शनिवार, १५ फेब्रुवारी, २०२५
बुलढाणा जिल्ह्यातील भ्रमंती-४
बुधवार, १२ फेब्रुवारी, २०२५
बुलढाणा जिल्ह्यातील भ्रमंती-३
लोणार सरोवराबाबत गेली कित्येक वर्षे वर्तमानपत्रांमधून आलेले अनेक लेख मी वाचलेले होते. हजारो वर्षांपूर्वी एका उल्कापातामुळे तयार झालेले हे सरोवर भारतातीलच नव्हे तर अख्ख्या जगातील एक आश्चर्य समजले जाते. या सरोवराचे वैशिष्ट्य असे की, उल्कापातामुळे जगभरामधे अनेक ठिकाणे विवरनिर्मिती झाली. पण फक्त याच विवराचे रूपांतर खाऱ्या पाण्याच्या सरोवरामधे झालेले आहे. "सुमारे सव्वातीनशे पायऱ्या उतरून आणि जंगलातली पायवाट चालून, आपण अगदी सरोवरापर्यंत जाऊन आलो तरीही, लोणार सरोवर परिसर बघायला अर्धा दिवस पुरतो" असे मला अनेकांनी सांगितले होते. त्या दृष्टीने आम्ही MTDC रिसॉर्टमधल्या खोलीचे एकाच रात्रीचे बुकिंग केले होते. आम्ही पोहोचलो तो शनिवार होता. लोणार ते पुणे हा प्रवास कमीतकमी ८ ते ९ तासांचा आहे असे आम्हाला गुगल मॅप्सवर दिसत होते. त्यामुळे, संध्याकाळच्या आत सरोवर बघायचे, दुसऱ्या दिवशी पहाटे उठून दैत्यसूदन मंदिर बघून उशिरात-उशिरा सकाळी नऊ वाजेपर्यंत लोणारहून निघून, दिवसाढवळ्या पुण्याला पोहोचायचे, असे आम्ही मनाशी ठरवले होते.
मेहेकर येथील सुंदर मंदिरे पाहून झाल्यावर आम्ही साधारण दुपारी अडीच-तीनच्या सुमारास MTDC रिसॉर्टमध्ये पोहोचलो. या रिसॉर्टमध्ये छोट्या-छोट्या अनेक टुमदार बंगल्या आहेत. प्रत्येक बंगलीमधे एक डबलरूम, अटॅच्ड टॉयलेट आणि खोलीच्या समोर व मागच्या बाजूला व्हरांडा आहेत. या व्हरांड्यांमधे प्लॅस्टिकच्या आराम खुर्च्या ठेवलेल्या असतात. चार-चार बंगल्यांच्या मधल्या चौरस भागामधे चांगली निगराणी राखलेले हिरवेगार लॉन आहे. आसपासच्या संपूर्ण परिसरामधे भरपूर झाडे आहेत. शिवाय संपूर्ण रिसॉर्टच्या आवारामध्ये छान फुलझाडे लावून सुशोभीकरण करण्यात आलेले आहे. एकूण तिथले वातावरण शांत आणि प्रसन्न आहे. व्हरांड्यामधल्या खुर्च्यांवर बसून निवांतपणे चहाचे घोट घेत त्या वातावरणाचा सुखद अनुभव घेता येतो. या रिसॉर्टचे रेस्टॉरंट वरच्या मजल्यावर आहे. त्या मजल्याची उंची मुद्दामच खूप जास्त ठेवलेली असल्यामुळे पूर्वी तिथूनच लोणार सरोवराचे दर्शन व्हायचे. पण आता रेस्टॉरंट आणि लोणार सरोवर यांच्या दरम्यान खूप झाडी वाढल्यामुळे तिथून सरोवर दिसत नाही.
MTDCच्या थोड्याफार गलथान कारभाराची पहिली झलक आम्हाला रिसेप्शन काउंटरवर गेल्याबरोबर मिळाली. महाराष्ट्रातल्या ज्या-ज्या पर्यटनस्थळी MTDC ची रिसॉर्ट आहेत त्या सर्व ठिकाणांची माहितीपुस्तके तिथल्या एका शेल्फमधे ठेवलेली दिसली. मी साहजिकच लोणारचे माहितीपुस्तक शोधू लागले. तिथल्या मॅनेजरने अगदी थंडपणे, 'लोणारची माहितीपुस्तके संपली आहेत. लोणार वगळता इतर सर्व माहितीपुस्तके आहेत' असे उत्तर दिले. त्याच्या आवाजामध्ये कुठलीही दिलगिरी नव्हती हे प्रकर्षाने जाणवले.
आमच्या बंगलीची किल्ली घेऊन आम्ही सामान खोलीत ठेवले. खोल्यांची देखभाल फारशी चांगली नाही, हे लगेच जाणवले. आजकाल कोणत्याही साध्या हॉटेलच्या खोलीमध्ये आंघोळीचा साबण, शाम्पू, टूथपेस्ट, पाणी गरम करण्याची किटली, हे सर्व ठेवलेले असते. त्या बंगलीमध्ये यापैकी एकही गोष्ट तर नव्हतीच, पण टॉवेल्स व नॅपकिन्सदेखील ठेवलेले नव्हते. चौकशी करता सांगण्यात आले की, "लॉंड्रीवाला दोन वाजता येईल, तेंव्हा टॉवेल मिळतील." खोलीमध्ये 'वायफाय' कनेक्शन होते पण इंटरनेट चालू नव्हते. त्याचे कारण ऐकून तर आम्ही धन्य झालो. "इंटरनेट कनेक्शनची फी वेळेत भरलेली नसल्याने कनेक्शन कापलेले आहे!"
दुपारी जेवणाच्या वेळेस आम्ही मेहेकरच्या बालाजी मंदिरात साबुदाणा उसळीचा प्रसाद खाल्लेला असल्यामुळे जेवायची भूक नव्हतीच. चहा घेऊन लगेच आम्ही सरोवर परिसर हिंडायला जायचे ठरवले. पण तिथल्या सहाय्यकाने दोन कप चहा आणायला अर्धा तास लावला. अल्युमिनियम फॉईलने झाकून आणलेल्या कपांमधला तो चहा आमच्या हातात येईपर्यंत थंड झालेला होता. महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना द्यायची असेल तर अशा अनेक लहान-मोठ्या गोष्टीकडे लक्ष देणे अत्यावश्यक आहे असे जाणवले.
लोणार गावामधे MTDC रिसॉर्ट व्यतिरिक्त 'विक्रांत रिसॉर्ट' आणि 'कृष्णा लॉज' अशाही दोन जागा राहण्याजोग्या आहेत असे समजले. पण लोणार सरोवराच्या सर्वात जवळचे निवासस्थान MTDC रिसॉर्ट हेच आहे. कृष्णा लॉज ST स्टँडच्या समोरच आहे. तिथे कदाचित रास्त भावात राहण्याची सोय होत असावी. विक्रांत रिसॉर्टचे दर MTDC रिसॉर्टपेक्षा जास्त आहेत असेही समजले. अर्थात, ही सगळी माहिती आम्हाला स्थानिक लोकांकडून 'ऐकीव' स्वरूपात मिळालेली असल्याने आणि आम्ही कृष्णा लॉज किंवा विक्रांत रिसॉर्ट येथे प्रत्यक्ष जाऊन शहानिशा करून घेतलेली नसल्याने खात्रीशीर म्हणता येणार नाही.
चहा घेऊन आम्ही निघालो. लोणार सरोवराच्या बाहेर रस्त्यावरच आमची गाडी उभी केली. तिथे जेमतेम पाच-सहा गाड्याच उभ्या होत्या. बाहेर हातगाडीवर तीन-चार फळविक्रेते, प्लॅस्टिकच्या ग्लासमध्ये उघड्यावरच ठेवलेल्या अननस आणि कलिंगडाच्या कापलेल्या फोडी विकत होते. काही पर्यटक ते विकत घेऊन खातही होते. 'उघड्यावरील फळे आणि अन्न खाऊ नये' असे शाळेत कितीही शिकवले गेले तरी प्रत्यक्षात मात्र ते पाळले जाताना दिसत नाही. "असल्या पोपटपंची शिक्षणाचा तरी काय उपयोग?" असे मला वाटून गेले. आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता बाळगण्याची सवय आपल्या देशातल्या सामान्यजनांना लावण्यासाठी अशा छोट्याछोट्या गोष्टींमधे प्रचंड काम करणे आवश्यक आहे.
सरोवर परिसरात जाण्यासाठी सकाळी सातपासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच प्रवेश दिला जातो. पाच वाजता प्रवेशद्वार बंद केले जाते, पण खाली सरोवरापर्यंत गेलेल्या पर्यटकांना गडबडीने वर यावे लागत नाही. खाली गेलेले सर्व पर्यटक वर आलेले आहेत याची खात्री करून मगच प्रवेशद्वाराला कुलूप लावले जाते. मुख्य प्रवेशद्वारावर प्रत्येक पर्यटकाला आपले नाव, गावाचे नाव, फोननंबर यांची नोंद करावी लागते. त्याशिवाय आधारकार्ड किंवा एखादे फोटो-आयडेंटिटी कार्ड दाखवावे लागते. तिथे असलेले सुरक्षारक्षक प्रत्येक पर्यटकांचे सर्व तपशील त्यांच्या वहीमध्ये लिहून घेतात. "इतकी कसून चौकशी का केली जाते?" हा माझ्या मनामधे साहजिकच आलेला प्रश्न मी तिथल्या सुरक्षारक्षकाला विचारला असता, गेल्या ऑगस्ट महिन्यामधे घडलेली एक धक्कादायक सत्यघटना त्याने सांगितली. परभणी जिल्ह्यातील एका विवाहित स्त्रीने लोणार सरोवराच्या परिसरामधे येऊन, एका साथीदाराच्या मदतीने आपल्या तरुण व अविवाहित प्रियकराचा गळा आवळून खून केला होता. मारेकऱ्यांनी त्या तरुणाचा मृतदेह तिथल्या झाडीमधे टाकून दिला होता. त्या घटनेनंतर, या परिसरात येणाऱ्या प्रत्येकाचे आधारकार्ड तपासून, नाव, गाव व फोननंबर यांची नोंदणी करण्याचे आदेश पोलिसांकडून जारी झाले आहेत. ही घटना ऐकून, माझ्या अंगावर अक्षरशः शहारा आला.
लोणार सरोवराच्या परिसरात शिरल्यानंतर काही दगडी पायऱ्या उतरून खाली जावे लागते. रस्त्याच्या पातळीपासून जेमतेम २५-३० मीटर्स खाली गेल्यावर गोमुख तीर्थ आणि इतर काही देवळांचा समूह लागतो. त्याच्याच डाव्या बाजूला जरा वरच्या भागामध्ये भल्यामोठ्या पिंपळाच्या झाडाजवळ हटेश्वर मंदिर आहे. त्याच्या बाजूलाच नारदेश्वर मंदिर आहे. तिथेच एक आयताकृती सुंदर लॉन तयार करून या भागाचे सुशोभीकरण करण्याचा थोडाफार प्रयत्न झालेला आहे. आम्ही ती मंदिरे परतीच्या वाटेवर बघायचे ठरवले आणि सरोवराच्या दिशेने पायऱ्या उतरायला लागलो. काही अंतर गेल्यावर पायऱ्या संपून पायवाट लागते. तिथेच वनखात्याचे सुरक्षारक्षक बसलेले दिसले. त्यांनी आम्हा दोघांकडून प्रत्येकी चाळीस रुपये घेऊन प्रवेशिका दिली. त्यानंतर आम्ही पुन्हा ती पायवाट धरली. लोणार सरोवराभोवती एकूण बरीच सुंदर मंदिरे आहेत. सगळी मंदिरे, त्यांचे वैशिष्ट्य आणि इतर बरेच काही मी पुढील भागांमधे सांगणार आहे.
शुक्रवार, ७ फेब्रुवारी, २०२५
बुलढाणा जिल्ह्यातील भ्रमंती-२
आम्ही सिंदखेडराजाहून दुपारी चार-साडेचारच्या सुमारास शेगावच्या दिशेने निघालो. वाटेवरच सुमारे १६-१७ किलोमीटरवर असलेल्या देऊळगावराजा गावातले बालाजीचे देऊळ आम्हाला बघायचे होते. रस्ता चांगला असल्यामुळे आम्ही अर्ध्या तासातच पोहोचलो. देवळापर्यंत जाणाऱ्या चिंचोळ्या गल्ल्यांमधे दोन्ही बाजूला, साधारण सर्व देवस्थानांच्या ठिकाणी असतात तशी दुकाने होती. या बालाजीच्या देवळातली मूर्ती लखुजीराजांना सापडली असे म्हणतात. जगदेवराव जाधवांनी बांधलेल्या मूळ देवळाचा जीर्णोद्धार १९५२ साली केला गेला. जाधवांचे वंशज या देवळाचे विश्वस्त आहेत.
या मंदिराला बालाजीचे दुकान किंवा देवघर असे म्हणले जाते. मंदिराला कळस नाहीये. या देवळातील बालाजीची मूर्ती यातुशय सुबक आणि मोहक आहे. बालाजीच्या उजव्या बाजूला श्रीदेवी आणि डाव्या बाजूला भूदेवीची मूर्ती आहे. बालाजीच्या मस्तकावर नागफणी आणि त्यावर पाचू बसवलेला आहे. या बालाजीला 'प्रतितिरुपती' असेही म्हणतात. तिरुपतीच्या मंदिरामधे बोललेला नवस या मंदिरामधे फेडता येतो असे मानले जाते. या देवळामध्ये देणगी देणाऱ्या भक्तांना, त्यांनी दिलेल्या देणगीच्या प्रमाणात काही टक्केवारीवर प्रसाद दिला जातो, हे या मंदिराचे वैशिष्ठ्य आहे. नवरात्रात लाखो भक्तांच्या उपस्थितीत उत्सव साजरा होतो. आम्ही गेलो तेव्हा मात्र तिथे भक्तांची फारशी वर्दळ नव्हती. दर्शन घेऊन बाहेर पडलो तेंव्हा एक वयस्कर विक्रेता, खाण्याचा डिंक आणि जिरे विकायला रस्त्याकडेलाच बसलेला दिसला. त्याच्याकडचा डिंक अगदी उत्तम प्रतीचा असल्याची तो ग्वाही देत होता आणि मी डिंक विकत घ्यावा यासाठी तो फारच गळ घालत होता. जिरे चांगल्या प्रतीचे आहे हे मला वासावरून कळत होते पण डिंकाबद्दल खात्री नव्हती. तरीही मी एक किलो डिंक आणि अर्धा किलो जिरे विकत घेतले. भाव, दर्जा यांची फारशी चिकित्सा न करता, मी इतकी लवकर खरेदी केलेली बघून आनंदला भलतेच आश्चर्य वाटले. घरी परतल्यानंतर गरम तुपामध्ये डिंक चांगला फुलल्यावर माझा चेहरा आनंदाने फुलला हे सांगायलाच नको.
संध्याकाळी पाचच्या सुमारास आम्ही चिखली-खामगावमार्गे शेगावकडे निघालो. शेगावच्या 'श्री गजानन महाराज संस्थान'तर्फे चालवण्यात येणाऱ्या 'आनंदविहार' या अतिथीगृहातच मुक्काम करावा असे माझ्या मैत्रिणीने आवर्जून सांगितले होते. संभाजीनगरहून निघण्यापूर्वीच आम्ही ऑनलाईन किंवा फोनबुकिंग करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, "शेगावपासून अर्ध्या तासाच्या अंतरावर पोहोचलात की फोन करा. खोली मिळून जाईल" असे आम्हाला फोनवर सांगण्यात आले हॊते. खामगावला पोहोचलो तेंव्हा आम्ही 'आनंदविहार'ला फोन केला. पण, "माऊली, इथे खोलीसाठी भक्तांची मोठी रांग लागली आहे. कमीतकमी दोन तासांचे वेटींग आहे. बराच वेळ थांबूनही खोली मिळेल याची खात्री देता येत नाही. आपणही येऊन रांगेत थांबू शकता." असे उत्तर अतिशय नम्रपणे देण्यात आले. सूर्यास्त होऊन अंधार पडायला लागला होता. दिवसभराच्या प्रवासामुळे आम्ही दोघेही कंटाळलेलो होतो. आनंद दिवसभर ड्रायव्हिंग करत असल्यामुळे त्याला विश्रांतीची नितांत गरज होती. त्यामुळे मी पुन्हा फोन केला. परंतु, नम्र स्वरामधे तेच उत्तर देऊन फोनवरची व्यक्ती म्हणाली, "माऊली, इथे जागा मिळेल याची खात्री देता येणार नाही. शेजारी आमचेच 'आनंद विसावा' नावाचे अतिथीगृह आहे, तिथे चौकशी करा." पण तिथेही आम्हाला विनम्र स्वरात नकारघंटाच ऐकू आली. आम्ही बरेच हिरमुसलो होतो. तरीही मोठ्या आशेने 'आनंदविहार'च्या पार्किंगमध्ये गाडी लावून बुकिंग काउंटरकडे गेलो.
'आनंदविहार'चा परिसर अतिशय विस्तीर्ण, स्वच्छ आणि रम्य आहे. आपल्याला खोली मिळेल की नाही अशी धाकधूक मनामध्ये बाळगून, बुकिंग काऊंटरजवळ आम्ही सुमारे दोन तास रांगेत थांबून होतो. "आत्तापर्यंत असा अनुभव कधीच आलेला नाही" असे रांगेतले अनेकजण आम्हाला सांगत होते. दुसऱ्या दिवशी, म्हणजे शनिवारी एकादशी होती आणि पाठोपाठ रविवार व २६ जानेवारीची सुट्टी असल्याने भक्तांची गर्दी लोटली असल्याचे आम्हाला समजले. काहीजण कंटाळून 'आनंद विसावा' मधे कोणालातरी पाठवून तिकडे खोली मिळवण्याच्या प्रयत्नात होते. आठ वाजून गेले तरी आम्हाला खोली मिळाली नव्हती. आता थकव्यासोबतच पोटात भूकही जाणवत होती. पण आमच्यापैकी किमान एकाला रांगेत थांबणे आवश्यक होते. त्यामुळे आधी मी आणि त्यानंतर आनंदने, तिथल्या उपाहारगृहामधे जाऊन जेवण केले. अतिशय साध्या, सात्विक चवीची थाळी प्रत्येकी केवळ सत्तर रुपयाला होती. अखेर, रात्री साडेनऊच्या सुमारास आम्हाला एक डबलरूम मिळाली आणि आमचा जीव भांड्यात पडला.
'आनंदविहार' येथे राहण्यासाठी २/३/४/५/६ जणांची सोय असलेल्या वेगवेगळ्या आकारमानाच्या एकूण सहाशे खोल्या आहेत. सर्व खोल्यांमधे चोवीस तास गरम पाण्याची सोय आहे. एकंदर परिसर आणि खोल्यांमधली स्वच्छता वाखाणण्याजोगी आहे. खोलीत गेल्याबरोबर अंघोळ करून आम्ही निद्रादेवीच्या अधीन झालो. दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ व नाश्ता उरकल्यानंतर आम्ही श्री गजानन महाराजांचे मुखदर्शन केले. देवळातली चोख व्यवस्था, तेथील सर्व सेवेकऱ्यांची सेवा आणि लोटलेल्या भक्तांचा गजाननमहाराजांच्या प्रति असलेला भक्तिभाव मनाला खूपच भावला. दर्शन झाल्यावर, खोलीवर परतून सामानाची आवराआवर केली. 'आनंदविहार'मधले प्रसन्न, शांत आणि अतिशय सात्विक वातावरण अनुभवायला परत शेगावला यायचेच अशी खूणगाठ मनाशी बांधून आम्ही खोली सोडली. शेगाव सोडताना तिथली सुप्रसिद्ध कचोरी खाण्याचा मोह टाळता आला नाही. गुगलचा सहारा घेऊन एका कुठल्यातरी शर्मांच्या दुकानातील कचोऱ्या विकत घेतल्या. काही बायका डझनावारी 'फ्रोझन' कचोऱ्या विकत घेत होत्या. मी दोन दिवसांनंतर पुण्याला पोहोचणार असल्यामुळे फ्रोझन कचोऱ्या विकत घेता आल्या नाहीत. कचोरीची चव अप्रतिम असली तरीही अशावेळी नेमके स्वतःचे गोलमटोल शरीर डोळ्यासमोर येत असल्यामुळे केवळ एका कचोरीवर समाधान मानले.
सुमारे ११ वाजता शेगाव सोडून आम्ही साडेबारा वाजेपर्यंत मेहेकर येथील 'शारंगधर बालाजी' मंदिरामधे पोहोचलो. या मूर्तीबाबतची सत्यकथा अतिशय रंजक आहे. १८८८ साली, ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मेहेकर गावाजवळच धरणाचे खोदकाम सुरु झाले होते. त्या खोदकामादरम्यान एक मोठी लाकडी पेटी सापडली. त्या पेटीमधे चंदनाच्या सालींमधे गुंडाळलेली बालाजीची अत्यंत सुबक मूर्ती होती. ही मूर्ती ब्रिटिशांनी पळवू नये म्हणून, कुठल्याच मुहूर्ताची वाट न बघता, ग्रामस्थांनी रातोरात त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली. यामुळे संतापलेल्या ब्रिटिशांनी येथील साठ गावकऱ्यांना काही महिने तुरुंगात डांबून ठेवले होते. त्या पेटीवर असलेला ताम्रपट व मूर्तीवरील दागिने मात्र ब्रिटिशांनी हडप केले, असे सांगितले जाते.
काळ्या गंडकी दगडामध्ये कोरलेली, ११ फुटी उंच, चार फुटी रुंद आणि दोन फुटी जाड, अशी ही मूर्ती बालाजीची जगातली सर्वांत मोठी मूर्ती आहे. मूर्तीभोवतीच्या प्रभावळीमधे दशावतार कोरलेले आहेत. चतुर्भुज मूर्तीच्या हातांत शंख, चक्र, गदा व पद्म आहे. बालाजीच्या मूर्तीबरोबर श्रीलक्ष्मी विराजमान असलेली ही एकमेव मूर्ती आहे. त्यामुळे या ठिकाणी लक्ष्मी-विष्णूच्या एकत्रित दर्शनाचा लाभ मिळू शकतो. प्रभावळीवर ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचे एकत्रित चित्र आहे. मूर्तीच्या पायाजवळ जय-विजय आणि भूदेवी आहेत. मूर्तीच्या डोक्यावर असलेल्या मुकुटामध्ये शारंग नावाचे धनुष्य धारण केलेल्या श्री विष्णूंची मूर्ती असल्यामुळे या मूर्तीला शारंगधार-बालाजी असे नाव पडले आहे. आपल्या मनामधे जो भाव असेल तोच भाव मूर्तीच्या चेहऱ्यावर दिसत असल्यामुळे इथे आत्मरूप दर्शनाचा लाभ मिळतो असे म्हणतात. इतकी सुंदर मूर्ती असलेल्या या देवस्थानाचा परिसर मात्र अगदीच रया गेलेला भासला. आम्ही दर्शन घेत असताना तिथल्या सेवेकऱ्यांनी आम्हाला विचारले, "तुम्ही बाहेरगावाहून आला आहात का?" आम्ही हो म्हणताच, मोठ्या अगत्याने ते आम्हाला देवळामागे असलेल्या प्रसादालयात घेऊन गेले. बाहेरगावच्या भक्तांना आवर्जून प्रसाद देण्याची प्रथा तिथे आहे. अप्रतिम चवीची 'साबुदाणा उसळ' म्हणजेच साबुदाणा खिचडी, आणि ताक असा प्रसाद त्या सेवेकऱ्यांनी आम्हाला आग्रहाने खाऊ घातला.
मंदिरामधून बाहेर पडण्याच्या रस्त्यावर नृसिंह मंदिराचा फलक दिसला. संत श्री बाळाभाऊमहाराज पितळे यांच्या ज्ञानमंदिराजवळील सुमारे २०० वर्षे जुन्या वाड्यामध्ये हे मंदिर आहे. संपूर्ण जगामधे जशी १२ ज्योतिर्लिंगे प्रसिध्ध आहेत तशी पौराणिक महत्त्व असलेल्या एकूण ११ नृसिंह मूर्ती आहेत. त्यापैकी सहावे नृसिंह मंदिर हे मेहेकर येथे आहे. ही स्वयंभू प्राचीन मूर्ती कमीतकमी १५०० वर्षे जुनी असावी. ही वाकाटक काळातील मूर्ती आहे असे काही संशोधक मानतात तर काही जणांच्या मते ही उत्तर चालुक्यकालीन असावी. एकुणात, या मूर्तीच्या कालखंडाबाबत एकमत नाही. अनेक शतके जमिनीखालील भुयारामधे ही मूर्ती बंदिस्त होती. येथील पितळे कुटुंबियांपैकी, नागपूरस्थित श्यामराज पितळे महाराजांना दृष्टांत झाल्यामुळे मेहेकर येथील माळीपेठेत असलेली ही हेमाडपंती भुयारामधली ही मूर्ती बाहेर काढली गेली. या मूर्तीची स्थापना १५८१ साली झालेली आहे. गंडकी काळ्या पाषाणामधे कोरलेली ही अतिशय सुंदर आणि सुबक मूर्ती आहे. ही मूर्ती अष्टभुज असून, तिच्या हातांमधे शंख, चक्र, पद्म आणि गदा आहेत. नृसिंहाचा चेहरा, आयाळ, व मुकुटावर आभूषणे अतिशय रेखीवपणे कोरलेली आहेत. हिरण्यकश्यपूच्या पोटामध्ये नृसिंहाची नखे रुतलेली स्पष्ट दिसून येतात. नृसिंहानी भक्त प्रल्हादाबरोबर इथेच भोजन केले आणि ते शांत झाले असा समज आहे. त्यामुळे या देवस्थानात अन्नदानाला खूप महत्त्व प्राप्त झालेले आहे. या मंदिरामधे मुख्य मूर्तीजवळच श्रीकृष्णाची काळ्या पाषाणातील सुबक पण छोटी मूर्ती आहे.
आम्ही काहीही ठरवले नसताना, एकादशीच्या दिवशी तीन देवस्थानाच्या ठिकाणी नतमस्तक होण्याचा योग आपसूकच आला, हे विशेष होते. अशा रितीने पुण्यसंचय करून, मेहेकरहून आम्ही लोणारच्या वाटेला लागलो.
बुधवार, ५ फेब्रुवारी, २०२५
बुलढाणा जिल्ह्यातील भ्रमंती-१
जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात काही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगरला जाणे झाले. शुक्रवारी दुपारपर्यंत काम संपणार होते. त्यानंतर तसेच पुढे लोणारला जावे असे आम्ही ठरवले. अनेक वर्षांपासून लोणार सरोवराला भेट द्यायची इच्छा माझ्या मनामधे होतीच. माझ्या तीन मैत्रिणी नुकत्याच तिथे जाऊन आल्याचे, त्यांनी ग्रूपवर पाठविलेल्या फोटोंवरून कळले होते. त्यामुळे आपणही तिथे जावे आणि आपलेही फोटो शेयर करावेत, असे वाटायला लागले. त्यापैकी एका मैत्रिणीला फोन केला असता तिने, "लोणारपर्यंत जाताच आहात, तर शेगावला पण जाऊनच या", असे आग्रहाने सांगितले. आम्ही दोघेही फारसे भाविक नसल्याने, आवर्जून शेगावला जाण्याचे कदाचित ठरवलेही नसते. पण मैत्रिणीच्या सूचनेप्रमाणे, आम्ही शेगाव आणि इतर एक-दोन ठिकाणांची भ्रमंती करायचे ठरवले.
शनिवार, ४ जानेवारी, २०२५
ना खाऊंगा ना खाने दूंगा !
ना खाऊंगा ना खाने दूंगा !
आपल्या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री, श्री. नरेंद्र मोदीजींनी काही काळापूर्वी ही घोषणा केली आणि त्याचे देशभरामध्ये बरेच पडसाद उमटले. राजकारणामध्ये कोणता नेता काय घोषणाबाजी करतो आणि त्या घोषणा प्रत्यक्षात किती पाळल्या जातात, याबाबत आपण कोणीच न बोललेले बरे. पण "ना खाऊंगा ना खाने दूंगा!" ही घोषणा मात्र माझ्या मनाला भावली होती.
माझ्या मते, वरकमाई करणे ही एक वृत्ती किंवा स्थायीभाव असतो. ज्याच्यामध्ये तो असतो, तो कुठे ना कुठेतरी उफाळून येतोच. यावरून लहानपणी ऐकलेली एक गंमतशीर गोष्ट आठवली. एका राजाच्या दरबारामध्ये एक खाबूनंदन, लाचखोर कर्मचारी होता. त्याला कुठल्याही खात्यात नेमले तरी तो वरकमाई करत असल्याच्या तक्रारी राजाकडे यायच्याच. पण त्या चतुर माणसाला कधीही रंगेहाथ पकडता आलेले नसल्याने राजाला त्याला कामावरून काढूनही टाकता येत नव्हते. शेवटी राजाने त्याला समुद्रकिनारी बसायला सांगितले आणि प्रत्येक दिवसभरामध्ये समुद्रात उठणाऱ्या लाटा मोजण्याचे काम दिले. थोड्याच दिवसांत पुन्हा या महाशयाविरुद्ध राजाकडे तक्रारी यायला सुरुवात झाली. समुद्राच्या काठी बसून हा कुणाकडून आणि कशी लाच खात असेल? या बद्दल राजाला भलतेच कुतूहल वाटले. "राजाने मला समुद्राच्या लाटा मोजण्याचे काम दिलेले आहे. तुमच्या जहाजाच्या हालचालीमुळे, या सरकारी कामात व्यत्यय येत आहे' अशी सबब सांगून हा महाभाग किनाऱ्यावर आलेल्या प्रत्येक जहाजाच्या कप्तानाकडून पैसे खात होता! त्यामुळे पैसे खाण्याची वृत्ती असलेला मनुष्य कुठल्या तरी मार्गाने पैसे खाणार हे निश्चित.
आनंदने, म्हणजे माझ्या नवऱ्याने, २६ वर्षे सेनाधिकारी म्हणून नोकरी केली, आणि कर्नल पदावर असताना, त्याने ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतली. सैन्याच्या नोकरीमधे वरकमाई करण्याचे प्रसंग तसे कमीच येतात. त्यातून सैन्याच्या शिस्तीमधे असे काही करताना पकडले गेल्यास कडक कारवाई होण्याची जबरदस्त भीती असतेच. तरीदेखील, 'लाचखोरी' हा स्थायीभाव असलेल्या, सैन्यातल्याही काही लोकांबाबत, लाच खाणे, लाच देणे किंवा इतरही गैरप्रकार क्वचितप्रसंगी कानावर येतातच. आनंदने चार वर्षे, अलाहाबाद येथील सर्विसेस सिलेक्शन बोर्ड (SSB), म्हणजेच सेनाधिकारी निवड समितीवर काम केले. तीन अधिकाऱ्यांच्या संयुक्त समितीमधील तो एक सदस्य असे. त्याकाळी अलाहाबाद रेल्वे स्टेशनवर काही भुरट्या एजंट लोकांचा सुळसुळाट होता. सेनाधिकारी होण्यासाठी आलेल्या उमेदवारांना अलाहाबाद स्टेशनवर उतरल्या-उतरल्या हे एजंट लोक गाठत असत. "आम्ही तुमची निवड करून देण्यासाठी मदत करू. परंतु, त्यासाठी निवड समितीतील अधिकाऱ्यांना काही पैसे द्यावे लागतात. सेनाधिकारी म्हणून तुमची निवड न झाल्यास, तुमच्याकडून घेतलेली अर्धी रक्कम तुम्हाला परत मिळेल" असे आमिष दाखवून अनेक उमेदवाराकडून ते एजंट पैसे घेत असत. प्रत्यक्षात, सेनाधिकारी निवडण्याची प्रक्रिया अत्यंत निष्पक्षपणे होईल याची दक्षता घेतलेली असते. त्यासाठी निवडसमितीवरील अधिकाऱ्यांवर, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे बरीच बंधनेही घातलेली असत. परंतु, सेनाधिकारी निवड प्रक्रियेमध्ये सरसकट लाचखोरी चालत असल्याचा गैरसमज उमेदवारांमधे पसरवून, मधल्यामधे ते लबाड एजंटस भरपूर कमाई करत असत. कधी-कधी निवडसमितीच्या अधिकाऱ्यांना लाच देण्याचा प्रयत्नही व्हायचा. त्या काळात आनंदलाही एक-दोन वेळा लाच देण्याचा प्रयत्न झाला होता. लाच घेण्याच्या किंवा देण्याच्या सक्त विरोधात असल्यामुळे, आनंद त्या प्रलोभनाला कधीच बळी पडला नाही.
वैयक्तिक पातळीवर 'ना खाऊंगा ना खाने दूंगा!' हे तत्व काटेकोरपणे पाळणे आपल्या देशामधे तसे अवघडच आहे. या घोषणेचा पहिला भाग, म्हणजे लाच न खाणे, एकवेळ शक्य आहे. कारण त्या गोष्टीवर बऱ्याच अंशी स्वतःचे नियंत्रण असू शकते. पण काही 'मलईदार' सरकारी खात्यांमधे, लाच न खाणारा कर्मचारी इतरांना नकोसा असतो. कधी-कधी अशा कर्मचाऱ्याला वरचेवर बदली, सहकाऱ्यांकडून होणारी कुचेष्टा, वरिष्ठाकडून अपमानास्पद वागणूक, अशा अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. आजही कित्येक सरकारी कामांमधे, लाच दिल्याशिवाय योग्यप्रकारे आणि वेळच्यावेळी काम होत नाही हे आपण ऐकतो. म्हणूनच, सामान्य माणूस, 'ना खाने दूंगा' हे तत्व सहजी पाळू शकत नाही. किंबहुना, सर्वसामान्य भारतीय नागरिकाला लायसेन्स काढण्यापासून ते पासपोर्ट मिळवण्यापर्यंत, सर्व कामे, थोडीफार लाच देऊन करून घेण्यामध्ये फारसे काही गैर वाटत नाही. परंतु दुर्दैवाने, लाच देऊनसुध्दा एखादे काम व्यवस्थित होईलच याची खात्री नसते. १५ वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्रामधे वास्तव्यास असलेल्या एका अमराठी सेनाधिकाऱ्याला येथील रहिवासी दाखला (डोमिसाईल सर्टिफिकेट) हवे होते. अनेक वेळा विहित नमुन्याचा अर्ज आणि योग्य शुल्क भरूनही महाराष्ट्र राज्याचा रहिवासी दाखला त्याला काही केल्या मिळत नव्हता. शेवटी नाईलाजाने त्याने एका एजंटला गाठले व ६००० रुपये देऊन आपले काम करून घेतले. पण प्रत्यक्षांत जेंव्हा त्याच्या हातात दाखला आला तेंव्हा त्यावर 'भारत देशाचा रहिवासी' इतकेच लिहून आले होते! झालेल्या चुकीबाबत चौकशी केली असता त्या एजंटने हात वर केले. त्यानंतर त्या एजंटने पुन्हा ६००० रुपये उकळले आणि मगच त्या अधिकाऱ्याला दाखला मिळाला!
आमच्यापुरते बोलायचे तर, 'ना खाऊंगा ना खाने दूंगा ' या तत्वाचे पालन करण्यासाठी मी आणि आनंद, कसोशीने प्रयत्न करतो. लाचखोरीच्या संदर्भातील ही घोषणा आठवण्यासाठी एक कारण नुकतेच घडले. काही दिवसांपूर्वी एका रिसॉर्टमधे, सुमारे ऐंशी वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत आमच्या मुलाचे 'डेस्टिनेशन वेडिंग' झाले. लग्नाचे मुख्य कार्यक्रम पार पडल्यानंतर शेवटच्या रात्री, आम्ही एक कॉकटेल पार्टी ठेवलेली होती. त्या रिसॉर्टकडे मद्यविक्रीचा कायमस्वरूपी परवाना नसल्यामुळे आमच्या पार्टीसाठी एका दिवसाचा परवाना काढणे आवश्यक होते. एक्साईज खात्याच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करून आणि ३८०० रुपये शुल्क भरून तो परवाना मिळवता येतो, ही खात्रीशीर माहिती आनंदला मिळालेली होती. परंतु, रिसॉर्टवाल्यानी तो परवाना काढून देण्यासाठी १५००० रुपये मागितले. अर्जासोबत लागणाऱ्या विहित शुल्काव्यतिरिक्त वरचे पैसे 'एक्साईज' खात्याच्या अधिकाऱ्यांना द्यावेच लागतात, त्याशिवाय परवाना मंजूर होतच नाही' अशी माहिती रिसॉर्टच्या व्यवस्थापकाने पुरवली. अर्थात लाच घेणे-लाच देणे, हे आमच्या तत्वाच्या विरुद्ध असल्याने आम्ही योग्य मार्गानेच परवाना काढायचे ठरवले.
कार्यक्रमाच्या बरेच दिवस आधी आनंदने त्या परवान्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु केली. ते करतानाही बऱ्याच बारीक-सारीक अडचणी आल्या. त्या साईटवर अपलोड करावी लागणारी कागदपत्रे व फोटो अमुक इतक्या आकाराचेच आणि तमुक फॉरमॅटमधेच असणे अनिवार्य होते. ती कागदपत्रे योग्य आकार व फॉरमॅटमधे बसवून साईटवर अपलोड करेपर्यंत, तो सर्व्हर डाऊन होई. मग पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागे. अशा अनंत अडचणी पार करत-करत शेवटी एकदाचा तो अर्ज त्या वेबसाईटवर अपलोड झाला. त्यानंतर परवाना शुल्क भरण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्याच दुसऱ्या एका वेबसाईटवर जाणे आले. त्यामध्येही अनेक अडचणी पार केल्यानंतर अखेर ते शुल्क भरले गेले. एक-दोन दिवसातच रिसॉर्टच्या व्यवस्थापकाचा आनंदला फोन आला, "साहेब, तुम्ही परवान्यासाठी आमच्या रिसॉर्टच्या नावे ऑनलाईन अर्ज केल्यानंतर इथल्या एक्साईज ऑफिसातून मला असे सांगण्यात आले आहे की गावातल्या काही संघटना ओल्या पार्ट्यांच्या विरोधात आहेत. त्यामुळे परवाना मिळायला अडचण येऊ शकते. त्यासाठी आपण कार्यालयात येऊन भेटावे असे तिथल्या कर्मचाऱ्याने मला सांगितले आहे." मात्र आनंदने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. काही दिवसानंतर ऑनलाईन परवाना मंजूर झाला व आनंदने घरीच त्याचा प्रिंटाऊटही काढून घेतला. दुसऱ्या दिवशी रिसॉर्टच्या व्यवस्थापकाचा आनंदला पुन्हा फोन आला, "साहेब, एक्साईज डिपार्टमेंटच्या क्लार्क बाईंनी सांगितले आहे की ऑफिसात पैसे भरून परवान्याची प्रत घेऊन जा. त्यासाठी मला पाच-दहा हजार रुपये सोबत घेऊन जावे लागेल. तर कसे करायचे?" आनंदने त्या व्यवस्थापकाला सांगितले, "त्या ऑफिसमधील क्लार्क बाईंना ठणकावून सांगा की योग्य शुल्क भरून मंजूर झालेल्या परवान्याची प्रत माझ्याकडे आहे. तरीही वर काही पैसे हवे असल्यास त्या बाईंनी तसे लेखी द्यावे किंवा मला मेसेज करावा." त्यानंतर मात्र आनंदला कुणाचाही फोन आला नाही, आणि सर्व नियमांचे पालन करून आम्ही आयोजित केलेली कॉकटेल पार्टीही निर्विघ्नपणे पार पडली.
लग्नाच्या निमित्ताने ठरवलेले सर्व कार्यक्रम आनंदात पार पडावे, अशी आमची इच्छा होती. "देऊन टाका ना वरचे पाच-दहा हजार रुपये. परवाना मिळवण्याची कटकट तरी वाचेल." असा सल्ला देणारे लोकही आम्हाला भेटले. पण "ना खाऊंगा ना खाने दूंगा!" या तत्वाला मुरड घालायला आम्ही तयार नव्हतो. आमचा बराच वेळ आणि श्रम खर्ची पडले असले तरी ती इच्छा पूर्ण झाल्याचा आनंद त्याहून खूप मोठा होता.
लाच देणे-घेणे हे अनेक देशवासीयांच्या रक्तात भिनले आहे हे पदोपदी जाणवते. आपल्यापैकी प्रत्येकाने थोडी अधिक धडपड करून, जर "ना खाऊंगा ना खाने दूंगा' हा मंत्र जपला तरच काहीतरी फरक पडेल असे वाटते.
शनिवार, २३ नोव्हेंबर, २०२४
सब घोडे बारा टक्के!
२० नोव्हेंबर २०२४ ला महाराष्ट्रामधे विधानसभेसाठी मतदान झाले.
"आपले मत मोलाचे असते. ते वाया घालवू नका", "माझ्या एका मताने काय फरक पडणार आहे, असा विचार करून मतदान टाळू नका" किंवा," मतदारांनो, आपल्या मतांसाठी पैसे घेऊ नका. आपले मत विकू नका" असल्या संदेशाचा, पांढरपेशा वर्गाच्या व्हाट्सएप्प ग्रुपवर सुळसुळाट झालेला होता. सुशिक्षितांच्या ग्रुपमध्ये हे असले संदेश काही कामाचे नसतात, असे मला वाटते. आपले मत वाया घालवू नये किंवा एका मताने काय फरक पडतो हे न कळण्याइतका पांढरपेशा वर्ग निर्बुद्ध नाही. आणि या वर्गातल्या कोणालाही कधीही कोणताही राजकीय पक्ष मतांच्या बदल्यात पैसे देत नाही. त्यामुळे तिसऱ्या संदेशाचाही आपल्यासारख्याना काही उपयोग नसतो. पण ते असो.
मतदानाच्या आदल्या दिवशी, पुण्यात माझ्याकडे काम करणारी मोलकरीण म्हणाली," ताई मी उद्या सुट्टी घेणार आहे."
मी म्हणाले," ठीक आहे. जरूर सुट्टी घे. मतदान करायचे असेल ना. "
" हो, आणि पैसे पण मिळणार आहेत."
मी म्हणाले, " खरंच पैसे वाटतात का गं ?
" हो. वाटतात की " ती निर्विकारपणे उत्तरली.
" दर निवडणुकीला पैसे वाटतात का ?"
" देतात ना. दर वेळी देतात. आमच्या घरात तर आम्ही आठ जण मतदार आहोत. प्रत्येकाच्या नावाने देतात."
" कुठली पार्टी देते गं ?" मी कुतूहलाने विचारले.
" आमच्या वस्तीत एकच पार्टी देते. तिकडे दुसऱ्या मुहल्ल्यात दुसरी पार्टी देते."
मतदानाच्या दुसऱ्या दिवशी ती आल्याबरोबर मी तिला विचारले, "मतदान केलेस का गं ?'
डाव्या हाताची तर्जनी माझ्यासमोर धरून ती म्हणाली "हे बघा. केले की ताई"
"पैसे मिळाले का? कसे आणि कुठे देतात गं पैसे?" मी उत्सुकतेपोटी विचारले.
" हो. मिळाले की पैसे. घरी येऊन नोटा देऊन जातात. यावेळी प्रत्येक मताला तीन हजार दिले की . आमच्या सगळ्यांच्यात मिळून २४००० रुपये मिळाले"
मी आश्चर्यचकित झाले.
ती पुढे बोलू लागली, "वर आम्हाला प्रत्येकाला, काहीतरी खूण केलेली वीस रुपयाची एक-एक नोट देऊन गेले आहेत. ती जपून ठेवायला सांगितले आहे"
" ती नोट कशासाठी?"
"ज्यांनी पैसे दिले आहेत त्यांची पार्टी निवडून आली की आम्ही ती वीसची नोट त्यांना दाखवायची. त्यानंतर ते अजून पैसे देणार म्हणाले आहेत.
हे सगळे ऐकून मी थक्क झाले.
" पण मग तू मत कोणाला दिलेस?"
" ज्यांनी पैसे दिले त्यांच्या उमेदवारालाच मत दिले. आम्ही बेईमानी नाही करत."
निवडणूकांमधे गरिबांची मते विकत घेतली जातात, हे अगदी लहानपणापासून मी ऐकून आहे. लहानपणी आमच्या घरातल्या मोलकरणींना निवडणुकीच्या आधी नव्या साड्या मिळायच्या, झोपडपट्टीतील पुरुषांना धोतरजोडी मिळायची. पुढे अनेक राजकीय पक्ष मतदारांना वेगवेगळ्या पद्धतीने विकत घ्यायला लागले. पण यावेळच्या निवडणुकीत राजकीय पक्षांच्या कल्पकतेला धुमारे फुटले होते, असे वाटले.
दिवाळीच्या आधी सोलापूरला गेले होते. तोपर्यंत महाराष्ट्रामधे निवडणुकीचे वारे वाहायला लागलेच होते.
मी आलेली आहे हे बघितल्यावर आमच्या शेजारी राहणारी सत्तरीची यास्मिन, मला भेटायला घरी येऊन बसली. गप्पा मारता-मारता सांगू लागली " मैं दिवालीमे अजमेर दरगेको जा रहीं हूँ. इसबार इन लोगोने बहोत अच्छा किया हैं. वहीच लोग हं सबकू लेको जा रहे है. सब खाना-पिना, गाडी सब उनकाच हैं. आपन खाली जानेका. खाली एक फार्म भरकु ले रहे हैं और एक फोटू और आधार कार्डकी कापी देना हैं. दिवालिके बाद निवडणुका हैं ऐसा बोल रहे हैं."
तिने एका राजकीय पक्षाच्या नेत्याचे नाव घेतले.
थोड्या वेळाने सोलापूरची मोलकरीण आली आणि आनंदाने सांगू लागली "ताई, दिवाळीनंतर दोन दिवस अष्टविनायकाला जाणार आहे."
सदैव कर्जबाजारी असलेली ही बाई, कामाचा खाडा करून अष्टविनायकाला जाण्याचा खर्च कसा करणार आहे? हा प्रश्न मला पडला. मी तिला काही विचारायच्या आत तिनेच खुलासा केला, "निवडणूका आल्यात नव्ह. म्हणून आम्हाला नेणार आहेत."
तिनेही दुसऱ्या एका राजकीय पक्षाचे नाव घेतले.
आपल्या देशामधे कुठलाच पक्ष धुतल्या तांदुळासारखा नाही. सगळे पक्ष एकमेकांवर पैसे वाटपाचे आणि मतदारांना विकत घेण्याचे आरोप करत असतात. पण निवडणूक तोंडावर आली की सर्वच पक्षांकडून पैसे वाटप होते. एकप्रकारे, तळागाळातील बहुजनांचा तात्पुरता आर्थिक विकास घडतो इतकेच!
उद्या सकाळी माझी मोलकरीण कामाला आली की, "त्या वीस रुपयाच्या नोटेच्या बदल्यात तुला कधी आणि किती पैसे मिळणार?" हा प्रश्न विचारून तिचे उत्तर ऐकायला मी उत्सुक आहे.
डॉ. स्वाती बापट
मंगळवार, २९ ऑक्टोबर, २०२४
अवघे एकशे वयमान!
रविवार, ९ जून, २०२४
एज इज नॉट जस्ट अ नंबर !
आज एकसष्ठी पूर्ण झाली. मध्यरात्रीपासूनच अनेक मित्र-मत्रिणी,आप्तांच्या आणि माझ्या बालरुग्णांच्या पालकांच्या शुभेच्छांचा नुसता पाऊस पडतोय. "आतातरी जरा तुझा बालिशपणा सोडून देऊन, जरा पोक्तपणे वागत जा" असा लाडिक सल्ला माझ्या काही 'हितचिंतकांनी' दिला. तर माझा एक वर्गमित्र फोनवर शुभेच्छा देत म्हणाला, "तुला एकसष्ट वर्षे पूर्ण झाली? खरंच वाटत नाही. तुझ्या वयाचे आकडे उलटे केले तर १६ हा अंक येतो. परवाच तू तोरण्यासारखा अवघड किल्ला सर केलास. त्यामुळे मला तर तू अजून षोडशाच वाटतेस!" त्याचे ते बोलणे ऐकून मी मनोमन अगदी सुखावले होते. माझ्या काही मोठ्या भावंडानी, 'साठ प्लस' या गटामध्ये माझे मागच्या वर्षीच सहर्ष स्वागत केले होते. आयुष्यातला साठीचा महत्त्वाचा टप्पा ओलांडून, वर एक वर्ष उलटून गेल्यामुळे 'साठ प्लस' या गटामधले माझे स्थान पक्के झाले. माझ्या मोठ्या भावंडानी आणि आप्तस्वकीयांनी माझे हार्दिक अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या! पण आता यापुढे तब्येतीला जपायला हवे असा प्रेमळ सल्ला दिला. माझ्या काही आत्या मावशा आणि काकूंनी, "अगंबाई मागच्याच वर्षी तू साठ वर्षांची झालीस नाही का? खरंच वाटत नाही गं. मला तर तू अजूनही अगदी फ्रॉक आणि दोन वेण्यातलीच अल्लड मुलगी आठवतेस!"
एकूण काय? माझ्या मागच्या वर्षीच्या वाढदिवसाला बोलले तसेच या वर्षीही मला शुभेच्छा देणारे सर्वजण 'वय' या संकल्पनेच्या वेगवेगळ्या पैलूंबद्दलच बोलत होते. त्यामुळे व्यक्तीच्या वयाबद्दल किती वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू शकतात, याचा मला पुनःप्रत्यय आला. सर्वसाधारणपणे वय मोजताना आपण जन्मतारखेपासून किती वर्षे उलटली, इतका आणि इतकाच विचार करत असतो. पण वैद्यकीय परिभाषेमधे केवळ या वयाचा विचार न करता, वयाच्या वेगवेगळ्या पैलूंचा किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या वयाचाही विचार केला जातो. जन्मदिवसापासून आजतागायत जो काळ उलटून गेला आहे त्याला आम्ही Chronological Age म्हणतो. ते महत्त्वाचे असतेच. पण बुद्ध्यांक काढण्यासाठी Mental Age हे खूप महत्त्वाचे ठरते. म्हणजे एखाद्या ठराविक वयाच्या मुला-मुलीच्या मेंदूची वाढ आणि प्रगल्भता, त्यांच्याच वयाच्या इतर मुला-मुलींच्या मेंदूइतकी झाली आहे की नाही, यावर त्या मुला-मुलीचे Mental Age ठरते. Mental Age हे Chronological age च्यापेक्षा बरेच कमी असेल तर त्या व्यक्तीला मतिमंद म्हटले जाते. Mental Age हे Chronological age च्या बरोबरीचे असेल तर त्या व्यक्त्तीचा बुद्ध्यांक १०० असतो. Mental age हे Chronological Age च्या पेक्षा जास्त असणे, अर्थात तुमचा बुद्ध्यांक जास्त असणे, हे कधीही चांगले समजले जाते.
कायद्याच्या परिभाषेमधे Legal Age ला खूपच महत्त्व असते. लग्न करणे, मतदानाचा हक्क मिळणे अशा अनेक गोष्टींसाठी Legal Age लक्षात घेतले जाते. वयाची १८ वर्षे पूर्ण झालेली नसल्यास, त्या व्यक्तीला भारतीय कायद्याच्या नजरेमध्ये 'अल्पवयीन' समजले जाते. 'अल्पवयीन' वयोगटासाठीचे कायदे, त्यांच्यातील गुन्हेगारांना मिळणाऱ्या शिक्षा वेगळ्या असतात. अशा अल्पवयीन व्यक्तींना कायद्याने काही विशेष हक्कही दिले गेलेले आहेत. हे हक्क, व हे कायदे बालकांच्या सुरक्षिततेसाठी खूपच महत्त्वाचे आहेत. काही दिवसांपूर्वी, साडेसतरा वर्षे वयाच्या एका मुलाकडून पुण्यात घडलेल्या एका मोठ्या अपघातानंतर, Legal Age वर खूप उहापोह झाला. असाच उहापोह 'निर्भया' हत्याकांडाच्यावेळीही झाला होता. बाल न्याय अधिनियमातील तरतुदींनुसार, वय वर्षे १६ ते १८ च्या दरम्यानच्या कुणा व्यक्तीने एखादा जघन्य अपराध केल्यास, त्या व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक स्थितीचे तज्ज्ञांद्वारे मूल्यमापन केले जाते. सदर गुन्हा करण्याकरिता व त्याचे परिणाम जाणण्यासाठी ती व्यक्ती सक्षम असल्याचा निर्वाळा तज्ज्ञांनी दिल्यास त्या व्यक्तीला कायद्याच्या दृष्टीने 'प्रौढ' मानून खटला चालवला जाऊ शकतो व तिला कठोर शिक्षा होऊ शकते.
एखाद्या व्यक्तीच्या प्रत्यक्ष वयाच्या मानाने, तिच्या शारीरिक अवयवांचे वय किती आहे? म्हणजेच एखाद्या व्यक्तीचे अवयव त्याच वयाच्या इतर व्यक्तींच्या अवयवाच्या मानाने कितपत सक्षमपणे काम करू शकत आहेत यावरून त्या व्यक्तीचे Biological Age ठरते. आपला आहार, आपल्या आरोग्यपूर्ण सवयी, आपली जीवनशैली, आपली अनुवांशिकता अशा अनेक घटकांवर आपले Biological age अवलंबून असते. आपल्या Chronological Age च्या मानाने शरीर कमी थकलेले असेल तर आपले Biological Age कमी आहे असे म्हटले जाते, व ते कमी असणे वैद्यकीय दृष्ट्या त्या व्यक्तीच्या दीर्घायुरोग्यासाठी उत्तम असते. अशा व्यक्ती वयोवृद्ध होईपर्यंत कार्यक्षण आणि कार्यरत राहू शकतात. त्यामुळे, कोणालाही आपल्या Chronological Age च्या मानाने आपले Biological Age कमी असावे असे वाटणे सहाजिकच आहे.
जीवनातल्या वेगवेगळ्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी, एखादी व्यक्ती तिच्याच वयाच्या इतर व्यक्तींच्या मानाने, मानसिक दृष्ट्या किती सक्षम आहे, यावर त्या व्यक्तीचे Psychological Age ठरते. वयाच्या मानाने Psychological Age जास्त असलेल्या व्यक्ती, तिच्या वयोगटातील इतर व्यक्तींच्या मानाने नवनवीन आव्हानांना सहजी तोंड देऊ शकतात, जास्त उत्साही असतात, नवीन कौशल्ये लवकर आत्मसात करू शकतात, नवीन व्यवसाय किंवा नोकरीमध्ये लवकर आणि सहजी रुळू शकतात किंवा अगदी नवीन विषय व अभ्यासक्रम सहजी पूर्ण करू शकतात. अशा व्यक्तींच्या व्यक्तिमत्वामध्ये एकप्रकारची लवचिकता असते. म्हणजेच, Chronological Age च्या मानाने Psychological Age जास्त असणे चांगलेच म्हणायचे!
प्रत्येक वयोगटातील व्यक्तीकडून एखाद्या संस्कृतीतील सामाजिक नियमानुसार काही ठराविक वर्तनाची अपेक्षा असते. यामध्ये आपली कौटुंबिक व सामाजिक कर्तव्ये पार पाडणे, आपले शिक्षण वेळेवर पूर्ण करणे, अशा गोष्टींचा समावेश असतो. एखादी व्यक्ती, आपल्या वयोगटातील इतर व्यक्तींच्या मानाने स्वतःच्या सामाजिक जबाबदाऱ्या किती सहजी आणि समर्थपणे पार पडते, यावर त्या व्यक्तीचे Social Age अवलंबून असते. म्हणजेच Chronological Age च्या मानाने Social Age जास्त असणे, कधीही चांगलेच समजले जाते.
थोडक्यात काय? आपल्या Chronological Age च्या मानाने आपले mental age, Psychological Age आणि Social Age जास्त असणे, परंतु Biological Age कमी असणे हे सर्वोत्तम!
म्हणूनच मी म्हणते, "एज इज नॉट जस्ट अ नंबर!"
रविवार, २६ मे, २०२४
प्रेरणादायी तोरणा सहल!
या वर्षी एप्रिल-मे महिन्यांतल्या उकाड्यामुळे फारच हैराण व्हायला झाले होते. दोन-तीन दिवस महाबळेश्वरला जायचे पक्के केले होते. पण तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वेल्हे गावातल्या एका रिसॉर्टबद्दल समाजमाध्यमात आलेली एक पोस्ट वाचली आणि तिकडे जावे असे अचानक मनात आले. आम्ही दोघे, माझे वडील दादा, माझा आतेभाऊ राजीव, आणि माझे सोलापूरस्थित काका, श्री. हरि गोडबोले आणि सौ. प्रियंवदाकाकू अशा सहाजणांनी जायचे ठरवले.
आम्ही चौघे पुण्याहून आणि काका-काकू सोलापूरहून, पहिल्या दिवशी दुपारी १२ वाजेपर्यंत पोहोचलो. त्या रिसॉर्टमधून अगदी समोरच तोरणा दुर्ग दिसत होता. वामकुक्षीनंतर चहासाठी म्हणून बागेमध्ये बसलो असताना विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरु झाला. काही क्षणांतच समोरचा तोरणा दुर्ग ढगांच्या आणि धुक्याच्या आड दिसेनासा झाला. सगळ्या परिसरातील दिवे गेलेले असल्याने, बाहेरच पण जरा आडोश्याला बसून रिसॉर्टच्या मालकांशी मनसोक्त गप्पा झाल्या. तोरणा चढायला आणि उतरायला किती वेळ लागतो, गाडी कुठपर्यंत जाऊ शकते, ही माहिती त्यांच्याकडून समजली. दुसऱ्या दिवशी पहाटे उठून गडावर जायचे, असे मी, आनंद व राजीवने फारसा विचार न करता ठरवूनच टाकले. सहलीला निघण्यापूर्वी, तोरणा गडाबाबत काहीही वाचलेले नव्हते किंवा गड चढायचा विचारही केलेला नव्हता हे विशेष.
पहाटे साडेपाच वाजता रिसॉर्टमधून आमच्या गाडीने निघून, आम्ही तिघे तोरणा गडाच्या पायथ्याशी पोहोचलो. आम्ही बरोब्बर पावणेसहा वाजता चढायला सुरुवात केली. आदल्या दिवशीच्या मुसळधार पावसामुळे वाटेवरची खडी चढण निसरडी झाली होती. त्यावेळी आमच्याशिवाय तिथे कोणीही नव्हते. आम्ही slow but steady अशा पद्धतीने, कुठेही न थांबता सतत चढत राहिलो. साधारण वर्षभरापूर्वी आनंदला हार्ट अटॅक येऊन त्याची दोनवेळा angioplasty झालेली असल्यामुळे, माझ्या मनामध्ये जरा धाकधूक होती. पण मी ती कोणाजवळही बोलून दाखवलेली नव्हती. किल्ला चढायला लागल्यानंतर माझीच इतकी दमछाक होत होती की काही बोलायला माझ्या तोंडातून शब्द फुटत नव्हता, हे वेगळेच. माझ्या शरीरातला 'अतिरिक्त' भार पेलत चढणे, हे मोठे जिकिरीचे काम होते. त्या मानाने राजीव आणि आनंदला कमी कष्ट पडत होते. जरूर पडेल तेंव्हा ते दोघे मला हातही देत होते.
अर्धी चढण चढून आम्ही आलो असू तेंव्हा आमच्या मागून काही कोवळी मुले आरडा-ओरडा करत, एकमेकांची चेष्टा करत, गाणी म्हणत, ठिकठिकाणी सेल्फ्या काढत वर येताना दिसली. ती मुले अगदी लीलया वर चढत होती. नुकतीच दहावीची परीक्षा देऊन आलेली जेमतेम सोळा-सतरा वर्षांची ही मुले, हातकणंगल्याहून आली होती. त्यांचे ते सरसर गड चढणे पाहून, त्यांच्यामध्ये मला सोळा-सतरा वर्षे वयाचे शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळेच दिसू लागले. त्या कोवळ्या वयात, शिवरायांसारख्या द्रष्ट्या महापुरुषाने स्वराज्याचे स्वप्न पाहिले, इतर समवयस्क मुलांना प्रेरित केले, हा किल्ला जिकंण्याची मोहीम आखली आणि ती यशस्वीरीत्या पारदेखील पाडली, हे सगळेच आज आपल्यासाठी आश्चर्यकारक, अभिमानास्पद आणि प्रेरणादायी आहे.
तोरणा हा पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच दुर्ग आहे. आम्ही दोन तासात गडावर पोहोचलो. तिथे थोडेफार फिरून, काही फोटो काढून आणि सभोवतालचे नयनरम्य दृश्य डोळ्यामध्ये साठवून आम्ही खाली उतरायला लागलो. त्या वेळी, वीस ते तीस वयोगटातले अनेकजण गड चढताना आम्हाला दिसत होते. बुद्धपौर्णिमेची सुट्टी असल्याने पुण्याहून आलेली कॉलेजची मुले, बँकेतील कर्मचारी, अंत्रोळीहून आलेल्या काही मुली अशी तरुणाई भेटल्यामुळे खूप छान वाटले. पुण्यातील एका कॉलेजचा गट तर चक्क हातात शिवरायांचा जरीपटका घेऊन वर येताना दिसला. त्यांना थांबवून, त्यांच्याबरोबर फोटो काढून घ्यायचा मोह आवरता आला नाही. आजच्या तरुण पिढीला इतक्या वर्षानंतरही शिवरायांचा प्रताप प्रेरणादायी ठरत आहे, हे विशेष.
वेल्हे गावाजवळच, मढे घाटातला लक्ष्मी धबधबा अतिशय प्रेक्षणीय आहे, असे आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी अचानकच समजले. तो बघायला म्हणून, सकाळी साडेसातच्या सुमारास गाडीने बाहेर पडलो. अर्थात भर उन्हाळ्यात आम्हाला धबधबा बघायला मिळणार नव्हताच. वाटेवर गुंजवणी धरणाचा बंधारा आणि भट्टी वाघदरा, केळद वगैरे गावे लागली. वेल्हे गावातून सोळा किलोमीटर, वळणावळणाचा घाटरस्ता पार करून आम्ही धबधब्यापर्यंत पोहोचलो. बराचसा रस्ता निर्मनुष्य होता. ज्या मोकळ्या पठारावरून खाली धबधबा दिसतो, त्या जागेजवळ आम्ही पोहोचलो. सर्वत्र धुक्याचे साम्राज्य होते. अचानक काही लोकांचा बोलण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. पुढे जाऊन पहिले तो, पाच-सहा पुरुषमंडळींनी पठारावरच्या मोकळ्या जागेत लहान-लहान तंबू ठोकून रात्रभर मुक्काम केला होता, असे समजले. त्यांच्यासोबतच्या गप्पांमधून बरीच माहिती मिळाली. केळद गावामध्ये तंबू भाड्याने मिळतात, असेही समजले. पुण्याच्या अभिनव स्थापत्य महाविद्यालयातील प्राध्यापक, श्री. अतुल भागवत नामक अवलियाबरोबर त्यांचे एक-दोन नातेवाईक व मित्र, खास पौर्णिमेच्या रात्री मुक्कामाला तेथे आलेले होते. प्रा. भागवत यांना अवलिया म्हणण्याचे कारण असे की, दर पौर्णिमेच्या रात्री, ते इथे येऊन मुक्काम करतात, कधी नातेवाईक अथवा मित्रकंपूसोबत, तर कधी एकटेच! हे ऐकून आम्हाला अगदी अवाक व्हायला झाले. सरांकडे स्वतःचे दोन तंबूदेखील आहेत. आमच्या परतीच्या वाटेवर, केळद गावातली देवराई बघून जायचा सल्ला भागवत सरांनीच आम्हाला दिला.
देवराईची संकल्पना, पावित्र्य आणि त्यामागची गावकऱ्यांची भावना याबाबत आम्हाला पूर्वकल्पना असली, तरीही प्रत्यक्ष देवराईला भेट देण्याचा अनुभव खूपच सुखद होता. ही देवराई तशी छोटीशीच आहे. देवळाभोवती, वर्षानुवर्षे गावकऱ्यांनी आपुलकीने जतन केलेली झाडे बघून भारावून जायला झाले. आम्ही वाटेवर पाहिलेल्या भट्टी वाघदरा या गावामधे, लोखंड वितळवून शस्त्रास्त्रे बनवण्याची शिवकालीन भट्टी आहे, अशी माहिती आम्हाला नंतर एका मित्राकडून कळली. पण ती माहिती कळेपर्यंत आम्ही वेल्ह्याला पोहोचलो होतो. त्यामुळे ही भट्टी बघायच्या निमित्ताने, पुन्हा या परिसराला भेट द्यायचे आम्ही मनाशी ठरवले.
दोन दिवसांची आमची ही छोटीशीच सहल अनेक कारणांमुळे अविस्मरणीय झाली.
काहीही न ठरवता आणि माहिती न घेता गेलेलो असूनही आम्ही तोरणा किल्ला चढलो. किल्ल्याची चढण बरीच अवघड आहे, हे आधी कळले असते तर माझ्याच मनाने कदाचित कच खाल्ली असती! कारण, मागच्या वर्षी, १२ जून २०२३ रोजी आनंदला हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. त्याच्या हृदयाच्या डाव्या बाजूच्या एका मोठ्या रक्तवाहिनीमध्ये तयार झालेल्या गुठळीमुळे ती रक्तवाहिनी पूर्णपणे बंद झाली होती. (१००% ब्लॉक). त्यावेळी 'इमर्जन्सी अँजिओप्लास्टी' द्वारे ती गुठळी काढून स्टेंट बसवावा लागला होता. त्याच वेळी त्याच्या हृदयाची आणखी एक मोठी रक्तवाहिनी ७० ते ८०% बंद असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले होते. पण तो अत्यवस्थ असल्याने, दुसरी अँजिओप्लास्टी लगेच न करता, ९ ऑक्टोबर २०२३ रोजी केली गेली. आमच्या तोरणा मोहिमेमधे आनंदच्या हृदयाच्या क्षमतेचा कस लागला, आणि मोहीम यशस्वी झाल्यामुळे आमचा आत्मविश्वासही वाढला.
अनेक तरुण-तरुणी, नुसते लोळत सुट्टी न घालवता, किल्ला चढायला आलेले बघूनही आम्हाला खूप कौतुक वाटले. किल्ल्याची अवघड चढण चढताना, "शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप.. .." हे शब्द मनामध्ये घोळत होते. प्रा. अतुल भागवतांच्या भटकंतीच्या कथा ऐकून मी अगदी भारावून गेले.
एकूण काय, तर शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या उत्तुंग, 'प्रचंडगड', अर्थात तोरणा गडाला भेट देऊन मला नवीन ऊर्जा तर मिळालीच, पण तिथली शुद्ध हवा पिऊन, आणि पक्ष्यांचे मंजुळ गान ऐकून, प्रसन्न मनाने आम्ही पुण्याला परतलो.
सोमवार, ६ मे, २०२४
कर्णफुलांच्या गोष्टी!
रविवार, ५ मे, २०२४
जागतिक हास्यदिन?
रविवार, ७ एप्रिल, २०२४
अलगद झेलणे...
आज पहाटे आमच्या घराजवळच्या आर्मी सब एरियाच्या मैदानामध्ये फिरायला गेले होते. तिथे चालण्यासाठी एक छोटाच पण अगदी छानसा सिन्थेटिक ट्रॅक केलेला आहे. त्या मैदानाच्या आवारात खूप जुनी, मोठमोठालीं झाडे आहेत. त्या झाडांची सावली वॉकिंग ट्रॅकवर पडते. तसेच त्या झाडांवर तऱ्हेतऱ्हेचे पक्षी किलबिल करत असतात. वॉकिंग ट्रॅकच्या कडेकडेने रंगीबेरंगी फुलांची झुडपे लावलेली आहेत. एकूणच, या सर्व वातावरणात चालणे अतिशय आनंददायी असते.
आज चालताना ट्रॅकच्या बाजूच्या हिरव्यागार झुडुपावर (Calyptocarpus Vialias) लक्ष गेले. वसंत ऋतूमध्ये या झुडुपावर अतिशय नाजूक अशी पिवळी धमक्क फुले येतात. गर्द हिरव्या पानांच्या मखमली पार्श्वभूमीवर ती पिवळी फुले उठून दिसतात. ते बघायला मला खूप आवडते. आज, नेहमीच्या फुलांबरोबरच, पण या झुडुपाच्या फुलांपेक्षा वेगळ्या आकाराची लहान-मोठी अनेक पिवळी फुले या झुडुपावर मला दिसली. मी जरा निरखून बघितल्यावर, ती फुले या झुडुपाची नसून, शेजारी असलेल्या पिवळ्या गुलमोहोराची (Peltophorum Petrocarpum) फुले आहेत असे लक्षात आले. त्या झाडाची फुले गळून खाली असलेल्या या हिरव्या झुडुपावर पडलेली होती. या झुडुपाने, जणू आपलीच फुले असल्यासारखी पिवळ्या गुलमोहराची ती फुले आपल्या अंगाखांद्यावर अलगद झेललेली होती. ते बघून मला, माझ्या लहानपणीची एक गोष्ट आठवली.
पूर्वीच्या काळी उन्हाळ्याच्या सुट्टीत मुले अगदी हक्काने मामाच्या घरी जात. मामा-मामीची तीन-चार मुले आणि पाहुणे म्हणून आजोळी आलेली पाच-सहा भाचरंडे अगदी गुण्यागोविंदाने तिथे नांदत. स्वतःच्या मुलांमध्ये आणि नणंदांच्या मुलांमध्ये कुठलाही भेदभाव न करता, आमच्या माम्या सर्व मुलांना प्रेमाने खाऊ-पिऊ घालायच्या, त्यांचे रुसवे-फुगवे काढायच्या आणि त्यांचे अमाप लाड करायच्या. त्यामुळेच आमच्या पिढीतल्या सर्वच मुलांचा 'मामी' हा एक जिव्हाळ्याचा विषय असायचा. आजोळी एकत्र जमलेले ते लेंढार आनंदाने आणि अलगद 'झेलणाऱ्या' त्या माऊल्या खरोखर कौतुकाला पात्र होत्या!
एखाद्या प्रसंगाला, किंवा व्यक्तीला 'झेलणे' या उक्तीमधे जरासा नकारात्मक भाव आहे.पण 'अलगद झेलणे' असं म्हटलं की त्या उक्तीला एक सकारात्मकता येते. आजकालची अनेक मुले लग्नच करायला नको म्हणतात. बरं, लग्न केलेच तर आम्हाला मूल नकोच आहे, एकापेक्षा जास्त तर नकोच नको, अशीच विचारसरणी हल्ली होत चालली आहे. आमच्या नंतरच्या पिढीतली कित्येक नाती आधीच हद्दपार होऊन गेली आहेत. आता तर काय? दर घरटी फक्त एकच मूल असल्याने मुलांना भावंडंच नसतात. त्यामुळे त्यापुढच्या पिढीत सख्खा मामा, मावशी, काका आत्या ही नाती नाहीत मग आते, मामे, चुलत आणि मावस भावंडे कुठून असणार?
आजोळी जाणे, मामा-मामीच्या अंगाखांद्यावर अलगद खेळणे, मामीशी गुळपीठ असणे आणि हितगुज करणे या सगळ्या गोष्टींना भावी पिढीला मुकावे लागणार आहे. आपला संपूर्ण समाज कुठेतरी निसर्ग-नियमाच्या विरोधात चालला आहे असं मला वाटतं. पटतंय का तुम्हाला?
बुधवार, २० मार्च, २०२४
चिमणी पाहावी शोधून!
आज २० मार्च, म्हणजे जागतिक चिमणी दिवस.
वळचणीला बसलेल्या आणि सर्वत्र चिवचिवाट करत असलेल्या असंख्य चिमण्या मी लहानपणी पहिल्या होत्या. आज चिमणीचे दर्शन केवळ स्वप्नांमधेच होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र या दुर्लक्षित पक्ष्यासाठी पुढे कधीतरी एखादा 'जागतिक दिवस' राखून ठेवला जाईल असे लहानपणी मला स्वप्नातदेखील वाटले नव्हते.
रोजच्याप्रमाणेच आजही सकाळपासून दिवसभर व्हाट्सऍपवर केवळ चिवचिवाटच चालू होता. त्यामध्ये 'चिमणी' या विषयावरचे बरेच लेख, कविता आणि विनोदही होते. आमच्या शाळेतल्या एका शिक्षिकेचे टोपणनाव विद्यार्थ्यांनी 'चिमणी' असे ठेवले होते. आमच्या शाळेच्या व्हाट्सऍप ग्रुपवर एका वात्रट विद्यार्थ्याने आज त्या 'चिमणाबाईंची' सुध्दा आवर्जून आठवण काढली! पण गेले काही दिवस माझ्या मनामध्ये मात्र एक वेगळीच चिमणी चिवचिवत होती. आजच्या या 'जागतिक चिमणी दिनाचे' औचित्य साधून, त्या चिमणीवर एक लेख लिहून काढायचा मोह मला आवरला नाही!आमच्या घराचे नूतनीकरण करण्याचा धाडसी निर्णय आम्ही नुकताच अमलात आणला. धाडसी निर्णय अशासाठी असे की नूतनीकरणाच्या काळामध्ये, गेले तीन महिने आम्ही आमच्याच घरामध्ये निर्वासितांसारखे राहत होतो. एक-दोन भिंती फोडणे, बाथरूम्स नवीन करणे, खिडक्या बदलणे अशा इतर कामांबरोबर आम्ही 'मॉड्युलर किचनही' करून घेतले. त्या किचनबरोबर 'चिमणी' अत्यावश्यक आहे, हे समजल्यामुळे 'किचन चिमणी'ची शोधाशोध सुरु केली. आजच्या काळात एखादी उडती-फिरती चिमणी शोधण्यापेक्षाही 'किचन चिमणी' शोधणे जास्त अवघड आहे, असे माझ्या लक्षात आले. अनेक वेबसाईट्स, यू-ट्यूब व्हिडीओ, मैत्रिणींची मते आणि समाजमाध्यमातील अनेक ग्रुप्सवर शोधाशोध केल्यावर मी जास्तच संभ्रमात पडले.
मिळत गेलेल्या माहितीतील एकेक तपशील हळू-हळू डोक्यामध्ये शिरायला लागला. किचन चिमणी ६० आणि ९० सेंटीमीटर, अशा दोन आकारामध्ये येते. सर्वसाधारणपणे दोन-तीन बर्नर असलेल्या शेगडीसाठी ६० सेंटीमीटर आणि ४-५ बर्नर असलेल्या शेगडीसाठी ९० सेंटिमीटर्सची शेगडी असावी. तसेच आपल्या गॅसच्या शेगडीच्या लांबी इतकी किचन चिमणी घेतलेली उत्तम. माझ्याकडची गॅस शेगडी तीन बर्नरची असली तरी त्या शेगडीची लांबी जवळपास ७५ सेंटिमीटर्स भरली. पण ७५ सेंटिमीटरमधे अगदीच कमी पर्याय उपलब्ध आहेत. आणि त्या चिमण्यांनाही ६० सेंटिमीटर्सच्या चिमणीचीच मोटार बसवलेली असते, फक्त वरची काच ७५ सेंटिमीटर्सची असते इतकेच. ही बाबा लक्षात आल्यावर मी ६० सेंटिमीटरची चिमणी घेण्याचे ठरवले.
फिल्टरवाली चिमणी घ्यावी का फिल्टरलेस चिमणी घ्यावी? हा प्रश्न पुढे आला. फिल्टरवाली चिमणी घेणेच योग्य आहे, असे माझ्या अभ्यासांती लक्षात आले. कार्बन फिल्टर, मेश फिल्टर आणि बॅफल फिल्टर, अशी वेगवेगळी नावे ऐकून मला, इंग्रजीमधल्या 'to get baffled' या वाक्यरचनेचा अर्थ पुरेपूर कळला!
बरीच माहिती गोळा केल्यानंतर मात्र कुठल्याही प्रकारे baffle न होता म्हणजेच बावचळून न जाता Baffle filter असलेली चिमणीच घ्यायचे पक्के केले. हा Baffle filter फोडणीतले तेल चिमणीच्या मोटारपर्यंत जाऊ देत नाही, असे असले तरी दर दोन-तीन आठवड्यातून तो फिल्टर स्वच्छ करण्याचे काम गळ्यात पडते, हेही खरे. मात्र हा फिल्टर वरचेवर स्वच्छ करून चिमणी वापरली तर स्वयंपाकघरामध्ये चिकट मेणी साठत नाही हे विशेष.
चिमणी ductless घ्यावी का ducted ? हा प्रश्न त्यानंतर उद्भवला. चिमणीमधून हवा बाहेर फेकणारी duct त्याच्या मॉड्युलर किचनच्या सौंदर्यामधे बाधा आणते असे अनेक गृहिणींना वाटते. त्यासाठी त्या ductless चिमणी घेतात. अशा चिमणीमध्ये वरच्या बाजूला एक कार्बन फिल्टर बसवलेला असतो. तो फिल्टर, स्वयंपाकघरातला धूर आणि वास काही प्रमाणात शोषून घेत असला तरीही बाहेर फेकू शकत नाही. तसेच स्वयंपाक करत असताना निर्माण होणारी वाफ आणि गरम हवासुद्धा ही चिमणी बाहेर फेकू शकतनाही. म्हणून मग स्वयंपाकघरातला उकाडा आणि कोंदटपणा कमी होत नाही. Ductless चिमणीमधे बसवलेल्या कार्बन फिल्टरमध्ये काजळी साठून तो दर चार-सहा महिन्यांनी गच्च भरतो आणि नीट काम करेनासा होतो. त्यामुळे कंपनीचा माणूस बोलवून कार्बन फिल्टर बदलावा लागतो. त्यासाठी दीड-दोनहजार रुपये मोजावे लागतात ते वेगळेच. चिमणीची duct डोळ्यांना खुपली तरीही चालेल पण माझे स्वयंपाकघर स्वच्छ ठेवणारी ducted चिमणीच मी घेणार, हे मी पक्के ठरवले. चिमणीच्या खालच्या बाजूला असलेला baffle filter तेल शोषून घेतो, आणि वास, धूर व गरम हवा बाहेर फेकण्याचे काम चिमणीतून घराबाहेर जाणारी duct करते.
बाजारामध्ये 'ऑटो-क्लीन' आणि 'नॉन ऑटो-क्लीन' अशा दोन प्रकारच्या चिमण्या उपलब्ध आहेत. 'ऑटो-क्लीन' चिमणीमध्ये एक बटन दाबले की त्या चिमणीच्या आतल्या बाजूला चिकटलेली मेणी वितळून एका ट्रेमध्ये साठते आणि चिमणी स्वच्छ होते. ही प्रक्रिया दाखवणाराने मस्त व्हिडीओ यू-ट्यूबवर बघायला मिळतात. आपल्या शरीरावर चिकटलेली मेणी, एखादे बटन दाबून बाहेर काढता आली तर किती बरे होईल, हा विचार ते व्हिडीओ पाहताना मनामध्ये आल्याशिवाय राहिला नाही! वर्षातून एकदा तरी कंपनीचा माणूस बोलवून 'नॉन ऑटो-क्लीन' चिमणी, आतून-बाहेरून स्वच्छ करवून घ्यावीच लागते. पण 'ऑटो-क्लीन' चिमणीसुध्दा तशीच दर वर्षी स्वच्छ करवून घ्यायला लागते, हे जसे समजले तशी मी 'ऑटो-क्लीन' चिमणी मनातून बाद करून टाकली.
किचन चिमणी हे तसे बरेच महागडे प्रकरण आहे. इंटरनेटवर बघायला मिळत असलेल्या बऱ्याचशा 'मॉड्युलर किचन'मध्ये 'स्लॅन्टेड' किंवा तिरप्या छताच्या चिमण्या दाखवलेल्या असतात. तिरप्या किंवा स्लॅन्टेड चिमण्या जागा कमी व्यापतात, हे खरे आहे. पण आपण चिमणी ज्या कामासाठी विकत घेतो, त्यासाठी त्या अगदीच कुचकामी ठरतात. केवळ 'आमच्याकडे महागडी किचन चिमणी आहे बरं का!' अशी शेखी मिरवण्यासाठी स्लॅन्टेड चिमण्या उपयोगी पडतात! एखादी वस्तू जास्त महाग असली कि ती जास्त चांगली असते, अशी अनेकांची समजूत असते. पण कित्येकदा तसे नसतेही.
किती suction power असलेली चिमणी विकत घ्यावी हे ठरवण्यासाठी माझ्या मेंदूची बरीच पॉवर खर्च झाली. सर्वसाधारणपणे, सध्याच्या विभक्त कुटुंबात जेमतेम तीन-चार माणसेच असतात. स्वयंपाकघरेही जेमतेम १००-१५० चौरस फुटांची असतात. अशा घरामध्ये १०००-१२०० सक्शन पॉवरची (ताशी १०००-१२०० घनमीटर) चिमणी पुरेशी होते. अशा पॉवरच्या चिमणीचा आवाजही सुसह्य असतो. १०-१२ लोकांच्या कुटुंबात, जिथे सतत आणि भरपूर स्वयंपाक होत असतो अशा कुटुंबासाठी १४००-१५०० पॉवर असलेली चिमणी लागते! पण अशा पॉवरबाज चिमण्यांचा आवाजही जबरदस्त असतो, हे लक्षात घ्यायला हवे. "तो आवाज ऐकल्यावर गिऱ्हाईक पॉवरबाज चिमणी घ्यायला तयार होत नाहीत, म्हणून आम्ही त्या चिमण्या शोरूम्समध्ये ठेवतच नाही" असे एका डीलरने मला दबक्या आवाजात सांगितले! पूर्ण विचारांती माझ्या किचनसाठी मी ११५० पॉवरची चिमणी निवडली.
आपल्या हाताच्या इशाऱ्यावर चालू-बंद होणाऱ्या, वेग कमी-जास्त करणाऱ्या (मोशन सेन्सर किंवा gesture control ) अशा चिमण्या बाजारामध्ये येतात. आपल्या बोटांच्या इशाऱ्यावर सगळे घर नाचावे अशी सुप्त इच्छा स्त्रीच्या मनामध्ये असल्यामुळे, तशी 'मोशन सेन्सर' चिमणी घेण्याचा मोह न पडला तरच नवल! पण तो मोह टाळणेच उत्तम. काही काळातच ते मोशन सेन्सर पॅनल बंद पडते, किंवा त्रास द्यायला सुरुवात करते आणि अखेर बदलावे लागते. खरंतर push buttons ने चालणारी चिमणी सर्वात उत्तम. पण हल्ली बाजारामध्ये तशी चिमणी सहजी उपलब्ध नसल्याने मला इलेक्ट्रॉनिक बटन्स असलेली चिमणी विकत घ्यावी लागली.
अशी 'सर्वगुणसंपन्न' चिमणी एकदाची माझ्या घरात येऊन बसली आणि मला अगदी 'हुश्श' म्हणावेसे वाटले. पण नुसते हुश्श म्हणून गप्प बसेन तर मी कसली?
म्हणून, माझ्या चिमणी-शोधमोहिमेचा वृत्तांत तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीच तर हा चिवचिवाट!
शुक्रवार, १ डिसेंबर, २०२३
दीव-सोमनाथ-व्दारका- ४
पहाटेच्या प्रसन्न वेळी फिरत-फिरत आम्ही सोमनाथ मंदिराचा संपूर्ण परिसर बघितला. त्यानंतर आपापले फोन, पर्सेस वगैरे ताब्यात घेतले आणि जवळच असलेल्या जुन्या शिवमंदिरात गेलो. पुण्यश्लोक अहल्याबाई होळकरांनी बांधलेल्या या जुन्या मंदिरामध्ये मात्र मोबाईल व इतर सामान नेण्यावर काहीही पाबंदी नव्हती. त्यामुळे तिथे आम्हाला फोटो काढता आले. दर्शन घेऊन झाल्यावर आनंद, शिरीष आणि गिरीश हॉटेलवर परतले. प्राचीला अभिषेक करायचा असल्याने आम्ही दोघी मागे थांबलो. प्राची भक्तिभावाने अभिषेक करत होती आणि मी नुसतीच 'मम' म्हणत होते.
मुख्य सोमनाथ मंदिरात पूजा-अर्चा-अभिषेक इत्यादि करण्याची व्यवस्था नाही. ते सर्व विधी अहल्याबाईंनी बांधलेल्या जुन्या मंदिरातच करता येतात. त्याकरता ठरवून दिलेले शुल्क अनेक ठिकाणी फलकांवर लिहिलेले आहे. आपण जमा केलेले पैसे सोमनाथ ट्रस्टला मिळतात आणि ट्रस्टमार्फत नेमलेले गुरुजी ते विधी पार पाडतात. आपल्याला कोणी ओळखीचे गुरुजी हवे असल्यास त्यांच्याकडून आपण विधी करून घेऊ शकतो. पूजा झाल्यावर आम्ही दोघी हॉटेलवर परतलो. सोमनाथ देवळाच्या उत्तरेला काही अंतरावर प्राचीन सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे संग्रहालय आहे पण ते आम्ही पाहिले नाही.
दुपारची विश्रांती झाल्यावर, आनंद, मी आणि गिरीश-प्राची असे चौघे सोमनाथमधील इतर देवस्थाने बघायला बाहेर पडलो. शिरीषला बरे वाटत नसल्याने तो दादांबरोबर हॉटेलमध्येच थांबला. आम्ही लक्ष्मीनारायणाचे देऊळ, सूर्यमंदिर, त्रिवेणी संगम, त्रिवेणी संगम मंदिर, गीता मंदिर, कामनाथ महादेव मंदिर इत्यादी अनेक मंदिरे बघितली. पाच पांडव गुहा सध्या बंद ठेवलेल्या असल्यामुळे त्या बघता आल्या नाहीत. भालका तीर्थ आणि देहोत्सर्ग स्थान ही दोन ठिकाणे भाविकांनी विशेष भेट द्यावीत अशी आहेत. पिंपळाच्या झाडाखाली झोपलेल्या श्रीकृष्णाला हरीण समजून व्याधाने बाण मारला आणि त्यामुळे श्रीकृष्णाचा देहांत झाला अशी पौराणिक कथा आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडली त्याच ठिकाणी भालका तीर्थ आहे. हिरण नदीच्या काठावर देहोत्सर्ग तीर्थ आहे. तिथे भगवान श्रीकृष्णांच्या पावलांचा ठसा आहे. या दोन्ही मंदिरातही बरीच गर्दी होती आणि स्वच्छतेचा अभावच होता.
सोमनाथ मंदिराच्या आवारात रोज संध्याकाळी ''light and sound show" असतो. त्या कार्यक्रमाची तिकिटे गिरीशने संध्याकाळी आधीच जाऊन काढली होती. कार्यक्रम उत्तम होता, पण त्यामध्ये मुख्य भर पौराणिक कथांवर होता. सोमनाथाचे देऊळ कोणी-कोणी आणि किती वेळा लुटले, याचा तपशीलही मिळेल या अपेक्षेने मी गेलेले असल्याने माझा थोडा अपेक्षाभंग झाला. देवळाच्या मागच्या बाजूला समुद्रकिनाऱ्यावर, अंबानी कुटुंबियांनी बांधलेले 'सागर दर्शन' नावाचे अतिथीगृह आहे. तिथे रास्त दरामध्ये राहण्याची उत्तम सोय उपलब्ध आहे. पण त्यासाठी त्यांच्या वेबसाइटवरून, बरेच आधी अर्ज करून आरक्षण करावे लागते. तिथले जेवणही शुद्ध-सात्विक आहे असे समजले.
मागच्या वर्षी आम्ही इजिप्तला गेलो होतो. मूर्तिभंजक आक्रमणकर्त्यांनी तिथल्या प्राचीन मंदिरांची केलेली तोडफोड आम्ही पाहिली होती. मोठमोठ्या शिळा वापरून उभारलेली ती मंदिरे आपल्या मंदिरांपेक्षा अतिभव्य आकाराची असल्याने आक्रमणकर्त्यांना ती पूर्णपणे उध्वस्त करता आली नव्हती. मात्र त्या धर्मांध आक्रमणकर्त्यांनी इजिप्तवासीयांचा धर्म पूर्णपणे नामशेष केला. त्यामुळे, आक्रमण होण्यापूर्वी प्राचीन इजिप्तवासीयांच्या धर्माचे नेमके स्वरूप कसे होते? या प्रश्नाचे उत्तर आज आपल्याला मिळत नाही.
तुलना करायची झाल्यास, आपली मंदिरे जरी वेळोवेळी उद्ध्वस्त झाली तरी आपला धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जतन केला गेला, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. सोमनाथचे मंदिरही मुसलमान आक्रमकांनी कैक वेळा लुटून जमीनदोस्त केले. परंतु, प्रत्येक वेळी, तत्कालीन राजांनी ते मंदिर पुन्हा बांधून घेतले. १९५१ साली पुनर्निमाण झालेले सोमनाथ मंदिर, सनातन धर्माच्या शाश्वततेचे प्रतीक म्हणून आज दिमाखात उभे आहे. याच कारणामुळे हे देऊळ बघण्याची माझी प्रबळ इच्छा होती. पण सोमनाथ मंदिराचा इतिहास बघता, एका गोष्टीचे मात्र मला कमालीचे वाईट वाटते. एकदा हल्ला झाल्यानंतर, आपल्या पूर्वजांनी या मंदिरावर पुन्हा-पुन्हा हल्ले का होऊ दिले?
आजच्या युगात कोणी परकीय आक्रमक येऊन आपल्या मंदिरांवर हल्ला करण्याची शक्यता कमीच आहे. पण समाजमाध्यमांतून, जाहिरातींमधून, आणि लव्ह-जिहाद, सक्तीचे धर्मांतर अशा प्रकारातून, आपल्या धर्मावर आणि संस्कृतीवर सतत हल्ला होतो आहे. झालेला प्रत्येक हल्ला परतवण्यासाठी आपण सक्षम असायला हवे. परंतु, त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे, हल्ला करण्याची कोणाची हिंमतच होऊ नये, यासाठी आपण सजग राहिले पाहिजे असे मला वाटते .
(क्रमशः)














