काल रात्री झोपायला जरा उशीरच झाला होता. तरी सवयीने सकाळी ५.३० ला जाग आलीच. आनंद आजही जरा कळवळतच उठला होता. त्याच्या अंगात तापही होता. तो व्यवस्थित मोजून पाहायला हवा, म्हणून तो मला म्हणाला, "खाली ओपीडीत जाऊन थर्मामिटर घेऊन ये." मी जाऊन थर्मामिटर व Pulse Oxymeter सुद्धा घेऊन आले. आनंदला १०० ताप होता. पण सुदैवाने त्याचे ऑक्सिजन saturation नॉर्मल होते. "चहा प्यावासा वाटतोय का?" असे मी त्याला विचारले आणि तो 'हो' म्हणाल्यामुळे लगेच वरच्या मजल्यावर जाऊन किचनमधे डोकावले. आचाऱ्याला विनंती करून बिनसाखरेचा चहा करून घेतला. पण तो चहा खोलीत न्यायला त्यांच्याकडे फ्लास्कच नव्हता. म्हणून परत खाली खोलीत येऊन आमचा फ्लास्क घेऊन वर गेले आणि चहा आणला. दोघांनी गरम चहा प्यायला. इथे 'अमूल' ची दूधपावडर येते. त्यात आधीच भरपूर साखर असते. इथले आचारी त्यातही वरून साखर घालतात. त्यामुळे एरवी इथला अति गोड, पाकासारखा चहा प्यायला मला आवडत नाही. मळमळायला होतं. आजचा कमी गोड चहा पिऊन मात्र बरे वाटले.
हे सगळे होईपर्यंत ६.४५ वाजले होते. बाहेर कडक ऊन पडलेले होते व हिमशिखरे चमकत होती. मला अचानक आठवण झाली की कपडे धुवायला हवेत. आधीच्या दोन वेळा आनंदनेच इथले वॉशिंग मशीन वापरलेले होते. म्हणून त्याच्याकडूनच मी ते कसे चालवायचे ते विचारून घेतले व मशीन लावले. मशीनची soak cycle झाली, वॉश सायकलही झाली आणि स्पिन सायकलसाठी शेजारच्या ड्रममधे कपडे टाकणार, तेवढ्यात नाईट ड्यूटीवर असलेल्या डॉ. शोभितचा फोन आला, "ओपीडीमधे दीड वर्षाचे मूल आले आहे, खूप रडतंय, खाली येऊन प्लीज त्याला बघा", अशी त्याने विनंती केली. म्हणून मग मी स्पिन सायकल लावून खाली पेशंट बघायला गेले.
ओपीडीमधे एक बाळ जोरजोरात केकाटत होते. मी त्याला व्यवस्थित तपासले. पण त्याला फारसे काही झाले नव्हते. त्याला काहीतरी साधेच औषध देऊन मी under observation ठेवले. थोडावेळ तिथेच थांबून ते मूल शांत झाल्यावरच मी खोलीवर परतले. आमच्या सर्व खोल्यांच्या मागच्या बाजूला एकच कॉमन व्हरांडा-कम-बाल्कनी आहे. त्यामुळे खोलीच्या मागच्या दरवाज्याने वॉशिंग मशिन ठेवलेल्या जागेपर्यंत जाता येते. मी गेले तोपर्यंत स्पिन सायकल संपलेली होती. मागच्या बाल्कनीमधेच तारा बांधून कपडे वाळत घालायची सोय केलेली आहे. अनेकांचे कपडे तिथे लटकत असतात. त्यातच जागा शोधून आपले कपडे वाळत घालायचे असतात. कपडे वाळत घालून मी खोलीवर येईपर्यंत ७.३० वाजले होते. आनंद खूपच दमलेला दिसत होता. तापामुळे रात्री त्याला नीट झोप लागली नव्हती. त्यामुळे तो नाष्टा करायलाही येत नाही म्हणाला. मग मीच पटापटा अंघोळ उरकून, कपडे बदलून नाष्टा करायला गेले.
आज नाश्त्याला काळे चणे आणि शेवयाची खीर होती. इथे एका नोटीसबोर्डावर आठवडाभराचा मेनू लावलेला असतो. रोजच्या तिन्ही जेवणांमधे नेमके काय-काय असणार ते कळावे अशी सोय आहे. पण मजा म्हणजे, छापील मेनू वेगळाच असतो आणि प्रत्यक्ष जेवणातले पदार्थ वेगळेच असतात.गौरीकुंडहून वर केदारनाथपर्यंत येणारी भाजी-फळे आणि स्वयंपाकघरातल्या आचाऱ्यांची मर्जी, यावरच त्या-त्या दिवशी काय बनवले जाईल हे ठरते. अर्थातच मेनू नावापुरताच लावलेला होता हे मला समजले. माझा नाश्ता चालू असतानाच मी आनंदला फोन करून आजचा मेनू सांगितला आणि विचारले, "तुला काही खायला आणू का?" तो "खीर चालेल" म्हणाल्यामुळे ग्लासमधे खीर घालून नेली. त्याने ती खीर खाल्ली. त्यामुळे मलाच जरा बरे वाटले. पुण्याहून सोबत नेलेले तुळशीचे बी मी सकाळीच भिजवून ठेवले होते. मी ते खाल्लेच होते पण आनंदलाही खिरीत घालून ते खायला लावले.
नेहमीप्रमाणे मी ८.४५ ला कामाला आले. रात्रपाळीचा नर्सिंग स्टाफ पेंगाळलेल्या अवस्थेत होता. कालच्या रात्रभरात खूप जास्त आणि त्यातही बरेच अत्यवस्थ असलेले रुग्ण आले होते. त्यामुळे ती सगळी नर्स मुले-मुली दमलेली होती. शिवाय, OPD मधेही रोजच्याप्रमाणेच पेशंट्सची गर्दी उसळलेली होती. रात्रीच्या चहाचे कप, स्टीलचा जग, पाण्याच्या बाटल्या, बिस्किटांचे अर्धवट खाल्लेले पुडे, असा सगळा पसारा माझ्या पुढ्यातल्या टेबलवर होता. मी ते टेबल स्वच्छ करून घेतले आणि लगेच झटून कामाला लागले.
इथे काही ठराविक स्थानिक पेशंट पुन्हा-पुन्हा येत असतात. त्यामधे इथले हॉटेलवाले, खेचरवाले, हमाल, बांधकामावरचे मजूर, स्थानिक पोलीस आणि देवळातले पुजारी असे लोक असतात. चारधाम यात्रेचे महिने सोडून इतरवेळी, इथे अगदी मोजकेच लोक राहत असल्याने हे सगळे लोक एकमेकांना ओळखतात आणि एकमेकांना सांभाळून असतात. त्यामुळे, इथल्या स्थानिक लोकांना आमच्या हॉस्पिटलमधे जराशी 'व्हीआयपी ट्रीटमेंट' असते. यातल्या अनेकांची आणि माझीही आता ओळख झाली होती. इथे येणाऱ्या यात्रेकरुंपैकी बरेच लोक मराठीभाषिक असतात. त्यांना मराठीत बोलणारी डॉक्टर मॅडम बघून साहजिकच खूप दिलासा वाटतो.
आज डॉ. अजयच्या ऐवजी डॉ. हर्ष ओपीडी ड्यूटीवर आला होता. त्याच्या जागी, मंदिराजवळच्या बूथवर अजय गेला होता. हर्ष अतिशय आस्थेने पेशंट्स बघतो पण तो जरा गप्पिष्ट आहे. जेंव्हा OPD मध्ये पेशंट्सची झुंबड उडालेली असते त्यावेळी प्रत्येक पेशंटसोबत गप्पा मारत बसायची त्याची सवय खूपच नडते. म्हणून अधूनमधून मी त्याला कानपिचक्या देऊन लगबगीने काम करायला लावत होते.
आज डॉ. सुभाषिनी, म्हणजे आमच्यासोबत हैदराबादहून आलेली सर्जन बाई, छान तयार होऊन, एक लांब स्वेटर घालून सकाळी दहानंतर तिच्या खोलीमधून खाली आली. बराच वेळ ओपीडीत न येता आतल्या बाजूच्या टेबलापाशी बसून होती. ती पेशाने सर्जन व कॉलेजातली प्राध्यापिका असल्याने, तिला OPDमध्ये सर्दी-खोकल्याचे पेशंट्स बघत बसायला नको वाटत असावे. काहीतरी operative काम मिळाले तर बरे असे तिला वाटत असावे. काही वेळ माझ्याशी गप्पा मारून ती खोलीवर निघूनच गेली. त्यानंतर पुन्हा थोडया वेळाने आली तेंव्हा तिने वेगळ्याच रंगाचा स्वेटर आणि टोपी घातलेली होती. वर एक छानसे जॅकेटही घातले होते. कामाच्या वेळेत चाललेली तिची फॅशनपरेड पाहून मला नवलच वाटले. ती जून महिन्यात कैलास मानसरोवर यात्रा करणार असल्याने त्या यात्रेसाठी तिने अनेक नवीन स्वेटर्स, टोप्या आणि जॅकेट्स विकत घेतलेले होते. त्यापैकीच एकेक कपडा घालून इथल्या थंडीपासून कसा बचाव होतोय, ते तिला बघायचे असावे. तिला नुसते बसून गप्पा मारायला खूप आवडते असे माझ्या लक्षात आले. माझे काम करता-करताच तिच्या गप्पा ऐकताना माझी चांगलीच करमणूक होत होती.
मी रोज माझे काम मन लावून करत असल्यामुळे मला इथे आल्यापासून खूप समाधान मिळत होते. इथल्या सर्व स्टाफपैकी मीच वयाने सगळ्यात मोठी असूनही मी इतके जास्त काम करते हे बघून इथल्या सगळ्या नर्सिंग स्टाफला माझे फार कौतुक वाटत होते. इथले निवासी डॉक्टर, डॉ. यादव हेदेखील मी आल्यापासून रोज मला विचारत होते, "मॅडम, आपकी तबियत कैसी है? आप ठीक तो हो ना? खांसी-बुखार तो नही है ना?" मला आधी त्यांच्या अशा रोजच्या चौकशीचे जरा आश्चर्यच वाटले होते. पण मग इथल्या नर्सिंग स्टाफकडून समजले की इथे आमच्यासारखे दहा-दहा दिवसांसाठी आलेले कोणीही डॉक्टर्स पूर्ण दिवस काम करूच शकत नाहीत. ते आजारी तरी पडतात किंवा काम न झेपल्याने लवकर खाली हरिद्वारला निघूनच जातात. हे ऐकल्यानंतर माझ्या लक्षात आले की इथल्या लोकांना माझे एवढे कौतुक का वाटत होते!
दुपारी खोलीवर येऊन आनंदला बघून गेले. तो झोपलेलाच होता. त्याला जेवणाबाबत विचारले. तो "काहीतरी खाईन" असे अनिच्छेनेच म्हणाला. माझ्याबरोबरचे दोन डॉक्टर्स आधीच वर जेवायला गेलेले होते. म्हणून मग डॉ. हर्षला फोन करून दुपारच्या जेवणाचा मेनू विचारला. सकाळचीच उरलेली खीर पुन्हा जेवणात ठेवलेली आहे, असे त्याने सांगितले. मग डायनिंग हॉलमधे जाऊन मी आनंदला खीर आणून दिली. वाळलेले कपडे खोलीत आणून ठेवले व परत खाली कामाला गेले. आजही मी रोजच्याप्रमाणे ७.३० वाजेपर्यंत काम केले. आज मलाही जरा अंगात कणकण आणि घशात खवखव जाणवत होती. कदाचित उद्या मलाही ताप येईल असे वाटले. पण लगेच, 'तसे न झाल्यास बरे', हा विचारही मनात आला. रात्री आनंदही जेवायला वर आला. कढी-पकोडे, दुधी भोपळ्याची भाजी, भात आणि सकाळचीच खीर असा बेत होता. आज कढी-भातासोबत तळलेले पापडही होते. त्यामुळे जेवायला मजा आली. मी दुपारी जेवले नसले तरी आज चहासोबत थोडे स्नॅक्स खाल्लेले होते. रोज दुपारी ५ च्या सुमारास हॉस्पिटलतर्फे, म्युसली आणि चॉकोज् असे एक मिश्रण येते. त्याशिवाय आज डॉ. सुभाषिनीने प्रत्येकाला चहासोबत एकेक नमकीनचे पाकीट दिले होते. मी ते स्नॅक्सचे पाकीट घेतले नव्हते. पण रिया नावाच्या नर्सने आग्रह करून मला तिच्या स्नॅक्सच्या पाकिटातले दोन घास खायला लावले होते.
आज संध्याकाळपासून थोडे बरे वाटते आहे असे आनंद म्हणाला. त्याच्या अंगात तापही नव्हता. पण माझे डोके मात्र जड होऊन, अंगही दुखून आले होते. पहिल्यापासूनच मी मनाशी निर्धार केला होता की काहीही झाले तरी शेवटच्या दिवसापर्यंत मी माझ्या कामात खंड पडू देणार नाही. त्यामुळे मला आजारी पडून चालणार नव्हते. म्हणून आज लवकरच झोपायचा विचार केला आणि तो अमलातही आणला...
[क्रमशः]
©डॉ. स्वाती बापट

स्वातीताईंनी डॉ. हर्षचे कौतुक करताना म्हटले होते की हा मुलगा खूप ध्येयवादी आहे.
उत्तर द्याहटवाहर्षबद्दल मनात एवढा आदर असूनही, जेव्हा प्रत्यक्ष कामाची वेळ येते, तेव्हा स्वातीताई एक 'सिनियर डॉक्टर' म्हणून अत्यंत कडक होतात. हर्ष गप्पा मारण्यात वेळ घालवत आहे हे पाहिल्यावर, त्या त्याला टोकतात आणि कामावर लक्ष केंद्रित करायला सांगतात. हा प्रसंग दाखवतो की स्वातीताई जितक्या कौतुक करणाऱ्या मैत्रिणी आहेत, तितक्याच त्या कर्तव्याच्या बाबतीत कडक मार्गदर्शक (Strict Mentor) आहेत. भावी पिढीला घडवण्याची ही त्यांची तळमळ कौतुकास्पद आहे.
ताटातूट झाल्यावर आनंद आणि स्वातीताई यांच्यात जी 'अति-काळाजीपोटी' भांडणे झाली होती, त्यावरून आनंद यांच्या मनातील स्वातीताईंबद्दलचे प्रेम आणि काळजी दिसली होती.
या भागात आनंद (पती) यांची तब्येत ठीक नाही, त्यांना ताप-खोकला आहे आणि ते खोलीवर विश्रांती घेत आहेत. एका बाजूला पती आजारी असताना मनामध्ये असलेली अस्वस्थता, आणि दुसऱ्या बाजूला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी ताटकळत उभे असलेले शेकडो रुग्ण... अशा कठीण प्रसंगात स्वातीताईंनी 'घर आणि कर्तव्य' या दोन्ही आघाड्यांवर स्वतःला साभाळले. पती लष्करी अधिकारी असल्याने त्यांनी स्वातीताईंना ड्युटीवर जाण्यास प्रोत्साहन दिले आणि स्वातीताईंनीही कौटुंबिक काळजी बाजूला ठेवून उशिरापर्यंत रुग्णांची सेवा केली. हा त्यांच्यातील सर्वोच्च त्यागाचा आणि निष्ठेचा क्षण आहे. त्यांची स्वतः ची तब्बेत पुढील भागात ठणठणीत झाली हे समजावे हीं सदिच्छा. 🙏
स्वाती ताईंनी नोंदवले होते की, २० तास चालूनही स्वातीताईंनी घरात 'औषधं औषधापुरतीच' या नियमामुळे कोणतीही 'पेन किलर' घेतली नव्हती. या वेळेस घसा दुखत असताना कणकण असताना तरी औषधं घेतले कीं नाही?