रविवार, २८ मे, २०२३

शिमला-कसौली भाग- १०

शिमल्याला येण्याआधी मी इंटरनेटवरून इथल्या पर्यटनस्थळांबद्दल बरीच माहिती वाचली होती. तसेच यूट्यूबवर चार-पाच ट्रॅव्हलॉगही बघितले होते. पण ऍन्नाडेलच्या आर्मी हेरिटेज म्युझिअम संबंधी फारसे वाचायला अथवा ऐकायला मिळाले नव्हते. शिमल्यामध्ये येणाऱ्या बऱ्याचशा पर्यटकांना या म्युझियमबाबत विशेष माहिती नसते. आर्मी हेरिटेज म्युझियमच्या आवारामध्ये आम्ही दहा वाजायच्या आधीच जाऊन पोहोचलो. २००६ साली सुरु केलेले हे छोटेसे पण अतिशय नीटनेटके म्युझियम, दोन-तीन टुमदार बैठ्या बंगल्यामध्पस रलेले आहे. हे म्युझियम बघण्यासाठी प्रवेशमूल्य नाही. पण फक्त भारतीय नागरिकांनाच इथे प्रवेश दिला जातो. सोमवार सोडून आठवड्यातील इतर सर्व दिवशी हे म्युझियम, सकाळी १० ते २ व ३ ते ५ या वेळात खुले असते. या म्युझियमच्या बाहेर व आतही फोटो काढण्याची मुभा आहे.

म्युझियमच्या आवारामध्ये, मूळ हिमाचल प्रदेशनिवासी शूर सैनिकांचे अर्धपुतळे बसवण्यात आलेले आहेत. हे सर्व वीर भारतमातेच्या रक्षणार्थ लढताना धारातीर्थी पडलेले आहेत. प्रत्येक पुतळ्याखाली त्या-त्या सैनिकाचे अथवा अधिकाऱ्याचे नाव व त्यांनी केलेल्या कामगिरीबाबत थोडक्यात माहिती लिहिलेली आहे. आम्ही ती सगळी माहिती वाचली. अशा ठिकाणी गेले की मनामध्ये खूपच कालवाकालव होते आणि डोळे पाण्याने भरून येतात. 

दहा वाजता हे संग्रहालय उघडणार होते. आम्ही दहाच्या आधी पोहोचलो होतो. आत साफसफाई चालू होती. पण तिथल्या जवानाला आनंदने, आपण निवृत्त सेनाधिकारी असल्याचे सांगितले. तसेच आम्हाला परतण्याची गडबड असल्यामुळे आम्हाला अगदी थोड्या वेळात, ते संग्रहालय आणि परिसर दाखवायची विनंती केली. त्या जवानाने आम्हाला आधी संग्रहालयाच्या बाजूला असलेल्या ग्रीन-हाऊसमधे  नेले. तिथे अतिशय सुरेख अशी निवडुंगांची बाग (कॅक्टस गार्डन) केलेली आहे. या बागेमध्ये अनेक प्रकारचे कॅक्टस आणि फुलझाडे आहेत. या बागेला गेली अनेक वर्षे स्थानिक स्पर्धांमध्ये बक्षीस मिळत असल्याचे त्याने मोठ्या अभिमानाने सांगितले. बाग बघून झाल्यावर आम्ही खालच्या बाजूला असलेल्या एका पॅव्हेलियनमध्ये गेलो. तिथे अनेक रणगाडे, तोफा आणि लढाऊ विमानांच्या छोट्या प्रतिकृती ठेवलेल्या आहेत. या आवारातून डाव्या हाताला ऍन्नाडेल गोल्फकोर्सचे पुन्हा एकदा सुखद दर्शन झाले. तिथे आमचे फोटो काढून होईपर्यंत संग्रहालय उघडलेले होते. त्यामुळे आम्हाला आत प्रवेश मिळाला. 

अगदी महाभारतातल्या अर्जुनापासून सध्याच्या भारतीय सैनिकांच्या कथा संग्रहालयामध्ये दाखवलेल्या आहेत. या संग्रहालयात भारतीय लष्कराबाबत उत्तम माहिती संकलित केलेली आहे. भारतीय सैन्यातील वेगवेगळ्या रेजिमेंटचे पोशाख व झेंडे, सियाचेन ग्लेशियरवर सैनिक वापरतात ते गणवेश, तसेच वायुसैनिकांचे आणि नौसैनिकांचे गणवेश आपल्याला बघायला मिळतात. काही हुतात्म्यांचे गणवेश आणि त्यांची पदकेही इथे संग्रहित केलेली आहेत. तसेच युद्धामध्ये, पूर्वीपासून वापरली जाणारी अनेकविध  शस्त्रास्त्रे, युद्धसाधने, व वाद्येही इथे ठेवण्यात आलेली आहेत.


एका दालनामध्ये लावलेल्या काही फोटोंनी आणि कागदपत्रांनी आमचे लक्ष वेधून घेतले. डेहरादूनची जॉईंट सर्विसेस विंग (JSW) ही संस्था म्हणजेच १९४९-५५ या काळातले, आत्ताच्या NDA खडकवासलाचे जुने रूप होते. JSW देहरादूनच्या पहिल्या बॅचचे कॅडेट म्हणून तिथे प्रशिक्षण घेत असतानाचा, फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांचा 'ब्लू पॅट्रोल' गणवेशातला अतिशय उमदा फोटो इथे लावलेला आहे. १८५७च्या स्वात्रंत्र्यसंग्रामानंतर मंगल पांडे यांचे कोर्ट मार्शल केले गेले होते. त्या कोर्ट मार्शलचे फर्मान एका शोकेसमध्ये लावलेले आहे. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात पाकिस्तानला सपशेल पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर पाकिस्तानी सैन्याच्या आत्मसमर्पण करारावर स्वाक्षरी करतानाचा, पाकिस्तानचे लेफ्टनंट जनरल नियाझी यांचा फोटो तिथे बघायला मिळतो. पाकिस्तानच्या पराभवाची निशाणी म्हणून इथे पाकिस्तानच्या एका रेजिमेंटच्या झेंडाही उलटा लटकावून ठेवला आहे. तसेच पाकिस्तानी हद्दीतून आणलेली एक पोस्टाची पेटीसुद्धा इथे टांगलेली आहे. १९७१ साली आपल्या सैन्याने केलेल्या पराक्रमाची शौर्यगाथा शिमल्यामधल्या या संग्रहालयात पाहताना ऊर अभिमानाने भरून येत होता. पण, याच शिमल्यातली एक कटू आठवणही मनात येत होती. इंदिरा गांधीजींनी, याच शहरात 'शिमला करारावर' स्वाक्षरी केली होती. बदल्यात काहीही न मिळवता, पाकिस्तानच्या युद्धकैद्यांना सोडून दिले होते आणि सैन्याने जिंकलेला प्रदेशही परत केला होता. त्या घोडचुकीची आठवण होऊन खंत वाटली.

यानंतर आम्ही म्यूझियमच्या 'शौर्य हॉल'मध्ये गेलो. तिथे मोठमोठया फलकांवर भारतीय सैनिकांनी लढलेल्या महत्वाच्या लढायांची माहिती थोडक्यात लिहिलेली आहे. तिथेच एक चौकोनी आकाराची टेबलांची मांडणी केलेली दिसली. त्यावर एका बाजूला China आणि दुसऱ्या बाजूला India असे लिहिलेले होते. भारत-चीन सीमेवर, चुशूल, लिपुलेख, नथू-ला, आणि बुम-ला या चार ठिकाणी वेळोवेळी होणाऱ्या वाटाघाटींकरता वापरल्या जाणाऱ्या टेबलची ती प्रतिकृती होती.

साडेअकराच्या आत परतून मेसमधली खोली रिकामी करायची असल्यामुळे आम्हाला इथे वेळ जरा कमीच पडला. त्यामुळे त्या थोडक्या वेळात शक्य तेवढी माहिती जमा करून घेण्याच्या उद्देशाने, आनंदने काही व्हिडिओ घेता-घेता त्याचे धावते वर्णनही करून ठेवले. त्यानंतर मात्र आम्ही बसमध्ये बसून आमच्या खोलीवर परतलो.

(क्रमशः)

१४ टिप्पण्या:

  1. तुमच्या लक्षात आलेच असेल की मी आतुरतेने तुमच्या लिखाणाची वाट बघत असते. मला बसल्या जागी सिमला दर्शन घडवत आहात.

    उत्तर द्याहटवा
  2. व्वा! सुरेख! शिमला कराराबाबत वाचल्यावर सखेद आश्चर्य वाटलं.

    उत्तर द्याहटवा
  3. Annadale चं हे म्युझियम आमचं बघायचं राहिलं. Rather वीणा वर्ल्डच्या itenarary मध्ये नसल्यामुळे आम्हाला दाखवलं नाही.
    तुझ्या ब्लॉगमुळे म्युझियमबद्दल समजले.🙏🙏

    उत्तर द्याहटवा