पायी चालत, दमून-भागून, आदल्या रात्री आम्ही केदारनाथला पोचलो होतो. रात्री झोपताना माझे अंग बर्फासारखे गार पडले होते. केस तर ओलेच होते. झोप लागण्यापूर्वी बराच वेळ मी रजईच्या आत कुडकुडत होते. तेंव्हा मला खरोखर असे वाटले होते की आज रात्रीतूनच माझे काही बरेवाईट होणार! दिवसभर फारसे काही खायलाही मिळालेले नसल्याने पोट रिकामेच होते. पण अतिशय दमणुकीमुळे मला झोप चांगली लागली. जवळजवळ पहाटे दोन वाजता मी झोपले असले, तरीही सवयीमुळे पहाटे ६.३० वाजता जाग आली.
कालच्या दिवसभरात आम्ही चौघेही सुमारे साडेसोळा तास चालून केदारनाथला पोहोचलो होतो. स्मार्टवॉचवरचे रेकॉर्ड बघितले तर एकूण ३२.५३ किलोमीटर अंतर पार केलेले दिसत होते. दमणुकीमुळे काल मी अगदीच अर्धमेल्या अवस्थेत होते. बाकीचे तिघे त्या मानाने ठीक होते. मी रात्री कुठलीही pain killer गोळी न घेताच झोपले होते. तरीही सकाळी उठताना, हालचाल करताना, पाय किंवा अंग फारसे दुखत नव्हते. मुख्य म्हणजे मी जिवंत आहे, हालचाल करू शकते आहे या जाणिवेमुळेच मला समाधान वाटले!
दात घासून सर्वप्रथम मी चहाच्या शोधात तळमजल्यावर गेले. तिथे हॉस्पिटलच्या ओपीडीमध्ये सगळेजण प्रचंड लगबगीत होते. पेशंट्सची तोबा गर्दी होती. त्या गोंधळातही एका नर्सने माझ्या हातात चहाचा कप आणून दिला. बिनदुधाचा, गोडमचूळ आणि थंड झालेला चहा मला मुळीच आवडला नाही. चहा व नाष्टा दुसऱ्या मजल्यावरच्या डायनिंग हॉलमधे सकाळी ८.३० वाजताच मिळेल ही मोलाची माहिती घेऊन मी खोलीवर परतले. आम्ही दोघेही तयार होऊन डायनिंग हॉलवर नाष्टा करायला गेलो. कुणाल व अविनाश हे दोन नर्सिंग कोर्सचे विद्यार्थी आमच्याही आधी डायनिंग हॉलमधे येऊन नाष्ट्याच्या प्रतीक्षेत थांबले होते. त्यांच्याशी थोडा वेळ गप्पा झाल्या. नाष्ट्याला गरम फुलके आणि बटाट्याची भाजी होती. त्याबरोबर छान, गरम, पण भरपूर गोडमिट्ट चहा होता. जवळपास ३६ तासांनंतर गरम आणि पोटभरीचे खाणे मिळाल्यामुळे आम्ही दोघांनी अगदी भरपेट खाल्ले. तेथील शिरस्त्याप्रमाणे नाश्ता झाल्यानंतर आपापली ताटे घासून ठेवली.
केदारनाथसारख्या दुर्गम ठिकाणी गेल्या वर्षीपर्यंत फक्त एक छोटेखानी, बैठा दवाखाना होता. परंतु, आताचे हे नवीन, पक्के बांधकाम असलेले हॉस्पिटल खूपच मोठे आणि अद्ययावत आहे. या धर्मादाय हॉस्पिटलचे उद्घाटन याच वर्षी ८ मे रोजी झालेले आहे. तळमजल्यावर औषधालय किंवा फार्मसी, एक छोटी लॅब, ओपीडी, एक लहान operation theater (मायनर ओटी), एक्सरे रूम, आयसीयू, जनरल वॉर्ड, आणि वेटिंग रूम आहे. बाहेरून आल्या-आल्या समोरच फार्मसी आहे. तिथे गोळ्या-औषधांचे वितरण होते. फार्मसीच्या डावीकडच्या दारातून आत गेले की OPD, इमर्जन्सी किंवा कॅजुअल्टी, त्याच्या बाजूला मायनर ओटी, सगळ्यात मागच्या बाजूला ICU, जनरल वॉर्ड, आणि लॅबोरेटरी अशी रचना आहे. हॉस्पिटलच्या आवारात सगळीकडे सीसी टीव्ही लावलेले आहेत. फार्मसीच्या आतमध्ये मागील बाजूस एक कॉन्फरन्स रूमही आहे. तिथेच सीसी टीव्हीचा स्क्रीन बसवलेला आहे. फार्मसीच्या पलीकडे एक भली मोठी वेटिंग रूम आहे. तिथे अनेक यात्रेकरू विसावा घेत असतात. त्यापलीकडे वरच्या मजल्यावर जाण्यासाठी जिना आहे.
इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सर्व वैद्यकीय स्टाफला राहण्याची व्यवस्था केलेली होती. खोल्या मोठ्या होत्या व त्यामध्ये गरज व सोयीनुसार पलंग आणि बंक बेड ठेवलेले होते. एकेका खोलीत चार ते पाच शिकाऊ पुरुष किंवा स्त्री नर्सेस, अशी राहायची व्यवस्था होती. सेवाज्येष्ठतेनुसार एका खोलीत एक किंवा फारतर दोन डॉक्टर्स राहतात. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर स्वयंपाकघर व भोजनालय आणि त्याच्या मागच्या बाजूला मोठी गच्ची होती. भोजनालयाच्या बरोबर खाली, पहिल्या मजल्यावर एक मोठे मोकळे दालन होते, जिथे सध्यातरी बांधकामाचे उर्वरित साहित्य ठेवलेले होते. आमच्या खोल्यांच्या सर्व बाजूंनी मोठा व्हरांडा होता. या व्हरांड्याला काचेची तावदाने असल्याने व्हरांड्यातून बाहेरचा यात्रेकरूंची ये-जा असलेला वाहता रस्ता दिसत होता. व्हरांड्याच्या एका कोपऱ्यातून आम्हाला केदारनाथ देवळाच्या शिखराचे दर्शन होत होते. आमच्याच हॉस्पिटलचे दोन बूथ्स केदारनाथच्या देवळाच्या अगदी जवळ आहेत, अशीही माहिती मला मिळाली. एक बूथ देवळाच्या प्रवेशद्वाराजवळ आणि एक देवळाच्या मागच्या दाराजवळ होता. तिथेही मोफत तपासणी आणि औषधे देण्याची सोय होती.
मी बरोबर ८.४५ वाजता तळमजल्यावर ड्यूटीसाठी पोहचले. तिथे OPD मधे प्रचंड गडबड होती. किमान चाळीसएक रूग्णांची रांग लागलेली होती. प्रत्येक व्यक्ती आपला नंबर आधी लागावा यासाठी धडपडत होती. प्रत्येक रूग्णाबरोबर दोन-तीन नातेवाईकही आत घुसून आपापल्या रुग्णाला लवकर तपासावे यासाठी गडबड करत होते. सगळा नर्सिंग स्टाफ पेशंट्सना तपासून औषधांसाठी फार्मसीमधे पाठवत होता. एका बाजूला एका ओळीत काही रूग्णांना खुर्चीवर बसवून मास्कने ऑक्सिजन देणे सुरू होते. तिथेच एका बाजूला असलेल्या ५-६ Casualty beds वर काही अत्यवस्थ रुग्णांना ठेवलेले होते. त्यातल्या तिघांना तातडीने हेलिकॉप्टरने खाली पाठवायची गरज होती. त्यासाठी हेलिकॉप्टरचे बुकिंग करणे, त्यांच्यासोबत जाण्यासाठी State Disaster Response Force (SDRF) आणि National Disaster Response Force (NDRF) च्या कर्मचाऱ्यांना बोलावून घेणे, हेलिपॅडपर्यंत पेशंटला घेऊन जाताना वाटेत ऑक्सिजन देत राहण्यासाठी भरलेला ऑक्सिजन सिलिंडर तयार ठेवणे, तो नेण्यासाठी पिठ्ठूवाल्याला सज्ज राहायला सांगणे अशी सर्व कामे करण्यात काही नर्सेस व हॉस्पिटलचे व्यवस्थापक, श्री. धनवीर व श्री. रोहन हे व्यग्र होते. हे सगळे होत असतानाच, पेशंटचे वैद्यकीय कागदपत्र तयार करणे, पेशंटचे आधार कार्ड, फोन नंबर घेणे, श्रीनगर (गढवाल) किंवा AIIMS ऋषिकेश यापैकी ज्या हॉस्पिटलमधे पेशंटला पाठवायचे आहे, तिथे संपर्क करून त्यांना पेशंटबाबत आगाऊ माहिती देणे, अशी अनेक कामे एकाचवेळी सुरू होती. ती सगळी लगबग बघून मी क्षणभर चक्रावून गेले.
पेशंटला हेलिपॅडपर्यंत न्यायला SDRF किंवा NDRF चे चार जवान येतात. पेशंटला उचलून स्ट्रेचरवर ठेवले जाते व पेशंटच्या नातेवाईकाच्या हातात पेशंटचे कागद आणि सलाईनची बाटली/infusion pump दिला जातो. पिठठूवाल्याच्या पाठीवर oxygen सिलिंडर ठेवतात. मग एक पेशंट, एक नातेवाईक, एक पिठठूवाला आणि चार जवान अशी सात जणांची वरात पेशंटला घेऊन हेलिपॅडकडे रवाना होते. अशावेळी पाऊस, बर्फ पडत असले तर पेशंटचे आणि नातेवाईकांचे मानसिक आणि शारीरिक हाल बघवत नाहीत. आपल्या पेशंटला हेलीकॉप्टरने खाली नेले तरी तिथल्या वैद्यकीय सेवा कशा असतील याची मनात धाकधूक, तिथे पैसे किती मोजावे लागतील याचा अंदाज नाही आणि इतकं करूनही आपलं माणूस जगेल का नाही याची शाश्वती नाही, अशा अनिश्चिततेच्या मनस्थितीत पेशंटचे नातेवाईक असतात. त्यांना धीर देऊन रवाना करण्याव्यतिरिक्त काहीच करता येत नाही.
माझ्या ड्यूटीच्या पहिल्याच सकाळी माझ्यासमोर तीन पेशंट्सना हेलिकॉप्टरने खाली पाठवले गेले. त्यातला एकजण High Altitude Pulmonary Oedema (HAPO म्हणजे फुफ्फुसात पाणी होऊन त्यावर सूज येणे) चा पेशंट होता. त्या अत्यवस्थ रुग्णावर माझ्यासमोरच उपचार झाले होते. त्याच्या श्वसनाचा वेग, हृदयाची गती आणि बाहेरून oxygen लावून का होईना, पण रक्तातील Oxygen Saturation या सर्वांमधे प्राथमिक उपचारांनंतर लक्षणीय सुधारणा झालेली मला दिसून आली होती. त्यामुळे त्याचा जीव नक्की वाचेल अशी आशा माझ्या मनामध्ये निर्माण झाली होती. पुढील उपचारासाठी त्याला ऋषिकेश येथील AIIMS मधे हलवणार होते. अशा रूग्णाच्या नातेवाईकांना तेथून निघण्यापूर्वीच्या काळात अभिप्राय लिहिण्याची विनंती करण्यात येते. HAPO झालेल्या त्या तरूण रूग्णाच्या भावाने सद्गदित होऊन साश्रूनयनांनी माझ्यासमोरच अभिप्राय लिहिला. "माझा भाऊ बरा होईल ना?" असे रडवेल्या आवाजात त्याने मला विचारले. मी त्याला धीर देऊन पाठवून दिले. घोड्यावरून पडून हात आणि पाय फ्रॅक्चर झालेल्या एका मध्यमवयीन बाईला प्लास्टर घालून ठेवलेले होते. ती वेदनेने कळवळत होती. एक वृद्ध रूग्ण हृदयरोगग्रस्त होता. त्या दोघांनाही यथावकाश खाली पाठवले गेले. केदारनाथच्या हॉस्पिटलमधे पोर्टेबल एक्सरेची देखील सोय आहे. दिल्ली येथील 'यथार्थ हॉस्पिटल' मधला अत्यंत उत्तम प्रकारे प्रशिक्षित झालेला स्टाफ केदारनाथच्या या हॉस्पिटलात सध्या कार्यरत आहे. सलाईन लावणे, पटापट एक्सरे काढणे, प्लॅस्टर घालणे अशी आणि इतरही अनेक कामे हे सर्व स्त्री व पुरूष नर्सेस अगदी सफाईने करतात.
हेलिकॉप्टरने खाली पाठवून द्यायच्या पेशंटची गडबड एकदाची संपली. त्यानंतर मी तिथले मुख्य वैद्यकीय अधिकारी, डॉ. सुशील यादव यांच्यापाशी गेले. माझे नाव, मेडिकल डिग्री, मी कुठून आले आहे इत्यादि ओळख सांगितली. मी इथे काय काम करायचे आहे? किती वाजल्यापासून ते किती वाजेपर्यंत कामावर यायचे आहे हे सगळे ते मला सांगतील अशी माझी अपेक्षा होती. पण तसे काहीच झाले नाही. त्यामुळे परत त्यांच्याजवळ जाऊन, "मी नेमकी काय-काय कामे करायची आहेत? किती ते किती माझी ड्युटी असेल?" असे विचारले. त्यावर त्यांनी,"मॅडम यहां कामही काम हैं. आपको जो करना है वो करिये. अगर बच्चे पेशंट्स आते हैं तो उनको आपही देखिये. माझ्यासारख्या सिनियर डॉक्टरला काम कसे सांगायचे, असे कदाचित त्यांना वाटले असेल, असे मी समजले. त्यानंतर फक्त पाच-दहा मिनिटे मी ओपीडीत काय काम चालू आहे, याचे निरीक्षण केले आणि तिथेच बसून येणारे सर्व पेशंट तपासायचे, असा निर्णय मी घेतला.
खरंतर माझी विश्रांती पूर्ण झाली नव्हती. थोडा वेळ काम करून वर येऊन झोपावे असे ठरवून मी खाली कामाला गेले होते. पण तिथल्या कामाचे प्रचंड लोड व मेडिकल स्टाफ यामधले व्यस्त प्रमाण आणि एकंदर सर्व गडबड बघता, मी विचार बदलला. पेशंट आल्यावर त्याला कोणी बघायचे, त्याने औषधे कुठून घ्यायची, पेशंटसाठी काय-काय औषधे आणि इतर उपचार उपलब्ध आहेत, हे सगळे तिथल्या नर्सेसकडून पटकन समजून घेतले आणि मी झटून कामाला लागले. हे सगळे होईपर्यंत १० वाजले होते. हरिद्वारपासून आमच्याबरोबरच चालत वरपर्यंत आलेले हर्ष आणि अजय हे दोन नवशिके डॉक्टर्स OPD त नुकतेच पोहोचले होते. ते दोघेही डॉ. सुशील यादव यांना जाऊन भेटले. हर्षची ड्यूटी देवळाजवळच्या बूथवर आणि अजयची ड्यूटी हॉस्पिटलच्याच ओपीडीत लावली गेली. इथे कसे काम करायचे याचा अंदाज तोपर्यंत मला आलेला होता. त्यामुळे मी अजयला पटापट काम समजावून दिले आणि आम्ही दोघेही भराभर पेशंट्स बघायला लागलो. दीड वाजेपर्यंत वेळ कसा गेला ते समजलेच नाही. त्यानंतर मी जेवायला वर गेले आणि जेवण झाल्यावर लगेच परत खाली येऊन संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत काम केले. आमच्याबरोबर हैदराबादहून डॉ. सुभाषिनी नावाच्या एक सर्जन बाई असणार आहेत असे आदल्या दिवशीच मला कळलेले होते. पण डॉ. सुभाषिनी त्या दिवशी कामाला आलीच नाही.
आमचे आदल्या दिवशी वापरलेले कपडे आनंदने वॉशिंग मशीनला लावून दुपारपर्यंत धुऊन घेतले होते. जेवण झाल्यावर तो खोलीतच थांबला होता. पण मला लक्षात आले की या हॉस्पिटलात अफाट काम आहे आणि ते अतिशय शिस्तबद्धतेने, तत्परतेने, व निःस्वार्थ भावनेने, 'निःशुल्क सेवा' याच स्वरूपात केले जात आहे. या सर्व कामाची व सोयी-सुविधांची माहिती सर्व भारतीयांसमोर यायला हवी असे मला प्रकर्षाने वाटले. ती माहिती, अत्यंत प्रभावी व्हिडिओज् बनवून लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम, आनंद निश्चितच करू शकेल, अशी माझी खात्री होती. स्वामी विवेकानंद हॉस्पिटलचे प्रमुख, डॉ. अनुज सिंघल यांना लगेच मेसेज पाठवून मी त्यांची परवानगी घेतली. त्याशिवाय, दुसरेही एक काम आनंदला करणे सहजी शक्य होते, ते म्हणजे OPD रजिस्टर लिहिणे. ते लिहिण्यासाठी एक नर्सिंग स्टाफ उगाचच अडकून राहिला होता. आनंदने ते काम तासभर केले. काहीतरी योगदान देता आल्यामुळे त्यालाही बरे वाटले. पण त्याला खूपच दमणूक व अंगदुखी जाणवत होती. त्यामुळे तासाभरानंतर तो खोलीत जाऊन झोपला.
साडेसात वाजता खोलीवर येऊन मी तासभर विश्रांती घेतली आणि मग आम्ही जेवायला गेलो. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात शिरा होता. शिरा साजूक तुपात केलेला होता आणि फार गोड नव्हता. त्यामुळे खायला बरा वाटला. दोन्हीवेळच्या जेवणात शिरा, बटाट्याची भाजी, भात, गरम फुलके व घट्ट डाळ होती.
जेवण झाल्यावर मात्र मी रात्री ९-९.१५ च्या सुमारास गाढ झोपी गेले.
[क्रमशः]
©डॉ. स्वाती बापट


Great👍
उत्तर द्याहटवा✌️
हटवाDr स्वाती बापट यांच्या 'मनी माझ्या' या ब्लॉगवरील 'केदारनाथ-भाग ६' हा लेख वाचताना मन आदराने आणि कृतज्ञतेने भरून येते. आदल्या दिवशीचा २० तासांचा अत्यंत खडतर प्रवास आणि केवळ साडेचार तासांची झोप... एवढा प्रचंड थकवा पाठीशी असतानाही, त्यांनी ज्या निस्सीम समर्पणाने आणि तन्मयतेने तिथल्या रुग्णालयात आपली वैद्यकीय सेवा दिली, ते खरोखरच अलौकिक आहे.
उत्तर द्याहटवा*आदल्या दिवशी १८-२० तास सलग चालून शरीर पूर्णपणे खचलेलं असताना आणि अवघ्या ४.५ तासांची झोप मिळालेली असतानाही, स्वातीताईंची निरीक्षणशक्ती कमालीची तल्लख होती.* रुग्णालयात पाऊल ठेवल्यापासून तिथल्या प्रत्येक रुग्णाची लक्षणे, त्यांची अवस्था आणि त्यांच्यावर तातडीने करायचे उपचार त्यांनी ज्या अचूकतेने टिपले आहेत, ते वाखाणण्याजोगे आहे. त्यांचे हे सूक्ष्म, तपशीलवार आणि वैद्यकीय बारकावे असलेले निरीक्षण वाचताना थोर कादंबरीकार आर्थर हॅली यांच्या 'फायनल डायग्नोसिस' (Final Diagnosis) या जगप्रसिद्ध कादंबरीची आठवण आल्याशिवाय राहत नाही. एका कसलेल्या आणि अनुभवी डॉक्टरची नजर कशी असते, हे त्यांनी या वर्णनातून दाखवून दिले आहे.
स्वतःचे शरीर वेदनेने ठणकत असतानाही, दुसऱ्या दिवशी सकाळी उठून त्यांनी मानवतेच्या सेवेसाठी स्वतःला झोकून दिले. यात आणखी एक कौतुकास्पद आणि थक्क करणारी गोष्ट म्हणजे, एवढ्या भयंकर शारीरिक त्रासानंतरही त्यांनी कोणतीही 'पेन किलर' (Painkiller - वेदनाशामक गोळी) घेतली नाही! हे वाचून मला त्यांच्या एका जुन्या संवादाची आठवण झाली, *जिथे या ग्रुपवर म्हणाल्या होत्या—"मी घरात औषधं, औषधापुरतीच ठेवते!"* आपली ही तत्त्वे त्यांनी केदारनाथसारख्या कठीण ठिकाणीही कृतीत आणून दाखवली, हे केवळ ग्रेट आहे!
खराब हवामान, ऑक्सिजनची कमतरता, वैयक्तिक थकवा आणि आदल्या दिवशी स्वतः रुग्ण बनण्याची वाटलेली भीती... या सर्व प्रतिकूल परिस्थितीवर (All odds) मात करत त्यांनी एका खऱ्या डॉक्टरच्या कर्तव्याला सर्वोच्च स्थान दिले. रुग्णांची गर्दी आणि उपलब्ध साधनसामग्रीचा तुटवडा असतानाही त्यांनी दिलेली सेवा त्यांच्या निस्सीम देशसेवेची आणि वैद्यकीय धर्माची साक्ष देते. त्यांच्या या समर्पित वृत्तीला माझा मनापासून सलाम!
*अशा या ध्येयवादी आणि वीरांगनेसारख्या मैत्रिणीचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. स्वातीताईंनी या वयात, सर्व अडचणींचा सामना करत मानवजातीची जी थोर सेवा केली आहे, तिचा गौरव व्हायलाच हवा. माझा असा विचार आहे की, आपण सर्वांनी मिळून एक छोटासा स्नेहमेळावा (Get-together) आयोजित करावा आणि त्यात स्वातीताईंच्या या अतुलनीय सेवेचा, जिद्दीचा आणि ध्येयाचा एक छोटीशी भेटवस्तू (Token of gift) देऊन यथोचित गौरव करावा. त्यांच्यासारख्या व्यक्तीचा सन्मान करणे हे आपले कर्तव्यच आहे.*
स्वातीताई, तुमची ही लेखणी आणि तुमचे हे सेवाव्रत आम्हा सर्वांना नेहमीच प्रेरणा देत राहील!
सर धन्यवाद. मला कुठलीही भेटवस्तू नको🙏
उत्तर द्याहटवा