मंगळवार, १६ जून, २०२६

केदारनाथ-भाग-८

काल रात्री छान झोप लागली. पहाटे साडेपाचला जाग आली. पण तसेच लोळत पडावेसे वाटले. NEET परीक्षेच्या घोटाळ्याबाबतचे व्हिडिओ ऐकत पडले होते. एकंदर  शिक्षणाचा बाजार पाहून मनातल्या मनात चडफडत होते. "मोटेगावकर आणि पेपर फोडणाऱ्या टोळीने २२ लाख मुलांचे नुकसान केले", असे सतत बोलले जात होते. पण माझ्या मते, या पेपरफुटीमुळे फक्त ते पेपर विकत घेणाऱ्या धनदांडग्यांच्या मुलांचे नुकसान झाले आहे. भविष्याचा विचार करता, इतर विद्यार्थ्यांचे भलेच झाले आहे असे मला वाटले.
माझ्या पाठोपाठ आनंद उठला. तो जरा कळवळतच उठला होता. "मला दम लागल्यासारखे वाटते आहे, रात्रभर झोप नाही" असं तो म्हणाल्याने मी घाबरले. लगेच त्याला खाली ओपीडीत घेऊन गेले व त्याचे ऑक्सिजन saturation तपासले. ते नॉर्मल होते. त्याचे टेंपरेचर बघितले, तेही नॉर्मल होते. "उगाच घाबरू नकोस. तुला काहीही झालेले नाही" असे मी आनंदला सांगून त्याला खोलीत पाठवले. ओपीडीमध्ये खूप पेशंट्स थांबलेले होते आणि रात्रीचा स्टाफही खूपच थकलेला दिसला. म्हणून मग मी तिथेच थांबून साधारण तासभर पेशंट्स तपासले. 

रात्रपाळीच्या डॉ. शोभित सिंग यांच्याशी अधेमधे गप्पा झाल्या. डॉ. शोभित याने MD (PSM) केलेले आहे. त्यानंतर सध्या तो DM (High Altitude medicine) हा कोर्स AIIMS ऋषिकेश इथे करत आहे. तो MD (PSM) करत असताना, पेशंट्स तपासणे, वॉर्डमधे काम करणे ही कामे त्याला करून माहितीच नव्हते. त्यामुळे क्लिनिकल कामात तो जरा चाचपडतोय असे मला जाणवले. त्याने मला विचारले, "मॅडम, तुम्हाला intubation करता येते का? मला शिकवाल का?" मी म्हणाले, "मला करता येते आणि मी तुला शिकवूही शकेन. मी स्वतः गेल्या कित्येक वर्षांमध्ये intubation केलेले नाही. पण वेळ पडली तर मी ते निश्चित करू शकते याची मला खात्री आहे."  तसे इथे नॉयडा येथील 'यथार्थ हॉस्पिटल' चा, कामात अतिशय तत्पर आणि तरबेज असलेला, नर्सिंग स्टाफ असल्याने, आम्हा सगळ्यांचेच काम सुकर झाले होते.

मी साधारण साडेसात वाजल्यानंतर लगेच ओपीडीतून वर जायला निघाले. तेवढ्यात मला दिसले की बाहेर आमचे सामान खेचरावरून वाहून पोचलेले होते. कालच मी सामान वाहून आणणाऱ्या खेचरवाल्यांना विनंती केलेली होती की, "उद्या कुठल्याही परिस्थितीत आम्हा दोघाचे सामान आणाच." ठराविक दोन खेचरवाले रोज हॉस्पिटलच्या सामानाची वर-खाली ने-आण करतात. रोज रिकामे झालेले Oxygen सिलिंडर खाली न्यायचे असतात. खालून औषधे, फळे-भाज्या आणि भरलेले सिलिंडर वर आणायचे असतात. रोज रात्री चालत ते वर येतात आणि दिवसा खाली उतरतात. मी नाश्त्याला गेले तेंव्हा, ते सामान वाहून नेणारे खेचरवालेही एका टेबलावर नाश्ता करत बसलेले मला दिसले. पुढेही ते अनेकवेळा नाश्त्याला दिसायचे. 

आज आमचे सामान आलेले पाहून मला आनंद झाला. मी चटकन आमच्या दोन्ही बॅग्ज उचलून वर आणल्या. आंघोळीनंतर अंग पुसायला पंचा, बदलायला चांगले कपडे, केस धुवायला शांपू, अंगाला लावायला मॉयश्चरायझर मिळाल्यामुळे अगदी चैन झाली. नाष्ट्याला वांग्याचे भरीत आणि गरम फुलके होते. भरीत छान चमचमीत होते. भूकही लागली होतीच. त्यामुळे दोन फुलके आणि भरीत चापले. आजचा चहाही चांगला कडक होता. पण नेहमीपेक्षाही खूप जास्त गोड होता. भर थंडीत गरमागरम चहा प्यायला चांगले वाटत होते. 

