकळ्या तोडून केवळ खालचे दांडे बाण म्हणून एकमेकांना मारायचो.

आज सकाळी, फिरायला निघताना जाणवत असलेला मनावरचा ताण, बुचाच्या फुलांचा वास श्वासात भरून घेतल्या-घेतल्या कमी झाला. या फुलांशी निगडित असलेल्या बालपणीच्या सुखद आठवणी कोंडून राहिलेल्या, मनाच्या कुपीचे बूच, आपसूक निघाले आणि मन अगदी हलके झाले. परत येताना, दोन्ही हात भरून फुले उचलून आणली. काही फुलांच्या पाकळ्यांचे फुगे करून फोडले आणि दोन चार फुलांच्या पिपाण्या करून आनंदच्या कानाशी नेऊन वाजवल्या आणि येत्या आठवड्याचे काम करायला सज्ज झाले!
.
शनिवार, २७ ऑगस्ट, २०१६
शंकासूर
रोज सकाळी माझ्या फेरफटक्याच्या मार्गावर बऱ्याच ठिकाणी मला शंकासुरांची झुडुपे दिसतात. लाल व पिवळ्या रंगाच्या या फुलांना काही विशेष गंध नसतो. या फुलांचे नाव 'शंकासुर' असे का पडले असावे? असा मात्र नेहमी मला प्रश्न पडतो .

'शंकासुर' या नावामुळे मला आमच्या अनिरुद्धचे बालपण आठवते. त्याला बोलायला येऊ लागल्यापासूनच अनेक प्रश्न आणि शंका विचारून, तो आम्हाला इतका भंडावून सोडायचा की एखादा 'शंकासुरच' आपल्या मागे लागला आहे असे वाटायचे. त्याच्या अनेक चित्र-विचित्र प्रश्नांना उत्तरे देणे, हे आम्हा दोघांना अवघड जायचे. तरीही मोठ्या संयमाने आम्ही समर्पक उत्तरे देत रहायचो. पुढे, तो जरा मोठा झाल्यावर त्याला आम्ही वाचनाची गोडी लावली. त्यामुळे त्याच्या बऱ्याचशा शंकाचे समाधान पुस्तकांमधून आणि इंटरनेटवरून होऊ लागले. आज तो शास्त्र शाखेचा एक अभ्यासू विद्यार्थी आहे. वेगवेगळ्या शास्त्र शाखांमधील संशोधनात तो रमलेला आहे आणि हातून काही मूलभूत संशोधन घडावे अशा प्रयत्नात आहे .
माझ्या दवाखान्यात, साधारण दोन तीन वर्ष वयाचे छोटे 'शंकासुर' रोज येत असतात. हे 'शंकासुर' सुद्धा त्यांच्या आई-वडिलांना सतत अनेक प्रश्न विचारून पिडत असतात. काही आई-वडील त्यांच्या 'शंकासुरा'ला योग्य पद्धतीने शांत करताना मी पाहते. काही पालक मात्र त्यांच्या शंकाकडे लक्ष देण्याची तसदीही घेत नाहीत. तर काहीजण ऐकतात, पण समाधानकारक उत्तरेच देत नाहीत. हे बघितले की मात्र मला फार वाईट वाटते. या शंकासुरी वृत्तीमुळेच उद्याचा शास्त्रज्ञ घडणार आहे. न्यूटन नामक शंकासुराला, 'झाडावरचं सफरचंद खाली का पडलं?' हा प्रश्न पडलाच नसता, तर शास्त्र आणि तंत्रज्ञान क्षेत्रातली मानवाची प्रगती कदाचित झालीही नसती. 'तुमच्या या शंकासुराला शांत करा ' हा माझा सल्ला ऐकायला अशा पालकांना वेळही नसतो आणि ऐकण्याची इच्छाही नसते .
पालकत्व जर असेच चालू राहिले तर भावी शात्रज्ञांची संख्या घटणार की काय? ही शंका मात्र माझ्या मनांत आल्यावाचून रहात नाही!
मंगळवार, २ ऑगस्ट, २०१६
उजळणी "संस्कृतीची"!
परंपरा जपणाऱ्या, एकत्र कुटुंबात जन्मल्यामुळे, लहानपणी घरात सगळे सण यथासांग साजरे होताना मला पाहायला मिळाले. दिव्याच्या अमावास्येच्या दिवशी मोलकरणी घरातले सगळे पितळी दिवे चिंच लावून घासून ठेवायच्या. आई-काकू गव्हाच्या जाडसर पिठांत तेल आणि गूळ घालून त्याचे दिवे करायच्या. पातेल्यावर चाळणी ठेऊन, त्यावर ते दिवे ठेऊन छान वाफवायच्या. नंतर ते काढून, त्या दिव्यांमध्ये वातींची जोडी व तूप घालून ते प्रज्ज्वलित करून देवाला नैवेद्य दाखवायच्या. तसंच, त्या दिव्यांनी आम्हा बालगोपालांचे औक्षण झाल्यावरच मग आम्हाला दिवे खायला मिळायचे. घरातल्या मोलकरणीबरोबर तिची एखाद-दोन लहान मुले आलेली असली तर आई-काकू त्यांना पण ओवाळायच्या आणि दिवे खायला द्यायच्या.
