शनिवार, १३ जून, २०२६

केदारनाथ-भाग-५

आनंदची आणि माझी ताटातूट झाल्यानंतर या प्रचंड गर्दीमध्ये आपण किती एकटे आहोत याची मला जाणीव झाली. माझ्याकडे फोन नसल्याने आनंदशी संपर्क कसा साधायचा हा प्रश्नच होता. जवळ पाणी नव्हते, आणि बाटली विकत घ्यायला पैसेही नव्हते.  त्यामुळे तहानेने जीव व्याकुळ झालेला होता. तरीही त्या अवस्थेत मी चालत पुढे निघाले. हळूहळू चढत जात असताना, प्रत्येक वळणावर वाटेत थांबून, एखाद्या बाईला विनंती करून, मी तिच्या फोनवरून कधी आनंदच्या तर कधी माझ्या स्वतःच्या फोनवर फोन करून बघत होते. फोनवर रिंग जात होती पण पलीकडून फोन उचलला जात नव्हता. त्या परिस्थितीतही एक मजेशीर विचार मनात आला. 'केदारनाथच्या वाटेवर बायकोपासून कायमची सुटका', असे म्हणत आनंद खुश झाला असावा! 

अनेक वेळा फोन करून झाल्यावरही आनंदने फोन उचलला नाही. त्यामुळे आता मला थोडी काळजीच वाटायला लागली होती. असेच एका तरूण मुलीचा फोन मी वापरला आणि परत केला. त्यानंतर त्या मुलीने मला सुनावले, "आँटी, आप तो पढी-लिखी लगती हैं. ऐसी जगह भीडभाडमें आते है तो कमसेकम अपना फोन, थोडे पैसे और अपनी पानीकी बॉटल तो अपने पास रखना चाहिये ना? इतनी समझदारी तो होनी चाहिये." हे तिचे बोलणे ऐकून मला मेल्याहून मेल्यासारखे झाले. कारण या तिन्ही गोष्टी माझ्याकडे नव्हत्या. पण ते हिला कसे कळले? असेही वाटून गेले. कसनुसा चेहरा करून, "चुकलंच गं बाई माझं" असं म्हणत मी पुढे चालू लागले. शेवटी मी बरीच पुढे गेल्यावर आनंद कुठूनसा मला शोधत, माझ्या मागून आला आणि मी हुश्श म्हणाले. आनंदला बघून मला बरे वाटले असले तरीही मी त्याच्यावर तोंडसुख घ्यायची संधी चुकवली नाही. त्यामुळे अर्थातच तिथे आमचे दोघांचे चांगलेच वाजले, हे सांगायला नकोच!
आम्ही तसेच चालत पुढे निघालो आणि जंगलचट्टीपर्यंत पोहोचलो. अजय व हर्ष कुठेतरी गायबच होते.  त्यामुळे आम्हाला आमच्या पाण्याच्या बाटल्या अजूनही उपलब्ध नव्हत्या. तहानेने व्याकूळ झाल्यामुळे आणि आमच्या भांडणामुळे तापलेले माझे डोके थंड करण्यासाठी, जंगलचट्टीला एके ठिकाणी थांबून मी लिंबू सरबत प्यायले.  या संपूर्ण रस्त्यावर सगळ्या गोष्टी कमालीच्या महाग विकतात. नळाच्या पाण्यातले लिंबू सरबत ५० रूपयांना होते. तर तेच बिसलेरीच्या पाण्यात केले की १०० रूपयाला होते. आनंदला माझ्या ग्लासमधले  सरबत प्यायचा मी  आग्रह केला, पण तो चिडलेला असल्याने त्याने सरबत प्यायला नकार दिला. माझे सरबत पिऊन होईपर्यंत हर्ष आणि अजय मागून कुठूनतरी उगवले. त्या तरूण मुलांना आमच्याबरोबर हळूहळू चालणे म्हणजे एकप्रकारे शिक्षाच वाटत असावी. त्यामुळे ते मधे-मधे थांबत, फोटो-बिटो काढत, खात-पीत असे निवांत येत होते. आमच्या भांडणानंतर मात्र पुढे अगदी शेवटपर्यंत आनंद माझ्याबरोबर चालत राहिला. आम्ही चढत होतो, मला खूप दम लागत होता, चालताना छातीत खूप धडधडत होते. स्मार्ट वॉचमधे कधीकधी हार्ट रेट मिनिटाला १६० च्या वर जात होता. असे झाले की मी ठिकठिकाणी थांबत होते. आनंद सहजी चालत होता आणि हर्ष व अजय तर लीलया चालत होते. 

रामबाराचा पूल पार करायला दुपारचे पाच वाजून गेले होते. आता जरा उन्हाची तीव्रता कमी झाली होती. अजून बरेच अंतर चालायचे होते. भीमबलीला आम्ही सहाच्या नंतरच  पोहोचलो असू. रस्ता संपायची काहीही चिन्हे दिसत नव्हती. वाटेवरच्या अंतर दाखवणाऱ्या पाट्या अतिशय विचित्र आहेत. समजा, एके ठिकाणी 'केदारनाथ १० किलोमीटर' असे लिहिलेली पाटी असेल तर बरेच चालून गेल्यानंतर पुढची पाटी, 'केदारनाथ ११ किलोमीटर' अशी दिसायची. त्यामुळे आपल्याला अजून किती चालायचे आहे, याबाबतची अनिश्चितता खूप त्रासदायक वाटत होती. सहा वाजेपर्यंत आकाशामधे सतत हेलिकॉप्टरची ये-जा चालू होती. हेलिकॉप्टरने न येता आपण चढून जायचे कुठून ठरवले असे मला झाले होते. सहा वाजल्यानंतर हेलिकॉप्टर्सचे आवाजही बंद झाले.

सूर्य मावळल्यानंतर हळूहळू अंधार पडायला लागला. त्यानंतर मात्र माझा धीर सुटत चालला होता. मला अतोनात दमणूक जाणवत होती. आपण हॉस्पिटलमध्ये सेवा द्यायला चाललो आहोत, आणि या ट्रेकिंगच्या दमणुकीमुळे आपण काम तर करू शकणार नाहीच आणि कदाचित आपलीच सेवा तिथल्या लोकांना करत बसावी लागेल असे सतत वाटत होते. अनेकदा घोड्यावर, पिठ्ठूवर किंवा डोलीमधून जायची इच्छा होत होती. वाटेत त्यापैकी अनेक लोकांनी आम्हाला थांबवून, "घोडा लेना है क्या? उपर तक पिठठू में चलना है क्या? हम मंदिर तक छोड दें क्या?" असे विचारले की, आपण घोड्यावर बसून किंवा आरामात डोली किंवा पिठ्ठूमधे बसून जावे,  असा विचार मनांत यायचा. पण अशी चौकशी मी सुरु केली की प्रत्येक वेळेस आनंद मला धीर देत होता, "तू चालत जाण्याचा निर्धार केला आहेस ना? मग आता धीर सोडू नकोस. आपण हळूहळू चालू, पण चालतच जाऊ या" ते शब्द ऐकून मी पुन्हा धीर एकवटून चालू लागायचे. मी मनाशी ठरवत होते की सलग शंभर पावले मोजून होईपर्यंत थांबायचे नाही. पण जेमतेम  चाळीस-पन्नास पावले झाली की मला थांबावे लागायचे. 

भीमबली ते लिंचोली हा प्रवास खूपच कष्टाचा झाला. तिथले खडे रस्ते बघून अनेक ठिकाणी पोटात गोळा उठत होता. दिवसभरात कुठेही फारसे काहीही खाल्लेले नव्हते. त्यामुळे भूकही लागली होती. पण एकाही ठिकाणी खाण्यास योग्य, स्वच्छ असे अन्न दिसत नव्हते. त्यामुळे मग चहा आणि एखादे नमकीनचे पाकीट, असे खात-पीत आम्ही निघालो होतो. वाटेत पाणी आणि स्वच्छतागृहाची नीटशी सोय नाही. पाण्याची १० रूपयांची बाटली सगळीकडे सर्रास १०० रूपयांना विकत होते. तरी आम्ही ती विकत घेत होतो. कितीतरी वेळा बाटली संपली आणि जवळपास दुकानही नसले तर नाईलाजानेच का होईना,पण रस्त्याच्या कडेला असणाऱ्या नळाचे पाणीदेखील आम्ही पीत होतो. साधारण सात वाजेपर्यंत आम्ही खूप दमून गेलो. शेवटी एका पिठ्ठूवाल्याला पकडून त्याच्याजवळ आमच्या पाठीवरचे बॅकपॅक्स काढून दिले आणि ते सामान वरपर्यंत नेण्यासाठी १५०० रूपयांची बोली झाली.

पाठीवरचे सामान कमी झाले तरीही माझा चालण्याचा वेग काही वाढत नव्हता. तसेच पाय ओढत-ओढत आणि हृदयाची धडधड ऐकत मी चढत होते. आम्हाला पोहोचायला रात्रीचे १० वाजून जातील असे वाटायला लागले. त्यामुळे आम्ही त्या पिठ्ठूवाल्याला फोन करून, आमचे सामान केदारनाथच्या स्वामी विवेकानंद हॉस्पिटलमधे ठेवायला सांगितले. हॉस्पिटलमधील श्री. धनवीर या व्यवस्थापकांना फोन करून, "पिठ्ठूवाल्याकडून सामान ठेवून घेऊन त्याला १५०० रुपये द्या, आम्ही पोचल्यावर तुमचे पैसे तुम्हाला देतो." असे सांगितले. रस्त्यावरील सर्वच हॉटेल्समधील अस्वच्छता बघून वाटेत काहीही खाण्याची इच्छाच होत नव्हती. त्यामुळे, मी श्री. धनवीर यांना विनंती केली होती की, आम्हा चौघांसाठी रात्री पोहोचल्यानंतर काहीतरी खायला-प्यायला ठेवा. पण, "रात्री दहा वाजल्यानंतर स्वयंपाकघर बंद होते. त्यामुळे इथे काहीही खायला मिळू शकणार नाही, वाटेतच काहीतरी खाऊन या." असे उत्तर मिळाले. 

लिंचोलीच्या पुढील रस्ता तर अतिशय चढणीचा होता. दर १५-२० पावलांना दम घ्यायला थांबावे लागत होते. एकच सुख होते की रात्र झालेली असल्याने हवा थंड झालेली होती आणि आमचे नशीब चांगले असल्याने पाऊस पडत नव्हता. हवा थंड झाल्यामुळे मी आणि आनंदने आपापली गरम जॅकेट अंगावर चढवली होती. वाटेतल्या ओढ्यांमधून ठिकठिकाणी पाण्याचे बर्फ झालेले दिसत होते. काही ठिकाणी ते रस्त्यावरही वाहून आलेले होते. आता अंधारून आल्यामुळे खालून वर येणाऱ्या प्रवाशांचा ओघ जरा कमी झाला होता. त्यामुळे मागून येणारी खेचरांची आणि डोलीवाल्यांची वर्दळही जराशी कमी झाली होती. पण आता केदारनाथहून खाली उतरणाऱ्या खेचरांचा फार त्रास होत होता. अंगावर स्वारी नसलेली खेचरे उतरणीवरून मोकाट उधळत खाली येत होती. दर पावलागणिक आनंद त्या खेचरांच्या मालकांना ओरडत होता, तसेच त्याच्या हातातील काठी उगारून खेचरं आमच्यापासून दूर हाकत होता. 

चढताना अधूनमधून अनेक शॉर्टकट्स दिसत होते. काही सहप्रवासी तरुण-तरुणी ते शॉर्टकट्स  घेतही होते. आमच्याबरोबर हर्ष आणि अजय चालत होतेच. ते दोघे गेल्याच वर्षी केदारनाथला चालत येऊन गेलेले असल्याने, त्यांना बरेच शॉर्टकट्स माहिती होते. एखादा खड्या चढाचा शॉर्टकट घेतला की, कमी चढणीचा पण बऱ्याच लांब पल्ल्याचा वळणा-वळणांचा रस्ता वाचायचा. पण शॉर्टकट घेणे म्हणजे खडी चढण चढण्याचा त्रास होताच. त्यामुळे काही शॉर्टकट्स आम्ही घेत होतो आणि काही सोडत होतो. प्रत्येक उंचवट्यावर आणि वळणावर माझा धीर सुटत होता. हर्ष आणि अजय मला सतत सांगत होते, "मॅडम, आता ही चढण चढून गेलो की सगळा सपाटच रस्ता आहे", किंवा "आता आपण अगदी जवळ आलो आहोत. आता उतरणीलाच लागणार आहोत" असे सांगत-सांगत मला धीर देणे चालू होते. आनंदही तीच भाषा बोलत होता. मला धीर देण्यासाठी तिघेही संगनमताने मला फसवत आहेत असे मला जाणवत राहिले. 

चालता चालता रात्रीचे बारा वाजून गेले, तरीही केदारनाथच्या बेसकॅम्पजवळही आम्ही पोहोचलो नव्हतो. चन्द्रप्रकाशात लोकांची ये-जा चालूच होती. आता आमच्याबरोबर चढणारे आणि समोरून उतरत येणारे यात्रेकरू विरळ होत चालले होते. संध्याकाळ झाल्यानंतरच अनेकांनी अर्ध्या वाटेत खेचर, डोली अथवा पिठठू करून केदारनाथ गाठायचा निर्णय घेतला होता. काहीजण मधेच कुठेतरी तंबूमध्ये मुक्कामाला थांबले असावेत. केदारनाथाचे दर्शन घेऊन येणारे काही यात्रेकरू रात्रीच खाली उतरून परतीच्या वाटेला लागले होते. त्यांना मी मोठ्या आशेने विचारत होते, "आता अजून किती अंतर राहिले आहे हो?" कोणी सांगायचे, "आता अगदी जवळ आहे", तर कोणी म्हणत होते "अजून खूप लांब आहे". त्यामुळे सगळीच माहिती मला फसवी वाटत होती. 

शेवटी रात्री साडेबाराच्या सुमारास आम्ही 'घोडापडाव' येथे, म्हणजे जिथपर्यंत घोड्यांना किंवा खेचरांना जायची परवानगी आहे, तिथपर्यंत पोहोचलो. "आता काय, इथून हॉस्पिटल जेमतेम २०० ते ३०० मीटरवर आहे." अशी खात्रीशीर माहिती हर्ष आणि अजयने दिली. त्या दोघा तरुण मुलांना साहजिकच खूप भूक लागलेली होती. त्यामुळे, ते दोघे एका  हॉटेलमध्ये जेवायला थांबले. आम्हा दोघांना मात्र आता काही खाण्याची इच्छा उरली नव्हती. त्यामुळे मी आणि आनंद तसेच पुढे चालत निघालो. हळूहळू हॉस्पिटलची दुमजली इमारत दृष्टीपथात आली. रात्री १ च्या सुमारास आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. रात्रपाळीवरील फार्मसिस्टने आमचे स्वागत केले व आमचे बॅकपॅक्स आम्हाला दिले. तिथल्या कर्मचाऱ्याने आम्हाला  वरच्या मजल्यावरील  आमची खोली उघडून दिली. मोठी व स्वच्छ खोली, आतल्याआत अटॅच्ड बाथरूम, गरम पाण्याचा गीझर, खोली उबदार ठेवण्यासाठी इलेक्ट्रिक वॉर्मर, छानसे पलंग आणि प्रत्येकी दोन-दोन रजया बघून आम्ही सुखावलो. खोलीमधे स्टीलचा रिकामा जग आणि एक स्टीलचा ग्लास होता. आम्हा दोघांना हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्याने पायात घालायला स्लीपर्स आणून दिल्या. एका फ्लास्कमधे गरम पाणीही आणून दिले.   

आम्ही खोलीतील वॉर्मर सुरु केला आणि अंघोळीचे पाणी गरम करण्यासाठी गीझरही चालू केला. मोठ्या उत्साहाने मी अगदी छान गरम पाण्याने डोक्यावरून अंघोळ केली. पण अंग पुसायला पंचाच नाही हे नंतर लक्षात आले. जी एक पातळसर ओढणी ओली करून डोक्यावर घेऊन दिवसभर उन्हामधे मी चालले होते, त्याच ओढणीने जेमतेम अंग आणि केस कोरडे केले. बाथरूममधून कुडकुडतच बाहेर आले आणि रजईत शिरून, कदाचित काही क्षणातच गाढ झोपी गेले. 

[क्रमशः]
©डॉ. स्वाती बापट.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा