संगमावर गंगास्नान करून झाल्यावर आम्ही बोटीने सरस्वतीघाटावर परतलो. घाटावर अनेक लहान मुले आणि मुली यात्रेकरूंच्या कपाळावर हळद-कुंकवाने मळवट भरायला उत्सुक होती. आम्ही चौघांनीही कपाळावर हळद आणि त्यावर कुंकवाने ओम आणि त्रिशुळाचे छाप मारून घेतले. किल्ल्याच्या आत जाऊन आम्ही आमचे कपडे आणि इतर सामान आमच्या टॅक्सीमध्ये ठेवले. घरून निघताना प्राचीने मेथीचे पराठे आणि अंजलीने डिंकाचे लाडू करून बरोबर आणले होते. दोन-दोन पराठे, एकेक लाडू खाऊन आणि गरम कॉफी पिऊन आम्ही ताजेतवाने झालो आणि किल्ल्याच्या आवारातच असलेल्या पाताळपुरी मंदिराकडे चालत निघालो.
पाताळपुरी मंदिरात जाण्यासाठी काही पायऱ्या उतरून जमिनीच्या खालच्या स्तरावर जावे लागते. मंदिराच्या आत अत्यंत जुना असा अक्षयवट आहे. असे म्हणतात की, प्रभू रामचंद्र आणि माता सीतेने वनवासात जात असताना या वडाच्या सावलीत विश्रांती घेतली होती आणि या झाडाचा आशीर्वाद त्यांना लाभला होता. गंगास्नान केल्यानंतर अक्षयवटाला नमस्कार केल्यास जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळून मोक्षप्राप्ती होते, अशी लोकांची श्रद्धा आहे. पूर्वीच्या काळी तर अक्षयवटावरून उडी मारून लोक आपले प्राण देत असत. जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून कायमची सुटका होऊन मोक्ष मिळावा अशीच त्यामागची धारणा असणार. परंतु, बादशाह अकबराने १५८३ साली हा भक्कम किल्ला अक्षयवटाभोवतालीच बांधून काढल्यामुळे 'तडक मोक्षप्राप्ती'च्या प्रथेला कदाचित आळा बसला असावा.
आम्ही पाताळपुरी मंदिरात गेलो खरे, पण तिथे इतकी गर्दी आणि गोंगाट होता की कधी एकदा इथून बाहेर पडतो असे आम्हाला झाले. आम्ही त्वरित दर्शन घेऊन बाहेर पडलो, पण देवदर्शनानंतर मनाला शांती आणि समाधान लाभल्याचा अनुभव मात्र आला नाही. किल्ल्याच्या तटबंदीवर एक 'President's View Point' आहे. तिथून खाली पाहिले असता, संपूर्ण कुंभमेळ्याचे, गंगाकिनारी तात्पुरत्या वसवलेल्या Tent City चे आणि त्यामध्ये हिंडणाऱ्या प्रचंड जनसमुदायाचे दर्शन होत होते. तटबंदीच्या जवळच, गंगाकिनारी असलेल्या 'लेटे हनुमान' किंवा 'बडे हनुमान' मंदिराबाहेर दर्शनासाठी थांबलेल्या भक्तांची २-३ किलोमीटर लांब बारी लागलेली दिसत होती. ती बारी बघूनच आम्ही हनुमान मंदिरात न जाण्याचा निर्णय घेतला.
आमच्या मुक्कामाची सोय प्राचीच्या भावाने एका महंतांकरवी केलेली होती. आमचे गंगास्नान व देवदर्शन व्यवस्थित व्हावे यासाठी ते महंत स्वतः लक्ष घालत होते. आम्ही निवासस्थानी कधी पोहोचणार हे जाणून घेण्यासाठी सकाळपासून त्या महंतांचा आम्हाला अनेकवेळा फोन येऊन गेला होता. आम्हीही आता दमलो होतो त्यामुळे आम्ही किल्ल्यातून तडक टॅक्सीने निघालो. यमुनेपारच्या नैनी या गावाला जोडणारा पूल पार करून आम्हाला साधारण आठ किलोमीटर दूर असलेल्या त्या पत्त्यावर पोहोचायचे होते. आमची टॅक्सी प्रचंड गर्दीतून वाट काढत निघाली. आठ किलोमीटर अंतर कापायला आम्हाला जवळपास तीन तास लागले. गर्दीतून वाट काढत पायी निघालेले तळागाळातले यात्रेकरी प्रयागराजला आल्यावर प्रथमच आम्हाला जवळून पाहता आले. गंगास्नानाच्या ओढीने आलेले ते लोक आपले सामान डोक्यावर लादून, गर्दीतून वाट काढत, अत्यंत शांतपणे चालत होते. कित्येक जण आपल्या लहान मुलांना खांद्यावर बसवून चालत होते. म्हातारे-कोतारे, अपंग, अंध असे अनेक भक्तगण गर्दीत दिसत होते. सर्वांचा उत्साह आणि आस्था वाखाणण्यासारखी होती.
'ओमॅक्स हायटेक सिटी' नावाच्या, नव्या कोऱ्या सदनिकांच्या संकुलामध्ये एका तीन बेडरूमच्या सुसज्ज सदनिकेपाशी आम्ही भुकेजलेल्या आणि दमलेल्या अवस्थेमधे पोहोचलो तेंव्हा दुपारचे चार वाजले होते. भगवी वस्त्रे धारण केलेले, अत्यंत मृदुभाषी, आणि प्रसन्न चेहऱ्याचे, महंत श्री. गंगाधरमहाराज आमच्या स्वागतासाठी थांबलेले होते. आम्हाला बोटीतून संगमापर्यंत नेऊन गंगास्नान करण्याची व्यवस्थाही महाराजांनी केलेली होती. पण आम्ही गंगास्नान करूनच आलो आहे हे समजल्यावर त्यांनी आम्हाला विश्रांती घेण्यास सुचवले. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून, संगमापासून दूर असलेल्या नवीन कॅंटोन्मेंटमध्ये आम्ही राहायला जाणार आहोत, हे आम्ही त्यांना सांगितले. "आपल्याला भेटायला मी पुन्हा संध्याकाळी येईन" असे सांगून ते महाराज निघून गेले.
आम्ही स्वयंपाकघरामधे पाहतो तो काय? चहा-साखरेचे सामान, दूध, तेल, पोहे, कांदे-बटाटे, हिरव्या मिरच्या, तेल, मसाले, मिसळवण्याचा डबा, कणीक, डाळ-तांदूळ, भांडी-कुंडी असे सर्व काही तिथे होते. मी माझा थकवा विसरले आणि लगेच स्वयंपाकघराचा ताबा घेतला. कांदा, मटार, हिरवी मिरची व टोमॅटो घालून मी केलेल्या चमचमीत पोह्यांवर ताव मारून झाल्यावर, आले घातलेला मस्त गरमागरम चहा आम्ही प्यायलो. मग चौघांनींही गरम पाण्याने अंघोळ केली आणि आमचा दिवसभराचा शिणवटा पळून गेला. प्राचीच्या अंगात थोडी कणकण असल्याने आणि दमणुकीमुळे तिला झोप लागलेली होती. नेमके त्याच वेळी महाराज आम्हाला भेटायला आले. अंजलीला, मला आणि आनंदला शाल देऊन महाराजांनी आमचा सत्कार केला आणि महाकुंभमेळ्याचे चित्र असलेली एक सुंदर फोटोफ्रेम आम्हाला भेट दिली!
श्री. गंगाधर महाराजांनी आमची राहण्याची उत्तम सोय तर केलेलीच होती. संध्याकाळी सातच्या सुमारास त्यांनी आमच्यासाठी गरमागरम शुद्ध शाकाहारी वैष्णव भोजनाच्या थाळ्याही पाठवून दिल्या. आमच्याकडून राहण्या-खाण्याचे काहीही पैसे ते घेणार नव्हते. इतके सर्व आमच्यासाठी करून, त्याउप्पर त्यांनी आमचाच सत्कार केल्यामुळे आम्हाला अगदी लाजायला झाले. महाराजांशी बोलता-बोलता ज्या गोष्टी कळल्या, त्या ऐकून तर आम्हाला थक्कच व्हायला झाले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या आदेशावरून 'ओमॅक्स हायटेक सिटी' संकुलामधे जवळपास २०० सदनिका राखून ठेवलेल्या होत्या. विविध मठांना प्रत्येकी १०-२० सदनिकांचा ताबा दिलेला होता. त्या-त्या मठांचे महंत आपापल्या सदनिकांमध्ये भाविकांची राहण्याची सोय व गंगास्नानाची व्यवस्था स्वतः पाहत होते. सर्व सदनिकांमधे सोफासेट, डबलबेड, गाद्या-उशा-पांघरुणे ठेवलेली होती. जुजबी स्वयंपाकासाठी शिधा, भांडी-कुंडी आणि Induction Heater यासह प्रत्येक स्वयंपाकघर सुसज्ज केले गेले होते. आम्ही कुणी VIP भक्त असल्याप्रमाणे आमची अशा ठिकाणी विनामूल्य सोय व्हावी याचेही आम्हाला फार आश्चर्य वाटले.
रात्री जेवण झाल्यावर मी आणि अंजली पाय मोकळे करायला बाहेर पडलो. ओमॅक्स हायटेक सिटीच्या बाहेर पडताच दोन-तीन हेलिपॅड्स दिसली. कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या 'खऱ्याखुऱ्या VIP' भक्तांची हेलिकॉप्टर्स तिथेच उतरतात असे नंतर समजले! पायी हिंडत आम्ही दोघीच अरेल घाटापर्यंत चालून आलो. 'महाकुंभमेळानगरी' मधली आकर्षक रोषणाई दुरूनच पाहून आमचे डोळे दिपले.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून, चहा घेऊन आणि अंघोळी करून आम्ही कुंभमेळा क्षेत्रापासून दूर असलेल्या नवीन कॅंटोन्मेंटकडे जाणार होतो. शरीर थकले होते, पण अंथरुणाला पाठ टेकल्यानंतरही मनामध्ये विचारचक्र सुरूच होते. महाकुंभमेळ्याबाबत आम्हाला मिळालेली माहिती, तिथे आलेले अनुभव आणि त्यामुळे माझ्या मनामध्ये सुरु झालेल्या विचारचक्राबाबत पुढील लेखामध्ये लिहीन...
(क्रमशः)