दिव्याच्या अमावास्येची दुसरी आठवण म्हणजे, केवळ त्या दिवशीच वाचली जाणारी, विशिष्ट कहाणी आणि सुरु होणारी जिवतीची पूजा. संपूर्ण श्रावण महिना देवघरात वास्तव्यास असलेला तो जिवतीचा फोटो अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे. जिवती नेहमीच दागिन्याने मढलेली, मोठ्ठ कुंकू लावलेली, गोल गरगरीत चेहऱ्याची आणि सुदृढ बांध्याची असायची. तिच्या पदराखाली एक आणि अंगा-खांद्यावर कमीतकमी चार-पाच मुले असायची. त्या काळात, "दो या तीन बस" "छोटा परिवार सुखी परिवार", "एक के बाद अभी नही और दो के बाद कभी नहीं", असली नारेबाजी एकीकडे वाचनात यायची आणि ठिकठिकाणी लाल त्रिकोण दिसायचा; तर दुसरीकडे हा फोटो! आमच्या कळत्या वयांत हा विरोधाभास त्रासदायक वाटल्यामुळे, आम्ही आईला विचारायचो, "एकापाठोपाठची इतकी लहान मुले असलेल्या या जिवतीची पूजा का करायची? त्यावर, "मी सांगते म्हणून करायची", किंवा "आपल्या घरात पूर्वीपासून करतात म्हणून करायची" अशी न पटणारी उत्तरे मिळत असत. क्वचित एखादी चापटही खावी लागायची.
अशा वातावरणामध्ये वाढत असताना, या अमावास्येला गटारी अमावास्या म्हणतात याचा मला गंधही नव्हता. मात्र, आमच्या घराच्या मागे एक देशी दारूचा गुत्ता होता. संध्याकाळी आजीच्या देखरेखीखाली पाढे आणि परवचा म्हणायची आमची वेळ, आणि घरामागील गुत्त्यावर दर्दी लोकांची वर्दळ वाढायची वेळ, साधारण एकच असायची. त्या गुत्त्यावर येणारी माणसे बघण्यामध्ये आणि ती काय बोलतात हे ऐकण्यामध्ये आम्हा भावंडांना कमालीचा रस असायचा. गुत्त्यावर चाललेली भांडणे, आरडाओरडा, खूप प्यायल्यानंतरच्या गळाभेटी आणि एकूण सर्वच तमाशा, घरातल्या मोठयांची नजर चुकवून, गच्चीवर लपून बघताना खूपच मजा यायची. तिथल्या वाचस्पतींमुळे आमचे (अप)शब्दभांडारही खूप समृद्ध झाले! या गुत्त्यावर गोंधळ घालणाऱ्या महाभागांमध्ये आमच्याकडे काम करणाऱ्या मोलकरणींचे नवरेही असायचे. रोज संध्याकाळी सुरु झालेला हा गदारोळ मध्यरात्रीनंतर कधीतरी संपत असावा. गटारी अमावास्येला तिथे काही खास वेगळा सोहळा होत होता की नव्हता, हे मी नाही सांगू शकणार!
दिव्याच्या अवसेला, दिवेलागणीच्या वेळी, मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी दडून बसलेल्या जुन्या आठवणींना उजाळा द्यायला मिळाल्यामुळे मला छान वाटतंय, हे मात्र खरं!
सोमवार, १ ऑगस्ट, २०१६
देवा, असेच छत्र असू द्या !
मागचे दोन आठवडे , माझ्या बालरुग्णांना रात्री अपरात्री उदभवणाऱ्या दुखण्यांमुळे, मला दुखणे आल्यासारखे झाले होते. रोजचे जागरण होत होते, सकाळी लवकर जाग येत नव्हती आणि उठल्यावरही अंग आळसावलेले राहत होते. आज मात्र पहाटे पहाटे छान जाग आली. त्यामुळे बरेच दिवसांनी, सकाळी फिरायला बाहेर पडले. बाहेर उघडीप होती म्हणून छत्री घ्यावी का न घ्यावी, अशा व्दिधा मनस्थितीत असताना शेवटी, छत्री घेऊनच बाहेर पडले. मागच्या वर्षी, आमची अर्धांगवायू झालेली छत्री बाद करून, चांगली महागातली एक नवीन छत्री विकत घेतली होती. पण मागच्या पावसाळ्यात काही तिची घडी मोडता आली नव्हती. त्यामुळे ती तशी अजूनही नवीनच असल्यासारखी आहे.
पावसाळ्यात छत्री घेऊन बाहेर पडले आणि पाऊस आलाच नाही की माझा जरासा हिरमोडच होतो. अशा वेळी, "कशासाठी उगीच छत्री घेऊन बाहेर पडतात, कुणास ठाऊक " असा भाव काही लोकांच्या चेहऱ्यावर उमटलेला दिसतो आणि वाईट वाटते. आज मी बाहेर पडून थोडा वेळ झाला आणि पावसाच्या सरी सुरु झाल्या. मी मोठ्या दिमाखाने माझी छत्री उघडली. अशावेळी मात्र, छत्री नसलेल्यांकडे बघून मात्र मला जास्तच वाईट वाटते. आषाढ आणि श्रावणांत, रस्त्यावर छत्री उघडझाप करण्याचा खेळ करण्यातही एक मजा असते . पाऊस थांबला म्हणून छत्री बंद करावी तर, आपण छत्री उघडेस्तोवर आपल्याला भिजवून टाकणारी एखादी जोरदार सर येऊन जाते. आपण छत्री उघडून चालत राहावे, तर मधेच पाऊस बंद होतो. पाऊस थांबलाय, हे लक्षांत न आल्यामुळे छत्री उघडी ठेऊन चालत राहिलं तर, "बाई आता पाऊस थांबलाय, बंद करा ती छत्री" असा भाव समोरच्यांच्या चेहऱ्यावर दिसायला लागतो.
या पावसाळ्यांत नवीन छत्री वापरून , पावसावर आणि छत्रीवर चार ओळी लिहण्याचा योग आलाय, हे ही नसे नसे थोडके. वरुणराजा, तुझे छत्र असेच आमच्यावर राहू दे रे बाबा !
पावसाळ्यात छत्री घेऊन बाहेर पडले आणि पाऊस आलाच नाही की माझा जरासा हिरमोडच होतो. अशा वेळी, "कशासाठी उगीच छत्री घेऊन बाहेर पडतात, कुणास ठाऊक " असा भाव काही लोकांच्या चेहऱ्यावर उमटलेला दिसतो आणि वाईट वाटते. आज मी बाहेर पडून थोडा वेळ झाला आणि पावसाच्या सरी सुरु झाल्या. मी मोठ्या दिमाखाने माझी छत्री उघडली. अशावेळी मात्र, छत्री नसलेल्यांकडे बघून मात्र मला जास्तच वाईट वाटते. आषाढ आणि श्रावणांत, रस्त्यावर छत्री उघडझाप करण्याचा खेळ करण्यातही एक मजा असते . पाऊस थांबला म्हणून छत्री बंद करावी तर, आपण छत्री उघडेस्तोवर आपल्याला भिजवून टाकणारी एखादी जोरदार सर येऊन जाते. आपण छत्री उघडून चालत राहावे, तर मधेच पाऊस बंद होतो. पाऊस थांबलाय, हे लक्षांत न आल्यामुळे छत्री उघडी ठेऊन चालत राहिलं तर, "बाई आता पाऊस थांबलाय, बंद करा ती छत्री" असा भाव समोरच्यांच्या चेहऱ्यावर दिसायला लागतो.
या पावसाळ्यांत नवीन छत्री वापरून , पावसावर आणि छत्रीवर चार ओळी लिहण्याचा योग आलाय, हे ही नसे नसे थोडके. वरुणराजा, तुझे छत्र असेच आमच्यावर राहू दे रे बाबा !
रविवार, २४ जुलै, २०१६
मोडणं सोपं असतं...
वर्षभरापूर्वी, म्हणजे २३ जुलै २०१५ रोजी, माझ्या ८६ वर्षांच्या सासूबाई बागेत फिरायला गेलेल्या असताना पडल्या आणि डोक्याला छोटी खोक पडली. मेंदू भोवती थोडा रक्तस्त्रावही झाला. मार अगदीच थोडा लागलेला असला तरीही त्या मनाने खचल्या आणि पुढे २० डिसेम्बर २०१५ ला त्यांनी इहलोकीचा निरोप घेतला. हा अपघात व्हायच्या दिवसापर्यंत माझ्या सासूबाई आणि माझे ९१ वर्षांचे सासरे असे दोघेच सारसबागेजवळच्या त्यांच्या सदनिकेत राहत होते. त्या वास्तूत जरी ते ३८ वर्षे राहत असले तरी त्यांचा ६७ वर्षे संसार झाला होता.
सासूबाईंचा अपघात झालेल्या दिवसापासून, माझे सासरे माझ्या नणंदेकडे राहात असल्यामुळे त्यांची सदनिका आजपर्यंत बंदच होती. आज मात्र माझ्या सासऱ्यांनी, आम्हा सर्वांना, त्यांची दोन्ही मुले, दोन्ही सुना आणि त्यांच्या मुलीला, एकत्रित स्वतःच्या वास्तूत बोलावून घेतले. त्यांची सदनिका भाड्याने देऊन टाकावी असा विचार आता पक्का केल्याचे सासऱ्यांनी आम्हाला सांगितले. तिन्ही अपत्यांनी त्यांच्या घरातले जे सामान ज्याला वापरासाठी हवे आहे ते एकमताने वाटून घेऊन घर रिकामे करावे असेही सुचवले.
त्यांच्या इच्छेला मान देऊन माझा नवरा आनंद, माझे दीर,आम्ही दोघी सुना, आणि आमची नणंद अशा पाच जणांनी मिळून, भांडी-कुंडी, लाकडी सामान, पुस्तके, अशा वस्तू सामंजस्याने वाटून घेतल्या. काही वस्तू आजच्या फेरीतच उचलून आपापल्या घरी नेल्या. काही पुढच्या एक-दोन फेऱ्यांमध्ये नेऊ आणि ते घर रिकामे करू. माझ्या सासू सासऱ्यांच्या घरात तसे फार सामान नव्हतेच. आम्ही बरेचसे सामान वाटून घेतले असले तरी काही सामान कोणीच घेऊ इच्छित नव्हते. ते कोणा गरजू व्यक्तींना द्यावे किंवा मोडीत टाकावे असे ठरले.
सामान घेताना माझ्या मनाची नकळतच घालमेल चालू झाली. पण मन घट्ट करून काही सामान घेतले. या गोष्टी सासूबाईंची आठवण म्हणून आपल्या घरी वापरात राहतील, याचे समाधान होतेच. आणलेले सामान साफ करण्यात आणि लावण्यात उरलेला दिवस गेला. पण कुठेतरी, मनाच्या कोपऱ्यातला एक विचार, सतत मनाला टोचतो आहे. माझ्या सासू-सासऱ्यांनी साठाहून अधिक वर्षांमध्ये जोडलेला त्यांचा संसार मोडायला साठ मिनिटेही लागली नाहीत.
आज मला प्रकर्षानं जाणवलं, की घर मोडणं सोपं आहे पण घर जोडणं फार अवघड आहे. आज आपण एक घर मोडलं, हा विचार त्रासदायक होतोय. पण आता मनाच्या प्रवाहाला मोडता घालून हा क्लेशदायक विचार मला मोडीत टाकलाच पाहिजे!
शनिवार, २ जुलै, २०१६
भाऊसाहेब नव्हे, भाऊच!
भाऊ गेल्याची बातमी फोनवरून समजली तेव्हा मी आणि आनंद हडपसरला एक कार्यशाळा घेत होतो. त्यामुळे तातडीने निघणे अशक्य होते. तरीही शक्य तेवढ्या लवकर कार्यक्रम उरकून आम्ही सुसाट वेगाने गाडी पळवत, शैलेश सोसायटीतील त्यांच्या बंगल्यावर पोहोचलो. पण तोपर्यंत भाऊंना तिथून वैकुंठाकडे नेलेले होते. मग तसेच उलटपावली वैकुंठ स्मशानभूमी गाठली. पण भाऊंच्या पार्थिवाचे दर्शन होऊ शकले नाही.
भाऊ म्हणजे, गजानन परशुराम सहस्र्बुद्धे, हे माझ्या माहेरच्या घरातले ज्येष्ठ जावई. आमच्या सर्वात मोठ्या आत्याचे, शान्ताआत्याचे यजमान. जुन्या काळात जावयांना साहेब, राव वगैरे उपाधी लावून संबोधण्याची पद्धत होती. म्हणून त्यांना सर्वजण भाऊसाहेब म्हणत. पण आम्ही मुले त्यांना भाऊच म्हणायचो. आमच्या सोलापूरच्या वाड्यात आमची आजी राहत असल्यामुळे भाऊ आणि शांताआत्याचे वरचेवर येणे व राहणे व्हायचे. दरवर्षी आम्हीसुद्धा पुण्याला त्यांच्या शिंदेआळीतल्या घरी जायचो. भाऊ आणि शांताआत्याबरोबर आम्ही बरेचदा सहलीलाही जायचो. त्यामुळे लहानपणी भाऊंचा सहवास लाभला. भाऊंच्या अनेक आठवणी मनात आहेत. स्वच्छ गोरा रंग, प्रसन्न हसरा चेहरा, घारे डोळे, सडपातळ देहयष्टी, बेताची उंची आणि हळू आवाजातले बोलणे असे भाऊंच्या बाह्यरूपाचे वर्णन करता येईल. पण त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू वर्णन करायला मात्र मला शब्द कमी पडतील.
भाऊ आणि शांताआत्याचे लग्न ज्या काळांत झाले त्या काळातील रूढीप्रमाणे, पत्रिकेतील गुण जुळल्यामुळेच त्यांचे लग्न झाले असणार. पण शान्ताआत्या आणि भाऊ या दोघांच्या प्रकृती मात्र अगदी भिन्न होत्या. तरीही त्या दोघांना त्यांच्या संसारात perfect communication, mutual respect आणि giving space to each other हे अगदी छान जमले होते. त्यांचा संसार अतिशय सुखा-समाधानाचा होता. शिंदेआळीतल्या त्यांच्या छोट्याशा भाडोत्री घरात, दोन्हीकडच्या अनेक नातेवाईकांचा पाहुणचार अत्यंत प्रेमाने व्हायचा. शांताआत्याचा भक्तिमार्ग भाऊंना कधी भावला असेल असे वाटत नाही. पण शांताआत्याचा शब्द भाऊंनी कधी पडू दिला नाही. तिच्या पूजाअर्चेसाठी, ती सांगेल ती कामे भाऊ तिच्याप्रति असलेल्या भक्तिभावाने करीत असावेत.
नात्याने ज्येष्ठ व माझ्यापेक्षा वयाने पन्नास वर्षे मोठे असले तरी मला किंवा आम्हा कोणाही भावंडाना भाऊंची भीती कधीच वाटली नाही. ते स्वभावाने शांत होते व लहान मुलांना ते खूप प्रेमाने वागवायचे. ते अतिशय हौशी होते आणि आमचे खूप लाड करायचे. भाऊंच्या दृष्टीने 'मुले सांभाळणे' हे 'काम' नसून तो त्यांच्या आनंदाचा भाग होता. लहान मुले त्यांच्याकडे बराच वेळ रमायची. अगदी रडकी, हट्टी मुलेसुद्धा त्यांच्याकडे गेली की शांत व्हायची. लहान मुलांना कडेवर घेऊन ते फेऱ्या मारायचे व अनेकदा झोपवावयाचेही. कदाचित त्यांच्या हाताचा प्रेमळ स्पर्श अगदी लहानग्या मुलालासुद्धा जाणवत असावा. त्याकाळांतल्या पुरुषवर्गात भाऊंचा हा गुण विशेष उठून दिसायचा.
भाऊ तसे खूप बोलके नव्हते. पण ते स्वतः आणि माझे वडील, म्हणजे दादा, हे दोघेही वकील असल्यामुळे त्यांच्या गप्पा विशेष रंगायच्या. भाऊ कमालीचे हजरजबाबी व विनोदी होते. अगदी हळू आवाजात ते एक-दोन शब्दच बोलून जायचे आणि उपस्थितांमध्ये खसखस पिकायची. काही विनोदी बोलत असतांना, भाऊंच्या चेहऱ्यावरची रेषसुद्धा हालत नसे अथवा कोणतेही हातवारे वा अंगविक्षेप ते करत नसत. मी लहान असताना बरेचदा मला त्यांचे बोलणे कळत नसे. पण मोठी माणसे भाऊंच्या बोलण्याला हसून दाद देत असल्यामुळे ते काहीतरी विनोदी बोलत असावेत असा अंदाज येऊन मला मजा वाटे. पुढे त्या बोलण्यातला नर्मविनोद कळायला लागल्यावर मात्र त्यांची समयसूचकता आणि विनोदबुद्धी मला अधिकाधिक भावायला लागली.
भाऊ एक निष्णात वकील होते. कायद्यातल्या खाचाखोचा त्यांना नेमक्या माहिती असायच्या. कधी-कधी आमचे दादाही एखाद्या केसमध्ये भाऊंचा सल्ला घ्यायचे. भाऊंची समरणशक्ती अफाट होती. एखाद्या पक्षकाराची केस त्यांनी ऐकली व समजावून घेतली की ती त्यांच्या डोक्यात पक्की बसायची. त्यामुळे कित्येकदा त्या केसचे कागदपत्र समोर नसतानाही भाऊ उत्तमप्रकारे ती केस चालवू शकायचे. अर्थात भाऊंची ही महती मी दादांकडून फक्त ऐकलेली आहे. पुण्यात कोर्टाच्या आवारात भाऊंचे एक ऑफिस होते. शिंदेआळीतल्या त्यांच्या घरांत पक्षकार क्वचितच यायचे. कोणी आले तरी पाच दहा मिनिटांत त्यांचे काम उरकून भाऊ त्यांची बोळवण करीत असत. त्यामुळे भाऊ कोर्टातून घरी आले, काळा कोट काढला की कुटुंबियांना त्यांचा सहवास लाभायचा. याउलट, सोलापूरला आमच्या दादांचे ऑफिस घरातच असल्यामुळे ते घरी आले तरीही सतत पक्षकारांबरोबर कामात असायचे. म्हणूनच भाऊंच्या कामाच्या पद्धतीचे मला खूप अप्रूप वाटायचे .
भाऊ एक निष्णात वकील होते. कायद्यातल्या खाचाखोचा त्यांना नेमक्या माहिती असायच्या. कधी-कधी आमचे दादाही एखाद्या केसमध्ये भाऊंचा सल्ला घ्यायचे. भाऊंची समरणशक्ती अफाट होती. एखाद्या पक्षकाराची केस त्यांनी ऐकली व समजावून घेतली की ती त्यांच्या डोक्यात पक्की बसायची. त्यामुळे कित्येकदा त्या केसचे कागदपत्र समोर नसतानाही भाऊ उत्तमप्रकारे ती केस चालवू शकायचे. अर्थात भाऊंची ही महती मी दादांकडून फक्त ऐकलेली आहे. पुण्यात कोर्टाच्या आवारात भाऊंचे एक ऑफिस होते. शिंदेआळीतल्या त्यांच्या घरांत पक्षकार क्वचितच यायचे. कोणी आले तरी पाच दहा मिनिटांत त्यांचे काम उरकून भाऊ त्यांची बोळवण करीत असत. त्यामुळे भाऊ कोर्टातून घरी आले, काळा कोट काढला की कुटुंबियांना त्यांचा सहवास लाभायचा. याउलट, सोलापूरला आमच्या दादांचे ऑफिस घरातच असल्यामुळे ते घरी आले तरीही सतत पक्षकारांबरोबर कामात असायचे. म्हणूनच भाऊंच्या कामाच्या पद्धतीचे मला खूप अप्रूप वाटायचे .
भाऊ सगळ्या कुटुंबाचा आधारवड होते. कुणालाही कसल्याही प्रकारची मदत करायला ते तत्पर असायचे. मदत करताना त्या व्यक्तीला उपकाराच्या ओझ्याखाली त्यांनी कधीही दबू दिले नाही, हे विशेष. भाऊ कमालीचे शांत आणि विचारी होते. कोणत्याही गहन कौटुंबिक समस्येमधून ते काहीतरी मार्ग काढतील असा विश्वास कुटुंबातील सर्वांना वाटायचा हे विशेष. आम्ही बद्रीनाथ व केदारनाथच्या यात्रेला गेलो होतो तेव्हा भाऊंच्या स्थितप्रज्ञ वृत्तीची एक झलक मला अनुभवता आली. एका वळणावर आमची बस रस्ता सोडून दरीच्या कडेला गेली आणि एक चाक दरीच्या वर अधांतरी अशा अवस्थेत थांबली. सर्व प्रवाश्यांचा आरडाओरडा व रडारड सुरू झाली. भाऊंनी काहीही न बोलता बसमधील शेवटचा प्रवासी सुखरूप बाहेर पडेस्तोवर अव्याहत मदतकार्य सुरू ठेवले. जीवघेण्या अपघातातून वाचल्यानंतर आम्हा इतर प्रवाशांमध्ये, सगळे कसे घडले, काय होऊ शकले असते आणि आता पुढील प्रवासाचे काय होणार, अशी चर्चा चालू होती. भाऊ मात्र दरीच्या कडेला उभे राहून शांतपणे दातांना मशेरी लावत होते!
भाऊ गेले तेंव्हा पुण्यात असून आणि प्रयत्न करूनही त्यांच्या पार्थिवापर्यंत पोहोचू शकलो नाही याची खंत सदैव जाणवेल. पण भाऊंच्या व्यक्तिमत्वाच्या उत्तुंगतेपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न करणे तर माझ्या हातात आहेच!
सोमवार, २७ जून, २०१६
प्रसिद्धी एजंसी
वर्षभराखाली आमच्या पारपत्रांची मुदत संपली. नूतनीकरणासाठी काय काय करावे लागेल याची इंटरनेटवरून माहिती वाचली, सगळ्या कागदपत्रांची पूर्तता केली आणि नियोजित वेळेवर कार्यालयाच्या बाहेर हजेरी लावली. रांगेमध्ये उभ्या असलेल्या बहुतांश लोकांनी एजंटमार्फत पासपोर्टसाठी अपॉईंट्मेंट घेतली होती. एजंटमार्फत का? असा प्रश्न विचारल्यावर एकापेक्षा एक अशी मजेशीर उत्तरे मिळाली. एकजण म्हणाले, "आपण पासपोर्ट कशासाठी काढतो? परदेशात जाण्यासाठी. तिकिट आणि इतर प्रवासखर्च मिळून आपण माणशी लाख-दीडलाख खर्च करणारच. मग एखाद्या एजंटला हजार बाराशे द्यावे लागले तर काय फरक पडतो ?" अजून कोणीतरी म्हणाले," आपल्या देशात कितीही सगळं कॉम्प्युटराईझ झालं तरीही, एजंट असल्याशिवाय कामं चटचट होतच नाहीत. एजंट लोकांच्या वरपर्यंत ओळखी असतात. काम अडकून पडण्यापेक्षा एजंटला पैसे दिलेले परवडतात" एका उच्चशिक्षिताने तर सरळ सांगितले " कितीही झालं तरी आपल्याकडून फॉर्म भरताना चुका होतातच. एजंटच ते रोजचंच काम असल्यामुळे त्यांच्याकडून चुका होत नाहीत आणि आपली नंतरची कटकट वाचते" अजून कोणीतरी म्हणालं," आमचे नेहमीचे एक एजंट आहेत. ड्रायविंग लायसेन्स काढण्यापासून ते व्हिसा मिळवून देण्यापर्यंत आमची सगळी कामं तेच करतात. अपॉइंटमेंट घेण्याचं काम आपलं आपल्याला करता येतं, हेच मला माहिती नव्हतं". एकेकाची उत्तरे ऐकून आम्ही अवाक झालो. आमची अपॉइंटमेंट सुरळीत पार पडली आणि आठ दिवसांत नवीन पारपत्रे घरी आली.
काही दिवसापूर्वी घरी काम करणारी मोलकरीण महिना भरायच्या आधीच म्हणाली," मॅडम, मला दोन हजार ऍडव्हान्स द्या ना. दोन-तीन महिन्यात फेडते"
मी विचारले "का गं ? आता ऍडव्हान्स कशासाठी? मुलांच्या फिया दप्तरं सगळं तर झालंय ना नुकतंच. "
"बाई माजा नवरा ट्याम्पो चालवतो. दोन दिवसांत त्याचं डायविंग लायसन संपणार हाय. एजंटला पैसे देऊन करून घ्यायचाय उद्या."
" आधी नाही का जागं व्हायचं जरा?"
" आमाला आदी कळलंच नाय ना. लायसन संपणार हाय हे पन एजंटनं सांगितलं म्हनून कळलं. आता त्येच काढून देनार हाय एक दिवसांत लायसन "
" लायसन्स करायला इतके पैसे कुठे लागतात? फारतर चारपाचशे रुपयांत काम होतं. एजंटच्या डोक्यावर तुमचे कष्टाचे पैसे असे कशाला घालवता?" मी कळकळीने म्हणाले.
"बाई आमाला तुमच्या सारखं लिवता वाचता येत असतं तर आमी कशाला गेलो असतो एजंटकडे ? आमच्या गल्लीतलाच एजंट हाय. बाहेरच्यांकडून तो तीन हजार घेतो. आमी गल्लीतच राहतो म्हणून दोनच हजारांत करतो. बाई द्या नं पैसे. लायसन येळेत नाय आला तर नवऱ्याला घरीच बसावं लागेल"
मी काहीही ना बोलता पैसे काढून दिले.
आपल्या देशातले "एजंटराज"संपवायचे असेल तर "एजंटराज"ची प्रसिद्धी करणाऱ्या सुशिक्षित चालत्या बोलत्या एजन्सी आधी बंद पाडल्या पाहिजेत. तुम्हाला काय वाटतं ?
काही दिवसापूर्वी घरी काम करणारी मोलकरीण महिना भरायच्या आधीच म्हणाली," मॅडम, मला दोन हजार ऍडव्हान्स द्या ना. दोन-तीन महिन्यात फेडते"
मी विचारले "का गं ? आता ऍडव्हान्स कशासाठी? मुलांच्या फिया दप्तरं सगळं तर झालंय ना नुकतंच. "
"बाई माजा नवरा ट्याम्पो चालवतो. दोन दिवसांत त्याचं डायविंग लायसन संपणार हाय. एजंटला पैसे देऊन करून घ्यायचाय उद्या."
" आधी नाही का जागं व्हायचं जरा?"
" आमाला आदी कळलंच नाय ना. लायसन संपणार हाय हे पन एजंटनं सांगितलं म्हनून कळलं. आता त्येच काढून देनार हाय एक दिवसांत लायसन "
" लायसन्स करायला इतके पैसे कुठे लागतात? फारतर चारपाचशे रुपयांत काम होतं. एजंटच्या डोक्यावर तुमचे कष्टाचे पैसे असे कशाला घालवता?" मी कळकळीने म्हणाले.
"बाई आमाला तुमच्या सारखं लिवता वाचता येत असतं तर आमी कशाला गेलो असतो एजंटकडे ? आमच्या गल्लीतलाच एजंट हाय. बाहेरच्यांकडून तो तीन हजार घेतो. आमी गल्लीतच राहतो म्हणून दोनच हजारांत करतो. बाई द्या नं पैसे. लायसन येळेत नाय आला तर नवऱ्याला घरीच बसावं लागेल"
मी काहीही ना बोलता पैसे काढून दिले.
आपल्या देशातले "एजंटराज"संपवायचे असेल तर "एजंटराज"ची प्रसिद्धी करणाऱ्या सुशिक्षित चालत्या बोलत्या एजन्सी आधी बंद पाडल्या पाहिजेत. तुम्हाला काय वाटतं ?
शनिवार, २१ मे, २०१६
गानकोकिळ


काल पहाटे माझे फिरणे संपायच्या वेळी माझ्या एका बालवर्गमित्राने रोजच्या त्याच्या रिवाजाप्रमाणे WhatsApp वर मला 'सुप्रभात' चा संदेश पाठवला. घरी पोहोचल्याबरोबर मी तो संदेश वाचला. "कोकिळ स्वत:ची भाषा बोलतो म्हणून तो मुक्त आहे. परंतु पोपट दुसऱ्याची भाषा बोलतो म्हणून तो पिंजऱ्यात गुलाम बनून रहतो. स्वत:ची भाषा, स्वत:चे विचार आणि स्वत:वर विश्वास ठेवा. सुप्रभात!" मी तो संदेश वाचायला आणि एका कोकिळाचे गान चालू व्हायला गाठ पडली. मला एकदम लहानपणीसारखेच 'कुहू-कुहू' असा आवाज काढून कोकिळाला चिथवण्याची सणक आली. आमच्या बेडरुममध्ये आनंद साखरझोपेत पहुडला होता, म्हणून मी दुसऱ्या बेडरुममध्ये गेले आणि अगदी मुक्तकंठाने 'कुहू कुहू' ओरडायला सुरुवात केली. ते ऐकल्यावर अर्थातच तो कोकिळ आपली लय वाढवत चेवाने ओरडायला लागला. मग मी त्याच्याहून वरच्या पट्टीत आवाज चढवून ओरडायला लागले. मला अगदी मुक्त वाटत होतं पण इतक्यात आनंदचे बोलणे कानावर पडले, "अगं अशी ओरडायला काय लहान आहेस का तू? आसपासचे लोक काय म्हणतील याचा तरी विचार कर." मग मात्र मला माझा मुक्त छंद आवरता घेणे भाग पडले.
काही क्षण का होईना पण मनाने लहान होत, बालपणीची वेगळी मजा अनुभवायला मिळाली, हेही नसे थोडके!
गुरुवार, १९ मे, २०१६
रंगबिरंगी
होळीच्या आसपास आणि पुढे महिना-दोन महिने पहाटे फिरायला जाताना, निसर्गातल्या अनेकविध रंगांच्या फुलांची उधळण मला भुलवून टाकते. मला या नैसर्गिक रंगांच्या होळीपुढे, रंगपंचमी किंवा होळीचे रंग नेहमीच फिके वाटतात. त्यातल्या त्यात अनेक रंगी बोगन वेलीच्या फुलांचे रंग मला फार आवडतात. होळी आणि रंगपंचमीला, अनेक रंगांनी रंगलेल्या लोकांच्यामध्ये, पांढरे वस्त्र परिधान केलेली व्यक्ती विशेष उठून दिसते. जणू तशीच, गुलबाक्षी, जांभळ्या, गुलाबी, अबोली, केशरी, पिवळ्या व लाल बोगनवेलीमध्ये, पांढरी बोगनवेल सुद्धा उठून दिसते आणि माझे लक्ष वेधून घेते.
