आदल्या रात्री लवकर जेवून झोपले होते. गाढ झोप लागली होती आणि पहाटे ६.३० वाजता अगदी प्रसन्न चित्ताने जाग आली. नेहमीप्रमाणे सकाळी चहा प्यायची हुक्की आली होतीच. कालच अशी महिती मिळालेली होती की, इथे सकाळी चहा मिळतो पण बरोब्बर सव्वासहाला वरच्या मजल्यावर स्वयंपाकघरात जाऊन तो आणावा लागतो. ती वेळ चुकली की मात्र मग नाष्ट्याबरोबरच चहापान करता येते. कडाक्याच्या थंडीमधे सकाळी उठल्यानंतर उबदार खोलीतून बाहेर पडून, चहा आणायला वरच्या मजल्यावर जायला अगदी नको वाटत होते. त्यामुळे, चहाची तल्लफ मनातच दाबून टाकली.
आमचे सगळे सामान असलेल्या स्ट्रॉली बॅग्स आम्ही १९ तारखेला संध्याकाळीच नारायणकोटीमध्ये तेथील व्यवस्थापकांच्या हवाली केल्या होत्या. पण २२ तारीख उजाडली तरी आमच्या बॅग्स अजूनही केदारनाथपर्यंत पोचलेल्या नव्हत्या. आश्चर्य म्हणजे आमच्यासोबतच वर चढून आलेल्या डॉ. हर्ष आणि डॉ. अजय यांचे सामान मात्र २२ तारखेला सकाळी त्यांना मिळाले. अगदीच जुजबी सामान जवळ असल्याने आमची बरीच गैरसोय होत होती. आनंदने काल वॉशिंग मशीनमधे आमचे कपडे धुतले असल्याने बदलायला स्वच्छ कपड्यांचा एक जोड तरी होता हे नशीब! काल एका नर्स मुलीकडून मी थोडासा साबण घेतल्यामुळे कपडे धुता आले होते. आज मात्र मी सकाळीच बाहेर पडून, हॉस्पिटलसमोरच्या दुकानातून सर्फचा एक पुडा विकत आणला. अंघोळ करून आम्ही दोघेही नाष्टा करायला गेलो. नाष्ट्याला गरम छोले-भटुरे होते. छोले अगदी छान मऊ शिजलेले आणि चवीला चटकदार होते. भटुरे आकाराने चांगलेच मोठे होते. दोन भटुरे व छोले आणि २-३ कप गरमागरम चहा असा भक्कम नाष्टा करून ८.४५ पर्यंत मी कामाला गेले.
मी ९ वाजायच्या आतच OPD मधे पोहोचल्यामुळे, रात्रपाळी केलेला स्टाफ अगदी खूष झाला. मी ताजीतवानी असल्याने लगेच कामाला लागले. तिथली रजिस्ट्रेशनची पद्धत, रूग्णांचे बेशिस्तीची वागणे आणि एकेका रूग्णाबरोबर येणाऱ्या दोन-तीन किंवा कित्येकदा जास्तच नातेवाईकांचे आत घुसणे, हे सगळे मला कालपासूनच खटकत होते. त्यामुळे मी तिथली घडी नीट बसवण्यासाठी सूत्रे हातात घेतली. रजिस्ट्रेशनची कारवाई नीट व सुरळीतपणे होईल यासाठी टेबलांची योग्य जागी हलवाहलव करून घेतली. बाहेरून आत येण्याच्या दरवाज्याजवळच आमची तपासणीची टेबल्स लावून घेतली. प्रत्येक रुग्णाने रांगेतच यायचे, नावनोंदणी केल्यानंतरच तपासणी होईल, आणि रुग्णासोबत शक्यतो एकाही नातेवाईकाने आत यायचे नाही, असे नियम मी लागू केले. त्यामुळे आपोआपच बघ्यांची संख्या घटली आणि गर्दी आणि गोंधळ जरासा कमी झाल्यामुळे सगळ्यांनाच सुसूत्रपणे काम करता येऊ लागले. इथल्या सगळ्या तपासण्या आणि उपचार मोफत आहेत हे बाहेरच्या बोर्डावरच लिहिलेले होते. त्यामुळे, एखाद्या खऱ्या रुग्णासोबत आलेले नातेवाईकदेखील फारसा काही त्रास नसताना, "माझे पण बीपी बघा, शुगर तपासा, ऑक्सिजनची लेव्हल मोजा" असा आग्रह आमच्यापाशी धरत होते. मी लागू केलेल्या नियमांमुळे, विनाकारण तपासणी करून घेऊ पाहणाऱ्या धडधाकट नातेवाईकांची संख्याही आपोआपच घटली. त्यामुळे, माझ्याबरोबर काम करणाऱ्या सगळ्या नर्सेसना अगदी "हुश्श" झाले.
सकाळी ८.४५ ते रात्री ७.३० पर्यंत मी सलग ड्यूटी केली. आज मात्र दुपारी जेवायलाही गेले नाही. अलीकडे बरेच दिवसांपासून, पुण्यात घरी असताना, आम्ही दुपारचे जेवण करायची सवय ठेवलेली नव्हती. शिवाय, आज सकाळचे भटुरे पोटात अगदी गच्च बसलेले होते. त्यामुळे फारशी भूकही लागली नव्हती. इथे थंडी जरी असली तरी फारशी भूक लागत नाही असे माझ्या लक्षात आले. या हॉस्पिटलमध्ये सतत खूप जास्त पेशंट्स येत असल्यामुळे एकाचवेळी सगळा स्टाफ व डॉक्टर्स जेवायला जात नाहीत. अर्धा नर्सिंग स्टाफ आधी जेवून येतो आणि ते लोक परत आले की उरलेली मुले-मुली जेवायला जातात. आधी गेलेल्या मुलामुलींकडून आज दुपारी जेवणात आंबे आहेत, हे मला कळले होते. त्यामुळे, नंतर जेवायला जाणाऱ्या रिया आणि कविता या नर्सेसना मी माझ्यासाठी आणि आनंदसाठी प्रत्येकी एक-एक आंबा आणायला सांगितले. पण या मुली जेवायला जाईपर्यंत आंबे संपत आलेले असल्याने त्यांनी एकच आंबा आणला होता. मी तो रात्रीच्या जेवणात खाण्यासाठी ठेवला.
इथे आल्यापासून अनेक चित्रविचित्र अनुभव येत राहिले होते. भारताच्या कोनाकोपऱ्यातून आणि खेडोपाड्यातून इथे भाविक येतात. अनेकजण घोड्यावरून, डोलीतून किंवा पिठ्ठूत बसून येतात. वाटेत घोड्यावरून पडून मार खाल्लेले, हाडे मोडलेले, खरचटलेले, किंवा मुका मार लागलेले असे दिवसभरात कमीतकमी १०-१२ रुग्ण येत होते. त्यापैकी अनेकजण अतिशय गरीब होते. सहसा अशा गरीब घरांमधील कित्येक वृद्ध बायका, पुरुष व लहान मुले आधीच कुपोषित व खालावलेल्या प्रकृतीचे असतात. इथली थंडी, प्रवासाचा शीण, हवेतली प्राणवायूची कमतरता, आणि एकंदर खाण्याचे हाल, यामुळे त्यांची तब्येत एकदमच कमालीची ढासळते. कित्येकांना इथपर्यंत येऊनही दर्शन न करताच परत जावे लागते. अनेकांनी चारधाम यात्रेसाठी आयुष्यभराची पुंजी खर्च केलेली असते. अशावेळी दर्शन न घेता परत जावे लागणे हे खरोखरच दुर्दैव म्हणायचे. दवाखान्यामध्ये एक दानपेटी ठेवलेली आहे. परंतु, इथले कोणीही कर्मचारी कोणालाही दान देण्याची विनंती करत नाहीत. तरीदेखील अनेक जण त्या दानपेटीमधे पैसे दान करताना दिसत होते. आणि मला जाणवलेली विशेष गोष्ट म्हणजे दान करणारे बरेचसे लोक गरीब घरामधून आलेले दिसत होते. त्या मानाने, सुखवस्तू लोक फारसे दान करताना आढळले नाहीत.
मला आलेला आणखी एक अनुभवही खूप बोलका होता. ज्यांना खरोखरीच खूप त्रास असतो, ते लोक फारसे कुरकूर करताना दिसले नाहीत. ते नावनोंदणी होईपर्यंत शांतपणे थांबत होते आणि आमचा सल्ला ऐकत होते. याउलट, विनामूल्य उपचार उपलब्ध आहेत म्हणून आलेले, फारसा त्रास नसलेले सुखवस्तू लोक जास्तच कटकट करत होते. विनाकारण हॉस्पिटलमधे आलेल्या कित्येक तरुण मुलामुलींना फारसे काहीही झालेले नसतानाही, उगीचच ऑक्सिजन लावून हवा असायचा. अशा लोकांना वेळीच ओळखून, थोडे गोड बोलून त्यांची बोळवण करावी लागे.
