काल रात्री मला खूप थंडी वाजत होती. मी अगदी पायमोजे-हातमोजे घालून, दोन रजया घेऊन झोपले होते. माझे अंगही खूप दुखत होते आणि पाय वळत होते. आनंदचे इन्फेक्शन मलाही लागले असावे, असे मला वाटले. शेवटी दुखणे मला अगदीच सहन होईना. त्यामुळे रात्री उशिरा केंव्हातरी उठून मी एक पॅरॅसिटॅमॉलची गोळी घेऊन झोपले. सकाळी उठले तेंव्हा जरा बरे वाटत होते. पहाटे पाच वाजता आनंदच्या हाक मारण्याने मला जाग आली. तो कण्हत होता. त्याचे संपूर्ण अंग आणि घसा खूप दुखत होते.
मी आनंदला तपासले. त्याला आजही ताप आहे, हे मला जाणवले. मी त्याचा घसा, छाती, नाडी पुन्हापुन्हा तपासत होते. त्या सगळ्या तपासणीनंतर, त्याला बॅक्टेरियल इन्फेक्शन झाले आहे, असे मला वाटत नव्हते. व्हायरल ताप असण्याचीच शक्यता अधिक होती. त्यामुळे Antibiotics घेणे आवश्यक नव्हते. तरीही, आता राहिलेले शेवटचे तीन-चार दिवस कसेबसे पार पडावेत असेही एकीकडे वाटत होते. इतक्या लांब आपण आलो आहोत, आता अजून किती काळ आनंदचा ताप हटायची वाट पाहणार? त्यापेक्षा एखादे अँटिबायोटिक सुरु करू या, असा विचार मी केला. खरंतर अँटिबायोटिक चालू करण्याचा निर्णय माझा मलाच पटत नव्हता. पण आता नाईलाज आहे अशा विचाराने मी बाहेरचे कपडे घालून, तयार होऊन, खालच्या मजल्यावरच्या फार्मसीमधून औषध आणायला बाहेर पडले.
जिना उतरून खाली गेले, तर जिन्यातून ओपीडीत जाणारा दरवाजाच बंद होता. तो दरवाजा रात्री बंद ठेवतात, आणि सकाळी साडेसहाच्या सुमारास स्वयंपाकघरामधून चहा खाली आणण्याच्या वेळीच तो दरवाजा उघडतात, हे मला नंतर आठवले. मागे एकदा, रात्री तो दरवाजा उघडा राहिला होता. त्यावेळी त्या दरवाज्यामधून वरच्या मजल्यावर येऊन अनेक यात्रेकरू झोपले होते. त्यामुळे आजकाल ही खबरदारी घेतली जाते, हे मी ऐकून होते. दरवाजा बंद असल्यामुळे मी फार्मसीमध्ये जाऊ शकले नाही आणि मला Antibiotic आणता आले नाही. त्यामुळे मी वर आले. खोलीत येऊन मी रात्रपाळीच्या डॉ. शोभितला दरवाजा उघडण्याबाबत WhatsApp वर मेसेज पाठवला. सव्वासहाला त्याचे उत्तर आले. पण तोपर्यंत आनंद उठून दात घासून, तोंड धुवून आला होता. आनंद मला म्हणाला, "तुला जर हे viral इन्फेक्शन वाटते आहे, तर तू तुझ्याच मनाविरुद्ध जाऊन Antibiotic का सुरु करते आहेस? तुझ्या डायग्नोसिसवर माझा पूर्ण विश्वास आहे. धीर सोडू नकोस. मला बरे वाटेल." त्यामुळे मग मी Antibiotics न देण्याचा निर्णय घेतला. मग त्याने सकाळी फक्त क्रोसिनची एक गोळी घेतली.
तो निर्णय झाल्यामुळे, मी वरच्या मजल्यावरच्या स्वयंपाकघरात आमच्याकडचा फ्लास्क घेऊन गेले. मी वर जात असतानाच स्वयंपाकघरात काम करणारा मनुष्य एका स्टीलच्या जगमधे चहा घेऊन खाली चाललेला दिसला. "मॅडम, तुम्ही वर स्वयंपाकघरात जा, तिथे तुम्हला हवा तसा, ताजा, गरम चहा करून देतील." असे त्याने मला सांगितले आणि मला हुरूप आला. वर जाऊन बिनसाखरेचा, ताजा चहा करून घेतला आणि तो फ्लास्कमधे भरून आणला. इथे चहासाठी, पाणी पिण्यासाठी, कागदी ग्लास आहेत. ते पिचके असल्यामुळे त्यातून कुठलेच पेय प्यायला नको वाटते. त्यामुळे मी दोघांसाठी नेहमी चार ग्लास घेऊन येते. दोन ग्लास एकात-एक घालून, त्या पिचक्या कपांना जरा तरी बळकटी येते. माझ्याकडे पुण्याला एक collapsible स्टीलचा ग्लास आहे. तो आणायला हवा होता, असे मला रोज वाटे.
मी चहा आणायला गेले होते, तेव्हा स्वयंपाकघरात नाश्त्याची तयारी चालू होती. मी मेनूची चौकशी केली तर, "आज कोबी घालून पोहे करणार आहे," असे तिथल्या स्वयंपाक्याने सांगितले. ते ऐकून मला कसेसेच झाले. मस्त, चमचमीत फोडणी दिलेले, सालासकट भाजून लाल शेंगदाणे घातलेले, फोडणीमध्ये भरपूर हिरव्या मिरच्या आणि कढीलिंब घातल्यामुळे स्वादिष्ट झालेले, शिवाय वर बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर आणि पांढरेशुभ्र ओले खोबरे पेरलेले, असे आपल्याकडचे पिवळेधमक कांदापोहे आठवले, आणि माझ्या तोंडाला पाणी सुटले. कोबी घातलेल्या पोह्यांची कल्पना मला अजिबात पसंत पडली नव्हती आणि ते पोहे खायला मी मुळीच उत्सुक नव्हते. पण सकाळी नाश्ता करणे आवश्यकच होते. त्यामुळे नाश्त्याला जाण्याआधी आमच्याकडे असलेला थोडा सुकामेवा खाल्ला. रोजच्याप्रमाणे, तुळशीचे बी गरम पाण्यात घालून ते पाणीही प्यायलो.
आम्ही दोघेही नेहमीच्या वेळेला, म्हणजे आठ-सव्वाआठच्या सुमारास नाश्ता करायला गेलो. तिथे कोबी, गाजर आणि भाजलेले शेंगदाणे घालून केलेले पोहे होते. पोह्यांचे रूप काही विशेष चांगले दिसत नव्हते. इथल्या जेवणा-खाण्यामधे कांदा-लसूण कधीच नसते. पोह्यांमधे हिरवी मिरची, कढीलिंब, कोथींबीर किंवा खोबरे यापैकीही काहीच नव्हते. नर्स मुले-मुली पोह्यांवर टोमॅटो सॉस घेऊन खात होते. कोबी घातलेले पोहे वाईटच लागणार असे मला आधी वाटले होते. पण त्या मानाने ते चवीला बरे होते. आमचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण झाल्यानंतर, मी किंवा आनंद आवर्जून तिथल्या स्वयंपाक्याचे आभार मानायचो. काही पदार्थ तो उत्तमच करायचा. आजचा आमचा नाश्ता झाल्यानंतर, "तुझ्यामुळे मला पोहे करण्याची नवीन पद्धत कळली. या वेगळ्या पध्द्तीने केलेले पोहेदेखील चांगले लागले." असे तिथल्या स्वयंपाक्याला मी सांगितले. त्यावर त्याने मला अगदी आत्मविश्वासाने आणि ठासून सांगितले की, "पोहा तो हमेशा ऐसेही बनता है. और कौनसा तरीका है? वैसे इसमें तो शिमला मिरचीभी डलती हैं. लेकिन आज वो सप्लायमें आयी नही थी. अगर शिमला मिरची होती, तो पोहा और इससेभी टेस्टी बनता." मला त्याच्या बोलण्याची मोठी गंमत वाटली. आपल्याकडे आपण करतो ते अनेक प्रकारचे चवदार पोहे आठवून मी मनोमन हसले आणि खाली कामाला निघून गेले.
खाली गेले तेंव्हा असे कळले की, काल अगदी अर्धमेल्या अवस्थेत असलेल्या, आणि Paroxysmal Supraventricular Tachycardia (PSVT) असे निदान झालेल्या त्या मराठी आज्जीबाईला पहाटे-पहाटे डिस्चार्ज मिळालेला आहे. त्या बाईला तिचा नवरा गौरीकुंडच्या दिशेने घेऊन गेला असेही समजले. जाताना रात्रपाळीच्या नर्सेसजवळ, तो माझ्यासाठी निरोप ठेऊन गेला होता. माझे तोंडभरून आभार मानून गेला होता. ती बाई बरी होऊन गेली, हे ऐकून मला खूपच आनंद झाला. या हॉस्पिटलमधे रात्री रुग्णाच्या नातेवाईकांना राहण्यासाठी अंथरूण व पांघरूण दिले जाते. रात्री गरमागरम डाळतांदुळाची खिचडी आणि सकाळी गरम चहाही देतात. तसेच, या संस्थेकडे येत असलेल्या देणग्यांमधून, गरीब, गरजू यात्रेकरूंना गरम मोजे, लोकरी टोप्या आणि उबदार ब्लँकेट्सही दान केली जातात. ही सगळी माहिती मी त्या बाईच्या नवऱ्याला पुरवली होती. रात्री ड्यूटी संपवून वर जाण्याआधी त्याला ब्लॅंकेट व झोपायला गादी मिळेल याची व्यवस्था मी केलेली होती.
काल डायबेटिक कोमामधे गेलेला मनुष्यही जिवंत आणि सुखरूप आहे हे बघून माझ्याच जिवात जीव आला. त्याने मात्र, काल रात्री शुद्धीवर आल्यापासून तिथे नुसता सावळा गोंधळ घालून ठेवला होता. तो प्रत्यक्षात टूर ऑपरेटरच होता आणि त्याने सोबत आणलेले प्रवासी त्याला शोधत-शोधत हॉस्पिटलमधे पोहोचलेले होते. त्याला खाली नेण्यासाठी हेलिकॉप्टरच्या बुकिंगची विनंती हॉस्पिटलकडून पाठवण्यात आली होती. त्याच्या सुदैवाने, हेलिकॉप्टरच्या एका फेरीमधे त्याच्यासाठी बुकिंगही झालेले होते. पण तो मनुष्य भलताच विचित्र निघाला. "इथल्या डॉक्टर्सनी मला मारायचा प्रयत्न केला आहे. त्यांनी माझी माफी मागितली तरच मी खाली जाईन." असा हट्ट त्याने धरला. तो काही केल्या, कोणाचेच ऐकायला तयार होईना. तो सगळ्यांवर ओरडत होता. "मी स्वतःच्या पायांनी चालत खाली उतरू शकतो. तरीही मला उगीचच हेलिकॉप्टरच्या खर्चात तुम्ही सगळे टाकत आहात." असाही आरोप तो करत होता. "मी कुठल्याही परिस्थितीत हेलिकॉप्टरचा खर्च करणार नाही, हा खर्च हॉस्पिटलनेच केला पाहिजे." असा आग्रहदेखील तो धरून बसला.
आता काय करायचे, असा आमच्यापुढे प्रश्नच पडला. शेवटी, "ठीक आहे. पण मग तू हेलिकॉप्टरने खाली जायला तयार नाहीस असे आम्हाला केसपेपरवर लिहून दे." अशी विनंती डॉ. यादव यांनी त्याला केली. त्याने ते लिहिण्यासाठी केसपेपर मागून घेतला. "या हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर्स आणि नर्सेसनी मिळून मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. मला काहीही झालेले नसताना, कालपासून विनाकारणच मला इथे ICU मध्ये डांबून ठेवलेले आहे. मला उगीचच सलाईन लावले आहे, इंजेक्शने टोचत बसले आहेत. त्यामुळे माझ्या बिघडलेल्या तब्येतीसाठी हे हॉस्पिटलच जबाबदार आहे. म्हणूनच, माझा आणि माझ्याबरोबर हेलिकॉप्टरमधून सोबत येणाऱ्या व्यक्तीच्या तिकिटाचा खर्च हॉस्पिटलनेच केला पाहिजे." असे त्याने त्या केसपेपरवर लिहिले. ते वाचून आम्ही सगळ्यांनी कपाळाला हात लावून घेतला.
त्या माणसाला आम्ही खूप समजावून सांगितले, की तुला हेलिकॉप्टरने खाली उतरणे आवश्यक आहे. पण तो काही केल्या ऐकेना. शेवटी त्याच्याकडून त्याच्या आई-वडिलांचा फोननंबर मी घेतला. त्याच्या आईवडिलांशी मी स्वतः बोलले. त्यांना परिस्थितीचे गांभीर्य समजावून सांगितले. त्यानंतर त्याच्या आईवडीलांनीही त्याला समजावायचा प्रयत्न केला. तरीही तो ऐकेना. अखेर, मी त्याच्यासमोर अक्षरशः हात जोडून त्याला विनंती केली की, "शहाणा असशील तर हेलिकॉप्टरने लवकरात लवकर खाली जा आणि स्वतःचा जीव वाचव." त्यानंतर तो मला म्हणायला लागला, "डॉक्टर, तुम्ही स्वतः जाऊन काल रात्रीचे CCTV रेकॉर्डिंग बघून या. म्हणजे तुम्हाला माझे म्हणणे पटेल. या लोकांनी मला मारायचा प्रयत्न केला आहे. मी मुंबईला मंत्रालयामधे फोन लावला आहे. तिथून केंद्र सरकारला फोन जाणार आहे. मग या लोकांना दिल्लीहून होम मिनिस्ट्रीकडून तंबी मिळेल. मग हे माझे पाय धरतील. त्यानंतरच मी इथून निघेन."
हे सगळे बोलणे ऐकल्यावर मात्र माझ्या लक्षांत आले की हा खरोखरच एक माथेफिरू मनुष्य आहे. मी थोडावेळ ICU च्या बाहेर गेले. परत येऊन त्याला मी सांगितले, "हे बघा, मी CCTV रेकॉर्डिंग बघितले. तुम्हाला कोणीही काहीही केलेले नाही. तुम्ही आता निष्कारण वेळ वाया घालवू नका. आत्ता बऱ्या बोलाने खाली गेलात तर स्वतःचा जीव वाचवू शकाल. तुमची पोटनि, चार वर्षांचा मुलगा, वयस्कर आईवडील हे सगळे तुमच्यतावर अवलंबून आहेत. मुंबईला गेल्यावर मग, या हॉस्पिटलावर जी कायदेशीर कारवाई तुम्हाला करायची, ती करू शकाल." तेंव्हा कुठे तो तयार झाला. शेवटी NDRF च्या टीमने येऊन त्याची अक्षरशः उचलबांगडी केली, त्याला हेलिकॉप्टरमध्ये बसवून दिले आणि आम्ही सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला.
तो मनुष्य गेला असेल-नसेल, तेवढ्यात, काल आपल्या वयस्कर आईला घेऊन आलेला, मुंबईचाच दुसरा एक मराठी मनुष्य मोठमोठ्याने आरडा-ओरड करत, त्याच्या आईला घेऊन हॉस्पिटलमध्ये घुसला. त्याच्या आईला कमालीचा दम लागलेला होता. तिला मी ऑक्सिजन देण्यासाठी खुर्चीवर बसवले. काल याच माणसाला मी नीट समजावून सांगितलेले होते, "तुझ्या आईची तब्येत चांगली नाहीये. तू आईला घेऊन लगेच खाली गौरीकुंडला जा. तिला दर्शनासाठी नेण्याचा हट्ट धरू नकोस. तिथे देवळाजवळ खूप गर्दी आहे असे मी ऐकून आहे. तुझ्या आईला ती सगळी दगदग सहन होणार नाही." पण त्याने माझा सल्ला मानला नव्हता. त्याने आणि इतर सर्व सहा कुटुंबियांनी रात्री केदारनाथलाच मुक्काम केला होता. सकाळी आईला घेऊन दर्शनाला जाण्याचा त्याचा बेत होता. पण त्याआधीच सकाळी त्याची आई अत्यवस्थ झालेली होती. आता आईला हेलिकॉप्टरने खाली नेण्यासाठी हेलिकॉप्टर मिळावे यासाठी त्याची धडपड चालू झाली होती. हेलिपॅडवर जाऊन हेलिकॉप्टर कंपन्यांच्या ऑफिसमध्येही तो जाऊन आला होता. पण त्याने मेडिकल सर्टिफिकेट आणले तरच त्याच्या आईला खाली नेण्यासाठी प्राधान्यक्रम मिळेल, असे त्याला सांगितले गेले होते. आता त्याला आमच्याकडून तसे मेडिकल सर्टिफिकेट हवे होते.
गुप्तकाशी, फाटा आणि सेरसी अशा तीन ठिकाणांहून, चार हेलिकॉप्टर कंपन्या सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सतत यात्रेकरूंची केदारनाथपर्यंत ने-आण करत असतात. दर १० ते १५ मिनिटाला एकेक हेलिकॉप्टर निघत असते. पण एकेका फेरीमधे चार ते सहा लोकांनाच जाता येते. अनेकजणांनी खूप आधीपासूनच बुकिंग केलेले असते. त्यामुळे ऐनवेळी कितीही पैसे देऊ केले तरीही कोणालाच हेलिकॉप्टरचे बुकिंग मिळत नाही. विशेष करून मे-जूनमध्ये अशी अचानक बुकिंग मिळण्याची शक्यता जवळ-जवळ शून्य असते. त्यातून, यंदाच्या मे महिन्यामध्ये, सुट्टी आणि अधिकमास असे एकत्र आल्याने, यात्रेकरूंची तुफान गर्दी झालेली होती. काही ठराविक आजाराने अत्यवस्थ झालेल्या रुग्णांना, मेडिकल कोट्यामधून ऐनवेळी हेलिकॉप्टरमधे जागा दिली जाते. या बाईंना, त्या आजारांपैकी, म्हणजे हृदयरोग, स्ट्रोक, HAPO, मेंदूत रक्तस्त्राव, किंवा कोमा, यापैकी काहीच झालेले नव्हते. त्यामुळे त्यांना तसे प्रमाणपत्र देणे हॉस्पिटललादेखील शक्य नव्हते. त्यामुळेच त्याला ऐनवेळी हेलिकॉप्टर मिळून आईला हेलिकॉप्टरने खाली नेणे शक्य होणार नव्हते. "तुझ्या आईसाठी तसे सर्टिफिकेट देणे आम्हाला शक्य नाही." असे मी त्याला सांगितले. त्यानंतर त्याने मला आणि तिथल्या इतर सर्व डॉक्टर्सना अक्षरश शिव्यांची लाखोली वाहिली. एकाच दिवसात दोन मराठी रुग्णांमुळे मला अक्षरशः लाजेने मान खाली घालण्याची वेळ आली हे दुर्दैवच म्हणायचे! आमच्या व्यवसायात शिव्या-ओव्या दोन्हीही 'इदं न मम' या भावनेनेच स्वीकारायच्या असतात हे बाळकडू मिळालेले असल्याने मी तसेच केले.
नेहमीप्रमाणे सकाळी ८.४५ पासून संध्याकाळी ७.३० पर्यंत मी इमानेइतबारे ड्यूटी बजावली. आजदेखील नेहमीप्रमाणेच मी ४०० च्या वर पेशंट्स तपासले होते. मधे दोनवेळा जेमतेम चहा प्यायला ब्रेक घेतला असेल. पेशंट्स पाहण्याचा त्रास काहीच वाटत नव्हता. पण पेशंटबरोबर आलेल्या नातेवाईकांना बाहेर थांबायला सांगणे, त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या पुरवणे, हेच मोठे जिकिरीचे काम होते. बोलून-बोलून माझा दुखरा घसा आता खूपच दुखायला लागला होता. शेवटी-शेवटी तर मी अगदी कंटाळून, दमून आणि हतबल होऊन लोकांच्या गर्दीकडे, बेशिस्तीकडे बघत होते.
कोणालाही रांगेत उभे राहायचे नव्हते, 'हॉस्पिटलच्या आत रुग्णाच्या नातेवाईकांना प्रवेश निषिद्ध' अशी पाटी बाहेर लावलेली असली तरीही तो नियम कुणीच पाळत नव्हते, ओपीडीत येऊन, फोनवर मोठमोठ्याने गप्पा मारत बसू नये इतका पाचपोचदेखील कुणाला आहे असे दिसत नव्हते. हॉस्पिटलमध्ये अत्यवस्थ रुग्ण असतात, आणि त्यांच्यामुळे लहान मुलांना जंतुसंसर्ग होऊ शकतो. लहान मुलांना गरज नसताना हॉस्पिटलमध्ये आणू नका, हे सांगितले तरी कुणी दखल घेत नव्हते. असे अनेक चित्रविचित्र आणि डोक्यात तिडीक जायला भाग पडणारे अनुभवही मला रोज येत होते.
हे हॉस्पिटल विनामूल्य सेवा देते, म्हणजे प्रत्येकाच्या हक्क्काचेच हॉस्पिटल असल्याच्या कल्पनेने, कित्येक लोक नावनोंदणी न करता किंवा आम्हाला कोणालाही न दाखवता आपले आपणच जाऊन ऑक्सिजन घ्यायच्या खुर्चीवर बसत होते. आधी नावनोंदणी करा, हे त्यांना सांगितले की त्यांना राग येई. अनेक सुशिक्षित आणि आर्थिक सुस्थितीतले लोक आपल्यासोबत ऑक्सिजन सिलेंडर-नामक, एक नऊ-दहा इंच लांबीचे डबडे घेऊन हिंडत होते. त्या डबड्यातला ऑक्सिजन जेमतेम पाच मिनिटात संपत असेल. आपल्या समाजातले अज्ञान मात्र संपत नाही हेच खरे, असे मला वाटायला लागले होते. त्यामुळे भारतीय माणूस कधी सुधारणार? अशीच भावना माझ्या मनात वरचेवर येई.
संध्याकाळपर्यंत मी हतबल होऊन आणि दमून बसलेली असताना एक सुस्थितीतला दिसणारा मनुष्य आत आला. मला म्हणाला "इथे आमची राहायची सोय कराल का? मी तुम्ही म्हणाल तेवढे पैसे देतो." ते बोलणे ऐकून तर मी अवाकच झाले. बाहेर हॉस्पिटलची पाटी वाचून आलेला हा सुशिक्षित मनुष्य मला हे काय विचारतो आहे, ते मला कळेचना. मला अगदी त्याला सांगावेसे वाटले होते, "बाबा रे, तू अॅडमिट हो. मी तुला इथे रात्रभर ठेवून घेते." अर्थात प्रत्यक्षात मी त्याला, "हे हॉस्पिटल आहे. हॉटेल किंवा धर्मशाळा नाही. इथे तुमची राहण्याची सोय करता येणार नाही." असे अत्यंत शांत स्वरात सांगितले.
ओपीडीतून वर खोलीत येईपर्यंत जवळपास ७.४० झाले होते. आनंदने संध्याकाळीही क्रोसिनची गोळी घेतली होती असे तो म्हणाला. आम्ही दोघे बरोबर आठ वाजता जाऊन जेवून आलो. बटाट्याची भाजी, दह्यातील बटाट्याचे रायते, राजमा, भात व पोळ्या असा बेत होता. जेवणानंतर काहीतरी गोड खाण्याची तीव्र इच्छा मला झाली. पण जेवणामध्ये आज काही गोड पदार्थ ठेवलेला नव्हता. त्यामुळे अर्थातच ती इच्छा मारावी लागली. रात्रीपर्यंत मनाने आणि शरीराने खूपच दमायला झाले होते. त्यामुळे खोलीत आल्याआल्या आम्ही झोपून गेलो.
[क्रमशः]
©डॉ. स्वाती बापट.

खरंच आहे, भारतीय माणूस कधी सुधारणार?
उत्तर द्याहटवासुधारणे अवघड आहे!
उत्तर द्याहटवाबापरे...! किती कठीण परिस्थितीत डॉक्टरांना काम करावं लागतं...! तरीही कसलीही कुरकुर न करता वेळप्रसंगी स्वत:ची प्रकृती बरी नसतानाही विश्रांती न घेता रुग्णालयात काम करणं खूप कौतुकास्पद आहे....आपण सगळ्यांनीच त्याची जाणीव ठेवायला हवी! 🙏🏼
उत्तर द्याहटवा🙏👍✌️
उत्तर द्याहटवापती आनंद यांची तब्येत ठीक नसताना, स्वतःचा कार्यकाळ (Tenure) पूर्ण होईल की नाही ही भीती मनात असतानाही, स्वातीताईंनी या सर्व 'अशिस्त' रुग्णांना सांभाळत आपली सेवा अखंड सुरू ठेवली. त्यांचे हे निरीक्षण आणि अनुभव वाचकाला अंतर्मुख करायला लावतात. आनंद यांची तब्येत लवकर बरी होवो आणि स्वातीताईंचा हा यज्ञ असाच यशस्वी पार पडो, हीच बाबा केदारनाथाच्या चरणी प्रार्थना!
उत्तर द्याहटवाSir William Osler यांनीही म्हटले होते की, "डॉक्टरची खरी परीक्षा रुग्णाच्या आजारापेक्षा त्याच्या अधीरतेशी (Impatience) लढण्यात असते." स्वातीताईंनी हा संयम केदारनाथच्या भूमीत कमालीच्या ताकदीने दाखवला आहे.
स्वातीताईंनी केदारनाथच्या मोफत आरोग्य केंद्रात येणाऱ्या विविध प्रकारच्या रुग्णांचे आणि त्यांच्या सोबत येणाऱ्यांचे जे सूक्ष्म निरीक्षण मांडले आहे, ते आपल्या देशातील सार्वजनिक व्यवस्थेचे वास्तव रूप दाखवते.
अमेरिका किंवा कॅनडासारख्या विकसित देशांमध्ये आरोग्य यंत्रणेत नाव नोंदवल्यावर डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिळण्यासाठी कित्येक महिने वाट पाहावी लागते (Waiting List). तिथले लोक अत्यंत संयमाने आणि शिस्तीने या नियमांचे पालन करतात.
आपल्याकडे मात्र विनामूल्य आणि तात्काळ सेवा मिळत असूनही रुग्ण कमालीची बेशिस्त दाखवतात, हे खेदजनक आहे.