या पांढऱ्या बोगनवेलीची एक मजा म्हणजे बरेचदा, तिच्या पांढऱ्या फुलांमध्ये कुठूनतरी हळूच गुलाबी रंग शिरलेला असतो. इतका हलका, इतका तरल गुलाबी रंग असतो की काही विचारू नका. त्या पांढऱ्या-गुलाबी फुलांच्या रंगाच्या छटा बघून मी थक्क होते. पांढऱ्या रंगाने रंगकाम चालू असताना, मधेच विधात्याचा कुंचला चुकून गुलाबी रंगात बुडाला असावा आणि त्यामुळेच या पांढऱ्या आणि गुलाबी रंगातील अनेक छटा निर्माण झाल्या असाव्यात असे वाटते. हा कुंचला, कधीकधी एकाच फुलामध्ये आणि कधी आसपासच्या अनेक पांढऱ्या फुलांमध्ये, गुलाबी रंगाच्या अनेक छटा भरतो .कधी या फुलांमधल्या गुलाबी छटेकडे पहिले की, एखाद्या गोऱ्यापान बाळाचे, थंडीमुळे झालेले गुलाबी गाल आठवतात. त्या आठवणीबरोबर नकळतच, त्या गालांचा मुलायम स्पर्श, बाळाचे खळखळणारे हसू, निरागस निष्पाप भाव, गालावरची तीट आणि तेल-वेखंडाचा मिश्र वास, डोळ्यावरची अलगद झोप,सगळं जाणवायला लागतं. असं एखादं गोंडस बाळ डोळ्यासमोर आलं, की पुन्हा मातृत्वाची आस लागल्याशिवाय राहात नाही.
कधी कधी मात्र ही फुले, एका क्षणात मला लहानपणीच्या विश्वात नेतात. चाळीस-पंचेचाळीस वर्षांपूर्वी आजच्यासारखे घराघरांत मिक्सर किंवा फ्रीज नव्हते. आज बाहेर ठीक ठिकाणी सहजी मिळतात तसे, आईस्क्रीम किंवा मिल्क शेक्सही त्यावेळी मिळायचे नाहीत. त्यामुळे आईस्क्रीम आणि मिल्क शेक्सचे आम्हाला अगदी अप्रूप असायचे. आमच्या घरी मिक्सर नसला तरी फ्रीज होता. उन्हाळ्याच्या दिवसांत दुधात रंग आणि इसेन्स घालून ते फ्रीजमध्ये गार करून, दूध कोल्ड्रिंक बनवून प्यायला खूप मजा यायची. घरच्या घरी पॉट आईस्क्रीम बनवून, सगळ्यांनी मिळून ते खाणे म्हणजे तर एक पर्वणीच होती म्हणा ना. दूध कोल्ड्रिंकच्या किंवा आईस्क्रीमच्या दुधामध्ये, आई-आजी अगदी हळूच गुलाबी रंगाचा एखादा थेंब टाकायच्या. मग दुधाच्या पांढऱ्या रंगात, गुलाबी तरंग उठायचे. ते दूध चमच्याने हलवले की, पांढऱ्या आणि गुलाबी रंगांच्या अनेक छटा निर्माण व्हायच्या. त्या दोन रंगांचे ते मीलन बघताना मी अगदी गुंग होऊन जायचे. उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच फुलणारी आणि मधूनच गुलाबी झालेली ही पंढरी बोगनवेल पाहताना, चक्क मला लहानपणीच्या दूध कोल्ड्रिंकचा किंवाआईस्क्रीमचा गारवा आणि गोडवासुध्दा अनुभवायला मिळतो!

कधी कधी मात्र ही फुले, एका क्षणात मला लहानपणीच्या विश्वात नेतात. चाळीस-पंचेचाळीस वर्षांपूर्वी आजच्यासारखे घराघरांत मिक्सर किंवा फ्रीज नव्हते. आज बाहेर ठीक ठिकाणी सहजी मिळतात तसे, आईस्क्रीम किंवा मिल्क शेक्सही त्यावेळी मिळायचे नाहीत. त्यामुळे आईस्क्रीम आणि मिल्क शेक्सचे आम्हाला अगदी अप्रूप असायचे. आमच्या घरी मिक्सर नसला तरी फ्रीज होता. उन्हाळ्याच्या दिवसांत दुधात रंग आणि इसेन्स घालून ते फ्रीजमध्ये गार करून, दूध कोल्ड्रिंक बनवून प्यायला खूप मजा यायची. घरच्या घरी पॉट आईस्क्रीम बनवून, सगळ्यांनी मिळून ते खाणे म्हणजे तर एक पर्वणीच होती म्हणा ना. दूध कोल्ड्रिंकच्या किंवा आईस्क्रीमच्या दुधामध्ये, आई-आजी अगदी हळूच गुलाबी रंगाचा एखादा थेंब टाकायच्या. मग दुधाच्या पांढऱ्या रंगात, गुलाबी तरंग उठायचे. ते दूध चमच्याने हलवले की, पांढऱ्या आणि गुलाबी रंगांच्या अनेक छटा निर्माण व्हायच्या. त्या दोन रंगांचे ते मीलन बघताना मी अगदी गुंग होऊन जायचे. उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच फुलणारी आणि मधूनच गुलाबी झालेली ही पंढरी बोगनवेल पाहताना, चक्क मला लहानपणीच्या दूध कोल्ड्रिंकचा किंवाआईस्क्रीमचा गारवा आणि गोडवासुध्दा अनुभवायला मिळतो!
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)