२ मेच्या सकाळी उशीरानेच जाग आली. आदल्या दिवशीच्या पायपिटीमुळे पाय आणि दिवसभर डोक्यावर छत्री घेऊन हिंडल्यामुळे, माझे हातही दुखत होते. बाहेर संततधार चालू होती. त्यामुळे आजचा दिवस टॅक्सी करून हिंडावे, असे आम्ही ठरवले. त्या दिवशी शिमल्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीचे मतदान असल्यामुळे इन्स्टिटयूट ऑफ ऍडव्हान्स स्टडीज बंद आहे, असे समजले. मग शिमल्याच्या बाहेर फिरून यावे, अशा विचाराने एक-दोन टॅक्सी वाल्यांशी संपर्क साधला. परंतु, पाऊस आणि धुक्यामधे बाहेर पडायला कोणी तयार होईना. शेवटी एक टॅक्सीवाला तयार झाला. त्यामुळे आम्ही शिमल्याच्या आसपासचा, नालदेहरा-मशोब्रा हा भाग बघायला बाहेर पडलो.
बाहेर प्रचंड धुके असतानाही आमचा टॅक्सीवाला अतिशय सफाईने टॅक्सी चालवत होता. राष्ट्रपतींचे उन्हाळ्यातले अधिकृत निवासस्थान मशोब्रा येथे आहे. उन्हाळ्यामध्ये सुमारे दोन आठवडे राष्ट्रपतींचा आणि त्यांच्या चाळीस कर्मचाऱ्यांचा मुक्काम इथेच असतो. राष्ट्रपती तिथे राहत नसतील त्या काळात ते निवासस्थान पर्यटकांसाठी यावर्षीपासूनच खुले करण्यात आले आहे. टॅक्सीतून जातानाच आनंदने फोनवरून ऑनलाईन पैसे (प्रत्येकी रु. ५०/-) भरून तिथले तिकीट काढले. राष्ट्र्पती निवासाच्या बाहेरच्या प्रवेशद्वारापाशी टॅक्सी सोडून द्यावी लागते. बाहेर सुरक्षा तपासणी झाल्यानंतर प्रत्यक्ष राष्ट्रपती निवासापर्यंत, बरेच अंतर चालत जावे लागते. तो रस्ता अगदी निर्मनुष्य असल्यामुळे आपण बरोबर जातोय की नाही? अशी शंका मनात सतत येत होती. बरेच चालल्यानंतर, शेवटी राष्ट्रपती निवासाची पाटी असलेले मुख्य प्रवेशदार दिसले. तिथे पुन्हा सुरक्षा तपासणी, तिकीट तपासणी झाली. आमच्या आधी आणि नंतर आलेले असे १५-२० पर्यटक जमल्यानंतर आमच्या गटाला आत सोडण्यात आले.
राष्ट्रपती निवासाची सर्व माहिती सांगण्यासाठी आमच्याबरोबर एक अधिकृत गाईड दिला होता. ही वास्तू १७३ वर्षे जुनी असून आजूबाजूचा परिसर अतिशय रम्य आहे. कोटी संस्थानाच्या राजाच्या मालकीची असलेली ही वास्तू, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ब्रिटिशांच्या ताब्यात होती. खूप पूर्वी एकमजली असलेली ही लाकडी दिमाखदार इमारत पुढे दुमजली करण्यात आली. मार्च महिन्यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते तिथल्या ट्यूलिप गार्डनचे उदघाटन झाले होते. आम्हालाही बागेमध्ये काही ट्यूलिप्स बघायला मिळाले. इमारतीतील काही खोल्या पर्यटकांना दाखवत असले तरी आतले फोटो काढण्यास मनाई आहे. आतल्या दालनांची सविस्तर माहिती गाईड आम्हाला सांगत होता. आत लावलेले अनेक फोटो बघायला आणि त्याबाबतची माहिती वाचायला खूप मजा आली. तिथल्या डायनिंग रूमच्या भिंतीवरच्या एका मोठ्या फ्रेममधल्या 'चंबा रुमालाने' माझे लक्ष वेधून घेतले. हिमाचलच्या अतिशय दुर्मिळ आणि प्राचीन कलेचा तो सुंदर नमुना मी प्रथमच बघितला. राष्ट्रपती निवासाच्या आवारामध्ये थोडेफार फिरून, फोटो काढून आम्ही पुढे निघालो. राष्ट्रपती निवासापर्यंत पोहोचायला इलेक्ट्रिक गाड्यांची सोय केली जावी असे मात्र प्रकर्षाने वाटले. तसेच आवारातली रेस्टॉरंट आणि स्वच्छतागृहे याची सोयही विशेष चांगली नव्हती.
त्यानंतर आमच्या टॅक्सीचालकाने, तेथून जवळच असलेल्या, 'भीमाकाली' मंदिरापाशी आम्हाला नेले. भर पावसामध्ये, निसरड्या पायऱ्या चढून आम्ही मंदिर बघितले. तिथून निघून आम्ही नालदेहराचे गोल्फ कोर्स बघायला जाणार होतो. वाटेवर हिमाचलची 'फ्रूट रिसर्च इन्स्टिटयूट' बघायला आम्ही थांबलो. तिथले तिकीट काढून आत गेलो. हिमाचलमध्ये सफरचंदाची लागवड कधी आणि कशी सुरु झाली, सफरचंदाच्या वेगवेगळ्या जाती, त्यावर पडणाऱ्या किडींचे निर्मूलन याबाबतची रंजक माहिती फलकांवर लिहिलेली होती. पण तिथे माहिती सांगायला कोणीही नव्हते. एकूणच सरकारी अनास्था जाणवली. हे सगळे होईपर्यंत दुपारचे दोन वाजले होते. त्यामुळे वाटेत एके ठिकाणी आम्ही जेवायला थांबलो. पोटात जेवण गेल्यावर जरा जास्तच थंडी वाजायला लागली. त्यामुळे जेवणानंतर गरमागरम 'अद्रकवाली चाय' पिऊन पुढे निघालो.
नालदेहरा येथील गोल्फकोर्स भारतातले कदाचित सर्वात जुने, सर्वात अवघड पण अतिशय नयनरम्य गोल्फकोर्स आहे. सर्वबाजूनी उंच-उंच वृक्षांनी वेढलेल्या या भागामध्ये, गोल्फ कोर्स तयार करता यावे इतकी विस्तीर्ण मोकळी जागा कशी मिळाली, याबाबतही एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. दोन देवतांमधील तुंबळ युद्धामध्ये मधल्या जागेतील सगळे वृक्ष जळून आणि दगड वितळून गेल्यामुळे हे शक्य झाले असे समजले जाते. ब्रिटिश व्हॉईसरॉय लॉर्ड कर्झनने जवळपास सव्वाशे वर्षांपूर्वी इथे गोल्फकोर्स तयार करवले. या जागेच्या प्रेमात पडलेल्या लॉर्ड कर्झन याने आपल्या तिसऱ्या मुलीचे नाव Alexzandra Naldehra असे ठेवले होते. गोल्फ कोर्स जवळ पोहोचेपर्यंत, काही पायऱ्या आणि चढी वाट चढून झालेली आमची दमणूक, हिरवेगार गोल्फ कोर्स समोर येताच, कुठल्याकुठे पळून गेली. गोल्फ-कोर्सच्या अवती-भवती घोड्यावर बसूनही फेरफटका मारता येतो. तिथे अनेक हौशी पर्यटक भर पावसामध्ये घोडेस्वारीचा आनंद घेत होते. गोल्फकोर्सच्या आत, बऱ्याच अंतरावर एक नागदेवतेचे देऊळ आहे असे समजले. परंतु, पावसामुळे सर्वत्र चिखल झाल्याने आणि वाटा निसरड्या झालेल्या असल्यामुळे आम्ही देवळापर्यंत गेलो नाही. गोल्फक्लबमध्ये एक छान रेस्टॉरंट आहे. तिथे बसले की आपल्याला सगळे गोल्फ कोर्स दिसू शकते. आमचे जेवण व चहा नुकतेच झालेले असल्यामुळे आम्ही तिथे काही खाल्ले-प्यायले नाही. गोल्फ कोर्सच्या जवळच राहण्यासाठी टुमदार बंगल्या आहेत. त्याचे आरक्षण हिमाचल टूरिझमद्वारे करता येते.
संध्याकाळ झाली आणि आम्ही परतीच्या वाटेला लागलो. दिवसभर घाटातल्या रस्त्यांवर फिरून आणि थंडगार वारे खाऊन आम्ही दमलो होतो. सहा-साडेसहा पर्यंत आम्ही खोलीवर परतलो. जेवण लवकरच उरकून घेतले. आम्ही आणखी एकच दिवस शिमल्यामध्ये राहणार होतो. उद्याच्या दिवस तरी शिमल्यामध्ये पाऊस नसावा, अशी मनोमन प्रार्थना करत निद्राधीन झालो.
Writing skill is noteworthy Dr.keep it up
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाहे सर्व मी पाहिलं आहे, परत पाहतोय असं वाटतं , तुझी लिहिण्याची शैली अप्रतिम आहे . फोटो पण pleasent आहेत. नितीन चौधरी.
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाछान लिहित आहेस
उत्तर द्याहटवाधन्यवाद!
हटवाअतिशय छान वर्णन केले आहेस - दीपक दांडेकर
उत्तर द्याहटवाधन्यवाद
उत्तर द्याहटवाखूप छान जीवन एन्जॉय करत आहात . मस्त.
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवास्वतः मी तुमच्या बरोबर फिरत आहे असं वाटतं
उत्तर द्याहटवाव्वा! छान अनुभव आहे. फार सुंदर लिहिलंय्, गं!
उत्तर द्याहटवाव्वा! खूप छान अनुभव! तू हे सगळं लिहितेस ना, ते फार महत्वाचे आहे. ते आठवणीत ही अमर होतं. नाही तर कालांतराने विसरतं.
उत्तर द्याहटवाखरं आहे
हटवाहो ना गं
उत्तर द्याहटवाछान.
उत्तर द्याहटवासुरेख लिहिले आहेस
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाछान लिहिलंय.👌
उत्तर द्याहटवाThanks!
हटवाThanks!
उत्तर द्याहटवा