सोमवार, १५ मे, २०२३

शिमला-कसौली भाग-३

२९ एप्रिलच्या पहाटे चहा घेऊन, आंघोळी करून, आम्ही टॅक्सीने कालका स्टेशनवर पोहोचलो. कालका स्टेशन अगदी टुमदार आहे. कदाचित ब्रिटिशकालीन असावे. तिथून ब्रॉडगेज मार्गाने दिल्ली, मुंबई, कलकत्त्यापर्यंत जाणाऱ्या लांब, पल्ल्याच्या अनेक गाड्या सुटतात. तसेच तिथून शिमल्यापर्यंत जाणारा मीटरगेजचा मार्गही आहे. ब्रिटिशांनी १८६४ साली भारताची उन्हाळी राजधानी म्हणून शिमला हे ठिकाण निवडले होते. त्यामुळे शिमल्यापर्यंत रेल्वे असण्याची त्यांना आवश्यकता वाटायला लागली. १८९८ ते १९०३ दरम्यान कालका-शिमला या रेल्वेमार्गाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. ९ नोव्हेंबर १९०३ या दिवशी, या मार्गावर  प्रथम  रेल्वे धावली. या रेल्वेप्रवासाबद्दल आम्ही खूप ऐकलेले होते. त्यामुळे हा रेल्वे प्रवास आम्हाला करायचाच होता. 

प्रवासामध्ये नेहमी आपल्याजवळ खाणे आणि पाणी ठेवले पाहिजे, असे माझ्या आईचे तत्व होते. मुंबईहून निघताना प्राचीने, म्हणजे माझ्या वहिनीने बांधून दिलेल्या खाद्यपदार्थांचा फडशा आम्ही आधीच पाडला होता. त्यामुळे, आमच्याकडे पाणी होते, पण खाणे नव्हते. गाडी सुटायला बराच वेळ असल्यामुळे, मी एक मोनॅकोचा पुडा आणि शेवेचे एक छोटे पाकीट विकत घेतले. त्या गोष्टींचा वाटेत खूपच उपयोग झाला. कारण शिमल्यापर्यंत वाटेतल्या कुठल्याही स्टेशनवर काही नीटसे खाद्यपदार्थ मिळाले नाहीत. 

कालका-शिमला प्रवास प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी केलाच पाहिजे. आमच्या गाडीच्या छताला काचेच्या खिडक्या असलेले, 'व्हिस्टाडोम' डबे होते. डब्यांना दोन्ही बाजूंनीही मोठमोठाल्या खिडक्या असल्यामुळे चहुबाजूचे दृश्य दिसू शकत होते. गाडी जशी घाटातून हळूहळू वर चढत निघाली, तशी हवा थंडगार व्हायला लागली आणि आजूबाजूची निसर्गशोभा बघून मन प्रसन्न व्हायला लागले. 

वाटेत अनेक बोगदे आणि पूल लागतात. समोरून येणाऱ्या गाडीला वाट देण्यासाठी ही गाडी मधे-मधे अनेकवेळा थांबते, आणि थांबल्यावर दम लागल्यासारखे उसासेसुध्दा सोडते. गाडी थांबली की सगळे प्रवासी खाली उतरतात, सेल्फ्या काढतात आणि आजूबाजूचा नजारा  डोळ्यांमधे आणि फोनमध्ये टिपून घेतात. समोरून येणाऱ्या गाडीकडून एक ठराविक रिंग, किंवा टोकन जमा केल्यावरच गाडीला पुढे जाण्याचा सिग्नल मिळतो. त्यामुळे, सर्व प्रवासी आणि इंजिन ड्रायव्हरसुद्धा निवांतपणे बाहेर उभे असतात. अगदी ब्रिटिश काळापासून चालत आलेली, आणि आता बरीचशी कालबाह्य झालेली, 'मॅन्युअल इंटरलॉकिंग सिग्नलिंग'ची ही पद्धत बघायला आता मजा वाटते.  

आमच्या डब्यामध्ये दोन व्यापारी कुटुंबे होती. दोन्ही पुरुष जेमतेम चाळीशीचे तर त्यांच्या बायका पस्तिशीच्या. लवकर लग्ने  झाल्यामुळे, दोन्ही कुटुंबातील ज्येष्ठ अपत्ये दहावी-बारावीत शिकत होती. दोघांची आपापली घरे, चारचाकी गाड्या, जमीन-जुमला, सगळे होते. मुले मोठी झालेली असल्यामुळे, त्या बायकाही सुटवंग झालेल्या होत्या. 

 चेन्नईहून आलेला मारवाडी व्यावसायिक सांगत होता, 

"आमच्या गावामधून १८व्या वर्षी मुले कामाला बाहेर पडतात. दोन वर्षे कुणाच्या तरी हाताखाली काम शिकले की आपापला व्यवसाय सुरु करतात. उच्च शिक्षण घेणे आणि कोणाच्या हाताखाली नोकरी करणे, हे आमच्या रक्तातच नाही. चेन्नईमध्ये आमच्या गावच्या लोकांचीच सुमारे हजार घरे आहेत. प्रत्येकजण हा ना तो धंदा करतो. सगळ्यांची घरे चेन्नईमध्ये आहेत, पण दरवर्षी आम्ही राजस्थानमधील आमच्या गावातल्या घरी जाऊन राहतो. चेन्नईमध्येही आम्ही आमची भाषा, पेहराव आणि संस्कृती टिकवून आहोत. " 

दिल्लीचा व्यावसायिक म्हणाला, "मला फॅक्टरी टाकून वीस वर्षे होत आली. पहिली पाच-सहा वर्षे खूप राबून मी व्यवसायात जम बसवला. आता बस्तान चांगले बसले असल्यामुळे मी  दिल्लीच्या बाहेर असलो तरीही फॅक्टरी आणि माझे उत्पन्न चालूच असते. त्यामुळे मी संपूर्ण भारतभर नुसती भटकंती करत असतो. शिमल्याला तर आम्ही दर वर्षी येतो. दहा-पंधरा दिवस  रिसॉर्टमध्ये राहतो, खातो-पितो, मस्त मजा करतो. "

आमचे बोलणे चालू असतानाच बडोगचा बोगदा ओलांडून आमची गाडी बडोग स्टेशनवर थांबली. बाहेर एक झोपाळा दिसल्यामुळे मी त्यावर पटकन जाऊन बसले. त्या थंड आणि कुंद हवेमध्ये झोका घेण्याचा आनंद काही औरच होता. 

मजल दरमजल करत आमची गाडी वर चढत होती. बाहेर ढग दाटून आले होते. त्या दोन व्यापाऱ्यांशी झालेल्या  बोलण्याशी निगडित अनेक विचार माझ्या मनांत दाटून आले. नोकरी मिळावी यासाठी, सरसकट सगळ्यांनीच विशीतली ऐन उमेदीची वर्षे कॉलेज-शिक्षणात घालवणे खरोखरीच कितपत योग्य आहे?  हा प्रश्न मला पडला. शाळा कॉलेजमधून उच्च शिक्षण घेतलेल्या अनेक व्यक्तींपेक्षा व्यवहारी जगामध्ये टक्के-टोणपे खाऊन, शिकलेले हे दोन सहप्रवासी जास्त यशस्वी आहेत असे मला वाटले. 

आमची गाडी शिमल्याला तासभर उशिरा पोहोचली. आम्हाला रिसॉर्टमध्ये न्यायला श्री. शिशिर अग्रवालांनी गाडी पाठवली होती. सामान घेऊन उतरेपर्यंत पावसाला सुरुवात झाली होतीच. आम्ही गाडीपर्यंत पोहोचेस्तोवर तडातडा गारपीटच व्हायला लागली!


 

(क्रमशः;)

१९ टिप्पण्या:

  1. सुरेख लिहितेस, 🚂 प्रवास करतोय असच वाटते नितीन चौधरी

    उत्तर द्याहटवा
  2. खूपच छान वर्णन .संपू नये वाटतं .

    उत्तर द्याहटवा
  3. छान लिहिते आहेस.... विनायक जोशी

    उत्तर द्याहटवा
  4. नेहमी प्रमाणे खुप छान,तुमच्या बरोबर आम्ही पण प्रवास करतोय असे वाटते

    उत्तर द्याहटवा
  5. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  6. अगं किती छान लिहिलंयस. अतिशय सुबक. दोन्ही व्यापा-यांची यशोगाथा ऐकल्यानंतर विचारप्रवण होणं. त्यानंतर विचारमंथन करणं आणि ते प्रवासवर्णनाबरोबरच वाचकांपर्यंत पोहोचवणं. फारच छान. हे तुझ्या लेखनाचं वैशिष्ट्य आहेच. 👌👍👍😊😃

    उत्तर द्याहटवा
  7. Worth reading useful narration and history of place

    उत्तर द्याहटवा
  8. मस्त मॅडम , train मधून प्रवास केल्यासारखं वाटलं

    उत्तर द्याहटवा