आपल्या देशात कोणत्याही पॅथीची, कुठलीही औषधे, डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवायही अगदी सहज मिळू शकतात हे आपण पाहतोच. अनेक पेशंट्स आपल्या मनाने वाट्टेल ती औषधे व गोळ्या खाऊन आलेले मला दिसले. तरीही त्यांना अजून मिळतील ती औषधे घेण्याची हौस होती. पंचेचाळीस वर्षांपूर्वी आम्ही केदारनाथला आलो होतो तेंव्हा आमच्यापैकी कोणालाही किंवा आमच्या आसपास चालणाऱ्या इतर कोणा यात्रेकरूंनाही प्राणवायूच्या कमतरतेमुळे त्रास झाल्याचे मला आठवत नव्हते. इथे मात्र बरेच पेशंट्स त्या त्रासाची तक्रार घेऊन येत होते. अनेकजण कापूर हुंगत-हुंगत आलेले होते. हातात किंवा आपल्या गळ्यामध्ये कापराच्या पुड्या बांधलेलेही महाभाग दिसले. त्यांच्या समजुतीनुसार कापूर हुंगल्याने शरीरातील प्राणवायू वाढतो! करोनाकाळामध्ये बऱ्याच प्रमाणात बोकाळलेले हे कापूराचे खूळ अजूनही लोकांच्या मनातून उतरलेले नसल्याचे पाहून आश्चर्यही वाटले आणि खेदही वाटला. अति कापूर हुंगण्यामुळे श्वासनलिकेला आतून सूज येऊ शकते आणि श्वसनाला अधिकच त्रास होऊ शकतो. या कापूर हुंगण्याच्या फॅडमुळेच तिथे येणाऱ्या अनेकांना श्वसनाचा त्रास होत होता. याबाबत लोकांचे प्रबोधन करण्याचा आम्ही प्रयत्न करतही होतो. पण हे 'कापूर-महात्म्य' लोकांच्या मनांमध्ये इतके खोलवर बिंबलेले आहे की फारसे कोणी आमच्यावर विश्वासही ठेवत नव्हते.
या हॉस्पिटलात रोज दुपारी ३ वाजता, इथे सहा महिने पूर्णवेळ काम करण्यासाठी आलेल्या सर्व नर्सिंग स्टाफची एक मिटिंग घेतली जाते. इथले व्यवस्थापक श्री. रोहनजी, श्री. धनवीरजी, आणि डॉ. यादव या मीटिंगमधे उपस्थित असतात. नर्सिंग स्टाफला राहण्या-खाण्याच्या बाबतीत किंवा रोजच्या कामामध्ये काही अडचणी येत असतील तर त्या ऐकून घेतल्या जातात व त्यावर तोडगा काढला जातो. अर्थात, आम्ही बाहेरून केवळ दहा दिवसांसाठी आलेले चार डॉक्टर्स या मिटिंग्जना जात नव्हतो. रोज दुपारी ३ ते ४ दरम्यान ही मिटिंग चालते. माझ्याबरोबर काम करणारा डॉ. अजय आज दुपारी जेवणानंतर बराच काळ कुठेतरी गायब होता. हैदराबादहून आलेल्या डॉ. सुभाषिनीची तब्येत बरी नसल्याने ती सलग दुसऱ्या दिवशीही कामाला आलेली नव्हती. दुपारी ३ ते ४ दरम्यान, नावनोंदणी करणारी एक नर्स, एक नर्सिंग कोर्सचा विद्यार्थी आणि मी एकटीच डॉक्टर, असे तिघेच काम करत बसलो होतो. आनंदने दुपारी येऊन तास-दीड तास रजिस्टर भरण्याचे काम केले.
पेशंट नोंदणीसाठी रोजची तीन रजिस्टर्स असतात. सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत नावनोंदणीचे एक रजिस्टर, दुपारी ३ ते रात्री ९ वाजेपर्यंत दुसरे रजिस्टर व रात्री ९ ते सकाळी ९ पर्यंतचे तिसरे रजिस्टर. सकाळी ९ ते दुपारी ३ पर्यंत, साडेतीनशेच्या वर पेशंटसची नावनोंदणी झालेली होती, म्हणजेच दुपारी ३ वाजेपर्यंत किमान ३५० पेशंट्स तपासले गेले होते! इथे रोज दुपारी ४ वाजता चहा येतो. श्रमपरिहारासाठी चहासारखे दुसरे काही नाही. तो चहा मात्र मी दोन-तीन छोटे कागदी कप भरून प्यायले. भर थंडीमध्ये गरम चहा चांगला वाटतो.
संध्याकाळी ७.३० पर्यंत ओपीडीत थांबून मी येतील ते सगळे पेशंट्स बघितले. दिवसभर पेशंट्स तपासून, त्यांच्याशी बोलून आणि बिनकामाच्या नातेवाईकांना बाहेर हाकलून मला खूपच दमायला झाले होते. रात्रीचे जेवण साधेच होते. घट्ट दाल, गरम रोटी, आलूमटारची भाजी आणि भात असे जेवून, आणि दुपारी जपून ठेवलेला आंबा खाऊन मी खोलीवर रात्री ९ पर्यंत पोहोचले. रात्री आनंदशी गप्पा मारत आणि फोनवर काहीबाही ऐकत असतानाच केंव्हातरी झोप लागून गेली.
[क्रमशः]
©डॉ. स्वाती बापट


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा