आर्मी हेरिटेज म्यूझियम पाहून आम्ही जेमतेम ११ वाजेपर्यंत आमच्या खोलीवर परतलो. सामान बाहेर काढून ठेवले. शिमल्याहून कसौलीला निघण्यापूर्वी आम्हाला 'हिमाचली रसोई' मध्ये स्थानिक जेवणाचा आस्वाद घ्यायचा होता. जिथे खास हिमाचली खाद्यपदार्थ मिळतात अशा या रेस्टॉरंटबद्दल मला यूट्यूब व्हिडीओवरून कळले होते. शिमल्यामध्ये आल्यापासून सतत लागलेल्या पावसामुळे या रेस्टॉरंटमधे जाता आलेले नव्हते. ५ मे ला आम्ही शिमल्यातला मुक्काम अर्ध्या दिवसाने वाढवला होताच. म्हणून दुपारचे जेवण आम्ही 'हिमाचल रसोई' मधे घ्यायचे ठरवले.
एपिक चॅनेलवरच्या 'राजा रसोई और अन्य कहानियाँ' आणि 'लॉस्ट रेसिपिज' या कार्यक्रमांमधून हिमाचली खाद्यसंस्कृतीची माहिती मी ऐकली होती. एलिझियम हेरिटेज रिसॉर्टमधे एकदा बुफे ब्रेकफास्ट मधे 'बब्रू' नावाचा तळलेला पदार्थ होता. पण कोणा लाडावलेल्या बबडूसाठी तो केला असेल असे समजून मी त्याकडे दुर्लक्ष केले होते. 'सिद्दू' नावाचा, एक वाफवलेला पदार्थ असतो, हे माहिती असल्यामुळे तो खायची इच्छा होती. 'हिमाचली रसोईला' फोन करून त्यांच्या वेळा विचारून मी आधीच सिद्दूची ऑर्डर देऊन ठेवली होती. बरोबर साडेबारा वाजता आम्ही त्या रेस्टॉरंटमध्ये हजर झालो.
'हिमाचली रसोई', हे छोटेसे रेस्टॉरंट शिमल्याच्या लक्कड बाजारमध्ये आहे. तळमजल्यावर, जेमतेम १०-१२ जण बसू शकतील अशी लाकडी टेबल आणि बाकडी आहेत. एक खडी शिडी चढून पोटमाळ्यावर गेल्यावर आठ-दहा माणसांना खाली बसून जेवण्याची व्यवस्था केलेली आहे. वर चढून जाण्याचे अजिबात त्राण पायात नसल्यामुळे आम्ही तळमजल्यावरच बसलो. मोजकेच पण एखाद्या विशिष्ट खाद्यसंस्कृतीचे स्वादिष्ट पदार्थ मिळणारी रेस्टॉरंट्स आम्हाला आवडतात. 'पंजाबी, मुगलाई, चायनीज, साऊथ इंडियन आणि इटालियन' अशी सरमिसळ पाटी लावलेल्या रेस्टॉरंटमधे आम्हाला जावेसे वाटत नाही. पाश्चिमात्य देशात काही अगदी छोट्या रेस्टॉरंट्सच्या बाहेर एखाद्या पाटीवर त्या-त्या दिवशीचा मेनू, किंमतीसह लावलेला असतो. ते आम्हाला फारच आवडले. 'आपण इथे जावे की नाही?' हे बाहेरच्या पाटीवरची डावी-उजवी बाजू बघून ठरवता येते! 'हिमाचल रसोई' मध्ये मोजकेच पण पारंपरिक हिमाचली पदार्थ मिळत असल्यामुळे ते आम्हाला प्रथमदर्शनीच आवडले.
त्या दिवशीच्या मेन्यूमध्ये 'मंडियाली धाम' होते. 'धाम' म्हणजे हिमाचलमधील सणासुदीच्या जेवणाचे ताट. आणि हिमाचलमधील मंडी शहराजवळच्या भागातले पदार्थ या थाळीत समाविष्ट असल्याने या जेवणाचे नाव 'मंडियाली धाम' असे होते. आम्ही एक मर्यादित थाळी आणि एक गोडाचे व एक तिखटाचे सिद्दू मागवले. हे जेवण स्वादिष्ट तर होतेच, पण आले-लसूण--कांदा विरहित असल्याने ते अतिशय सात्विकही होते. थाळीतल्या पाच वाट्यांमध्ये, कढी, राजमा, दुधी भोपळ्याची भाजी, पाकातला दुधीहलवा आणि एक चिंच-गूळ घातलेली आंबट-गोड भाजी, अशी तोंडीलावणी भातासोबत वाढली होती. चायनीज बाऊ या पदार्थाच्या जवळ जाणारा, वाफवलेल, सिद्दू हा पदार्थ, आम्हाला फारच आवडला. गरमागरम सिद्दू फोडून, त्यावर साजूक तूप घालून खायला मजा आली. गोडाच्या सिद्दूमध्ये खसखस, सुका मेवा आणि गुळाचे सारण होते, तर तिखटाच्या सिद्दूमधे खसखस, कोथींबीर आणि गरम मसाले घातलेले सारण होते. जेवण झाल्यावर, माल रोडवरून आम्ही लिफ्टच्या साहाय्याने कार्ट रोडला उतरलो. तोपर्यंत आमचा टॅक्सीचालक कुलदीप, आमचे सामान मेसमधून घेऊन तिथे पोचला. त्यानंतर आम्ही कुफ्री-चैल मार्गे कसौलीचा प्रवास सुरु केला.
कसौलीपर्यंतचा रस्ता रतिशय रम्य होता. थंडीच्या मोसमात बर्फाच्छदित शिखरांसाठी आणि बर्फातल्या खेळांसाठी कुफ्री प्रसिद्ध आहे. आम्हाला तिथे थांबायला वेळ नव्हता. आमचे जेवण तर झालेले होते, पण तीन वाजून गेले तरी कुलदीप त्याच्या जेवणासाठी कुठेही थांबायला तयार नव्हता. जनेड घाटातल्या 'सोनी दा ढाबा' मधेच मी जेवणार, असे त्याने सांगितले. शेवटी तो ढाबा आल्यावर आम्हाला हायसे वाटले. कुलदीपच्या सांगण्याप्रमाणे, हा ढाबा उत्तम स्थानिक जेवणासाठी अतिशय प्रसिद्ध आहे. कुलदीप जेवायला गेला तरी आम्ही टॅक्सीमधेच बसून लांबूनच त्या ढाब्याकडे पाहत होतो. एक गोरी-गोबरी पण मिचमिच्या डोळ्यांची बाई, सतत रोट्या लाटत आणि चुलीवर भाजत बसलेली होती. तुपाची धार सोडलेल्या गरमागरम रोट्या, आणि तोंडीलावणी वाढायची लगबग चालू होती. ढाब्याच्या एका गाळ्यामध्ये ड्रायव्हर्स आणि कामकरी लोकांची आसनव्यवस्था होती. तर शेजारच्या गाळ्यामध्ये टूरिस्ट लोकांसाठी जेवण्याची व्यवस्था होती. इथले सगळे जेवण आणि विशेषतः 'हिमाचली मीठी रोटी' अतिशय प्रसिद्ध आहे, असे कुलदीपणे आम्हाला सांगितले. आम्हाला भूक नसल्यामुळे आम्ही मात्र तिथे काहीच खाल्ले नाही.
मस्त गप्पा मारत, आणि आम्हाला सगळी माहिती सांगत कुलदीप सफाईने गाडी चालवत होता. आम्हाला चैल पॅलेस पाहायला जायची इच्छा नव्हती. पण चैल येथील सुप्रसिद्ध 'राष्ट्रीय मिलिटरी स्कूल'पर्यंत जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांशी आम्ही संवाद साधला. तसेच, कुलदीपच्या सांगण्यावरून 'काली टिब्बा' या प्राचीन मंदिराला भेट दिली. उंच डोंगरावर बांधलेले हे मंदिर सुंदर असून इथले वातावरण अतिशय प्रसन्न आहे. पण इथल्या तुफान वाऱ्यामुळे आम्ही अगदी कुडकुडून गेलो. हे सगळे होईपर्यंत संध्याकाळचे सहा वाजत आले होते. आम्हाला गरमागरम चहा हवा होता. पण, 'मैं आपको एक जगह बढिया चाय पिलाऊंगा' असे म्हणत कुलदीप इथे-तिथे कुठेही थांबायला तयारच नव्हता. शेवटी कंडाघाट येथील एक छोट्या टपरीपाशी तो थांबला. अगदी हसतमुख अशा माय-लेकींच्या जोडीने चालवलेल्या त्या टपरीवर अप्रतिम चवीचा, आले घातलेला अगदी गरम चहा मिळाला. एक कप चहा पिऊन झाल्यावर आम्हाला आजून एकेक कप चहा प्यायची आणि त्याबरोबर मठरी खायची इच्छा अनावर झाली.
चहा घेऊन आम्ही सोलन मार्गे कसौलीकडे निघालो. त्या दिवशीची आमची भ्रमंती खरेतर खाद्यभ्रमंतीच होती. वाटेत कुलदीपशी गप्पा चालू होत्याच. गप्पांच्या ओघामध्ये व्यसनाधीनता हा विषय सुरु झाला. त्यानंतर मात्र कुलदीपने सांगितलेली माहिती ऐकून आम्ही सुन्न झालो. पंजाबमधल्या तरुण पिढीसारखीच, हिमाचलमधील तरुण पिढीदेखील व्यसनाच्या विळख्यात अडकत चालली आहे आहे हे ऐकून आम्हाला धक्का बसला.
साधारण रात्री नऊच्या सुमारास आम्ही कसौलीच्या आर्मी हॉलिडे होम मध्ये पोहोचलो. रात्रीचे जेवण खोलीवरच आले. जेवण झाल्यावर निद्रधीन झालो.
इंटरेस्टिंग. नितीन चौधरी
उत्तर द्याहटवाधन्यवाद!
हटवागोड सिद्धू म्हणजे उकडीच्या मोदकाचा भाऊ वाटला. ओलं खोबरं वगळता
हटवासारण मोकळं नव्हते आणि त्यातही काही वेगळे मसाले होते.
हटवाव्वा! फारच छान! खाद्यपदार्थांची नावं मजेशीर आहेत.
उत्तर द्याहटवा😊👍🙏
खरं आहे
हटवा👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद!
हटवा🙏🙏
उत्तर द्याहटवा👍
हटवापोट भरलं .
उत्तर द्याहटवा🤣🤣
हटवावाचताना मजा आली. सर्व गोष्टी अगदी डोळ्यासमोर उभ्या राहिल्या.
उत्तर द्याहटवाधन्यवाद!
हटवाApratim pravas varnan covering minute aspects
उत्तर द्याहटवाधन्यवाद!
हटवाछान!आमच्याही तोंडाला पाणी सुटले.
उत्तर द्याहटवाधन्यवाद!
उत्तर द्याहटवा