काल रात्री खूप थंडी होती. इथे उणे ३ तापमान होते. रात्रभर हीटर चालू ठेवून झोपलो होतो. त्यामुळे खोली चांगली उबदार राहिली होती. मला सलग सात तास झोप लागली. आनंदला मात्र सलग झोप लागली नाही, असे त्याने सकाळी मला जाग आल्यानंतर सांगितले. त्याला आज ताप नव्हता, पण घसा दुखणे आणि सर्दी-खोकला अजून होतेच. माझाही घसा दुखतच होता आणि खोकलाही येत होता. पण झोप चांगली झाल्यामुळे काम करण्यासाठी उत्साह होता.
आनंदला गरम पाण्यात मीठ घालून गुळण्या करायला सांगितले आणि मी वर चहा आणायला गेले. आज नाष्ट्याला काय करणार आहे? असे आचाऱ्याला विचारले. आजही 'सूजीका हलवा', म्हणजे शिरा असणार होता. चहा घेऊन मी खाली आले. आज कपडे बरेच साठलेले दिसले. म्हणून मग लाँड्री लावली. रोज आतले कपडे तर घामामुळे खराब होतच होते, पण सतत पेशंटशी संपर्क आल्यामुळे बाहेरचे कपडेही खराब होत असत. त्यामुळे एक दिवसाआड कपडे धुवावेच लागत. काल बाहेर वापरण्याचे दोन स्वेटर्सही हाताने धुवून वाळत टाकले होते. आता इथे दोन-तीनच दिवस राहिले या कल्पनेने एकीकडे खूप वाईट वाटत होते, तर दुसरीकडे घरची ओढही लागली होती. मला इथल्या कामामुळे आणि आनंदला त्याच्या आजारपणामुळे, अजूनही देवळात जाऊन दर्शन घ्यायला आम्हाला वेळच झालेला नव्हता. माझ्याबरोबरचे तिन्ही डॉक्टर्स दोन वेळा देवळामध्ये जाऊन आले होते. त्यांच्याकडून तिथे असलेल्या तुफान गर्दीचे आणि धक्काबुक्कीचे वर्णन ऐकायला मिळालेले होते.
आज सकाळी नेहमीप्रमाणे मी ८.४० पर्यंत ड्यूटीवर गेले. गेल्यागेल्या, समोरच पांढऱ्या कपड्यामध्ये गुंडाळलेला एक मृतदेह दिसला. आज पहाटे एका पेशंटला मृतावस्थेत इथे आणले गेले होते, असे कळले. केदारनाथचा ट्रेक अवघडच आहे. अनेकजणांना घोड्यावरून किंवा डोलीतून येतानाही कमालीचा त्रास होतो. अनेकांची तब्येत आधीच खराब असते. इथे कमालीची गर्दी असल्यामुळे अनेकांना दगदग सोसवत नाही. साठी उलटून गेलेले एक नवरा-बायको दोघेच काल रात्री केदारनाथला पोहोचले होते. रात्री कुठेतरी तंबूमध्ये झोपले असतील. पहाटे त्या बाईंनी नवऱ्याला हाका मारल्या पण तो जागाच झाला नाही. म्हणून तिने त्याला हॉस्पिटलमध्ये आणले होते. पण त्याचा आधीच मृत्यू झालेला होता. आता त्या बाईला आपल्या नवऱ्याच्या मृतदेहाबरोबर परत जायचे होते. माझ्या समोरच NDRF च्या चार जवानांनी त्या माणसाचा मृतदेह उचलून नेला, त्या बाईंचा चेहरा बघून मला कसेसेच झाले. अशा तीर्थस्थानी मृत्यू आल्यास मृतात्म्याला सद्गती लाभते असा समज हिंदुधर्मात आहे. पण तो मृतदेह घेऊन आपल्या गावी परतणे हे नातेवाइकांच्या दृष्टीने किती दुःखदायक असेल याची कल्पना न केलेलीच बरी.
आज डॉ. अजय आणि नर्स कृष्णा कुठेतरी गायब झालेले होते. डॉ. सुभाषिनी वर किचनमधे आचाऱ्याला इडली-दोशाचे पीठ भिजवायला शिकवणार होती. त्यामुळे तिला यायला उशीर होणार होता, हे तिने मला आधीच सांगितलेले होते. त्यामुळे, सुमारे १०.४५-११ वाजेपर्यंत मी आणि नोंदणी करणारी नर्स रिया, अशा दोघीच काम करत होतो.
रेडीमेड रवा इडलीची आणि MTR सांबार मसाल्याची अनेक पाकिटे इथल्या स्वयंपाकघरात पडलेली होती. पाकिटावरच्या सूचना वाचून कोणीतरी इथल्या आचाऱ्याला इडली करण्याची कृती समजावून देणे आवश्यक होते. पण ते कष्ट आत्तापर्यंत कोणीच घेतले नसावेत. पूर्वी एकदा आचाऱ्याने त्या पाकिटातील इडली रवा भिजवून इडल्या केल्या होत्या, पण त्या दगडासारख्या कडक झाल्या होत्या असे समजले. त्यानंतर त्या रवा इडलीच्या पाकिटात कोणीच हात लावला नव्हता व अनेक पाकिटे पडून होती. डॉ. सुभाषिनीला इथे फुलके आणि भाजी खाऊन कंटाळा आलेला होता. तिला स्वतःलाच इडली, डोसे आणि मेदुवडा खायची अतीव इच्छा झालेली होती. त्यामुळे तिनेच पुढाकार घेऊन, पाकिटावरच्या सूचना आधी स्वतः वाचून घेतल्या होत्या. त्या सूचनांप्रमाणे, इडलीचे पीठ नेमके कसे भिजवायचे, त्यात किती दही घालायचे, हे सगळे तिने आचाऱ्याला शिकवले होते.
ओपीडीत येण्यापूर्वी डॉ. सुभाषिनी रेडीमेड इडलीचे पीठ तर भिजवून आलीच होती. पण त्या बरोबरच मेदुवड्यासाठी उडदाची डाळ आणि दोशांसाठी डाळ आणि तांदूळही तिने भिजवले होते. डॉ. सुभाषिनी आल्यावर मला थोडीतरी उसंत मिळाली. डॉ. अजय, डॉ. हर्ष आणि नर्स कृष्णा हे शेवटी संध्याकाळी पाच वाजता कुठूनतरी आले. ते कदाचित कुणालाच न सांगता गायब झाले होते. त्यामुळे आम्ही सगळेच त्यांच्यावर चिडले होतो. आज ११.३०-११-४५ च्या सुमारास, मी न मागताच, मस्त आले घातलेला चहा आला होता. चहाबरोबर टोस्टही आले होते जे मी खाल्ले नाहीत. थोड्या वेळाने MTR ची रवा इडली आली. त्या इडलीची चव बघण्यासाठी सुभाषिनीने फारच आग्रह केला. इडली बरी झाली होती, पण इडलीबरोबर चटणी नसल्याने अगदीच कोरडी लागत होती.
आज मी जवळपास चारशे-पाचशे पेशंट्सना तपासले होते. आजही बराच काळ मी एकटीच डॉक्टर काम करत असल्याने मी पार दमून गेले होते. पेशंट्सशी बोलून आणि "गर्दी करू नका, बाहेर थांबा" असे त्यांच्या नातेवाईकांना सांगून-सांगून संध्याकाळपर्यंत घसा ठणकायला लागला होता. इथे येणाऱ्या काही ठराविक पेशंट्सना योग्य ट्रीटमेन्टची आवश्यकता असते. बाकी सर्वांना लवकरात लवकर जुजबी उपचार करून बाहेर काढणे व पुढचे पेशंट तपासणे आवश्यक असते. पेशंट्सच्या अशा गर्दीतही मला काही चित्रविचित्र अनुभव आले. इथे केदारनाथला अनेक भगवे वस्त्रधारी साधू येत असतात. कित्येकजण इथे सहा महिने मुक्कामच करतात. अनेक तृतीयपंथी लोक देखील भगवी वस्त्रे परिधान करून, आपले चेहरे रंगवून हातात त्रिशूल घेऊन इथे येतात. आज हॉस्पिटलमधे दाखवायला आलेल्या एका साधूने अंगात पातळ भगव्या कफनीशिवाय काहीही घातलेले नव्हते. त्याच्या पायात चपला, बूट असे कोणतेच पादत्राणही नव्हते. त्याचे दोन्ही तळपाय सोलवटलेले होते. तळपायांवर काही ठिकाणी फोडही आलेले होते. मला वाटले की तळपायाला फोड आल्यामुळे हा मनुष्य अनवाणी आला असेल. पण त्याच्याकडून वेगळीच माहिती मिळाली. भगवी कफनी वगळता इतर सर्व वस्त्रांचा आणि पादत्राणांचा त्याने त्याग केलेला होता. अनवाणी पायानेच तो केदारनाथ देवळाच्या मागच्या बाजूला आणि आसपासच्या बर्फाच्छदित डोंगरांमधे फिरून आलेला होता. त्याने मला तिथे काढलेले व्हिडिओदेखील दाखवले. काही साधू तर फक्त गोणपाटाचे कापड गुंडाळून आलेले दिसत होते. इथे आल्यापासून अनेक अनुभवांची शिदोरीच मला लाभली होती.
केदारनाथपर्यंत अनेक सामान्य लोकही अनवाणी चालत येतात. काहीजण कसला ना कसला नवस बोललेले असतात. या लोकांच्या पायाला खूप फोड येणे, पाय सोलवटणे असे प्रकार होतात. अशा लोकांना बूट-चपला घालायला सांगितले तरीही ते ऐकत नाहीत. कित्येक नवविवाहित जोडपी इथे जोडीने दर्शनाला येतात. त्यांच्या घराण्याची तशी पद्धत असते. त्यांच्याबरोबर सासरचे लोकही आलेले असतात. या जोडप्यामधली नववधू भरपूर नटलेली, अंगावर दागदागिने घातलेली आणि हातभर लाल चुडा भरून आलेली असते. आज दोन सख्खे भाऊ आपापल्या सुंदर नववधूंना घेऊन आले होते. त्या दोघीनींही चेहऱ्याला छान मेकअप केलेला होता आणि भरजरी साड्या नेसलेल्या होत्या. त्या दोघींनाही फारसे काहीच झाले नव्हते. पण नवीन लग्न झालेले असल्याने, काळजीपोटी त्यांचे नवरे त्यांना दाखवायला घेऊन आले होते. आमच्या हॉस्पिटलमध्ये अनेक स्त्रिया आम्हाला सॅनिटरी पॅड्स मागत येत होत्या. केदारनाथला आल्यावर दगदगीमुळे त्यांना नियमित वेळेच्या आधीच अचानक पाळी आलेली असायची. केदारनाथमध्ये अशा अनेक वस्तू सहजी मिळत नाहीत. त्यामुळे मग बायकांची पंचाईतझालेली असायची. अशा बायकांसाठी आमच्या नर्सेस कापूस आणि बँडेजचे कापड वापरून तात्पुरती सॅनिटरी पॅड्स बनवून ठेवत आणि इमर्जंसीपुरती एक-दोन पॅड्स देत.
आज दुपारी आनंदला खूप बरे वाटत नसल्याचे त्याने मला फोनवर कळवले. मी वर जाऊन ताप मोजला, तर त्याला १०१ ताप होता. छाती भरल्याची किंवा इतर काहीच लक्षणे नव्हती. पण आज तापाचा चौथा दिवस होता. त्याचे रक्त आमच्या लॅबमध्ये तपासायला दिले होते, त्यात त्याचा WBC काउंट वाढलेला दिसला. त्यामुळे मग मी त्याला Augmentin 625 या गोळ्या चालू केल्या. एकदा असे वाटत होते की त्याला IV (शिरेवाटे) अँटिबायोटिक द्यावे. पण उगीचच त्याच्या अंगात सुया टोचायला नको असेही वाटले. चार वाजता गोळ्यांचा पहिला डोस त्याने घेतला. रात्री दहा वाजता दुसरा डोस घ्यायचा होता. गरज वाटेल तसे क्रोसीनही घ्यायला मी त्याला सांगितले. आम्ही इथे अजून दोनच दिवस असणार होतो. आम्हाला हॉस्पिटलच्या बाहेरही पडता आलेले नसल्याने, केदारनाथाचे दर्शन कधी होणार असा विचार राहून-राहून मनात येत होता. आज आनंदाला इतका जास्त ताप चढलेला पाहून मी काळजीतच पडले. इथपर्यंत येऊन दर्शनाशिवाय परत जावे लागणार कि काय असे वाटून गेले.
आजदेखील नेहमीप्रमाणे साडेसातपर्यंत मी अविरत काम केले. डोसे आणि वडे कसे करायचे हे स्वयंपाक्याला शिकवण्यासाठी म्हणून सुभाषिनी लवकरच निघून गेली होती. आनंदला घेऊन वर जेवायला लवकरच यायला तिने मला सांगितले होते. ती दोसे, वडे आणि इडली तयार ठेवणार होती. त्यामुळे मी आनंदला घेऊन लवकर वर गेले. पण तिथे नेहमीप्रमाणे बटाटा भाजी, गरम फुलके, घट्ट दाल असे जेवण होते. दोसे, वडे सांबर याचा अजून पत्ता नव्हता. सुभाषिनी स्वयंपाकघरात काहीतरी खुडबूड करत होती. मी चटकन जेवण उरकून तिच्या मदतीला गेले. तिला स्वतःला दोसे घालता येत नव्हते. तिने घातलेले दोसे त्या तव्यावरून जाम निघतही नव्हते. उडीदवडे अद्याप तळून झालेले नव्हते. ती मूळची दक्षिण भारतीय (हैद्राबादची) असूनही तिला मध्ये भोक असलेले मेदूवडे घालता येत नाहीत, असे तिने मला सांगितले. ती एका बड्या घरातली सून होती. तिचे सासू-सासरे आमदार आहेत व नवरा मोठा कारखानदार आहे. तिच्या घरी स्वयंपाकीच कामाला ठेवलेला असल्याने तिला कामाची सवय आणि उरक नाही असे तिने मला सांगून टाकले. मग मी एकीकडे भराभर दोसे घातले तर दुसरीकडे वडे तळायला घेतले. त्यामुळे पुढील दोन तास मी सगळ्यांना वडे तळून व दोसे करून घातले. तिने भिजवलेले दोशाचे पीठ केंव्हाच संपले. मग मी माझं डोकं लढवलं. इथे रवा इडलीची अनेक पाकिटे पडलेली आहेत. त्यातले एक पाकीट फोडून, त्यात थोडे दही व पाणी घालून भिजवले. ते मिश्रण मिक्सरमधून काढून बारीक केले व त्याचे पातळ, कुरकुरीत रवा दोसे केले. तरूण नर्सेस, ब्रदर्स, फार्मसिस्ट, सफाई कामगार, इथले निवासी डॉक्टर यादव आणि व्यवस्थापक धनवीरजी व रोहनजी, अशा सर्वांनी दोसे खाल्ले. दोन दिवसांनी मी जाणार आहे हे कळल्यावर ती सगळी मुले हळहळली. तुम्ही रोज नवीन काहीतरी बनवा, असे म्हणू लागली.
मी सव्वादहा वाजता खोलीवर आले. आमचे सामान उद्याच इथून परत पाठवावे लागणार असल्याचे कळल्यामुळे, त्यानंतर लाँड्री करून मग रात्री बारा वाजता एकदाची पलंगावर पाठ टेकवली.
[क्रमशः]
डॉ. स्वाती बापट.

Dr.Swatee,Excellent work..Great service.......Dr.Arvind S.Ganeriwal
उत्तर द्याहटवा🙏
उत्तर द्याहटवाInteresting... तुला केदारनाथचे दर्शन घडले की नाही, याची उत्सुकता लागली आहे.
उत्तर द्याहटवा- विठ्ठल
🙏
हटवावयाच्या ६४ व्या वर्षी एकाच दिवसात तब्बल ४०० रुग्णांना तपासणे, पती आजारी असतानाही कर्तव्यात कसलीही कसूर न ठेवणे आणि त्यानंतर रात्रीच्या वेळी सर्वांसाठी स्वयंपाकघराची धुरा सांभाळणे... हे सर्व वाचून स्वातीताईंबद्दल मनात कृतज्ञता आणि आदराची भावना दाटून येते आणि खरोखरच असे म्हणावेसे वाटते—"तेथे कर माझे जुळती!"
उत्तर द्याहटवादिवसभरात ४०० रुग्ण तपासणे ही कोणत्याही तरुण डॉक्टरसाठीही अशक्यप्राय आणि दमवणारी गोष्ट आहे. केदारनाथसारख्या उंचावरील, जिथे ऑक्सिजन कमी असतो अशा वातावरणात स्वातीताईंनी हे करून दाखवले. पती आनंद यांची तब्येत अजूनही पूर्णपणे बरी नसताना, त्यांनी घरचे कोणतेही कारण किंवा थकव्याचे निमित्त पुढे न करता आपल्या या Noble Profession सर्वोच्च प्राधान्य दिले.
तब्बल १० तास अविरत काम करत असतानाही त्यांची निरीक्षणशक्ती कुठेही मंदावली नव्हती. Minus तापमानातही केवळ तूरळक कपड्यावर फिरणारे अद्भूत साधू, तर दुसरीकडे अथांग श्रद्धेपोटी बर्फाळ रस्त्यांवरून अनवाणी चालल्यामुळे ज्यांच्या तळपायांना बलिस्टर्स आले आहेत असे असंख्य भाविक... या जगामध्ये किती विविध रंगांचे, प्रवृत्तींचे आणि टोकाच्या मानसिकतेचे लोक राहतात, याचे त्यांनी टिपलेले हे चित्र वाचकाला थक्क करते.
१० तासांची ओपीडी (OPD) संपवून जेव्हा त्या खोलीवर आल्या, तेव्हा तिथल्या तरुण डॉक्टर आणि स्टाफला साधे इडली-मेदूवडा पीठ असूनही जमवता येत नाही हे त्यांच्या लक्षात आले. प्रचंड थकलेल्या असतानाही, स्वातीताईंनी थकवा बाजूला सारून थेट किचनचा ताबा घेतला. तिथल्या संपूर्ण स्टाफसाठी त्यांनी गरम, मऊ आणि चवदार इडली-वडा तयार केला. सर्व तरुण सहकाऱ्यांच्या चेहऱ्यावरचा तो तृप्तीचा आनंद पाहून स्वातीताईंमधील एक 'डॉक्टर' आणि 'सैनिक पत्नी' बाजूला राहून एका वात्सल्यमयी 'आई'चे आणि *अन्नपूर्णेचे रूप* समोर येते. रात्री १२ वाजता झोपायला जाईपर्यंत त्या एका क्षणासाठीही थांबल्या नाहीत, हा त्यांचा स्टॅमिना केवळ अद्भूत आहे!
थोर मराठी कवी कुसुमाग्रज यांनीही अशाच ध्येयवेड्या प्रवासासाठी लिहिले होते, "अनंत अमुची ध्येयासक्ती, अनंत अमुची आशा, किनारा तुला पामराला!" स्वातीताईंच्या या अढळ ध्येयासक्तीसमोर थकवा आणि वयाच्या मर्यादा फिक्या पडल्या आहेत.
४०० रुग्णांची सेवा आणि रात्रीचा स्वयंपाक आटोपून शेवटी त्या जेव्हा खूप उशिरा 12 वाजता झोपायला जातात, तेव्हा वाचक म्हणून आपल्या मनात आजही तोच प्रश्न आणि तीच उत्कंठा कायम राहते की—या अफाट धावपळीत स्वातीताईंना शेवटी केदारनाथाचे दर्शन घेता आले का?