आम्ही हेलिकॉप्टरमधे बसल्यावर आम्हाला थंडी वाजेनाशी झाली. सुमारे ११७०० फुटांवरून काही मिनिटांतच बरेच खाली उतरल्यावर आनंदला बरे वाटेल, या कल्पनेने मी जरा सुखावले. तरीही, त्याच्या आजाराचे अजून नेमके निदान न झाल्यामुळे एक डॉक्टर या नात्याने मी मनातून अस्वस्थ होते. मी त्याला रोजच तपासत होते. त्याला Viral infection झाले आहे असेच मला त्या तपासणीमधून वाटत होते. तरीही सहा-सात दिवस त्याला चढ-उतार ताप होता. आम्ही केदारनाथला असताना त्याच्या सर्व रक्ततपासण्या होऊ शकल्या नव्हत्या. अशा परिस्थितीत, त्याला टायफॉईड, मलेरिया किंवा अजूनच काहीतरी गंभीर आजार नाहीये ना? अशी चिंता माझ्या मनाला भेडसावत होती.
आमच्याबरोबर हेलिकॉप्टरमधे बसलेले तिघेजण मराठी भाषिकच निघाले. त्यातले एक जोडपे आणि आम्ही तिघे मागे बसलेलो होतो. ते जोडपे माझ्या आणि आनंदच्या समोर बसले होते. हेलिकॉप्टरने उड्डाण करताच, डॉ. सुभाषिनीने तिच्या फोनवर बाहेरच्या विहंगम दृश्याचे चलत-चित्र रेकॉर्ड करायला सुरुवात केली. आमच्या समोर बसलेल्या नवरा-बायकोना, हेलिकॉप्टरमधून प्रवास करत असतानाचा त्यांचा फोटो आणि व्हिडीओ काढून हवा होता, असे मला वाटले. त्यामुळे मी हात पुढे करून, "मी तुमचे फोटो आणि व्हिडीओ काढते," असे सुचवले. त्यांनीही तत्परतेने मला त्यांचा फोन दिला. मी त्यांचे फोटो आणि एक छोटासा व्हिडीओ काढून दिला. त्यानंतर त्या अनोळखी व्यक्तीने, लगेच माझा फोन मागून घेतला आणि माझा व आनंदचा एक फोटो आणि छोटासा व्हिडीओ काढला.
आम्ही सकाळी दहाच्या सुमारास सेरसीला पोहोचलो. खाली उतरल्यावर आमच्या अंगावरचे गरम कपडे काढून आम्ही आपापल्या बॅकपॅक्समध्ये ठेवले. आता आनंदला ताप नसल्याने तो जरा बरा दिसत होता. केदारनाथहून सुखरूप खाली उतरल्यामुळे आमच्या मनावरचा ताण आता बराचसा कमी झाला होता. सकाळपासून आम्ही तिघांनी काहीही खाल्लेले नव्हते. त्यामुळे आम्हा तिघांनाही आता भुकेची जाणीव व्हायला लागली होती. आधी नाश्ता करावा आणि मग एखादी टॅक्सी पकडून सोनप्रयागला आमच्यासाठी आलेल्या गाडीपर्यंत पोहोचावे, असे आम्ही ठरवले. जवळच असलेल्या एका रेस्टॉरंटमधे थांबून आम्ही पनीर पराठे खाल्ले आणि चहा घेतला. त्यानंतर टॅक्सीचा शोध चालू केला. सेरसी ते सोनप्रयाग हे अंतर जेमतेम पाच-सहा किलोमीटर आहे. हेलिपॅडच्या बाहेर अनेक टॅक्सीझ् उभ्या होत्या, पण बऱ्याचश्या टॅक्सीझमधे चालक बसलेले नव्हते. काही टॅक्सीझमधे चालक होते, पण आम्ही कितीही पैसे द्यायची तयारी दाखवली तरीही सोनप्रयागपर्यंत यायला कोणीही तयार होईना. शेवटी, थोडे चालत पुढे जावे, तिथे एखादी टॅक्सी मिळेल, अशा आशेने आम्ही शंभरएक मीटर चालत पुढे गेलो. पण एकही टॅक्सीवाला आम्हाला न्यायला तयार झाला नाही. शेवटी कसेबसे एका टॅक्सीवाल्याला अक्षरशः हात जोडून विंनती करून आम्ही तयार केले. तो म्हणाला, "मी तुम्हाला इथून फार तर तीन किलोमीटरवर सोडेन. पुढे तुमचे तुम्ही जा. तुम्हाला तिथपर्यंत सोडण्याचे मी १२०० रुपये घेईन." आमचा नाईलाज झाला. तीन किलोमीटर तर तीन किलोमीटर, असे म्हणून आम्ही त्याच्या टॅक्सीमध्ये बसलो. काही वेळातच एका ठिकाणी रस्त्यावर आम्हाला उतरायला सांगून तो निघून गेला.
आम्हाला पुढचे अडीच-तीन किलोमीटर चालत जायचे होते. मनावरचा ताण आणि जागरण यामुळे आम्ही दमलेले होतो. आनंदला त्या सकाळी ताप नसला तरीही त्याला बराच अशक्तपणा जाणवत होता. आम्ही तिघेही तसेच पाय ओढत चालत निघालो. तेवढ्यात आम्हाला सोनप्रयागकडे जाणारा एक मोटारसायकलवाला दिसला. आम्ही त्याला थांबवून आम्हाला सोनप्रयागपर्यंत सोडण्याची विंनती केली. आमच्या नशिबाने त्याने ती विनंती मानली. आम्ही दोघींनी त्याच्या पाठीमागे बसून जावे, असे आनंदचे मत होते. त्याचे ते मत आम्ही दोघींनी पूर्णपणे खोडून काढले. आम्ही आनंदजवळ आमच्याकडच्या दोन बॅकपॅक्स दिल्या आणि त्याला त्या मोटारसायकलवाल्याच्या पाठीमागे बसून जायला लावले. आता आम्हा दोघींमधे मिळून वजनाने हलका असा एकच बॅकपॅक होता. त्यातून उताराचा रस्ता असल्याने आम्ही दोघी सहजी चालत वीसएक मिनिटातच सोनप्रयागपर्यंत पोहोचलो. आनंद आमच्या आधीच पोहोचलेला होता. त्याने आमच्यासाठी पाण्याच्या बाटल्याही विकत घेऊन ठेवलेल्या होत्या.
सोनप्रयाग ते नारायणकोटीच्या प्रवासात वाहतूक कोंडीमुळे, वरचेवर अनेक ठिकाणी थांबत-थांबत मार्गक्रमण करावे लागले. शेवटी दुपारी एक वाजायच्या सुमारास आम्ही नारायणकोटीच्या हॉस्पिटलमधे पोहोचलो. तिथे जेवायला वगैरे न थांबता लवकरात लवकर, पुढे हरिद्वारला निघून जाण्याची आमची इच्छा होती. पण नारायणकोटीच्या हॉस्पिटलमधे त्या दिवशी प्रथमच नवीन सोनोग्राफी मशीन आलेले होते. त्या मशीनच्या उदघाटनाचा कार्यक्रम आणि पूजा पार पडलेली होती. त्या पूजेचा प्रसाद खाऊनच आम्ही हरिद्वारला जायला निघावे, असा प्रेमळ आग्रह आम्हाला मोडता आला नाही. छोले, मसालापुरी, रायता, डाळ-भात आणि प्रसादाचा शिरा असे मस्त जेवण मी आणि सुभाषिनीने हॉस्पिटलमध्ये जाऊन केले. आनंद खालच्या मजल्यावरच्या खोलीत झोपून होता. त्याने फक्त प्रसादाचा शिरा खाल्ला आणि दूध प्यायले. दुपारी दीड-दोनच्या सुमारास, आम्ही अजून नारायणकोटीला असतानाच आनंदला पुन्हा १०१ च्या वर ताप चढायला लागला होता. त्याला त्याची अँटिबायोटिकची आणि क्रोसिनची गोळी देऊन आम्ही हरिद्वारला निघालो. केदारनाथहून खेचरावरून पाठवलेले आमचे सामान आमच्या आधीच नारायणकोटीला पोहोचलेले होते. हरिद्वारकडे टॅक्सीने निघण्याआधी आमचे सामान तपासून ते टॅक्सीमधे ठेवले. नारायणकोटी ते हरिद्वार या प्रवासातही आनंदला ताप होताच. त्यामुळे हरिद्वारच्या हॉस्पिटलमधील डॉ. संजय शहा यांच्याशी मी संपर्क साधला व त्यांना कल्पना देऊन ठेवली. रस्त्यावरच्या वाहतूक कोंडीमुळे आम्ही रात्री बाराच्या सुमारास हरिद्वारला पोहोचलो. आम्ही पोहोचल्यावर लगेच आनंदच्या सर्व तपासण्या होतील, अशी सोय डॉ. संजय शहा यांनी केलेली होती. सुदैवाने हरिद्वारला पोहोचेपर्यंत आनंदचा ताप उतरला होता. त्याच्या सर्व तपासण्यांचे रिपोर्ट्स एका तासाभरात मिळाले. ते रिपोर्टही नॉर्मल आले.
आम्ही ३० मे रोजी रात्री उशिरा हरिद्वारला पोहोचलो होतो. आमची परतीची फ्लाईट एक जूनला दुपारी होती. त्यामुळे आमच्याकडे दीड दिवस होता. त्या दीड दिवसांमधे या संस्थेचे, धर्मावाला येथील मुख्यालय आणि तिथले हॉस्पिटल बघून यावे, असे आम्ही आधी मनोमन योजले होते. पण आता ते शक्य नव्हते. त्यामुळे आम्ही दोघांनीही खोलीतच आराम केला. डॉ. संजय शहा रोज दोनवेळा आमच्या खोलीमधे येऊन आनंदला तपासत होते. त्यांनी त्याला औषधे तर दिलीच पण त्याला धीरही दिला. हरिद्वारच्या हॉस्पिटलमधे बालरोगतज्ज्ञ कार्यरत नसल्यामुळे, तिथे आलेल्या एक-दोन बालरुग्णांना मी तपासावे अशी विनंती डॉ. संजय शहांनी मला केली. त्यानुसार मी बालरुग्ण तपासले. मी एका मुलाला तपासत असताना, डॉ. शहांच्या सांगण्यानुसार हॉस्पिटलमधील एका कर्मचाऱ्याने माझा फोटो काढला. आम्ही एक जूनला विमानतळावर जायला निघण्यापूर्वी डॉ. संजय शहा यांनी मला स्वामी विवेकानंद धर्मार्थ हॉस्पिटलचे अहवाल भेट दिले. त्यांचा, आनंदचा आणि माझा एक फोटोही काढला गेला.
केदारनाथाचे मंदिर पाहताना माझे मन सहजच ४५ वर्षांपूर्वी मी केलेल्या यात्रेची उजळणी करून आले. 'स्वामी विवेकानंद हेल्थ मिशन सोसायटी' च्या कर्मचाऱ्यांची निःस्वार्थ सेवा पाहून आणि केदारनाथाच्या सुंदर व विशाल मंदिरातील शिळारुपी पिंडीचे स्पर्शदर्शन करून आल्यानंतर माझ्या मनात एक विचार अगदी सहजपणे उमटला,
"दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती"
[लेखमाला समाप्त]
डॉ. स्वाती बापट.


स्वाती तुझी केदारनाथ नरसेवा यावरील सर्व लेख वाचताना खरच तुझ्या चिकाटीची कमाल आणि नरसेवा करण्याची इच्छा याची पूर्ण जाणिव झाली. ही सेवा तुझ्या हातून घडावी अशी खुद्द परमेश्वरची इच्छा होती,म्हणूनच तुला तिथे जाण्याची इच्छा झाली.. खरोखरीच एक यात्राच तुझी आणि आनंद यांची घडली आणि आम्हाला तुझ्या लेखातून एक परमेश्वर आणि मानवतेचे दर्शन घडले. प्रत्येक लेखात तू अतिशय बारकाव्याने प्रत्येक गोष्टीचे वर्णन केले आहेस, हे एक विशेष.त्यामुळे वाचताना फारच उत्सुकता आणि तेथील परिस्थिती डोळ्यासमोर उभी राही. नक्कीच पुढील प्रवासवर्णन यात्रावर्णन वाचायला आवडेल.तुझे आणि आनंद यांचे खूप कौतुक वाटते. दोघांचेही ही अवघड कष्टप्रद मानवसेवा आणि ईश्वरसेवा सुखरूप पणे पूर्ण केल्याबदल मनःपूर्वक अभिनंदन🌷
उत्तर द्याहटवा🙏✌️👍
हटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
हटवासंपूर्ण लेखमाला वाचनीय झाली आहे.
उत्तर द्याहटवा- विठ्ठल
निस्वार्थ सेवा म्हणजे काय याचा वस्तुपाठ घालून दिलास तू स्वाती. अगदी आपल्या गावातील सरकारी रुग्णालयात रुग्ण फुकट तपासणाऱ्या मानद डॉक्टरलासुद्धा त्यातील काही रुग्ण आपल्या प्रायव्हेट क्लिनिकला येतील अशी सुप्त इच्छा असतेच. आमचे अग्रवाल सर तर म्हणायचे की ससूनची attachment मिळाली की आपोआप डॉक्टरची प्रायव्हेट प्रॅक्टिस फळफळते. इथे तर त्यातील एकही पेशंट पुण्यात तुझ्याकडे येण्याची शक्यता नव्हती. (अन् आलाच तर इतक्या दूर आला म्हणून त्याला तू फुकट तपासशील). तरीदेखील हरिद्वार ते हरिद्वार प्रवासात अनंत अडचणी सोसून , तुम्हा दोघांच्या तब्येती ठीक नसताना हिमालयातील थंडीत, त्या उंचीवर, दहा दिवस रुग्ण सेवा देणे हे केवळ तूच करू जाणे. या सगळ्यात आनंदची साथही तेवढीच मोलाची आहे. त्याचा सैनिकी चिवटपणा आणि तुझ्या कामावरचा त्याचा विश्वास कामी आला. 'Age is just a number' हे ही तुम्हाला तंतोतंत लागू पडतं.
हटवाYou are really made for eachother.
आता राहिली तीर्थक्षेत्री जाऊन पुण्य कमावण्याची गोष्ट. ते तर मला वाटतं श्री.केदारनाथच्या दर्शनाच्या कितीतरी पट पुण्य जेवढ्या लोकांना तपासून, औषधोपचार करून त्यांना केदारनाथचे दर्शन घडविले त्यातून मिळालं.
नरसेवा हीच नारायणसेवा हे ब्रीदवाक्य असणाऱ्या विवेकानंद केंद्राचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत. हे केंद्र अन् त्यांच्या माध्यमातून सेवा देणाऱ्या सर्वांची मानवतेची उंची त्या हिमालयाशी स्पर्धा करतेय असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरू नये.
अतिशय हुषार, ब्रिलियंट मुलगी आहेस. अतिशय जबाबदारीने पूर्ण अभ्यास करून निर्णय घेतलास.
उत्तर द्याहटवायश मिळणारच. ति. दादांना सा. न. आणि शुभेच्छा!
तुला सलाम !!!
🙏😊
अंतिम भाग वाचताना एकाच वेळी मनामध्ये दोन टोकाच्या भावना दाटून येतात—पहिली, त्यांनी आणि आनंद यांनी सर्व शारीरिक व मानसिक संकटांवर मात करून हा यज्ञ यशस्वी पूर्ण केल्याची कृतज्ञता; आणि दुसरी, गेले १५ दिवस रोज आपल्याला खिळवून ठेवणारा हा थरार आणि भक्तीचा प्रवास आता संपल्याची एक अनामिक हुरहूर.
उत्तर द्याहटवामाणूस जर मनाने खंबीर असेल, तर तो शरीर आणि मनावर येणाऱ्या कोणत्याही टोकाच्या तणावाला पचवू शकतो, हे या दाम्पत्याने आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.
केदारनाथमधील १० दिवसांची अत्यंत खडतर ड्युटी संपवून खाली आल्यानंतर, 'नारायण कोटी' येथे मिळालेल्या दीड दिवसाच्या मुक्कामातही स्वातीताई शांत बसल्या नाहीत! तिथेही त्यांनी रुग्णांची सेवा सुरूच ठेवली, हा त्यांच्यातील 'प्रोफेशनल ethics चा ' सर्वोच्च क्षण आहे. विवेकानंद मिशनच्या ज्या निस्वार्थी कार्यकर्त्यांनी कोणत्याही व्यावसायिक हेतूशिवाय स्वतःला गरिबांच्या सेवेसाठी वाहून घेतले आहे, त्यांच्याबद्दल स्वातीताईंनी व्यक्त केलेली कृतज्ञता अतिशय बोलकी आहे. स्वातीताईंनी स्वतःही नेमके हेच सेवाव्रत तिथे अखंडपणे चालवले, त्यामुळे 'संतांनी संतांचे मर्म जाणावे' तसाच हा काहीसा प्रकार.
स्वाती ताई आज तुमची ही लेखमाला संपली, पण गाठीशी खूप मोठे विचार देऊन गेली. यापुढे रोज सकाळी तुमच्या ब्लॉगवरून मिळणारा तो थरार आणि केदारनाथाची गोरगरीब यांची भक्ती आम्हा सर्वांना खूप miss होईल, ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानाप्रमाणे, तुमच्या मनातील ही 'सत्कर्मी रती' अशीच उत्तरोत्तर वाढत राहो, हीच प्रार्थना! तुम्हा दोघांनाही पुढील निरोगी आणि आनंदी आयुष्यासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा! 🙏