शुक्रवार, २ सप्टेंबर, २०२२

७. मलबारची सफर-'सेंट अँजेलो फोर्ट'


१४ ऑगस्टच्या पहाटे ६ वाजता मला जाग आली. पाठोपाठ आनंदही जागा झाला. बीचवर जाण्यासाठी सोनम अगदी छान तयार होऊन शुभेन्दूची वाट पाहत थांबली होती. सात वाजेपर्यंत चहा मिळू शकणार नसल्याने आम्ही पुळणीवर फेरफटका मारायला गेलो. श्री. अशोक म्हात्रे आणि सौ. अस्मिता म्हात्रे, हे पती-पत्नी आम्हा सर्वांच्या आधीच तिथे पोहोचून पुळणीवर चालत होते. त्यांच्याबरोबर गप्पा मारत आम्हीही पाय मोकळे केले. पाठोपाठ सोनम-शुभेन्दूही आले. सगळ्यांचे एक छान फोटोसेशन झाल्यावर आम्ही रिसॉर्टवर परतलो. तोपर्यंत तिथे सकाळचा चहा आलेला होता. दादांना उठवून त्यांच्याबरोबर गरमागरम चहा घेतला. 

चहा झाल्यानंतर अंघोळी आटपाव्यात म्हटले तर नळाला गरम पाणीच येईना. केरळमध्ये सर्वच हॉटेलांमध्ये, मसाल्याचा वास असलेले गरम पाणी प्यायला देतात. पण अंघोळीला मात्र गरम पाणी घेण्याची पद्धत नसावी की काय अशी शंका आम्हाला येऊ लागली. रिसॉर्टमध्ये सौर उर्जेवर पाणी गरम करण्याची सोय होती. पण त्यात कदाचित काही बिघाड असल्यामुळे गरम पाणी येईना. वातावरण ढगाळ होते आणि ऊन पडायचीही शाश्वती नव्हती. म्हणून आम्ही अंघोळीच्या आधीच नाश्ता करून घ्यायचे ठरवले.

नाश्त्यामध्ये स्थानिक पदार्थांची रेलचेल होती. जाळीदार पांढरेशुभ्र आप्पम, नारळाची चटणी, तांदुळाच्या उकडीपासून केलेले नाजूक इडिअप्पम व त्यासोबत गूळ घातलेले नारळाचे दूध, उपमा, गोडसर आप्पे म्हणजे मुट्टप्पम, व्हेज स्ट्यू असे एकेक अफलातून आणि सात्विक चवीचे पदार्थ होते. कुठल्याही पदार्थामध्ये तेल, मसाले अथवा मिरची जास्त नव्हते. कलिंगडाच्या कापलेल्या फोडींवर पुदिन्याची पाने आणि मसाला घालून ठेवलेले होते. आदल्या रात्री मी जेवलेले नसल्याने, मला भूक लागली होतीच. हे अतिशय आकर्षक पदार्थ समोर आल्यावर मी अक्षरशः पोटाला तडस लागेपर्यंत नाश्ता केला.

अंघोळीच्या गरम पाण्यासाठी सगळ्यांनाच काही काळ थांबावे लागले. शेवटी साडेनऊच्या सुमारास आमची गाडी 'सेंट अँजेलो फोर्ट' कडे निघाली. त्या दिवशी आमच्याबरोबर मोहम्मद शिहाद हा 'लोकल गाईड' म्हणून आलेला होता. किल्ल्यामध्ये पोहोचल्यावर त्याने आम्हाला बरीच चांगली माहिती सांगितली. काही माहिती मी गूगलवरही वाचली. गिरीश-प्राची आणि जहागीरदार पती-पत्नी आम्ही पोहोचायच्या आधीच किल्ल्यापाशी पोहोचले होते.    

१४९८ साली वास्को द गामा पहिल्यांदा भारतात कोळीकोड किनाऱ्यावर उतरला होता. त्याने स्थानिक कोलाथिरी राजाला वसाहतीसाठी जागा देण्याची विनंती केली. १५०५ साली राजाकडून जमीन मिळवून पोर्तुगीजांनी तिथे एक लाकडी किल्ला बांधला. १५०७ साली त्यांनी त्याच जागी एक भक्कम दगडी किल्ला बांधायला सुरुवात केली. त्यावेळी तिथल्या झामोरिन आणि कोलाथिरी राजांनी, किल्ल्याला वेढा घालून पोर्तुगीजांकडून तो किल्ला जिंकण्याचा असफल प्रयत्न केला. पुढे या किल्ल्यामध्येच आपल्या नौदलाचा भक्कम तळ उभारून पोर्तुगीजांनी गोवाही जिंकले.

१६६३ साली डचांनी पोर्तुगीजांकडून सेंट अँजेलो किल्ला जिंकला आणि किल्ल्याचे आधुनिकीकरण केले. अरक्कलचा राजा अली याने १७७२ साली हा किल्ला डचांकडून विकत घेतला, पण १७९० साली ब्रिटिशांनी तो त्याच्याकडून हिरावून आपल्या ताब्यात घेतला. १९४७ सालापर्यंत हा किल्ला ब्रिटिशांचा मलबारमधील मुख्य लष्करी तळ होता. बेकलच्या किल्ल्याप्रमाणेच, हा किल्लादेखील समुद्रामध्ये घुसणाऱ्या एका उंच सुळक्यावर बांधलेला आहे. त्यामुळे, किल्ल्याच्या बुरुजावरून दिसणारे दृश्य अतिशय नयनरम्य आहे. किल्ल्याची काही प्रमाणात पडझड झाली असली तरीही सगळा परिसर खूप स्वच्छ ठेवलेला आहे. बुरुजावरून मापिला खाडी दिसते. खाली एका बाजूला अगदी समुद्राच्या काठावर एक छानशी बाग, आणि चालण्यासाठी एक ट्रॅकही केलेला आहे. 

मोहम्मद शिहादसोबत आम्ही सगळा किल्ला हिंडून बघितला. किल्ला  दाखवताना, तो किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व आम्हाला समजावून सांगत होता. किल्ल्यावर एक जुने दीपगृह आहे. समुद्राच्या दिशेने डागता येतील अशा अनेक तोफा किल्ल्याच्या एका बुरुजावर आहेत. गंमत म्हणजे, त्यातल्या एका तोफेमधे एक तोफगोळा अडकूनच बसलेला आहे. त्याचा मी फोटो काढला. एके ठिकाणी, एका डच अधिकाऱ्याच्या पत्नीच्या आणि त्यांच्या दोन मुलांच्या थडग्यावरच्या दगडावर, त्या काळच्या डच भाषेत, त्यांचा मृत्युलेख लिहिलेला आहे. तो दगड बघून मात्र मला जरा उदास वाटले. 

किल्ल्यामध्ये खालच्या बाजूला घोड्याच्या पागा आहेत. त्याशेजारी एक अंधारकोठडी आहे. किल्ल्याच्या आतमध्ये खूप उंच-उंच वृक्ष आहेत आणि बरीच फुलझाडेही आहेत. आम्ही भर पावसाळ्याच्या दिवसात तिथे गेल्यामुळे सगळीकडे हिरवळही होती. किल्ल्यामध्ये एके ठिकाणी एक खोल विवर होते. एखाद्या कैद्याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली असेल तर त्याचे हातपाय तोडून, त्याला त्या विवरामध्ये  ढकलून देत असत, असे शिहादने आम्हाला सांगितले. त्या काळी, पोर्तुगीजांनी या भागामधील स्थानिक लोकांवर अनन्वित अत्याचार केले. विवरामध्ये ढकलून मृत्युदंडाची शिक्षा देण्याची प्रथा ब्रिटिशांनी बंद केली असेही आम्हाला सांगितले गेले. 

किल्ल्याच्या आवारात एक 'Light and Sound show' चालू करण्याचे २०१५ साली ठरवण्यात आले होते. त्यासाठी किल्ल्यामध्ये जेंव्हा खोदकाम केले गेले, तेंव्हा जमिनीखाली गाडले गेलेले हजारो किलो वजनाचे तोफगोळे मिळाले. हजारो तोफगोळे बाहेर काढल्यावरही जमिनीखाली अजूनही बरेच तोफगोळे आहेत असे लक्षात आल्यामुळे शेवटी ते खोदकाम थांबवण्यात आले. ते सर्व तोफगोळे दोन खोल्यांमध्ये रचून ठेवले आहेत आणि खोल्यांच्या जाळीच्या दरवाज्यांना कुलूप लावलेले आहे. ती तोफगोळ्यांची रास आम्हाला शिहादने जाळीतूनच दाखवली. मी त्याचा फोटोही काढला.  

किल्ल्याच्या आवारात आम्ही एकूण तास-दीडतास होतो. त्यानंतर आम्ही अरक्कल म्युझियम आणि कण्णूरचा दीपस्तंभ बघण्यासाठी पुढे निघालो. 

४ टिप्पण्या: