शिमल्यात आम्ही राहात असलेल्या आर्मी ट्रेनिंग कमांड (आरट्रॅक) ऑफिसर्स मेसमधली खोली आम्हाला ४ मेला सकाळी १० वाजेपर्यंतच सोडावी लागणार होती. पण त्या दिवशी सकाळी आम्हाला ऍन्नाडेललाही जाऊन यायचे होते. त्यामुळे सकाळी लवकर उठून आम्ही आमचे सामान आवरून ठेवले. आमच्यानंतर त्या खोलीचे आरक्षण ज्यांच्या नावे होते, त्यांच्याशी बोलून, ते लोक किती वाजेपर्यंत पोहोचणार आहेत याचा अंदाज घेतला. ते जरा उशिरा म्हणजे ११.३० वाजेपर्यंत येणार असल्याचे कळले. ऍन्नाडेलचे 'आर्मी हेरिटेज म्युझिअम' दहा वाजता उघडणार होते. ऍन्नाडेलचे गोल्फ कोर्स बघून, दहाच्या आतच म्युझियममध्ये जावे असे आम्ही ठरवले. म्युझिअम बघून ११.च्या आत परतायला हवे होते. हे सगळे वेळेत करण्याच्या हिशोबाने सकाळी आठ वाजताच आम्ही चालत बाहेर पडलो. शिमल्यातल्या आमच्या सख्या, म्हणजे आमच्या छत्र्या आमच्या हातात होत्याच!
पर्यटनासाठी बाहेर पडल्यानंतर, भोज्ज्याला शिवल्यासारखे, भराभर पर्यटनस्थळे बघत हिंडायला आम्हाला मुळीच आवडत नाही. त्यामुळेच आम्ही शक्यतो ट्रॅव्हल कंपनीतर्फे पर्यटन करत नाही. ट्रॅव्हल कंपनीचा ७-८-९, म्हणजे ७ वाजता उठणे, आठ वाजता नाश्ता आणि ९ वाजता बाहेर पडणे, हा फॉर्म्युला आम्हाला फारसा त्रासदायक वाटत नाही. परंतु, आपल्याला आवडलेल्या पर्यटनस्थळी, हवा तेवढा वेळ घालवण्याची मजा, ट्रॅव्हल कंपनीतर्फे गेल्यावर उपभोगता येत नाही, असे आम्हाला वाटते. बहुतेक सर्व ट्रॅव्हल कंपन्या आठवड्याभरात शिमला-कुलू-मनाली अशी टूर आखतात. त्यामुळेच, आम्ही शिमला-कुलू-मनाली ट्रिप करणार आहोत, असा समज अनेक मित्र-मैत्रिणींचा आणि नातेवाईकांचा झाला होता. पण शिमला-कुलू-मनाली आठवड्याभरात करणे म्हणजे ती-ती ठिकाणे केवळ 'उरकणे' झाले असते आणि आमची खूप धावपळ झाली असती.
आरट्रॅक मेसच्या बाहेर पडून, शिमला विधानसभा चौकातून खाली, पूर्ण उताराच्या रस्त्याने चालत आम्ही ऍन्नाडेल गोल्फ कोर्सकडे निघालो. गूगल मॅपनुसार आम्ही अर्ध्या तासात पोहोचायला हवे होते. पण गेल्या तीन-चार दिवसात चढ-उताराचे रस्ते चालून आम्हा दोघांचेही गुढगे बोलायला लागले होते. त्यामुळे आम्ही हळूहळू चालत, थांबत, थांबत चाळीस मिनिटामध्ये ऍन्नाडेल गोल्फ कोर्सच्या जवळ पोहोचलो. गोल्फकोर्स आणि आर्मी हेरिटेज म्यूझियम एकाच आवारात आहे. गोल्फकोर्सच्या प्रवेशद्वाराच्या उजवीकडे म्युझिअमचे गेट आहे. हा सर्व परिसर आरट्रॅकच्या ताब्यात असून त्याची देखरेखही आर्मीतर्फेच केली जाते. सेनाधिकारी आणि काही निवडक सरकारी अधिकाऱ्यांनाच या गोल्फकोर्सवर खेळायची परवानगी आहे.
एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत शिमला आणि आसपासच्या इलाख्यात गुरख्यांचे राज्य होते. १८१५-१६ साली गुरखा आणि ब्रिटीशांदरम्यान युद्ध झाले. गुरख्यांनी कडवी लढत दिली, पण शेवटी त्यांचा पराभव करण्यात ब्रिटिश यशस्वी झाले. त्यानंतर ब्रिटिशांनी या परिसरात आपला जम बसवला. १८३० च्या सुमारास, ऍन्नाडेल मधली ही सुंदर जागा ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या नजरेस पडली. सुरुवातीला या जागेचा वापर पोलो, क्रिकेट आणि फुटबॉलचे मैदान म्हणून आणि सहलीची जागा म्हणून केला जायचा. तेंव्हा स्थानिक लोक या जागेला 'कंपनीका बाग' असे म्हणत. साधारण १८४० च्या सुमारास इथे रेसकोर्स सुरु करण्यात आले. १८५८ नंतर हे मैदान ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या अधिपत्याखाली आले. १८६४ साली, अधिकृतपणे शिमल्याला ब्रिटिशांच्या उन्हाळी राजधानीचा दर्जा देण्यात आला. ऍन्नाडेल मैदानावर गोल्फकोर्स कधी तयार केले गेले, या बाबत नेमकी माहिती कुठे दिसली नाही. पण ते १८६४ नंतरच्या काही वर्षांतच तयार केले गेले असावे. १८८४-८५ साली गोल्फ कोर्सचे पॅव्हेलियन उभारण्यात आले. याच ऍन्नाडेल मैदानावर १८८८ साली, सर मॉर्टिमर ड्युरांड यांच्या नावे फुटबॉलची सुप्रसिद्ध 'ड्युरांड ट्रॉफी' स्पर्धा सुरु झाली, जी भारतात आजही खेळली जाते.
गोल्फ क्लबची पूर्णपणे लाकडी इमारत अतिशय सुंदर आहे. क्लबच्या समोर एका बाजूला, चोचीत गोल्फचा चेंडू पकडलेल्या कावळ्याचा पुतळा आहे. त्या पुतळ्याखाली एक मजेशीर कविता लिहिलेली आहे. ती कविता अशी कल्पना करून रचलेली आहे की जणू तो कावळा तिथे आलेल्या गॉल्फर्सशी बोलतो आहे. क्लबच्या समोर दुसऱ्या बाजूला, भल्या मोठ्या आकाराच्या गोल्फ चेंडूचेही शिल्प आहे.
गोल्फकोर्सच्या मधोमध एक हेलिपॅड आहे. शिमल्यामधे येणाऱ्या सर्व व्हीआयपी लोकांची हेलिकॉप्टर्स इथेच उतरत असल्यामुळे, या जागेला एक विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. या जागेचे, ऍन्नाडेल किंवा ऍन्नानडेल असे नाव का पडले? या बद्दलही एक रंजक कथा आहे. 'डेल' या शब्दाचा अर्थ दरी असा आहे. ऍन्नाडेल नावाची अजून एक दरी शिमल्याच्या पश्चिमेला आधीपासूनच होती. पण अगदी सुरुवातीच्या काळात इथे आलेला, कॅप्टन चार्ल्स प्रॅट केनेडी नावाचा एक ब्रिटिश अधिकारी, कुणा एका ऍना नावाच्या तरुणीच्या प्रेमात होता. सर्वप्रथम तो जेव्हा या जागी आला, तेंव्हा इथले नेत्रसुखद दृश्य बघून तो ऍनाच्या आठवणीने व्याकुळ झाला. त्यामुळे त्याने या जागेचे नाव ऍन्नाडेल असे ठेवले, असे सांगितले जाते.
सकाळच्या त्या प्रसन्न वातावरणात गोल्फकोर्सच्या भोवती असलेल्या पायवाटेवर मी एक चक्कर मारून आले. तरी म्युझिअम उघडायला अजून थोडा वेळ होता. त्यामुळे आम्ही गोल्फक्लबच्या आत असलेल्या रेस्टॉरंटमध्ये गरम-गरम चहा घेतला. तिथे बसून निवांतपणे चहा घेत असताना माझ्या मनामध्ये अनेक विचार येत होते. ब्रिटिशांनी आपल्या देशावर दीडशे वर्षे राज्य केले. आपल्या देशाला लुबाडून ब्रिटिश सैन्य इथे अगदी ऐश-आरामात राहिले, या गोष्टीची मला मनोमन चीड आहे. पण ब्रिटिशांमुळे आपल्या देशात अनेक सोयी-सुविधा, व आधुनिकीकरण त्या काळी झाले हेदेखील खरेच.
मनामधे आलेले हे सगळे विचार बाजूला सारून, आम्ही साडेनऊ-पावणेदहाच्या सुमारास म्युझिअमच्या प्रवेशद्वारात पोहोचलो...
(क्रमश:)
आजचा नेहमी प्रमाणेच अतिशय रंजक भाग वाचणारी मी पहिलीच
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाKhup maja Ali vachun...ekdam savistar varnan kele ahes.
उत्तर द्याहटवाधन्यवाद!
हटवामस्त लिहिलेस, तुम्हां दोघांचे फोटो पण छान आहेत, मोठा प्रसन्न वावर असतो तुमचा. नितीन चौधरी
उत्तर द्याहटवाधन्यवाद नितीन
हटवाछान
उत्तर द्याहटवाछान. अता शिमल्याला गेल्यावर काय काय बघायलाच हवे हे ठरले तर.
उत्तर द्याहटवानिश्चित बघा!
हटवाव्वा! छान.खूप मस्त लिहिलंय. 🙏😊
उत्तर द्याहटवाधन्यवाद!
हटवास्वाती, शिमला-कसौली प्रवास वर्णन, कालका - शिमला रेल्वे प्रवास...सर्व वाचून परत शिमला ट्रिप करावी वाटते.
उत्तर द्याहटवाही ट्रीप परत करायला काय हरकत आहे? मला पण परत जावंसं वाटतंय!
उत्तर द्याहटवाछान लिहिले आहे
उत्तर द्याहटवाखूप छान लिहिलंय तुम्ही!! बसल्या बसल्या शिमला प्रवास घडला!!
उत्तर द्याहटवाThanks Kanchan!
हटवाछान लिहिलंय.👌
उत्तर द्याहटवाफोटोही छान आलेत.
Thanks!
हटवाWorth reading Dr
उत्तर द्याहटवाछान लिहिलय
उत्तर द्याहटवा