मार्चच्या पहिल्या आठवड्यात माझ्या मोठ्या भावाच्या मुलीच्या लग्नासाठी मला जयपूरला जायचे होते. त्यामुळे नवीन साड्या, मॅचिंग ब्लाऊज व चपला, आणि दागिने, ही सगळी तयारी झालीच होती. त्यामुळे सिमल्याच्या लग्नासाठी फारशी तयारी करावी लागणार नव्हती. जयपूरहुन परतल्यावर, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात, आनंदच्या पासपोर्टच्या कामानिमित्त आम्ही सोलापूरला गेलो. परतीच्या वाटेवर दादांच्या इच्छेखातर भुलेश्वर मंदिर बघितले. पण दादांना प्रवासाची दगदग झाली असावी. ९-१० एप्रिलच्या सुमारास त्यांना न्यूमोनिया झाल्याचे माझ्या लक्षात आले. मी त्वरित घरच्या घरीच उपचार सुरु केले. तरीही, त्यांचे वय बघता, मी जरा काळजीतच होते. पण दहा-बारा दिवसांमध्ये दादांची तब्येत पुष्कळच सुधारली. त्यामुळे सिमल्याला जायचा बेत आम्ही रद्द केला नाही.
२७ मेला पुण्याहून उबर टॅक्सी करून आम्ही मुंबईला, माझ्या धाकट्या भावाच्या, गिरीशच्या घरी पोहोचलो. हल्ली सरकारने ओला/उबरच्या, सर्व इंटरसिटी गाडयांना सीएनजी बसवणे अनिवार्य केलेले आहे. डिकीमध्ये सी.एन.जी. ची टाकी असल्यामुळे जास्त सामान बसत नाही. आमचे सामान खूप असल्याने, दोन टॅक्सी रद्द कराव्या लागल्या. शेवटी पुणे-मुंबई टॅक्सी सेवेमार्फत मोठी टॅक्सी मागवून, सर्व सामान व्यवस्थित बसवून, रात्री मुंबईला पोहोचलो. या सगळ्या प्रकारात चांगला दीड-दोन तासांचा खोळंबा झाला.
२८ एप्रिलला आमची मुंबई-चंदिगढ फ्लाईट दुपारी पावणेचार वाजताची होती. त्यामुळे आदल्या रात्री गप्पा मारत उशिरा झोपलो. अर्थातच सकाळी उठायला उशीर झाला. आम्ही निवांतपणे चहा-नाष्टा उरकला. पण साडेदहाच्या सुमारास इंडिगोचा मेसेज आला, 'तुमची फ्लाईट रद्द झाली आहे, तुम्ही पैसे परत घेऊ शकता किंवा दुसरी फ्लाईट बुक करू शकता'. आमच्या निवांतपणाला अचानकच सुरुंग लागला. बरीच फोना-फोनी केल्यानंतर आम्हाला मुंबई-गोवा आणि गोवा चंदीगड असे बुकिंग मिळाले. मुंबई-गोवा फ्लाईट दुपारी दोन वाजता निघणार असल्यामुळे बारा बाजेपर्यंत विमानतळावर पोहोचायचे होते. आमची चांगलीच तारांबळ उडाली. पटापट सामान आवरून आम्ही मुंबई एयरपोर्ट गाठला. आधीच्या तिकिटानुसार आम्ही ज्या वेळेला चंदीगढला पोहोचलो असतो त्यापेक्षा आता तासभर उशिरा पोहोचणार होतो. पूर्वीच्या काळी जेंव्हा विमानप्रवासाचे अप्रूप होते, तेव्हा असे घडले असते, तर कदाचित दोन वेळा विमानात बसायला मिळणार याचा मला आनंदच झाला असता. पण आता मात्र विमान बदलणे, आणि गोवा विमानतळावर दोन तास थांबणे अगदी जिवावर आले होते.
रात्री साडेआठच्या सुमारास चंडीगढ विमानतळावर पोहोचलो. दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजताची कालका-सिमला टॉय ट्रेन आम्हाला पकडायची होती. मेजर जनरल हरविजय सिंग (सेवानिवृत्त), या आनंदच्या मित्राने, कालका रेल्वे स्टेशनजवळच असलेल्या, टेरिटोरियल आर्मीच्या ऑफिसर्स मेसमध्ये आमच्यासाठी एक गेस्टरूम आरक्षित करून ठेवलेली होती. पण कालका कॅंटोन्मेंट अगदी छोटेखानी असल्याने, ते ठिकाण आम्हाला शोधावेच लागणार होते. कुठल्याही आर्मी कॅन्टोन्मेंटमध्ये एखादा पत्ता शोधणे हे एक मोठे दिव्य असते. त्यातून रात्रीच्या वेळी ते आणखीच अवघड होऊन बसते. हे गेट बंद, ते गेट बंद, सेन्ट्रीला आय-कार्ड दाखवा, इथे नोंद करा, तिथे नोंद करा, असे अनेक सोपस्कार असतात. ठिकठिकाणी विचारत-विचारतच आम्ही टेरिटोरियल आर्मीच्या ऑफिसर्स मेसपर्यंत पोहोचलो.
तिथे पोहोचल्यानंतर मात्र आमची छान बडदास्त ठेवली गेली. साधीच पण अतिशय स्वच्छ, आणि सर्व सोयीयुक्त नीटनेटकी खोली आमच्यासाठी तयार होती. आम्ही पोहोचेपर्यंत खूप उशीर होणार असल्याने 'मी फक्त गरम दूधच घेईन' असे मेसमध्ये कळवून ठेवले होते. त्यामुळे आर्मीच्या जवानाने फक्त आनंदपुरते जेवण, आणि माझ्यासाठी पेलाभर गरम दूध आणि केळी आणून दिली. फ्लॉवरची भाजी, दालफ्राय, गरम फुलके आणि भात असे साधेच जेवण होते. पण गरमा-गरम जेवणाच्या वासाने माझी भूक खवळली. त्यामुळे मीही चार घास जेवले आणि वर दूधही प्यायले. अर्थात आर्मीच्या मेसमध्ये एका माणसासाठी म्हणून जो डबा येतो त्यात सहजी दोन माणसांचे हलके जेवण होऊ शकते.
दुसऱ्या दिवशी सकाळी कालका स्टेशनवर जाण्यासाठी आनंदने फोनवरच टॅक्सीचे बुकिंग करून ठेवले. 'पहाटे साडेपाच वाजता आम्हाला चहा दे' असे त्या आर्मीच्या जवानाला सांगितले.
भरपेट व गरमागरम जेवणामुळे, आणि दिवसभराच्या प्रवासाच्या दगदगीमुळे, त्या थंडगार वातानुकूलित खोलीमध्ये आम्हाला कधी झोप लागून गेली, हे कळलेच नाही.
Toy train journey, कालका चे फोटो टाक. नितीन चौधरी
उत्तर द्याहटवाToy train/कालका फोटो टाक, गाडी बुला रही है या दोस्त चित्रपटातील गाण्याचं शूटिंग तिथलच आहे
उत्तर द्याहटवाटाकणार
हटवाताई. तुझ्या मस्त प्रवास वर्णनामुळे मला फिरून आल्यासारखे वाटले. मस्त
उत्तर द्याहटवाधन्यवाद!
हटवापुढच्या वर्णनाची वात पाहत आहे
उत्तर द्याहटवायेणार! 😄
हटवाछान वर्णन
उत्तर द्याहटवासाधे , सरळ आणि उत्तम..... विनायक जोशी
उत्तर द्याहटवाछान प्रवास अनुभव
उत्तर द्याहटवाछान वर्णन लिहिते आहेस. .मेघा
उत्तर द्याहटवाधन्यवाद!
हटवाWaiting for the next one.
उत्तर द्याहटवाजमेल तसे लिहीन
हटवाVery nice narration.appreciate your style of writing Dr.keep it up
उत्तर द्याहटवाधन्यवाद!
हटवाखूप मस्त लिहिलंयस्. पुढच्या पुढच्या वर्णनाची उत्सुकता वाढतेच आहे.
उत्तर द्याहटवाधन्यवाद!
उत्तर द्याहटवा