मंगळवार, ६ सप्टेंबर, २०२२

१०. मलबारची सफर- 'बेंगला कुटुंबीय' आणि 'मुळाप्पिलंगड बीच'

आम्ही डॉ. हर्मन गुंडर्ट यांच्या बंगल्यामधून अतिशय भारावलेल्या अवस्थेत बाहेर पडलो. त्यावेळी सहा वाजून गेले होते. आता आम्ही 'मुळाप्पिलंगड बीच' वर जाणार होतो. पण आमची गाडी बीचकडे वळायच्या ऐवजी विरुद्ध दिशेच्या एका अरुंद बोळामध्ये वळून एका दुमजली घराजवळ थांबली. आमचा गाईड उर्फ 'स्टोरी टेलर' मोहंमद शिहाद गाडीतून उतरला आणि त्या घरात शिरला. त्याच्या मागे आमच्यापैकी काहीजण गेले. 'आपण आता इथे कशासाठी थांबलो आहोत? ही काही विशेष प्रेक्षणीय जागा आहे का?' असे प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण झाले. तिथे नेमके काय आहे, हे बघून यावे म्हणून मी पण त्या घरात गेले. तिथले सुंदर दृश्य बघून आणि शिहाद सांगत असलेली माहिती कानावर पडताच मी त्वरित बाहेर आले, आणि दादांना व आळसावलेल्या इतर सर्व सहप्रवाशांना बरोबर घेऊन परत त्या घरामध्ये गेले.   

२६५ वर्षांपूर्वी बांधलेले हे घर, श्री. इशाक बेंगला व त्यांच्या कुटुंबियांचे राहते घर होते. श्री. इशाक, हे शिहादच्या ओळखीचे असल्याने, शिहादने त्यांचे घर आम्हाला दाखवण्याची विनंती त्यांना केली होती. आमच्या सुदैवाने ती विंनती श्री. इशाक यांनी मान्य केली होती.

या दुमजली घराच्या खालच्या मजल्यावर मोठा व्हरांडा होता. तिथे आरामखुर्च्या आणि मोठे बाकी ठवलेले होते. मुख्य दरवाज्यातून आत गेल्यावर एक बैठकीची खोली होती. त्या खोलीला असलेल्या दोन मोठ्या खिडक्यांची झापडे आतल्या बाजूला उघडली की त्या झापडांचेच बाक तयार होत होते. मुख्य दरवाज्याच्या अगदी समोरच्या भिंतीमध्ये स्वयंपाकघरात जाण्यासाठी एक दार होते. त्या स्वयंपाकघरामध्ये आणि आतल्या खोल्यांमध्ये बेंगला कुटुंबातील स्त्रियांचा वावर असल्याने आम्हाला अर्थातच तिकडे जाता आले नाही. बैठकीच्या खोलीच्या उजव्या बाजूला एक नक्षीदार जिना होता. जिना चढून वर गेल्यावर उजव्या हाताला एक प्रशस्त दिवाणखाना होता. त्यातील भल्यामोठ्या खिडक्यांच्या तावदानांना रंगीबेरंगी काचा लावलेल्या होत्या.  


दिवाणखान्याच्या छताला मोठमोठाले हांडे आणि झुंबरे टांगलेली होती. तिथे अनेक मूल्यवान अशा शोभेच्या पुरातन वस्तू होत्या. एक मोठा ग्रामोफोन होता, खटका दाबल्यावर एकच सिगरेट बाहेर येईल अशी व्यवस्था असलेली सिगारेट केस होती, अनेक सुंदर दिवे आणि फुलदाण्या होत्या, एक नाजूकसा हुक्का होता, एक खूप जुना रेडिओ होता. श्री. इशाक हे पंच्याहत्तरीचे गृहस्थ, त्यांच्या तारुण्यात उत्तम क्रिकेटपटू आणि फ़ुटबॉलपटू होते. त्यांनी जिकंलेल्या काही ढाली आणि चषक तिथे मांडून ठेवलेले होते. दिवाणखान्यामध्ये एक मोठे गोलाकार टेबल आणि एक सुंदरसा झोपाळा होता. 


दिवाणखान्यातील एका कोपऱ्यामध्ये असलेले  एक कपाट उघडून, श्री. इशाक यांनी आम्हाला त्यातली एक गंमत दाखवली. त्या कपाटातच्या वरच्या फळीच्या वर, एक पिळाचा दांडा होता. तो  दांडा फिरवत राहिल्यास ती फळी खाली येत जाई. त्या फळीच्या खालच्या फळीवर, घडी केलेली एक साडी ठेवलेली होती. दांडा फिरवून वरची फळी खाली-खाली आणून त्या साडीवर दाबून ठेवण्याची ती योजना होती. कपड्यांना  इस्री करण्यासाठीही अनोखी पद्धत पूर्वी वापरात होती असे इशाकभाईंनी आम्हाला सांगितले.

दिवाणखान्यालगतच्या दोन मोठमोठया खोल्यामध्ये, मच्छरदाणी लावण्याची सोय असलेले मोठे पलंग होते. त्या दोन्ही खोल्या सध्या बेडरूम म्हणून वापरात होत्या. दिवाणखान्याच्या मागच्या बाजूच्या एका दालनामधे, एक खूप लांब टेबल आणि त्याभोवती खुर्च्या ठेवलेल्या होत्या. चाळीस ते पन्नास माणसे एकत्र जेवायला बसू शकतील असे ते लांबलचक डायनिंग टेबल होते. त्याच दालनाच्या मागच्या बाजूला एक सुंदर जिना होता. खालच्या मजल्यावर असलेल्या स्वयंपाकघरातून, बायकांना ये-जा करण्यासाठी तो जिना होता. भारतातील अनेक सुप्रसिद्ध क्रिकेटपटू, त्या टेबलावर, त्या कुंटुबासोबत जेवलेले आहेत, असे  श्री. इशाक यांनी आम्हाला सांगितले. बेंगला कुटुंबाच्या या ऐतिहासिक घराला भेट देऊन गेलेल्या अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंचे फोटो वरच्या मजल्यावरच्या एका छोट्या खोलीमध्ये लावलेले होते. इशाकभाईंनी सगळे घर आम्हाला मोठ्या उत्साहाने दाखवले एवढेच नव्हे तर, आम्हा सर्वाना शुद्ध तुपातली सोहनपापडीही खायला दिली. इशाकभाईंचा निरोप घेण्यापूर्वी आम्ही त्या घरासमोर, त्यांच्यासोबत आमचा सर्वांचा एक फोटो काढून घेतला. त्यानंतर आम्ही 'मुळाप्पिलंगड बीच' बघायला निघालो. 



'मुळाप्पिलंगड' किनारपट्टी जवळपास चार ते पाच किलोमीटर लांबीची आहे. इथले वैशिष्ट्य म्हणजे या पुळणीच्या वाळूवर गाडी किंवा स्कूटर-मोटरसायकल चालवता येते. बीचवर पर्यटकांची बरीच गर्दी होती. अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहने सुसाट वेगाने समुद्राला समांतर धावत होती. आम्हीही आमच्या टेम्पो ट्रॅव्हलर गाडीमधून बीचवर फिरलो. थोडा वेळ आम्ही बाहेर पायीही फिरलो, पण बारीक पाऊस पडत असल्याने आम्हाला जास्त फिरता आले नाही. आम्ही बरेच दमलेले असल्यामुळे निलेश राजाध्यक्ष यांनी एका चहाच्या टपरीवर सर्वांसाठी चहा मिळवण्यासाठी प्रयत्न केला. पण तिथले दूध संपलेले होते, आणि संध्याकाळचे सात वाजून गेले होते. म्हणून गाडीमध्ये बसून आम्ही रिसॉर्टकडे  परत निघालो. 

'सी शेल बीच होम' वर पोहोचताच आधी चहा घेतला. रात्रीचे जेवण अगदी साधे आणि सात्विक होते. मी दुपारी विशेष जेवलेले नसल्यामुळे रात्री जेवले. कोबीची भाजी, पडवळाची भाजी, फोडणीचे वरण, पोळ्या, साधा पुलाव, प्रॉन्स पुलाव आणि गुलाबजाम असा बेत होता. रिसॉर्टच्या जवळच श्री. हरीस यांचे एक शेत आहे. त्या शेतात उगवणाऱ्या ताज्या भाज्या स्वयंपाकात वापरल्या जातात, अशी माहितीही जेवताना कळली.भाज्यांची चव आपण घरी करतो त्यापेक्षाही खूप वेगळी होती. जेवण साधे असले तरीही अतिशय रुचकर असल्याने अगदी घरचे जेवण जेवल्यासारखे वाटले.  

दुसऱ्या दिवशी म्हणजे १५ ऑगस्टला सकाळी साडेआठ वाजता, दादांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर कण्णूर-कोळीकोड रेल्वे प्रवास करायचा आहे असे निलेश यांनी आम्हाला सांगितले. १५ तारखेलाच म्हात्रे दांपत्याच्या लग्नाचा वाढदिवस असतो. पण १५ तारखेला चतुर्थी असल्याने, त्या दोघांचा उपास असणार होता. म्हणून १४ ऑगस्टच्या रात्रीच्या जेवणानंतरच त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय निलेश राजाध्यक्षांनी घेतला होता. त्यासाठी साधीच पण अतिशय सुंदर सजावट केली होती. एक छानसा केक मागवला होता. म्हात्रे पती-पत्नींनी केक कापला आणि आम्ही सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन केले. त्यानंतर संगीताच्या तालावर त्या दोघांनी झोकात नृत्य केले. समुद्राच्या काठावर, लाटांच्या संगीतामध्ये,  हलक्या  वाऱ्यावर, मंद निळ्या प्रकाशात लग्नाचा वाढदिवस साजरा करण्याची कल्पना खरोखरीच रोमँटिक होती!

रात्र खूप झाली होती. दुसऱ्या दिवशी लवकर उठून, नाश्ता करून, ध्वजवंदन करून आम्हा सर्वांना गाडी पकडायची होती. त्यामुळे  गप्पा मारत बसण्याचा मोह आवरून आम्ही झोपायला निघून गेलो.       

रविवार, ४ सप्टेंबर, २०२२

९. मलाबारची सफर- 'हर्मन गुंडर्ट' आणि 'गुंडर्ट बंगला'

कण्णूर दीपगृहापासून निघून आम्ही थेट थलासरीच्या 'एम आर ए रेस्टॉरंट' मध्ये साधारण अर्ध्या तासामधे पोहोचलो. रेस्टारंटमध्ये तुडुंब गर्दी होती. त्यामुळे आम्हाला जेवण्यासाठी जागा मिळेपर्यंत पुढे अजून अर्धा-पाऊण तास लागला. तोपर्यंत सर्वांनाच कडाडून भूक लागली होती. त्या कॅफेच्या बाहेर, काचेच्या आड मांडून ठेवलेले अनेक खाद्यपदार्थ अत्यंत आकर्षक दिसत होते. तिथे बाहेरच एक माणूस 'कुनाफा' नावाचा गोड पदार्थ तयार करत होता. जेवणाला वेळ लागणार आहे हे लक्षात आल्यामुळे प्राचीने दादांसाठी एक कुनाफा विकत घेतला. शेवटी आम्हाला बसायला जागा मिळाली. पण रेस्टारंटमध्ये तुफान गर्दी असल्यामुळे, जेवण खूप उशिरा आले. थलासरी चिकन, थलासरी बिर्याणी आणि दोन प्रकारचे पुलाव उत्तम होते. प्रत्येकाला त्याच्या आवडीचे जेवण मिळावे यासाठी निलेश राजाध्यक्ष खूपच धडपड करत होते. परंतु, तेथील गर्दीमुळे, त्यांचे प्रयत्न तोकडे पडत होते. जेवणासाठी बराच वेळ प्रतीक्षा करूनही मनासारखे खाद्यपदार्थ न मिळाल्याने काहीजण नाराज झाले. 

जेवण उरकून रेस्टॉरंटमधून निघेपर्यंत साडेचार वाजून गेले होते. जेमतेम पंधरा मिनिटांतच आम्ही 'गुंडर्ट बंगल्या'मध्ये पोहोचलो. या प्रशस्त बंगल्याचे आवारही  खूप मोठे आहे. बंगल्याच्या चारही बाजूंना मोठे व्हरांडे आहेत. हा बंगला पारंपरिक केरळी स्थापत्यशैलींमध्ये बांधलेला आहे. बंगल्यावर उतरते कौलारू छप्पर आहे. बंगल्याला मोठमोठ्या खिडक्या आहेत तर तिथले लाकडी दरवाजे चांगले रूंद व मजबूत आहेत. हा बंगला वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे आणि बंगल्याचा परिसर शांत व निसर्गरम्य आहे.

एकोणिसाव्या शतकामध्ये, याच बंगल्यामधे सुमारे २० वर्षे राहून डॉ. हर्मन गुंडर्ट आणि त्यांच्या पत्नी ज्युली डुबोईस यांनी मल्याळम भाषासंवर्धनासाठी आणि शिक्षणाच्या प्रसारासाठी अत्यंत मोलाचे कार्य केले. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी या बंगल्यामध्ये गुंडर्ट यांच्या जीवनाबाबतची आणि कार्याबद्दलची सर्व माहिती संग्रहित करण्यात आली आहे. ती माहिती विविध भाषांमधून ऐकण्याची सोय करण्यात आलेली आहे. 


डॉ हर्मन गुंडर्ट यांचा जन्म १८१४ साली जर्मनीमधील स्टुटगार्ट या शहरामध्ये झाला. ते अतिशय प्रतिभावंत होते. १८३५ मधे टूबिगन विद्यापीठामधून त्यांनी भाषाशास्त्रामध्ये (फिलॉलॉजीमध्ये) डॉक्टरेटची पदवी संपादन केली. त्याचबरोबर त्यांनी तिथे धर्मशास्त्राचाही अभ्यास केला. या शिक्षणादरम्यान, हिब्रू, लॅटिन, इंग्रजी आणि फ्रेंच या भाषांवर त्यांनी प्रभुत्व मिळवले. १८३६ साली ते ख्रिश्चन मिशनरी म्हणून युरोपातून सागरी मार्गाने भारतात आले. बोटीवरील काही महिन्यांच्या प्रवासातच ते बंगाली, हिंदी व तेलगू भाषा शिकले आणि सहप्रवाशाना शिकवूही लागले. त्यांचे जहाज आधी कलकत्त्याला जाणार होते. पण ते तिथे न जाता मद्रासच्या किनाऱ्याला लागले. त्यामुळे काही काळ ते तामिळनाडूमधील तिरुनेलवेल्ली आणि पुढे आंध्रप्रदेशमधील चित्तूर येथे कार्यरत होते. त्याकाळात त्यांनी तामिळ आणि तेलगू भाषांवर प्रभुत्व मिळवले. युरोपमधून त्यांच्याबरोबर आलेल्या ज्युली डुबोईस या तरुणीशी, चित्तुर येथे ते विवाहबद्ध झाले. नोव्हेम्बर १८३८ मधे गुंडर्ट पती-पत्नींना मेंगलोरच्या बासेल मिशनचे काम बघण्यासाठी बोलावण्यात आले. त्या कामानिमित्त फिरताना ते केरळच्या थलासरी येथे पोहोचले आणि पुढील वीस वर्षे त्यांनी तिथेच वास्तव्य केले. 

गुंडर्ट पती-पत्नींनी थलासेरीच्या इल्लीकुन्नू भागातील या बंगल्यामध्ये राहावे, तेथेच बासेल मिशनचे स्टेशन स्थापन करावे आणि ख्रिस्ती धर्मप्रसाराचे काम करावे असे ठरले होते. त्या कामाच्या निमित्ताने  डॉ. गुंडर्ट यांनी स्थानिक शिक्षकांकडून काही महिन्यातच मल्याळम भाषा शिकून घेतली. वर्षभरातच त्यांनी त्यांच्या बंगल्याच्या व्हरांड्यात पहिली मल्याळम शाळा सुरु केली. त्याच वेळी त्यांच्या पत्नीने मुलींसाठी पहिली  निवासी शिक्षणसंस्था सुरू केली. त्यानंतरच्या काही महिन्यांत, डॉ गुंडर्ट यांनी कादिरूर, थलासेरी फोर्ट, माहे आणि धर्मादम येथे मल्याळम शाळा सुरु केल्या. या सर्व शाळांना नियमित भेटी देऊन, तिथल्या कामकाजावर ते देखरेख करीत असत. 

ख्रिस्ती धर्माच्या प्रसारानिमित्त, थलासरीच्या आसपासच्या गावांना सातत्याने भेटी देत असल्यामुळे, तेथील स्थानिक लोकांमध्ये डॉ. गुंडर्ट यांची नियमित उठ-बस होती. स्थानिकांसोबतच्या संवादातून त्यांनी शक्य तितके मल्याळम शब्द, वाक्प्रचार आणि म्हणी गोळा केल्या. त्यामुळे, मल्याळम भाषेचे पुष्कळच ज्ञान त्यांना प्राप्त झाले. स्थानिक विद्वानांसोबत चर्चा करून, त्यांनी मल्याळम भाषेतील व्याकरणाचे नियम निश्चित केले. तसेच त्या भाषेमधे  पूर्णविराम, स्वल्पविराम, अर्धविराम, आणि प्रश्नचिन्ह अशा चिन्हांचा वापर प्रचलित केला. 'मल्याळभाषा व्याकरणम' हे मल्याळम भाषेतील पहिले व्याकरणाचे पुस्तक डॉ. गुंडर्ट यांनीच संकलित करून १८५१ साली छापले. तसेच, १८७२ साली पहिला मल्याळम-इंग्रजी शब्दकोशदेखील त्यांनी तयार केला व बायबलचे मल्याळममध्ये भाषांतरही केले. 

१८५७ मध्ये, मलाबार प्रांताच्या दक्षिणेला असलेल्या कोळीकोड शहरापासून ते उत्तरेकडे कर्नाटकातील हुबळीपर्यंतच्या सर्व शाळांचे पहिले शिक्षण-निरीक्षक म्हणून डॉ. गुंडर्ट यांची नियुक्ती केली गेली. त्या पदावर असताना, शिक्षकांची नियुक्ती करण्याचे कामही ते पाहत असत. शाळा, महाविद्यालये आणि नव्याने स्थापन झालेल्या मद्रास विद्यापीठासाठी डॉ. गुंडर्ट यांनी पाठ्यपुस्तके लिहिली आणि परीक्षांकरिता प्रश्नसंचही संकलित केले. इतिहास, भूगोल आणि खगोलशास्त्र या क्षेत्रातही डॉ गुंडर्ट यांनी योगदान दिले आहे. मल्याळम भाषेमधील अनेक जुने दस्तऐवज आणि थलासरीशिवाय मलबार प्रांतामधील इतर ठिकाणच्या धर्मग्रंथांचे संकलन त्यांनी केले होते. ते सर्व संकलित साहित्य त्यांनी पुढे जर्मनीमधील टुबिंगेन विद्यापीठाला देणगीरूपाने दिले.

डॉ. गुंडर्ट यांनी छपाईसाठी, आपल्या बंगल्यामध्येच एक 'लिथो प्रेस' चालू केली. त्या छापखान्यामधून, 'राज्यसमाचारम' नावाचे पहिलेवहिले मल्याळम वर्तमानपत्र, आणि पुढे 'पश्चिमोदयम' हे दैनिकदेखील छापण्याची सुरुवात डॉ गुंडर्ट यांनीच केली. महिलांना इंगजी शिक्षण देऊन, शिवणकाम शिकवून त्यांना उपजीविकेचे साधन मिळवून देऊन, त्यांचा सामाजिक स्तर उंचावण्यासाठी या बंगल्यात चालू केले गेलेले अनेक उपक्रम अतिशय महत्त्वाचे आहेत. डॉ. हर्मन  गुंडर्ट यांनी सुरु केलेली नेत्तूर टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (NTTF),  ही या बंगल्याच्या शेजारीच आहे आणि अजूनही कार्यरत आहे.

केरळची स्थानिक संस्कृती व मल्याळम भाषेचा विकास साधण्याकरिता, आणि शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी व्याकरणविषयक ज्ञान संकलित करण्यासाठी, डॉ. गुंडर्ट यांनी दिलेले योगदान बहुमूल्य आहे. त्यांनी मल्याळम भाषेत एकूण तेरा पुस्तके प्रकाशित केली. त्यांनी तेलगू साहित्याचे हिब्रूमध्ये भाषांतर केले आहे, असेही एका फलकावर वाचले आणि मी आश्चर्यचकितच झाले. डॉ गुंडर्ट याचे नातू, जर्मन कादंबरीकार व नोबेल पारितोषिक विजेते हर्मन हेसे यांच्या म्हणण्यानुसार, डॉ. गुंडर्ट यांना कमीतकमी तीस भाषा अवगत होत्या. 

गुंडर्ट बंगला पाहून आणि डॉ. गुंडर्ट यांच्या कार्याबद्दल लिहिलेली विस्तृत माहिती वाचून, मी कमालीची थक्क झाले. कोण कुठला हा परकीय मनुष्य, आपल्या देशामध्ये येऊन राहतो काय, आपल्यालाही अतिशय अवघड वाटणाऱ्या दाक्षिणात्य भाषा व संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळवतो काय, स्थानिक संस्कृती व भाषांच्या संवर्धनासाठी आपल्या तारुण्यातील बहुमूल्य काळ वेचतो काय, हे सर्व अचंबित करणारेच कार्य आहे. 

परंतु, डॉ. गुंडर्ट यांच्या कार्याबद्दल वाटलेल्या आदरासोबतच मला स्वतःचीच फार लाजही वाटली. मी एक डॉक्टर असल्याने, बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या केरळी नर्सेसबरोबर माझा नेहमी संबंध येतो. त्या नर्सेस आपापसात मल्याळममध्ये बोलत असतात. इतकी वर्षे ती भाषा माझ्या कानावर पडत आली आहे, पण ती मला बोलता तर येत नाहीच, पण समजतही नाही, ही वस्तुस्थिती खरोखरच लाजिरवाणी आहे. 

आपल्यापैकी कित्येकांना, एखादी दाक्षिणात्य भाषा ऐकल्यानंतर ती तेलगू आहे, तमिळ आहे की मल्याळम, हेसुद्धा सांगता येत नाही. त्या भाषा बोलणे किंवा त्या भाषांमध्ये लेखन करणे ही तर खूपच दूरची गोष्ट झाली. इतकेच नव्हे तर, मराठी भाषेशी पुष्कळसे साधर्म्य असलेल्या हिंदी, गुजराती या भाषाही आपल्याला येत नाहीत, आणि त्याची लाज वाटण्याऐवजी आपण ते 'वृथा अभिमानाने' सांगून हसण्यावारीही नेतो. 

आपण आपल्याच देशाबद्दल आणि देशवासीयांबद्दल किती अनभिज्ञ आहोत, आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी आपण सर्वांनीच आणखी किती प्रयत्न केले पाहिजेत याची जाणीव मला गुंडर्ट बंगल्यामधे गेल्यावर प्रकर्षाने झाली.

शनिवार, ३ सप्टेंबर, २०२२

८.मलबारची सफर-'अरक्कल संग्रहालय' आणि दीपगृह

'सेंट अँजेलो फोर्ट' बघून झाल्यावर आम्ही अराक्कल संग्रहालय बघायला निघालो. वाटेत एका मशिदीची सुंदर इमारत दिसली. सर्वसाधारणपणे बघायला मिळणाऱ्या इतर मशिदींपेक्षा या इमारतीची रचना खूपच वेगळी होती. ही मशीद अरक्कल म्युझियम आणि मापिला खाडीच्या मध्ये आहे. कण्णूर शहरातील ही सर्वात जुनी मशीद अरक्कल राजाने सतराव्या शतकात बांधली, असे आम्हाला आमचा गाईड शिहाद याने सांगितले. डच स्थापत्यशैलींमध्ये बांधली गेलेली ही एकमेव मशीद आहे आणि त्यामुळेच या मशिदीची इमारत वेगळी आणि अतिशय देखणी आहे.  

सेंट अँजेलो किल्ल्यावर उन्हामध्ये फिरून आमच्या तोंडाला कोरड पडली होती. त्याबाबत आम्ही काही तक्रार करायच्या आधीच निलेश राजाध्यक्ष यांनी ते ओळखले असावे. अराक्कल संग्रहालयाजवळ आम्ही गाडीतून उतरल्यावर, संग्रहालयाच्या आत जाण्याआधी, त्यांनी आम्हा सर्वांना एक मस्त शीतपेय प्यायला दिले. शहाळ्यातील पाणी आणि 'पतली मलई' एकत्र मिक्सरमधून फिरवून, नंतर थंडगार केलेले ते मधुर पेय पिऊन आम्ही अगदी ताजेतवाने झालो. 

'अरक्कल राजवट' ही केरळमधील एकुलती एक मुस्लिम राजवट होती. कण्णूर शहर आणि लक्षद्वीपमधील दक्षिणेकडील काही बेटांवर यांचे राज्य होते. हे शाही घराणे कोलाथिरी राजवंशाचीच एक शाखा असल्याचे म्हटले जाते. या घराण्यात मातृसत्ताक पद्धत पाळली जात असल्यामुळे, राज्याचे उत्तराधिकार मामाकडून भाच्याकडे जात असत. पण कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ सदस्य, स्त्री अथवा पुरुष, हाच राज्याचा शासक असतो. राज्यकर्त्या राजाला 'अली राजा' आणि सत्ताधारी राणीला 'अरक्कल बीवी' अशा नावांनी संबोधले जाते. या मुस्लिम शासकांनी, अठराव्या शतकामध्ये हैदर अली या म्हैसूरच्या राजाला, केरळवर आक्रमण करण्यासाठी बोलावले होते. १६६३ साली अरक्कल राजाने डचांकडून एक वास्तू विकत घेतली. ती वास्तू, म्हणजेच 'अरक्कल राजवाडा', ज्यामध्ये सध्या हे अरक्कल संग्रहालय आहे.  

या छोट्याशा संग्रहालयाची इमारत जुनी असली तरी मजबूत आहे. संग्रहालयामध्ये अरक्कल राजघराण्यामधल्या लोकांनी वापरलेल्या वस्तू मांडून ठेवल्या आहेत. त्यात लाकडी नक्षीदार टेबल-खुर्च्या, बाक, पलंग, कपाटे, संदुका आणि मोठमोठाले आरसे आहेत. त्याचबरोबर त्या काळची शस्त्रे, दंड, वाद्ये, हांडे अशा इतरही अनेक वस्तू आहेत. जुने टेलीफोन्स, दुर्बिणी यासोबतच तिथले विशेष आकर्षण म्हणजे, कुराण शरीफची एक हस्तलिखित प्रत आणि अरक्कल राजवटीचा जुना ध्वज! शिहादने आम्हाला त्या ध्वजावरच्या सगळ्या चिन्हांबद्दल सविस्तर माहिती दिली. संग्रहालय बघून झाल्यावर आम्ही कण्णूरचे दीपगृह बघायला निघालो. 

पैयंबलम बीचजवळ असलेल्या या दीपगृहापर्यंत पोहोचेस्तोवर, दुपारचे  बारा वाजून गेले होते. दीपगृहाच्या आवारात शिरताच, डाव्या बाजूला एक छोटे संग्रहालय आहे. त्यामध्ये, सर्व दीपगृहांमध्ये पूर्वापार वापरली गेलेली वेगवेगळी उपकरणे ठेवलेली आहेत. शिहादने आम्हाला त्या उपकरणांची माहिती सांगितली. १८८५ सालापासून ते १९६२ पर्यंत लक्षद्वीप दीपस्तंभामध्ये वापरले गेलेले एक अवाढव्य ऑप्टिक (प्रकाश प्रवर्धित करणारी भिंगाची रचना) दाखवले. कधीकधी दाट धुक्यामुळे, ऑप्टिकने प्रवर्धित केलेला प्रकाशही जहाजांना दिसू शकत नाही. अशा परिस्थितीत जहाजचालकांना सतर्क करण्यासाठी पूर्वीपासून वापरण्यात आलेली एक प्रचंड  घंटा  या संग्रहालयामध्ये बघायला मिळाली. तिथल्या प्रेक्षागृहामध्ये भारत देशातील सर्व दीपगृहांबद्दलचा एक माहितीपट दाखवला जातो. संग्रहालय बघून झाल्यावर, आम्ही प्रेक्षागृहामध्ये चित्रपट बघायला जाईपर्यंत एक वाजत आला होता. तिथल्या सरकारी कर्मचाऱ्याने आम्हाला चित्रपट चालू करून दिला. पण बरोबर एक वाजायला पाच मिनिटे बाकी असताना, आपला सरकारी बाणा दाखवला. दुपारी १ ते २ जेवणाची सुट्टी असल्यामुळे त्याने आम्हाला संग्रहालयाच्या बाहेर काढले. त्यामुळे तो चित्रपट आम्हाला पूर्ण बघता आला नाही.  

सकाळी सगळ्यांनी भरपेट नाश्ता केलेला असल्यामुळे एक वाजेपर्यंत कोणालाच भूक लागली नव्हती. त्यामुळे आम्ही सर्वांनी दीपगृहाचा जिना चढून वर जाण्याचे ठरवले. फक्त दादा आणि सौ. अस्मिता म्हात्रे खालीच थांबले. लाल आणि पांढर्‍या रंगात रंगवलेले, जवळपास ७५ फूट उंच असे हे  दीपगृह, अजूनही सक्रिय आहे. वर चढून जाण्यासाठी एक चक्राकार जिना आहे. जिन्यामधे हवा येण्यासाठी बाहेरच्या भिंतीला ठराविक अंतरावर खिडक्या आहेत. जिना चढताना आम्हाला सर्वानाच धाप लागत होती. त्यामुळे त्या खिडक्यांजवळ थांबून जरा दम खात, अंगावर वारे घेत, बाहेर बघायला बरे वाटले. 

अगदी शेवटी एक निमुळती आणि खडी चढण असलेली लोखंडी शिडी चढून, दीपगृहाच्या गोलाकार सज्जामध्ये जात येत होते. त्या शिडीवरून एकावेळी फक्त एकच व्यक्ती चढू किंवा उतरू शकत होती आणि चढताना पायामधे आणि पोटामध्येही गोळे येत होते. पण इतके कष्ट करून, सज्ज्यामध्ये पोहोचताच, जे दृश्य दिसले ते मात्र वर्णनातीत होते. मॉन्सूनचे तुफान वारे वाहत होते आणि नजर पोहोचेपर्यंत फक्त समुद्रच दिसत होता. तिथे आम्ही अनेक फोटो काढले. बऱ्याच जणांनी ३६० अंशातील व्हिडिओही काढला. व्हिडियोमध्ये आपण एखाद्या ठिकाणचे दृश्य, तिथले आवाज, तिथे असलेल्या व्यक्तींच्या चेहऱ्यावरील भाव हे सगळे कैद करू शकतो. पण तरीही तेथील 'माहौल', आणि त्यावेळी आपल्या मनामध्ये उचंबळणारे भाव मात्र कैद करता येत नाहीत!  


खरं सांगायचे तर त्या 'माहौल' मधून आमचा कोणाचाच पाय निघत नव्हता. पण त्या छोट्या सज्ज्यामध्ये पर्यटकांची गर्दी व्हायला लागली होती. तसेच आम्हाला पुढे थलासरीपर्यंत प्रवास करून, तिथली सुप्रसिद्ध 'थलासरी बिर्याणी' चाखायची होती. त्यामुळे काहीश्या नाईलाजानेच आम्ही खाली उतरलो आणि गाडीमध्ये बसून थलासरीकडे प्रयाण केले.   

 

शुक्रवार, २ सप्टेंबर, २०२२

७. मलबारची सफर-'सेंट अँजेलो फोर्ट'


१४ ऑगस्टच्या पहाटे ६ वाजता मला जाग आली. पाठोपाठ आनंदही जागा झाला. बीचवर जाण्यासाठी सोनम अगदी छान तयार होऊन शुभेन्दूची वाट पाहत थांबली होती. सात वाजेपर्यंत चहा मिळू शकणार नसल्याने आम्ही पुळणीवर फेरफटका मारायला गेलो. श्री. अशोक म्हात्रे आणि सौ. अस्मिता म्हात्रे, हे पती-पत्नी आम्हा सर्वांच्या आधीच तिथे पोहोचून पुळणीवर चालत होते. त्यांच्याबरोबर गप्पा मारत आम्हीही पाय मोकळे केले. पाठोपाठ सोनम-शुभेन्दूही आले. सगळ्यांचे एक छान फोटोसेशन झाल्यावर आम्ही रिसॉर्टवर परतलो. तोपर्यंत तिथे सकाळचा चहा आलेला होता. दादांना उठवून त्यांच्याबरोबर गरमागरम चहा घेतला. 

चहा झाल्यानंतर अंघोळी आटपाव्यात म्हटले तर नळाला गरम पाणीच येईना. केरळमध्ये सर्वच हॉटेलांमध्ये, मसाल्याचा वास असलेले गरम पाणी प्यायला देतात. पण अंघोळीला मात्र गरम पाणी घेण्याची पद्धत नसावी की काय अशी शंका आम्हाला येऊ लागली. रिसॉर्टमध्ये सौर उर्जेवर पाणी गरम करण्याची सोय होती. पण त्यात कदाचित काही बिघाड असल्यामुळे गरम पाणी येईना. वातावरण ढगाळ होते आणि ऊन पडायचीही शाश्वती नव्हती. म्हणून आम्ही अंघोळीच्या आधीच नाश्ता करून घ्यायचे ठरवले.

नाश्त्यामध्ये स्थानिक पदार्थांची रेलचेल होती. जाळीदार पांढरेशुभ्र आप्पम, नारळाची चटणी, तांदुळाच्या उकडीपासून केलेले नाजूक इडिअप्पम व त्यासोबत गूळ घातलेले नारळाचे दूध, उपमा, गोडसर आप्पे म्हणजे मुट्टप्पम, व्हेज स्ट्यू असे एकेक अफलातून आणि सात्विक चवीचे पदार्थ होते. कुठल्याही पदार्थामध्ये तेल, मसाले अथवा मिरची जास्त नव्हते. कलिंगडाच्या कापलेल्या फोडींवर पुदिन्याची पाने आणि मसाला घालून ठेवलेले होते. आदल्या रात्री मी जेवलेले नसल्याने, मला भूक लागली होतीच. हे अतिशय आकर्षक पदार्थ समोर आल्यावर मी अक्षरशः पोटाला तडस लागेपर्यंत नाश्ता केला.

अंघोळीच्या गरम पाण्यासाठी सगळ्यांनाच काही काळ थांबावे लागले. शेवटी साडेनऊच्या सुमारास आमची गाडी 'सेंट अँजेलो फोर्ट' कडे निघाली. त्या दिवशी आमच्याबरोबर मोहम्मद शिहाद हा 'लोकल गाईड' म्हणून आलेला होता. किल्ल्यामध्ये पोहोचल्यावर त्याने आम्हाला बरीच चांगली माहिती सांगितली. काही माहिती मी गूगलवरही वाचली. गिरीश-प्राची आणि जहागीरदार पती-पत्नी आम्ही पोहोचायच्या आधीच किल्ल्यापाशी पोहोचले होते.    

१४९८ साली वास्को द गामा पहिल्यांदा भारतात कोळीकोड किनाऱ्यावर उतरला होता. त्याने स्थानिक कोलाथिरी राजाला वसाहतीसाठी जागा देण्याची विनंती केली. १५०५ साली राजाकडून जमीन मिळवून पोर्तुगीजांनी तिथे एक लाकडी किल्ला बांधला. १५०७ साली त्यांनी त्याच जागी एक भक्कम दगडी किल्ला बांधायला सुरुवात केली. त्यावेळी तिथल्या झामोरिन आणि कोलाथिरी राजांनी, किल्ल्याला वेढा घालून पोर्तुगीजांकडून तो किल्ला जिंकण्याचा असफल प्रयत्न केला. पुढे या किल्ल्यामध्येच आपल्या नौदलाचा भक्कम तळ उभारून पोर्तुगीजांनी गोवाही जिंकले.

१६६३ साली डचांनी पोर्तुगीजांकडून सेंट अँजेलो किल्ला जिंकला आणि किल्ल्याचे आधुनिकीकरण केले. अरक्कलचा राजा अली याने १७७२ साली हा किल्ला डचांकडून विकत घेतला, पण १७९० साली ब्रिटिशांनी तो त्याच्याकडून हिरावून आपल्या ताब्यात घेतला. १९४७ सालापर्यंत हा किल्ला ब्रिटिशांचा मलबारमधील मुख्य लष्करी तळ होता. बेकलच्या किल्ल्याप्रमाणेच, हा किल्लादेखील समुद्रामध्ये घुसणाऱ्या एका उंच सुळक्यावर बांधलेला आहे. त्यामुळे, किल्ल्याच्या बुरुजावरून दिसणारे दृश्य अतिशय नयनरम्य आहे. किल्ल्याची काही प्रमाणात पडझड झाली असली तरीही सगळा परिसर खूप स्वच्छ ठेवलेला आहे. बुरुजावरून मापिला खाडी दिसते. खाली एका बाजूला अगदी समुद्राच्या काठावर एक छानशी बाग, आणि चालण्यासाठी एक ट्रॅकही केलेला आहे. 

मोहम्मद शिहादसोबत आम्ही सगळा किल्ला हिंडून बघितला. किल्ला  दाखवताना, तो किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व आम्हाला समजावून सांगत होता. किल्ल्यावर एक जुने दीपगृह आहे. समुद्राच्या दिशेने डागता येतील अशा अनेक तोफा किल्ल्याच्या एका बुरुजावर आहेत. गंमत म्हणजे, त्यातल्या एका तोफेमधे एक तोफगोळा अडकूनच बसलेला आहे. त्याचा मी फोटो काढला. एके ठिकाणी, एका डच अधिकाऱ्याच्या पत्नीच्या आणि त्यांच्या दोन मुलांच्या थडग्यावरच्या दगडावर, त्या काळच्या डच भाषेत, त्यांचा मृत्युलेख लिहिलेला आहे. तो दगड बघून मात्र मला जरा उदास वाटले. 

किल्ल्यामध्ये खालच्या बाजूला घोड्याच्या पागा आहेत. त्याशेजारी एक अंधारकोठडी आहे. किल्ल्याच्या आतमध्ये खूप उंच-उंच वृक्ष आहेत आणि बरीच फुलझाडेही आहेत. आम्ही भर पावसाळ्याच्या दिवसात तिथे गेल्यामुळे सगळीकडे हिरवळही होती. किल्ल्यामध्ये एके ठिकाणी एक खोल विवर होते. एखाद्या कैद्याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली असेल तर त्याचे हातपाय तोडून, त्याला त्या विवरामध्ये  ढकलून देत असत, असे शिहादने आम्हाला सांगितले. त्या काळी, पोर्तुगीजांनी या भागामधील स्थानिक लोकांवर अनन्वित अत्याचार केले. विवरामध्ये ढकलून मृत्युदंडाची शिक्षा देण्याची प्रथा ब्रिटिशांनी बंद केली असेही आम्हाला सांगितले गेले. 

किल्ल्याच्या आवारात एक 'Light and Sound show' चालू करण्याचे २०१५ साली ठरवण्यात आले होते. त्यासाठी किल्ल्यामध्ये जेंव्हा खोदकाम केले गेले, तेंव्हा जमिनीखाली गाडले गेलेले हजारो किलो वजनाचे तोफगोळे मिळाले. हजारो तोफगोळे बाहेर काढल्यावरही जमिनीखाली अजूनही बरेच तोफगोळे आहेत असे लक्षात आल्यामुळे शेवटी ते खोदकाम थांबवण्यात आले. ते सर्व तोफगोळे दोन खोल्यांमध्ये रचून ठेवले आहेत आणि खोल्यांच्या जाळीच्या दरवाज्यांना कुलूप लावलेले आहे. ती तोफगोळ्यांची रास आम्हाला शिहादने जाळीतूनच दाखवली. मी त्याचा फोटोही काढला.  

किल्ल्याच्या आवारात आम्ही एकूण तास-दीडतास होतो. त्यानंतर आम्ही अरक्कल म्युझियम आणि कण्णूरचा दीपस्तंभ बघण्यासाठी पुढे निघालो. 

गुरुवार, १ सप्टेंबर, २०२२

६. मलाबारची सफर- 'सी शेल बीच होम'


नीलेश्वर बॅकवॉटर्सपासून आम्ही कण्णूरकडे साधारण चार वाजायच्या सुमारास गाडीत बसून निघालो. नकाशावर अंतर ७५ किलोमीटर दिसत होते. पण रस्त्यामध्ये वाहतूक कोंडी झाली असल्याने, आम्हाला वाट वाकडी करून जावे लागले. दीड तासांत पोहोचू असे वाटले होते. पण वेळ लागू लागला. त्यामुळे वाटेत जरा 'पाय धुवायला' थांबलो. [हा वाक्प्रचार हल्ली फारसा वापरात नाही. 'फ्रेश होणे' या आजकाल मराठीत घुसलेल्या वाक्प्रचारामुळे असे अनेक जुने मराठी वाक्प्रचार वळचणीला जाऊन पडलेले आहेत!] तिथे आसपास कुठे चहा मिळतोय का, हे पाहायचा प्रयत्न श्री. नीलेश यांनी केला, पण चहा काही मिळाला नाही. दोन तास होत आले तरीही रिसॉर्ट न आल्याने सगळ्यांनाच जरा कंटाळल्यासारखे झाले होते. शेवटी साडेसहा वाजायच्या सुमारास 'सी शेल बीच होम' या रिसॉर्टला आम्ही पोहोंचलो. गिरीश-प्राची आणि जहागीरदार पती-पत्नींचे अगदी ऐनवेळी या सहलीला यायचे ठरल्यामुळे, त्या चौघांना 'सी शेल बीच होम' मध्ये जागा मिळाली नव्हती. त्यामुळे त्यांची सोय दुसऱ्या कुठल्यातरी रिसॉर्टमध्ये केलेली होती. बेकलचा किल्ला बघून ते परस्पर तिकडे गेले.  

'सी शेल बीच होम' मधे आमच्या स्वागताची तयारी होती. बाहेरच एका मोठ्या टोपल्यात शहाळी घेऊन एक गडी बसलेला होता. त्याने सपासप शहाळी कापून आम्हाला सर्वांना दिली. शहाळ्याचे गोड पाणी पिऊन झाल्यावर त्याने आम्हाला आमच्या शहाळ्यांमधली 'पतली मलई' काढून दिली. शहाळ्यातले पाणी पिऊन आणि मलई खाऊन आमचा थकवा दूर पळाला. शहाळे बघितल्यावर, अनिरुद्धची, म्हणजे आमच्या मुलाची आठवण झाल्याशिवाय राहिली नाही. अमेरिकेतून भारतात आल्याबरोबर आणि परतीच्या प्रवासासाठी विमानतळावर पोहोचायच्या आधी तो आवर्जून शहाळे पितो. त्याची आठवण काढत मी दोन शहाळी प्यायले.   

'सी शेल बीच होम' हे रिसॉर्ट समुद्रकिनाऱ्याला लागून असलेल्या एका उंच कड्यावर आहे. आमच्या डोळ्यासमोर, पण जरा खालच्या पातळीवर समुद्र दिसत होता. समुद्राचा धीरगंभीर नाद इथल्या संपूर्ण वातावरणात भरून राहिलेला होताच पण एक सुखावह शांतताही जाणवत होती. रिसॉर्टचे बाह्य रूप अगदी साधे आहे. ज्या पर्यटकांना 'तथाकथित' पंचतारांकित सोयी हव्या असतात त्यांना कदाचित हे रिसॉर्ट फारसे आवडणार नाही. पण आम्हाला आवडते तशी स्वच्छ, शांत, कुठलाही भपका नसलेली ही जागा असल्याने आम्ही फारच खूष झालो. 'सी शेल बीच होम' मध्ये  राहायला आलेल्या पाहुण्यांना, 'Home away from home' असा अनुभव देण्यासाठी  रिसॉर्टचे मालक हरिस आणि त्यांचा मुलगा रोशन जातीने लक्ष घालत असतात. 

'सी शेल बीच होम' रिसॉर्टच्या आत आल्या-आल्या, अगदी समोरच एक समुद्राभिमुख झोपाळा आहे. जवळच, पन्नास-साठ माणसांना आरामात बसता येईल असे एक दालन आहे. त्यामध्ये एक छोटे स्टेजही आहे. एखादे घरगुती स्नेहसंमेलन आयोजित करण्यासाठी ही अगदी सुयोग्य जागा आहे. या बीच होम मध्ये एकूण १६ खोल्या आहेत. सर्व खोल्या वातानुकूलित आहेत. खालच्या मजल्यावरच्या खोल्यांच्या समोर व्हरांडा आहे तर वरच्या मजल्यावरच्या खोल्यांना बाल्कनी आहे. तिथे लाकडी बाक आणि मोठमोठाल्या आरामखुर्च्या ठेवलेल्या आहेत. कुठल्याही खोलीच्या बाहेर उभे राहिले की समोर अथांग समुद्र दिसतो! खालच्या मजल्यावर स्वयंपाकघर आहे. त्यासमोरच एका प्रशस्त मोकळ्या जागेमध्ये जेवणासाठी टेबल-खुर्च्या मांडलेल्या आहेत. या जागेवर छप्पर घातलेले असल्यामुळे, भर पावसामध्ये सुद्धा इथे बसता येते. या भागातून खाली समुद्राकडे जाण्यासाठी एक बांधलेला जिना आणि पायवाट आहे. पंधरा-वीस पायऱ्या आणि पायवाट उतरून गेले की आपण पुळणीवर पोहोचतो.  

आम्हाला खालच्या मजल्यावरच्या दोन खोल्या दिल्या होत्या. अंघोळ करून कपडे बदलून आम्ही मोकळ्या हवेवर बाहेर येऊन बसलो. तिथे एका कोपऱ्यामधले टेबल पकडून, तमाम समविचारी लोकांनी, निवांतपणे सुरापानाचा आस्वाद घेतला. जेवण लागेपर्यंत आम्ही सगळे, 'खारे' वारे खात, आरामात गप्पा मारत बसलो. आम्हा 'अनुभव'च्या सहप्रवाशांसाठी खास बुफे लावला होता. मलाबारी पराठेआणि साधे पराठे, पनीर मसाला, डाळ, कसलीशी भाजी, मटण स्ट्यू , तळलेले मासे, आणि फ्राईड चिकन आणि भात असा बेत होता. जेवणानंतर व्हॅनिला आईस्क्रीम होते. श्री. हरिस, प्रत्येकाची आपुलकीने चौकशी करत, स्वतः सगळ्यांना जेवण वाढत होते. त्यांना सांगून मी  दादांसाठी केळ्यांची शिकरण करून घेतली. सर्व खाद्यपदार्थांचे रूप आणि वास खूपच चांगला असल्याने, मला जेवायचा मोह होत होता, पण मी तो आवरला. दुपारचे जेवण उशिरा झाल्यामुळे भूक कमीच होती आणि रात्री उशिरा बाहेरचे जेवण जेवल्यावर त्रास होईल की काय, अशी भीतीही वाटत होती. मी एक ग्लासभर गरमागरम दूध मात्र प्यायले. 

जेवण झाल्यानंतरही उशिरापर्यंत आम्ही सगळे गप्पा मारत बसलो. नीलेश राजाध्यक्ष यांनी आम्हाला दुसऱ्या दिवशीच्या, म्हणजे १४ ऑगस्टच्या, कार्यक्रमाबाबत सूचना दिल्या. सात वाजता चहा मिळेल, नाश्ता आठ नंतर मिळेल, मधल्या वेळामध्ये कोणाला समुद्रावर फिरायला जायचे असेल तर जाऊन यायला हरकत नाही, असे सांगितले गेले. नाश्त्यानंतर सकाळी ९ वाजायच्या सुमारास 'फोर्ट सेंट अँजेलो' बघायला निघायचे आहे असेही सांगितले गेले. १४ ऑगस्टला आम्ही आणखी बऱ्याच छानछान जागांना भेट देणार होतो. 

सगळे झोपायला गेले तरीही मला झोप येत नव्हती. त्यामुळे मी व्हरांडयातील आरामखुर्चीवर बसून सतत उसळणाऱ्या समुद्राच्या लाटांकडे बघत बसले. माझ्या मनामध्येही अनेक विचार उसळत होते.  गिरीश-प्राची आणि जहागीरदार पती-पत्नींना आमच्याबरोबर या घरातला पाहुणचार घेता आला नाही याचे वाईट वाटत होते. आमच्या नातीला, म्हणजे नूरला इथे घेऊन आलो तर तिला किती आवडेल, असेही वाटले. जवळच्या सर्व आप्तांना या 'सी शेल बीच होम' मध्ये घेऊन यायचे , असा मनाशी निश्चय करून मी  खोलीमध्ये जाऊन निद्राधीन झाले. 

मंगळवार, ३० ऑगस्ट, २०२२

५. मलाबारची सफर-नीलेश्वरची निळाई!

आनंदाश्रमपासून नीलेश्वर बॅकवॉटर्सला पोहोचायला साधारण पाऊण तास लागला. तो रस्ता खूप वळणा-वळणाचा होता. तसे केरळमधले सगळेच रस्ते नागमोडी होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुंदर बंगल्या आणि नजर पोहोचेपर्यंत सगळीकडे फक्त हिरवाई! एका गावाची हद्द संपून दुसरे गाव कधी सुरु होते हे आपल्याला कळतच नाही. या सहलीला जाण्याचे अचानक ठरवल्यामुळे आपण नेमके कुठे-कुठे जाणार आणि काय बघणार, या बाबत गूगलवर मी काहीही वाचलेले नव्हते. त्यामुळे, नीलेश्वर बॅकवॉटर्स हा जास्तच तरल आणि सुखद अनुभव ठरला. 



आम्ही सगळेजण 'बेकल रिपल्स' या कंपनीच्या बोटीवर चढलो. २०-२५ जण आरामात प्रवास करू शकतील अशी मध्यम आकाराची ती बोट होती.  बोटीच्या समोरच्या भागात, म्हणजे डेकवर जाण्यासाठी, एक फूटभराची पायरी चढून वर जावे लागत होते. तिथेच कॅप्टनची खुर्ची आणि बोटीचे चक्राकार सुकाणू होते. बोटीच्या अगदी समोरच्या टोकावर तिरंगा फडकत होता. बोटीच्या पुढच्या अर्ध्या भागात प्रवाशांना बसण्याची सोय होती. त्या भागावर ऊन-पावसापासून संरक्षण मिळावे म्हणून छप्पर होते. पण त्या भागाच्या सर्व बाजू मोकळ्या असल्याने, आसपासचा परिसर बघता येत होता. बोटीच्या मधल्या भागामध्ये एक डबल बेड असलेली बेडरूम आणि अटॅच्ड टॉयलेट होते. बोटीच्या मागच्या भागात सुसज्ज स्वयंपाकघर होते. 

सुरुवातीला बोटीचे कॅप्टन आलेले नव्हते आणि बोट एका जागी बांधून ठेवलेली होती. बोटीचे सुकाणू बघून माझ्या मनातले 'मूल' जागे झाले आणि कोणाला काही कळायच्या आत मी कॅप्टनच्या खुर्चीवर जाऊन बोटीचे चक्राकार सुकाणू हातात घेतले. 'काय हा हिचा पोरकटपणा' असे आनंदच्या आणि गिरीशच्या मनामध्ये निश्चित आले असणार! बोट चालवायला मिळावी ही सुप्त इच्छा माझ्या मनामध्ये होतीच. पण ते शक्य नसल्याने, मी सुकाणू हातात धरून माझे फोटो मात्र काढून घेतले. माझ्यापाठोपाठ इतर प्रत्येकाने ते चक्र हातात घेऊन आपापले फोटो काढून घेतले. हे होईपर्यंत बोटीचे कप्तान आले आणि बोट चालू केली. त्यानंतर  दादाही  मोठ्या  उत्साहाने  बोटीच्या डेकवर चढले. कप्तानाने दादांना आपली खुर्ची दिली, त्यांच्या डोक्यावर आपली टोपी घातली. त्यानंतर आम्ही दादांचे फोटो काढले. तसेच तिरंग्याबरोबरही आम्ही आमचे  फोटो काढले.  

तेजस्विनी नदीवर संथ गतीने तरंगत बोट चालली होती. बॅकवॉटरच्या दोन्ही बाजूला नारळाच्या घनदाट बागा होत्या. बोटीचे कप्तान आम्हाला आसपासच्या भागाची माहिती सांगत होते. आमच्या डाव्या बाजूला अचमथुरुथी हे एक लहान बेट दिसत होते. नदीच्या मध्यभागी असलेल्या या अगदी छोट्या, शांत आणि नयनरम्य अशा बेटावर केवळ चारशे घरे आहेत. पुढे गेल्यावर चेरुवथुर या गावाजवळ असलेला कोट्टापुरम–अचमथुरुथी फूट-ब्रिज हा केरळ राज्यामधला, नदीवरील सर्वात लांब फूट-ब्रिज आहे, असेही त्याने आम्हाला सांगितले. हा प्रवास करत असताना सभोवताली निळ्या-हिरव्या रंगाच्या अनेक छटा दिसत होत्या. दुपारची वेळ असल्याने हवेमध्ये गारवा नव्हता पण उकाडाही नव्हता. 

बोटीवर आमचे स्वागत लिंबू सरबताने करण्यात आले. त्या पाठोपाठ 'स्टार्टर' म्हणून, गूळ आणि केळे घालून केलेले, गरमागरम आणि अतिशय चविष्ट असे तांदुळाचे आप्पे आले. दुपारची जेवणाची वेळ झालीच होती. पण जेवणाला अजून वेळ होता. त्यामुळे निलेश यांनी म्युझिक सिस्टमवर छानसे संगीत सुरु केले. त्यावर 'कराओके'ची पण सोय होती. आमच्याबरोबरचे श्री. प्रफुल्ल पेंडसे यांनी त्यांच्या सुमधुर आणि सुरेल आवाजात, "बार बार देखो, हजार बार देखो..." हे गाणे म्हटले.  तिथले सगळे वातावरणच असे होते की या गाण्याच्या ठेक्यावर वर आमचे पाय आपोआप थिरकू लागले. पाठोपाठ वृंदा जोशींनीही "अजीब दास्ताँ हैं ये, कहाँ शुरू कहाँ खतम..." हे गाणे फार छान म्हणले. पेंडसे आणि वृंदा जोशींनी अजूनही एकेक गाणे म्हटले. 

स्वयंपाकघरामधून येणाऱ्या खमंग वासामुळे भूक खवळली होती. थोड्याच वेळात जेवणाचा बुफे मांडला गेला. पोळी, भात, दाल फ्राय, रस्सम, सांबर, अवियळ, बीन्सची ओले खोबरे घातलेली भाजी, दह्यातली कोशिंबीर, तळलेले पापड, लोणचे असा अगदी फक्कड बेत होता. मांसाहारी लोकांसाठी करीमीन या जातीचे मासे, गरम-गरम तळून वाढले जात होते. सर्व पदार्थांची चव अगदी वेगळी आणि चटकदार होती. जेवणानंतर, वेलदोड्याची पूड घातलेली शेवयाची खीर, 'पायसम', आली. त्यामध्ये थोडा साबुदाणा आणि तुपात खमंग तळलेले काजूही घातले होते. आजूबाजूची सुखद निळाई बघत, गप्पा-गोष्टी करत अगदी निवांतपणे भरपेट जेवण झाले. त्या सगळ्या वातावरणामुळे, अनंत काळासाठी या बोटीवर राहावे, असे वाटू लागले होते. पण आम्हाला पुढील मुक्कामी, म्हणजे कण्णूरला पोहोचायचे होते. साधारण चारच्या सुमारास गरमागरम चहा पिऊन आणि त्याबरोबर आलेल्या केळ्याच्या भज्यांची चव घेऊन आम्ही कण्णूरकडे निघालो. गिरीश-प्राची आणि जहागीरदार पती-पत्नी बेकलचा किल्ला पाहायला निघून गेले. 

केरळच्या दक्षिण भागातील अलेप्पी, कोची आणि कोल्लम भागामधील बॅकवॉटर्स आणि तिथल्या हाऊसबोटस खूप प्रसिद्ध आहेत. त्या मानाने, नीलेश्वर बॅकवॉटर्स अजून फारशा पर्यटकांना माहीत नाही. त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची  विशेष गर्दी नव्हती. या अतिशय शांत, रम्य ठिकाणच्या बॅकवॉटरवरच्या नौकाविहाराचा अनुभव मला फार आवडला.   

रविवार, २८ ऑगस्ट, २०२२

४. मलाबारची सफर- 'अनंतपद्मनाभस्वामी' - 'आनंदाश्रम'

 

शनिवार दिनांक १३ ऑगस्टला सकाळी पाऊणे सात-सात वाजता रूमवर चहा आल्यामुळे जाग आली. तोपर्यंत मला बरेचसे बरे वाटायला लागले होते. बेकल किल्ल्यावरच्या सुसाट वाऱ्याबरोबर माझा ताप कुठल्याकुठे उडून गेला असावा. सकाळी नऊ वाजेपर्यंत सामानसुमान बांधून आम्हाला खोली सोडायची होती. त्या दिवशी सकाळी  नाश्ता झाल्यावर आम्हाला 'अनंतपद्मनाभस्वामी' हे विष्णूचे देऊळ बघायला जायचे होते. आमच्या कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे या देवळात आम्ही १२ ऑगस्टला सकाळी जेवणाच्या आधी जाणार होतो. पण मुंबईहून येणाऱ्या प्रवाशांचे विमान थोडे उशिरा पोचल्यामुळे १३ ऑगस्टच्या सकाळी देऊळ बघायचे ठरले होते. 

हॉटेलच्या बुफे नाश्त्यामध्ये इडली-वडा, सांबर, चटणी, पुरी-भाजी, उत्तप्पे, कॉर्नफ्लेक्स, चॉकोज, असे अनेक पदार्थ व चहा-कॉफी होती. सिटी टॉवर्स हॉटेलमधील जेवण उत्तम होते. पण त्या मानाने नाश्त्यातील पदार्थांची चव काही खास नव्हती. एकीकडे आमचा सगळ्यांचा नाश्ता होत असताना बसचालक श्यामने आमचे सामान गाडीच्या टपावर बांधून ठेवले होते. त्यामुळे नाश्ता उरकून आम्ही लगेच 'सिटी टॉवर्स' हे हॉटेल सोडले. 'अनंतपद्मनाभस्वामी' देवस्थान बघण्यासाठी गाडी परत मंगळुरूच्या दिशेने निघाली. जाताना निलेश राजाध्यक्ष यांनी आम्हाला या देवस्थानाबद्दल माहिती सांगितली. 

अनंतपूर गावामध्ये असलेले, हे केरळमधले एकमेव तळ्यातले देऊळ आहे. तिरुअनंतपूर या केरळच्या राजधानीमधले 'अनंतपद्मनाभस्वामी' देवस्थान सुप्रसिद्ध आहे. त्या 'अनंतपद्मनाभस्वामींचे' मूळ स्थान पूर्वी अनंतपूरच्या देवळात होते, अशी एक आख्यायिका आहे.  अनंतपूर देवळातील तळ्याच्या उजव्या बाजूला असलेल्या गुहेतून बाहेर निघणाऱ्या गुप्तमार्गाने, 'अनंतपद्मनाभस्वामी' आपले मूळ स्थान सोडून तिरुअनंतपूरला निघून गेले, अशीही एक आख्यायिका आहे. 

तिरुअनंतपूरचे देवस्थान अतिशय श्रीमंत देवस्थान आहे असे मी ऐकून आहे. परंतु, 'अनंतपद्मनाभस्वामींच्या' मूळ देवस्थानात मात्र श्रीमंतीचा भपका अजिबात जाणवला नाही. तेथे भाविकांची गर्दीही फार नव्हती. "पैशाकडे पैसा जातो" असे अगदी सहजी बोलले जाते. इतर भौतिक गोष्टींच्या बाबतीत हे सूत्र नक्कीच लागू पडत असेल. पण, तथाकथित 'श्रीमंत' देवस्थानांच्या बाबतीतही हेच सूत्र लागू पडते की काय, असे मला यापूर्वीही अनेकदा वाटून गेले आहे. तोच विचार पुन्हा मनात येऊन थोडे उदास वाटले. परंतु, मनःशांतीची जी 'श्रीमंती' अनंतपूरच्या या देवालयात मी अनुभवली, त्याने माझ्या मनावरचे मळभ क्षणभरातच दूर होऊन गेले. 

पंधरा-वीस पायऱ्या उतरून तळ्यापर्यंत गेल्यावर देवळात जाण्याची वाट आहे. पुरुषमंडळींना आपापल्या अंगातले सदरे काढून ठेऊन, उघड्या अंगाने दर्शन घ्यावे लागले. पुजाऱ्याने आम्हाला या देवळाबद्दल आणि विष्णूच्या मूर्तीबद्दलच्या अनेक आख्यायिका सांगितल्या. सध्या गाभाऱ्यात असलेली मूर्ती पंचधातूंपासून बनवलेली आहे. पण मूळ मूर्ती,  'कडू-शर्करा-योगम्' अशा अनेक औषधी घटकांपासून तयार केलेली होती. इथल्या मूर्तीपासून परावर्तित होणारे किरण, पुरुषांच्या उघड्या छातीमधून आणि स्त्रियांच्या कुंकवामधून शरीरात प्रवेश करून ऊर्जा देतात, असेही आम्हाला सांगितले गेले. 

तळ्यामध्ये अनेक मासे आणि एक मगर आहे. ती मगर ठराविक वेळी देवळाजवळ येऊन प्रसाद ग्रहण करते, पण मासे खात नाही, असेही आम्हाला सांगितले गेले. त्या मगरीचे दर्शन मिळणे मोठे भाग्याचे समजले जाते. आम्ही देवळामध्ये पोहोचलो त्या वेळी मगरीच्या प्रसादग्रहणाची वेळ नव्हती. देवळाच्या उजव्या बाजूला गेल्यावर कुठेतरी मगर दिसू शकेल असे पुजाऱ्याने सांगितल्यामुळे आमच्या बरोबरचे काहीजण तिकडे गेले. पण बऱ्याच वेळानंतर, 'मगर तुम न आये ... ' असे म्हणत ते सगळे परतले.

देवदर्शन झाल्यानंतर आम्ही कन्हानगड येथील एका छोट्या टेकाडावर, वसलेल्या 'आनंदाश्रम' येथे गेलो. आम्ही आमच्या टेम्पो ट्रॅव्हलरमधून उतरलो, आणि आश्चर्य म्हणजे, आमचे स्वागत करायला, मुंबईमधील सुप्रसिद्ध वकील व माजी न्यायाधीश, श्री. शेखर जहागीरदार, त्यांच्या पत्नी सौ. निशिगंधा जहागीरदार, माझा भाऊ गिरीश आणि वहिनी सौ. प्राची, असे चौघेजण उभे होते. त्या चौघांना बघून आनंदाश्रमात शिरायच्या आधीच आम्हाला खूप आनंद मिळाला.  

कन्हानगड येथेच जन्मलेले श्री. विठ्ठल राव यांनी १९२० मध्ये, वयाच्या छत्तिसाव्या वर्षी संन्यास घेऊन स्वामी रामदास हे नाव धारण केले. श्री. रामदास स्वामींनी १९३१ साली आनंदाश्रमची स्थापना केली. आश्रमात शिरल्यावर उजव्या हाताच्या दालनामध्ये स्वामी रामदास याचे जीवन, त्यांचे विचार आणि कार्य याबद्दल माहिती देणारे फोटो आणि लेख मांडून ठेवलेले होते. त्यांच्याबद्दलचा एक माहितीपटही आम्हाला दाखवला गेला. 'सर्व प्राणीमात्रांमध्ये देवत्व आहे असे समजून त्यांची सेवा करावी', या विचाराचा आणि 'वैश्विक प्रेम' या तत्वाचा त्यांनी पुरस्कार केला. जीवनामध्ये आदर्श आचरण कसे असावे याबाबत स्वामींनी भाष्य केलेले आहे. प्रत्येक व्यक्तीने आपापला व्यवसाय सचोटीने करून, जमेल तेवढी प्राणिमात्रांची सेवा केल्यास, त्याच्या हातून खरी ईशसेवा घडते अशी काहीशी स्वामीजींची शिकवण होती. 

सध्या आश्रमाचे काम पाहणारे एक वरिष्ठ स्वामीजी एका खोलीमध्ये बसलेले होते. त्यांनीही रामदास स्वामींच्या विचारधारेची महती आम्हाला समजावून सांगितली. पण नेमके त्याचवेळी मला थोडा खोकला आल्यामुळे मी खोलीच्या बाहेर आले. पाठोपाठ मला एक फोन आल्यामुळे मी पुन्हा आत जाऊ शकले नाही. त्यामुळे इतर सर्वांना क्रीम बिस्किटांचा पुडा आणि वेलची केळी असा प्रसाद मिळाला, जो मला मात्र मिळाला नाही! पण सौ. प्राचीने मला प्रसाद आणून दिला. त्या क्रीम बिस्किटांची चव विशेष चांगली होती.   

विशेष म्हणजे 'आनंदाश्रमात' सर्व जाती-धर्माच्या लोकांना विनामूल्य प्रवेश आहे. 'आमची इतरत्र कुठेही शाखा नाही' असे पुण्यामध्ये मला सुपरिचित असलेले वाक्य इथेही ऐकायला मिळाले. पण त्यामध्ये मार्दव होते. या स्थळाचे पावित्र्य, शांतता आणि भारलेले वातावरण मी इतरत्र फारसे अनुभवले नव्हते. त्यामुळे त्यांची कोठेही शाखा नसणे हे मला स्वाभाविकच वाटले. या आश्रमाला कुठल्याही प्रकारचे बाजारू स्वरूप आलेले नसल्यामुळे तेथे गेल्यावर मन खरोखरच प्रसन्न झाले. आनंदाश्रमामध्ये जरा उंचावर चढून गेल्यावर, ध्यानधारणेसाठी एक खोली आहे. माझे पाय दुखत असल्यामुळे तिथे मात्र मी गेले नाही. पण बाहेरच्या एका झाडाखालच्या कट्ट्यावर आडवे पडून मी काही मिनिटे ध्यानधारणा करू शकले! 

गिरीश-प्राची आणि जहागीरदार पती-पत्नी १२ तारखेला संध्याकाळच्या विमानाने कण्णूर येथे येऊन पोहोचले होते. अनुभव ट्रॅव्हल्सनेच त्यांची सगळी व्यवस्था केली होती. एका इनोव्हा कारमधून ते कण्णूरहून उत्तरेला प्रवास करून आनंदाश्रम येथे आलेले होते. आनंदाश्रम सोडताना आम्ही दादांची रवानगी इनोव्हा मध्ये केली, आणि श्री. शेखर व सौ. निशिताई जहागीरदार आम्हा इतरांबरोबर टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये आले. हसत-खेळत आम्ही नीलेश्वर बॅकवॉटरचा रस्ता पकडला.  

शनिवार, २७ ऑगस्ट, २०२२

३. मलाबारची सफर- बेकलचा किल्ला


कासारगोडमधील सिटी टॉवर्स हॉटेलच्या खोल्या तशा टिचक्या होत्या पण अगदी स्वच्छ आणि नेटक्या होत्या. वामकुक्षी घेऊन ताजेतवाने झालेले सर्व प्रवासी साडेचारच्या सुमारास तळमजल्यावरच्या रेस्टोरंटमध्ये जमलो. चहा प्यायल्यानंतर  सर्वांना अजूनच तरतरी आली. त्यानंतर आम्ही सगळेजण बेकल किल्ला बघायला गाडीमधून निघालो. आमच्या हॉटेलपासून किल्ला साधारण १६-१७ किलोमीटर अंतरावर होता. सुमारे अर्धातास प्रवास केल्यानंतर आम्ही बेकल किल्ल्यापाशी पोहोचलो. 

बेकलचा किल्ला हा केरळमधील सर्वांत मोठा आणि अत्यंत महत्वाचा सागरी किल्ला आहे. फार पुरातन काळापासून मलबार किनारपट्टीमधे बेकल हे महत्त्वाचे बंदर होते. तिथे पूर्वी कोळाथरी राजवटीने बांधलेला एक साधा किल्ला होता, असे म्हटले जाते. पण आत्ताचा हा दणकट किल्ला, शिवाप्पा नायक या राजाने १६५० साली बांधला. १७६३ साली हा किल्ला मैसूरचा सुलतान हैदर अली याने जिंकला. हैदर अलीचा मुलगा टिपू सुलतान याने बेकलच्या किल्ल्यामध्ये तळ ठोकून मलबार पट्टी काबीज केली. पुढे बरीच वर्षे हा किल्ला टिपू सुलतान याची अत्यंत महत्वाची सैन्यछावणी होती. १७९९ साली, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीबरोबर झालेल्या चौथ्या आणि शेवटच्या युद्धामध्ये टिपू सुलतान मारला गेला. त्यानंतर १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यातच राहिला. या ऐतिहासिक महत्वापेक्षाही बेकल किल्ल्याचे महत्व अलीकडच्या काळात एका वेगळ्याच कारणामुळे वाढलेले आहे. दिग्दर्शक मणिरत्नम याच्या 'बॉंबे' या सिनेमातील 'तू ही रे, तेरे बिना मैं कैसे जिऊं...' या सुमधूर गाण्याचे संपूर्ण चित्रीकरण, या किल्ल्यामध्ये झाले आहे. बेकल किल्ल्यावरचे आमचे फोटो मित्र-मैत्रिणींना आणि मुलांना पाठवल्यावर, त्यांच्याकडून ही माहिती मला कळली.     

किल्ल्याच्या प्रवेशद्वाराभोवती खंदक आहे, आणि बाकी तिन्ही बाजूने तो अरबी समुद्राने वेढलेला आहे. नागमोडी वळण घेत आपल्याला किल्ल्यामध्ये प्रवेश करावा लागतो. चाळीस एकरवर पसरलेला हा किल्ला जवळजवळ समुद्रात घुसलेला आहे असेच वाटते. आम्ही संध्याकाळी पाचच्या सुमारास किल्ल्याच्या आत पोहोचलो. ऊन उतरलेले असल्याने, तिथले वातावरण आल्हाददायक होते. आम्ही भर पावसाळ्यात तिथे गेलेलो असूनही आम्हाला पाऊस लागला नव्हता, पण मान्सूनमधले समुद्री वारे भरभिरत होते. हवेमध्ये ओलसर गारवा होता. किल्ल्याच्या आत सगळीकडे हिरवाई होती. त्यात भर म्हणून, अनेक मोर डौलदार चालीत इकडे-तिकडे फिरत होते, झाडा-झुडुपांवरून उड्या मारत होते. तिथल्या हिरवाईमुळे, केकावलीमुळे, समुद्राच्या लाटांच्या गाजेमुळे आणि तुफान वाऱ्यामुळे  वातावरणांत एकप्रकारची धुंदी आली होती. 

आमचे दादा आता नव्वदीला आलेले असले तरीही छान चालते-फिरते आहेत. पण इतर सर्वांच्या बरोबरीने खूप लांबवर चालायला त्यांना जरा त्रासाचे होते. सहलीमध्ये त्यांना सगळ्यांच्या बरोबर राहता यावे या दृष्टीने, आम्ही अशा प्रवासात त्यांच्यासाठी व्हीलचेयर बरोबर ठेवतो. बेकल किल्ल्यामध्ये आत बरेच चालायचे होते. तिथे आम्ही दादांना व्हीलचेयरवरून हिंडवले. किल्ल्यामध्ये दोन-तीन उंच टेहळणी बुरुज आहेत. त्यापैकी सर्वात मोठ्या टेहळणी बुरुजावर चढण्यासाठी पायऱ्या नाहीत तर अगदी खडी चढण आहे. दादांना व्हिलचेयरवर बसवून, त्या चढणीवरून ढकलत वर नेणे, त्यांना आणि आम्हालाही त्रासाचे झाले असते. त्यामुळे त्या बुरुजाच्या पायथ्याशी व्हीलचेयर वरून दादांना उतरवले. त्यानंतर एखाद्या तरुणालाही लाजवेल अशा उत्साहात आणि वेगाने दादा एका दमात तो बुरुज चढून वर आले. त्यामुळे आमच्याबरोबर आलेल्या सर्वानाच आश्चर्याचा धक्काच बसला! 


त्या टेहळणी बुरुजावरून किल्ल्यातील सर्व भाग, ३६० कोनातला आसपासचा रम्य परिसर आणि बेकलची किनारपट्टी दिसत होती. सागरी मार्गाने येणाऱ्या शत्रूंच्या हल्ल्यांवर लक्ष ठेवण्यासाठी, आणि हल्ला झालाच तर त्यापासून प्रभावीपणे किल्ल्याचा बचाव करण्यासाठी, तटबंदीबर अनेक झरोके आहेत. त्या झरोक्यांची वैशिष्ट्यपूर्ण रचना अतिशय कल्पकतेने केलेली आहे. वेगवेगळ्या आकारांचे हे झरोके तटबंदीवर वेगवेगळ्या उंचीवर, आणि वेगवेगळ्या कोनांमध्ये आहेत. किल्ल्यापासून कमी-जास्त अंतरावर असलेल्या शत्रूच्या नौकांना टिपण्यासाठी नेमक्या कोनातून तोफांचा मारा करता यावा यासाठी झरोक्यांचा वापर केला जात असे. दारुगोळा साठवण्यासाठी किल्ल्याच्या आत एक भलेमोठे कोठारही आहे. पण ते सध्या बंद आहे. किल्ल्यामध्ये असलेली दोन भुयारे  किनारपट्टीवर उघडतात. पण ते भुयारी मार्ग सध्या बंद करून ठेवलेले आहेत. किल्ल्याच्या आत एक भलीमोठी विहीर आहे. किल्ल्यामधून खाली किनारपट्टीकडे जायला एक चांगली दगडी पायवाट आहे. 

बेकल किल्ला पाहून आल्यावर आम्ही सर्व सहप्रवासी 

किल्ला बघून परतताना आम्ही बेकल बीच वर न जाता, वाटेतल्या एका छोट्या पुळणीवर थांबलो. दादाही मोठ्या उत्साहाने तिथे उतरले. संध्याकाळी हॉटेलवर परत येईपर्यंत आम्ही बरेच दमलेले होतो. आम्ही पुण्याहून निघण्यापूर्वी जयंताने, माझ्या मोठ्या भावाने, अगदी प्रेमाने  आनंदला, 'One for the road' असे म्हणत,  'Malibu Rum' ची एक छोटी बाटली दिली होती. दादांनी आणि आनंदने त्याचा आस्वाद घेतला. इतर दर्दी मंडळींनी, हॉटेलबाहेर जाऊन श्रमपरिहारासाठी पेय विकत आणले ही माहिती आम्हाला जेवताना मिळाली. गप्पा मारत निवांतपणे जेवण झाले. त्यावेळीच प्रत्येकाने आपापली ओळख करून दिली. दुपारचे जेवण उशिरा झालेले असल्याने मी जेवले नाही. पण जेवणानंतर आलेल्या फालुद्याची चव बघितली. ती गोड चव जिभेवर आणि दिवसभरातील गोड आठवणी मनांमध्ये घोळवत मी निद्राधीन झाले.  


शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०२२

२. मलाबारची सफर- कासारगोड

 

आम्ही मंगळुरुला ११ तारखेला दुपारी पोहोचलो होतो. 'अनुभव ट्रॅव्हल्सचे' निलेश राजाध्यक्ष आणि सुमंत पेडणेकर हे दोन प्रतिनिधीही ११ तारखेला संध्याकाळी आमच्याच हॉटेलमध्ये डेरेदाखल झाले. रात्रीच्या जेवणाच्या वेळी आम्हाला भेटून त्यांनी आमची अगदी आस्थेने विचारपूस केली. तसेच, दुसऱ्या दिवशीचा, म्हणजे १२ ऑगस्टचा कार्यक्रम काय असणार आहे याची कल्पना आम्हाला दिली. १२ ऑगस्टला  सकाळी ११ वाजेपर्यंत सामान-सुमान बांधून आम्ही तयार राहावे, असे त्यांनी आम्हाला सांगितले. 'अनुभव ट्रॅव्हल्स'ची टेम्पो ट्रॅव्हलर गाडी मुंबईहून येणाऱ्या सहप्रवाशांना विमानतळावरून घेऊन, त्यानंतर पद्मश्री हॉटेलमधून आम्हा तिघांना घेऊन पुढे कासारगोडकडे जाईल, असेही सांगितले. 

१२ ऑगस्टला सकाळी अजूनही  माझ्या अंगात ताप होताच. तरीही, मला सकाळी  नेहमीसारखी अगदी व्यवस्थित  भूक लागली होती. मला एक महिन्यापूर्वीच दुसऱ्यांदा (त्या आधी दीड वर्षापूर्वी पहिल्यांदा) कोव्हिड होऊन गेला होता. पण त्यावेळीही कधी भूक काही कमी झाली नव्हती! कोव्हिड झाल्यावर भीती वाटण्याच्या ऐवजी आता या निमित्ताने का होईना आपले वजन थोडेफार कमी होईल की काय, असा विचार मनाला सुखावह वाटला होता. पण कसले काय, त्याही वेळी भूक लागतच होती. एकीकडे आहार तसाच राहिला पण  रोजचा व्यायाम मात्र कमी झाला. या दोन्ही गोष्टींचा एकत्रित परिणाम अंगावर दिसू लागला होता. तरीही खादाडीचे व्यसन सुटण्याची शक्यता नव्हती!

'पद्मश्री' हॉटेलच्या खालच्या मजल्यावर 'पद्मश्री रेस्टॉरंट' होते. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास तिथे नाश्ता करायला गेलो. आम्ही तिघांनी मसाला डोसा, इडली-वडा आणि मुख्य म्हणजे मंगळुरुचे सुप्रसिद्ध बन्स व त्यानंतर फिल्टर कॉफी, असा भरपेट नाश्ता केला. पण त्यातल्या कुठल्याही पदार्थाला स्पर्श करण्याच्या आधी, त्यांचे वेगवेगळ्या बाजूंनी फोटो काढले. ते फोटो मित्र-मैत्रिणींच्या आणि नातेवाईकांच्या व्हाट्सएप् ग्रुप्सवर पाठवले. खरंतर पदार्थाचे असे फोटो काढून ते वेगवेगळ्या ग्रुपवर पाठवण्याचा आनंद जास्त असतो, की त्या पदार्थांचा आस्वाद घेण्याचा आनंद जास्त असतो, हे ठरवणे  हल्ली अवघड होऊन गेले आहे! फोटोमधे ते पदार्थ अगदी मोहक दिसत असले तरी त्यांची चव तशी बेताचीच होती. पण हलक्या गोडसर चवीचे, भटुऱ्यासारखी आतून छानशी जाळी असलेले, 'मंगळुरु बन्स' मात्र मला आवडले. 


सकाळी अंघोळी करून, निवांतपणे नाश्ता खाऊन व सामानसुमान बांधून ११ वाजेपर्यंत आम्ही तयार होतो. पण मुंबईहून मंगळुरुला  येणारे विमान जरा उशिरा आले. त्यामुळे आमच्या सहप्रवाशांना घेऊन येणारी गाडी पद्मश्री हॉटेलला जरा उशीरानेच पोहोचली. शेवटी साधारण दुपारी १२च्या सुमारास आम्ही आमच्या सामानासह गाडीत चढलो आणि तिथून आमच्या 'Malabar Coast-a drift experience'  या सहलीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.  

आम्ही एकूण दहाजण या सहलीमध्ये सहभागी झालो होतो. सोनम-शुभेन्दू साहनी, हे तिशीतले जोडपे, श्री. प्रफुल्ल व सौ. स्नेहल पेंडसे, श्री. अशोक व सौ. अस्मिता म्हात्रे, कु. वृंदा जोशी आणि आम्ही तिघे. आधी WhatsApp ग्रूप तयार केलेला असल्याने, सहप्रवाशांची नावे माहिती होतीच. आम्ही गाडीमध्ये बसल्यावर सगळ्यांशी जुजबी तोंडओळखही झाली. टेम्पो ट्रॅव्हलर गाडी वातानुकूलित होती. बस चालक श्याम गाडी सावधानीने चालवत होता. तासभर प्रवास केल्यावर आम्ही कासारगोडच्या 'सिटी टॉवर्स' या हॉटेलमध्ये पोहोचलो. 

अनुभव ट्रॅव्हल्सच्या गाडीला कर्नाटकातून केरळमध्ये शिरण्यापूर्वी एक परवाना काढावा लागला. त्यामुळे वाटेत एके ठिकाणी थोडावेळ थांबावे लागले. त्यावेळी आता आपण कर्नाटकमधून आता केरळमधे शिरणार आहोत हे कळले. नाहीतर स्थानिक भाषेतील पाट्यांवरून आम्हाला काही बोध होणे शक्यच नव्हते. त्या पाट्यांवरच्या अक्षररूपी जिलब्यांचे वळण थोडेफार बदललेले आहे, इतकेच काय ते कळत होते. पण ते सगळे लिखाण अगम्य होते. नाही म्हणायला काही ठिकाणी इंग्रजीमधून पाट्या होत्या. त्यामुळे वाटेत लागणाऱ्या गावांची नावे वाचता येत होती. 
 
'सिटी टॉवर्स' या हॉटेलच्या तळमजल्यावरच्या रेस्टोरंटमध्ये आमच्या ग्रुपसाठी जेवणाची खास वेगळी सोय केली होती. जेवणामध्ये चमचमीत व चविष्ट शाकाहारी आणि सामिष पदार्थांची रेलचेल होती. अनुभव ट्रॅव्हल्सच्या सहलीमध्ये जेवण-खाण्याची बरीच चंगळ असते, हे ऐकून होतेच. कासारगोडपासूनच तो अनुभव सुरु झाला. श्री निलेश राजाध्यक्ष कुणाला काय हवे-नको आहे याची जातीने चौकशी करत होते. आम्हाला आग्रह करकरून जेवण वाढतही होते. दादांना चावायला सोपे पडावे म्हणून, नीलेश राजाध्यक्ष यांनी गरमागरम मलाबार पराठा मागवला. आम्ही इतरांनीही ते लुसलुशीत, लच्छेदार पराठे चवीने खाल्ले. फ्राईड चिकन, मटार-पनीर, चमचमीत चिकन रस्सा, डाळ फ्राय, मिक्स भाजी, जिरा राईस, सलाड, वेगवेगळ्या प्रकारच्या रोट्या आणि त्यानंतर दुधी हलवा असे रुचकर जेवण झाले. तासाभराच्या विश्रांतीनंतर साडेचारच्या सुमारास चहा घेऊन बेकल किल्ला बघायला बाहेर पडायचे आहे, असे निलेश यांनी आम्हा सर्वांना सांगितले. सगळेच दमलेले असल्यामुळे, तडक आपापल्या खोलीत जाऊन सगळ्यांनी ताणून दिली. 




गुरुवार, २५ ऑगस्ट, २०२२

१. मलाबारची सफर- मंगळुरु

मंगळुरु बद्दल मला फक्त 'मंगळुरी कौले', इतकेच काय ते ऐकून माहिती होते. पण प्रत्यक्षात मंगळुरुला जाण्याचा कधी योग येईल असे वाटले नव्हते. या वर्षी ऑगस्ट महिन्यात, जोडून सुट्ट्या येत आहेत तर आपण सगळे मिळून, दादांना घेऊन कुठेतरी प्रवासाला जाऊया, अशी टूम देवाशिषने, म्हणजे माझ्या भाच्याने काढली. मग इथे जाऊया का तिथे जाऊया? असे करता करता त्याची गाडी, 'सध्या कुठेच नको. दिवाळीच्या सुट्टीत जाऊया' इथपर्यंत येऊन थांबली. प्रवासाला जायला मी आणि आनंद तर खुश होतोच, पण दादाही उत्सुक होते. आता त्या बेतावर पाणी पडणार, या कल्पनेने दादा हिरमुसले झाले. मी आणि आनंदने जवळपासच्या अनेक रिसॉर्टस्  मधे जागा मिळते आहे का याबाबत फोनवर चौकशी केली. पण लागून सुट्ट्या आलेल्या असल्याने कुठेही जागा उपलब्ध नव्हती. 

मागे ज्योत्स्नाकडून, म्हणजे माझ्या चुलत बहिणीकडून 'अनुभव ट्रॅव्हल्सच्या'  'कोस्टल कर्नाटक' सहली बद्दल, बरेच कौतुक ऐकले होते. ते आठवल्यामुळे मी 'अनुभव  ट्रॅव्हल्सच्या' पुणे ऑफिसला फोन करून त्यांची एखादी सहल जाणार आहे का? याची चौकशी केली. नेमके आम्हाला हव्या त्या दिवसातली 'मलाबार कोस्ट' ची त्यांची सहल निघणार होती आणि त्यात पाच जागाही शिल्लक होत्या. त्या चार दिवसांच्या सहलीची कार्यक्रम पत्रिका WhatsApp वर मागवून घेतली. दादांनी मलाबार किनारपट्टी आधी बघितलेली नव्हती. त्यांना या सहलीची रूपरेषा आवडली. त्यामुळे आम्ही लगेच पैसे भरून सहलीला जायचे निश्चित करून टाकले. आमच्या व्याह्यांना आणि विहीणबाईंना, म्हणजे डॉ राजेंद्र देवपूरकर सरांना आणि सौ. संध्याताईंना आमच्याबरोबर येण्याचा आग्रह केला. पण ते येऊ शकले नाहीत.  

१२ ऑगस्टच्या सकाळपासून मंगळुरु एयरपोर्टवरून चालू होऊन, मलाबार किनारपट्टीवरून दक्षिणेला प्रयाण करत सोळा ऑगस्टला सकाळी ती सहल कोळीकोडला संपणार होती. दादांना तो प्रवास सुखाचा व्हावा म्हणून आम्ही एक दिवस आधी, म्हणजे ११ ऑगस्टला मंगळुरुला पोहोचायचे आणि १६ ऑगस्टनंतर एक दिवस कोळीकोड येथे थांबून मगच परतायचे असे ठरवले. त्याप्रमाणे जाताना मुंबई-मंगळुरु व परतीचे कोळीकोड-मुंबई अशी विमानाची तिकीटे हातोहात काढून टाकली. 

१० ऑगस्टला दिवसभराची सगळी कामे संपवून रात्रीपर्यंत आम्ही टॅक्सी करून मुंबईला गिरीश-प्राचीकडे मुक्कामाला पोहोचलो. रात्री सगळ्यांना उकडीचे मोदक करून घातले. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करून, विमान सुटायच्या वेळेच्या दोन तास आधी विमानतळावर पोहोचलो आणि सामान चेक-इन करून निश्चिंत झालो.  शाळेत माझ्या मागे एक वर्ष असलेली 'अर्जुन पुरस्कार विजेती' वंदना शानभाग मंगळुरुला आहे असे कळले होते. तिच्याशी संपर्क साधला, पण नेमकी त्यावेळी ती चिकमगळूरला गेलेली असल्याचे कळले. 

आमच्याबरोबर गिरीश आणि प्राचीही येऊ इच्छितात असे आदल्या रात्री कळले होते. पण रात्री 'अनुभव ट्रॅव्हल्स' शी बोलणे होऊ शकले नाही. सकाळी मुंबई विमानतळावरून मी त्यांच्याशी संपर्क साधला. पण इतक्या ऐनवेळी नवीन प्रवाशांना घेणे शक्य नाही असे उत्तर मिळाले. त्यामुळे जरा वाईट वाटले. 

मुंबई-मंगळुरु विमान प्रवास अगदी अल्लद झाला. मंगळुरु विमानतळ अगदी स्वच्छ आहे. जागोजागी  कलात्मक सजावट केलेली आहे. विमानतळावरून टॅक्सी करून हॉटेलमध्ये येताना, वाटेवर फळे विकत घ्यायला एका दुकानात थांबले. पूर्वी कधीही न बघितलेले, एक लालभडक्क रंगाचे काटेरी फळ मला तिथे दिसले. जेवण करून, फलाहार केला आणि थोडी वामकुक्षी घेतली. संध्याकाळी असिलताशी फोनवर बोलणे झाले तेव्हा त्या फळाचे नाव, 'राम्बुतान' आहे असे कळले. ती फळे फारच मधुर आणि रसाळ होती. 

सकाळपासून मला जरा बरे वाटत नव्हते. दुपारी मात्र चांगलाच ताप भरला. आता हा ताप सहलभर मला 'ताप' देणार की काय, हा विचार मनाला अस्वस्थ करत होता. 

मंगळुरु विमानतळ 


लालभडक्क राम्बुतान !

गुरुवार, १७ मार्च, २०२२

उधळण रंगांची...

या वर्षीच्या होळीच्या सुमारास 'काश्मीर फाईल्स' हा सिनेमा प्रदर्शित झाल्यामुळे, समाजमाध्यमांमध्ये अनेक रंगांची उधळण चालू आहे. 

१९८० च्या दशकात काश्मीर खोऱ्यात वास्तव्यास असलेल्या हिंदूंच्या अमानुष नरसंहाराचे विदारक चित्रण 'काश्मीर फाईल्स' सिनेमामध्ये केले आहे. दाखवलेल्या सगळ्या घटना सत्य आहेत. पण त्या एकाच कुटुंबातील व्यक्तींवर आणि एका ठराविक काळात घडल्या आहेत असे नाही. पूर्ण सिनेमा व त्यातील प्रसंग 'रक्तरंजित' आहेत. त्या घटनांचा आणि त्या दृश्यांच्या लाल रंगाने आपल्या मनांत काळे ढग निर्माण झाल्याशिवाय राहत नाहीत. 

आपण हा सिनेमा बघायचा नाही, असा निश्चय काहीं लोकांनी केलेला आहे. काहींनी त्यापुढे जाऊन, तो इतरांनीही सिनेमागृहात जाऊन पाहू नये यासाठी प्रयत्न केलेले आहेत. पण अनेक जण स्वतः सिनेमा बघत तर आहेतच पण इतरांनाही सिनेमा पाहण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. सिनेमा पाहून आलेल्या लोकांच्या मनांमध्ये मात्र, जातीधर्मातील तेढीच्या अनेक छटा दिसत आहेत.

कश्मीर खोऱ्यात अनेक वर्षांपासून काश्मीरी हिंदूंचा छळ, त्यांचे धर्मांतर आणि स्त्रियांची अब्रू लुटणे हा प्रकार चालत होता. पण या कारवायांना १९८० च्या दशकात ऊत आला. त्या काळात अल्पसंख्याक, निःशस्त्र काश्मिरी हिंदूंना कमलीची दहशत बसवून  त्यांचे हत्याकांड केले गेले. हे सत्य या सिनेमात दाखवले गेले आहे. 

पण, "असा काही नरसंहार घडला हेच मुळी खोटे आहे", असे सांगणारे काहीजण आहेत. अशा लोकांमध्ये मुख्यत्वे, धर्मनिरपेक्षतेचा मुखवटा धारण करणाऱ्या, डाव्या विचारसरणीच्या लोकांचा भरणा आहे. देशाचे तुकडे करण्याची घोषणाबाजी करणाऱ्या 'आझादी गँग'चा मुखवटा या सिनेमाने फाडून काढला आहे. त्यामुळे, मुखवट्यामागचे त्यांचे  रंग उडालेले चेहरे समोर आलेले आहेत. इतर सगळ्या धर्मांतील लोकांच्या छळाचे भांडवल करून गळे काढणाऱ्या या 'धर्मनिरपेक्ष' लोकांना, हिंदूंचा झालेला छळ अमान्य करणे सोयीचे वाटते आहे. 

बहुसंख्याकांकडून अल्पसंख्याकांचे शोषण किंवा हत्या होणे हे निंदनीयच आहे. अर्थात, काश्मीरमध्ये अल्पसंख्याक पंडितांवर झालेले अत्याचार निंदनीय असलेच पाहिजेत. पण एकंदरीत काश्मीरबाबतच्या तोकड्या ज्ञानामुळे, एक मोठाच गैरसमज भारतीय समाजात पसरलेला आहे. 

काश्मिरी पंडित म्हणजे केवळ ब्राह्मणसमुदाय आहे असे अनेकजण समजतात. प्रत्यक्षात, काश्मिरी हिंदूंमध्ये अधिकांश लोक जरी ब्राह्मण असले तरी, 'कारकून', 'वाणी' अशा इतर जातींचे लोकही आहेत. त्यांच्यावरही अत्याचार झालेच आहेत आणि त्यांनाही जिवाच्या भीतीने काश्मीर सोडून पळावेच लागले आहे. प्रत्यक्षात, 'पंडित' हा शब्द काश्मीरमध्ये 'हिंदू' या शब्दाचा समानार्थी शब्दच म्हणावा लागेल. दहशतवादामुळे हिंदूंना जसे काश्मीर खोरे सोडावे लागले तसेच अनेक शीख कुटुंबियांनाही सोडावे लागले हेही आपल्याला लक्षात घेतले पाहिजे.   

पण हे सत्य समजून न घेता, सिनेमात दाखवलेल्या सत्य घटनांना काही लोक जातीय रंग देत आहेत. "या चित्रपटात ब्राह्मणांवरील अत्याचारांचे विनाकारण उदात्तीकरण केले आहे", अशी मुक्ताफळे उधळणारेही काही आहेत. त्याही पुढे जाऊन, "ब्राह्मणांची जातच भेकड. आम्ही असतो तर शर्थीने लढलो असतो आणि शेजारचा देशही काबीज केला असता" अशा फुशारक्या मारणारेही अनेक आहेत. हे दोन्ही प्रकारचे लोक, त्यांच्या मनातल्या काळ्या रंगाच्या छटांचे दर्शन घडवत आहेत. 

काश्मिर खोऱ्यामध्ये काही शतकांपूर्वी, दहशतीच्या जोरावर मुस्लिमांनी हिंदूंचे धर्मांतर केले. धर्मांतर न करणाऱ्या हिंदूच्या हत्या केल्या. अशा प्रकारे हिंदूंना जीवाची भीती घालून भगव्या रंगाचे उच्चाटण करण्यात आले. तसाच प्रकार १९८८ सालापासून पुढे घडू लागला. त्या काळातले सत्य 'काश्मीर फाईल्स' हा सिनेमा आपल्यापुढे अत्यंत प्रभावीपणे मांडतो. त्यामुळे न्याय्यनिष्ठ आणि संवेदनशील वृत्तीच्या प्रत्येक व्यक्तीला मनापासून वाईट वाटते. 

परंतु, ते सत्य पाहिल्यावर भडकून जाऊन, "संपूर्ण देशातून हिरव्या रंगाचे पूर्णपणे उच्चाटण केले पाहिजे", अशी दुसऱ्या टोकाची भूमिका घेणारे महाभागदेखील आहेत. ही भूमिका देशहिताच्या दृष्टीने वाईट आहेच पण ती तर्कसंगतही नाही. कारण, आपल्या धर्मनिरपेक्ष देशात रक्तपाताचा लाल रंग वगळता, इतर कुठल्याही एका रंगाचे उच्चाटण करणे, हे आपले ध्येय असूच शकत नाही.

आपल्या राष्ट्रध्वजातील सर्व रंगांना एकत्र ठेवणे, आणि आपल्या देशाच्या खऱ्या शत्रूंना ओळखून त्यांना नेस्तनाबूत करणे, हेच ध्येय आपण सर्वांनी मनात ठेवले पाहिजे. 

होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!








सोमवार, ७ मार्च, २०२२

मी तर घरीच असते!

अलीकडेच कुठल्याशा समारंभात एका मध्यमवयीन बाईंशी माझी कोणीतरी ओळख करून दिली. त्यांचा नवरा उच्च्पदस्थ अधिकारी होता. बोलताना सहजच  मी त्या बाईंना विचारले,
"तुम्ही काय करता?"
अगदी कसनुसं हसून त्या म्हणाल्या,
"तशी मी डबल ग्रॅज्युएट झालेली आहे. पण मी घरीच असते."

त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव आणि बोलण्याचा सूर, त्यांच्यातला न्यूनगंड दर्शवत होते. त्या बाईंशी बोलत असतानाच मला सौ. सिन्हा आठवल्या. 

पंधरा-सोळा वर्षांपूर्वी आनंदचे पोस्टिंग दिल्लीला होते. मुलांना घेऊन मी पुण्यातच राहत होते. असिलताने, आमच्या मुलीने, नुकतेच भारताच्या ऍस्ट्रॉनॉमी ऑलिम्पियाड संघात स्थान मिळवून, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. गणित ऑलिम्पियाडच्या राष्ट्रीय शिबिरातही तिची निवड झालेली होती. ही सर्व माहिती आनंदबरोबर काम करणाऱ्या एका बिहारी सेनाधिकाऱ्याला समजली. त्याच्या ओळखीतल्या, श्री. सिन्हा या सनदी अधिकाऱ्याचा मुलगादेखील त्याच स्पर्धांसाठी तयारी करत होता. असिलताची यशोगाथा त्या सेनाधिकाऱ्याने सिन्हा कुटुंबियांना सांगितली असणार.

थोड्याच दिवसात मला सौ. सिन्हा यांचा दिल्लीहून फोन आला. "तुमच्या मुलीने या परीक्षांची तयारी कशी केली? कोणकोणती पुस्तके वापरली?" त्या फोनवर मला प्रश्न विचारू लागल्या. माझी उत्तरे त्या लिहून घेत होत्या. 

चार दिवसांनी परत सौ. सिन्हांचा मला फोन आला. त्या स्पर्धापरीक्षांची काही पुस्तके दिल्लीमध्ये उपलब्ध नसल्याने, ती पुण्यात विकत घेऊन, मी  त्यांना पार्सल करावीत अशी विनंती त्यांनी मला केली.  

मुलांना सुट्टी लागत असल्याने दोनच दिवसांनी, मी आणि मुले दिल्लीला जाणार होतो. त्यामुळे, पुस्तके सोबतच घेऊन येईन असे मी त्यांना सांगितले.
 
दिल्लीला पोहोचल्यानंतर मी सौ. सिन्हांना फोन केला. 
 
"स्वातीजी, क्या आप किताबें भिजवा सकती हैं? या फिर आप स्वयं लेकर हमारे घर आईए ना। उसी बहाने मिलना भी हो जाएगा। असलमें, मेरे घरमें कई बच्चे पढ रहें हैं, नहीं तो मैं स्वयं किताबे लेने आ जाती।" 
बाईंनी अत्यंत मृदू स्वरात मला सांगितले. 

"ही 'कई' बच्चेकंपनी कुठून आली?" हा प्रश्न मला पडला पण सौ. सिन्हांच्या मुलाचे मित्र त्याच्याबरोबर अभ्यास करत असतील असा विचार मी केला. ठरलेल्या वेळी मी त्यांच्या घरी गेले. दिल्लीतल्या रामकृष्णपुरम या भागात, सरकारी अधिकाऱ्यांच्या वसाहतीत त्यांचा खूप मोठ्ठा चार बेडरूमचा फ्लॅट होता. प्रशस्त दिवाणखान्याची अगदी साधी सजावट होती. चारही बेडरूम्सची दारे बंद होती. 

सिन्हा बाईंनी हसतमुखाने  माझे स्वागत केले. चहापानाबरोबर आमच्या गप्पा सुरु झाल्या. बोलण्या-बोलण्यात त्यांनी मला  सांगितले,
"मैं घरमेंही रहती हूँ। सब बच्चोंकी पढाई, खाना-पीना, किताबें, नोट्स सब मुझे देखना पड़ता है। कुछ बच्चों को मैं गणित सिखाती भी हूँ।"

उत्सुकतेपोटी, शेवटी मी त्यांना त्यांच्या "बच्चेकंपनीबद्दल" विचारलेच. 

"हमारा इकलौता बेटा है, जो हमारी बेडरूम में पढ रहा है। बाकी तीनों बेडरूम में दूसरे बच्चे पढ रहें हैं।"

सौ. सिन्हांनी मला पुढे सांगितले की, एका बेडरूममध्ये यूपीएस्सीची तयारी करणारे तीन तरुण, दुसऱ्या बेडरूममध्ये मेडिकलची तयारी करणारी दोन मुले, तर तिसऱ्या बेडरूममध्ये आय.आय.एम. च्या प्रवेशपरीक्षेची तयारी करणारी काही मुले होती.

"हा प्रकार तरी काय असेल?"  मी बुचकळ्यात पडले होते. 

माझा प्रश्नार्थक चेहरा पाहून सिन्हा बाईंनीच खुलासा केला. 

श्री. सिन्हा बिहारमधील अगदी गरीब कुटुंबात जन्मलेले, पण जात्याच हुशार होते. नोकरी करत-करत ते पदवीधर झाले आणि नंतर दिल्लीला आले. दहा-बारा बिहारी मुलांबरोबर ते एका खोलीत राहिले. अर्धवेळ नोकरी करून, स्वहस्ते जेवण शिजवून खात, कष्टाने अभ्यास करून श्री. सिन्हा पहिल्याच प्रयत्नात  यूपीएससी परीक्षा अव्वल दर्जाने उत्तीर्ण झाले आणि सनदी अधिकारी म्हणून दिल्लीतच रुजू झाले. 

सिन्हा पती-पत्नींनी लग्नानंतर, त्यांच्या नात्या-गोत्यातल्या, ओळखीपाळखीच्या अनेक हुशार मुलांना दिल्लीत आपल्या सरकारी निवासात ठेऊन घेतले. त्यांच्या घरीच राहून, अभ्यास करून अनेक मुले सनदी अधिकारी झाली, कित्येक मुले आयआयटी, आयआयएम मध्ये दाखल झाली.  

सिन्हा साहेब बढती मिळवत, उच्च पदांवर चढत गेले तरी सिन्हा पती-पत्नींनी त्यांचा शिरस्ता तसाच चालू ठेवला. पुढे-पुढे तर बिहारच्या खेड्यातील, अनेक अनोळखी होतकरू, हुशार विद्यार्थ्यांना हुडकून आणून त्यांनी आपल्या घरी ठेऊन शिकवले. 

मी अवाक झाले. आणि मग मला जाणवले, सिन्हा बाईंच्या, "मैं घरमेंही रहती हूँ।" या वाक्यामध्ये कमीपणाचा कुठेही लवलेश नव्हता, उलट खूप अभिमान होता. 

"मी घरीच असते" असे सांगताना स्त्रियांच्या बोलण्यातला कमीपणाचा भाव मला नेहमीच खटकतो. आपल्या आधीच्या पिढ्यांमधल्या बहुतांश बायका घरीच असायच्या.   

माझी आई सतत स्वयंपाकघरात आणि आल्या-गेल्यांचे आगत-स्वागत करण्यात व्यग्र असायची. माझ्या सासूबाई शिवणकाम, विणकाम, वाचन याबरोबरच घरात मुलांची शिकवणीही घ्यायच्या. माझी मोठी काकू तिच्या मोलकरणीच्या मुलांना इंग्रजी बोलायला शिकवायची. तसेच, माझ्या आत्या, मावशा आणि इतरही कितीतरी बायका घरीच असायच्या. सुस्थितीत असलेल्या या सगळ्या बायका, मुलांचे संगोपन, स्वयंपाक, घरची टापटीप अशा कितीतरी गोष्टी करायच्या. अनेक बायका, गृहउद्योग करून आपापल्या संसाराला हातभार लावताना आपण  बघतोच. 



"मी तर घरीच असते!" हे कमीपणाने सांगणाऱ्या स्त्रियांना मला नेहमीच सिन्हा बाईंचे उदाहरण सांगावेसे वाटते. तसेच हेच वाक्य, मोठ्या अभिमानाने उच्चारता येईल, असे काहीतरी  करा असे त्यांना सुचवावेसे वाटते.

वर्षातला एखादाच दिवस 'महिला दिन' म्हणून साजरा करण्याऐवजी, एकही महिला कधीही 'दीन' कशी होणार नाही, याचा विचार करणे मला अधिक महत्वाचे वाटते.    
 
 


गुरुवार, ३ मार्च, २०२२

रताळ्यांना कचऱ्यातच काढले पाहिजे!

या लेखाचे शीर्षक वाचून तुम्हाला जरा आश्चर्यच वाटले असेल. गावाकडच्या मराठी भाषेमध्ये 'रताळ्या' हा एक तुच्छतादर्शक शब्द आहे. साधारणपणे एखाद्या रेम्याडोक्याच्या व्यक्तीसाठी हा शब्द वापरला जातो. खेडयापाडयात, एखाद्या पुरुषाने तरुणींची छेडछाड केली तर, चिडून जाऊन, त्या पुरुषाला कधीकधी 'का रे, ए रताळ्या, तुला काही आई बहिणी नाहीत का?' असे मुली दटावतात. 

त्याचप्रमाणे, एखाद्याला कचऱ्यात काढणे, म्हणजे कस्पटासमान समजणे, या वाक्प्रचाराचा अर्थही अपमानास्पद असाच आहे.  

व्हॅट्सऍप आणि फेसबुकवर बागकामविषयक चर्चा व मार्गदर्शन करणाऱ्या काही ग्रुप्सची मी सदस्य आहे. "गच्चीवरील मातीविरहित बाग संस्था" हा फेसबुक ग्रुप मला आवडतो. या ग्रुपवरील सदस्यांच्या पोस्ट आणि त्यावर चाललेली चर्चा वाचून, मला बागकामाविषयी खूप चांगली माहिती मिळते.  

माझ्या गच्चीवरच्या बागेत, थर्माकोलच्या एका डब्यात लावलेली रताळी शिवरात्रीच्या निमित्ताने मी काढली. त्या रताळ्यांचे वजन सुमारे दीड किलो भरले. वजनकाट्यावर ठेवलेल्या त्या रताळ्यांचा फोटो मी काढला, आणि "आज एका थर्माकोलच्या डब्यातली रताळी काढली! मातीविरहित बागेतून आलेले पीक!" अशा शीर्षकाखाली तो फोटो,  "गच्चीवरील मातीविरहित बाग संस्था" या ग्रुपमध्ये टाकला. त्यावर अनेकजणांनी कौतुक केले व  मातीशिवाय रताळी कशी उगवली? असा प्रश्न मला विचारला. उत्तरादाखल मी खुलासा केला होता.   

 


लोकांनी फेकून दिलेल्या थर्माकोलच्या, पत्र्याच्या, व प्लॅस्टिकच्या डब्यांमधे रोपे लावून, आमच्या इमारतीवरच्या गच्चीमध्ये मी माझी बाग उभी केली आहे. तिथेच, प्लॅस्टिकच्या मोठमोठ्या कचराकुंड्या आणि थर्माकोलच्या डब्यांमध्ये मी कंपोस्ट तयार करते. त्या डब्यांमधे आणि कचराकुंड्यांमध्ये मी गांडुळे सोडलेली आहेत. त्यामुळे गांडूळखत व कंपोस्ट एकत्रच तयार होत असते. ते चाळल्यावर खाली जी खतमिश्रित माती मिळते त्यातच मी भाजी-पाला लावते. चाळणीत उरलेला चाळ एका मोठ्या थर्माकोलच्या डब्यात मी साठवते. 

साधारण दीड वर्षांपूर्वी, माझ्या आतोबांनी, त्यांच्या बागेतल्या रताळ्याच्या वेलाचा एक लांबलचक तुकडा मला दिला. ते रोप लावण्यासाठी एकही रिकामा डबा त्यावेळी माझ्याकडे नसल्यामुळे, वेलाचा तो तुकडा मी पाण्यात घालून ठेवला होता. काही दिवसातच त्याला पुष्कळशी मुळे फुटली. अखेर, त्या वेलाचे एक-दोन लहान तुकडे कापले आणि खताचा चाळ साठवलेल्या डब्यात खुपसून ठेवले. 

गंमत म्हणजे, ती रोपे तिथे रुजली. त्यानंतरही मी त्या डब्यात चाळ व पाणी घालतच राहिले. मागच्या वर्षी दोनवेळा रताळ्याचा वेल उपसून, त्याखाली लागलेली रताळी मी काढली होती. पण, गेल्या सात-आठ महिन्यांत मात्र मी रताळी काढली नव्हती. 

यावेळी आलेली ती सणसणीत रताळी बघून मला आनंद झालाच, पण  इतरांनीही कौतुक केल्यामुळे तो द्विगुणित झाला. रताळ्याचा वेल लावलेल्या डब्यात चाळ, म्हणजेच झाड-पाल्याचे मोठे-मोठे तुकडे, असल्यामुळे त्या डब्यात हवा खेळती राहिली होती . तसेच, गांडुळांच्या अविरत कार्यामुळे तेथे गांडूळखतही तयार होत राहिले होते. त्यामुळेच त्या रोपाला भरपूर पोषण मिळून जोरदार पीक आले असावे, असा निष्कर्ष  मी काढला .  

आतोबांकडून आणलेल्या त्या वेलाचे एक-दोन लहान तुकडे, शिरीष गोडबोले या माझ्या सोलापूरस्थित भावालाही दिले होते. महाशिवरात्रीच्या दिवशी, शिरीषने त्याच्याकडे उगवलेल्या रताळ्यांचा एक फोटो मला पाठवला. रताळ्यांचे आकारमान लक्षात यावे म्हणून त्याने त्या रताळ्यांच्या शेजारी एक बॉलपेन ठेवले होते. "डाव्या बाजूचे कचऱ्यातले, आणि उजव्या बाजूचे मातीतले" अशी तुलनात्मक टिप्पणी फोटोखाली त्याने लिहिली होती. कचऱ्यात उगवलेले ते धष्टपुष्ट रताळे बघून मी पटकन म्हणून गेले, "रताळ्यांना कचऱ्यातच काढले पाहिजे!"

एखादे पीक काढणे म्हणजेच एखादे पीक घेणे, असा एक अर्थ अभिप्रेत असतो. पण, "रताळ्या", आणि "कचऱ्यात काढणे" यांचा बोली भाषेतला अर्थ, आणि "रताळ्यांना कचऱ्यातच काढले पाहिजे!" या वाक्यामधे मला प्रत्यक्षात अभिप्रेत असलेला अर्थ, यांच्यामधला विरोधाभास लक्षात आल्याने मला खूपच मजा वाटली.

अचानकच झालेल्या या शाब्दिक कोटीमुळे, मायमराठीबद्दल अभिमानही माझ्या मनात दाटून आला. 

मराठी भाषेचे गुणगान 'मराठी राजभाषा दिनी'च झाले पाहिजे, असे काही नाही! हो ना ?  

सोमवार, २१ फेब्रुवारी, २०२२

'आया' आणि 'गया'

काल दि. २० फेब्रुवारी २०२२ च्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये छापून आलेल्या एका बातमीने माझे लक्ष वेधून घेतले. पूर्व लंडनमधील, हॅकने या भागात, २६ किंग एडवर्ड रस्त्यावर असलेल्या 'The Ayah's Home' या इमारतीला 'Blue Plaque' मिळाल्याचे ते वृत्त होते. 

काही महत्त्वाच्या व्यक्तींचे भूतकाळात वास्तव्य असलेल्या इमारतींवरअशी 'Blue Plaque' किंवा निळ्या रंगाचा स्मृतिफलक लावण्याची पद्धत भारतातही आहे. पण, या 'The Ayah's Home' नावाच्या इमारतीला 'Blue Plaque' का मिळाली असावी? अशा कोण विशेष व्यक्ती त्या इमारतीमध्ये भूतकाळात वास्तव्यास होत्या? त्याबद्दल आणखी माहिती वाचल्यावर मला आश्चर्याचा धक्काच बसला. 

'गोरे साहेब' आणि त्यांच्या मड्डमांनी भारतात कमालीचे ऐषोआरामाचे आयुष्य व्यतीत केले. इंग्लंडमधल्या नोकरांच्या पगाराच्या एक अष्टमांश पगारात भारतीय नोकर मिळत असल्याने, एकेका गोऱ्या कुटुंबाच्या दिमतीला, भारतीय नोकर आणि मोलकरणींचा मोठा ताफाच असायचा. हे ब्रिटिश साहेब-मेमसाहेब, उन्हाळ्याच्या सुट्टीत, किंवा सेवानिवृत्त झाल्यावर, इंग्लंडला परतताना भारतीय मोलकरणी म्हणजेच 'आया' आपल्याबरोबर इंग्लंडला नेत असत. तिथे गेल्यावर, काही कारणाने त्यांची सेवा नको असल्यास, ते दुसऱ्या एखाद्या गोऱ्या अधिकाऱ्याकडे त्यांना काम मिळवून देत, किंवा भारतात परत पाठवत असत. पण मोलकरणींना नीट न वागवणाऱ्या काही महाभागांनी त्या 'आयां'ना अगदी पगारही न देता, रस्त्यावर सोडून दिले होते. अशा अशिक्षित, निर्धन 'आयां'ना, अक्षरशः भीक मागून परतीच्या प्रवासासाठी पैसे जमा करावे लागत. कुठल्यातरी गलिच्छ वस्तीमध्ये, एकाच खोलीत अनेक 'आया' दाटीवाटीने राहून,  कसेबसे दिवस कंठत असत. 

इग्लंडमधील काही महिला सामाजिक कार्यकर्त्यांना, या 'आयां'च्या सामाजिक स्वाथ्याची समस्या लक्षात आली. अशा 'आयां'च्या आसऱ्यासाठी जागा मिळवण्याकरता काही संस्थांनी पुढाकार घेतला. प्रथम १८९१ साली, एलगेड  ईस्ट लंडन मधील, ६ ज्युरी स्ट्रीट वरच्या एका घराचा ताबा लंडन सिटी मिशनने घेतला व तिथे 'The Ayah's Home' चालू केले. सन १९०० साली, पूर्व लंडनमधील, हॅकने नावाच्या भागात, २६ किंग्ज एडवर्ड रोड वर, तीस खोल्यांच्या एका प्रशस्त वास्तूत 'The Ayah's Home' हलवले गेले. निष्कांचन अवस्थेत मालकांनी सोडून दिलेल्या, परतीच्या प्रवासाची वाट बघत थांबलेल्या, किंवा किंवा प्रकृती अस्वास्थ्यामुळे प्रवासच  करू शकत नसलेल्या, अशा अनेक भारतीय, चिनी, मलेशियन 'आयां'ना 'The Ayah's Home' ने आसरा दिला.




ज्या परकीय 'आयां'नी ब्रिटिशांची मुले-बाळे आत्मीयतेने सांभाळली त्यांच्या सेवेची सन्मानपूर्वक आठवण राहावी यासाठी, 'The Ayah's Home' ला 'Blue Plaque' प्रदान करण्यात आला. मला याचे खूप अप्रूप वाटले, आणि माझ्या वडिलांकडून अनेक वेळा ऐकलेल्या एका गोष्टीची प्रकर्षाने आठवण झाली.   

माझी पणजी, म्हणजे माझ्या वडिलांच्या वडिलांची आई,  कै. सौ. लक्ष्मीबाई नारायण गोडबोले, यांना वयाच्या चाळीशीतच, १९२७ साली,  अर्धांगवायूचा झटका आला. त्यानंतरची सतरा वर्षे, म्हणजे, १९४४ साली मृत्यू पावेपर्यंत  ती अंथरुणाला खिळलेली होती. तिच्या सेवेला गया नावाची एक मोलकरीण ठेवलेली होती. माझ्या पणजीचे मलमूत्राने खराब झालेले कपडे बदलणे, तिला अंघोळ घालणे, जेवण भरवणे अशी सगळी सेवा, गयाबाईने अत्यंत मायेने केली.

पणजीच्या निधनानंतरही, सुमारे १९५२ सालापर्यंत, गयाबाई माझ्या माहेरीच पगारी मोलकरीण म्हणून काम करीत राहिली. त्यानंतर मात्र तिला अंधत्व आल्यामुळे, आमचे काम सोडून ती आपल्या गावी, म्हणजे टेंभुर्णीला वास्तव्यास गेली. १९५८ सालापर्यंत, आमच्या कुटुंबियांना  भेटायला ती अधून-मधून येत असल्याचे वडील सांगतात.  

माझे पणजोबा, कै. नारायण रामचंद्र गोडबोले यांनी,  १९५३ साली आपले मृत्युपत्र केले. त्यांच्या पत्नीच्या अखेरच्या काळात गयाबाईने केलेल्या सेवेबाबत त्यांनी त्या मृत्युपत्रात कृतज्ञता व्यक्त केली होती.  तसेच, तिने केलेल्या सेवेच्या सन्मानार्थ, गयाबाईला दोनशे रुपये बक्षीस द्यावेत, अशी इच्छा त्यांनी लिहून ठेवली होती. 

पणजोबांच्या मृत्यूनंतर, माझ्या वडिलांच्या काकांनी, टेंभुर्णीला जाऊन, ती रक्कम गयाबाईंना देऊ केली. पुढील काळात, गयाबाईंच्या टेंभूर्णीच्या राहत्या जागेवर अतिक्रमण झाल्याचे समजताच, ते हटवण्यासाठी माझ्या वडिलांनी न्यायालयात दावा लढवून, गयाबाईला तिच्या जागेचा ताबा मिळवून दिला. 

आजदेखील सोलापूर-पुणे प्रवासात, टेंभुर्णी गाव जवळ आले की, गयाबाईची आठवण काढून तिचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख माझे वडील हमखास करतात. गयाबाईंने केलेल्या सेवेची आठवण माझ्या कुटुंबियांनी जागृत ठेवली याचा मला रास्त अभिमान वाटतो. 

बुधवार, ९ फेब्रुवारी, २०२२

प्रसन्न रूप चित्ती राहो...

लतादीदी आज या जगात राहिल्या नाहीत हे क्लेशदायक सत्य आपल्याला स्वीकारावे लागणार आहे. पण त्यांच्या स्वर्गीय आवाजाच्या रूपाने त्या अजरामर राहणार आहेत, हेही आपल्याला माहिती आहे.


लतादीदींच्या मृत्यूनंतर वर्तमानपत्रातून, आणि सोशल मीडियावर त्यांच्या  संगीत कारकिर्दीची समग्र माहिती देणारे, आठवणी जागवणारे, अनेक लेख, सुरेल गाण्यांच्या ध्वनिफिती आणि चित्रफिती आल्या. मी बरेचसे लेख समरसून वाचले, ध्वनिफिती आणि चित्रफिती कानात आणि डोळ्यांत प्राण आणून ऐकल्या. एकीकडे माझे मन हेलावत होते तर दुसरीकडे त्या स्वरसम्राज्ञीचे सूर ऐकून माझा ऊर अभिमानाने भरून येत होता.  

त्यानंतर गेल्या दोन दिवसांत, टेलिव्हिजनवर मी लतादीदींच्या अनेक मुलाखती आणि त्यांच्यावरचे काही  कार्यक्रम पाहिले. त्यांच्या मुलाखतीत त्यांनी स्वतः सांगितलेल्या अनेक गोष्टी माझ्या मनाला स्पर्श करून गेल्या. लतादीदींच्या वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचे वडील वारले. तरीही त्या अनाथ झाल्या असे त्यांना वाटले नाही, असे त्या सांगतात. स्वकर्तृत्वावर त्यांचा किती विश्वास होता हे त्यातून कळते. वयाची नव्वदी ओलांडल्यावरही त्यांची बुद्धी आणि स्मरणशक्ती तल्लख होती, आवाज सुरेल होता, आणि त्या नर्म हास्यविनोद करत बोलत असत, हे प्रकर्षाने जाणवते.  

काहीं लोकांनी मात्र अतिउत्साहाच्या भरांत लतादीदींच्या शेवटच्या दिवसातले, गलितगात्र अवस्थेतले, दोन-तीन व्हिडीओ व्हॉटसऍप आणि फेसबूकवर टाकले. ते व्हिडीओ मला बघवले तर नाहीतच, पण ज्या लोकांनी ते व्हिडीओ आवर्जून शेअर केले त्या लोकांबद्दल किंवा त्या मनोवृत्तीबद्दलचा  माझा संताप उसळून आला. 

एखादी महत्वाची व्यक्ती अजून जिवंत पण अत्यवस्थ असताना, "एक्सक्लुझिव्ह ब्रेकिंग न्यूज" देण्याच्या धडपडीत, आणि जणू काही एखादी आनंदाची बातमी सांगतोय अशा आवेशात, त्या व्यक्तीला मृत घोषित करणाऱ्या चॅनेल्सवाल्यांमध्येही तीच मनोवृत्ती मला दिसते. 

लतादीदी वयोवृद्ध होत्या आणि मृत्यूपूर्वी काही काळ त्या आजारी होत्या. साहजिकच, त्या अगदीच कृश आणि अशक्त झाल्या असणार. त्यांचे ते विकलांग रूप बघून कोणाला काय मिळणार? पण तरीही काहीजणांना ते बघावेसे आणि इतरांनाही आवर्जून दाखवावेसे का वाटले असेल? या प्रश्नांची उत्तरे मला सहजी मिळाली नाहीत, पण माझ्या दिवंगत आईबद्दलची एक क्लेशदायक आठवण माझ्या मनांत  जागृत झाली.  

माझी आई अतिशय कामसू होती. वयाची सत्तरी ओलांडल्यानंतरही, नव्वदी पार केलेल्या आपल्या सासूची, म्हणजे माझ्या आजीची सेवा-शुश्रुषा केली. आमच्या घरी खूप येणे जाणे असले तरी ते भले-मोठे घर स्वतः ऐंशी वर्षांची होईपर्यंत, हौसेने सांभाळले. तोपर्यंत तिने अनेक जणांना हरतऱ्हेची मदतही केली. त्यानंतर मात्र हळूहळू तिची तब्येत ढासळू लागली. वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी ती एकदा मृत्यूच्या दारी जाऊन परत आली. पण काही महिन्यातच, पुन्हा अत्यवस्थ होऊन शेवटी तिचा मृत्यू झाला. आईच्या त्या शेवटच्या काळात मला अशाच काही लोकांच्या अविचारी मनोवृत्तीचे दर्शन झाले. 

आईला जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून, आम्हा कुटुंबीयांपैकी कुणा एकानेच तिच्यासोबत थांबावे असे डॉक्टरांनी निक्षून सांगितले होते. कदाचित ती काही दिवसांचीच सोबती होती, हे आम्हाला दिसत होते. म्हणूनच, कमीतकमी लोकांनी तिच्याजवळ जावे यासाठी आम्ही दक्ष  होतो. पण काही आप्तस्वकीय 'बघ्या' लोकांनी हॉस्पिटलमध्ये येऊन, "आम्हाला एकदातरी आत जाऊन त्यांना बघून येऊ दे ना", असा आग्रहच  धरला. रुग्णाच्या शुश्रुषेमध्ये आवश्यक असणारी मदत करायला मात्र असले 'बघे' लोक फारसे उत्सुक नसतात, हेही त्यावेळी जाणवले. नाकातोंडात नळ्या घातलेल्या अवस्थेत, मृत्युशय्येवर पडलेल्या, बेशुद्धावस्थेतील रुग्णाला बघण्यात त्यांना का रस असतो? हे मला अजूनही कळलेले नाही. आपण आजारी व्यक्तींच्या नातलगांच्या भावना दुखावत आहोत, याचीही जाणीव अशा लोकांना नसते. 

बालरोतज्ज्ञ म्हणून काम करतानाही मला असाच अनुभव येतो. नवजात अतिदक्षता विभागांत अत्यवस्थ झालेल्या बाळांना वाचवण्यासाठी आम्ही धडपडत असतो. कुठल्याही बाळाला जंतुसंसर्ग होऊ नये यासाठी आम्ही बरीच काळजी घेत असतो. अशावेळी बाळाचे काका, आत्या, मामा, मावश्या, किंवा इतर अनेक नातेवाईक अतिदक्षता  विभागाच्या बाहेर येत राहतात. "आम्हाला फक्त  एकदा बाळाला बघून येऊ दे, आम्ही एकेक करून बघून येतो " असा धोशा सतत आमच्या मागे लावतात. आम्ही कितीही शांतपणे समजावून सांगायचा प्रयत्न केला तरीही हे लोक हुज्जत घालतच बसतात. या लोकांमध्येही मला तोच अविचारीपणा दिसतो. 

रस्त्यावर अपघात होताच, रक्तबंबाळ झालेल्या अपघातग्रस्त व्यक्तींना मदत करण्याऐवजी त्यांचे फोटो किंवा व्हिडीओ काढत बसणारे महाभागही असतातच की! अनेक "बघे" आसपास असूनही,  वेळच्यावेळी  वैद्यकीय मदत न मिळाल्यामुळे अपघातग्रस्तांना प्राण गमवावा लागतो, असेही बऱ्याच वेळा घडते. अशा बातम्या वाचल्या किंवा ऐकल्या की, या अविचारी लोकांबद्दल माझ्या डोक्यात  तिडीक जाते. 

"ब्रेकिंग न्यूज" च्या स्पर्धेपोटी, एखाद्या व्यक्तीला अकालीच मृत घोषित करणाऱ्यांमधे, किंवा अत्यवस्थ व्यक्तीला "बघायला" आयसीयूमध्ये जाण्याची धडपड करणाऱ्यांमधे, किंवा लतादीदींसारख्या महान व्यक्तीचा विकलांग अवस्थेतील व्हिडीओ टाकणाऱ्यांमधे, जवळजवळ विकृतीकडे झुकणाऱ्या अविचाराचा एक समान दुवा मला दिसतो आणि माझे मन उद्विग्न होते. 

लहानपणीच कौटुंबिक जबाबदारी खंबीरपणे  पेलणाऱ्या, अत्यंत कसोशीने प्रयत्न करून आपल्या सुरांमध्ये आणि शब्दोच्चारांमध्ये अचूकपणा आणणाऱ्या, आपल्या असामान्य प्रतिभेच्या व मेहनतीच्या जोरावर सिनेसृष्टीत अढळपद मिळवणाऱ्या, महान समाजकार्य करणाऱ्या, असीम देशभक्ती उराशी जपणाऱ्या, त्या पहाडासारख्या कणखर आणि उत्तुंग व्यक्तिमत्वाचे प्रसन्न रूपच फक्त मनांत  साठवावे आणि डोळ्यांसमोर आणावे असे मला प्रकर्षाने वाटते. 

लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली !