आज पहाटे अगदी लवकर जाग आली. चटकन तयार होऊन लांब सायकल स्वारीला जावे असा विचार केला होता. पण सायकल दुरुस्तीसाठी टाकली आहे हे लक्षात आले. म्हणून मग खूप लांब चालायला जायचे ठरवले. अचानक मला, कॅनबेरामध्ये विकत घेतलेल्या, माझ्या नव्याकोऱ्या एसिक्स बुटांची आठवण झाली. नव्याकोऱ्या नव्हे, न वापरलेल्या, असे म्हणूया. कारण ते बूट विकत घेऊन दहा महिने उलटून गेले. पण आज प्रथमच मी ते वापरले आणि चांगला दहा-बारा किलोमीटरचा फेरफटका मारून आले. मला थोडे दमायला झाले. पण त्यामानाने, माझ्या पायांना व्यवस्थित बसणाऱ्या बुटांमुळे माझ्या पायांना खूप थकवा जाणवला नाही.
मागच्या वर्षी, जुलैच्या शेवटाला मी ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा येथे, माझ्या मुलीच्या बाळंतपणासाठी गेले होते. माझी नात दोन आठवड्याची झाल्यानंतर तिला घेऊन, माझी मुलगी, जावई आणि मी असे कॅनबेरात हिंडायला बाहेर पडायला लागलो होतो. मला तिथे काही खास खरेदी करायची नव्हती. पण, निघताना माझे वापरातले बूट पुण्यातच राहिल्यामुळे मी प्राचीचे, म्हणजे माझ्या मुंबईच्या वहिनीचे, बूट घालून ऑस्ट्रेलियाला गेले होते. ते बूट माझ्या पायाला जरा घट्टच होत होते. पुण्यात राहिलेले माझे बूटही तसे जुनेच झाले होते. त्यामुळे, कॅनबेरात मी चांगले बूट खरेदी करावेत, असा 'बूट' निघाला आणि माझी मुलगी व जावई मला तिथल्या मॉलमध्ये घेऊन गेले.
एरवी, मी आणि माझी मुलगीही, मॉलमध्ये जायला अजिबात उत्सुक नसतो. पूर्वी तिच्याकडे शिकागोला गेले असताना, केवळ अमेरिकन मॉल्समधल्या वातावरणाची झलक दाखवायला म्हणून, मुलीने मला आवर्जून तिथल्या मॉलमध्ये नेले होते. अमेरिकेतला मॉल बघितल्यावर, भारतातल्या मॉलमधले चंगळवादी वातावरण कुठून आले आहे, ते लगेच कळते. कॅनबेरातल्या मॉलमध्ये साधारण आपल्या इथल्या मॉल सारखीच मोठी-मोठी दुकाने होती. पण अमेरिकेतल्या किंवा भारतातल्या मॉल्समध्ये अनुभवायला मिळणारे, कान किटवणारे संगीत, धांगडधिंगा करणारे तरुण-तरुणींचे घोळके, श्रीमंतीचे ओंगळवाणे प्रदर्शन किंवा बेभानपणे खरेदी करत सुटलेल्या बायका, असे फारसे काहीच दिसले नाही.
त्याने निर्देशित केलेल्या बुटांच्या रांगेकडे आम्ही वळलो. त्या रांगेतले कुठलेच बूट सेलवर नव्हते. त्यामुळे सेलमधले, पन्नास-साठ ऑस्ट्रेलियन डॉलर्स किंमतीचे, चांगले बूट मिळण्याची आशा मावळली. त्याने दाखवलेल्या त्या रांगेतले एक-दोन बूट घालून मी चालून बघितले. अर्थातच ते माझ्या पायांना अगदी सुखावह वाटत होते. दीड-दोनशे डॉलर्स किंमत बघून मी खरेदीतून पाय मागे घेणार, हे माझ्या मुलीच्या लक्षात आले. "अगं, हे बूट पायाला अगदी आरामदायी असतात, वर्षानुवर्षे टिकतात, एक बुटाची जोडी तू विकत घेच" असा आग्रह तिने व जावयाने धरला. मग, मला आवडलेले निळ्या रंगातले बूट मी खरेदी केले. भारतात परतल्यानंतर, माझ्या आईच्या आजारपणात मी अतिशय व्यस्त होते. गेल्या ऑगस्टमध्ये खरेदी केलेले ते बूट, मी अजून वापरलेच नव्हते. आई गेल्यानंतर माझे सायकलस्वारीचे रूटीन सुरु झाले, पण माझे जुने बूटच मी वापरत होते. आज प्रथमच, खूप लांबवर चालण्यासाठी एसिक्स कंपनीचे नवीन बूट वापरले. पहाटेच्या शांत वातावरणांत चालता-चालता माझ्या मनातल्या विचारांनाही चालना मिळाली.
कालच आषाढी एकादशी झाली. या वर्षी वारी, दिंड्या, रिंगण या सगळ्या गोष्टीना करोनामुळे बंदी होती. सहजच, माझ्या मनासमोर पंढरीच्या वारकऱ्यांचे चित्र उभे राहिले. वर्षानुवर्षे, गावोगावचे अनेक वारकरी विठूमाऊलीच्या ओढीने पंढरीला पायी चालत जातात. माझी आजीही वयाच्या पंच्च्याहत्तरीपर्यंत सोलापूरहून पंढरपूरला चालत जायची. पण ती कधी बूट वापरायची नाही, चप्पलच घालायची. ती वारीला निघायची त्यावेळी माझे आई-वडील तिला चांगल्या चपला घेऊन द्यायचे. वारीबरोबर पाच-दहा किलोमीटर चालून, सोशल मीडियावर स्वतःचे पन्नास फोटो टाकून, आपल्या भक्तीचे प्रदर्शन मांडणारे, मॉडर्न 'वारकरी'ही मला आठवले. ते मात्र रिबॉक, आदिदास, नायके वगैरे कंपन्यांचे बूट घालून चालत असतील. पण सामान्य वारकऱ्यांचे काय? तुटक्या, झिजलेल्या बूट-चपला घालून हे वारकरी रोजचे वीस-वीस किलोमीटर अंतर चालतात. कित्येकांना मी अनवाणी पायानेही जाताना पाहिलेले आहे. भक्तिमार्गावर चालणाऱ्या या खऱ्याखुऱ्या वारकऱ्यांच्या पायांना, तो पंढरीनाथ शीण येऊच देत नसावा. महागडे आणि आरामदायी बूट घालून, व्यायामासाठी मी करत असलेल्या पायपिटीच्या दरम्यान मला, पांडुरंगाच्या भेटीसाठी मैलोन-मैल अनवाणी चालणाऱ्या गरीब वारकऱ्यांची आठवण झाली आणि मनोमनच त्या अनामिक वारकऱ्यांचे मी पाय धरले.