आज सतत वीज जात-येत होती. आमच्या टेबलजवळ एक इलेक्ट्रिक वॉर्मर ठेवलेला होता. आम्हाला बसायला दिलेल्या खुर्चीवर इलेक्ट्रिक पॅड्स लावलेली होती. विजेवर चालणारी ती पॅड्स, पाठीला आणि ढुंगणाला छान शेक देण्याकरता ठेवलेली होती. एरवी मी गेल्यागेल्या ती पॅड्स बंद करून ठेवायचे किंवा काढूनच ठेवायचे. आज मात्र बाहेर बर्फ पडायला सुरुवात झाली होती. गारवा चांगलाच जाणवत होता. अंग भिजून, थंडीने कुडकुडत, थरथरत असे अनेक म्हातारे-कोतारे येऊ लागले. त्यांच्याजवळ वॉर्मर लावून त्यांना बसवणे, कपडे बदलायला लावणे, प्रसंगी सलाईन देणे, अशी कामे चालू झाली होती. 

अत्यंत कुपोषित, गरीब आणि खेड्यापाड्यातून आलेल्या त्या भाविकांची हिंमत वाखाणण्याजोगी असते. भिजून थंडीने कुडकुडणारे ते पेशन्टस बघून मी माझ्या खुर्चीजवळचा वॉर्मर बाहेर काढून ठेवला व त्या म्हाताऱ्या माणसांना त्याचा जरा शेक घ्यायला सांगितले. केवळ माणुसकीला धरून जे मला करावेसे वाटले तेवढेच काम मी केले होते. पण त्या रुग्णांना मात्र त्यामुळे खूप दिलासा मिळाला. एक-दोघे तर चक्क माझ्या पायाच पडायला लागले. आजच्या दिवसभरात आठ ते दहा बालरूग्णही मी बघितले. त्यातली काही मुले तशी सुखवस्तू घरातली असली तरी कुपोषितच दिसत होती. त्यांना ताप, चक्कर येणे, अशी लक्षणे होती. इतक्या थंडीत आणि मरणप्राय गर्दीत लहान मुलांचे आणि म्हाताऱ्यांचे खूप हाल होतात. कित्येकजण तंबूमध्ये किंवा पिठठूमध्ये बसलेल्या अवस्थेतच बेशुद्धावस्थेत गेलेले आढळतात. मग त्यांना गडबडीने हॉस्पिटलमध्ये आणले जाते. त्यांना वॉर्मर लावणे, oxygen देणे, सलाईन व इंजेक्शन देणे असे उपचार करावे लागतात. दिवसातून असे ३-४ पेशंटस तरी येतच होते. 

डायबेटीस आणि ब्लडप्रेशरचे रुग्णही बरेच होते. त्यातले बरेच लोक आपापली नेहमीची औषधेच बरोबर घेऊन आलेले नव्हते. कुठली औषधे चालू आहेत तेही त्यांना नीटसे सांगता येत नव्हते. अनेक मधुमेहींनी आपल्या मनानेच गोळ्या बंद केलेल्या आहेत असे दिसले. त्यातल्या तीन बायकांची शुगर तर ६०० च्या आसपास निघाली. मग त्यांना इन्सुलिन चे इंजेक्शन देऊन त्यांची शुगर कमी करावी लागली. काहीजण म्हणाले की ते मधुमेहासाठी 'इंग्लिश औषधे' म्हणजे Allopathy ची औषधे खात नाहीत आणि खाणार नाहीत. अनेक पेशंट्स काय वाट्टेल ती औषधे, अगदी Antibiotics सुद्धा आपापल्या मनानेच घेत असतात हे कळून आले. माझ्या असेही लक्षात आले की अनेक उच्चशिक्षित लोकदेखील स्वतःला वाटेल तेंव्हा, आणि वाटेल ती डायबेटीस व हायपरटेंशनची औषधे अगदी बिनदिक्कत घेत असतात. डॉक्टर म्हणून आपण औषधे लिहून देताना किती खोलात जाऊन विचार करतो आणि पेशंट्स मात्र आपापल्या मनाने काय-काय महाभयंकर प्रकार करू शकतात, याची प्रचिती मला आली. 

आज एका वयस्कर माणसाला देवळाजवळ उभे असताना दम लागू लागला होता. इथल्या सरकारी हॉस्पिटलच्या कॅम्पमध्ये त्याला सांगितले गेले होते की, "आता तुम्ही दर्शन न घेताच परत जा". इथपर्यंत २२ किलोमीटर चालत चढून आल्यानंतर दर्शन न घेताच परत जाण्याची त्याची अजिबात तयारी नव्हती. मध्यप्रदेशातील एका खेड्यातून आलेल्या त्या सडपातळ पण कणखर अशा सत्तरीच्या म्हाताऱ्याला मी तपासले. त्याचे बीपी, ऑक्सिजन saturation उत्तम आहे, हे सांगून धीर दिला आणि "जरा हिंमत करा, घट्ट राहा आणि केदारनाथाचे दर्शन घ्या" असे त्याला सांगितले. तो माणूस एकटाच आलेला होता व त्याने इतर सर्व म्हणजे ११ ज्योतिर्लिंगांचे दर्शन केलेले होते. मोठ्या आशेने तो बाराव्या ज्योतिर्लिंगांचे दर्शन घ्यायला आला होता. दर्शन घेता येणार नाही, या कल्पनेने तो अगदी रडवेला झाला होता. मी त्याला दर्शन घेण्याची परवानगी दिल्याने त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. मला काही कळायच्या आतच त्याने माझे पाय धरले आणि म्हणाला, "डॉक्टर, तुमच्यामुळे मला आज देवाचे दर्शन होणार आहे!" मी लाजून चटकन पाय मागे घेतले. संध्याकाळी दर्शन घेऊन परत जाताना तो आवर्जून थांबून माझे आभार मानून गेला. 

असेच एक सात-आठ जणांचे कुटुंब आले होते. त्यातला ऐंशी वर्षांच्या जवळपास आलेला एक वृद्ध गौरीकुंडापासून २२ कि.मी. चालत वर आला होता. पण केदारनाथला पोहोचल्यावर त्याला दम लागू लागला होता. आम्ही त्याला oxygen दिला. त्याची oxygen level सुधारल्यावर त्या वृद्धाचा मुलगा त्याला घेऊन दर्शनासाठी गेला. पण थोड्याच वेळात त्या वृध्दाला परत धाप लागली. म्हणून त्याचा मुलगा त्याला हॉस्पिटलमध्ये परत घेऊन आला. त्या माणसाला पुन्हा oxygen द्यावा लागला. "मॅडम, मेरे पिताजीको मै आपके पास छोडके जाऊं क्या? हम दर्शन करके जल्दही वापस आते है". त्यांची अगतिकता बघून मला नाही म्हणवेना. त्या माणसाचे वय आणि वैद्यकीय परिस्थिती बघून त्यांना एकट्यालाच वेटिंग रूममध्ये ठेऊन जा, असेही सांगायला जीभ रेटेना. बराच वेळ मी त्या आजोबांना आमच्याजवळ बसवून ठेवले. थोड्या वेळाने एक बेड रिकामा झाला. त्यावर त्या आजोबाना पडून राहायला सांगितले.  चार-पाच  तासांनी त्यांचा मुलगा दर्शन घेऊन परत आला. त्यानेही येऊन आमचे आभार मानले. 

आज डॉ. सुभाषिनी सकाळी कामाला आली होती. पण डॉ. अजय आणि डॉ. हर्षला घेऊन ती देवळामध्ये दर्शन करायला निघून गेली. त्यानंतर दुपारपर्यंत त्यांचा पत्ता नव्हता. त्यामुळे आजही बराच काळ मी एकटीच डॉक्टर कामावर होते. आज नेहमीप्रमाणे संध्याकाळी ७.३० वाजता काम संपवून वर आले. आनंदला जरा ताप आलेला वाटत होता. म्हणून परत खाली जाऊन थर्मामिटर आणला. ताप नव्हता, तरी फार्मसीमधून क्रोसिनच्या गोळ्या घेऊन आले. आठ वाजता आम्ही दोघेही जेवायला गेलो. बटाटा व भोपळी मिरची आणि सोयाचे मुटके घातलेली भाजी, भात, दाल, आणि गरम फुलके, असे छान जेवण होते. रोज दुपारी जेवत नसल्याने, रात्रीपर्यंत चांगली भूक लागलेली असते. त्यामुळे रात्रीचे जेवण तसेही रुचकर लागते. इथे आलेली अनेक नर्स मुले घरून लोणी किंवा तूप घेऊन आलेली होती. रोजच ती मुले फुलक्यांना लोणी किंवा तूप चोपडून खातात. आम्हालाही लोणी-तूप घ्यायचा आग्रह करतात. पण वजनकाट्याची आठवण आम्हाला वरचेवर येत असल्याने आम्ही ते कधीच घेतले नाही. जेवण झाल्यावर आपापले ताट घासून ठेवायचे, असा इथे नियम आहे. ही मुले मात्र एकाच ताटात दोघे किंवा तिघे जेवतात व आळीपाळीने ते ताट धुतात! थंडीत ओले थोडे काम वाचवायचा त्यांचा हेतू असावा. अगदी वेगळ्याच वातावरणात आणि वेगवेगळे अनुभव घेत इथे काम करायला मला खूपच मजा येऊ लागली होती.

आज आनंद मात्र खूपच दमलेला दिसत होता. त्याने दिवसभर विश्रांती घेतली होती. पण आता त्याचे अंगही गरम लागत होते. म्हणून मी पुन्हा खाली जाऊन थर्मामिटर आणि pulse oxymeter आणला. त्याचे टेंपरेचर ९९ च्या आसपासच होते पण मुख्य म्हणजे त्याचे ऑक्सिजन saturation उत्तम होते. त्याचा घसाही मी तपासला. किंचितसा लाल होता. बाकी सर्व नॉर्मल होते. पण एकूण त्याची प्रकृती जरा नरम झाल्याचे कळत होते. म्हणून रात्री त्याला क्रोसिनची गोळी दिली. सगळे होईपर्यंत झोपायला १० वाजून गेले होते.

[क्रमशः]

©डॉ.  स्वाती बापट.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा