३ मे हा शिमल्यातला आमचा शेवटचा दिवस होता. अजून, 'इंडियन इन्स्टिटयूट ऑफ ऍडव्हान्सड् स्टडी' बघायचे राहिले होते. सकाळपासून आम्ही पाऊस थांबण्याची वाट बघत खोलीमध्येच थांबलो होतो. खोलीच्या खिडकीपाशी बसून, बाहेर झाडांवर आलेल्या वानर टोळीतील पिल्लांचे चाललेले खोडकर चाळे बघण्यात वेळ जरा बरा गेला. दुपारी दोननंतर पाऊस थांबल्यावर आम्ही छत्र्या घेऊनच, 'ऑब्झर्वेटरी हिल' वर उभ्या असलेल्या इंडियन इन्स्टिटयूट ऑफ ऍडव्हान्स स्टडीज' च्या आकर्षक इमारतीकडे चालत निघालो.
शिमल्यातल्या 'ऑब्झर्वेटरी हिल' ला एक विशेष महत्व आहे. ती टेकडी भारताची जलविभाजक (Watershed ) किंवा पाणलोट टेकडी आहे. या टेकडीच्या पूर्व बाजूच्या उतारावरून पडणारे पाणी ज्या नद्यांमध्ये वाहत जाते, त्या नद्या बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतात. पश्चिमेच्या उतारावरून पडणारे पाणी वेगवेगळ्या नद्यांमधून वाहत अरबी समुद्रात जाऊन मिसळते.
याच 'ऑब्झर्वेटरी हिल'वर ब्रिटिशांनी, १८८४ ते १८८८ या काळात एक भव्य 'व्हाईसरीगल लॉज' बांधले. तत्कालीन व्हाइसरॉय, लॉर्ड डफरीन यांचे उन्हाळी निवासस्थान म्हणून ही इमारत बांधली गेली. भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत सर्व व्हाइसरॉयांचे शिमल्यातले निवासस्थान हेच होते. स्वातंत्र्योत्तर काळात ते भारताच्या राष्ट्रपतींचे अधिकृत उन्हाळी निवास झाले. पण राष्ट्रपती राधाकृष्णन यांच्या आदेशानुसार, १९६५ साली ती वास्तू, 'इंडियन इन्स्टिटयूट ऑफ ऍडव्हान्स स्टडीज' या संस्थेला दिली गेली. त्यानंतर राष्ट्रपतींचे अधिकृत निवास मशोब्रा येथे नेण्यात आले. 'ऍडव्हान्स स्टडीज'ची ही वास्तू आतून बघायला, माणशी १०० रुपये इतके जुजबी तिकीट आहे. साधारण अर्ध्या तासात आपल्याला आत हिंडवून, तिथली माहिती सांगतात.
या इमारतीच्या बाहेर अतिशय सुंदर बाग आहे. मागच्या बाजूला टेनिस कोर्ट्स आहेत. मुख्य इमारत आतून-बाहेरून नितांतसुंदर आहे. बाहेरून भक्कम दगडी बांधकाम असल्याने ती एखाद्या राजवाड्यासारखी दिसते. आतल्या बाजूला उत्तम लाकूडकाम केलेले आहे. स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात १९४५ साली, महत्वाची शिमला कॉन्फरन्स याच वास्तूमध्ये झाली होती. भारतीयांना स्वायत्तता देण्याच्या प्रक्रियेतील, 'वेव्हेल प्लॅन' हा अत्यंत महत्वाचा टप्पा, याच ठिकाणी संमत केला गेला. पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल, महात्मा गांधी, अशा दिग्गजांचे पाय या वास्तूला लागलेले आहेत. इतिहासाच्या पाऊलखुणा सांगणारे अनेक फोटो आत लावलेले आहेत. पण त्या बाबतची माहिती वाचायला वेळ कमी पडल्यामुळे खूपच चुटपुट लागून राहिली. या वास्तूच्या बाहेरून फोटो काढता येतात, पण आत फोटो काढण्यास मनाई आहे. त्यामुळे वास्तूच्या आतल्या भागातले सौंदर्य डोळ्यातच साठवत आम्ही बाहेर पडलो. खोलीवर परत येईपर्यंत संध्याकाळचे पाच वाजत आले होते.
संध्याकाळी, आम्हाला जनरल बालींनी जेवायला बोलावले होते. त्यामुळे आम्ही खोलीवर परतून, तयार होऊन त्वरित बाहेर पडलो. जाताना आर्मी ट्रेनिंग कमांडच्या मुख्यालयासमोर फोटो काढले. शिमल्यातल्या लोकप्रिय मॉल रोडवर आम्ही अजून तसे मनसोक्त हिंडलो नव्हतो. मला शिमल्यातले 'लोअर बाजार' आणि 'लक्कड बाजार' हिंडायचीही इच्छा होती. सुदैवाने त्या संध्याकाळी पाऊस थांबला होता आणि इतक्या दिवसात प्रथमच छानसे ऊन पडले होते. पुढचा तास-दीड तास शिमल्यातले सगळे बाजार पायाखालून घातले. खरेदी अशी काहीच करायची नव्हती. पण लोअर बाजारात एके ठिकाणी एक भाजीवाला आंबेहळद विकायला बसला होता. माझ्या बागेत लावायला म्हणून त्याच्याकडून मी थोडे कंद विकत घेतले.
संध्याकाळच्या उन्हामध्ये Ridge वर हिंडायला खूप मजा आली. तिथे सर्वच पर्यटकांच्या उत्साहाला उधाण आले होते. घोड्यावर बसून रपेट करणे, पारंपरिक हिमाचली वस्त्रे आणि आभूषणे घालून फोटो काढून घेणे, एकमेकांसाठी फोटो काढणे, फेरीवाल्यांकडून वस्तू विकत घेणे, साबणाचे फुगे सोडणे, खाणे-पिणे अशा एक ना अनेक गोष्टी तिथे चालू होत्या. गंमत म्हणजे दोन-चार दिवसांच्या संततधारेमुळे दूरवरची काही शिखरे बर्फाच्छादित झालेली दिसत होती. थोड्याच वेळात, जनरल बाली आणि त्यांची बायको अप्राजिता, Ridge वर चालत येताना दिसले. जनरल बालींनी Ridge वरून दूरवर दिसणाऱ्या सगळ्या इमारतींबद्दल आणि पर्वतराजींबद्दल आम्हाला माहिती दिली. त्यांनी हेही सांगितले की, इतक्या वर्षांमध्ये त्यांनी प्रथमच मे महिन्यात झालेली बर्फवृष्टी पाहिली होती. साठच्या दशकामध्ये जनरल बाली आणि सौ. अप्राजिता यांचे शालेय शिक्षण शिमल्यामध्ये झाले. त्यामुळे त्यांच्याकडे जुन्या शिमल्याच्या आठवणींचा खजिना होता. त्याकाळी सूट-बुटात वावरणारे शिमलावासीय, देवानंदबरोबर झालेली भेट, आणि शिमल्यामध्ये अनेक सिनेमांचे चित्रीकरण होत असताना त्यांनी बघितलेले प्रसिद्ध सिने-सितारे आणि तारका, यांच्या आठवणी त्यांनी सांगितल्या.
त्यानंतर जनरल बाली आम्हाला Ridge वरच असलेल्या एका पुतळ्यापाशी घेऊन गेले. दिवंगत लेफ्टनंट जनरल दौलत सिंग यांचा तो पुतळा होता. १९६१ ते १९६३ या काळामधे, लेफ्टनंट जनरल दौलत सिंग हे आर्मीच्या पश्चिम कमांडचे 'जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ' होते. १९९३ सालापर्यंत पश्चिम कमांडचे मुख्यालय शिमल्यातच होते. त्या काळात, जम्मूच्या पूंछ भागाची हेलिकॉप्टर मधून हवाई पाहणी करण्यासाठी गेलेले असताना, या अतिशय कर्तबगार अधिकाऱ्याचे, हेलिकॉप्टर कोसळून अपघाती निधन झाले. जनरल बालींच्याच पुढाकारामुळे हिमाचल प्रदेश सरकारने Ridge वर, लेफ्टनंट जनरल दौलत सिंग यांचा पुतळा उभा केला. पुतळ्याभोवती लेफ्टनंट जनरल दौलत सिंग, यांच्या स्मरणार्थ एक उद्यानही तयार केले गेले.
साडेसातच्या सुमारास जनरल बाली आम्हाला शिमल्याच्या Amateur Dramatics Club या सुप्रसिद्ध, ब्रिटिश कालीन, आणि अगदी उच्चभ्रू लोकांसाठी असलेल्या क्लबमध्ये जेवायला घेऊन गेले. तिथे आत जाताना, तिथला सुटा-बुटाचा ड्रेस कोड पाळावा लागतो. हा क्लब आतून खूपच सुंदर आहे. तिथे अनेक सिनेमांचे शूटिंग झाले आहे. या क्लबच्या डायनिंग हॉलमध्ये जाण्यासाठी पायऱ्या उतरून खाली जावे लागते. त्यामुळे आपण Ridgeच्या खालच्या पातळीवर बसून जेवण करतो. क्लबमध्ये निवांतपणे जेवण आणि गप्पा झाल्या. तिथले फिश फिंगर्स, हरा-भरा कबाब, पेने पास्ता, बेक्ड व्हेजिटेबल्स, रोस्टेड चिकन, कटलेट्स आणि लेमन सूफले हे सर्वं खाद्यपदार्थही उत्तम होते.
आम्ही आल्यापासून चार दिवस पाऊस पडत असल्याने, शिमल्यातील Annadale चे आर्मी म्युझिअमही बघायचे राहिले होते. ते बघितल्याशिवाय तुम्ही जाऊ नका असे जनरल बालींनी आम्हाला सांगितले. त्यामुळे आम्ही शिमल्यातला आमचा मुक्काम अर्ध्या दिवसाने वाढवायचे ठरवले.
(क्रमशः)
Nice 👍 नितीन चौधरी
उत्तर द्याहटवाखूप छान लिहिलंय, हे सगळे भाग म्हणजे ह्याच्यानंतरचाही वाचलाय. वाचल्यावर लक्षात येतं कि तू दिलेलं शीर्षक 'मनी माझ्या' अगदी योग्य आहे.
उत्तर द्याहटवा🙏
छान लिहिलंय.👌
उत्तर द्याहटवाफोटोही छान आलेत.